माझे साईपदयात्रेचे अनुभव - १

कविता१९७८'s picture
कविता१९७८ in भटकंती
1 Aug 2014 - 12:00 pm

मी ६ वर्षांपासुन पदयात्रा करीत आहे. मार्च एप्रिल मध्ये जात असते. आमचा पदयात्रेचा मार्ग चारोटी - जव्हार - मो़खाडा - त्र्यंबकेश्वर - नाशिक - सिन्नर - वावी ते शिर्डी असा आहे. दिवसा कमालीचे उन आणि रात्री जंगल असल्याने भरपुर थंडी असते. एप्रिल २०१४ या महिन्यात मी माझी ६ वी वारी पुर्ण केली. रात्री अतिशय थंडी असल्याने मला ह्यावेळी रात्री झोपच लागायची नाही. २ शॉल्स नेउन सुद्धा सारखी कुडकुडायचे. म्हणुन विचार केला कि वुलनच्या उबदार शॉल्स घेतल्या तर बरं पडेल. मी आमच्याकडे शोध घेतल्या शॉल्स तर मिळाल्या पण साईज छोट्या होत्या. त्यामुळे मी दुसर्‍या एका संकेतस्थळावर मदत मागितली. मला लगेचच मदत मिळाली. सगळ्यांनी पदयात्रेचा कौतुक केलं आणि पदयात्रेचा अनुभव लिहिण्याविषयी सुचवले. मला लिहिण्याचा अनुभव नाहीये पण मैत्रीणींच्या प्रेमाखातर मी जसं जमेल तसं लिहिण्याचा प्रयत्न केला. लिहिताना ६ वार्यांचा अनुभव जसा आठवेल तसा टाकण्याचा प्रयत्न केलाय. यामुळे त्या संकेतस्थळावर मला काही चांगल्या मैत्रीणीही मिळाल्या. ईथेही तसेच झाले तर आवडेल. काही चुकत असल्यास माफी असावी.

दरवर्षी बर्याच ठिकाणांहुन भाविक साईपदयात्रेत सामील होतात. आमच्या बोईसर आणी आजुबाजुची गावे मिळुन १०० मंडळे जातात ; माझ्या घरातुन माझा सख्खा भाऊ गेली १४ वर्षे पदयात्रा करतोय तर एक चुलत भाउ २१ वर्षे व दुसरे ५ - १० वर्षांपासुन पदयात्रेत सामील होतात.पण बहुतकरून ग्रुप हा फक्त पुरुषांचाच दिसायचा. मला जायची तीव्र ईच्छा होती. मी शिर्डीला गाडीतुन बर्याचजणांना चालत जाताना पाहायचे, एका ग्रुपमध्ये बायका दिसायच्या. मला त्यांचे खुप कौतुक वाटायचे. २००८ च्या नोव्हेंबर मध्ये माझ्या बहीणीच्या बिल्डींगमध्ये भाउजींचे मित्र राहायला आले. बोलता बोलता कळले की त्यांच्या गावातुन २ ग्रुप पदयात्रेसाठी निघतात व दोन्ही ग्रुपमधुन बायका ही जातात. त्यांचे गाव घिवली आहे. पालघर - डहाणुच्या (महाराष्ट्र - गुजराथ बॉर्डर ) मध्ये बोईसर हे स्टेशन आहे जिथे मी राह्ते. मोठा एम.आय.डी.सी. एरीया आहे. तिथुन १० कीमी वर तारापुर हे गाव आहे. व तिथुन आतमध्ये २ कीमी वर घिवली आहे. बी.ए.आ. सी. व टी.ए.पी.एस. चे १,२,३,४ हे प्लांट गावाला लागुन आहेत. एक ग्रुप जो भंडारी जमातीचा (गावड, मोरे, पाटील, राउत ) आहे तो राउतच्याच माणसांचा आहे म्हणजे ग्रुप मेंम्बर्स हे त्यांचे सर्व नातेवाईक आहे, भाउ, मामा , चुलते वगैरे आहेत. हे ग्रुप गुढीपाडव्याच्या दिवशी निघतात आणी रामनवमीच्या आदल्या दिवशी पोहोचतात. मी त्यांना लगेचच सांगितले की माझे नाव तुमच्या ग्रुपमध्ये नोंदवा. फेब्रुवारी २००९ साली त्यांनी सांगितले की २६ मार्च २००९ ला पदयात्रा निघणार आहे तर २ फोटो , फी हे द्यावं लागेल आणी ते पत्रक देतील त्याप्रमाणे सामान बरोबर घ्यावं लागेल.

माझ्या घरच्यांनी मला खुप समजावण्याचा प्रयत्न केला की ईतक्या लांब जाणं झेपायचं नाही. ८ दिवस चालायचं आहे, तु १ कीमी सुद्धा चालत नाहीस कसं होणार? जंगलाचा रस्ता, कुठे उघड्यावर झोपणार जंगलचा रस्ता आहे, उन खुप असणार, तुला सतत ए.सी.ची सवय , परत मुलीचा सेफ्टीचा प्रश्न असतो. परत ज्या ग्रुपबरोबर जातेस ती लोकं अतिशय अशिक्षीत , लगेचंच मारामारीवर येणारी , बायकाही तशाच पुरुषांप्रमाणे अरेरावी करणार्या, जाउ नकोस नेहमी गाडीनं जातेस तशीच जा, साईबाबांनी काही सांगीतलं नाहीये कि चालंतच ये म्हणुन ह्या ना त्या प्रकारे मला घरच्यांनी न जाण्याचा सल्ला दिला. पण मला साईबाबांवर विश्वास होता ते मला नेतील ह्याची खात्री होती आणी माझी चालत जाण्याची ईच्छा खुपच प्रबळ होती. माझे वजन ही भावा प्रमाणे जास्त होते त्यावेळी मी चालु शकेल ही माझ्या घरच्यापैकी कुणालाही खात्री नव्हती. आणी मी रोज साईबाबांना विनवायचे की देवा मला सुखरुप न्या.

राउत ने दिलेल्या लिस्ट प्रमाणे मी सामानाची जमवाजमव केली. ऑफीसमधुन १५ दिवसांची सुट्टी घेतली. पॅकींग केली , अगदी निघेपर्यंत सर्व न जाण्याचा सल्ला देत होते. माझ्या नकळत राउतने नातेवाईकांना सांगितले होते. की हिला आरामाची सवय आहे हि काही २ की.मी पेक्शा जास्त चालु शकणार नाही हिला जितकं चालता येईल तितकं चालवा आणी नाहि जमलं तर गाडीत बसवा. पण एकटीला कुठेही सोडु नका मागे पडली तरी तिच्या बरोबर राहा. राउतने मला सांगितले कॅश जास्ती बरोबर घेउ नकोस, आणी माणसं कशीही असोत कुणाच्याही नादी लागु नकोस, आपल्याला शिर्डीला पोहोचायचं आहे हेच ध्यानात ठेव. २५ मार्चला राउत बरोबर मोठी सामानाची बॅग पाठवुन दीली आणी २६ मार्च २००९ ला सकाळी घिवलीला पोहोचले. आणी पदयात्रेला सुरुवात केली.

चुलत भावाने सुचवल्याप्रमाणे घरातुनच पायात अंगठा वेगळा असलेले सॉक्स त्यावर अँकल सपोर्ट व स्लीपर घालुन निघाले होते. त्याने सांगुन ठेवले होते कि जर कुठलेही कपडे जे स्कीन टाईट असतील ते नेहमी ऊलट करुन घालायचे कारण ह्या प्रवासात घामाने खुप रॅशेस येतात. घिवलीपासुन पदयात्रेला सुरुवात झाली. सगळ्यात आधी साईबाबांची पालखी निघाली आणी नंतर लोकं हळुहळु सामील व्हायला लागले. गावातुन २ पालख्या एकत्र निघाल्या . एक भंडार्यांची आणी एक कोळी लोकांची . ह्या भागात सहसा कोळी लोकांना मांगेला/ मांगेली म्हणतात. पुर्वी एकच पालखी निघायची पण आपापसातील भांडणामुळे १० वर्षांपासुन २ वेगवेगळ्या पालख्या निघु लागल्या. पालखी सगळीकडे थांबुन येत असते म्हणुन पदयात्री पुढे निघाले. २ कि.मी. पुढे आल्यावर एके ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो. नाश्ता करुन पुढे चिंचणी येथे साईबाबांच्या मंदीरात आलो. हे मंदीर साईबाबांचे भक्त अण्णा चिंचणीकर ह्यांचे आहे. येथे दासगणुंनी भजन केले आहे असे मी ऐकले आहे. तिथे मला राउत यांची आई, बायको आणी इतर नातेवाईक भेटले. मी त्यांच्याबरोबरच चालायला सुरुवात केली. घिवली गावातल्या प्रत्येक घरातील सगळे जण सामील झाले होते. दुपारच्या जेवणाच्या थांब्यापर्यंत सर्व घरातल्या पदयात्रींना साथ द्यायला येतात आणी जेवुन माघारी फिरतात. गप्पा मारत मारत १५ कि.मी. वर केतखाडी येथे जेवणाच्या थांब्यावर पोहोचलो. पाय दुखू लागले होते. इथे एक भाविक सर्वांसाठी स्वखर्चाने जेवण देतात. जवळपास ७०० ते ८०० माणसे जमली होती. पाल़खी आल्याशिवाय निघायचे नसल्याने आम्ही जेवण करुन आराम करत रोडवर बसलो.

थोडया वेळाने पालखी आल्यावर जे न येणारे होते त्यांनी आपापल्या लोकांना निरोप द्यायला सुरुवात केली. माझ्याबरोबर राउतची आई आणी बायको होत्या. राउतच्या आईने एका मुलीबरोबर ओळख करुन दिली आणी त्या दोघी माघारी वळल्या. मी पुन्हा पायात सॉक्स त्यावर अँकल सपोर्ट घालुन नंतर स्लीपर्स घालुन त्या मुलीबरोबर चालायला सुरुवात केली. थोडया वेळातच कळले की बरोबरच्या मुलीला तिच्या मित्राबरोबर चालायचे होते. मी माझी वाट धरली. थोडया वेळात आम्ही वाणगावला रेल्वे लाईन क्रॉस केली. वाणगाव हे स्टेशन बोईसर आणी डहाणु या दोन स्टेशनामधले आहे. ही रेल्वे लाईन वेस्टर्न लाईन आहे. उन भरपुर होते मागे पुढे माणसे होती पण ओळखीचे कुणीच नसल्याने एकटीच चालले होते. थोड्यावेळात राउत चा भाउ, त्याचे भाउजी मागुन आले त्यांनीच ओळ्ख दिली आणी आम्हि आहोत एकटी मागे राहीलीस तरी घाबरु नकोस असे सांगितले आणी तुला जसे चालता येईल तसे चाल असेही सांगितले. . एके ठि़काणी रोडवर तेथील एका घराकडुन पदयात्रेसाठी सरबताची व्यवस्था केली होती. ईथे पुर्ण आदिवासी एरीया आहे. गरीबी आहे पण बिचारे पदयात्रींसाठी टाकीभर सरबत करुन ठेवतात. पुढे साखरा नदी लागली २ डोंगराना वळसा घालुन खुप पुढे चहाचा थांबा होता. पाय आता खुप दुखायला लागले होते. साधारण ५ वाजता चहाचा थांबा आला. आधी पाय मोकळे केले. पायाला आयोडेक्स लावले. चहा घेतला आणी सर्व निघालो. आत्ता खुप पाय दुखायला लागले. पण बाकिच्यांनी सांगितले की आता ३-४ की.मी. वर ऐना या गावी रात्रीचा थांबा आहे. चाल मंदावली, ह्ळुह्ळु सर्व पुढे निघुन गेले. आणी राउतचा भाउ, भाउजी, आत्यावा मुलगा आणी एक आणखी एक जण माझ्या बरोबर चालु लागले. हे सर्वजण पदयात्रा मंडळाचे सभासद होते. ही मंडळी सर्वात शेवटी चालतात व जो कोणी मागे पडेल त्याला बरोबर घेउन जातात. मी थकले आणी पाय खुपच दुखायला लागले. कधी तो थांबा येतो असे झाले. बरोबरची मंडळी म्हणाली आता १० मिनिटांबर थांबा आलाय फास्ट चाललीस तर लवकर येईल. मी थोडया फास्ट चालु लागले. अर्धा तास झाला तरीही थांबा आलाच नाही . अंधार पडू लागला. मी पुन्हा विचारले तर तेच उत्तर आता मोजुन १० मिनिटे राहीलीत पण पाय दुखत असल्याने मला काहि फास्ट चालता येत नव्हते. पायाचे तुकडे पडतील असे वाटत होते. शेवटी कसेबसे ७ वाजता पोहोचलो.

एका राईस मिलच्या पटांगणात थांबलो होतो. पाठीमागेच ओढा होता. गारठा जाणवत होता. पदयात्रींसाठी मोठ्या सतरंजी अंथरल्या होत्या. बायकां आणी पुरुषांसाठी वेगवेगळ्या सतरंज्यांची सोय होती. प्रत्येकाने स्वत:च्या जागा पकडुन ठेवल्या होत्या. कुणी फ्रेश होत होतं, कुणी दुसर्या दिवशीच्या आंघोळीचं सामान काढुन ठेवत होतं. मी उशिरा पोहोचल्याने माझं सामान गाडीतुन काढुन एके ठीकाणी ठेवण्यात आलं होतं ते घेतलं आणी जागा शोधली. बसल्यावर पायातलं सामान काढल्यावर जरा बरं वाटलं . अंग खुपच दुखत होतं आणी तापासारखं वाटत होतं. मी थोडावेळ स्वस्थ पडुन राहीले. पालखीच्या आरतीला सुरुवात झाली. सर्वांनी आरती घेतली. ह्या लोकांना साईबाबांच्या सर्व आरत्या येत नाहीत. "आरती साईबाबा ..." ह्या आरती नंतर सर्व गणपतीच्या आरत्या झाल्या. मंडळाची माणसे पदयात्री मोजत होती, बरेचण आयत्यावेळी सामील झाल्याने त्यांची फी जमा करायला घेतली होती, साधारण ३५० जण पदयात्री होते, २५-३० जण पदयात्री कम मंडळाचे सभासद होते. १० जण आचारी होते जे फक्त जेवण बनवणे आणी चहा नाश्ता बनवुन देण्याचे काम करणार होते. बाजुलाच जेवणाची तयारी चालु होती. जेवणाची रांग लागली प्रत्येकाने स्वतः रांगेत उभे राहायचे आणि स्वतःचे ताट स्वतः धुवायचे. रात्री एक नर्स बाई होत्या सर्व जण त्यांच्या कडुन पेनकीलर्स (गोळ्या आणी ईंजेक्शन्स ) घेत होते. कुणी फोडात झालेले पाणी सीरींज ने काढायला येत होते. मला ही राउतच्या भावाने ईंजेक्शन घ्यायचे सुचविले, मी आधी नर्सला ईंजेक्शन बद्द्ल विचारले ती म्हणाली साधं पेन कीलर आहे, बाकि काही नाही मग मी सुदधा एक घेतलं. दुसर्या दिवशीचे आंघोळीचे सामान आधीच काढुन ठेवायचे होते कारण दुपारी फक्त छोट्या बॅग्ज / बॅकपॅक्स मिळणार होत्या व मोठ्या बॅग्ज फक्त संध्याकाळी झोपताना मिळणार होत्या. पहील्या दिवशी २८-३० की.मी. चाललो होतो. दुस-या दिवशी ३०-३२ की.मी. असल्याने ४ वाजता निघण्याचे ठरले. त्याकरीता ३.३० ला उठावे लागणार होते. २ चादरी अंथरुन पहुडले. खुप झोप आली होती आणी थंडीही वाजत होती

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

1 Aug 2014 - 12:31 pm | मुक्त विहारि

हा भाग आवडला...

योगी९००'s picture

1 Aug 2014 - 12:43 pm | योगी९००

मस्त अनुभवकथन...पुढील भाग लवकर टाका... तुमच्या साईभक्तीला नमस्कार...!!!

राहवले नाही म्हणून विचारतो.. तुम्ही किंवा इतर अश्या वार्‍याकरून तुम्हाला मानसिक समाधानाखेरीज आणि काय मिळते..? अश्या वार्‍या करून मला तरी श्रध्देऐवजी अंधश्रद्धाच जास्त दिसते. (माफ करा...पण मला जे वाटले ते लिहीतोय). वारीला जाताना वाटेतील गावांमध्ये काही समाजसेवा करणे असा उपक्रम असतो का? तसे असेल तर वारी करणे हा स्तुत्य उपक्रम आहे. केवळ भजने म्हणत जाणे आणि स्वत:च्या शरीराचे हाल (पायाला फोड) होईपर्यत चालणे असे असेल तर मग अजून काही न बोलणेच बरे..

मीही स्वतः देवभोळा आहे पण वारी करणे, तासनतास रांगेत उभे राहणे मला जमत नाही आणि जमत असले तरी मी करत नाही. म्हणूनच असा विचार मनात येतो. बाकी तुमच्या साईभक्तीचा मला आदर आहेच.

[तुम्हाला ऑफिसमधून १५ दिवसांची रजा (कदाचित साईकृपेमुळे) मिळाली तशी सर्वांना ( तुमचा भाऊ व गावातील १०० मंडळे) मिळते का? हा ही प्रश्न आहेच पण सध्या हा प्रश्न पार्क करतो. आमचं घोडं येथेही मार खातं].

शैलेन्द्र's picture

1 Aug 2014 - 12:52 pm | शैलेन्द्र

थोडासा वाईटपणा पत्करुनही काही प्रश्न उपस्थीत केलेत त्या धाडसाला सलाम.

साईभक्तांच्या मार्गावरचे, शिर्डीच्या अगदी अलिकडचे, वावी हे माझे गाव. अनेक भक्तांच्या, मंडळांच्या लीला जवळुन पहायला मिळतात.

कविता१९७८'s picture

1 Aug 2014 - 12:57 pm | कविता१९७८

वावी हे माझं साईदर्शनाचं ठीकाण , पुढे येईलच.

योगी९००'s picture

1 Aug 2014 - 1:07 pm | योगी९००

आभारी आहे. पण एक गोष्ट की प्रस्तुत धागाकर्ती किंवा वारी करणार्‍या कोणाचीही चेष्टा किंवा टर उडवण्याचा माझा हेतू नाही आहे. फक्त कुतूहलापोटी विचारत आहे.

अनेक भक्तांच्या, मंडळांच्या लीला जवळुन पहायला मिळतात.
आम्हाला आवडतील ह्या लीला वाचायला....पण वेगळा धागा काढा.

अनेक भक्तांच्या, मंडळांच्या लीला जवळुन पहायला मिळतात.

शैलेन्द्र साहेब, ह्याबद्दल पण एक सविस्तर लेख येउद्या.

कविता१९७८'s picture

1 Aug 2014 - 12:56 pm | कविता१९७८

मला मानसिक समाधान मिळतं बाकी काही मिळवण्याकरीता मी जात नाही पण विल पॉवर स्ट्राँग होते हे नक्की. वारीला जाण्याचे अनुभव ईथे कथन करतीये अजुन पहिल्याच दिवसाचे अनुभव मांडलेत त्यामुळे समाजसेवे बद्द्ल काही लिहित नाही कारण वारीत ते शक्य नाही. एकदा आपला एरीया सोडला कि पुढे आपल्याला तसेही कुणी ओळखत नाही आणि चालुन चालुन इतका दमतो माणुस तो समाजकार्य काय करणार.

रजेचं म्हणाल तर माझा सख्खा भाउ आणि चुलत भाउ हे कुणीही नोकरी करत नाही परंतु जे काही नोकर्‍या करत असतील त्यांना सुट्ट्या नक्की मिळतात तेव्हाच तर ते जातात कारण वर्षभर पालख्या जात असतात आणि एकुण कमीत कमी २० ते २५ लाख पब्लिक जात असते.

आम्ही जातो तेव्हा एका मंडळातुन १५०० पदयात्री प्रवास करतात तर लालबागच्या मंडळातुन कदाचित २५०० ते ३००० पदयात्री असतात ह्यावेळी आम्ही पोहोचलो त्या दिवशी २०० पालख्या पोहोचणार होत्या.

योगी९००'s picture

1 Aug 2014 - 1:09 pm | योगी९००

धन्यवाद....!!

पुढील भागांच्या प्रतिक्षेत...!!

nanaba's picture

25 Jul 2016 - 11:26 am | nanaba

Mee swataha vaaree keli nahiye kadhi.. pan mala vatat, "ghalib, tune pee hee nahi.." asa ahe he.. Karun pahaa - je anubhav yetil tyavarun tharava..

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Aug 2014 - 1:12 pm | राजेंद्र मेहेंदळे

रोज ३०-३५ कि.मी. चाल?
श्रद्धा वगैरे बाजुला ठेवले तरीही केवळ या स्टॅमिनाला सलाम

बाळ सप्रे's picture

1 Aug 2014 - 1:27 pm | बाळ सप्रे

मी आमच्याकडे शोध घेतल्या शॉल्स तर मिळाल्या पण साईज छोट्या होत्या. त्यामुळे मी दुसर्‍या एका संकेतस्थळावर मदत मागितली. मला लगेचच मदत मिळाली

शॉल लहान असण्यावर संकेतस्थळावर काय मदत मिळाली??

लि़खाण थोडसं विस्कळीत आहे.. जरा एकदोनदा वाचून पहा प्रकाशित करण्यापूर्वी..

बाकी एखादी गोष्ट डोक्यात घेतल्यावर इतकं चालण्याच शारीरीक बळ मिळतं हे कौतुकास्पद!

साती's picture

1 Aug 2014 - 11:05 pm | साती

त्यांना मोठ्या शाली कुठे मिळतील याचे अनेक पत्ते मिळाले.
इतकेच नव्हे तर एका सदस्येने भली मोठी आणि सुबक सुंदर शाल कवितासाठी स्वहस्ते विणून दिली.

:)

कविता१९७८'s picture

1 Aug 2014 - 11:09 pm | कविता१९७८

धन्यवाद साती ; अवलची परवानगी घेउन शालीचे फोटो ईथे डकवायचा विचार आहे.

साती's picture

1 Aug 2014 - 11:12 pm | साती

तिथल्या त्या धाग्याची लिंक इथे देऊ शकता.
ज्यामुळे तुम्ही ही मालिका का लिहिलीत, तुमचे लिखाण इतके प्रामाणिक आणि अनकट व्हर्जन कसे हे ही कळेल.
आणि शालही सगळ्यांना बघता येईल.
:)

प्रांजळ लेखन आवडले. लिहीत रहा.

कवितानागेश's picture

2 Aug 2014 - 1:18 am | कवितानागेश

विल पॉवर स्ट्राँग होते > हे अगदी पटलं.
शिवाय मूळातही ती असावीच लागते, नाहीतर आपला 'कम्फर्ट झोन' सोडून कुणीही सहजासहजी बहेर पडत नाही.
अवांतरः 'का जायचं' हाच प्रश्न ट्रेक करणार्‍यांनाही अनेकजण विचारतात. मला वाटतं 'पॅशन' हेच त्याचं उत्तर असावं.

खटपट्या's picture

2 Aug 2014 - 2:17 am | खटपट्या

+१

अमोल केळकर's picture

11 Aug 2014 - 2:41 pm | अमोल केळकर

छान उपक्रम

अमोल केळकर

चलत मुसाफिर's picture

18 Aug 2014 - 10:17 am | चलत मुसाफिर

पाचव्या भागावरील प्रतिसाद बंद करण्यात आलेले आहेत असे दिसत असल्यामुळे इथे प्रतिसाद नोंदवत आहे. पाचही भाग प्रतिसादांसह वाचल्यानंतर एकूण प्रतिसादकर्त्यांचा कल हा लेखिकेची कीव करण्याकडे आहे असे वाटले.

आध्यात्मिक अनुभवांवर व श्रद्धांवर टीका करणे हे अतिशय सोपे असते. पण श्रद्धा ही एक मानवी गरज आहे हे लक्षात घेतले गेले पाहिजे. अमरनाथ, नर्मदा परिक्रमा व तत्सम यात्रांना जाणारे वयस्कर, अपंग, स्त्रिया, बालगोपाल पाहिले, तर त्यांची टर उडवण्याची इच्छा नाहीशी होईल. अदम्य विश्वास आणि प्रबळ इच्छाशक्ती या बळावर हे लोक असाध्य ते साध्य करतात.

जोवर कुणाच्या व्यक्तिगत श्रद्धांमुळे इतरांना त्रास होत नाही, तोवर कुणाच्या भावनांवर असे हल्ले चढवू नयेत. तुम्हाला नसतील करायच्या यात्रा तर नका करू.

कविताताई, एका कवितेवरच्या प्रतिसादात पदयात्रेचा उल्लेख बघितला. म्हणून शोध घेतला आणि हा खजिना सापडला. तुमच्या श्रध्देला आणि दुर्दम्य इच्छाशक्तीला प्रणाम.
अशा श्रध्देचा उल्लेख करुन हेटाळणीयुक्त प्रतिसाद देणाऱ्यांचा निषेध.

सामान्य वाचक's picture

25 Jul 2016 - 11:46 am | सामान्य वाचक

अजून दर वर्षी वारी सुरु आहे का ?

कविता१९७८'s picture

25 Jul 2016 - 11:47 am | कविता१९७८

हो गं, साईबाबांच्या कृपेने दरवर्षी पदयात्रा सुरुये.

सामान्य वाचक's picture

25 Jul 2016 - 12:08 pm | सामान्य वाचक

पंगू लांघीयते गिरीम म्हणतात ते खोटे नाही

आणि श्रद्धा नसेल तर पाय साथ देत नाहित

मला स्वतःला हा अनुभव मलंगगढ़ ला आला

कविता१९७८'s picture

25 Jul 2016 - 12:29 pm | कविता१९७८

खरंय गं , श्रद्धा हवीच आणि त्याबरोबर देवाची कृपाही. मीही मलंगगढला गेलीये पण लहानपणी. तुझेही अनुभव लिही की , छानसा धागा काढ ना.

स्नेहल आचरेकर's picture

25 Jul 2016 - 11:58 am | स्नेहल आचरेकर

वाह कविताताई , तुमच्या श्रध्देला आणि दुर्दम्य इच्छाशक्तीला प्रणाम. खरंच खुप कौतुकास्पद आहे, आणि तुम्ही अजुन ही जाता म्हणजे खरंच तुमच्यावर साईबाबांची कृपा आहे हे नक्की. यावर्षीची पदयात्रा झाली का की व्हायचीये , अजुन काही अनुभव सांगा ना प्लीज.

कविता१९७८'s picture

25 Jul 2016 - 10:21 pm | कविता१९७८

हो यावर्षी एप्रिलमधे मी माझी ८ वी वारी पुर्ण केली, अनुभव लिहेनच

शि बि आय's picture

25 Jul 2016 - 10:37 pm | शि बि आय

व्वा.. सहीच कविता... कौतुक आहे ग तुझं.. छान लिहीत आहेस. लवकर टाक पुढचा भाग.

कविता१९७८'s picture

25 Jul 2016 - 10:46 pm | कविता१९७८

धन्यवाद ग , ७ ही भाग टाकुन झालेत.