नवे देव आणि त्यान्चे नवे भाव

शेखरमोघे's picture
शेखरमोघे in जे न देखे रवी...
4 Jan 2014 - 1:36 pm

भाव तेथे देव, मग नवीन देव आले तर नवीन नकोत का भाव?
विसरा जुनी माहिती, जुन्या पद्धती, खूप ऐकले असेल भाव तेथे देव,
पण आता नवीन पद्धती आणि त्यांत "भाव" कसा ठरवावा हे माहीत आहे काय?
"प्रयत्नांती परमेश्वर" असेल अनेकदा ऐकलं, पण त्याचाच आता नवा "अर्थ" काय ?

भाषा बदलते आहे, "अर्थ" बदलत आहेत, नवीन वारा वाहतो आहे, लक्ष द्या नीट
नवी भाषा, नवे "अर्थ", जाणू शकलात तर व्हाल प्रत्येक चित्रपट आणि नाटकासारखे (सुद्द लेकनाची ऐसी तैसी) "हीट"

माहित होतं ना अभ्यास करा किंवा न करा, देवाबरोबर करावा लागतो भाव
परीक्षेत काय, मुलाखतीत काय, नोकरी लागताना काय किंवा
परदेशात राहून आपल्या नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळवण्याकरता काय
हेही आधीच ठरवावे लागते, कुठल्या देवाला भजावे, "आदर्श" देव कुठला
आपला (आणि आपल्यांचा) "उत्कर्ष" होण्यासाठी किती "नैवेद्य" कुणाला
देव होतो त्याला(च) प्रसन्न जो फेडतो बोललेले नवस आणि "उज्वल भविष्यासाठी" करत रहातो भाव
आधीच ठरवावे लागते की घालायला हव्या किती प्रदक्षिणा, प्रसाद किती किलो की पुरे एक पाव

सवयीने समजत आणि माहीत होते, कुठल्या देवाला कुठला पंड्या भावतो,
कुठल्या देवाला कमळ बोचते तर कुठल्याला तेच सदैव लागते

माहीत होता, आजवरचा प्रघात,
देवाना शोधायला जाण्याची जरूर न लागता पंड्याच "व्यवस्थित" मार्गदर्शन करतो
नैवेद्य "ओला" का "सुका", "सुका" असल्यास किती पेट्या याची बैजवार माहिती देतो,
कुणाला "नीट", कुणाला "फिट", कुणाला काय आणि कधी हवे हे सर्व सांगतो,
नैवेद्य नेतो, आणतो, पोचवतो, वाटतो, सगळे "सेटिंग" करून देतो
आपल्या मार्गातील छोटे मोठे, असलेले बनवलेले अडथळे दूर करून देण्याचे
कधी भरघोस आश्वासन देतो , तर कधी " पूर्ण कन्त्राटच" घेतो
जरूर लागेल तसतसा "पाठीवर", "डोक्यावर" आणि इतर कुठे कुठे "हात" ठेवतो
व्यवस्थित मांडवली (हा तसा नवीनच शब्द, फेकता येतो का बरोबर?) करून देतो

आता मात्र हे शोधावे लागेल की (नवे) देवच सध्या कुठे आणि कसे विराजमान होत आहेत

जे देव, फक्त कधी कधी (बहुतेक दर पाच वर्षानी) विमान-मार्गे अवतरत
लीन, दीन दिशाहीन भक्तांकडून, कधी गोंजारून तर कधी दंडुके दाखवत
करून घेत पुष्पवृष्टी आणि (आधी आणि नंतर सुद्धा) दाखवत "हात"
ते आता होत आहेत गायब, नवे "देव" आहेत अवतरत

नवे वारे वहात आहेत, प्रश्नच प्रश्न आहेत उभे करत
ओळखीचे देव होत आहेत गायब, नवे "देव" (अजून तरी) पंड्या नाहीत वापरत
ओळखणार कसे "नवे देव", कारण त्यांच्याकरता देऊळ बांधलेच पाहिजेत असा ते हट्ट नाही धरत
नाही अजून नव्या देवांचे देऊळ, जवळचे, ओळखीचे होत
नव्या देवांची ओळख फक्त एक मात्र, त्यांच्या डोक्यावरील (वेगळेच) ओळखपत्र
नाही अजून ठाऊक नव्या देवाना कौल कसा लावावा
नाही अजून ठाऊक नव्या पद्धतीने नवस कसा बोलावा (आणि फेडावा)

आता व्हायला हवेत प्रगतीचे अनेक नवे मार्ग तयार, अनेक नव-भाषा-तज्ञ हुश्शार
ज्याना वाचता येईल नव्या देवांच्या डोक्यावरील ओळखपत्र
शोधता येईल या नवीन देवांचे आधीचे गण गोत तसेच मूळ गोत्र
ठरवता येईल नैवेद्याची नवी व्याख्या आणि रूप
कारण या नव-तंत्र-मंत्र-ज्ञानाचे गरजू आहेत खूप

या तज्ञांच्या मदतीने येऊही शकेल नवीन पाणी वापराचा "मापक" जो देतो हमी
पाण्याचा वापर "फक्त ७०० लिटर" किंवा त्याहूनही कमी
फक्त द्या ठरलेल्या पानवाल्याकडे "वर्गणी", वापरा कितीही पाणी, कधी नाही पडणार कमी

नवे देव, त्यांचे नवीन पंड्ये शोधण्याचे प्रयत्न चालू असताना,
नवीन देवांची ओळख अजून पटायची असताना
नवीन "देवांचा देव", लोकपाल अजून अवतीर्ण व्हायचा असताना
(त्याचा ही "भाव" अजून ठरलेला नसताना)
विसरू नका आधीचे नवस, व्रतें, घेतलेला वसा, कबूल केलेले नैवेद्य
कसे विसरून चालेल, आधीचे अनेक हित-संबंध, काहीही असो परिस्थिती सद्य

नवीन भाषा शिकण्याचे, नवीन भाषा तज्ञ शोधण्याचे, करत राहा प्रयत्न
(कारण आहे प्रयत्नांती परमेश्वर, सापडेल हो तुम्हाला नवीन देव, त्याचा पंड्या किंवा नवीन भाव)
ज्यांना ज्यांना पाठवत होता आजवर नैवेद्य, ती चालूच ठेवा प्रथा, किलो असो की फक्त पाव
टोपीवाले पळाले म्हणता म्हणता, टोपीवालेच पुन्हा तख्तावर आहेत
जोपर्यंत खुर्चीला कुर्निसात करण्याची (आणि करवून घेण्याची) अनेक शतकांची परंपरा आहे,
तोपर्यंत जुन्या किंवा नव्या, तांबड्या, पांढऱ्या किंवा छापील, टोप्या या टोप्याच आहेत

मुक्तक

प्रतिक्रिया

चान चान
दत्तोबांची आठवण आली