के-२ : द सॅव्हेज माऊंटन - ७

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in भटकंती
4 Apr 2014 - 9:58 am

के २ वर यशस्वी चढाई करून उतरणा-या गिर्यारोहकांपुढे काय वाढून ठेवलेलं होतं ?

रात्री ८.००

मार्को कन्फर्टोला शिखरावर काही मिनीटंच थांबून ताबडतोब परत फिरला होता. त्याच्या बरोबर कॅस वॅन डी गॅवेल होता. डच मोहीमेतील इतर गिर्यारोहक अगोदरच परतीच्या वाटेला लागलेले होते.

लार्स नेसाच्या पाठोपाठ खाली उतरत असलेल्या सेसील स्कॉगला रॉल्फ बेई आपली वाट पाहत थांबला असेल याची कल्पना होती. काही अंतर उतरून आल्यावर तिने त्याला हाका मारण्याचा सपाटा लावला, मात्र एकाही हाकेला ओ येईना ! अखेर निरुपायाने तिने हाका मारणं बंद करुन खाली उतरण्यास सुरवात केली.

अखेरीस एका बर्फाच्या ढिगा-यावर स्कॉग आणि नेसाची वाट पाहत असलेला बेई त्यांच्या नजरेस पडला ! स्कॉगने अत्यानंदाने त्याला आलिंगन दिलं. रॉल्फला तिचा अभिमान वाटला. त्यांची मोहीम अखेर यशस्वी झाली होती ! आता सुरक्षीतपणे खाली परतणं बाकी होतं.

बेईचा ऑक्सीजन सिलेंडर संपला होता. स्कॉगने आपला सिलेंडर त्याला दिला. एका सरळ रेषेत सावधपणे त्यांनी कँप ४ ची वाट पकडली.

रात्री ८.३०

दक्षिण कोरीयन मोहीमेतील गिर्यारोहकांनी बॉटलनेकच्या वरच्या उतारांवर सुरक्षा दोर बांधण्याचा निश्चय केला. अर्थात त्यात वेळ जाणार होता, परंतु अंधारात दोराशिवाय खाली उतरण्याची त्यांची तयारी नव्हती. त्यांच्यापाठोपाठ इतर सर्वांनाच अडकून पडावं लागणार होतं !

बेई, स्कॉग आणि नेसा बॉटलनेकच्या ट्रॅव्हर्सवर बांधण्यात आलेल्या सुरक्षा दोरापाशी पोहोचले होते. काही वेळातच खाली उतरून ते बॉटलनेकच्या ट्रॅव्हर्सपाशी पोहोचले.

स्कॉगच्या हेडलँपची बॅटरी संपत आली होती. तिने बॅटरी बदलण्याचा निर्णय घेतला. बेईच्या योजनेनुसार त्याने स्कॉग आणि नेसाला ओलांडलं आणि बॉटलनेकच्या सीरॅकखालून पुढे सरकण्यास सुरवात केली. बेईच्या पाठोपाठ काही वेळातच स्कॉग आणि नेसाने ट्रॅव्हर्स पार करण्यासाठी पाऊल उचललं.

रात्री ९.००

शिखरावरुन सर्वात शेवटी परत फिरलेल्या मार्को कन्फर्टोलाला खाली उतरणा-या गिर्यारोहकांचे हेडलँप दिसत होते. त्याने त्यांची पाठ धरली. ते बहुतेक कोरीयन मोहीमेतील गिर्यारोहक असावेत असा त्याने अंदाज केला होता.

जुमीक भोटे आणि त्याच्या मदतीला आलेला चिरींग दोर्जे यांनी एव्हाना बॉटलनेकच्या वरच्या उतारावर सुरक्षा दोर बांधला होता. एकेक गिर्यारोहकाने खाली सरकण्यास सुरवात केली.

रोल्फ एव्हाना ट्रॅव्हर्सच्या मध्यावर पोहोचला होता. त्याच्यापाठी सुमारे शंभर फूट अंतरावर स्कॉग आणि तिच्यापाठी पन्नास एक फूटांवर लार्स नेसा होता. स्कॉगला बेईचा हेडलँप स्पष्ट दिसत होता.

... आणि बॉटलनेकच्या ट्रॅव्हर्सवर ओथंबून असलेल्या सीरॅकने पहिली हालचाल केली !

बॉटलनेकच्या उतारावर भूकंपासारखे हादरे बसण्यास सुरवात झाली ! प्रचंड गर्जनेसारखा आवाज झाला आणि धाडकन हिमखंड कोसळला !

ट्रॅव्हर्स पार करत असलेली स्कॉग कोसळणा-या हिमखंडाचा आवाज ऐकून पार हादरली. बर्फात क्रम्पॉन रुतवून तिने आधार घेतला आणि आपल्या देहाचा सर्व भार कड्यावर टाकला ! सुरक्षा दोर ताणला गेल्याची तिला जाणिव झाली आणि काही क्षणातच तो तुटल्याचं तिच्या ध्यानात आलं ! नेमका त्याचवेळी तिच्या हेडलँपने राम म्हटला ! भीतीने थरथरत हादरणा-या बर्फाच्या कड्याला चिकटून ती घट्ट उभी होती !

स्कॉगच्या पाठी काही अंतरावर असलेल्या नेसालाही बर्फाला बसणारे हादरे जाणवत होते. पण नेमकं काय झालं असावं याची त्याला कल्पना आली नव्हती. मात्रं काही क्षणांतच त्याला स्कॉगचा आवाज आला.

" रॉल्फ ?"

नेसाने स्कॉगला गाठलं. एव्हाना हिमखंड कोसळल्याची त्याला कल्पना आली होती.

" सेसील ! तू ठीक आहेस ?"
" मी ठीक आहे लार्स !" स्कॉग उत्तरली, " रॉल्फ ? तो कुठे आहे? त्याचा हेडलँप दिसत नाही ! कुठे गेला तो ?"
" इथेच थांब !"

स्कॉगला तिथेच थांबण्यास सांगून नेसा सावधपणे पुढे निघाला. आपल्याला काय पाहण्यास मिळेल याची धाकधूक सतत त्याच्या मनात होती. सुरक्षा दोराचा आधार घेत सुमारे नव्वद फूट तो पुढे गेला...

... आणि अचानक सुरक्षा दोर संपल्याचं त्याच्या ध्यानात आलं !
सुरीने कापावा तसा तो दोर कापला गेला होता !

समोर कोसळलेल्या हिमखंडाचे भलेमोठे तुकडे सर्वत्र पसरलेले दिसत होते. त्या हिमखंडामुळे सुरक्षा दोर कापला गेला होता ! गिर्यारोहकांच्या पाऊलखुणा साफ पुसल्या गेल्या होत्या !

रॉल्फ बेईचं काय झालं असावं याची नेसाला कल्पना आली. कोसळलेल्या हिमखंडाने बेईवर झडप घातली होती ! हिमप्रपाताच्या तळाला कुठेतरी दुर्दैवी बेईचा निष्प्राण देह विसावला होता.

नेसाने मागे फिरुन स्कॉगला गाठलं.

" लार्स !" धडधडत्या अंतःकरणाने तिने विचारलं, " दिसला रॉल्फ ? एनी लक ?"
" नाही !"
" असं होणार नाही ! आपल्याला त्याला शोधावंच लागेल !"

नेसा स्कॉग आणि बेई इतका अनुभवी गिर्यारोहक नव्हता परंतु प्रसंगाचं गांभीर्य त्याच्या ध्यानात आलं होतं. बेईचा शोध निष्फळ आहे याची त्याला पूर्ण खात्री पटली होती. त्याचा शोध घेणं म्हणजे सरळ सरळ आत्महत्या करणं होतं. एक चुकीचं पाऊल आणि ते बॉटलनेकच्या तीव्र उतारावरून खाली कोसळले असते.

सुदैवाने नेसाच्या बॅगेत सुमारे २०० फूट सुरक्षा दोर होता ! स्कॉगला तिथेच सोडून तो पुन्हा तुटलेल्या दोराशी आला आणि आपल्याजवळचा दोर त्याने तिथे बांधला. तिथला अँकर कोसळलेल्या हिमखंडालाही दाद न देता अद्याप टिकून होता !

स्कॉगपाशी परतून त्याने आपली योजना तिला समजावून सांगीतली. कँप ४ वर पोहोचणं अत्यावश्यक होतं अन्यथा त्यांचीही बेईसारखी अवस्था होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती !

नेसाने ट्रॅव्हर्सवरून पुढे वाटचालीस सुरवात केली आणि काही वेळातच त्याला पुढचा मार्ग सापडला. त्याच्यापाठोपाठ स्कॉग पोहोचली.

" रॉल्फची काही खूण ?" स्कॉगचा पहिला प्रश्न.
" नाही सेसील. तो गेला !"
" नाही ! आपण त्याला शोधून काढू !"
" ठीक आहे ! पण उद्या सकाळी ! आता आपल्याला काही दिसणार नाही ! आपल्याला खाली जावंच लागेल !"

इथून पुढे सुरक्षा दोराशिवाय उतरण्याला पर्याय नव्हता !

नेसा आणि स्कॉगने खाली उतरण्यास सुरवात केली. एकेक पाऊल सावधपणे टाकत अननुभवी नेसा स्कॉगला खाली उतरण्यास मदत करत होता ! बेईच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरणं केवळ अशक्यं होतं.

अल्बर्टो झरीन कँप ३ वर पोहोचला होता !

रात्री १०.००

मार्को कन्फर्टोलाने एव्हाना त्या गिर्यारोहकांना गाठलं होतं. त्याच्या कल्पनेप्रमाणे ते कोरीयनच होते. मात्रं त्यांच्याबरोबर असलेल्या आणखीन एका गिर्यारोहकाला पाहून तो चकीत झाला. तो जेरार्ड मॅक्डोनेल होता ! कन्फर्टोलाने सुरक्षा दोराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला.

कँप ४ वर एरिक मेयर आणि फ्रेड्रीक स्ट्रँग रेडीओ संदेशाची वाट पाहत होते. अमेरिकन तुकडीतील चिरींग दोर्जे शेर्पा हा शिखरावर पोहोचलेला एकमेव गिर्यारोहक होता. त्याच्या यशाची बातमी कळताच मेयर आणि स्ट्रँगने त्याचं अभिनंदन केलं ! खाली उतरणा-या गिर्यारोहकांना झालेला उशीर पाहून त्यांना काळजी वाटत होती.

क्रिस किंकलने आपल्या तंबूपासून सुमारे दहा यार्डांवर एका बर्फाच्या तुकड्यावर एक प्रखर प्रकाशाचा मार्गदर्शक दिवा लावून ठेवला. अंधारात कँप ४ कडे येणा-या गिर्यारोहकांना दिशा समजण्यासाठी त्याचा उपयोग होणार होता.

नेसा आणि स्कॉग सावधपणे खाली उतरत होते. एव्हाना उताराची तीव्रता काहीशी कमी झाली होती.

अचानकपणे एका बर्फाच्या तुकड्यावरून स्कॉगचा पाय घसरला !

स्कॉग भयाने चित्कारली ! कोस़ळलेल्या बर्फावरून ती वेगाने घसरत होती. सुमारे साठ फूट घसरल्यावर तिच्या हातातली आईस एक्स एका मजबूत हिमखंडाला अडखळली. सुदैवानेच तिची घसरगुंडी थांबली !

काही क्षणांतच नेसा तिच्याजवळ पोहोचला ! भयाने हादरलेली स्कॉग थरथर कापत होती ! नेसाने तिला सावरलं आणि सावधपणे कँप ४ चा मार्ग पकडला.

रात्री १०.३०

जुमीक भोटे तीन कोरीयन गिर्यारोहकांसह खाली उतरत होता. किम जे सून आणी गो मी यंग एव्हाना बरेच पुढे गेलेले होते. मात्रं इतर तीनही अननुभवी गिर्यारोहक सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून होते. त्यांना खाली उतरण्याची तो सतत घाई करत होता.

एका उतारावरून खाली उतरण्यासाठी जुमीकने दोर बांधला होता. त्याच्या आधी कोरीयन गिर्यारोहक खाली उतरत होते. जुमीक खाली उतरत असतानाच...

... अचानकपणे दोर बांधलेला अँकर निसटला !

काहीही कल्पना येण्यापूर्वीच जुमीक खाली असलेल्या तिघा कोरीयन गिर्यारोहकांच्याही खाली फेकला गेला होता ! सुदैवाने तो खोल दरीत न कोसळता डोंगराच्या कडेला असलेल्या खाचेवर आपटला होता.

स्वतःला सावरत जुमीक नीट बसण्यात यशस्वी झाला ! मात्रं त्याचे हात आणि पाय आपटल्यामुळे चांगलेच दुखावले होते. आणखीन भर म्हणजे तो दोराच्या गुंडाळ्यांमध्ये पार गुरफटला होता !

जुमीकने वर पाहीलं. सुरक्षा दोराला हार्नेसच्या सहाय्याने दोने कोरीयन गिर्यारोहक अद्यापही लटकत होते !

सर्वात वर असलेला कोरीयन खाली डोकं - वर पाय अशा अवस्थेत लटकला होता ! त्याचा चेहरा रक्ताने माखला होता ! दुस-याचीही अवस्था तशीच होती ! मात्रं तो थोडा तिरक्या अवस्थेत लटकला होता ! तिस-या कोरीयन गिर्यारोहकाचा पत्ता नव्हता !

जुमीकच्या मनात आपल्या पत्नीचा आणि मुलाचा विचार आला. आपल्या मुलाला आपल्या वडिलांचं जेन जेन हे नाव देण्याचं त्याने कधीच ठरवलं होतं. मात्रं या परिस्थीतीतून कोणाची मदत आल्याविना सुटका होणं अशक्यंच होतं !

वर असलेल्या मार्को कन्फर्टोला आणि जेरार्ड मॅक्डोनेलने कोरीयन गिर्यारोहकांपाठोपाठ खाली उतरण्याचा विचार रद्द केला होता. त्यांना कँप ४ वर असलेल्या दिव्याचा प्रकाश दिसत होता, परंतु तिथे पोहोचायचं कसं ?

अखेर त्यांनी रात्री तिथेच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला !

कन्फर्टोला आणि मॅक्डोनेल रात्रं काढण्याच्या तयारीत असतानाच खाली बर्फ गडगडण्याचा त्यांना आवाज आला ! कन्फर्टोलाने सॅटेलाईट फोनवरुन इटालियन एव्हरेस्ट-के २ मोहीमेच्या प्रेसीडेंट असलेल्या ऑगस्टीनो डी'पोलेन्झाशी संपर्क साधून सगळी परिस्थीती त्याच्या कानावर घातली. सकाळ उजाडेपर्यंत तिथेच थांबून मग खाली उतरावं असा निर्णय कन्फर्टोला आणि मॅक्डोनेलने घेतला.

एकमेकांशी गप्पा मारत आणि गाणी म्हणत आणि फ्रॉस्टबाईट टाळण्यासाठी हात पाय चोळत दोघं सकाळची वाट पाहू लागले.

मेयर आणि स्ट्रँगला चिरिंग दोर्जेचा रेडीओ संदेश आला ! चिरिंग एव्हाना बॉटलनेकच्या ट्रॅव्हर्सवर पोहोचला होता.

" इथे एकही सुरक्षा दोर शिल्लक नाही !" दोर्जेने हादरवणारी बातमी दिली
" काळजी घे आणि सांभाळून खाली ये !" मेयर उत्तरला.

चिरींग एव्हाना बराच पुढे आला होता. त्याच्यापाठोपाठ इतर मोहीमेतील गिर्यारोहक होते परंतु सुरक्षा दोराचा मार्ग सोडून ते इतस्ततः भरकटत असल्याचं त्याच्या नजरेस पडलं ! किम जे सू, गो मी यंग, विल्को वॅन रूजेन, ह्युजेस डी'ऑब्रेड यांना खाली उतरणं मुष्कील होत होतं. चिरींगने त्यांच्या मदतीसाठी थांबण्याचा निर्णय घेतला. त्याच्या पुढे असलेले पेम्बा गाल्जे आणि छोटा पसांग लामा एव्हाना दिसेनासे झाले होते !

चिरींगने काही वेळ इतरांची वाट पाहीली पण कोणाचाही मागमूस दिसत नव्हता. निरुपायाने त्याने खाली उतरण्याचा निर्णय घेतला.

काही अंतर चालून गेल्यावर त्याचा पाय अचानक घसरला ! मात्रं सुदैवाने फारशी दुखापत न होता सुमारे सत्तर फूट अंतरावर त्याची घसरण थांबली !

नेमका त्याचवेळी त्याला खाली हेडलँपचा प्रकाश दिसला ! त्याला खालून जोराने हाक मारल्याचा आवाज आला.

" पेम्बा !" चिरींगने त्याचा आवाज ओळखला, " थांब ! मी खाली येतो !"
" इथे अ‍ॅव्हलाँच आलेलं दिसत आहे ! लवकर !"

चिरींगने सुरक्षा दोराचं टोक गाठलं आणि तो झपाट्याने खाली उतरू लागला. पेम्बाजवळ तो पोहोचला तेव्हा छोटा पसांगही तिथे असल्याचं त्याला दिसून आलं.

पसांगची आईस एक्स हरवली होती ! तो चांगलाच हादरला होता. त्याचे डोळे रडल्यामुळे लाल झाले होते !

पेम्बाने पुढे जाऊन दोराचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. मात्रं तो बराच खाली उतरल्याचं ध्यानात आल्यावर चिरींगने त्याला आवाज दिला.

" मी दोराविना खाली जातो आहे !" पेम्बा उत्तरला, " कोरीयन पाठोपाठ येत आहेत, ते पसांगला मदत करतील !"

अर्थात कोरीयन गिर्यारोहक भरकटल्याची पेम्बाला कल्पना नव्हती.

चिरींगने काही क्षण विचार केला. पसांग अननुभवी शेर्पा होता. कोरीयन गिर्यारोहकांच्या भरवशावर चिरींग त्याला सोडून खाली गेल्यास त्याचा जीव धोक्यात येणार होता.

चिरींगने एक असामान्य धाडसी निर्णय घेतला !

पसांगचा सुरक्षा दोर त्याने आपल्या सुरक्षा दोराशी भक्कमपणे बांधला आणि त्याच्यासह खाली उतरण्यास सुरवात केली ! खरंतर पसांग आणि स्वतः चिरींग सुरक्षीत खाली पोहोचण्याबद्दल साशंकं होता. दोघांपैकी एकही जण घसरला तर दुस-याचाही मृत्यू निश्चीत होता ! पण पसांगला तिथे सोडून जाण्याची त्याची तयारी नव्हती ! अत्यंत सावधपणे एकेक पाऊल उचलत त्यांची वाटचाल सुरू होती.

रात्री ११.००

कन्फर्टोला आणि मॅक्डोनेलच्या जोडीला तिसरा गिर्यारोहक येऊन पोहोचला होता.

विल्को वॅन रुजेन !

रूजेन थकल्यामुळे कन्फर्टोलाच्याही मागे पडला होता. कन्फर्टोलाच्या सतत चालू असलेल्या हेडलँपची दिशा पकडून रुजेन अखेर त्यांच्यापर्यंत पोहोचला होता.

मॅक्डोनेलचे पाय गारठले होते. तो आपले पाय चोळत होता. त्यांना पाहून रुजेनला आश्चर्य वाटलं. मात्रं खाली जाण्याचा कोणताही मार्ग त्यांना सापडत नव्हता. रुजेनच्या आग्रहास्तव त्यांनी पुन्हा खाली जाणारा मार्ग शोधण्यास सुरवात केली. मात्रं अंधारात कोणताही मार्ग न सापडता आपलीच शक्ती फुकट जाते हे त्यांच्या ध्यानात आल्यावर त्यांनी तिथेच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला.

किम जे सू आणि गो मी यंग आपल्या तुकडीतील इतर तीन गिर्यारोहकांना सोडून बरेच पुढे आले होते. बॉटलनेक मध्ये पोहोचताना मधला सुरक्षा दोर तुटल्याची त्यांना कल्पना आली होती. मात्रं दोघंही अनुभवी गिर्यारोहक असल्याने त्यांनी फारशी पर्वा न करता खाली उतरण्याचा निर्णय घेतला !

सावधपणे वाटचाल करणा-या नेसा आणि स्कॉगला अचानक सुरक्षा दोर दिसला ! काही अंतरावरच त्यांना कँप ४ वर असलेल्या प्रखर दिव्याचा उजळणारा प्रकाश दिसला.

रॉल्फ बेई कँप ४ वर पोहोचला असावा याबद्दल स्कॉगची खात्री पटली होती !

रात्री ११.३०

किम जे सू एव्हाना पुढे गेला होता. त्याच्या पाठोपाठ असलेल्या गो ला मात्र त्याच्यापाठोपाठ जाणं जमत नव्हतं. तिचा ऑक्सीजन कधीच संपला होता. गडबडीत रस्ता चुकून ती भलत्याच वाटेला गेली होती !

सुमारे शंभरएक फूट गेल्यावर आपला मार्ग चुकल्याची तिला कल्पना आली. मागे फिरुन तिने पुन्हा बर्फाळ उतार गाठला. परंतु पुढचा मार्ग मात्र तिला सापडेना. नक्की कोणत्या बाजूला जावं ? डाव्या ? उजव्या ? अखेर निरुपायाने दिवस उजाडेपर्यंत अथवा आणखीन कोणाचीतरी गाठ पडेपर्यंत वाट पाहणं हा एकच पर्याय तिच्यापुढे उरला होता.

चिरींग आणि पसांग अत्यंत सावधपणे खाली उतरत होते. मात्रं एका वळणावर पसांगचा पाय निसटला आणि दोर्जेसह तो घसरणीला लागला !

" आपण संपलो !" पसांग भयाने ओरडला.

सुदैवाने सुमारे नव्वद फूट घसरल्यावर चिरींगची आईस एक्स एका खडकाला अडखळून थांबली. दोघांनाही फारशी दुखापत झालेली नव्हती. काही क्षणांनी ते पुन्हा खाली निघाले.

२ ऑगस्ट

मध्यरात्री १२.००

चिरींग आणि पसांग त्यांची वाट पाहत थांबलेल्या पेम्बापाशी पोहोचले. चिरींगने मागे वळून शिखराकडे नजर टाकली. नशिबानेच तो अद्यापही सुरक्षीत होता.

चिरींगने मेयर आणि स्ट्रँगशी रेडीओवर संपर्क साधला.

" मी, पेम्बा आणि पसांग बॉटलनेकच्या खाली आलो आहोत. आम्ही कँप ४ वर येत आहोत !"

स्कॉग आणि नेसा कँप ४ वर पोहोचले. त्यांच्या तुकडीतील चौथा गिर्यारोहक ऑयस्टीन स्टँगलँड कँप ४ वर होता. त्याने बॉटलनेकच्या ट्रॅव्हर्सवरुनच माघार घेतली होती. स्कॉग आणि नेसाकडे त्याने बेईची चौकशी केली. नेसाने नकारार्थी मान हलवली.

" तो नाहीसा झाला !'

दरम्यान स्कॉगने सर्व तंबू पालथे घातले होते. बेईचा पत्ता नव्हता !

कोरीयन मोहीमेतील दुस-या तुकडीतील गिर्यारोहक कँप ४ वर पोहोचले होते. पण अद्याप पहिल्या तुकडीतील गिर्यारोहकांचा पत्त नसल्याने त्यांनी आपली चढाई पुढे ढकलली होती.

चिरींग भोटे आणि मोठा पसांग भोटे ऑक्सीजन सिलेंडर्स, पाणी, खाद्यपदार्थ आणि स्लीपींग बॅग घेऊन गिर्यारोहकांचा शोध घेण्यासाठी कँप ४ वरुन निघाले होते !

रात्री १.००

चिरींग भोटे आणि मोठ्या पसांग भोटेची पेम्बा, चिरींग दोर्जे आणि छोट्या पसांगशी गाठ पडली. त्यांना पाणी देऊन त्यांनी जुमीकची चौकशी केली. जुमीक कोरीयन गिर्यारोहकांबरोबर बराच मागे पडला होता. तिघांचा निरोप घेऊन चिरींग आणि मोठा पसांग बॉटलनेकच्या मार्गाला लागले.

कॅस वॅन डी गेवेल एव्हाना बॉटलनेकच्या ट्रॅव्हर्सच्या उतारावर पोहोचला होता. सावधपणे खाली उतरताना त्याला बर्फात बसलेला एक गिर्यारोहक दिसला.

ह्युजेस डी'ऑब्रेड !

डी'ऑब्रेडला पाहून डी गेवेलला आश्चर्य वाटलं. डी'ऑब्रेड बरोबर त्याचा पोर्टर मेहेरबान करीम मात्रं दिसत नव्हता. गेवेलला पाहताच डी'ऑब्रेडने सुटकेचा नि:श्वास टाकला. खाली जाण्याची नेमकी वाट ठाऊक नसल्याने तो अद्याप तिथे थांबून राहीला होता.

" कॅस ! तू पुढे हो ! मी पाठोपाठ येतो !"

डी गेवेल पुढे निघाला. काही अंतर काटल्यावर तो लार्स नेसाने बांधलेल्या दोरापाशी पोहोचला. अर्थात रॉल्फ बेईचा बळी घेणारा हिमखंड कोसळल्याची त्याला काहीच कल्पना नव्हती. गेवेलने सावधपणे दोरावरून मार्गक्रमणा करण्यास सुरवात केली. काही अंतरावर दोर संपताच त्याने सावधपणे तो तीव्र उतार आईस एक्सच्या सहाय्याने उतरण्यास सुरवात केली.

उजव्या हाताला काही अंतरावर त्याला विल्को वॅन रूजेनने चढाई दरम्यान ठेवलेली बॅग आढळली. त्याबरोबर आपण बॉटलनेकमध्ये नेमके कुठे आहोत याची त्याला कल्पना आली. रुजेन अद्यापही खाली आलेला नव्हता. त्याच्यासाठी बॅग तिथेच सोडून कॅस पुढे निघाला.

.... आणि त्याच्या डाव्या हाताला सुमारे तीस फूट अंतरावर खाली कोसळणारा गिर्यारोहक त्याच्या नजरेस पडला !

त्या गिर्यारोहकाचा हेडलँप अद्यापही सुरू होता ! त्याचा चेहरा गेवेलला दिसू शकला नाही परंतु त्याचा पिवळा जर्द गिर्यारोहणाचा पोशाख मात्र डी गेवेलच्या दृष्टीस पडला.

ह्यूजेस डी'ऑब्रेड !

डी'ऑब्रेड कशामुळे कोसळला असावा याची गेवेलला काहीच कल्पना नव्हती. त्याने शिखराकडे नजर टाकली. मागून येणारे दोन गिर्यारोहक त्याच्या नजरेस पडले. पण ते ब-याच अंतरावर होते. गेवेलने त्यांना आवाज दिला पण त्यांचं काहीच उत्तर आलं नाही.

गेवेलने कँप ४ चा मार्ग पकडला.

रात्री १.३०

चिरींग दोर्जे, पसांग आणि पेम्बा ग्याल्जे सुरक्षीतपणे कँप ४ वर पोहोचले ! स्ट्रँग आणि मेयरने चिरींगला गाढ आलिंगन दिलं !

चिरींग आणि मोठा पसांग बॉटलनेकच्या मार्गावर असतानाच त्यांना खाली उतरणा-या गिर्यारोहकाचा हेडलँप दिसला. त्यानी दिलेल्या आवाजाची दिशा पकडून तो त्यांच्याजवळ पोहोचला.

किम जे सू !

किम आणि गो इतर कोरीयन गिर्यारोहकांपासून वेगळे होऊन बरेच पुढे आले होते. पण वाटेत त्यांचीही चुकामुक झाली होती ! त्यांनी गो ची चौकशी केली.

" दिदी कुठे आहे ?"
" ती माझ्यापाठोपाठ खाली उतरत होती ! तिचा शोध घ्या !"

दोघांनी किमला कँप ४ ची वाट दाखवली आणि ते पुढे निघाले.

किमला सोडून चिरींग आणि पसांग काही अंतर पुढे गेले आणि...

.... डाव्या हाताला असलेल्या खोल उतारावर कोसळणारा आकार त्यांच्या दृष्टीस पडला ! त्या धक्क्यातून ते सावरत असतानाच आणखीन एक आकार खाली कोसळलेला त्यांच्या नजरेस आला. यावेळी खाली कोसळणा-या मानवी शरीराचा घसपटणारा आवाजही !

दोन गिर्यारोहक खाली कोसळल्याबद्दल त्यांना कोणतीच शंका उरली नव्हती. त्यात जुमीक तर नव्हता ना?

रात्री २.००

खाली उतरत असलेल्या गेवेलची चिरींग आणि पसांगशी गाठ पडली. डी'ऑब्रेड कोसळल्याचं त्याने त्यांना सांगीतलं त्यांचा निरोप घेऊन तो खाली निघाला.

कँप ४ वर पोहोचण्यापूर्वी गेवेलने बेस कँपवर रोलँड वॅन अ‍ॅसशी रेडीओसंपर्क साधला.

" रोलँड, मी बॉटलनेकच्या खाली आलो आहे. मी ठीक आहे. विल्को आणि जेरार्ड अद्याप वर आहेत. मी बहुतेक ह्युजेसला पडताना पाहिलं आहे ! कोणाला तरी मदतीस वर पाठव !"
" कॅस, तू कँप ४ वर पोहोच !"

रात्री २.३०

कॅस वॅन डी गेवेल कँप ४ वर पोहोचला.

बॉटलनेकच्या दिशेने चढाई करणा-या चिरींग आणि मोठा पसांग यांना थांबून राहिलेल्या गिर्यारोहकाचा हेडलँप दिसला. त्यांनी गो च्या नावाने हाका मारण्यास सुरवात केली.

" दिदी ! दिदी !"
" मी इथे आहे ! लवकर इथे या !"

काही वेळातच दोघं शेर्पा तिच्याजवळ पोहोचले. त्यांना पाहताच तिने सुटकेचा नि:श्वास सोडला. आपल्याला कँप ४ वर घेऊन जाण्याची तिने त्यांना विनंती केली. दोघंही तिच्यासह परतीच्या वाटेला लागले.

पहाटे ४.३०

अल्बर्टो झरीन कँप ३ वर साखरझोपेत होता !
सेसील स्कॉग आणि लार्स नेसा कँप ४ वर परतले होते.
रॉल्फ बेई कोसळलेल्या हिमखंडात अदृष्य झाला होता !
चिरींग दोर्जे, छोटा पसांग लामा, पेम्बा ग्याल्जे, कॅस वॅन डी गेवेल, किम जे सू कँप ४ वर पोहोचले होते.
ह्युजेस डी'ऑब्रेड खाली कोसळला होता.
त्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक गिर्यारोहक पडला असावा अशी दाट शक्यता होती.
चिरींग भोटे, मोठा पसांग भोटे आणि गो मी यंग कँप ४ वर पोहोचले !
जुमीक भोटे आणि दोन कोरीयन गिर्यारोहक बॉटलनेकमध्ये दोराला लटकलेल्या अवस्थेत होते.
तिसरा कोरीयन गिर्यारोहक कुठे होता ?
विल्को वॅन रूजेन, जेरार्ड मॅक्डोनेल आणि मार्को कन्फर्टोला यांनी बॉटलनेकच्या वर बायव्हॉक केला होता.
मेहेरबान करीमचा काहीही ठावठिकाणा नव्हता !

पुढे काय होणार होतं ?

क्रमश :

प्रतिक्रिया

रघुपती.राज's picture

4 Apr 2014 - 12:30 pm | रघुपती.राज

भयानक आहे हे सगळे....पण वाचल्याशिवाय राहवत नाही.

प्रचेतस's picture

4 Apr 2014 - 10:11 pm | प्रचेतस

मिपावरील अनोख्या मालिकांपैकी एक.

केदार-मिसळपाव's picture

4 Apr 2014 - 3:22 pm | केदार-मिसळपाव

लिहित आहात. येणारे प्रतिसाद अतिशय कमी असले तरिही वाचनसंख्या बघता तुमचे लेख प्रसिद्ध झाले आहेत हे नक्की समजा.

अजया's picture

4 Apr 2014 - 4:37 pm | अजया

आवडते आहे वाचायला. पु.भा.प्र.

पैसा's picture

9 Apr 2014 - 12:28 pm | पैसा

माणूस यंत्रांच्या मदतीने निसर्गावर विजय मिळवायच्या गमजा करतो, पण अशी काही यंत्र मदतीला नसतील तर निसर्गासमोर माणूस अगदी बापुडवाणा आहे. :(

सुवर्णमयी's picture

16 Apr 2014 - 2:29 am | सुवर्णमयी

लेखन अतिशय सुंदर. खिळवून ठेवणारे