The Lake house

Primary tabs

स्पंदना's picture
स्पंदना in दिवाळी अंक
26 Oct 2013 - 8:46 am

अ‍ॅलेक्स त्याच्या घरी जायला निघालेला. रस्ता एकाकी, दाट झाडीतून जाणारा. रस्ता नव्हेच, जंगलातली एक मातीची, जरा रुंद अशी गाडीवाट. फोन वाजतो अन फोनवर हॉस्पिटलमधून त्याच्या वडिलांची डॉक्टर; त्याला त्यांच्या मृत्यूची बातमी कळवते.

नेमकी त्याचवेळेला, त्याचे वडील आपल्याच हॉस्पिटल मध्ये अ‍ॅडमिट होते हे कळल्याने कुतुहल चाळवलेली डॉक्टर केट हॉस्पिटलच्या जुन्या फायली काढुन अलेक्सच्या वडिलांचे रेकॉर्ड पहाते. त्यात अ‍ॅडमिशनच्या दुसर्‍याच दिवशी झालेला त्यांचा मृत्यू वाचुन ती हादरते. त्यांचं नुकतच प्रसिद्ध झालेले वास्तुशास्त्रावरचे पुस्तक ती गडबडीने खरेदी करुन अ‍ॅलेक्सला पाठववून देते. ती लिहिते, "अ‍ॅलेक्स हे पुस्तक अजून दोन वर्षांनी प्रसिद्ध होईल, पण मी ते तुला आज पाठवतेय कारण मला तुला कळवायचे आहे, तुझे वडील तुझ्यावर अतिशय प्रेम करत होते."

कालच तर अ‍ॅलेक्स, वडील अ‍ॅडमिट आहेत ऐकून हॉस्पिटलकडे धावला होता. नेहमीप्रमाणेच त्यांनी थंडपणाने तुला यायची गरज नव्हती मला काहीही झाले नाही म्हणून सांगितले होते. त्याची आई घराबाहेर पडली; तेंव्हाच ती मला मेली म्हणुन अगदी औपचारिकतेसाठीसुद्धा तिच्या दफनविधीला न येणारे त्याचे वडील फारसे जवळीक वाढवावी असे नव्हतेच. त्यांच्या मृत्यूने नक्की कश्याप्रकारे दु:ख व्यक्त करावे हे न समजून गोंधळलेला अ‍ॅलेक्स केट्ने पाठवलेल्या पुस्तकात त्याचा वडिलांबरोबरचा फोटो पहातो, अन छातीत दगड बनू पहाणारे त्याचे हृदय अश्रू रुपाने पाझरु लागते. हुंदके देऊन देऊन अ‍ॅलेक्स रडतो. निदान वडिलांच्या मायेचा एक पुरावा, त्याला आज जेंव्हा ते दुरावलेत, त्या वेळी मिळतो. एरवी २००६ मध्ये हे पुस्तक प्रकाशित होणारच होतं. पण आज २००४ मध्ये जेंव्हा त्याला अतिशय गरज होती तेंव्हा ते देण्याचा विचार फक्त एखादी जिवलग व्यक्तीच करु शकत होती, अन ती होती केट!

बरच गोंधळवणारं वाटलं ना? आपण आपल्या स्वतःच्या दु:खाव्यतिरिक्त आपल्या जिवलगाचे दु:खसुद्धा हलके करायचा मनापासून प्रयत्न करतो. पण काही दु:खे जी पुर्वाश्रमीची, काळाच्या पडद्याआड लपलेली, आपण जेथे पोहोचू शकत नाही अश्या ठिकाणी घडलेली, आपल्या कक्षेबाहेरची असतात. कधीतरी कातरवेळी हातात हात गुंफून गप्पा मारताना ही अशी दडलेली वेदना बाहेर येते अन क्षणभर वाटून जातं, हा काळाचा पडदा मध्ये नसता तर तेथे पोहोचून मी हे दु:ख हलकं करु शकेन का? हे आयुष्य नामक जिग सॉ चे तुकडे मला हवे तसे बसवू शकेन का?

मी वर वर्णिलेली एका मिनिटाची ही फ्रेम आहे "द लेक हाऊस" या चित्रपटातली. सारा चित्रपट तर वेधक आहेच, पण त्यातही जिवलगाच्या अतिशय कोवळ्या क्षणावेळी तेथे असावं या भावनेपोटी चित्रिलेला हा प्रसंग मला अतिशय भावला.
ही अर्थातच एक प्रेम कहाणी आहे. इतर प्रेम कहाण्यांप्रमाणे हळवी, गोंडस तर ही आहेच. पण यात खलनायकाची भुमिका बजावलेय काळाने. हो काळ! टाईम द ग्रेट!

सुरुवात होते तीच मुळी अ‍ॅलेक्स त्याच्या कुटुंबाच्या रिकाम्या पडलेल्या घरी येतो तेंव्हा. बालपणीच्या अनेक जुन्या आठवणी घेऊन, आईच्या मृत्युनंतर बर्‍याच वर्षांनी अ‍ॅलेक्स तेथे आला आहे. हे घर त्याच्या आर्किटेक्ट वडिलांनी खास त्याच्या आईसाठी बांधलेलं. अ‍ॅलेक्सच्या शब्दात सांगायचं तर या घरात त्याच्या आईने "घर" टिकवण्याचा संघर्ष केला. पण या घराच्या बांधणीनंतर त्याचे वडील एव्हढे मोठे आर्किटेक्ट झाले की त्यांच्याबरोबर त्यांचा भला मोठा इगो सोडून आणखी काहीही मावणे दुरापास्त झाले. आईने, दोन लहानगी मुले घेऊन घर सोडले. अन आज अ‍ॅलेक्स पुन्हा परतला आहे. त्याच्या मैत्रिणीला अ‍ॅलेक्स तेथे का रहायला जातोय हेच उमगत नाही; कारण त्या घराला प्रायव्हसी नावाची गोष्टच नाही. एका निवांत तळ्यावर उभारलेला तो शीशमहाल आहे. अगदी घरातल्या खोल्यांना सुद्धा काचांच्याच भिंती!

घराच्या साफसफाईत गुंतलेल्या अ‍ॅलेक्सला त्याच्या मेलबॉक्स मध्ये एक पत्र मिळते. त्या पत्रात एक व्यक्ती स्वतःची ओळख करुन देत अ‍ॅलेक्सला सांगते की मी त्या घराची आधीची भाडेकरु आहे. अन जर चुकून काही पत्रं या पत्त्यावर आली तर त्याने ती तिला पाठवण्याची कृपा करावी.

अ‍ॅलेक्स गोंधळून जातो. ते पत्र तो तसच सोडून घराच्या डागडुजीत व्यस्त होतो. पण मनाच्या कोपर्‍यात काही तरी खुपत रहातं. शेवटी न रहावून अ‍ॅलेक्स पुन्हा ते पत्र वाचतो अन त्या पत्रातल्या व्यक्तीला, केटला हा नक्की काय गोंधळ आहे ते विचारतो. कारण हे घर या आधी कधीही भाड्याने दिले गेले नाही. आता केट्ला जरा राग येतो अन ती त्याला खडसावून विचारते मी मागची दोन वर्षे त्या घरात काढली आहेत. २००४ ते २००६. आणि चुकून काही पत्रव्यवहार तिच्या नावे आला तर अ‍ॅलेक्सने तो तिला पाठवुन द्यावा. ती स्वतःचा पत्ता अन ती काम करत असलेले हॉस्पिटल यांचा उल्लेख त्या पत्रात करते. त्या बरोबरच ती लिहीते, की ती जेंव्हा त्या घरात रहायला आली तेंव्हा तेथील घराकडे नेणार्‍या लाकडी पुलावर पंजांचे ठसे उमटलेले होते. अ‍ॅलेक्स गोंधळतो कारण तेथे कोठेही पंजांचे ठसे नसतात. पण मग नंतर जेंव्हा तो काठावरुन घराकडे येणार्‍या लाकडी मार्गिकेच्या कठड्यांना रंग लावत असतो, तेंव्हा कुठुनशी एक लहानगी कुत्री धावत येते अन ती त्या रंगाच्या ट्रेमधून पळत जाऊन त्याच्या नजरेसमोर ते पंजांचे ठसे उमटवते.

अन अ‍ॅलेक्स आणखीच बुचकळ्यात पडतो. कारण तो स्वतः येथे आलाय ते या शहरात नवीन बांधकाम करायला. केटने दिलेला स्वतःचा पत्ता, अजून अस्तित्वात यायचा आहे. किंबहुना अ‍ॅलेक्सच त्या वास्तूचे बांधकाम करतो आहे. त्याच्या पत्रावर त्याने मजकुर लिहायच्या आधी टाकलेल्या तारखा दोन वर्षे आधीच्या पाहुन केटही गोंधळते. उत्तरादाखल लिहिलेले पत्र नेऊन अ‍ॅलेक्स मेलबॉक्स मध्ये टाकून परतत असताना मेल बॉक्स फ्लॅग डाऊन होतो अन अ‍ॅलेक्स आणखीच गोंधळतो. मग एका ठिकाणी उभे राहून एकाच मेल बॉक्स मध्ये दोघे पत्रांची देवाणघेवाण करत रहातात्....काळाच्या वेगवेगळ्या चौकटीतून!

आहे का नाही धम्माल? केट अ‍ॅलेक्सच्या दोन वर्षे पुढे जगत असते. एका प्रसंगात केट धुंवाधार पावसात रस्ता ओलांडायचा प्रयत्न करत असते अन नेमका त्याचवेळी अ‍ॅलेक्स एक झाडाचे रोपटे (यांची रोपटी सहा सात फुट उंच असतात हो) नेऊन एका नियोजित बिल्डीगच्या होर्डींग पुढे रोवतो. पावसात हातातल्या वस्तू सांडल्याने त्या गोळा करायला झुकलेल्या केटच्या डोक्यावर एकदम एक विशाल वृक्ष उभा रहातो. दोघे एकमेकांशी अगदी निवांत गप्पा मारत रहातात. चित्रपटात दाखवताना दोन वेगवेगळ्या फ्रेम्स मध्ये एकाच स्क्रीनवर हे दोघे बोलताना दाखवलेत, बरीच माहिती मिळते त्यांच्या या पत्रप्रपंचातून! अन हेच कारण असते की केटला अ‍ॅलेक्सचं एकटेपण, वडिलांचा दुरावा याची जाणीव असते. अ‍ॅलेक्सचा लहान भाऊ 'हेन्री वायलर' हा आईवडिलांच्या दुराव्यादरम्यान नकळत्या वयाचा असल्याने, आई वडिलांच्या नात्याचा त्याला फारसा विचार नाही, पण अ‍ॅलेक्स मात्र त्याच्या अगदी जवळचा. त्यामुळे हा काळाचा झालेला लोचा जेंव्हा अ‍ॅलेक्स त्याला सांगतो तेंव्हा अगदी धाकट्या भावाच्या अल्लडपणाने तो ते स्विकारतो.

या सगळ्यात कुठेही कंटाळवाणा असा प्रसंग येत नाही. एकदा खट्याळपणे केट अ‍ॅलेक्सला तू दोन वर्षे मागे आहेस ना? मग माझ्या वडिलांनी मला दिलेली एक भेट मी ट्रेन स्टेशनवर विसरले आहे ती आणुन दे म्हणून सांगते. त्या प्रमाणे अ‍ॅलेक्स तेथे जातो. तेथे एक तरुण जोडपे एकमेकांचा निरोप घेत उभे असते. त्यांच्या जवळिकीने थोडासा शरमून अ‍ॅलेक्स बाजूला उभा रहातो. त्यातली तरुणी गडबडीने आपली बॅग उचलुन ट्रेनकडे धावते अन तरुण वळून निघून जातो, सुटणार्‍या ट्रेनकडे पहाताना अ‍ॅलेक्सला तेथल्या बेंचवर Persuasion, हे पुस्तक मिळते. तो ट्रेन पाठी धावत सुटतो. ती तरुणी काही न उमजून त्याच्याकडे पहात रहाते अन शेवटी अ‍ॅलेक्स नुसता हात हलवून तिला निरोप देतो. ती असते केट. तिला पाह्यलाचा आनंद अ‍ॅलेक्सच्या मनात मावत नाही. मी योग्य वेळी तुला ते पुस्तक देईन असे अलेक्स सांगतो. (हे पुस्तक पुढे बर्‍याच काळाने आपल्या बॉयफ्रेंड बरोबर लेक हाऊसमध्ये शिफ्ट झाल्यावर केटला एका कंटाळवाण्या सांजेला मिळते, जेंव्हा तिने तू मला लिहायचे बंद कर अस अ‍ॅलेक्सला विनवलेले असते.)

एकदा ठरवून दोघेही शिकागोच्या सफरीवर निघतात. एका मॅपवर आपण या वेळेला या रस्त्याने जायचं असं लिहून अ‍ॅलेक्स तो मॅप तिला पाठवतो अन दोघे मिळून शिकागोची सफर करतात. समोर नसलेली पण मना-शरीराचा एक भाग असणार्‍या एखाद्या व्यक्तीकडे आपण ज्या पद्धतीने आकर्षित होतो तसेच काहीसे या कथेत घडत जातं. एकदा अचानक अ‍ॅलेक्स केटच्या बॉयफ्रेंडला भेटतो अन त्याच्याकडून कळल्याने त्या संध्याकाळी तिच्या वाढदिवसाच्या सरप्राईज पार्टीला हजर रहातो. त्याला माहीत असतं ती कोण आहे. ती...कोणत्याही रिलेशनशिप पासून दूर पळणारी...बॉयफ्रेंडच्या या अचानक हल्ल्याने गोंधळलेली...पार्टी सोडून दूर जाऊन बसते, अन अ‍ॅलेक्स तिला तिने Persuasion हे पुस्तक वाचलंय का विचारतो. नकळत तिचा इतिहास तिच्या तोंडी ऐकून तो तिला आपली ओळख देत नाही, कारण ती एका अनोळखी व्यक्तीकडे व्यक्त होत असते. नात्यात हे शक्य नसतं. त्या प्रसंगात दोघेही नकळत एकमेकांच्या चुंबनात गुंततात अन केटचा बॉयफ्रेंड तेथे उगवतो!

चित्रपट कोठेही रेंगाळत नाही. बरीचशी कहाणी डायलॉग्ज मधून उलगडत जाते. केट आणि अ‍ॅलेक्सच्या पत्रव्यवहारामधून होणार्‍या गप्पा एकाच स्क्रीनवर दोन वेगवेगळ्या फ्रेम्स मध्ये दाखवायचा प्रयत्न तर धमाल! दोघेही एकाच बेंचवर बसलेत, एकाच बिल्डिंगसमोर, पण काळाचा फरक. तिच्या समोरची वाहतुक, माणसांची वर्दळ वेगळी, जी अर्ध्या स्क्रीन पर्यंत येउन गायब होते, अन अर्ध्या स्क्रीनमधून नवीन माणसे, नवीन वाहतुक त्याच्या स्क्रीनवर पसरत जाते. दिग्दर्शक अलांद्रो अग्रेस्तीचे करावे तेव्हढे कौतुक कमी वाटते मला. या कहाणीचा मूळ स्त्रोत आहे एक साऊथ कोरियन चित्रपट 'मेअर'! हा चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला होता. (हो! उगा फक्त आमचे बॉलीवुडवालेच रिमेक काढतात असा गैरसमज नक्क्को!)

ही अशी रिलेशनशिप पासून पळणारी केट उभी केलीय बुलकांच्या सँड्राने. Speed मध्ये wild cat म्हणुन संबोधलेली, Miss congeniality मध्ये एक पोलिस ऑफिसर आणि धमाल The Proposal या चित्रपटात नायकाच्या आज्जी बरोबर तिचा बेभान नाच! या बाई बराचसा अभिनय डोळ्यांनी करतात. फार हातपाय हलवायची गरज पडत नाही यांना. अर्थात मला आवडतात! हा भावनेचा गुंताळा सहजपणे उभा केलाय केनु रिव्हजने. हो तोच तो, मॅट्रीक्सवाला, स्पीड मध्ये सँड्रा बाईंबरोबर असलेला, अन डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट मध्ये केव्हिन लोमॅक्सचं कॅरेक्टर जगलेला. अतिशय संयत अभिनय. बराच हँडसम दिसतो. या अश्या अफलातून कथेला दिग्दर्शन आहे अलेन्द्रो अग्रेस्तिंचे. जन्माने अर्जेंटेनियन असलेला असलेला हा युवक विशीच्या आतच एक अतिशय उमदा अन उभरता दिग्दर्शक म्हणून नावारुपाला आला. नेदरलँडसच्या चित्रपट जगतात हे नाव म्हणजे अगदी सुभाष घई, अथवा आजचे संजय लीला भन्साली म्हणावे लागेल. यांचे बरेच चित्रपट डच भाषेत आहेत, पण युरोपातल्या त्यांच्या नावाच्या दबदब्याच्या जोरावर ते हॉलिवुडमध्येही काम करतात. नशिबाने हॉलिवुडात वर्षाला एक चित्रपट काढावा लागत नाही यशस्वी म्हणवून घेण्यासाठी. असा एखादाच तरल चित्रपट त्यांचं नाव कोरुन जातो.

चित्रपट पुढे जाऊन बराच इंटरेस्टिंग होतो. खरंतर केट जे सुरुवातीला पहिलं पत्रं पाठवते, ते एका माणसाच्या अकाली मृत्यूची साक्षीदार झाल्याने. एका मॉल मध्ये बसलेल्या व्यक्तीचा केटच्या डोळ्यासमोर एक अपघात होतो, डॉक्टरच्या नात्याला जागून मदतीला धावलेल्या केटच्या हातात 'ती' दुर्दैवी व्यक्ती प्राण सोडते. त्याच्या मृत्युने हळहळणारं कोणी असेल की नाही? की तोही आपल्यासारखाच एकांडा असेल? आपण कोणाशीही कधीच कसे काय बांधले गेलो नाही? समजा कुणाला आपल्याबद्दल काही मित्रत्वाची, आपुलकीची भावना असेल अन जर आपल्या बदललेल्या पत्त्याने ती व्यक्ती आपल्यापर्यंत पोहोचू शकत नसेल तर काय? या विचाराने केट आपल्या पुर्वीच्या घराच्या मेल बॉक्स मध्ये आपला रेफरन्स ठेवते, अन कहाणीला सुरूवात होते. ती केटच्या हातात मरणारी व्यक्ती कोण हे जर जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच पहा हा चित्रपट "द लेक हाऊस".

दिवाळी अंक २०१३

प्रतिक्रिया

जुइ's picture

2 Nov 2013 - 2:58 am | जुइ

परीचय दिला आहे. पाहण्यात येईल.

कवितानागेश's picture

2 Nov 2013 - 12:01 pm | कवितानागेश

४ वेळा पाहिलाय. :)
... कदाचित परत बघेन.

पैसा's picture

2 Nov 2013 - 12:38 pm | पैसा

सँड्रा बुलॉकसाठी बघावा असं वाटतंय. पण ही काळाला पडलेल्या निरगाठीची गोष्ट कमालीची वेधक वाटते आहे.

मुक्त विहारि's picture

2 Nov 2013 - 9:04 pm | मुक्त विहारि

सुंदर ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद

प्यारे१'s picture

2 Nov 2013 - 11:29 pm | प्यारे१

उत्तम परिचय.

परत एकदा सावकाश लेख वाचून चित्रपट बघेन.

यशोधरा's picture

3 Nov 2013 - 1:29 pm | यशोधरा

मस्त ओळख करुन दिली आहेस.

अनन्न्या's picture

3 Nov 2013 - 4:28 pm | अनन्न्या

कथा नेमक्या शब्दात उलगडते आहे. अजून पूर्ण वाचली नाहीय.

दिपोटी's picture

5 Nov 2013 - 1:19 pm | दिपोटी

वेगळं कथानक आहे. परिचयाबद्दल धन्यवाद!

जमेल तेव्हा चित्रपट पाहीनच.

- दिपोटी

आतिवास's picture

9 Nov 2013 - 8:19 am | आतिवास

थोडा गोंधळ झाला माझा हे वाचताना.
बघू, जमेल तेव्हा चित्रपट पाहीन आणि मग पुन्हा हे वाचून बघेन :-)

अजया's picture

9 Nov 2013 - 9:51 pm | अजया

नक्की बघणार.

सतरंगी_रे's picture

29 Jan 2014 - 10:34 am | सतरंगी_रे

भाषा : कोरियन

http://www.youtube.com/watch?v=NUqzc67nda4

कथानकात थोडा(साच) बदल आहे, पण प्रेरणास्रोत नक्कीच !

रुपी's picture

18 Aug 2017 - 11:11 pm | रुपी

छान ओळख!
माझाही थोडा गोंधळ झालाय वाचताना. कधी पाहायला मिळाला तर नक्कीच बघेन.