मी, सियाचेन आणि कारगिल युद्ध…!

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in दिवाळी अंक
27 Oct 2013 - 11:44 am

सुधीर मुतालीक

जम्मू-काश्मीरमधल्या कुपवाडाजवळील केरन भागात पाकिस्तानने पुन्हा एकदा घुसण्याचा आगाऊपणा केला. आपल्या सेनेला त्या भागात दहा दिवस झुंजून घाण साफ करावी लागली. अर्थात तो प्रभाग स्वच्छ झाला आणि होणारच होता. १९७१ साली भारताकडून अत्यंत अपमानास्पद मार खाल्ल्याचा व्रण आपल्या ध्वजावर ठेवून पाकिस्तान गेली ४२ वर्षे वावरतो आहे. त्या मार खाण्याने अक्कल येउन भारताशी मैत्रिपूर्ण सबंध ठेवण्यात खरे तर पाकिस्तानचे हित आहे. पण त्यांच्या ठायी शहाणपण असते, तो तर पाकिस्तान कसचा? त्यानंतर त्यांचा रडीचा डाव चालू राहिला. कारण विज्ञान, तंत्रज्ञान, शेती आणि उद्योग या दालनांमध्ये आपला विकास करून भारताशी टक्कर देण्याची पाकिस्तानची ऐपत नाही. त्यामुळे केरन आणि त्याआधी कारगील यासारख्या कुरापती पाकिस्तान काढत राहतो आणि राहणार.
मे महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला की चौदा वर्षांनी आजही माझी चिडचिड होते. २६ मे १९९९ला बातमी थडकली की भारताची दोन फायटर - मिग विमाने पाकने पाडली आणि देशभर संतापाची लाट पसरली. पाकचा नंगानाच ३ मेला उघडकीस आला - एका धनगराकडून. दोनच दिवसांनी पाच मार्चला पाक्यांनी आपल्या १९-२० वर्षाच्या पाच तरण्याबांड जवानांना पकडून नेले आणि त्यांचे हालहाल करून त्यांना मारून टाकले. नवाज शरीफ आणि मुशर्रफ यांना द्रास, काक्सार आणि मुश्कोह भागात उंदरांची पिले सोडून घुसखोरी करायची होती. पण भारत सरकारची मुत्सद्देगिरी आणि भारतीय सैनिकांची तडफ यापुढे नवाज शरीफ आणि त्याच्या उंदरांच्या पिलावळीला शेवटी पाच जुलैला शेपूट घालावी लागली. २६ जुलैला भारत सरकारने आपला विजय जाहीर करून समर संपविले. मे-जून-जुलै महिने आले की मला यातला प्रत्येक दिवस आठवतो. हे दिवस माझ्या आयुष्यभर लक्षात राहतील, कारण मी याच दिवसात भारतीय सैन्याबरोबर एका कामगिरीत गुंतलो होतो भर युद्धभूमीवर - सियाचेनमध्ये. बरेच दिवस.

( I am with the famous Bofors Gun in the field )

कारगिल युद्धादरम्यान टीव्हीवर सातत्याने श्रीनगर ते लेह मार्गाचे चित्रण दाखवत होते, ते कदाचित आठवत असेल. त्या रस्त्यावर माल वाहून नेणा-या वाहनांची महाप्रचंड तोबा गर्दी आठवते का पाहा. त्यातली बहुतेक वाहने केरोसीनचे बॅरल घेऊन जाणारे असत. विशेषत:सियाचेनमध्ये रॉकेल हे तिथल्या सैनिकांचे जीवनच आहे. रॉकेलशिवाय जगणे त्या हिमनदीवर अशक्य आहे. तेथे थंडीत सुमारे उणे साठ अंश एवढ्या भीषण खाली तापमान जाते. अशा वातावरणात साधे जगणेही मुश्किल होईल, तिथे आपले जवान युद्ध करायला तयार असतात. सियाचेन ही जगातली सर्वात उंचावर असणारी युद्धभूमी आहे. शेकोटी पेटविण्याबरोबर अन्य सर्व गोष्टींसाठी रॉकेल हेच इंधन म्हणून वापरले जाते. अन्न शिजवायला, त्यांच्या स्नो स्कूटर चालविण्यासाठी, प्रकाश मिळविण्यासाठी, त्यांचे कपडे धुण्याची मशीन्स चालविण्यासाठी वगैरे - रॉकेल हे सियाचेनमध्ये जीवन आहे.

Jawans at Post in the Glacier !

त्यामुळे एक हजार सैन्य असणाऱ्या त्या तळावर सरकार रोज चार कोटी रुपये खर्च करीत असेल, तर रॉकेल वाहून नेण्याचा खर्च सुमारे एक कोटी रुपये रोज व्हायचा. जिथपर्यंत रस्ते आहेत, तिथपर्यंत ट्रक्सने ही वाहतूक चालते, पण पुढे हिमनदीमध्ये……? खरी गरज तर तिथेच आहे! तिथे आपल्या दुर्दैवाने काहीही सुविधा नव्हती. तापमानाचा नीचांक. हिमनदीमध्ये चालता येते, पण तो बर्फच आहे. तिथे जड वस्तू वाहून नेणारी वाहतूक नाही. काही मशीन्सचा वापर करावा, तर मशीन्स ठेवणार कुठे ? बर्फात? आणि त्याला लागणारी वीज? ती तिथे उपलब्धच नाही. बनवली जाते ती फक्त प्रकाश देण्यापुरती. आणि हिमनदीमध्ये - म्हणजे सातशे चौरस किलोमीटर एवढ्या महाप्रचंड क्षेत्रफळात किती मशीन्स कुठे कुठे लावणार? आणि ती बंद पडली तर? तिथे असतात खच्चून हजार-एक जवान, तेही फक्त शत्रूवर देखरेख ठेवायला. ते मशीन दुरुस्त करण्यात कशाला वेळ घालवतील? आणि अंतरे कशी? पंधरा किलोमीटर चालायला पंधरा दिवसही लागू शकतील, किंवा जास्तही!! पण त्या शेकडो चौरस किलोमीटर परिसरात पसरलेल्या जवानांना रॉकेल तर पोहोचविलेच पाहिजे. लष्कराने काही काळ हेलिकॉप्टरच्या साहाय्याने उचलून बॅरल्स वरून टाकायला सुरुवात केली. पण जवानांचे हालच व्ह्यायचे. खराब तापमानामुळे हेलिकॉप्टर बऱ्याचदा उडायचे नाहीत. त्यामुळे पुरवठा बंद. वरून बॅरल पडले, तर बऱ्याचदा पाकच्या हद्दीत पडायचे. पुरवठा नाही. आपल्या हद्दीत पडले तर धडपडून तेवढे जड बॅरल्स त्या थंडीमध्ये आपल्या बंकरपर्यंत नेणे सोपे असेल का? असाही अनुभव आहे की त्या धडपडीत शत्रूला हालचालीचा मागमूस लागला की ते अंदाधुंद फायरिंग करायचे…… रॉकेल जवानांपर्यंत पोहोचविणे हा भारतीय लष्करापुढे गहन प्रश्न होता. महान आव्हान होते.

१९९७ साली मी ते आव्हान स्वीकारायचे ठरविले. सात-आठ महिन्यांपूर्वी मी एका विशिष्ट पद्धतीचे पंप्स बनवायचा उद्योग सुरू केला होता. पण सियाचेनमध्ये रॉकेल पुरवठा करण्यासाठी पंप्स वापरणे ही कल्पना हास्यास्पद होती. मुख्य म्हणजे तिथे वीज नाही. ती हिमनदी आहे. जमीन नाही. पंप ठेवायला टणक जमीन लागते. फाऊंडेशन! सातशे चौरस किलोमीटर इतके क्षेत्रफळ! कुठे कुठे पंप ठेवणार? बरे, एखादा पंप बंद पडला तर समजणार कसे? आणि तो दुरुस्त करायला प्रत्येक वेळी जवान पाठविणार? साधे पंधरा किलोमीटर चालायला पंधरा दिवसही लागू शकतात!! जवान सैनिकी शिक्षण घेऊन जातात. त्यांना पंप दुरुस्त करता येतील? सामान्य नागरिकाला तिथे जायला परवानगी नाही. आणि मिळाली तरी त्या वातावरणात त्याला उभेही राहता येणार नाही. अशा शेकडो प्रश्नांचा सामना मला करायचा होता. सगळ्यात आधी लष्कराला माझ्याविषयी विश्वास वाटला पाहिजे ना! ….पण पोटात आग होती. तारुण्याचे बारूद समोर येणारा प्रत्येक प्रश्न आणि अडचण बेचिराख करत होता. परवानगी कुचेष्टेच्या वेष्टनात मिळाली. पण वेष्टन त्या आगीत जळून खाक झाले.

काम सुरू केले आणि सगळ्या अडचणींच्या नाकावर टिच्चून काम करतील असे दोन अगदी धमाल पंप्स ९८च्या शेवटी शेवटी तयार झाले. विजेशिवाय चालणारे. लष्कराने चाचण्या घेतल्या. एक पंप एक तासात दोनशे लीटर रॉकेल अडीच किलोमीटर अंतरावर पाठवत होता. प्रत्येक दोन अडीच किलोमीटरवर पंप्स टाकायचे आणि पंप्सना जोडणा-या अगदी वेगळ्या आणि खास बनविलेल्या पाइप्सनी हे पंप्स जोडायचे, असा एक अजस्र प्रकल्प उभा करायचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला. संपूर्ण प्रकल्प उभारणीसाठी लष्कराने हिरवा कंदील दिला.

I with my installation at Siachen Glacier - World's First Such Installation, yes the 1st !!

लष्करी अधिकारी दोन कारणांनी खूश होते. एक तर जवानांना काहीही करून रॉकेल मिळणार होते आणि दुसरे भारतीय हेलिकॉप्टरचे आयुष्य वाढणार होते, कारण रॉकेलचे बॅरल्स टाकणे हे हेलिकॉप्टरचे काम नव्हे. त्यामुळे लष्कराचा प्रचंड खर्चही वाचणार होता. मे ९९मध्ये कारगिलचा प्रश्न अचानक उद्भवला आणि एकच धांदल उडाली. त्यातच लष्कराला दिलासा देणारा हा प्रकल्प नुकता उभारणीला सुरुवात होत होती. नागरिकांना सियाचेनसारख्या ठिकाणी जायला परवानगी नसते. पण प्रसंग बाका होता. त्यामुळे लष्कराने मला बोलावले आणि मी आजवरच्या पाच किंवा सहा, फारतर आठ सिविलियन्सपैकी एक आहे, ज्याला सियाचेनमध्ये प्रत्यक्ष युद्धभूमीवर सैन्याबरोबर त्यांच्या बराकीमध्ये आणि बंकर्समध्ये महिन्याहून अधिक काळ राहता आले आणि भारतीय सैन्यासाठी काम करता आले.

संरक्षण विभाग, संरक्षण तंत्रज्ञान आणि संरक्षण सामग्री या सर्व क्षेत्रांकडे भारतीय विद्वान, विद्यार्थी आणि भारतीय उद्योजक यांनी स्फूर्तीने, कर्तव्यतत्पर भावनेने, जिद्दीने आणि चिकाटीने पहिले पाहिजे आणि आपले अस्सल भारतीय योगदान दिले पाहिजे, असे मला मनोमन वाटते. आज एकूण भारतीय संरक्षण तंत्रज्ञान आणि सामग्रीमध्ये भारतीयांचा वाटा वीस टक्केही नसेल. १९९२ साली डॉ. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली सत्तर टक्के भारतीय वाटा नेण्यासाठी एक समिती नेमली होती, पण त्या समितीला पराभव पत्करावा लागला. संरक्षण क्षेत्रामध्ये असणा-या व्यवस्था आणि तिथली स्वार्थी भ्रष्टाचारी मंडळी या पराभवाला जबाबदार आहेत, त्याचे फटके मीही खातो. भारतीय उद्योजकांना आणि विद्वानांना अत्यंत हीन आणि अपमानास्पद वागणूक मिळते, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. पण आपण खचलो, तर हा देश 'स्व-तंत्र' कसा होणार?

तन समर्पित, मन समर्पित,
और यह जीवन समर्पित,
चाहता हूँ मातृभू,तुझको
अभी कुछ और भी दूँ....

दिवाळी अंक २०१४

प्रतिक्रिया

विटेकर's picture

1 Nov 2013 - 2:43 pm | विटेकर

लेखही छान पण घाई झाल्यासारखी वाटते .. जरा सविस्तर लिहा ना.

सोत्रि's picture

4 Nov 2013 - 1:43 pm | सोत्रि

सहमत, मलाही असेच वाटले!

- (जवानांच्या खडतर जिवनशैलीला कडक सॅल्यूट करणारा) सोकाजी

पैसा's picture

1 Nov 2013 - 3:01 pm | पैसा

केवळ अद्वितीय, अप्रतिम अनुभव! तुम्हालाही त्या सैनिकांबरोबर सलाम! एका मराठी उद्योजकाने आपल्या सैनिकांना सियाचेनमधे मदत केली हे वाचून ऊर भरून आला! जय हो!!

नोकरशाही, भ्रष्टाचार या सगळ्याला एकेकटा माणूस काही करू शकत नाही. पण तरीही त्यातून रस्ता काढून तुम्ही हे करू शकलात! अभिनंदन!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Nov 2013 - 10:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१११

तुमच्या या प्रयोगाबद्दल अजून सविस्तरपणे वाचायला आवडेल.

लेख आटपल्यासारखा वाटला.. अधिक विस्ताराने वाचायला आवडेल

हा एखाद्या लेखमालेचा सारांश वाटतोय.
सर, तुमची ह्या विषयावर एक लेखमाला येऊ द्या .
आत्ता फक्त तुम्हाला एक सॅल्युट.
प्रतिसाद लेखमालेनंतर.

बहुगुणी's picture

1 Nov 2013 - 4:26 pm | बहुगुणी

सध्या सॅल्यूट स्वीकारा (दिवाळीचाही), पण विस्तारानेही लिहाच. 'विजेशिवाय' पंप्स कुठल्या ऊर्जेवर चालले तेही वाचायला आवडेल. आज तिथे काय परिस्थिती आहे, तुम्ही (किंवा असे इतर उद्योजक) अजूनही भारतीय लष्कराला as needed मदत करतात का (करू शकतात का) हेही सांगा. त्या क्षेत्रातही भष्टाचार होत असल्याच्या बातम्या वरचे वर येतात, तुम्हाला त्याचा त्या वेळी त्रास झाला का, असल्यास कसं तोंड दिलंत?

लॉरी टांगटूंगकर's picture

1 Nov 2013 - 11:14 pm | लॉरी टांगटूंगकर

_/\_
अजून विस्ताराने लिहा, आणि नियमित लिहीत चला राव. खजिना असणारे तुमच्याकडे अनुभवांचा!

चिगो's picture

1 Nov 2013 - 4:55 pm | चिगो

जबरदस्त कामगिरी.. सलाम. पण जरा विस्तृतपणे सांगाल, ही अपेक्षा. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Nov 2013 - 6:20 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

जबरदस्त. अजुन विस्तारानी लिहाल का नंतर?

शिवोऽहम्'s picture

1 Nov 2013 - 8:44 pm | शिवोऽहम्

थरारक! अडचणींवर मात केल्याचा अनुभव अधिक विस्ताराने मांडलात तर फार रोचक माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल. ट्रेलर दाखविलात तो आवडला आहेच, पण जरा रीळं वाढवुन बैजवार कहाणी सांगा प्लीज.

यशोधरा's picture

1 Nov 2013 - 9:06 pm | यशोधरा

मस्त!

खरंच सविस्तर लिहा..

मुक्त विहारि's picture

1 Nov 2013 - 10:39 pm | मुक्त विहारि

एक मिपाकर म्हणून तुमचा अभिमान वाटला...

आणि एक भारतीय म्हणून मान ताठ झाली.

sश्रिकान्त's picture

2 Nov 2013 - 1:28 am | sश्रिकान्त

नशीबवान आहात. भारतीय सैन्या बरोबर कामकरण्यास भाग्य लागत, ते तम्हाला लाभल.

जॅक डनियल्स's picture

2 Nov 2013 - 7:37 am | जॅक डनियल्स

खूपच अभिमानास्पद अनुभव आहे. तुम्हाला सलाम!
वरती प्रतिसाद आले आहेत, त्या प्रमाणे जरा टेक्नीकल पण वाचायला आवडेल.
जर माझ्या सारख्या सिव्हिलिअन ने संरक्षण क्षेत्रामध्ये संशोधनासाठी घुसायचे असेल तर काय करता येईल ? मी आत्ता सिमेंट मध्ये संशोधन करतो आहे.

प्रभाकर पेठकर's picture

2 Nov 2013 - 9:50 am | प्रभाकर पेठकर

अभिमानाने मान ताठ व्हावी अशी कामगिरी.

अर्थात, वरील सर्व सदस्यांच्या प्रेमळ आणि आग्रही तक्रारीत मीही सहभागी आहे. कामगिरीचे अजून तपशिलवार वर्णन येऊ द्यात.

तरीपण, भारतभूच्या सेवेकर्‍याला मनापासून अभिवादन.

श्रीगुरुजी's picture

2 Nov 2013 - 10:55 am | श्रीगुरुजी

छान लेखन! तुमचे अनुभव अजून विस्तृत सांगा.

ब्रिज's picture

2 Nov 2013 - 1:19 pm | ब्रिज

अजुन डिट्टेलवार लिहा..त्या पंप्सबद्दल आणखी वाचायला आवडेल.

सुहास झेले's picture

3 Nov 2013 - 7:56 am | सुहास झेले

निव्वळ थरारक..... विस्ताराने लिहिल्यास अजून आवडेल :)

संजय क्षीरसागर's picture

3 Nov 2013 - 3:11 pm | संजय क्षीरसागर

तन समर्पित, मन समर्पित,
और यह जीवन समर्पित,
चाहता हूँ मातृभू,तुझको
अभी कुछ और भी दूँ....

अभिमानानं ऊर भरुन आला आहे.

बाबा पाटील's picture

4 Nov 2013 - 12:02 am | बाबा पाटील

तुमच्या जिद्दीला आणी धैर्याला सलाम.

इन्दुसुता's picture

6 Nov 2013 - 9:49 am | इन्दुसुता

"तन समर्पित, मन समर्पित,
और यह जीवन समर्पित,
चाहता हूँ मातृभू,तुझको
अभी कुछ और भी दूँ...."
अगदी हेच्च.

दिपोटी's picture

6 Nov 2013 - 12:27 pm | दिपोटी

लेख अतिशय सुरेख झालाच आहे, पण वर बर्‍याच लोकांनी सांगितल्याप्रमाणे विस्तृत वर्णन करता आले तर लेख उत्तम होईल.

पेट्रोल सारखे *ज्वालाग्राही* इंधन एवढ्या लांब कित्येक किलोमीटर्सवर व शत्रूभूमीपासून जवळच्या प्रदेशातून वाहून नेताना येणार्‍या अडचणी व घ्याव्या लागणार्‍या काळज्या, इतक्या लांब व महत्वाच्या अशा 'लाईफलाईन' पाईपलाईनचे शत्रूपासून व त्याच्या फायरिंग-बाँबपासून बचाव करण्यासाठी घेतलेल्या पायर्‍या (भूमिगत?), बहुगुणींनी वर विचारल्याप्रमाणे उर्जेसाठी विजेला वापरलेला पर्याय (बॅटर्‍या?) अशा तांत्रिक बाबींचा सुध्दा (या किंवा दुसर्‍या एका स्वतंत्र) लेखात समावेश करता येईल का?

तुमचे लिखाण वाचनीय असतेच, ते अधिक वाचनीय व्हावे म्हणून हा 'आगाऊपणा'.

- दिपोटी

सौंदाळा's picture

7 Nov 2013 - 1:53 pm | सौंदाळा

सुंदर प्रेरणादायी लेख.
तुमचे अभिनंदन आणि तुम्हाला सलाम.
एक मोठी लेखमाला व्हायला हवी यावर.
सवड मिळेल तसे नक्की लिहा.
तुमच्याकडुन आणखी (आणि आपल्या सर्वांकडुन) राष्ट्रासाठी छोटे, मोठे मोलाचे काम होवो हीच इच्छा.

संरक्षण क्षेत्रामध्ये असणा-या व्यवस्था आणि तिथली स्वार्थी भ्रष्टाचारी मंडळी या पराभवाला जबाबदार आहेत, त्याचे फटके मीही खातो. भारतीय उद्योजकांना आणि विद्वानांना अत्यंत हीन आणि अपमानास्पद वागणूक मिळते, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. पण आपण खचलो, तर हा देश 'स्व-तंत्र' कसा होणार?

शेवटचे हे वाक्य मनावर अगदी कोरल्यासारखे उमटले. चरचरीत वास्तव अन तेवता आशावाद!

भडकमकर मास्तर's picture

30 May 2014 - 12:53 am | भडकमकर मास्तर

लेख आवडला... अधिक विस्ताराने येउद्या...

मे-जून-जुलै महिने आले की मला यातला प्रत्येक दिवस आठवतो.
अगदी ! कारगिल युद्ध होउन १५ वर्ष झाली आता, पण कॅप्टन सौरभ कालिया आणि त्याच्या टिमला ज्या पद्धतीने हाल हाल करुन ठार मारले त्याची मनाला वेदना देणारी आठवण जागॄत होते.
इतके होउन देखील आपले वीर योद्धे नक्की कसे असतात आणि त्यांचे अनुभव कसे होते त्याच एक उदा. खाली देतो.

जाता जाता :- १५ वर्ष उलटुन देखील कारगिल शहिंदांची अवहेलना काही केल्या थांबत नाही ! :(