चावडीवरच्या गप्पा - 'आप'आपली मते

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
10 Dec 2013 - 3:01 pm

chawadee

“पवारसाहेबांनी राष्ट्रवादीच्या वेबसाइटवर त्यांच्या एका ब्लॉग पोस्टवर कसले सणसणीत आणि परखड विश्लेषण केले आहे दिल्ली विधानसभा निवडणुकांचे!”, बारामतीकर, चावडीवर प्रवेश करत.

“वेबसाइट, ब्लॉग...बरं... बरं... काय म्हणताहेत तुमचे आदरणीय शरदचंद्ररावजी पवारसाहेब?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात.

“मग, साहेब नवीन तंत्रज्ञानातही आघाडीवर आहेत! असो, सर्वांचीच कानउघाडणी केली आहे त्यांनी! विशेष म्हणजे तुमच्या त्या केजरीवालांचेही पितळ उघडे केले आहे?”, बारामतीकर अभिमानाने.

“ह्म्म्म, आमचे केजरीवाल!”, (आमचे वर जोर देत) नारुतात्या.

“दिल्लीकरांनी अजून पाच सहा जागा देऊन आम आदमी  पक्षाला सरकार बनविण्याची संधी द्यायला हवी होती म्हणजे ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ झाले असते असे साहेब म्हणाले, परखडपणे”, बारामतीकर.

“अहो, पवार बोलणारच! त्यांच्या 'कांद्याचे भाव'  ह्या वर्मावर केजरीवालांनी ‘कांद्यांचे भाव निम्मे करून दाखवू’ असे म्हणत बोट ठेवले होते ना!”, इति चिंतोपंत.

“अहो शेती आणि शेतीची जाण हाच तर साहेबांचा हुकुमाचा एक्का आहे! त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की  या भावांवर राज्यांचे काहीच नियंत्रण नसते. उत्पादनावर आधारित दरांचे चढउतार होत असतात  हेच वास्तव आहे.”, बारामतीकर एकदम भावुक होत.

“कसला शिंचा हुकुमाचा एक्का आणि कसली शिंची ती जाण! अहो ह्या कृषिप्रधान देशाच्या शेतीचा पार चुथडा केला आहे ह्या कृषिमंत्र्याने.”, घारुअण्णा लालबुंद होत.

“घारुअण्णा उगाच काहीही बरळू नका, तुम्हाला काय कळते हो शेतीतले?”, शामराव बारामतीकर घुश्शात.

“नसेल मला शेतीतले काही कळत, पण तुमचे सो कॉल्ड साहेब काय करताहेत ते मात्र कळते आहे बरं! भारी शेतकर्‍यांतचा पुळका त्यांना! अहो आपल्या पुण्यातलीच किती एकर लागवडीखालची जागा ‘डेव्हलपमेंट’च्या नावाखाली बरबाद केली? आणि त्यातून कोणाची ‘डेव्हलपमेंट’ झाली हे ही कळते हो! असे केल्यावर कसे वाढणार उत्पन्न आणि कशा होणार किमती कमी?”, घारुअण्णा रागाने.

“अरे पवार काय म्हणाले आणि तुम्ही कुठे चाललात! पवारांनी एकंदरीत आढावा घेतला आहे निवडणूक निकालांचा. सर्वांनाच कानपिचक्या दिल्या आहेत त्यांनी!”, भुजबळकाका चर्चेच्या मैदानात येत.

“धन्यवाद बहुजनहृदयसम्राट, नेमके हेच म्हणायचे होते मला.”, बारामतीकर हसत.

“पण साहेबांनी केजरीवालांवर केलेला हल्ला जरा अतीच होता. दिल्ली निकालानंतर तर काय सगळेच केजरीवालांचे भविष्य आपल्यालाच कळल्याच्या थाटात मते सांडत सुटले आहेत? ”, इति भुजबळकाका.

“म्हणजे? स्पष्ट बोला असे मोघम नको.”, नारुतात्या बुचकळ्यात पडत.

“अहो, लोकसत्तेच्या अग्रलेखात माननीय संपादकांनी काय तारे तोडलेत ते वाचले नाहीत का?”, भुजबळकाका.

“नाही ब्वॉ, काय म्हणतोय लोकसत्तेचा अग्रलेख?”, इति घारूअण्णा.

“ज्या क्षणी 'आम आदमी पक्ष' आपली राजकीय भूमिका स्पष्ट करेल तो क्षण आम आदमी पक्षाच्या शेवटाची सुरुवात असेल असे भविष्य त्यांनी वर्तवले आहे.”, भुजबळकाका शांतपणे.

“आम आदमी पक्ष वा त्या पक्षाचे रोमॅंटिक समर्थक यांनी हुरळून न जाणे बरे असा फुकटचा न मागितलेला सल्ला ही दिला आहे बरं का!”, चिंतोपंत.

“च्यामारी, त्या बिचार्‍या केरजीवालाचे यश कोणालाच बघवेनासे झालेले दिसतेय!”, नारुतात्या जोरात हसत.

“हो ना, अण्णांनी पण मौन सोडलेले दिसतेय. अण्णांनी दिल्लीत केलेल्या आंदोलनामुळे आम आदमी पक्षाचा प्रचार दिल्लीतल्या घरा-घरात झाला असे आता अण्णा म्हणताहेत.”, चिंतोपंत.

“पण हेच अण्णा केजरीवालांची खिल्ली उडवत होते ना पक्ष स्थापनेनंतर?”, नारुतात्या.

“अहो, केजरीवालांचे यश बघून त्यांचे संतपण ही गळून पडलेले दिसतेय, परत उपोषणाची घोषणा केली आहे त्यांनी! किती ती शिंची अॅलर्जी म्हणावी, खीsssखीsssखीsss”, घारुअण्णा खो खो हसत.

“त्या किरण बेदीही निवडणूक प्रचाराच्या वेळी कुठेही नव्हत्या, पण निकालानंतर मात्र एकदम आप आणि भाजपा यांच्यात समेट करायला रिंगणात!”, चिंतोपंत.

“अहो भावनेच्या आहारी जाऊन सेंटिमेंटल फूल होऊ नका उगाच! दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होऊन पुन्हा निवडणुका होतात की नाही बघा! साहेबांचेही खाजगीतले हेच मत आहे.”, बारामतीकर.

“त्याचा फायदा भाजपालाच होईल, केजरीवालांना काही फायदा होईलसे वाटत नाही.”, चिंतोपंत.

“काहीही असो, पण केजरीवालांनी मिळवलेल्या यशाने बहुतेकांना अनपेक्षिततेचा धक्का जरा जास्तच बसलेला दिसतोय!”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, म्हणजे नेमके काय म्हणायचे आहे तुम्हाला?”, घारुअण्णा.

“अहो केजरीवालांना कोणी खिजगणतीतच धरले नव्हते! काँग्रेस राहुल गांधी आणि भाजपा नरेंद्र मोदी यांच्याच नादात होते. केजरीवाल एकदम 28 जागांवर कब्जा मिळवतील हे कोणाच्या स्वप्नातही आले नसेल. त्यामुळे हा धक्काच आहे सर्वांसाठी!”, सोकाजीनाना.

“सोकाजीनाना, खरे आहे तुमचे?”, नारुतात्या.

“सद्य राजकीय अनागोंदीच्या आणि भ्रष्ट सरकारी पार्श्वभूमीवर हा निकाल पॉझिटिव्ह आणि प्रॉमिसिंग ठरावा. अण्णांच्या आंदोलनाने जन-जागृती झाली होती पण त्या जन-आंदोलनात भरीव काहीही नव्हते. त्यावेळी झालेल्या जन-आंदोलनाने समजा जर क्रांती होऊन सत्ताधार्‍यांना सत्तेवरून हाकलून लावले असते, ट्युनेशिया क्रांतीसारखे, तर पर्यायी सरकारची व्यवस्था काय होती अण्णांकडे? नुसते जनलोकपाल बील पास करून घेण्यासाठीच झालेल्या जन-जागृतीचा आणि जन-आंदोलनाचा भर ताबडतोब विरून गेला कारण ठोस अजेंडाच काही नव्हता. व्यवस्थेला बदलण्यासाठी व्यवस्थेचा भाग असणे गरजेचे असते, केजरीवालांनी नेमके हेच जाणून घेतले आणि आपल्या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्यावेळी अण्णांची त्यातून माघार घेतली खरी पण आता त्यांचीही गोची झालेली दिसतेय कारण केलरीवालांचे हे यश कोणालाच अपेक्षित नव्हते.

सद्य स्थितीत, कोणताही प्रस्थापित राजकीय पक्ष सत्तेवर येण्यापेक्षा एका नवीन, फ्रेश पर्यायाची भारताला गरज आहे. ‘आप’च्या रूपात केजरीवालांनी तो पर्याय दाखवला आहे आणि दिल्लीतील त्यांच्या विजयाने जनतेने त्या पर्यायाला स्वीकारलेले दिसते आहे. आता केजरीवाल आणि त्यांचे आमदार कसे आहेत ते लवकर कळेलच. त्यामुळे दिल्ली हा ‘आप’ची धोरणे समजून घेण्यासाठी उपलब्ध झालेला एक प्लॅटफॉर्म ठरावा. एवढ्यातच कुठल्याही निष्कर्षावर पोहोचणे हे जरा आततायी होईल. सो, वेट अॅन्ड वॉच!”, सोकाजीनाना मंद हसत.

“काय पटते आहे का? जाऊद्या चहा मागवा!”. सोकाजीनाना चेहरा निर्विकार ठेवत.

सर्वांनीच चहाची ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.

समाजजीवनमानप्रकटनमाध्यमवेधवादविरंगुळा

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

10 Dec 2013 - 3:24 pm | प्यारे१

उच्च!
बाकी ते एके ठिकाणी 'बारमातीकर' चपखल बसलंय बरं. ;)
- चावडी गँगचा चाहता

प्रकाश घाटपांडे's picture

10 Dec 2013 - 3:26 pm | प्रकाश घाटपांडे

दर वेळी चहा काय मागवता? यखांद्या बारीला वाईन मागवा कि! गांधीजींनी काय सांगितलय? देशी उद्योगाला चालना मिळाली पाहिजे.

चौकटराजा's picture

10 Dec 2013 - 3:34 pm | चौकटराजा

पवार यानी या शेती मंत्री पदाचा चार्ज घेतल्याचे दुसर्‍या की तिसर्‍या दिवशीच शेतमालाचे भाव आता वाढणार हे भाकित " जाणता राजा" या पदावरून केले होते. भाववाढ इतर अनेक गोष्टीमुळे झाली आहे हे खरेच आहे. ( मनमोहन सिंग यांच्या मते तेलाच्या भावात वाढ व शेतमालाचा किमान भावात वाढ ही दोन त्यातीलच ) .भाववाढ नमो व केजरीवाल कुणालाही थांबवता येणार नाही. पण इतर अनेक कारणामुळे कोंग्रेस तरत्या मतदारांमधे अप्रिय ठरली आहे.

बाकी केजरीवालाप्रमाणे राज ठाकरे यानीही पूर्वी काहीसा धक्का दिल्याचे लोकाना स्मरत असेल.

चिरोटा's picture

10 Dec 2013 - 3:41 pm | चिरोटा

मस्तच.'आप्'च्या यशाने हुरळून जाण्याचे कारण नसले तरी अनेक राज्यांतले/पक्षातले 'जाणते राजे',सम्राट थोडेसे 'जळता' आहेत्.

विशाल चंदाले's picture

10 Dec 2013 - 3:46 pm | विशाल चंदाले

आम्हाला तर पटलय बघा. आवडलं.

मुक्त विहारि's picture

10 Dec 2013 - 4:03 pm | मुक्त विहारि

लाटा येतात आणि जातात...

आणीबाणीच्या वेळी पण जयप्रकाश यांची लाट आलीच होती.

लाटेवर स्वार होतात की लाटेत डुंबतात की विरघळून जातात, हे आत्ताच सांगणे कठीण आहे.

ब्रिटिशांच्या काळात पण काँग्रेसची लाट होतीच की.(वादळच होते ते)

(१९५०च्या दशकांत खासदार पण महिना अखेरीस १०रु. मागत असत, असा किस्सा फिरिझ रानडे यांनी लिहीला आहे.)

जनतेला नेहमीच स्वच्छ सरकार हवे असते, इतका बोध सगळ्याच पक्षांनी घेतला तरी बराच फरक पडू शकतो.

अविनाश पांढरकर's picture

10 Dec 2013 - 4:07 pm | अविनाश पांढरकर

आता दिल्लीत सत्ता चालवणे कोणालाही कठीणच होणार आहे.
त्यामुळे अगोदर सत्ता मिळवण्यासाठी चाललेली स्पर्धा विरोधकांमध्ये बसण्यासाठी चालू आहे.

मुक्त विहारि's picture

10 Dec 2013 - 4:19 pm | मुक्त विहारि

मिपा वर रोज यायला आणि लेख-प्रतिसादांचा पावूस पाडायला सगळेच तयार पण संपादक मंडळात सामील व्हायला कुणीच तयार नाही.

(वरील वाक्य हे १००% विनोदी असल्याने गांभीर्याने घेवू नये.)

जेपी's picture

10 Dec 2013 - 4:17 pm | जेपी

आवडल .

सुहास..'s picture

12 Dec 2013 - 4:36 pm | सुहास..

चावडी ईज बॅक !

आता तुझ( सदर-लेखक म्हणुन) कौतुक तरी किती करु :)

तु हे सदर मनावर घेच !!