जनुका रेषा - एक स्वैर प्रकट चिंतन

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
6 Mar 2014 - 11:31 am

एक रेषा असते जी जनुकांनी बद्ध असते. त्या किमान बंधनांपलीकडे तीने मला अमर्याद स्वातंत्र्य दिलेल असतं. पण या स्वातंत्र्यावरही बंधन येत असतात. काही मी माझी घालून घेतलेली असतात, काही काळ आणि परीस्थितीने येणारी असतात, काही कुटूंबातील, समाजातील, संस्कृतीतील, राज्य आणि धर्म संस्थेतील घटकांनी कधी कळत, कधी नकळत घातलेली असतात. कुटूंब, समाजातील, संस्कृतीतील, राज्य आणि धर्म संस्थेतील असलेल्या बंधनांच्या रेषांची वर्तुळ; कधी स्विकारून, कधी अलिप्त राहून, कधी विरोध दर्शवून, कधी बदलून, बंधनांच्या परिघांच कोंडाळ घडवण्यात, बदलण्यात, टिकवण्यात, एक व्यक्ती म्हणून माझा सहभाग असतोच असतो.

या मी सहभागी असलेल्या लक्ष्मण रेषा; मी अथवा माझ्यावतीने सातत्याने विवीध गोष्टींना नाकारत असतात. मी या भ्रमात असतो की मी दुसर्‍यांना नाकारतो आहे; पण वस्तुस्थिती असते की प्रत्येक होकारा प्रमाणेच दिलेला प्रत्येक नकार मी स्वतःला दिलेला असतो. दिलेला प्रत्येक होकार दिलेला प्रत्येक नकार माझ्या भोवतीचा परीघ ठरवत असत. हे दिलेले सर्व होकार नकार सर्व माहिती घेऊन दिले जातात का ? विवेक वापरून दिले जातात का ? हा माहितीचा अधिकार, होकाराचा आणि नकाराचा अधिकार, मी, माझ्या स्वतःच्या मनाने वापरत असतो का ? की, हे माझ्या मनाचे मूलभूत अधिकारच मी इतर कुणाच्या स्वाधीन करून बसलो आहे? माझ्या भोवतीची रेषा स्वतः आखण्याच सामर्थ्य स्वतःत आणण्याचा माझा कीमान प्रयास असतो का ? मी स्वतः आखलेल्या परीघाच स्वतः समर्थन करतो का ? किंवा मी घातलेल्या रेषांनी इतरांच्या रेषांचे उल्लंघन तर होत नाही आहे ना ? मी दिलेल्या, माझ्यावतीने दिल्या गेलेल्या होकारांनी अथवा नकारांनी; माझे, माझ्या आप्तांचे, माझ्या समुहाचे, समाजाचे, देशाचे हित साधले जात आहे, जाणार आहे हे मी तपासत असतो का ?

एखाद्या व्यक्तीने रेषेच्या बाहेर पाऊल टाकल की, त्या व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या मर्जी शिवाय माझ्या रेषेत मी जबरदस्तीने ओढून तर घेत नाहीए ना ? कुणीही याव रबरी बॉल समजून टप्पा मारून जाव अस तर होत नाहीना ? माझ्या वर्तुळात कुणी एक जनुका असते, ती माझ्या वर्तुळा बाहेर पहाते तर मी तयार केलेला समुह जनुकेला लगेचच अमानुषतेने प्रताडीत तर करत नाहीना ? काचे प्रमाणे तीला खळ्ळकन फोडून मोकळा होत नाही ना ? प्रत्येक जनुकेला स्वत:च्या वर्तुळाची परिघाची व्याख्या करण्याचा अधिकार आहे, त्या अधिकारावर मी माझ्या व्याख्यांच ओझ तर लादत नाही आहे ना ? जनुकाचे जनक कोण होते, हे विचारून मी जनुकाला तीच्या संधी नाकारत नाही ना ? किंवा जनुकाच्या परिघावरून तिच्या निर्मीत जनांच्या संधी मी नाकारत नाही ना ?

मी, माझ कुटूंब, माझा समाज वस्तुस्थितींना नाकारत नाही ना ? अथवा साप साप म्हणून भुईला झोडपत नाही ना ?

संस्कृतीधर्मसमाजजीवनमानराहणीप्रकटनविचारअनुभव

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

6 Mar 2014 - 12:44 pm | स्पंदना

का जाणे. पण हल्ली हेच प्रश्न मलाही पडताहेत.
उगा जुंपलेल्या बैला सारख जू ओढताना दिसतात काहीजण. काय हरकत आहे एखादा श्वास मोकळा घ्यायला? का अडवतो आपण त्यांना? आपण जरी नाही अडवल, तरी समाजात रहायच म्हणुन ते स्वत्;च अडकत जाताहेत. आणखी एक-दोन पिढ्या खर्ची पडतील अस वाटतय. पण होइल हा बदलही होइल.

माहितगार's picture

6 Mar 2014 - 4:50 pm | माहितगार

समाजात रहायच म्हणुन

मानवी समाज आत्मपरिक्षण आणि तर्कसुसंगत विचार करू शकेल ? सध्या केवल शुभेच्छा व्यक्त करू शकतो.

एनीवे या निमीत्ताने आमच्या मनाचा खुलेपणा (मोकळेपणा/ओपन माईंडेडनेस) कसा जोपासावा ? धाग्याची जराशी हि जाहीरात ओळ.

आणि प्रतिसादा करीता धन्यवाद

कवितानागेश's picture

6 Mar 2014 - 12:47 pm | कवितानागेश

हम्म...
वैचारिक म्युटेशन?

वैचारिक म्युटेशन? हम्म... विचार करतो आहे.आपणास 'वैचारिक म्युटेशन?' मध्ये काय काय अभिप्रेत आहे याची कल्पना नाही. माझ्या लेखन/चिंतन भूमिके मागे अंशतः; नरहर कुरुंदकरांनी एका लेखात स्वातंत्र्य जन्म सिद्ध असत का की संस्कृती सिद्ध असत असा प्रश्न उपस्थित केला होता तो होता. मनाचा खुलेपणा वास्तवात येऊ शकतो का मृगजळच राहतो; ते व्यक्ती कुंटूंब आणि समाज यावर कालानुरूप अवलंबून असत; मनाचा खुलेपणा जपणार्‍या काही टक्के व्यक्ती सर्वकालीन सर्व समाजात असतातच पण ती टक्केवारी काय आणि समाज आणि संस्कृतीच्या त्या त्या वेळच्या स्थितीवर ठरत ? 'वैचारिक म्युटेशन?' आपोआप होत का साधता येत ? संस्कृतीस घडवण्याचा प्रत्येकजण आपापल्या परीने योगदान करत असतो ते आपण आपल्या परीने सकारात्मक करायच एवढच.

आपल्या प्रतिसादा करीता धन्यवाद

आत्मशून्य's picture

6 Mar 2014 - 1:06 pm | आत्मशून्य

अगदी जन्मापासुन मृत्युपर्यंत प्रत्येक क्षणी आपली इछ्चा असो वा नसो सातत्याने एक अप्रत्यक्ष दबाव कार्यन्वीत असतो. जो दर वेळी दोन ऑप्शनपैकी एक निवडावाच लागेल अशी सक्ती करत असतो. ऑप्शन ए का बी.. ?. देर इज नो ऑप्शन सी. आणी नेहमी समोरील पर्यांयांपैकी एक हमखास निवडावाच लागतो... ज्याची परीणती अजुन पुढे दोन नवीन पर्याय सामोरे येण्यात होते... श्वास घेउ की नको ते कॉमर्स की सायन्स सगळं या प्ध्दतीने घडत असते. आपण मात्र "मी", "माझी निवड" "माझे विचार" "माझे प्रारब्ध्द" वगैरे वगैरे भ्रमात फार आनंदी/दुखी: असतो. अन प्रत्येक कृतीचे स्वामीत्व स्वतःकडे घेत असतो. पुन्हा पुन्हा विसरत की ऑप्शन सी जो खर्या अर्थाने आपला असेल समोर दिलेल्या पर्यांयांपैकी एक नसेल तो आपण कधीच निवडला नाही.

माहितगार's picture

6 Mar 2014 - 5:09 pm | माहितगार

आमचा पुढचा धागा ऑप्श्न्स बद्दल असण्याची शक्यता आहेच. प्रतिसादाकरता धन्यवाद

पैसा's picture

29 Mar 2014 - 3:12 pm | पैसा

प्रत्येक गोष्ट "मी" करतो हे गृहीतक तपासून घ्यावे असे वाटत नाही का? कित्येक गोष्टी बाह्य कारणांमुळे घडतात किंवा या "मी" ला करणे भाग पडते. "मी" सगळ्या गोष्टींचा कारक असतो का यावर आधी चर्चा व्हायला हवी नाही का? आपण ज्या अधिकार आणि स्वातंत्र्याबद्दल बोलतो त्यातले प्रत्यक्षात फारच थोडे माणसाच्या वाट्याला येतात.

तुम्ही दुसर्‍या माणसाला आपल्या रेषेत ओढून घेण्याबद्दल जेव्हा बोलता तेव्हा तो स्वतःची निर्णयशक्ती वापरत असेल ही शक्यता विचारात घेत नाही आहात. किंवा तुमच्या दोघांच्यापेक्षा वेगळी आणखी काही तिसरी शक्ती असेल जी तुमच्या दोघांवर परिणाम करत आहे ही पण एक शक्यता आहेच ना!

माहितगार's picture

29 Mar 2014 - 4:46 pm | माहितगार

आपल मत अभ्यासतोय, आपल्या प्रतिसादावर अजून काही मते प्रतिसाद व्यक्त होतात का बघतो मग माझा प्रतिसाद देतो.

खरेतर हा धागा मी स्वतःही अल्पावधीत विसरून गेलो होतो, धागा पुन्हा वर आलेला पाहुन आनंद झाला, प्रतिसादासाठी धन्यवाद.

या लेखाच्या निमीत्ताने मराठी विकिपीडियावरील दोन लेखांचे दुवे नमुद करावेसे वाटतात.

१) अभिव्यक्त होणे अभिव्यक्ती प्रकट होण्याची प्रक्रिया (Process of expression,or expressing oneself, in living organisms and specially human beings and how various sciences and philosophies explain,describe,perceive or relate to this process)

२) अभिव्यक्तिस्वातंत्र्य