संपादकीय

स्पंदना's picture
स्पंदना in दिवाळी अंक
1 Nov 2013 - 7:00 am

नमस्कार मंडळी,
मिसळपाव संस्थळाकडून हा सलग दुसर्‍या वर्षीचा 'दिवाळी अंक' सादर करताना मनात अभिमान अन आनंद याशिवाय कोणत्याच भावनेला थारा नाहीये. हे संपादकीय जरी मी लिहीत असले, तरी या अंकावर आपल्या सर्वांचा हक्क आहे. कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस जागून, खपून, ठरवून केलेल्या कार्यक्रमाची गोडी या दिवाळी अंकालाही आहे. संपादक मंडळाने दिवाळी अंकाची जाहिरात केल्या दिवसापासून ते अगदी आजपर्यंत भरघोस लेखनाचा आशीर्वाद आम्हाला तुम्हा सदस्यांकडून लाभला, आणि या आशीर्वादाबद्दल, तुम्ही दाखवलेल्या या आत्मीयतेने आम्ही सर्वच जण अतिशय भारावून गेलो आहोत.

अन का नाही असणार आत्मीयता आपल्या सर्वांना? मिपा आहेच तसं! आपल्यातुपल्यातलं! जणू समोर बसून गप्पा हाणाव्या, अशा धारणेचं! आपल्या आयुष्यात रेडिओ, टी.व्ही. ही प्रसारमाध्यमं यायच्या आधी गप्पांमधूनच तर आपण आपल्याकडच्या माहितीची देवाणघेवाण करत होतो. आज मिपाकडे पाहिल्यावर एक वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना दाटते. कारण पुन्हा फिरून आपण टी.व्ही.वरच्या पात्रांऐवजी खर्या खुर्या माणसांकडे आकर्षित होतो आहोत. मराठी संस्थळांना याचं जेवढं श्रेय जातं, तेवढंच मिसळपावच्या खेळकर धोरणालासुद्धा जातं. हलक्याफुलक्या गप्पांबरोबर येथे चर्चांचे फडही रंगतात. सुरेख सुंदर काव्याबरोबर विडंबनाची रांग लागते. पाककृतीच्या रसग्रहणात “आम्ही असंही करतो” असं अगदी बिनधास्त सांगितलं जातं. कथा मनापासून आवडली म्हणून सांगताना त्यात जरा भर घालायला पक्का मिपाकर कधीच नाही विसरायचा. एक अनौपचारिक सूर आहे मिपाला अन त्या सुराला धरूनच मी आज हे संपादकीय सादर करायचा प्रयत्न करते आहे.

तर, संपादक मंडळाने दिवाळी अंकाचा धागा काढल्यावर पैसाताईने मला “दिवाळी अंकाच्या संपादनाचं काम करशील का?” अशी विचारणा केली. नुकताच 'श्री गणेश लेखमालेला' अगदी भरघोस प्रतिसाद पाहून मलाही वाटलं, करू या! त्यात काय एवढं?

तर मंडळी, त्या ‘त्यात काय एवढं’चा नूर उतरला तो मागल्या वर्षीच्या यशस्वी दिवाळी अंकाचे संपादक गवि यांचे प्रतिसाद वाचल्यावर. आता गविंबद्दल मी तुम्हाला काय सांगावं? त्यांची लेखनप्रतिभा तर आपण जाणतोच! त्याही पलीकडे जाऊन गवि अनुभवविश्वाचा एक महासागर आहेत. अन ते अनुभव कसे आणि कोणत्या वेळी वाटायचे, याचं त्यांचं तंत्रही तितकंच वेगळं. बहुतेक वेळा एखादी कार्यशाळा अटेंड केल्यावर आपल्याकडे फीडबॅक मागितला जातो, जेणेकरून पुढील कार्यशाळेला हा फीडबॅक उपयोगी पडावा. पण आमची 'ही' कार्यशाळा वर्षांनंतर येणारी. मग जर गविंनी त्या वेळचा फीडबॅक तेव्हा दिला असता, तर आज तो विस्मरणात गेला असता. दिवाळी अंकाच्या सल्लामसलतीच्या धाग्यावर, गविंनी जवळजवळ चार मेगाबायटी प्रतिसाद टाकले. येणार्याय अडचणींचं त्या प्रत्येक प्रतिसादात पुरेपूर वर्णन होतं. नुसत्या अडचणींचं वर्णन करून थांबले तर ते गवि कसले? त्यावरचे उपाय अन काही अनुभवातून आलेलं शहाणपण त्यांनी अगदी खुल्या दिलाने आमच्याबरोबर शेअर केलं. काही नवीन उपाय सुचवले अन नीलकांतने त्याप्रमाणे ताबडतोब पावलं उचलून मदतीचा हात पुढे केला. आता यात माझा सहभाग किती?
लिखाणाचं काम तर तुम्ही लोकांनी अगदी भरभरून केलंच, पण मग प्रश्न आला तो मुद्रितशोधनाचा. याही वेळी गविंनी सुधांशु नूलकरांचा कॉन्टॅक्ट देऊन हेही काम सुलभ केलं. आता सुधांशु नूलकरांबद्दल सांगावं तेवढं थोडंच. अगदी पाठवलेला प्रत्येक लेख त्यांनी साफसूफ करून दिवाळी अंकासाठी मोलाची मदत केली. गवि अन सुधांशुजी यांनी अगदी वेळेवर बहुमोल मदत केल्याने आज हा दिवाळी अंक आपल्यापुढे सादर होतो आहे.

दिवाळी अंक हा मिपाचा आरसा असावा, असा संपादक मंडळाचा काहीसा दृष्टिकोन असल्याने, या वर्षीच्या दिवाळी अंकात ललित कथांबरोबरच मिपाचा ‘हॉट अॅ न्ड स्पायसी’ विभाग घेऊन येत आहे काही सुरेख पाककृती. त्यांचा आस्वाद घेत घेत तुम्ही कविमंडळाच्या काही कविता पाहाल. आरोग्य हाही एक आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असल्याने आपल्यासाठी दंतकथा घेऊन येताहेत डॉ. अजया. स्वतः सुरांच्या लहरींवर हिंदोळे घेता घेता आपणालाही त्यात ओढू पाहताहेत आपले चौरा, अन तुम्हाला चवदार पाककृती घेऊन येणारे पेठकरकाका या वेळी आपल्याला त्यांच्याबरोबर मस्कतची सफर घडवताहेत. टेक्नॉलॉजी, अध्यात्म, इतिहास, पुराणकथा अशा सर्व रसांनी भरपूर असा हा दिवाळी अंक तुमच्या हातात देताना मला अगदी कृतकृत्य वाटतंय. पण त्याहीपेक्षा मला आज या प्रसंगी मनापासून आभार मानायचे आहेत आपल्या संपादक मंडळाचे! पैसाताईचा खंबीर आधार, रेवतीताईंची अन यशोधराची मदत करण्याची तयारी, वल्ली, गणपा यांनी टेक्निकल गोष्टींसाठी वेळोवेळी पुढे केलेला मदतीचा हात. किसनदेवांचे सल्ले, लिमाउजेट अन बिरुटे सरांचे उत्साहवर्धक शब्द! अन आपल्या कलाकार अभ्या...ची हातसफाई॓, ज्यामुळे हा अंक आज इतका सुंदर दिसतो आहे. पीडीएफ अंकाच्या मुखपृष्ठासाठी अत्रुप्त आत्मा यांची फुलांची रांगोळी आपल्याला बघायला मिळेल. श्री. नीलकांत आणि श्री. प्रशांत यांनी त्यांच्या अतिशय बिझी शेड्यूलमधून वेळ काढून अगदी मोलाची मदत केली अन आज हा अंक आपल्या सर्वांपर्यंत पोहोचतो आहे.

मंडळी, दिवाळी अंकाच्या आकाराला एक मर्यादा आहे, अन हेच कारण आहे की आपण पाठवलेल्या लिखाणातील काही लिखाण आम्ही या अंकात प्रकाशित नाही करू शकलो. अर्थात जे लिखाण दिवाळी अंकात प्रकाशित नाही होऊ शकलं, त्याचा आस्वाद मिपावर आपण घेणार आहोतच.

शेवटी मला आज असा प्रश्न पडलाय की मी खरंच काही योगदान दिलं का या कार्यात? वेळोवेळी हाका मारणं एवढं एकच काम मी जोराशोरात केलं! पण हाकासुद्धा तेव्हाच मारल्या जातात, जेव्हा तुमच्या हाकेला उत्तर देणारं कोणी असतं. अन येथे अगदी 'घेशी किती दो कराने...'सारखी अवस्था झाली माझी तुम्हा सर्वांच्या सहभागाने अन मदतीने! तरीही मायबाप वाचकहो, जर या अजाण अपर्णाकडून या अंकात एखादी चूक राहिली असेल, तर मला माफ करा. जे काही उणं असेल, त्याची जबाबदारी माझी असेल अनं आहे.

तर मंडळी, सर्व मिपा परिवाराला दिपावलीच्या शुभेच्छा! शुभ दिपावली अन येणारे नववर्ष तुम्हा सर्वांना सुखसमृद्धीदायक अन भरभराटीचे जावो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी हे माझे संपादकीयचे दोन शब्द आवरते घेते.
धन्यवाद.
__/\__
अपर्णा

दिवाळी अंक २०१३

प्रतिक्रिया

पैसा's picture

1 Nov 2013 - 1:45 pm | पैसा

धन्यवाद अपर्णा! मस्त काम केलंस!!

ऋषिकेश's picture

1 Nov 2013 - 1:50 pm | ऋषिकेश

दिवाळी अंकाचं मनःपूर्वक स्वागत.. सर्व संपादक मंडळाचे अभिनंदन!
आता एकेक लेख वाचून तिथे प्रतिक्रीया देईनच!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Nov 2013 - 10:23 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

संपादक मंडळ, सर्व लेखक आणि मिपाकरांचंही अभिनंदन.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Nov 2013 - 1:58 pm | अत्रुप्त आत्मा

उत्तम संपादकीय! :)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

1 Nov 2013 - 2:04 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

एइसेहीच बोल्ता..
आपाताई सलाम..
दिवाळीच्या शुभेच्छा..

बहुगुणी's picture

1 Nov 2013 - 2:49 pm | बहुगुणी

संपादकीय आवडलं. सर्व आधारस्तंभांचाही अभिनंदन आणि आभार. आता इतर लेखांचा / साहित्याचा आस्वाद घेतो, तत्पूर्वी मिपाच्या सर्व परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रभाकर पेठकर's picture

1 Nov 2013 - 2:18 pm | प्रभाकर पेठकर

दिवाळी अंकाबद्दल सर्व श्रमिकांचे मनापासून अभिनंदन आणि अर्थात कौतुकही.
मिपा आम्हाला अभिव्यक्त होण्यासाठी संधी उपलब्ध करून देतं. चार निबंध लिहून स्वतःला 'लेखक' वगैरे बिरुद चिकटविताना मन सुखावतं. येणार्‍या प्रतिसादातून आपण किती 'खोलात (किंवा पाण्यात) आहोत' हे जाणवतं. वाचक वर्ग लेख, कविता, पाककृत्या, प्रवासवर्णनं, चर्चा, माहितीपर लेख इत्यादी सर्व मनापासून वाचून आपापल्या प्रतिक्रिया देतात त्यामुळे कांहीबाही लिहीण्याचेही श्रम सार्थकी लागतात.
दिवाळी अंकाप्रमाणेच वसंतोत्सव, पर्जंन्यांक आणि हिवाळी अंकाचेही आयोजन व्हावे आणि त्या त्या ऋतुला, विषयाला अनुसरुन लेख, कविता, पाककृत्या, कालमहात्म्य इ.इ. लेखनमहापुर मिपावर यावा असे वाटते.

यशोधरा's picture

1 Nov 2013 - 2:21 pm | यशोधरा

अगदी मनापासून उतरलेलं. ओप्पन्ना, मस्त लिहिलंस बयो! :)

विटेकर's picture

1 Nov 2013 - 2:21 pm | विटेकर

अंक सुंदर उतरला आहे..
सर्वांचे अभिनंदन आणि दीपावली शुभेच्छा !

दिवाळी अंक २०१३ च्या धाग्यात अनुक्रमणिकेवर नजर फिरवली आणि याही वर्षी गेल्यावर्षीप्रमाणे ऊत्कृष्ठ किंबहुना त्याहुनही चांगले साहित्य वाचायला मिळणार या विचाराने अतिशय आनंद झाला. आता सवडीने प्रत्येक लेखाचे पारायण करून त्यावर वैयक्तिक प्रतिक्रिया देईनच. आपले संपादकीय वाचल्यावर दिवाळी अंकात काय काय वाचायला मिळणार आहे याची ऊत्सुकता लागुन राहिली आहे. संपादकीय छान लिहिले आहे. धन्यवाद.

सर्व लेखकांचे आणि संपादक मंडळाचे अभिनंदन. दिवाळी अंकाच्या वाचनाची ऊत्सुकता असल्यामुळे सध्या ईथेच थांबतो.

वसईचे किल्लेदार's picture

1 Nov 2013 - 2:32 pm | वसईचे किल्लेदार

अभिनंदन अन अभिष्ट्चिंतन!

मिपाच्या दिवाळी अंकासाठी स्वतःचा अमुल्य वेळ खर्च करुन आणि सर्व इतर रोजची कामे सांभाळुन लेखन,संपादन आणि प्रकाशन करणार्‍या सर्व मंडळींचे आभार मानावे तितके कमीच आहे. :)
मिपावर माहितीचा आणि अनुभवांचा महापूर येत असताना त्याला दिवाळी अंकाची जोड मिळावी याचा फार आनंद वाटतो.

मुक्त विहारि's picture

1 Nov 2013 - 2:39 pm | मुक्त विहारि

उत्तम रीतीने पार पाडलीत.

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....

सुधीर मुतालीक's picture

1 Nov 2013 - 2:49 pm | सुधीर मुतालीक

मला तुम्हा मंडळींच्या ध्यासाचे कौतुक वाटतं ! दिवाळी अंक वगैरे प्रकरण प्रचंड वेळ आणि उर्जा खाणारे आहे, फक्त गंमत म्हणून ते करता येणारे नाही. आपण खस्ता खावु पण देताना इतके उत्तम देऊ की घेणारा खुष होईल, हरखून जाईल. हे फक्त आईच्याच हृदयाला जमू शकतं. त्यामुळे तुम्ही सगळी मंडळी मातृहृदयी आहात ! आपल्या पैकी प्रत्यक्ष काहीजणी आया असतीलही पण ज्यांना पाहिलं नाही, ज्यांचा परिचय नाही, ज्यांच्याशी कोणताच आयुष्यात व्यवहार होणार नाही अशाही लोकांना देताना, त्याच्या हातात पडल्यावर ते हाताळताना तो हरवून गेला पाहिजे ही भावना संतवाङ्गमयातल्या माउलीचीच असू शकते ! खुप छान अंक आहे. राजस आहे. संपादकीय तर माउली बरोबरचा सुख संवाद आहे, संपु नये सा वाटणारा. प्रश्न पडलाय आता मी काय करू ? हात जोडू की नतमस्तक होऊ ? अं हं, हात जोडू की नतमस्तक होऊ हा नाई माझा प्रश्न, मी फक्त खुष नव्हे तर कृतकृत्य झाल्याची भावना त्या विशाल हृदयांपर्यंत पोहोचवू कशी ?

नित्य नुतन's picture

1 Nov 2013 - 2:53 pm | नित्य नुतन

अभिनंदन अपर्णा ताई आणि समस्त संपादक मंडळ ..

इतकं सुंदर .... सगळं सगळं वाचावयास उपलब्ध केल्याबद्दल आपले आभार मानावे तेवढे थोडेच ...
आप जियो हजारो साल ....

समस्त मिपा परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ....

नंदन's picture

1 Nov 2013 - 3:48 pm | नंदन

मिपाच्या दिवाळी अंकाचं मनःपूर्वक स्वागत आणि या अंकासाठी झटलेल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन! अंक निवांत वाचून प्रतिक्रिया लिहितोच.

शुभ दीपावली!

सुधीर's picture

1 Nov 2013 - 4:05 pm | सुधीर

दरवर्षी प्रमाणे मिपासाठी आणि पर्यायाने सर्व वाचकांसाठी झटणार्‍या हातांना सलाम!
सगळ्या मिपाकरांना आणि वाचकांना ही दिवाळी सुखाची, समाधानाची आणि भरभराटीची जावो ही शुभेच्छा!

प्रचेतस's picture

1 Nov 2013 - 4:26 pm | प्रचेतस

सुरेख संपादकीय.
समस्त मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

शिद's picture

2 Nov 2013 - 1:00 am | शिद

असेच म्हणतो. :)

किसन शिंदे's picture

1 Nov 2013 - 4:40 pm | किसन शिंदे

अतिशय सुरेख उतरलंय हे संपादकीय. अपर्णा ताई, तू घेतलेल्या अपार कष्टाचं चीज म्हणजे मिपाचा यावर्षीचा दिवाळी अंक!

अनन्न्या's picture

1 Nov 2013 - 4:48 pm | अनन्न्या

उत्कॄष्ट मांडणी, अप्रतिम मुखपॄष्ठ, रोचक आणि वाचनीय साहित्य, या सर्वाना शोभेसे आपले अगदी जवळचे वाटणारे संपदकीय! साहित्य फराळ भरपूर असल्याने सावकाशपणे वाचून दाद देतेच आहे.
मिपाच्या दुसय्रा दिवाळी अंकात सहभाग दिल्याबद्द्ल संपादक मंडळाचे आभार!

मोठी जबाबदारी पार पाडलीस, आणि तुझ्यासोबतच किसन,अभ्या, सुधांशु आणि इतर अनेक ज्ञात अज्ञातांचे हात या कामाला लागले... सर्वांचं अभिनंदन.

प्रशांत, नीलकांतचे विशेष कौतुक.

:)

mvkulkarni23's picture

1 Nov 2013 - 5:04 pm | mvkulkarni23

दिवाळी अंकाचं मनःपूर्वक स्वागत.. सर्व संपादक मंडळाचे अभिनंदन!

सौंदाळा's picture

1 Nov 2013 - 5:07 pm | सौंदाळा

अभिनंदन.
आता वाचायला सुरुवात करतो.

आपातै, संपादक मंडळ, सल्लागार, चालक, मालक, वाचक नि उर्वरीत सगळ्यांनाच दीपावली अभिष्टचिंतन!

छान लिहिलयस अपर्णा! अगदी मस्त! अंकाचं काम सुरु झाल्यापासून किती काम करत होतीस ते पाहिलय. तुझं, नीलकांत, प्रशांत, अभ्या, नूलकर यांचे विशेष अभिनंदन! आत्मू गुरुजी, रांगोळी झक्कास. धन्यवाद!

अत्रुप्त आत्मा's picture

1 Nov 2013 - 9:40 pm | अत्रुप्त आत्मा

धन्यवाद रेवतीताई. :)

चतुरंग's picture

1 Nov 2013 - 10:12 pm | चतुरंग

मिपाच्या दुसर्‍या वर्षीच्या अंकाचं मुखपृष्ठ देखणं झालंय बरंका अतॄप्त आत्मा गुर्जी!
अनुक्रमणिकेवर एक नजर टाकली आणि अंक वाचनीय असणार याची खात्रीच पटली. अंकासाठी राबलेल्या सगळ्या हातांना, मनांना आणि हृदयांना एक मिपाकर म्हणून मनापासून _/\_!!

(कृतज्ञ)रंगा

मुक्त विहारि's picture

1 Nov 2013 - 10:51 pm | मुक्त विहारि

वो बुद्धीबळ का मॅच अभी बाकी है....

उधर तुमको आणेका और हमको कुछ समझानेका..

पाषाणभेद's picture

1 Nov 2013 - 10:26 pm | पाषाणभेद

दिवाळी अंकाचं मनःपूर्वक स्वागत.. सर्व संपादक मंडळाचे अभिनंदन!

चाफा's picture

1 Nov 2013 - 10:44 pm | चाफा

संपादकीय लेख मनापासून उतरलाय :)
सगळ्या मिपाकरांचे अभिनंदन, आज वेळ मिळालाय आज तुटून पडतो अंकावर :)

विकास's picture

2 Nov 2013 - 12:23 am | विकास

अंक छानच झाला आहे! सर्व संपादक मंडळाचे अभिनंदन. मुखपृष्ठावरील फुलांची रांगोळी आणि त्यातील "मिपा" ही अक्षरे भन्नाट आहेत! त्याची जर कुठे माहिती दिली नसेल तर अवश्य द्यावीत. सर्व अंकच वाचनीय आहे. लेख वाचत असताना प्रतिसाद देईनच. :)

बाकी या निमित्ताने, मिपा मालक, संपादक, सल्लागार आणि सगळ्यात महत्वाच्या - समस्त मिपापरीवारास, दिवाळी निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा!

किलमाऊस्की's picture

2 Nov 2013 - 2:02 am | किलमाऊस्की

अंक वाचून प्रतिक्रिया देईनच. मिसळपावच्या सर्व परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

सुहास झेले's picture

2 Nov 2013 - 2:49 am | सुहास झेले

मस्तच... आता अंक वाचायला घेतो :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Nov 2013 - 9:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अपर्णा अ. चे सर्वप्रथम आभार आणि मनःपूर्वक अभिनंदन....!

आभार यासाठी की हौसेनं आपण हे सर्व करत असतो आपल्या या हौसेसाठी आपण आपल्या व्यक्तिगत आयुष्यातला जो वेळ देतो त्याला तोड नाही, यामागे केवळ मिपा प्रेम असते. सामान्य माणसाच्या मागे काय कमी व्याप असतात. दिवाळीसणाच्या काळात सर्व सांभाळून दिवाळी अंकासाठी आपलं पूर्ण योगदान देणं हे काही सोपं काम नाही, त्याचे मूल्य होऊ शकत नाही मिळतो तो केवळ आनंद.... दिल्या वेळेसाठी एक मिपा वाचक म्हणून आभार....!!!

संपादकीय पोहचलं. उगाच उच्चभ्रूपणा नाही. , भाषेत बोजडपणा नाही, निर्जीव शब्द मैलाचे दगड जसे रस्त्यात उभे असतात तसे करण्याचा सोस नाही, राजकारण, भ्रष्टाचार, देश, भाषा, आणि इतर गोष्टींना विनाकारण स्पर्श करण्याची नसती उठाठेव नाही, हे सर्व टाळून एक सहजपणे वाटलेलं ते उतरवलेलं संपादकीय भावलं.

मुखपृष्ठ तर लै म्हणजे लै आवडलं. आपल्या प्रेयसीच्या डोळ्यात नूसतं टक लावून बघणा-या प्रियकरासारखी माझी अवस्था फुलांची रांगोळी पाहतांना झाली. अतृप्त आत्मा उर्फ बुवांचे आभार. लेखन शुद्ध स्वरुपात देणारे आणि त्यासाठी वेळ देणा-या सुधांशुंचे आभार मानले पाहिजेत.

पैसा, रेवती,गवि,किसना,गंपा,प्रशांत,अभ्या, आणि नीलकांत यांची दिवाळी अंकाच्या विचारांची देवाण-घेवाण वाचून मी वाट्सप, चावडी, मेलवर थकून जातो. दिवाळी अंकाच्या कामात अगदी गर्क झालेली ही मंडळी असतात. व्यवस्थेत असल्यामुळे हे सर्व पाहता येतं. यांनी घेतलेल्या कष्टाला तोड नाही. ग्रेट लोक्स. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. सवडीने सर्व लेखन वाचतो आणि पुन्हा दुसरा प्रतिसाद लिहिनच.

-दिलीप बिरुटे

कवितानागेश's picture

2 Nov 2013 - 12:45 pm | कवितानागेश

सुंदर झालाय दिवाळी अंक. आणि अपर्णानी खरोखरच खूप मेहनत घेतली आहे.

दिपक.कुवेत's picture

2 Nov 2013 - 10:45 am | दिपक.कुवेत

हा अंक प्रकाशीत होण्यामागे ज्या ज्या लोकांचे हात आहेत त्या सर्वांना सलाम! आज मिपाचा दिवाळि अंक वाचताना प्रचंड आनंद तर होत आहेच पण आपण ह्या कुटुंबाचा एक छोटासा हिस्सा आहोत हे बघुन मुठभर मास अंगावर चढलयं.

परत एकदा सगळयांना मनापासुन शुभेच्छा!

नगरीनिरंजन's picture

2 Nov 2013 - 6:07 pm | नगरीनिरंजन

मुखपृष्ठ पाहूनच छान वाटले! आता निवांत वाचतो.
सगळ्या स्वयंसेवकांचे मन:पूर्वक आभार आणि सर्व मिपाकरांना दिवाळीच्या अनेकानेक शुभेच्छा!!

मुक्तसुनीत's picture

2 Nov 2013 - 7:45 pm | मुक्तसुनीत

दिवाळी अंकाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. दिवाळीनिमित्त अनेकोत्तम शुभेच्छा.

वेल्लाभट's picture

2 Nov 2013 - 10:05 pm | वेल्लाभट

संपादक मंडळ, दिवाळी अंकाशी संबंधित सर्वांचेच मनापासून कौतुक, अभिनंदन आणि आभार....
आणि समस्त मिपाकरांना; दिवाळीच्या शुभेच्छा !
aa

वेल्लाभट's picture

2 Nov 2013 - 10:07 pm | वेल्लाभट

aa

दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावरची फुलांची रांगोळी अतिशय देखणी आहे!

मन१'s picture

3 Nov 2013 - 3:33 pm | मन१

एकदा निवांत डेस्कटोप वा लॅपी हातास लागला की सविस्तर प्रतिसाद देतो. तोवर आम्हास असा फक्कड अंकदेणार्‍यांचआब्ब्भार

अनिता ठाकूर's picture

3 Nov 2013 - 7:35 pm | अनिता ठाकूर

सर्व संबंधितांचे मनापासून आभार! संपादकीय तर अगदी समतोल उतरले आहे.सर्व मिपाकरांना दिवाळीसाठी हार्दिक शुभेच्छा!!

सुधीर कांदळकर's picture

4 Nov 2013 - 8:06 am | सुधीर कांदळकर

अभिनंदन आणि दीपावली शुभेच्छा. फुलांची रांगोळी आवडली. अर्धा अंक वाचून झाला. आवडला. पुढे वाचतोय.धन्यवाद.

श्रीधर's picture

4 Nov 2013 - 8:30 pm | श्रीधर

संपादक मंडळ व दिवाळी अंकाशी संबंधित सर्वांचेच मनापासून कौतुक.......

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

मिपा दिवाळी २०१३ अंक संपादक मंडळ,

उत्तम दिवाळी अंक ... उत्तम संपादकीय! अंकासाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचे धन्यवाद!

हळूहळू जसाजसा अंक वाचतो आहे तशातशा प्रतिक्रिया देईनच.

- दिपोटी

साती's picture

5 Nov 2013 - 8:21 pm | साती

मुखपृष्ठ फारच देखणं झालंय.
सुंदरच.
अभिनंदन.

आता बरेचसे वाचून झाले आहे … एकच प्रतिक्रिया … कडक काम झाले आहे …सुरेख.
दिवाळी अंकाची जबाबदारी तुम्ही समर्थपणे पेलली आहे … अंक सुंदर झाला आहे; अगदी भरल्या फराळाच्या ताटासारखा

- सार्थबोध