मोघेकाकू..!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
15 Jul 2008 - 6:12 pm

"अहो कितीची गाडी आहे रात्री? नऊची ना? मग इथेच या की सगळे! उगाच घरी कशाला स्वयंपाक करत बसता? सामानसुमान बांधून तयार ठेवा, इथेच जेवा आणि निघा."

"छे! अहो त्यात कसला आलाय त्रास? आणि ५-६ मंडळींच्या आमटीभाताला असा कितीसा वेळ लागणार आहे? केव्हाच होईल! या या, नक्की या हां!"

मोघेकाकू चा़ळीतल्या कुणाला तरी आग्रह करत असतात. त्यांचा आग्रह इतका मनापासून असतो की सहसा तो कुणाला मोडवत नाही. ठरल्याप्रमाणे ती कोण ती ५-६ मंडळी रात्री मोघेकाकूंकडेच जेवायला येतात. साधा आमटीभात, मटकीची उसळ, गरमागरम पोळ्या. कोशिंबीर, गोडाचा शिरा, उगाच कुठे चवीला चार कुरडया अन् तळलेली सांडगी मिरची असा फस्क्लास बेत मोघेकाकू केव्हाच तयार ठेवतात!

मोघेकाकू!

आमच्या चाळीतलं एक केवळ निरागस म्हणावं असं, भाबडं, अत्यंत हौशी, कष्टाळू आणि अजातशत्रू व्यक्तिमत्व! गिरणी कामगारांच्या संपात नवरा घरी बसला आणि हिंमत हारून, हाय खाऊन तीन लहानग्यांना मागे ठेवून अकाली वारला. मोघेकाकू जेमतेम सातवी-आठवी शिकलेल्या! पण बाई मोठी कष्टाळू, हिंमतीची अन् बहाद्दर! हाताला चव होती. पोळीभाजीचे डबे, चिवडा, चकल्या इत्यादी फराळाचे पदार्थ, पापड, कुरडया, असे नानाविध पदार्थ करून ओळखीपाळखीत विकू लागली. पदार्थ उत्तम असल्यामुळे वरचेवर ऑर्डरी मिळत गेल्या, त्यामुळे त्या उत्पन्नात स्वत: व तीन मुलं यांचं भागू लागलं. मुलांचं शिक्षण देखील अडलं नाही. वाट्टेल तितके कष्ट करण्याची बाईची तयारी होती आणि तिने ते केलेही! पदरात दोन मुलं अन् एक मुलगी होता. मुलंही आईसारखीच गुणी व कष्टाळू. भराभर शिकली, काहीबाही उद्योग करून आपापल्या पायावर उभं राहण्याइतकी मोठी झाली.

राधाबाई नावाच्या कुणी बाई विविध पाककृती करण्याकरता मोघेकाकूंना मदतीला येत. ठराविक रोजीवर मोघेकाकूं त्यांच्याकडून पदार्थ बनवायला, तयारीला, निवडण्या-कांडण्याकरता बारीकसारीक मदत घेत. राधाबाईही तश्या गरजूच होत्या, चार पैसे त्यांनाही मिळत! पण स्वत: मोघेकाकूंचाच कामाचा आवाका जबरदस्त होता. आणि एवढं सगळं करून चेहेरा नेहमी हसतमुख. कधी चिडचिड नाही की चेहेर्‍यावर सुरकुती नाही! आहे त्या परिस्थितीत समाधानी राहून पुन्हा लोकांना मदत करायला उत्साहाने तयार! चाळीत कुणाहीकडे काही कार्य निघालं की मोघेकाकू या हव्यातच!

मोघेकाकूंच्या दोन घरं सोडून नाना आठवल्यांचं घर. नाना आता खूप थकलेले. तसे आजारी-आजारीच असत. एकदा केव्हातरी नानांचा मुलगा ऑफिसच्या कुठल्याश्या परिक्षेला बाहेरगावी जायचा होता. सूनबाईला काही जरुरी कामानिमित्त पुण्याला आईकडे जावं लागणार होतं. मग आजारी नानांकडे बघणार कोण? पण चाळीतल्या लोकांना मोघेकाकू असल्यामुळे असले प्रश्न कधीच पडले नाहीत!

"अरे अरविंदा, तू खुश्शाल जा हैद्राबादला. आणि माधवी दोनच दिवसांकरता तर पुण्याला जायची आहे. नानांकडे बघायला मी नाहीये का? तुम्ही जा बेलाशक, नानांना औषधं आणि जेवण मी नाही का द्यायची?"

मोघेकाकूंनी दोन मिनिटातच हा प्रश्न चुटकीसरशी सोडवला. अरविंदा आणि माधवी मोघेकाकूंवर घर आणि नानांना सोपवून निर्धास्त घराबाहेर पडले. मोघेकाकूंनी आता नानांचा आणि आठवल्यांच्या घराचा ताबा घेतला.

"नाना, मी इथे पाण्याचं तांब्याभांड ठेवत्ये. काही लागलं तर आहे मी इथेच. येऊन जाईन मधनंमधनं! आमच्या गंप्याला इथेच अभ्यासाला बसवते! जरा वेळाने मी औषध द्यायला येईन. जेवण काय करू? मऊभात चालेल की थोडी मुगाच्या डाळीची खिचडी करून आणू?"

काही वेळाने मोघेकाकू औषध द्यायला गेल्या तर नानांना तिथे गादीतच उलटी झाली. सगळं औषध ओकून पडलं!

"होऊ दे, होऊ दे नाना. काही काळजी करू नका!" असं म्हणन मोघेकाकूं ओकणार्‍या नानांच्या पाठीवरून हात फिरवत होत्या.
"पुन्हा काही वाटलं तर आपण डॉक्टरना बोलावू हं! आम्ही सगळे आहोत चाळीत. काही काळजी करू नका! अहो, इतक्या वर्षांचा शेजार आपला, आम्ही कुणी परके का आहोत? आता जरा बरं वाटतंय का?"

असं म्हणून मोघेकाकूंनी सगळी उलटी साफ केली, चादर बदलली! वर पुन्हा, "अहो कालच आल्याच्या छान वड्या केल्या आहेत. दुकानांची नेहमीची ऑर्डर होती. थोडी आल्याची वडी आणत्ये, ती खा म्हण़जे अंमळ बरं वाटेल हां! "

आजारी, थकलेल्या नानांच्या डोळ्यात फक्त कृतज्ञता होती!

"अरे तात्या, इकडे ये रे जरा!"

मोघेकाकूंनी चाळीत कुणालाही हक्काने हाक मारावी, त्यांचा तो अधिकार होता. त्यांनी तसं प्रत्येकाचं कोडकौतुकाने केलंही होतं प्रेमाने!

"काय काकू?"

"अरे, पुढच्या दोनचार दिवसात माझे पोष्टात ठेवलेले दहा हजार रुपये सुटताहेत बघ! त्याचं काय करावं म्हंणतोस? पुन्हा कुठे गुंतवावेत?"

मी काकूंचा अर्थिक सल्लागार होतो.

"सांगतो काकू तुम्हाला एकदोन दिवसात. काही चांगल्या स्कीमस आहेत!"

"सांग बाबा! हो, पण या वेळेला पुन्हा सगळे नाही हो मी गुंतवायची! थोडे ठेवणार आहे मला हाताशी!"
चेहेर्‍यावर मिश्किल छटा होती. स्वत:वरच खुश दिसत होत्या!

"का हो काकू? काय खर्च काढलात?" मीही तेवढ्याच मिश्किलतेनी विचारलं!

"अरे काही नाही रे, आमच्या राधाबाईंच्या सुमनचं लग्न ठरलंय. राधाबाईंनी नशीब काढलं हो! जावई चांगला मिळालाय म्हणत होत्या. माझ्याकडे गेली तीन-चार वर्ष मदतीला येताहेत, त्यांना आणि त्यांच्या मुलीला मी घरी जेवायला बोलावून केळवण करणार आहे. साडीचोळी, आहेराचंही थोडंफार काही देईन म्हणत्ये! मग त्याकरता पैसे नकोत का?!"

मी थक्क होऊन फक्त ऐकत होतो. याला म्हणायचं हौस! याला म्हणायचं आनंदाने जगणं, दुसर्‍याच्या आनंदात स्वत:चा आनंद शोधणं! खासच होत्या आमच्या मोघेकाकू!

उंचीने थोड्या बुटक्या, अंमळ स्थूल, गोल चेहेर्‍याच्या, दात पुढे असलेल्या, मोठ्ठ्या आवाजाच्या मोघेकाकू रंगारुपानं म्हणाल तर दिसायला जेमतेमच होत्या. परंतु त्यांचं ओव्हरऑल व्यक्तिमत्व, वागणं नेहमी इतकं छान नी मनमोकळं असायचं की त्या सुरेखच दिसायच्या! या बाईच्या मनात विष नावाचा प्रकार कधी आलाच नाही, कुणाबद्दलही नाही, कधीही नाही! आपण बरं, आपले कष्ट बरे! परिस्थितीविषयी तक्रार नाही की कधी कुठलं रडगाणं नाही. वर शिवाय, 'अहो त्यात काय एवढं? मी करीन की!', 'त्यात कसले आलेत कष्ट, मी करीन की!' असं म्हणून सदैव लोकांना मदत करायला तयार! मोघेकाकू चाळीतल्या प्रत्येकच कुटुंबाच्या कधी ना कधी उपयोगी पडलेल्या! आणि एवढं करूनही कधी केलेल्या मदतीचा एका शब्दाने उच्चार नाही की अहंकार नाही! त्यांच्या जीवनगाण्यात 'पुण्यपर उपकार' हेच शब्द होते, 'पाप ते परपीडा' या शब्दांना तिथे स्थान नव्हतं! चाळीत कुणाकडेही मृत्यु झाला की पिठलंभाताचा कडूघास हा मोघेकाकूंनीच द्यायचा, असा जणू अलिखित नियमच होता! चाळीतल्या प्रत्येक सुखा-दु:खात मोघेकाकूंचा काहितरी ठळक सहभाग असायचा, ठसा असायचा!

"तात्या, पटकन जरा इकडे ये!"

"काय काकू?"

"अरे आधीच खूप उशीर झालाय. ह्या उपम्याची चव बघ आणि कसा झालाय ते सांग मला पटकन! मला बघता येणार नाही, संकष्टी आहे आज माझी!"

जवळच कुठेसं एक १५-२० खाटांचं हॉस्पिटल होतं, तेथील रुग्णांना सकाळचा उपमा करून देण्याचं कॉन्ट्रॅक्ट सातपुते डॉक्टरांनी मोघेकाकूंनाच दिलं होतं. मोघेकाकू आता घाईघाईने आणि लगबगीने ताजा आणि गरमगरम उपमा घेऊन हॉस्पिटलात चालल्या होत्या!

"ठीक आहे ना रे चव? नाही, आपण चार पैसे घेतो म्हटल्यावर माल नीट नको का द्यायला? अरे त्यातून ती आजारी माणसं! थांब, हा मोतीचुराचा लाडू खा, मी निघत्ये आता. नाहीतर 'मोघेकाकूंनी फक्त उपम्याची चव घेण्याकरता बोलावलं, असं म्हणशील!'" असं म्हणून मनमोकळेपणाने हासत माझ्या पाठीत एक धपाटा मारला!

मी प्रेमातच होतो या बाईच्या! मी काय, आख्खी चाळच होती!

"अरे हो हो, भेळ तयार तर होऊ दे मेल्यांनो! अजून सगळी नीट मिक्स करायची आहे मला तर आधीच हात घालून लागले खायला!"

मोघेकाकूंनी चाळीतल्या आम्हा सगळ्या पोराटोरांना, टोणग्यांना दम भरला. त्या दिवशी होळी होती. होळी म्हटलं की चाळीत एकच धमाल असायची! गेली अनेक वर्ष त्या दिवशी चाळीत भेळ अन् मसालादुधाचा मेनू ठरलेला. ते कराण्याचं कॉन्ट्रॅक्ट अर्थातच मोघेकाकूंकडे! चाळीतली पोरंटोरं, बालगोपाळ मंडळी, तरणी मंडळी आता होळी पेटवायच्या तयारीत. आमच्या मोघेकाकू नेहमीप्रमाणे एकदम फार्मात! होळीची पूजा, तिला पुरणपोळीचा नेवैद्य हे सगळं सगळं मोघेकाकू करणार आणि सबंध चाळ त्यात सहभागी होणार! मोघेकाकू आमच्या म्होरक्या!

पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. छातीत दुखू लागलं, कळ आल्याचं निमित्त झालं आणि मोघेकाकू कोणताही गाजावाजा न करता, अगदे शांतपणे देवाघरी गेल्या! एकंदरीत पाच मिनिटात सगळा कारभार आटपला. एक कृतार्थ, कष्टाळू, परोपकारी जीवन आता संपलं होतं. चाळीचा आधारवृक्षच कोलमडला होता, चाळ पोरकी झाली होती! जगाच्या दृष्टीने म्हटलं तर एका चाळीतली एक सामान्य बाई, पण आमच्याकरता मात्र तेवढीच असामान्य! तिच्यातलं असामन्यत्व आम्ही वेळोवेळी पाहिलं होतं, अनुभवलं होतं!

त्या रात्री होळी पेटली ती मोघेकाकूंच्या चितेची! आता कुणाला हातावर पटकन बेसनाची वडी मिळणार नव्हती की मोतीचुराचा लाडू मिळणार नव्हता! नाना आठवल्यांना कुठल्याही औषधापेक्षा गुणकारी ठरणारी मायेची, आपुलकीची आल्याची वडी मिळणार नव्हती! सांत्वन तरी कोण कुणाचं करणार आणि पिठलंभाताचा कडूघास तरी कोण कुणाला देणार? चाळीतल्या प्रत्येकच घरात मृत्यु झाला होता जणू काही!

-- तात्या अभ्यंकर.

वाङ्मयप्रतिभा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

15 Jul 2008 - 6:25 pm | प्राजु

त्या रात्री होळी पेटली ती मोघेकाकूंच्या चितेची! आता कुणाला हातावर पटकन बेसनाची वडी मिळणार नव्हती की मोतीचुराचा लाडू मिळणार नव्हता! नाना आठवल्यांना कुठल्याही औषधापेक्षा गुणकारी ठरणारी मायेची, आपुलकीची आल्याची वडी मिळणार नव्हती! सांत्वन तरी कोण कुणाचं करणार आणि पिठलंभाताचा कडूघास तरी कोण कुणाला देणार? चाळीतल्या प्रत्येकच घरात मृत्यु झाला होता जणू काही!

वा तात्या... अतिशय सुंदर. हा शेवटचा पॅरा सुन्न करून गेला. खूप छान लिहिलं आहे तुम्ही.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
आवांतर : व्यक्तीचित्र कशाशी खातात हे प्राजूला दाखवतो या इराद्याने ताबडतोब पोस्ट नाहीना केलं?? (ह्.घ्या.)

साती's picture

15 Jul 2008 - 6:34 pm | साती

व्यक्तीचित्र छान रंगवले आहे.

साती

विकास's picture

15 Jul 2008 - 6:42 pm | विकास

सुंदर व्यक्तिचित्र रंगवले आहे.

"शेजार"आणि "घरोबा" या शब्दांशी निगडीत अनेक आठवणी मनात जाग्या झाल्या....

सहज's picture

15 Jul 2008 - 7:01 pm | सहज

सुंदर व्यक्तिचित्र रंगवले आहे.

वरदा's picture

15 Jul 2008 - 6:43 pm | वरदा

डोळ्यात पाणी आलं एकदम...
अरे काही नाही रे, आमच्या राधाबाईंच्या सुमनचं लग्न ठरलंय. राधाबाईंनी नशीब काढलं हो! जावई चांगला मिळालाय म्हणत होत्या. माझ्याकडे गेली तीन-चार वर्ष मदतीला येताहेत, त्यांना आणि त्यांच्या मुलीला मी घरी जेवायला बोलावून केळवण करणार आहे. साडीचोळी, आहेराचंही थोडंफार काही देईन म्हणत्ये! मग त्याकरता पैसे नकोत का?!"

खरच किती चांगले विचार्....खूप शिकण्यासारखं आहे ह्यांच्याकडून....

"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

राधा's picture

15 Jul 2008 - 6:56 pm | राधा

छान लिहिलत्........मोघेकाकुंच अस जाणं मनाला चटका लाउन जात.........

यशोधरा's picture

15 Jul 2008 - 6:58 pm | यशोधरा

खूप छान जमलय व्यक्तीचित्र तात्या.

मेघना भुस्कुटे's picture

16 Jul 2008 - 7:09 am | मेघना भुस्कुटे

एकदम मस्त जमलंय व्यक्तिचित्र तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

15 Jul 2008 - 7:02 pm | प्रकाश घाटपांडे

तात्याची व्यक्तिचित्र जीवाला चटका लाउन जातात.
प्रकाश घाटपांडे

ऋषिकेश's picture

16 Jul 2008 - 11:16 am | ऋषिकेश

तात्याची व्यक्तिचित्र जीवाला चटका लाउन जातात

१००% सहमत
थेट भिडलं तात्या तुमचं हे चित्रण
.
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

मनस्वी's picture

15 Jul 2008 - 7:05 pm | मनस्वी

आज अशी माणसे बघायला मिळणे दुर्मिळच.. त्यांचा सहवास तर दूरची गोष्ट.

परंतु त्यांचं ओव्हरऑल व्यक्तिमत्व, वागणं नेहमी इतकं छान नी मनमोकळं असायचं की त्या सुरेखच दिसायच्या!

आम्ही सगळे आहोत चाळीत. काही काळजी करू नका! अहो, इतक्या वर्षांचा शेजार आपला, आम्ही कुणी परके का आहोत? आता जरा बरं वाटतंय का?

मोघेकाकू कोणताही गाजावाजा न करता, अगदे शांतपणे देवाघरी गेल्या!

दुसर्‍यांच्या मदतीला धावून जाणार्‍या, प्रेमळ अन् निरागस मोघेकाकूंना देवही अलगद काही त्रास न होउ देता घेउन गेला!

आवडल्या मोघेकाकू!

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

प्रियाली's picture

15 Jul 2008 - 7:05 pm | प्रियाली

नेहमीसारखंच फर्मास जमलंय व्यक्तिचित्र. सामान्य माणसांतला असामान्यपणा अशा दिलखुलास व्यक्तिचित्रांनीही खुलतो असं वाटतं.

मोघेकाकूंना चांगला मृत्यू आला.

विद्याधर३१'s picture

15 Jul 2008 - 7:07 pm | विद्याधर३१

तुम्ही होम पीचवर असताना लेख रंगला नसता तरच नवल होते.
व्यक्तिचित्रे रंगवण्याची खसियत आवडली. लेख वाचताना स्वत: तेथे असल्याचा भास झाला.
यातच सर्व काही आले.
आपला
(वाचक)विद्याधर

अवांतर: गटण्याचा लेख कधी पाडताय? :W

आनंदयात्री's picture

15 Jul 2008 - 7:08 pm | आनंदयात्री

तात्या श्टाईल व्यक्तीचित्र .. छान लिहलय तात्या, नेहमीप्रमाणे आवडले.

नंदन's picture

16 Jul 2008 - 12:28 am | नंदन

आहे. व्यक्तिचित्र आवडले.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

डोमकावळा's picture

15 Jul 2008 - 7:18 pm | डोमकावळा

एकदम आवडलं तात्या....
छानच...

मुक्तसुनीत's picture

15 Jul 2008 - 7:26 pm | मुक्तसुनीत

...तुमचे व्यक्तिचित्र वाचून असेच म्हणावेसे वाटते. त्यांना कधी आपल्या "मिशन" बद्दल प्रश्न पडले नसतीलच. अशी माणसांचे आयुष्य हेच एक मिशन असते.

तात्या , पुन्हा एकदा धन्यवाद ! लिखाण खूप आवडले. (तुमची बिल्डींग पहावीशी वाटते आहे !) :-)

सर्किट's picture

15 Jul 2008 - 11:07 pm | सर्किट (not verified)

..तुमचे व्यक्तिचित्र वाचून असेच म्हणावेसे वाटते. त्यांना कधी आपल्या "मिशन" बद्दल प्रश्न पडले नसतीलच. अशी माणसांचे आयुष्य हेच एक मिशन असते.

अगदी बरोबर !

सुंदर चित्रण, तात्या.

- सर्किट

चतुरंग's picture

15 Jul 2008 - 7:27 pm | चतुरंग

मोतीचुराचा लाडूच होता! :) (अगदी मोघेकाकूंनी केल्यासारखा वाटला!)
सर्वसामान्य माणसांकडे एका वेगळ्याच नजरेने तुम्ही बघू शकता आणि मुख्य म्हणजे जे काय भावलं आहे ते शब्दात मांडू शकता हे पुन्हा एकदा सिद्ध केलंत!
जियो!!
(स्वगत - एवढं चांगलं लिखाण मिपावर भरभरुन येत असताना हा तात्या ट्रॅफिक जॅमची काळजी का करतो? :W )
चतुरंग

शिप्रा's picture

15 Jul 2008 - 7:38 pm | शिप्रा

मस्त लिहिले आहे..तात्या...असे वाटले ह्या फ्लॅट संस्क्रुतीतुन बाहेर पडुन परत चाळीत किंवा पुण्याचा वाडा संस्क्रुतीत जावे..जिथे पैश्यापेक्षा माणुसकीला महत्व होते...

जिथे कमी तिथे आम्ही ..:)

मदनबाण's picture

15 Jul 2008 - 8:00 pm | मदनबाण

अगदी सुंदर लिहलय तुम्ही तात्या..

मदनबाण.....

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Jul 2008 - 8:03 pm | बिपिन कार्यकर्ते

मोघे काकू छानच. इतकं सुंदर जीवन आणि त्याहूनही सुंदर मरण, भाग्यवान होत्या.

बिपिन.

अभिज्ञ's picture

15 Jul 2008 - 8:07 pm | अभिज्ञ

अतिशय सुंदर व्यक्तिचित्रण.
खास संग्रहि ठेवावा असा लेख!
अभिनंदन.

अभिज्ञ.

केशवसुमार's picture

15 Jul 2008 - 8:49 pm | केशवसुमार

तात्याशेठ,
व्यक्तीचित्रांची भट्टी बाकी तुम्हाला बेष्ट जमते यात वाद नाही..
नेहमी प्रमाणेच सुंदर लेख..
(वल्ली)केशवसुमार
स्वगतः साले हे लेखक व्यक्तीचित्राचा शेवट नेहमी दु:खीच का करतात? :/

वरदा's picture

15 Jul 2008 - 10:34 pm | वरदा

व्यक्तीचित्राचं विडंबन म्हणून हसता विनोदी शेवट असणारं एखादं व्यक्तिचित्र लिहाच केसु...:))))
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

llपुण्याचे पेशवेll's picture

15 Jul 2008 - 9:03 pm | llपुण्याचे पेशवेll

अशा मोघेकाकू मला वाटते प्रत्येक चाळीत किंवा वाड्यात असतातच. तात्याची वर्णनशैलीही अगदीच खास.

आमच्या वाड्यात पण आहेत अशा एक काकू, वाड्यात त्याना सगळे 'विनयच्या आई' म्हणतात. खरोखर अजातशत्रू व्यक्तिमत्व असतात.
वाडा गेला ओनरशिप घरे आली पण या नवीन 'दार'बंद संस्कृतीतही 'विनयच्या आईंचे दार कोणाच्याही मदतीसाठी सताड उघडे असते. त्यांचे यजमान त्याना दादा म्हणतात ते म्हणजे तर अगदी प्रेमळ व्यक्तिमत्व. तात्या खरोखर तुझ्यामुळे आठवण झाली बघ त्यांची.

पुण्याचे पेशवे

डॉ.प्रसाद दाढे's picture

15 Jul 2008 - 9:32 pm | डॉ.प्रसाद दाढे

अशी माणसे फक्त जुन्या चाळीतच पाह्यला मिळायची. आत्ताच्या फ्लॅट स॑स्कृतीत फारच अवघड आहे. शिवाय मदत करायला गेल॑ तर चो॑बडेपणा वाटण्याची शक्यता अधिक! प्रायव्हसी डिस्टर्ब होते ना!
तात्या, कालच सई परा॑जपे॑चा 'कथा' चित्रपट (कितव्या॑दा कुणास ठाऊक) पाहात होतो. त्यातला राजाराम (नसिरूद्दिन शाह) अगदी तुमच्या मोघेकाकू॑सारखा आहे!

कोलबेर's picture

15 Jul 2008 - 9:35 pm | कोलबेर

व्यक्तिचित्र आवडले...
खास तात्या टच!

बेसनलाडू's picture

15 Jul 2008 - 10:27 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू
शेवटचे वाक्य तर फारच टोचले.
(भावुक)बेसनलाडू

भाग्यश्री's picture

15 Jul 2008 - 10:21 pm | भाग्यश्री

मोघेकाकू खूप आवडल्या! :)

तात्या ,
मोघे काकुचा सहवास तुम्हाला लाभला हे खुप छान आहे,
अशी लोक फार कमी असतात जी सदैव दुसर्याच्या मदतीला धावुन येतात आणि स्वत:च्या दुखाचा बाऊ न करता इतराच्या सुखात , आनदात रमतात.
पण खरच मरण ही खुप छान आले
पण त्याना अजुन आयुष्य लाभले असते तर बरे झाले असते असे वाटते.

पिवळा डांबिस's picture

15 Jul 2008 - 11:32 pm | पिवळा डांबिस

आता आणखी काही जास्त लिहून डोह डुचमळवत नाही....
-पिडा

संदीप चित्रे's picture

16 Jul 2008 - 1:01 am | संदीप चित्रे

>> याला म्हणायचं आनंदाने जगणं, दुसर्‍याच्या आनंदात स्वत:चा आनंद शोधणं!
क्या बात है तात्या ! तू व्यक्तिचित्रण लिहितोस तेव्हा असं असं वाटतं की ती व्यक्ती आपल्याही खूप ओळखीची आहे.
--------
ईश्वर मोघेकाकूंच्या प्रेमळ आत्म्यास शांती देवो !

--------------------------
www.atakmatak.blogspot.com

अरुण मनोहर's picture

16 Jul 2008 - 7:44 am | अरुण मनोहर

व्यक्तीचित्र खूप छान लिहीले आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jul 2008 - 7:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोघेकाकूंचं व्यक्तिचित्र आवडले, संपुर्ण लेखन वाचतांना मोघेकाकू डोळ्यासमोर वावरत होत्या, त्यांची लगबग दिसत होती.
आणि शेवटचा प्रवास मात्र अगदी शांत, जीवाला हळहळ करायला लावणारा !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अमोल केळकर's picture

16 Jul 2008 - 9:53 am | अमोल केळकर

मस्त व्यक्तिचित्र.
आमची आजची पिढी नक्किच दुर्दैवी ज्यांना चाळीतील एकोपा, मोठ्या माणसांचे मार्गदर्शन , दुसर्‍यांना मदत करण्याची , त्यांच्या अडीअडचणींना धावुन जाण्याची वृत्ती अनुभवायला नाही मिळाली

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

श्रीयुत संतोष जोशी's picture

16 Jul 2008 - 10:18 am | श्रीयुत संतोष जोशी

नमस्कार,
वाह तात्या छान .

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

श्रीकृष्ण सामंत's picture

16 Jul 2008 - 11:04 am | श्रीकृष्ण सामंत

तात्याराव,
आपल्याला मानलं.सुरवाती पासून शेवट पर्यंत मन लावून वाचलं.खूप आवडलं
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

छोटा डॉन's picture

16 Jul 2008 - 1:08 pm | छोटा डॉन

सामान्यांचे असामान्यत्व एका सामान्याच्या नजरेतुन टिपण्याचे "आख्यान" उत्तम जमले आहे ...
रोजच्ज्या व्यवहारात आपण अशी अनेक माणसे पाहतो , त्यांच्याशी व्यवहार करतो पण कधीतरीच त्यांच्यातले "असामान्यत्व" आपल्या लक्षात येते.

गावाकडे अशी खुप माणसे पाहिली लहानपणी, त्यांच्या आठवणी आजही येतात ...
त्यांनी दिलेल्या "प्रेमाची आठवण" म्हणुन असा लेख लिहणे यातच त्याची थोडीशी का होईन "परतफेड" होय ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

ईश्वरी's picture

16 Jul 2008 - 1:41 pm | ईश्वरी

सुंदर व्यक्तिचित्रण रंगवले आहे, तात्या. मोघेकाकू डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. शेवट चटका लावून गेला.
ईश्वरी

नारदाचार्य's picture

16 Jul 2008 - 5:26 pm | नारदाचार्य

व्यक्तिचित्र. सुरवात 'नारायण'चा भास करून देणारी. पण...
होळी? "त्या रात्री होळी पेटली..." हे काय लिहून गेलात विसोबा? पटलं नाही. अजिबात नाही. मोघेकाकूंच्या चितेची होळी? काही तरी गडबड आहे. एक तर आमच्या आकलनात किंवा लेखनात तरी. होळी अमंगलाची करतात ही धारणा चुकीची असेल तर लेखन बरोबर आहे. ही धारणा बरोबर असेल तर मोघेकाकूंच्या चितेची होळी होऊ शकत नाही. आमचं चुकत असेल तर आधीच शब्द मागं घेऊन ठेवतोय.

झकासराव's picture

16 Jul 2008 - 7:20 pm | झकासराव

नेहमीप्रमाणेच बेष्ट.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

विसोबा खेचर's picture

17 Jul 2008 - 9:10 am | विसोबा खेचर

आपुलकीने प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकवरांचे मन:पूर्वक आभार...

आपला,
(कृतज्ञ) तात्या.

सुचेल तसं's picture

17 Jul 2008 - 9:18 am | सुचेल तसं

तात्या,
जबरदस्त हा एकच शब्द तुमच्या हया लेखाला योग्य ठरेल. जाताना जीवाला अगदी चटका लाऊन गेल्या मोघेकाकू.
http://sucheltas.blogspot.com

प्रभाकर पेठकर's picture

17 Jul 2008 - 10:51 pm | प्रभाकर पेठकर

त्या रात्री होळी पेटली ती मोघेकाकूंच्या चितेची!

नारदाचार्यांशी सहमत.

चाळीतल्या प्रत्येकच घरात मृत्यु झाला होता जणू काही!

मन सुन्न करून गेले हे वाक्य.

मनाला स्पर्ष करणारे लिखाण. अभिनंदन तात्या. अशा व्यक्तींचा सहवास, त्यांच्या आठवणीत रमण्याचे भाग्य तुम्हाला लाभले, नशिबवान आहात.

विसोबा खेचर's picture

18 Jul 2008 - 9:31 am | विसोबा खेचर

सुचेल तसं, प्रभाकरशेठ,

आपले मनापासून आभार...

या असभ्य, असंस्कृत, व शिवराळ माणसाने केलेले वेडेवाकडे लेखन आपल्या सगळ्यांनी वाचले व कौतुक केले त्याबद्दल सर्वांचेच पुनश्च एकदा आभार...!

असो,

तात्या.

शिंगाड्या's picture

18 Jul 2008 - 1:33 pm | शिंगाड्या

अप्रतीम व्यक्तिमत्व..अन तेव्हढ्याच ताकदीचे लेखन...

अवांतरः २,४ दिवसांपसुन वमिसळपाववर चाललेल्या 'ऐतिहासिक' लेखनानंतर आलेला हा लेख फार सुखवुन गेला!
वळीवाच्या पावसानंतचे निरभ्र आकाशासारखा!!

स्वाती दिनेश's picture

18 Jul 2008 - 1:40 pm | स्वाती दिनेश

मोघेकाकू आवडल्या तात्या,
डोळे पाणावले.
स्वाती

आंबोळी's picture

18 Jul 2008 - 5:25 pm | आंबोळी

लगबगीत असलेल्या मोघे काकू थेट डोळ्यासमोर उभ्या केल्यात तात्या. सुंदर.

आंबोळी

विसोबा खेचर's picture

18 Jul 2008 - 5:29 pm | विसोबा खेचर

शिंगाड्या, स्वाती आणि कंदिलराव,

सर्वांना धन्यवाद...

तात्या.