स्वार्थ: काहि सैल/स्वैर विचार

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जनातलं, मनातलं
3 Aug 2008 - 1:28 am

"अख्खा समाजच स्वार्थी झालाय.. " मी एकदम चमकून पाहिले. ट्रेनच्या डब्यात मागे बसलेल्या दोन व्यक्तींमध्ये हे संभाषण चालू होते.. अख्ख्या डब्याला ऐकू जाईल इतक्या मोठ्याने म्हणणारा अजूनही लेक्चर झोडतच होता "जरा भारतात बघ एकेक व्यक्तींनी सगळ्यांसाठी आयुष्य पणाला लावलं.. रामापासून ते बुद्ध, गांधी अश्या व्यक्तीच्या समाजात स्वार्थीपणा अजून टिकला हेच नवल... "
मी यापुढचेही संभाषण ऐकत होतो.. पण आता कानावर शब्द पडत होते पण कळत नव्हते कारण डोक्यात अचानक विचार चमकला "खरंच आपण स्वार्थी आहोत का?.. मी स्वार्थी आहे का? स्वार्थी असावं का? "

"स्वार्थी कोणाला म्हणावे? " मनाच्या एका कोपऱ्यातून प्रश्न.. स्वतःच स्वत:ला विचारलेला..........
"जो केवळ स्वतःसाठीच जगतो.. स्वतःला हवे तसेच जगतो.. स्वतःला हवे तेच करतो आणि तसेच वागतो तो स्वार्थी! " मनातील दुसऱ्या कोपऱ्यातून आलेले उत्तर....
"हं..... "काही क्षण मन शांत पण दुसऱ्या मनाचे समाधान नाहीच.. पुन्हा प्रतिप्रश्न.. "...... म्हणजे मग स्वतःच्या बायकोच्या, आईच्या, भावाच्या, नववधूच्या मानसिकतेची पर्वा न करता केवळ स्वतःला योग्य वाटते म्हणून तसे वागणारा स्वार्थीच नाही का? "
" तर काय बेलाशक! जी आपल्या भरवशावर नव्या घरात येते, अश्या आपल्या बायकोच्या भावनांची पर्वा न करता स्वतःला हवे ते करणारा स्वार्थी नाहीतर काय? स्वार्थीच तो"
"हं मग राम, बुद्ध, गांधीजी हे ही स्वार्थीच नाही का? नववधूच्या भावनांची यत्किंचित पर्वा न करता लग्नमंडपातून सुखाच्या शोधासाठी पळणारा बुद्धच घे.. कारण काय तर त्याला स्वतःला अंतिम सत्याचा शोध घ्यायचा होता.. बाकी घरच्यांचे काहीही होवो.. मला वाटले मी ते करणार असा म्हणणारा बुद्ध स्वार्थीच नाही का? रामही मग स्वार्थी का नाही? संपूर्ण आयुष्यभर स्वतःच्या मर्जीने चालणारा, केवळ स्वतःच्या प्रतिमेखातर आपल्याला उभ्या वनवासात साथ देणाऱ्या सीतेला पुन्हा महालाबाहेर काढणारा राम स्वार्थीच ना? आपल्या पत्नीच्या भावनांची/गरजांची जाणीव असूनही जराही पर्वा न करता स्वतःला हवे तसे वागणाऱ्या गांधीजींनाही स्वार्थी का म्हणू नये? "
"हं.. माझ्यामते समाजात जे जे चुकीचे वाटले ते ते बदलण्यासाठी 'वैयक्तिक' स्वार्थ बाजूला सारला म्हणून तर ह्या व्यक्ती थोर नाही का? "
"समाजाचे बाबा "हे हे" चुकते हे त्यांनी कसे ठरवले? "
"ते त्यांना तसे वाटले"
"म्हणजे पुन्हा फक्त केवळ स्वतःला वाटते म्हणून समाजाला बदलायला निघाले.. समाजाप्रमाणे स्वतः बदलायचे सोडून केवळ स्वतःच्या हट्टाखातर /आग्रहाखातर त्यांना हवे तसे वागले. गंमत म्हणजे समाजासाठीच काम करताना जवळच्या व्यक्तीची, नातेवाईकांची सोडाच तर त्याच समाजाचीही पर्वा त्यांनी केली नाही. "
"असं म्हणता येईल का? की ज्या विचारांमुळे/कृतींमुळे त्यांच्याशी निगडित समाजाचे भले होईल असा विश्वास त्यांना वाटला. आणि अश्यांवेळी त्यांनी स्वतःवरच्या विश्वासामुळे कोणाचीही पर्वा केली नाही... म्हणून तर ते प्रसिद्ध झाले. इतिहासात बघशील तर अनेक व्यक्ती झाल्या पण त्यात प्रसिद्ध त्याच झाल्या ज्यांनी 'असा' स्वार्थ जोपासला. यापैकी जे जिंकले, विजयी झाले ते समाजसुधारक झाले तर जे हरले ते व्हिलन म्हणून गाजले. आर्य समाजाचे हित ज्यूंचा नायनाट करणाऱ्यामुळेच होईल हे हिटलरला वाटले व त्याने असे केवळ स्वतःला वाटते म्हणून तसे केले. जर ज्यू नामशेष होऊन हिटलरचा विजय झाला असता तर इतिहासात त्याची हेटाळणी झाली असती का? चंगेझ खान जर शेवटापर्यंत अजेय राहिला असता तर केवळ "अल्फा मेल" इतकीच ओळख राहिली असती का? "
"हं म्हणजे प्रसिद्ध होण्यासाठी, काहीतरी करून दाखवण्यासाठी स्वतःवर दुर्दम्य विश्वास हवा. मग त्या विश्वासाला कोणी स्वार्थ म्हणाल तरी बेहत्तर.. मला हे पटलं आहे की यामुळे समाजाचं भलं होईल आणि म्हणून मी ते करीनच असा ऍटिट्युड हवा. आपलं बघ ना आपण सतत दुसऱ्यासाठी जगतो.. घरी आईला काय वाटेल, शेजाऱ्यांना त्रास होईल का?, जाऊ दे मित्र म्हणाला तर त्याचं मन कसं मोडायचं, बापानं कधी नव्हे ते काही सांगितलं आणि ऐकायचं नाही म्हणजे.. असं करतच आयुष्य जातं.. केवळ स्वतःला वाटतं म्हणून, स्वत:ला आवडेल तसाच एकही दिवस आपण घालवत नाही.. "केवळ इच्छा झाली म्हणून" असे कितीसे वागतो??? "
"शेवटी केवळ स्वतःच्या मर्जीने आयुष्य जगणारे आणि दुसर्‍याला जागायला लावणारे कोण? तर थोर परमार्थी आणि ससत दुसर्‍याचा विचार करत स्वतःचे असे काहि क्षण शोधावा लागणारा मी कोण तर स्वार्थी!!!! "

समाजप्रकटनविचार

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

3 Aug 2008 - 2:06 am | प्रियाली

आवडले ऋषिकेशा, सैल विचार मांडलेस म्हणून बरे झाले ;) पण मी जरा विचार घट्ट बांधायचा प्रयत्न करते. :) ह. घे.

बुद्ध लग्नात नाही रे पळाला. रामदासस्वामी पळाले. बुद्ध आपली पत्नी आणि मुलगा यांना मागे टाकून निघून गेला. लग्न-बिग्न झाल्यावर बर्‍याच काळाने. रामानेही सितेला नाही टाकले. तुलसीदासाने त्याला तसे करायला भाग पाडले. मारिओ पुझोच्या गॉडफादरला फिरोजखान ते रामू काय वाट्टेल ते करायला भाग पाडतात ना तसे. ;)

चंगीझ खानही फक्त अल्फा मेल नाही. त्याला टोळीप्रमुख म्हणून जाणणारे अज्ञ आहेत. त्याच्या देशात तो राष्ट्रीय नायक गणला जातो आणि त्याने केलेल्या अत्याचारांची ग्वाही आजही मध्यपूर्व आशियातल्या लोकांच्या रक्तात दिसते. काही नाही तरी भारताला अनेक खान तर पुरवून गेला - हे मात्र ह. घेण्यालायक ;)

चंगीझ, हिटलर, सद्दाम आणि राम, गांधी, बुद्ध यांत खूप साम्य वाटत नाही, जे काही साम्य आहे ते फक्त एखाद्याचा ध्यास घेतल्याचे, ध्येयवेडाचे.

जे गांधींनी केले आणि एखादा व्यावसायिक पैसे मिळवायला, किंवा एखादा कर्मचारी बढती/ प्रमोशन मिळवायला करतो त्यापेक्षा वेगळे नाही. साम्य असे की कामाची नशा चढल्यावर आयुष्यातील काही गोष्टींकडे दुर्लक्ष होते आणि फरक असा की पैसा कमवताना, प्रमोशन कमवताना घराची होळी होईलच असे नाही. असो, गांधींनी केले तेच क्रांतिकारकांनी केले, इतर नेत्यांनी केले. ध्येयाने वेडी झालेली माणसे कोणाचीच नसतात, अगदी त्यांची स्वतःचीही.

जे बुद्धाने केले, समजा की आख्यायिकेप्रमाणे खरंच त्याने रोगजर्जर व्यक्ती, म्हातारी व्यक्ती आणि प्रेत पाहिले आणि इतकीच कारणे त्याला भौतिक जग सोडायला उद्युक्त करून गेली तर त्याच्यात आणि माझ्यात प्रचंड फरक आहे कारण हे सर्व बघून मला क्षणभर वाईट वाटतं, आणि बस एवढंच वाटतं. बुद्धाला मात्र सर्वस्वाचा त्याग करावासा वाटला. बायको-मूल-राज्य-आई वडिल यासर्वांसोबत त्याने "स्वतःचा"ही त्याग केला असावा असे नाही का वाटत? ज्या रात्री यशोधरा आणि राहुलचा निरोप घेतला त्याच रात्री बुद्धाने सिद्धार्थाचाही निरोप घेतला असावा. :) जो स्वतःचाच नाही राहिला, तो स्वार्थी कसा?

बुद्ध, रामदासस्वामींनी जर बायका-पोरांना सोडून दुसर्‍या बाया केल्या असत्या, घरोबा केला असता, माया गोळा केली असती ते करताना समाजाकडे दुर्लक्ष करून आप्पलपोटी जीवन जगले असते तर ते स्वार्थी झाले असते. पण त्यांनी स्वतःसाठी कमवायचे म्हणून काही केले नाही, जे त्यांच्याकडे होते त्याचाच त्याग करत गेले. ते स्वार्थी नाही, म्हणूनच जग त्यांना परमार्थी म्हणून ओळखते. आपण आई-वडिलांचा विचार करतो वगैरे म्हणतो पण त्यासाठी कितीसा त्याग करतो. आपल्याला शक्य असते तेवढेच करतो. श्रावणबाळ फार कमी जन्मतात हल्ली. :)

केवळ आपल्या मनासारखे वागणे म्हणजे स्वार्थ नाही. शेवटी, बुद्ध काय आणि रामदासस्वामी काय दोघेही माणसाच्याच जन्माला आले होते. त्यांच्यातील चांगले गुण पाहून इतरांनी त्यांना मोठेपण दिलं. ते आपल्या मनासारखे वागले पण समाजाला ऋणी करून गेले.

समाजाप्रमाणे स्वतः बदलायचे सोडून केवळ स्वतःच्या हट्टाखातर /आग्रहाखातर त्यांना हवे तसे वागले

हे मात्र खरं! हट्टी माणसंच जगात काहीतरी करतात...सतत इतरांना दबून राहणारी माणसं सहसा आपली छाप पाडण्यात अयशस्वी ठरतात आणि सकारात्मक हट्टाचे फळही चांगले मिळते.

बघ! मिसळपाव कसं जन्माला आलं ते!! हट्टातूनच की! :)

पिवळा डांबिस's picture

3 Aug 2008 - 2:57 am | पिवळा डांबिस

सैल विचारांचा काय गच्च बुचडा बांधलाय!
आखीव, रेखीव, नीटस (आणि म्हणूनच खुलून दिसणाराही)!!! (ह. घ्या)

बुद्ध, रामदासस्वामींनी जर बायका-पोरांना सोडून दुसर्‍या बाया केल्या असत्या, घरोबा केला असता, माया गोळा केली असती ते करताना समाजाकडे दुर्लक्ष करून आप्पलपोटी जीवन जगले असते तर ते स्वार्थी झाले असते. पण त्यांनी स्वतःसाठी कमवायचे म्हणून काही केले नाही, जे त्यांच्याकडे होते त्याचाच त्याग करत गेले. ते स्वार्थी नाही, म्हणूनच जग त्यांना परमार्थी म्हणून ओळखते.
अगदी अचूक!! परमार्थी तोच असतो जो नुसता विचार करत न बसता प्रत्यक्ष कृती करून तो स्वतःचं आयुष्य झोकून देतो. विचार आपण सगळेच करतो पण हे धैर्य बहुतेकांकडे नसतं...

ध्येयाने वेडी झालेली माणसे कोणाचीच नसतात, अगदी त्यांची स्वतःचीही. ज्या रात्री यशोधरा आणि राहुलचा निरोप घेतला त्याच रात्री बुद्धाने सिद्धार्थाचाही निरोप घेतला असावा. जो स्वतःचाच नाही राहिला, तो स्वार्थी कसा?
क्या बात है! जबाब नही!!!!

रामानेही सितेला नाही टाकले. तुलसीदासाने त्याला तसे करायला भाग पाडले. मारिओ पुझोच्या गॉडफादरला फिरोजखान ते रामू काय वाट्टेल ते करायला भाग पाडतात ना तसे.
:)

बघ! मिसळपाव कसं जन्माला आलं ते!! हट्टातूनच की!
हा, हा, हा!!!! हा मात्र परफेक्ट पंच!!!
इथे आम्ही दाद देतो!!!:))

ऋषिकेश's picture

3 Aug 2008 - 9:20 am | ऋषिकेश

अनेक आभार प्रियालीताई, मस्त :) .. इतस्त्ततः पसरलेल्या कपट्यांचं कोलाज आवडलं
पण.. मला ते आहे याच स्वरूपात लिहायचं होतं कारण विचार हे नेहेमीच सुसंबद्ध असतात असे नाहि.. अशा स्वैरविचारांच्या गहन चिंतनानंतर (!!!!) लेख प्रसवतात ;) मात्र सर्वप्रथम मी सैल आणि स्वैर अशाकरता लिहिले होते की हे काहि क्षण चमकून गेलेले विचार आहेत.. ते सैल तर आहेतच पण अत्यंत स्वैर आहेत.. हे विचार, मते अथवा तथ्ये नाहित... त्या विचारांना क्षणिक घटना सोडल्यास अजिबात संदर्भ नाहित.. एखाद्या 'पेटलेल्या' ;) क्षणी जेव्हा जग तुला स्वार्थी म्हणून हिणवत असतं तेव्हा अशाही पद्धतीचे विचार चमकून जातात... :P

साधारणतः याला मी विचित्र विचार म्हणतो.. इथेही बघितलंस तर सुरवातीला कैच्या कै वाटणारे विचार शेवटीशेवटी (कसेबसे)चॅनलाईझ होत जातात.

हट्टी माणसंच जगात काहीतरी करतात...सतत इतरांना दबून राहणारी माणसं सहसा आपली छाप पाडण्यात अयशस्वी ठरतात आणि सकारात्मक हट्टाचे फळही चांगले मिळते

हे मात्र अचूक..
मला या निष्कर्षावर मुद्दामच यायचे नव्हते.. केवळ मनातील भन्नाट विचार चॅनलाईझ होऊ पाहतानापर्यंतचा प्रवास दाखवायचा (आता कळतंय की क्षीण ;) ) प्रयत्न होता.. हा प्रवास मला बर्‍याचदा जास्त रोचक वाटतो.. एरवी आपण कधीही करत नाहि असे कैच्या कै विचार या दरम्यान आपण करतो नाहि का?

बुद्ध लग्नात नाही रे पळाला. रामदासस्वामी पळाले. बुद्ध आपली पत्नी आणि मुलगा यांना मागे टाकून निघून गेला

अशा चुकांबद्दल बोलाल तर रात्री दिडला लिहावसं वाटण्याची ही उबळ कारणीभूत आहे ;)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Aug 2008 - 12:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ऋषिकेश आणि प्रियाली,
तुम्ही दोघांनी मस्तच लिहिलंय. एक आणखी माहिती:
रामदासस्वामींनी लग्नातून पळून गेल्यावर नंतर त्या मुलीचं लग्न लावून दिलं होतं दुसय्रा मुलाशी.

यमी

प्रकाश घाटपांडे's picture

3 Aug 2008 - 5:08 pm | प्रकाश घाटपांडे


रामदासस्वामींनी लग्नातून पळून गेल्यावर नंतर त्या मुलीचं लग्न लावून दिलं होतं दुसय्रा मुलाशी


कुनी लाउन दिलं ? कव्हा लाउन दिलं? क्वाँच्याशी लाउन दिलं? तिच पुढ काय झालं? संदर्भासहित स्पष्टीकरण करा ( १० मार्क)
प्रकाश घाटपांडे

श्रेष्ठ गंगाधर, म्हणजे रामदास स्वामींचे थोरले बंधू यानी त्याच मंडपात उपस्थित दुसर्‍या एका चांगल्या घरच्या मुलाशी, दुसरा मुहूर्त साधून लावून दिले होते.
:)
पुण्याचे पेशवे

II राजे II's picture

3 Aug 2008 - 6:39 pm | II राजे II (not verified)

जो स्वतःचाच नाही राहिला, तो स्वार्थी कसा?

वा !

एकदम उत्तम प्रतिसाद !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

चित्रा's picture

3 Aug 2008 - 6:43 pm | चित्रा

सैल विचारांनी डोक्याला चालना दिली.
प्रियालीचा प्रतिसाद फारच आवडला. असेच काही मनात आले, पण एवढे सुंदर लिहीता आले असते की नाही शंका आहे!

स्वाती दिनेश's picture

4 Aug 2008 - 8:11 pm | स्वाती दिनेश

ऋषीकेश,
सैल विचारांनी डोक्याला चालना दिली.
प्रियालीचा प्रतिसाद फारच आवडला.
असेच म्हणते,
स्वाती

विकास's picture

4 Aug 2008 - 7:21 am | विकास

प्रियालीच्या प्रकट चिंतनात या खेपेस ;) वाद न घालता दुजोरा देता येत असल्याने तुर्तास +१ इतकेच म्हणतो!

बाकी हृषिकेशचा मूळ लेख पण काही वादग्रस्त विधाने वाटली असली तरी आवडला.

यशोधरा's picture

3 Aug 2008 - 8:53 am | यशोधरा

मस्त लिहिलय प्रियाली!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Aug 2008 - 2:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषी,
स्वार्थ या विषयावरील चिंतन आवडले आणि प्रियाली यांचा प्रतिसादही !!!

अवांतर : गडबडीच्या इतिहासाचं काय वाटलं नाही, आशय महत्वाचा :)

धनंजय's picture

4 Aug 2008 - 8:02 pm | धनंजय

लेख, प्रतिसाद, दोन्ही आवडले.

दाखल्यांची गडबड झाली असली तरीही ऋषिकेश यांचा आशय समजला.

तुकारामाची बायको, सॉक्रेटिसची बायको, मो.के.गांधींचा पुत्र, यांची पुष्कळ फरपट झाली... या कलंदर लोकांना जे काय मिळते त्याला "आत्मानंद" (आत्मा = स्व) असे काहीसे म्हणतात, ते उगाच नव्हे.

अवांतर : सीतेला पुन्हा परित्यक्ता करविणारा प्रथम मोठा कवी तुलसीदास की भवभूती?

पंचम's picture

3 Aug 2008 - 4:27 pm | पंचम

जियो प्रियाली !

क्या बात है !

शब्दांनी घायाळ केलस्सं!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!१

प्रियाली's picture

3 Aug 2008 - 4:57 pm | प्रियाली

कौतुकासाठी धन्यवाद मंडळी

अशा चुकांबद्दल बोलाल तर रात्री दिडला लिहावसं वाटण्याची ही उबळ कारणीभूत आहे

हो ते आलं होतं लक्षात माझ्या. ;) विचारांना बंधने नसतात आणि एखाद्या विचाराची उबळ यायला आणि ती मूर्तस्वरूपात बांधायला निमित्त लागत नाही. :) म्हणूनच तुझे चिंतन आवडले. काही विचार हृदयातून येतात तर काही डोक्यातून. (म्हणजे काय ते विचारू नका बॉ!) तुझे विचार हृदयातून आले.

प्राजु's picture

3 Aug 2008 - 8:10 pm | प्राजु

ऋषिकेश, आणि प्रियाली... दोघांनीही सुंदर लेखन केले आहे.
ऋषिकेशने जिथे लेख संपवला आहे.. म्हणजे त्याला कोणत्याही शेवटापर्यंत न नेता म्हणजे सकारत्मक किंवा नकारात्मक... अशा प्रकारच्या निर्णयापर्यंत न नेता जिथे संपवला आहे.. त्यातून त्याच्या मनात चालेलेल्या विचारांचं द्वंद्व लक्षात येतं.
प्रियालीने त्या विचारांना दिशा देण्याचं काम केलं आहे असंच मी म्हणेन.

जो स्वतःचाच नाही राहिला, तो स्वार्थी कसा?
+१

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सर्किट's picture

4 Aug 2008 - 6:38 am | सर्किट (not verified)

प्रियालीने सगळ्या ऐतिहासिक श्रद्धास्थानांच्या चड्ड्या उघड्या केलेल्या आहेतच. इथे पुढे जाणे नको.

पण एका वाक्याला टाळ्या पडताहेत, त्याची चड्डी काढणे उरले. ते काम आमचे. सगळे म्हणताहेतः

"जो स्वतःचाच राहिला नाही, तो स्वार्थी कसा?" +१ वगैरे.

मंडळी, स्वतः ही संकल्पना, पुन्हा एकदा चाचपडून बघा. स्वतः म्हणजे माझे शरीर, माझा आत्मा, माझे नातेवाईक, त्यांची शरीरे, त्यांचा आत्मा, माझे मित्र/मैत्रिणी, त्यांचा आत्मा, किंवा कसे ?

ह्यात माझे अनुयायी, सध्या असलेले, किंवा पुढे जे होतील ते, हे कसे वगळले ?

समजा माझी विचारशैली इतकी खोल असेल, की माझे जे पुढे होणारे अनुयायी आहेत, त्यांना मी सध्या केलेले कार्य हे स्वार्थी वाटणार नाही, तर ?

मी आज जी गोष्ट केलेली आहे, ती सध्याच इतरांना माझ्या स्वार्थातून उद्भवलेली वाटणार नाही, उलट अत्यंत निस्वार्थीपणे केली आहे असेच वाटेल पण त्यामुळे मला पुढे अनेक अनुयायी मिळतील, ह्या विचाराने मी केलेली असेल तर ? मी स्वार्थी आहे की नाही ?

आता असा अनेक वर्षानंतरचा विचार करण्यास आपण सामान्य जन निष्प्रभ ठरतो, पण बुद्ध, ख्रिस्त, किंवा रामदास हे सर्वच अशा "डीप" बुद्धिमत्तेचे होते. त्यांनी असा विचार केलाच नसणार, हे छातीठोकपणे सांगू शकाल ?

- सर्किट

चतुरंग's picture

4 Aug 2008 - 7:01 am | चतुरंग

नेहेमीप्रमाणेच बुद्धिबळातल्या उंटासारखा तिरका विचार आणि म्हणून स्वागतार्ह! ;)

मी आज जी गोष्ट केलेली आहे, ती सध्याच इतरांना माझ्या स्वार्थातून उद्भवलेली वाटणार नाही, उलट अत्यंत निस्वार्थीपणे केली आहे असेच वाटेल पण त्यामुळे मला पुढे अनेक अनुयायी मिळतील, ह्या विचाराने मी केलेली असेल तर ? मी स्वार्थी आहे की नाही ?

'अनुयायी मिळतील' ह्या स्वार्थी हेतूने जर आचरण केले तर त्या केलेल्या गोष्टींचा फोलपणा लवकरच उघड होतो कारण ध्येयनिश्चिती पोकळ असते. अशी कामे पिढ्यानपिढ्या सोडाच परंतु बर्‍याचदा त्या व्यक्तींच्या हयातीतच मोडकळीला येतात. परंतु बुद्ध, ख्रिस्त, रामदास (किंवा शिवाजी) अशा लोकांनी केलेले कार्य हे अनुयायी गोळा करण्यासाठी नव्हते तर 'अकेले चलते बने और कारवां बनता गया' अशा स्वरुपाचे होते. कोणत्याही प्रकारचा आर्थिक किंवा कोणताही मोबदला देण्याची कोणतीही गॅरंटी नसताना केवळ ध्येयाने प्रेरित होऊन मागे जायला सर्वच माणसे वेडी नसतात. त्यातले जाणते लोक बिंग फोडतात किंवा परिस्थितीनेच ते फुटते आणि हे लोक इतिहासजमा होतात इतिहास निर्माण करु शकत नाहीत!
तेंव्हा तुम्ही म्हणता त्याप्रकाराने त्यांची बुद्धी 'डीप' नव्हती!

चतुरंग

सर्किट's picture

4 Aug 2008 - 7:18 am | सर्किट (not verified)

अशा लोकांनी केलेले कार्य हे अनुयायी गोळा करण्यासाठी नव्हते तर 'अकेले चलते बने और कारवां बनता गया' अशा स्वरुपाचे होते.

पुरावा काय ?

बुद्धिमत्ता खोल असली, तर पुढच्या दोन नव्हे तर दहा चाली मनात ठेवून पुढची पहिली चाल करायची ह्या बुद्धिबळातल्या खेळींविषयी आपण माहितगार असालच.

सामन्य बुद्धिमत्तेच्या लोकांना पुढच्या दोन (फार तर तीन) चाली दिसतात). प्रत्येक वेळी पुढच्क्ष्ही चाल ठरवताना त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह फ्याक्टर १६ (किंवा किमान पुढच्या फळीतले आठ) असतो.

मग ? एवढा विशाल वृक्ष कुठून वाढणार, हे कसे ठरवणार आपण सामान्य लोक ?

तुम्ही शिवाजीचे नाव घेतले आहे, म्हणून सांगतो. नेताजी पालकराला पुन्हा महंअद कुलीखानापासून हिंदू धर्मात आणण्यात महाराजांच्या किती चाली होत्या ?

त्यांच्या तोफखान्याचा जिम्मेदार मुसलमान होता. त्याला स्वराज्यातच ठेवण्यासाठी तर हे कृत्य झाले नाही ?

आग्र्याहून महाराज परत आलेत, तेव्हा त्यांच्या सत्तावीस किल्ल्यांपैकी वीस मुसलमानांच्या ताब्यात होते. कुलीखानाचा पालकर करून घ्येण्यात त्या वीस किल्लेदारांना बेसावध ठेवणे, हे तर धोरण नव्हते ?

रंगराव, तुम्ही आणी आम्ही ह्या ऐतिहासिक महापुरुषांना सेकंड गेस करू शकत नाही. त्यावेळी त्यांच्या मनात किती डीप मूव्ह्ज होत्या हेदेखील ठरवू शकत नाही. त्यामुळे आपण त्यांना "बेनेफिट ऑफ डाऊट" द्यायला हवा, की नाही ?

- सर्किट

कार्य हेच त्यांच्या 'नि:स्वार्थी' विचार करण्याचा पुरावा आहे त्याला आणखी वेगळा पुरावा नको!
प्रत्येक आणीबाणीच्या परिस्थितीत आपल्याला त्या त्या परिस्थितीप्रमाणे एखाद्या महापुरुषाचे किंवा स्त्रीचे स्मरण होते ह्यातच त्यांची महत्ता दडलेली असते.

बुद्धिबळाच्या चालीत महान खेळाडू हे ८ ते १० चालींपुढचे आणि कित्येक वेळा तर १२ ते १४ चालीपर्यंतसुद्धा संभाव्य चित्र डोळ्यांसमोर आणू शकत असतात. त्याचप्रमाणे हे महान लोक तसे करु शकत असावेत असे दिसते त्याशिवाय आपल्या कार्याचे दूरगामी परिणाम कसे होऊ शकतील ह्यासंबंधी विचार संभवत नाही.
नेताजीचे पुनर्धर्मांतर करुन घेणे ही सरळ सरळ राजकीय मुत्सद्देगिरी आहे ह्यात शंकाच नाही पण हा तथाकथित 'स्वार्थ' अंतिमतः स्वराज्याच्या हिताचा होता त्यामुळे तो व्यक्तिगत संकुचित स्वर्थाच्या कैकपट विशाल होता! त्यात त्यांचे आणखी कोणकोणते विचार आणि अंतःप्रवाह दडलेले होते हे महाराज आणि त्यांचे कूटनितिज्ञ मंडळच जाणो! पण ते व्यक्तिगत, संकुचित नक्कीच नव्हते/नसणार हे आपण सांगू शकतो असे तुम्हाला वाटत नाही का?
महाभारताच्या युद्धात कृष्ण अनेक वेळा संदिग्ध राहिला आहे, सकृतदर्शनी खोटे बोलला आहे, जसे 'नरो वा कुंजरो वा' हे कशाचे लक्षण आहे? अंतिम सत्याच्या विजयासाठी खेळली गेलेली कूटनीती ही व्यक्तिगत स्वार्थी नसते तर ती सत्याचाच एक भाग बनते.

ह्यात सेकंड गेस करण्याचा प्रश्नच नाहीये. दूरगामी विचार करताना परिस्थितीच्या विशाल पटावर कोणती मोहोरी कुठे आहेत, कुठे असतील, कुठे असायला हवीत ह्याचा विचार करुन तो यथार्थपणे कृतीत उतरवणे आणि हे करीत असताना त्या त्या वेळच्या परिस्थितीला प्रामाणिक राहून निर्णय घेणे हे काम ते लोक करीत आले. त्यात कुठलाही 'डाऊट' नाहीये, असलाच तर त्याचे निराकरण पुढे घडत जाणार्‍या/गेलेल्या घटनांवरुन घडून येते.
आता आपल्याला तेव्हाच्या सर्व घटनांविषयी तंतोतंत माहीती असणे संभवत नाही त्यामुळे काही गोष्टीत डाऊट असणे शक्य आहे परंतु त्या व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा, कारकीर्दीचा विचार करताना एकून जी काही वागणूक आपल्याला इतिहासातून दिसलेली असते त्यावरुन त्या डाऊट असलेल्या प्रसंगी सुद्धा, तर्काने विचार करता, ती व्यक्ती स्वार्थी वागलीच नसती असे आपण म्हणू शकतो. ह्या अर्थी बेनिफिट ऑफ डाऊट द्यायला मी तयार आहे! :)

चतुरंग

एकलव्य's picture

5 Aug 2008 - 9:19 am | एकलव्य

सगळ्यात पहिल्यांदा - ऋषिकेश आणि इतर प्रतिसादींचे चर्चा रंजक केल्याबद्दल मनापासून आभार...

मनातील एक उत्स्फुर्त विचार - ही भलीभली मंडळी फार पुढच्या चालींचा विचार करण्यातला फोलपणा ओळखून असावीत असा बेनिफिट ऑफ डाऊट द्यायला हरकत नसावी. पुढ्यातली एकच चाल तेवढी महत्वाची हे कळायला खरोखरच केव्हढा थोरपणा हवा... ह्म्म्म्म...

अनिल हटेला's picture

4 Aug 2008 - 9:29 am | अनिल हटेला

रामदासस्वामींनी लग्नातून पळून गेल्यावर नंतर त्या मुलीचं लग्न लावून दिलं होतं दुसय्रा मुलाशी


कुनी लाउन दिलं ? कव्हा लाउन दिलं? क्वाँच्याशी लाउन दिलं? तिच पुढ काय झालं? संदर्भासहित स्पष्टीकरण करा ( १० मार्क)

लै भारी !!!!

ऋषिकेश, आणि प्रियाली... दोघांनीही सुंदर लेखन केले आहे.

वादच नाय !!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

ऋषिकेश's picture

5 Aug 2008 - 9:03 am | ऋषिकेश

सर्व वाचकांचे, प्रतिसादकर्त्यांचे व विशेषतः प्रियालीताईचे व सर्कीटरावांचे याच विचारांना वेगळ्या (की वेगवेगळ्या ;) ) कोनातून बघितल्याबद्दल अनेक आभार
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

सर्किट's picture

5 Aug 2008 - 9:07 am | सर्किट (not verified)

विशेषतः प्रियालीताईचे व सर्कीटरावांचे याच विचारांना वेगळ्या (की वेगवेगळ्या ) कोनातून बघितल्याबद्दल अनेक आभार

चालायचंच. रंगरावांचेही आभार. त्येंनी आमच्या येगळ्या कोनाचा पदुकोन केला. शटल परत आले, परतवणे वेळेअभावी शक्य नाही.

- सर्किट

विसोबा खेचर's picture

8 Aug 2008 - 11:35 am | विसोबा खेचर

लेखन आणि प्रतिसाद, सर्वच लै भारी! परंतु आमच्या मात्र बरचंसं डोक्यावरूनच गेलं!

ऋष्या, औरभी आनेदो..

आपला,
(ऋष्या लाडका असलेला) तात्या.