सत्व

psajid's picture
psajid in दिवाळी अंक
26 Oct 2013 - 8:50 am

सूर्याकडून तांबूस सोनेरी किरणे उसनी घेऊन उल्हासित झालेली पहाट श्री. दीक्षित यांच्या दारावर हळुवार थाप मारू लागली होती. परंतु उशिराच्या जागरणामुळे असेल किंवा रात्रीच्या पार दुसऱ्या प्रहरी लागलेल्या झोपेमुळे असेल, श्री. दीक्षित तिच्या गोड हाकेला प्रत्युत्तर देत नव्हते. आपल्या सोनेरी रूपावर भाळून स्वागताला येणाऱ्या दीक्षित यांची तिला अगदी सवयच होऊन गेलेली होती. परंतु आज ते बाहेर येत नाहीसे पाहून तिला अचंबा वाटला. थोडा वेळ वाट पाहून थकलेली पहाट मोत्यासारख्या शुभ्र रूपात त्यांच्या दरवाजात अवतरली.

अगदीच नाइलाज झाला, तसे श्री. दीक्षितांनी दरवाजा उघडला. अगदी हवीहवीशी एक मंद झुळूक पाहुणीच्या रूपात अंगाला बिलगली अन कानामध्ये अवीट गोडीचे एक भावगीत गुणगुणू लागली. त्यांनी भोवती पाहिले. एकदम रम्य वातावरण, कुठेही जळमट नसणारी आह्लाददायक पहाट, पक्ष्यांचे गुंजारव, वाऱ्याबरोबर होणारी पानांची एका सुरातील सळसळ... अगदी मदहोश करणारे वातावरण! अप्रतिम...!

त्यांच्या मनामध्ये क्षणभर विचार आला. रोजचेच पक्षी! वारा! वातावरण! मग आज आपणास ते हवेहवेसे का वाटताहेत? वठत चाललेल्या मनास पालवी फुटून पुन्हा जगण्याची ईर्षा का निर्माण व्हावी? ही जगावेगळी अभिलाषा आपल्या मनामध्ये का उत्पन्न व्हावी?

त्यांनी आपल्या अंगाभोवती शाल लपेटून घेतली अन पाण्याची झारी घेऊन ते अंगणामध्ये ठेवलेल्या कुंडीमध्ये पाणी शिंपू लागले. त्यांनी पाहिले – कुंड्या अस्ताव्यस्त होत्या. काही फुलांची रोपे कोमेजू लागली होती. पांढऱ्या निशिगंधाकडे लक्ष जाताच त्यांच्या मनास धक्का बसला. त्याच्या मुळ्यामध्ये जोर होता, तरी ते वरून खाली सुकत चालले होते. त्यांनी झारीतील पाणी त्याच्या मुळात शिंपले. त्याच्याजवळच बसून त्याचे मन भूतकाळात डोकावू लागले...

पांढरा निशिगंध आपणास खूप पसंत होता, कारण तिलाही तो खूप आवडायचा. आपल्यापेक्षा तिलाच जास्त. आपण जेव्हा ओंजळीमधून फुले न्यायचो, तेव्हा ती लहान मुलासारखी आनंदून जायची. बाळबोध चाळे कायकरायची. अगदी अधिर होऊन आपल्याच ओंजळीत फुलांना भरभरून हुंगायचीअन् हळुवार कोमल हातांनी त्यातील दोन फुले वेणीमध्ये माळायची. डोळ्यांमध्ये मार्दव, आर्जव, आणून "कशी दिसतात?" विचारायची. आपण'अप्रतिम' म्हणण्याच्या बदल्यामध्ये तिच्याकडून सुरेश भटांचे कोणतेही एक भावगीत म्हणून घ्यायचो. तिच्या गोड आवाजाने कान तृप्त झाल्यावर मग आपण 'अप्रतिम' म्हणायचे. आणि मग ती खुदकन हसायची,हसताना तिच्या गालावर पडणारी ती मोहक खळी, तिचा तो लडिवाळ आविर्भाव पाहून वाटायचे वाटायचे की आयुष्यभर हिच्या केसामध्ये फुले माळावीत. परंतु नियतीने ते भाग्यही आपणांस दिले नाही. कॉलेज संपण्यापूर्वीच दोघांच्या भिन्न भिन्न रस्त्याविषयी जाणवले. 'चूक या शब्दाला प्रेमात थारा नाही' म्हणूनच चूक कुणाची या गोष्टीवर कधी विचार करत बसलो नाही. ठेचाळत्या अवस्थेत आपण जीवनाच्या रखरखीत फुफाट्यातून चालत राहिलो. आणि त्या उष्ण फुफाट्यानेच मग घाव भरण्याचे काम केले. मात्र आपण ही बंगली बनवली, तेव्हा तिची आठवण म्हणूनच हा पांढरा निशिगंध आपल्या हातांनी फुलवला, वाढविला,जोपासला. जेव्हा रात्र तिच्या आठवणींनी कासावीस करी, तेव्हा तो निशिगंध तिच्या रूपात येऊन आपणास थोपवयाचा अन हळुवार निद्रेच्या स्वाधीन करायचा. एक झटका बसावा, तसे श्री. दीक्षित भानावर आले.
आज त्याची ही अवस्था पाहून त्यांच्या मनामध्ये एक उसण भरली. त्यांच्या अंतर्मनाला अपराधाची एक बोच लागली. कित्येक दिवसांमध्ये आपण त्याच्याकडे लक्षच दिले नाही, म्हणून कदाचित त्याची ही केविलवाणी अवस्था झालीय. आज माळ्याला चांगला फैलावर घेतला पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात आला अन क्षणात नाहीसाही झाला. कारण तो तरी कोणकोणती कामे एकदम करणार होता? घरातील दुधापासून भाजीपाला आणून स्वयंपाक करण्यापर्यंतची सर्व कामे तो बिचारा एकटाच तर करत होता. तशी चूक आपल्याच हातून झाली होती. आपण आपल्या भावनांचे रक्षण करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवणेच चूक होते. ती चूक पुन्हा होता नये, अशी मनाची समजूत घालून ते आत आले. आंघोळ, नाष्टा उरकून ते बाहेर पॅसेजमध्ये सोडलेल्या पाळणाखुर्चीमध्ये वर्तमानपत्र वाचत बसले. मात्र त्यामध्ये त्यांचे लक्ष लागत नव्हते. ते उठून पॅसेजमध्येच फेऱ्या मारू लागले.

आजची सकाळ एका निवृत्त प्राध्यापकास रम्य वाटली होती. कित्येक दिवसानंतर त्यांच्या मनाचा एक कप्पा हळुवार भावना बाहेर ओतू पाहत होता. त्यांना आठवले, या अगोदर फक्त मायाच्या सहवासातच फर्ग्युसन कॉलेजला शिक्षण घेत असताना आपली अशी अवस्था होत होती. मात्र आज खूप वर्षांनी पुन्हा ती हवीहवीशी संवेदना मनाचे तळ ढवळून काढत होती. उताराला लागलेल्या देहाला पुन्हा वर खेचू पाहत होती. त्यांच्या लक्षात आले – काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे सारसबागेमध्ये फेरफटका मारण्यास गेल्यावर, विश्रांतीसाठी लहान वृक्षाशेजारी बसल्यानंतर एक भावगीत त्यांच्या कानी आले. आणि पहिल्या ओळीनेच त्यांच्या हातापायाला जडत्व आणले. ते निश्चेष्ट झाल्यासारखे प्राण कंठात आणून ते भावगीत ऐकत होते. गीत संपल्यानंतरही ते बराच वेळ त्या अवस्थेमध्ये होते. एकदम मंत्रमुग्ध! नकळत त्यांच्या ओठातून 'अप्रतिम' शब्द निघून गेला. मात्र त्या स्त्रीच्या अन तिच्याबरोबर असणाऱ्या लहान मुलाच्या संवादांनी त्यांचा तो आवाज हवेतच विरला. त्यांच्या संभाषणावरून तो मुलगा तिचा नातू असावा. श्री. दीक्षितांना तिच्या गोड गळ्याबद्दल अभिनंदन करण्याचा मोह होत होता. गडबडीने दीक्षित उठले, मात्र फिरून सामोरे जाण्याअगोदरच ती स्त्री आपल्या नातवाचा हात धरून चालू लागली होती.

अगदी तेव्हापासून श्री. दीक्षितांचे मन सैरभैर होते अगदी तसाच आवाज, तोच गळा , सुरेश भटांचेच झुलवत ठेवणारे, फुलवत घेऊन जाणारे काव्य! कसे शक्य आहे? रात्रीच्या पहिल्या प्रहरी त्यांच्यासमोरून कॉलेजमधील तारुण्याचे ते दिवस जसेच्या तसे सरकू लागले होते.

पॅसेजमध्ये फिरत असतानाही त्यांना कालच्या या सर्व गोष्टी आठवत होत्या. त्या गोष्टींनी ते अगदी अस्वस्थ होत होते. त्यांच्या नकळतच त्यांच्या मनाने त्या स्त्रीला भेटून तिच्या आवाजाला दाद देण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच त्यांचे मन शांत झाले.
*************

"नमस्कार! मी प्रा. रामचंद्र दीक्षित."
"नमस्कार! मी श्रीमती संगीता जोग. पण आपली पूर्वीची ओळख आहे?"
"अगदी कालची! परंतु म्हणालात तर खूप वर्षापूर्वीची."
"मी समजले नाही."
"मी आवाजाची ओळख सांगितली. काल तुम्ही फार छान भावगीत म्हणालात."
"आभारी आहे. निखिलने खूपच आग्रह केला अन् धमकीही दिली."
"धमकी?"
"धमकीच म्हणायची. कारण एकट्या त्याचाच लळा आहे, हे तो लबाड जाणतोय. म्हणूनच 'गीत नाही म्हटलं तर तो माझ्याबरोबर पुढच्या रविवारी माझ्याकडे येणार नाही' म्हणाला. हो.. पण.. मी खूपच हळू आवाजात ते म्हटलं होतं."
"हो ना! परंतु मीही खूप दूर नव्हतोच. म्हणूनच एक 'अप्रतिम' काव्य ऐकण्याचा योग आला. आणि काही आठवणी पुन्हा पल्लवित झाल्या. खरे तर यासाठी प्रथमत: निखिलचेच आभार मानले पाहिजेत. कुठे आहे तो?"
"नाही आला. आठवड्यातून फक्त एकदाच तो माझ्याकडे असतो. "
"म्हणजे? "
"तो माझ्या मुलीचा मुलगा. आणि रविवार फक्त आम्हां दोघांचा असतो. चला, मला निघायला हवं."
"आणखी बोलता आलं असतं तर छान वाटलं असतं. ठीक आहे. निघू या. उद्या बोलू."
"शक्यता कमी आहे. कारण उद्यापासून मी इथे येणार नाही आहे."
"बाहेरगावी असता का?”
"नाही. इथेच पद्मावतीला राहते मी. परंतु एक दुवा होता, तोही आता निसटतोय."
"म्हणजे? चला, स्वारगेटपर्यंत चालत चालत बोलू." असे म्हणून श्री. दीक्षितही उठून चालू लागले.
"म्हणजे माझ्या जावयांची बदली मुंबईला झाली आहे." "हं..." असा सुस्कारा सोडून त्या पुन्हा म्हणाल्या. "आता पुन्हा ते वैराण वाळवंट,पुन्हा तो अधाशी एकटेपणा खायला उठेल. असो, माझ्या गाण्याचं कौतुक करण्यासाठी आलात, त्याबद्दल धन्यवाद!"
****************

रात्री अंथरुणावर श्री. दीक्षित विचारांमध्येच गुरफटले होते. त्यांनी झोपेची आळवणी करूनही ती त्यांना प्राप्त होत नाहीसे पाहून त्यांनी व.पुं.चे पुस्तक हाती घेतले. परंतु त्यामध्येही त्यांचे लक्ष लागत नव्हते. एक अज्ञात शक्ती त्यांना आपल्याकडे खेचत असल्याचा भास होत होता. आणि या एका विचाराने ते खूपच हादरून गेले. नाही! कधीच नाही! आपण केलेल्या तपस्येचा असा अंत होणे बरोबर नाही. आपण जे जिवापाड जपले, ते सत्त्व एका वादळाने येऊन घेऊन जाणे बरोबर नाही. आजपर्यंत तिच्या आठवणींवर आपण जगायचे ठरवले आणि अविवाहित राहून, प्रपंच त्यागून तारुण्याची वर्षे घालवली. मग त्याला अर्थ तो काय? आपण केलेला तो त्याग फक्त देखावाच राहणार...? कसे शक्य आहे? परंतु ती अज्ञात शक्ती त्यांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी प्रलोभने दाखवू लागली. गत आयुष्याच्या जीवनामध्ये डोकावण्यास भाग पाडू लागली. त्या वेळी केवळ नोकरी नाही, म्हणून सर्टिफिकेटला रद्दी म्हणणारा तिचा बाप! आणि केवळ आजारी पित्याची इच्छा म्हणून तिने स्वीकारलेली वेगळी वाट! अनपेक्षितपणे सात वर्षांनी पतीसोबत भेटल्यानंतर त्याची ओळख करून देतानाची तिच्या चेहऱ्यावरील परिपूर्णता! यामध्ये कुठेतरी त्याला जाणवलेली त्याच्या प्रेमाची उपेक्षा! या सर्वांची आठवण ती अज्ञात शक्ती त्यांना करून देऊ लागली. आयुष्याच्या उतरणीवर दिलासा देणाऱ्या माणसाची गरज! संपूर्ण जीवनातील भकास क्षण! कधीही हवीहवीशी न वाटणारी संध्याकाळ अन् कधीही उल्हासित न करणारी सकाळ यांची जणू उजळणीच त्यांना होत होती. त्यांचे मन आता त्यांच्या हातून निसटून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र त्यांच्या त्याग, सत्त्व, तपस्या यांना ते मुळीच मान्य नव्हते. जवळजवळ अगदी निसटत्या क्षणी त्यांनी त्या अज्ञात शक्तीवर विजय मिळवला. त्यांनी मनाची ठरवले की आता कधीच त्या मोहाच्या वाटेवर जायचे नाही.

मात्र चारच दिवस उलटले असतील. त्यांना आपल्या मनाची चाललेली तळमळ गप्प बसू देईना. त्यांनी या रात्री अक्षरशः दिवसासारख्या जागून काढल्या होत्या. त्यांनी मनाचा ठाम निर्णय केला अन त्यांची पावले पुन्हा सारसबागेकडे वळली. बागेच्या कमानीतून खाली उतरतानाच त्यांची नजर सर्वत्र शोध घेऊ लागली. परंतु अपेक्षित असे काही त्यांच्या नजरेला गवसत नव्हते. त्यांनीखाली येऊन संपूर्ण फेरफटका मारला. एकदम शून्य! बाजूच्या पेशवेपार्कमध्येही जाऊन पाहिले. छे ... नाहीच! ते निराश मनाने घरी आले. पुन्हा रात्रभर तळमळ! तगमग!

हे चक्र साधारण पाच दिवस चालले. अगदी व्यर्थच! आणि आज मात्र ते मनात म्हणाले – “आज नाही, तर कधीच नाही.” ते कमानीतून खाली उतरू लागले, इतक्यात त्यांची नजर समोर गेली अन ते एकदम आनंदून गेले, थोडेसे गोंधळलेसुद्धा! काही क्षण पावले घुटमळली! मात्र त्यांचे लक्ष जाताच त्याच हसल्या अन हात करत त्यांच्याकडे चालत येऊ लागल्या. आपण काही चूक तर करत नाही ना? असे श्री. दीक्षितांना क्षणभर वाटून गेले.
"नमस्कार श्रीयुत दीक्षित! मी तुम्हालाच शोधत होते. म्हटलं 'आज नाही तरकधीच नाही.”
दीक्षितांनी नमस्कारासाठी हात जोडले.
"अगदी माझ्या मनातलं बोललात. मीही हेच ठरवून आलो होतो. गेले चार-पाचदिवस झाले तुम्हालाच शोधत होतो, परंतु आपण भेटला नाहीत, आज मनात म्हटलं ' आज नाही तर कधीच नाही' "
दोघेही अगदी मनमोकळेपणाने हसले अन एका रिकाम्या बाकड्याकडे चालू लागले.
"आपल्याही मनांमध्ये तेच विचार होते तर? आता पुढे त्याचा आपणास कितपत उपयोग होईल, सांगणे कठीण आहे."
"मी समजलो नाही."
“श्रीधरनेही अशीच ओळख नसताना मैफल संपल्यावर एकदम व्यासपीठावर येऊन गळ्याला दाद दिली होती. पत्रकार होता तो. काही दिवसांनी पुन्हा एका मैफलीमध्ये भेटला अन माझ्याजवळ माझ्या मैफलीबद्दल लेख लिहिण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर आमचे भेटणे वाढले. आणि एके दिवशी आम्ही घरचा विरोध पत्करून आंतरजातीय विवाह केला. लग्नाची काही वर्ष अगदी सुखात गेली. आमच्या प्रपंचलतेवर एक कोमल फूल उमललं. श्रीधर खूपच कौतुक करायचा तिचं. लाडाने तो तिला 'भातुकली' म्हणायचा. एक दिवस लेख घेऊन कोणत्या झोपडपट्टीतून घरी आला. त्यांच्या जीवनाविषयी तळमळीने बोलला. आठ दिवस तिथले पाणी प्यायल्यामुळे थोडासा सरदी, खोकला होता. औषध घेऊनही खोकला वाढत गेला. आणि एक दिवस खोकता खोकता रक्ताची उलटी झाली. सर्व फ्रीज! जिथल्या तिथे! माझा तर आधारच गेला. मात्र त्यातूनही उठायचं ठरवलं, कारण श्रीधरने माझ्या हातामध्ये त्याची आवडती 'भातुकली' दिली होती...
पुन्हा मैफली करायचं कटाक्षाने टाळून नोकरी पत्करली. आमच्या 'भातुकलीला' खेळण्याच्या विश्वातून बाहेर आणून वास्तव जगात प्रवेश करण्यास साहाय्य केलं. मात्र या कामी दुसरीकडे माझं असं काहीतरी हरवत गेलं. लग्नाच्या ऑफर खूप आल्या. काहींनी मुलीसह, तर काहींनी एकटीला पसंत केलं. परंतु प्रत्येकाला नकार देत आले. प्रत्येक वेळी श्रीधरचा हसरा चेहरा दिसू लागायचा अन तोंडातून नकळत नकार बाहेर यायचा. काहीकाही वेळा शरीर भावनेवर विजय मिळवू पाहायचं. त्या वेळी खूप कष्ट पडायचे. मात्र त्याला हरवावेच लागे. आज आमच्या 'भातुकली'चा उमललेला, फुललेला संसार बघताना कृतकृत्य वाटतं. सर्व भरून पावतं.”
खूप दिवसांनी, खूप दिवसाचे, साठवून ठेवलेले श्रीमती जोग श्री. रामचंद्रांना अगदी विश्वासाने सांगत होत्या. बराच वेळ बोलल्यामुळे त्यांना थोडा थकवा जाणवत होता. थोडा वेळ विश्रांती घेऊन त्या पुन्हा बोलू लागल्या.
"मात्र ओळख नसताना परवा तुम्ही माझ्या गळ्याला दाद दिलीत अन मला पुन्हा श्रीधरची आठवण झाली. मन पुन्हा सैरभैर झालं, पुन्हा बंडाळी करू लागलं. म्हटलं, हा एकटेपणा आपणास यापुढे साहणार नाही. आपणास हा उतार उतरताना मानसिक आधाराची गरज आहे. आठवड्यातून एक दिवस भेटणारा निखिलही आता भेटणार नाही, तेव्हा तर प्रकर्षाने आपणास एका हळुवार माणसाची गरज आहे. असा माणूस, ज्याच्या मनात संवेदना राहत असतील. अशा माणसाची आपणास गरज आहे, याची मनास जाणीव होऊ लागली. आणि त्याच वेळी माझ्या डोळ्यापुढे तुमचा चेहरा येत राहिला अन त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मी इथे तुम्हांला शोधत राहिले. कदाचित तीन-चार दिवस तुम्ही इथे आलाच नाहीत. या चार दिवसात माझं उसळणारं, भरती आलेलं मनही श्रांत होऊन ओहोटीला लागलं. घरी बसून मी विचार केला की नको…, नाही… ! हे चूक आहे. आपण जे करतोय, ते बरोबर नाही. पतीच्या पश्च्यात शील जपण्यासाठी आपण सर्वस्व पणाला लावलं. आयुष्याबरोबर लावलेला तो ‘पण’आपण जिंकला. समाजाने अनेक प्रलोभनं दाखवली. मात्र आपण त्याच्यापासून अलिप्त राहून समाजाला वाकुल्या दाखवल्या. त्याला कोठेही बोट ठेवण्याला जागा ठेवली नाही. मात्र आज केवळ एका क्षणासाठी, जो आपल्या आयुष्यात नको त्या ठिकाणी, नको त्या वेळी आला आहे. त्या क्षणांसाठी आपण आजपर्यंत कमावलेला, मिळवलेला संयम , सर्वस्व यांची एकदम आहुती द्यावी? हे माझ्या मनास पटले नाही. तुमच्या भावुक डोळ्यांनी माझ्याशी बोलणी केली होती. शिवाय आपणही बोलता–बोलता आपल्या जुन्या आठवणींविषयी बोलला होतात. म्हणून मनात म्हटलं, आपणास असं तळमळत सोडण्यापेक्षा सत्य स्थिती कथन करावी. मला माफ करा, पण आपणच समाजाच्या दृष्टीने आपल्या वयाचा, अन आपल्या दृष्टीने आपण केलेल्या त्यागाचा विचार करून आपल्या मर्यादा आपल्यापुरत्या ठरवणं योग्य होईल. आपणच आपलं मर्यादाचं वर्तुळ मोडून टाकायचा प्रयत्न करणं बरोबर नाही. जे वर्तुळ आपण आपल्याभोवती जाणीवपूर्वक निर्माण केलेलं आहे. मात्र असं व्हायला नकोय. कारण मग आपण केलेल्या बलिदानाची, तिळतिळ तुटत घालवलेल्या एकेका क्षणांची क्षणात राखहोऊन जातेय."

श्री. दीक्षित या बोलण्यांने खूपच प्रभावित झाले होते. अगदी मंत्रमुग्ध! तेअचंबित होऊन त्यांच्याकडे पाहत होते. एकदम सुरवातीला आपल्या मनात उमटणारे तेच बोल ते त्यांच्या तोंडून ऐकत होते. परिस्थिती वेगळी असली तरी दोघांचा त्याग सर्वस्वी एकच होता. आणि हे ऐकत असतानाच त्यांच्या मनावर विजय मिळवलेल्या त्या अदृश्य शक्तीची धार बोथट होत होती. त्यांचे ते तपस्वी मन पुन्हा उजळून निघत होते.

"खूपच छान विश्लेषण केलंत. खरं तर माझीही स्थिती काही काळ दोलायमान झाली होती. मात्र तुमच्या एकेक शब्दानिशी माझं कमकुवत होत चाललेलं मन पुन्हा उभारी घेऊन आपल्या पूर्वीच्या मताशी ठाम उभं राहिलं आहे. आजपर्यंत कुणीही आपल्याकडे बोट करू नये असं वागत आलो. काहीकाही वेळा त्याविषयी मन अगदी संदिग्ध होत होतं. मात्र आता ती काळजीही नाही."
"खूप वेळ झाला. आपण निघू या आता."
" हो हो, निघू या अगदी! परंतु कधीही एकटेपणा वाटला तर माझ्या घरीनि:संकोच स्वागत असेल तुमचं. अं…. माझा पत्ता......?"
"आभारी आहे. परंतु आता त्याची गरज नाही."
"मला कळेल असं बोला."
"म्हणजे असं की, यापुढे आपण कधीही भेटणार नाही आहोत. अगदी वृद्धापकाळातील मित्र म्हणूनही नाही. कारण आजचा संयम, दृढनिश्चय ठाम राहील की दिवसेंदिवस कमकुवत पडत जाईल, हे सांगणे कठीण आहे. कदाचित भविष्यात मग आपल्या स्वागताला स्वार्थही उभा राहील."
"माझ्या म्हणण्याचा उद्देश तो नव्हता. पण आता निखिलही मुंबईला...."
"ते जरी खरं असलं तरी मी त्याची भेट घेण्यासाठी तिकडे जाऊ शकते. आणि मग तो इथं नसण्याचीही हळूहळू सवय होऊन जाईल."
" जे होतं ते चांगल्यासाठी' या गोष्टीवर माझा प्रगाढ विश्वास आहे. चला, आपण कॉफी पिऊन आपल्या शेवटच्या भेटीचं सेलिब्रेशन करू."
**************************

रात्री श्री. दीक्षित अगदी मोहक वातावरणामध्ये घरी आले. वातावरण रम्य होते की त्याचे मनच रमणीय झाले होते, हे सांगता येत नव्हते. परंतु फाटकातून आत येताच त्यांची गात्रे मोहरून गेली, सुगंधित झाली. ते मोहरल्या वातावरणात तसेच निशिगंधाच्या कुंडीजवळ आले. त्यांनी पहिले – निशिगंधाने पुन्हा जोर धरला होता. पुन्हा त्याच्यावर पांढरी फुले उमलून आली होती.चांदण्याचा प्रकाशात टपोऱ्या मोत्यासारखी दिसणारी ती पांढरी फुले त्यांना खूपमोहक वाटली. त्यांनी त्यातील दोन फुले आपल्या ओंजळीत घेतली अन घरामध्ये प्रवेश करत त्यांनी ओंजळ नाकाजवळ नेत त्याचा सुवास घेतला. पुनःपुन्हा! अगदी भरभरून! नकळत त्यांच्या ओठावाटे शब्द निघाले - "अप्रतिम !"

समाप्त

लेखक : श्री. साजीद यासीन पठाण
(९९७०५७५७६६)
मु : दह्यारी. तालुका : पलूस,
जिल्हा : सांगली ( महाराष्ट्र )

दिवाळी अंक २०१३

प्रतिक्रिया

पैसा's picture

2 Nov 2013 - 12:47 pm | पैसा

भावभावनांचे हिंदोळे अगदी छान टिपलेत! उतारवयात कोणाची साथ घ्यावी का हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न. पण एकूण कथा, त्यातलं वातावरण, विचार फारच छान आले आहेत!

अधुरी एक कहाणी आवडली! म्हटलं तर शेवट आहे म्हटलं तर नाही!

अनन्न्या's picture

2 Nov 2013 - 6:33 pm | अनन्न्या

शेवट थोडा अनाकलनीय वाटला पण अपूर्ण नाही वाट्ली कथा!

प्रभाकर पेठकर's picture

3 Nov 2013 - 3:56 am | प्रभाकर पेठकर

कथेचा आशय चांगला आहे. पण त्याची मांडणी बर्‍यापैकी चुकल्यासारखी वाटते आहे.
अजिबात ओळख नसलेले दोन वृद्ध भेटतात एकत्र गप्पा मारतात इथपर्यंत पटतं पण दोघेही स्वतःशीच प्रामाणिक वाटत नाहित. प्रेम भावना (त्या वयातही) अपवित्र नाही. पण आजपर्यंत आपण आपल्या जोडीदाराच्या आठवणी उराशी बाळगून 'एकटेच' जगलो आहोत म्हणजे खूप मोठा 'त्याग' केला आहे ह्या विचारांमागे अहंभावना जाणवते आहे. आपल्या आयुष्याला आपणच लावलेले हे 'त्यागाचे' बिरुद पुन्हा लग्नाचा विचार जरी केला तरी समाजापुढे मलीन होऊन जाईल आणि तथाकथित 'तपस्येला' गालबोट लागेल ही अनाकलनिय 'भिती' प्रामाणिक प्रेमभावनेला मारून, समाजातील आपल्या 'त्यागी' ह्या भ्रामक प्रतिमेला गोंजारत, स्वतःवरच अन्याय करणारी आहे.
इतकी वर्षे, आपल्या उदात्त प्रेमाला हृदयाशी कवटाळून आयुष्य व्यतीत केले आणि आता वृद्धापकाळी जेंव्हा शारीरिक आकर्षण उरत नाही, शारीरिक गरजेचा दबाव मनावर राहात नाही, अशा वेळी दुसर्‍या स्त्री/पुरुषाचे आकर्षण, क्षणैक असले तरी पुनर्भेटीसाठी इतके उतावीळ होणे (लागोपाठ एकमेकांना शोधत ५ दिवस भटकणे इ.इ.) हेच हृदयाशी कवटाळलेल्या 'उदात्त' प्रेमाभावनेला तडा देणारे आहे. त्यात अनैसर्गिक कांहीच नाही. पण नैसर्गिक भावनेचा अस्विकार करून पुन्हा त्या भ्रामक 'उदात्तते'चा मुखवटा धारण करण्याचा प्रयत्न स्वतःच्याच नैसर्गिग भावनेशी प्रतारणा करणारा आहे. असो.
आपल्या समाजात अजूनही स्त्री, एवढा पुढाकार घेऊन (दूसर्‍या भेटीत), एका परपुरुषाला गृहीत धरून एवढीमोठी लेक्चरबाजी करीत नाही. लेखकाच्या मनांत दोन्ही व्यक्तींच्या मनांतील भावनांची इत्यंभूत माहिती आहे पण कथेतील दोन्ही पात्रे एकमेकांना संपूर्णतः अनोळखी आहेत. पण श्रीमती संगिता जोग श्री. रामचंद्र दिक्षितांना संपूर्ण गृहीत धरून, अगदी न चाचरता, सहजिवनातील फोलपणा मांडतात हे पचण्यास कठीण आहे. कथेत श्रीमती संगिता जोगांनी त्या मागे दिलेली कारणमिमांसा (श्री रामचंद्र दिक्षितांचं मन संवेदनशील आहे आणि त्यांना तळमळत ठेवणं योग्य नाही वगैरे वगैरे) व्यावहारिक वाटत नाही. मुळात कोण होते ते श्री. रामचंद्र दिक्षित श्रीमती संगिता जोगांचे? कोणीच नाही. एकदा त्यांच्या गाण्याला, त्यांच्या कानावरही न पोहोचलेली, दाद दिलेले एक परके गृहस्थ. त्यांना आयुष्यात भेटायचेच नाही असे ठरविले असताना, 'का भेटायचे नाही' ह्याचे स्पष्टीकरण द्यायला, मुद्दाम तिथे त्या सारसबागेत, उतावळ्या 'टिन एजर' सारखे ५ दिवस फेर्‍या घालण्याचे कारणच काय? पुन्हा भेटायचेच नाही, संपला प्रश्न. श्री. रामचंद्र दिक्षित कांही भावव्याकुळ अपपरिपक्व तरूण नव्हते. त्यांचा कांही प्रेमभंग वगैरे झाला नसता की त्यांनी त्या, एक दिवसाच्या, अव्यक्त प्रेमासाठी आत्महत्या वगैरेही केली नसती. पण लेखकाने दोन अनोळखी पात्रांच्या, दोन वेगवेगळ्या भावविश्वांना वेगळे राखून एकमेकांनी हळूवारपणे त्यात प्रवेश करविण्याचा प्रयत्नही केलेला जाणवत नाही. एकाच भेटीत दोघांनाही एकमेकांच्या भावभावनांची एवढी घनिष्ट ओळख, कथेची लांबी मर्यादेत ठेवण्यासाठीच घडवलेली जाणवते आहे. असो.

दोघांनाही पहिल्याच भेटीत एकमेकांबद्दल प्रेम वाटलं, आपल्या एकाकी जीवनाचा तिटकारा आला, भेटीत उत्कटता आली आणि अचानक आपण फार मोठी चूक करीत आहोत हेही तितक्याच झटक्यात जाणवून, लगेच पुन्हा एकेकटे राहण्याचे महत्त्व उमगले. कुठली चर्चा नाही, समजवासमजवी नाही, विचारांचे मुद्देसुद मांडणे.

नाही, नाही, कुछ जम्या नही।

पेठकर काका, तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद ! तुमच्यासारख्या संवेदनशील आणि जागृत वाचकांनी माझी (मांडणी बिघडलेली) कथा वाचून त्यावर मुद्देसूद कारणमिमांशा केल्याबद्दल आभारी आहे.
तुम्ही म्हणतात - "आशय चांगला आहे मात्र मांडणी चुकीची आहे" एक गोष्ट विचारतो जर तुमच्या पर्यंत आशय पोहोचला आहे तर मग विस्कळीत मांडणीमधून तो तुमच्यापर्यंत आला कसा ? मला असे वाटते कि, कोणत्याही कथेचं सूत्र हे आरंभ - मध्य - अंत असे असते. वाचकांना मी सांगू इच्छितो कि, ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, ही सत्य घटना नाही आणि काल्पनिक कथेमध्ये कल्पनाविलास आणि वर्तमानाची सांगड घालून भावनात्मक शब्दांची मोट बांधली जाते आणि मलाही कथेचा वेग कायम राखण्यासाठी काही गोष्टी जुळवून आणाव्या लागल्या. कित्येक गोष्टी आपल्या आकलनाच्या पलीकडच्या असूनही आपण हिंदी मराठी किंवा रजनीकांतचे चित्रपट बघतो आणि त्याला दाद देतोच की !
तुम्हाला त्यांचे पहिल्याच भेटीत इतकं मोकळेपणाने बोलणं भावलं नाही मात्र त्यांच्या (दोघांच्याही)भूतकाळातील प्रसंग जे त्यांच्या आयुष्यात आले ते पाहता श्री. दिक्षीतांनी श्रीमती जोग यांच्या गायनाला दिलेली दाद ही त्यांना आपल्या पतीच्या उस्फुर्तपणाची आठवण देते आणि अगदी तसेच पुर्वप्रेमिकेच्या आवाजासारखा आवाज ऐकून दीक्षितांचे भारावून जाणे सहज वाटत नाही का ? आपणही कामाच्या धावपळीत किंवा आयुष्याच्या जोडणीमध्ये थकून जात असतानाच एखादा कॉलेज मधील प्रसंग किंवा प्राथमिक शाळेतील घटना आपल्या डोळ्यासमोर आली तर ती आपल्याला मंद झुळकी सारखी आल्हाददायक वाटते, पुन्हा हवीशी वाटते अगदी तसे प्रसंग कथेमध्ये आणण्याचा माझा प्रयत्न होता. मुळात ही कथाच या दोघांच्या गतआयुष्यातील घटनां आणि प्रसंगावरच बेतली आहे. यामध्ये शारीरिक ओढीपेक्षा मानसिक आधाराची गरज एकटेपणावर मात करण्यास मदत करते हे सांगण्याचा आणि आयुष्यभर जे जपले ते तत्व किंवा प्रण मोठं आहे हे सांगण्याचा माझा प्रयत्न होता. आणि हे करताना कथेचा बाज टिकवून ठेवणे हेही गरजेचे होते. त्यामुळे कदाचित तुम्ही म्हणता तसे न पटणारे, न भावणारे किंवा न जमणारे प्रसंग कथेमध्ये आले असतील हे मी मान्य करतो.
एका प्रसंगामध्ये त्यांच्यातील संवाद घडवणे हे चूक आहे हे ही मान्य मात्र अजून दोन चार भेटी आणि आणखी घडामोडी लिहल्या असत्या तर ही कथा न राहता श्री. बाबा कदमांसारखी कादंबरी झाली असती.
तरीही तुमच्या अभ्यासपूर्ण अभिप्रायाबद्दल धन्यवाद ! तुमच्या सूचना आणि टिपणी लक्षात ठेवून पुढील लेखन करीन !
श्री. साजीद पठाण

प्रभाकर पेठकर's picture

8 Nov 2013 - 3:23 am | प्रभाकर पेठकर

"आशय चांगला आहे मात्र मांडणी चुकीची आहे" एक गोष्ट विचारतो जर तुमच्या पर्यंत आशय पोहोचला आहे तर मग विस्कळीत मांडणीमधून तो तुमच्यापर्यंत आला कसा ?

एकाकी जीवन जगणार्‍या वृद्धांच्या मनांत कोणाबद्दल प्रेमभावना निर्माण होणे नैसर्गिक आहे. कथेचा हाच 'आशय' चांगला आहे पण त्यावर कथा बेतताना गुंफलेले प्रसंग वास्तवापासून, तार्किकतेपासून फटकून आहेत, सबब मांडणी चुकली आहे.
विस्कळीत मांडणीतूनही आशय शोधल्यास तो वाचकांपर्यंत पोहोचणे कठीण नाही. एखाद्याच्या शर्टाचे कापड चांगले असेल पण तो चुकीच्या पद्धतीने शिवला असेल तर 'कापड चांगले आहे' हा आशय लक्षात येतो पण नीट शिवलेला नाही हे वास्तव नजरेआड करता येत नाही. असो.