पाकातले चिरोटे

रेवती's picture
रेवती in दिवाळी अंक
27 Oct 2013 - 7:47 am

साहित्य: तीन मोठ्या वाट्या मैदा, सहा ते सात टीस्पून्स साजुक तूप/डालडा,तीन टेबलस्पून्स् तांदूळ पिठी , कक्ष तापमानाचे पाणी, चवीपुरते मीठ, दीड मोठ्या वाट्या साखर, वेलदोडा पूड, केशर, आवडत असल्यास केशरी रंग, लिंबूरस, सजावटीसाठी उपलब्ध असलेले नट्स, तळणीसाठी तेल.
कृती: प्रथम परातीत साडेतीन टीस्पून्स तूप कणी मोडेपर्यंत हाताने फेसावे. मीठ घालून फेसावे. त्यात मोजलेला मैदा घालून त्यास तूप चोळावे. मुटका वळता आला पाहिजे असे मिश्रण झाले म्हणजे थोडे थोडे पाणी घालून पोळीच्या कणकेइतपत घट्ट भिजवावे. हा मैद्याचा गोळा झाकून ठेवावा. त्याच परातीत राहिलेल्या तुपाची कणी फेसून मोडावी व तांदळाची पिठी घालून साटा तयार करावा. तो एका वाटीत काढून ठेवावा.
भिजवलेल्या मैद्याचे सहा सारखे भाग करून घ्यावेत. तीन गोळ्यांच्या तीन पातळ पोळ्या लाटाव्यात. एका पोळीला साटा लावून त्यावर दुसरी पोळी पसरावी. त्यावरही साटा लावावा. आता त्यावर तिसरी पोळी पसरून त्यावर साटा लावावा. असे झाल्यावर त्याची वळकटी करावी. अशीच वळकटी उरलेल्या तीन गोळ्यांची करून घ्यावी. आता सुरीने वळकटीचे एक पेर रुंदीचे तुकडे करावेत. पोळपाटावर प्रत्येक तुकडा ठेवून हलक्या हाताने थोडा थोडा चौकोनी लाटावा. तेल तापल्यावर आच मध्यम करावी व एकावेळी एकेक चिरोटा त्यात सोडावा. झार्‍याने हलकेच उलटून गुलाबी रंगावर तळावा. तळणीतच पापड भाजयच्या चिमट्यात चिरोटा उभा धरून डावाने त्यावर तेल ओतल्यास नीट तळला जातो. असे सर्व चिरोटे चाळणीत निथळण्यास ठेवावेत.
एका पातेलीत दीड वाट्या साखर व पाऊण वाटी पाणी घालून पाक करण्यास ठेवावे. एकतारी पाक होत आला की त्यात केशर काड्या, हवा असल्यास केशरी रंग, वेलदोडा पूड, लिंबूरस घालावा. पाकाचे पातेले उतरवून त्यात एकेक चिरोटा चिमट्यात धरावा व डावाने पाक त्यावर ओतावा. चाळणीत निथळण्यास ठेवावा. असे सर्व चिरोटे करून झाले की त्यावर बदाम, पिस्ते, काजू यांचे तुकडे पसरावेत.
टिपा: १) साट्याचे सहा भाग करून ठेवावेत.
२) सर्व पोळ्या, वळकट्या व तुकडे स्वच्छ, ओल्या फडक्याने झाकून ठेवावेत.
३)वरील पद्धतीने चिरोटे बेताचे गोड होतात पण ज्यांना ते जास्त गोडीचे हवे असतील त्यांनी थोडा वेळ पाकात राहू द्यावेत व नंतर निथळण्यास बाहेर काढून ठेवावेत.

दिवाळी अंक २०१३

प्रतिक्रिया

पियुशा's picture

1 Nov 2013 - 2:04 pm | पियुशा

सहिच्च ! दिपावलीच्या गोड - गोड शुभेच्छा :)

सविता००१'s picture

1 Nov 2013 - 2:16 pm | सविता००१

काय मस्त केले आहेस गं! मी पण करते आता.

प्रकाश घाटपांडे's picture

1 Nov 2013 - 2:26 pm | प्रकाश घाटपांडे

वा मस्त! आत्ताच खाल्ले. पाककृती मेहनतीची आहे.

दीपावली शुभेच्छा!

आह्ह ! चिरोटो पाहुनच त्याचा गोडवा कळला आहे. :)

ऋषिकेश's picture

1 Nov 2013 - 3:08 pm | ऋषिकेश

उत्तम! हे ही करून बघणार.. दिवाळीत करेन का माहित नाही पण करून नक्की बघणार

बादवे, हे तळण्याऐवजी ओव्हनमध्ये बेक केल्यास (१८० वर १०-१२ मिनिटे पुरेलसे वाट्टे) कसे होतील तेही बघितले पाहिजे असे पाकृ वाचून वाटले.. करून पाहेन एखादा नी सांगेन

प्यारे१'s picture

1 Nov 2013 - 3:17 pm | प्यारे१

चिरोटा बघूनच प्राण गेलाय.

स र स!

अनन्न्या's picture

1 Nov 2013 - 6:49 pm | अनन्न्या

तोंपासु. असं ऐकलय की तांदुळ पिठी साट्यासाठी वापरल्यास ती तळताना तळणीत उतरते म्हणून मी कधी तांदुळ पिठी वापरत नाही. असे काही होते का?

रेवती's picture

1 Nov 2013 - 8:34 pm | रेवती

हो अनन्या. पिठी तळाणीत उतरण्याचा प्रकार नक्कीच होतो. ही पाकृ करताना साजूक तूप वापरले होते व तळणीसाठी मात्र तेल! खूप थंडी असेल तर तळणी गार झाल्यावर तळणीत उतरलेले तूपही तळाला गोठते. अजून तेवढी थंडी सुरु न झाल्याने तसे झाले नाही. चिरोटे जत तुपात तळले तर थंडीमुळे तेही कुरकुरीत न राहता कडकडीत होतात.

अजया's picture

1 Nov 2013 - 10:23 pm | अजया

खरंच अप्रतिम!!

पैसा's picture

2 Nov 2013 - 12:29 am | पैसा

अहाहाहा! लै भारी!

झकास दिसताहेत चिरोटे… एकदम मेहनतीने अणि आवडीने केलेली अशी पाककृती...!

प्रभाकर पेठकर's picture

2 Nov 2013 - 12:53 pm | प्रभाकर पेठकर

मेहनतीची पाककृती आहे. छायाचित्रावरून मस्तं गोड, खुसखुशीत दिसते आहे. अभिनंदन.

सानिकास्वप्निल's picture

2 Nov 2013 - 3:59 pm | सानिकास्वप्निल

चिरोटे अतिशय आवडता प्रकार आहे :)
नाजूक व चविष्ट

दिपक.कुवेत's picture

2 Nov 2013 - 5:18 pm | दिपक.कुवेत

करण्या पेक्शा खायलाच (आयते) जास्त आवडतील.

म्हैस's picture

8 Nov 2013 - 11:36 am | म्हैस

वाव …. चिरोटे माझे एकदम फेवरेट अहेत. मी पण करणार . फक्त साटा म्हणजे काय ते सांगता का?

स्पंदना's picture

11 Nov 2013 - 6:48 am | स्पंदना

म्हैसबाई साटा म्हणजे दोन पातींच्या मध्ये जे तांदुळपिठी अन तूपाचे मिश्रण लावायचे ते.

त्याच परातीत राहिलेल्या तुपाची कणी फेसून मोडावी व तांदळाची पिठी घालून साटा तयार करावा. तो एका वाटीत काढून ठेवावा.

हे लिहीलेल आहे रेवाक्काने. तसे करा अन मग दोन्पातींच्यामध्ये हे मिश्रण लावुन मग त्यांचा रोल करा,

सुहास झेले's picture

11 Nov 2013 - 5:39 am | सुहास झेले

लै लै भारी :) :)

स्पंदना's picture

11 Nov 2013 - 6:50 am | स्पंदना

केलतो दिवाळीला :) जमले मला. फक्त ते तू जसे कापल्याबाजुने लाटलेस ना ते मी चुकुन पातीच्या बाजुने लाटेल. मग चूक लक्षात आल्यावर पुन्हा कापल्याबाजूने लाटले.
म्हणुनच जरा करतानाचा एखादा फोटो उपयोगी पड्तो, माझ्यासारख्या मठठ बाईला समजायला सोपे पडते. ;)

त्रिवेणी's picture

11 Nov 2013 - 3:55 pm | त्रिवेणी

म

इन्दुसुता's picture

18 Nov 2013 - 9:49 am | इन्दुसुता

माझीही पाकृ अशीच... मी हे दर दिवाळीत करतेच.