चौकट

मिसळपाव's picture
मिसळपाव in जनातलं, मनातलं
11 Jul 2008 - 6:06 am

भर दुपारी मी स्टेशनकडे झपाझप चाललो होतो. ऊन तर होतंच पण त्याहीपेक्षा कधी एकदा कॉलेज पहातो याची ऊत्सुकता जास्त होती. तब्बल पंधरा वर्षानी मी परत 'कॉलेज्ला चाल्लो' होतो! ऐन उमेदिची पाच वर्षे मी तेथे काढली. मग पुढच्या शिक्षणासाठी पाच सहा वर्षे मुंबईबाहेर गुरफटला गेलो आणि लगेचच अमेरीकेला आलो. एव्हढ्या वर्षात जमलेल्या एकुलत्या एका भारतभेटीत फिरणार तरी कीती?
मी भराभर पावलं उचलंत होतो. एव्हढ्या सगळ्या काळात अर्थातच सगळीकडेच कमी-जास्त बदल झाले होते. कॉलेजचा रस्तासुध्दा त्याला अपवाद नव्हता. पुर्वी या नाक्यावर पिंपळाचं भलं थोरलं झाड होतं. काही वर्षं साईबाबांचाहि मुक्काम असायचा त्या झाडाखाली! यथावकाश मंदिर उठवलं नी नवा पूल बांधला तेव्हा झाडही जमीनदोस्त झालं. नाका ओलांडून दोन मिनीटात स्टेशनपाशी आलो नी उजवीकडे वळून स्टेशनरोड घेतला.

या ईथपासनंच जणू काही कॉलेजची हद्द सुरू व्हायची कारण पुढे फारशी वस्ती नसल्यामुळे मुख्यतः कॉलेजला जाणारया-येणारयांचीच काय ती वर्दळ असायची. अरेच्चा, पण एथलं 'अ.बी.व्ही.पी' चं ऑफीस गेलं कुठे? ठराविक रंगांचे ते फलक, झेंडे नी बावटे, मोठ्मोठ्याने गपा मारणारी टोळी, सराईतपणे चेहरे न्याहळणारया नजरा - गेलं कुठे सगळं? कदाचित कँपसवर हलवलं असेल. आणि आता मिनीटाभरात....यस् ... 'श्रीकृष्ण उडिपी' - कँटिननंतर खादाडीची मुख्य जागा! चक्क होतं तस्संच आहे अजून. पण आचारी नक्की बदलले असतील. कारण तो वडा-डोसा-सांबारचा टिप्पिकल, संमिश्र वास थोडा वेगळा वाटला! श्रीकृष्ण मधलं 'टोमॅटो ऑमलेट' हे अगदि प्रिय खाद्य होतं माझं. मला आठवतंय, बाकीच्या मित्रांप्रमाणे मलाही "पॉकेट मनी" हवा म्हणून मी आई-दादाना भंडावून सोडलं होतं. पण लवकरच पॉकेट मनीची ठराविक रक्कम न घेता महिन्याभरात अधनं मधनं वरकड रक्कम घेणं जास्त फायदेशीर पडतं हा उलगडाहि झाला - कारण पॉकेट मनीच्या ठरलेल्या पैशात टोमॅटो ऑमलेट फार वेळा खाता येईना!! आणि पहील्यांदा मी इथे आलो तो नव्याच झालेल्या गृपबरोबर. फन् फेअरच्या स्टॉलसाठी कायकाय उचापत्या करायच्या ते ठरवायला. बिल आल्यावर मी भोटम् मामासारखी दहा रूपयांची नोट काढली आणि अशा वेळेला 'बेंबट्या, दीड रूपयाच्या आपल्या डोशासाठी रूपयाच पुढे सरकवावा; तोही शक्यतो सर्वात शेवटि', हे सूत्र कळलं! पहिल्याच खेपेला गेलेल्या त्या दहा रूपयानी पुढचे बरेच रूपये वाचवले.

विचारांच्या नादात कधी कॉलेजपाशी आलो ते कळलंच नाहि. ही सगळी दुकानंही परीचित नव्हती. पूर्वी एक-दोन झेरॉक्स, अमोनिया प्रिंटस् ची दुकानं नी एक टायपिंगचा क्लास, बस्स् एव्हढंच असायचं इथे. गेटातनं वाकून आत गेलो नी नजर अभावितपणे उजवीकडे गेली - लेडीज हॉस्टेलची वाट! पटकन् पुढे होउन मुख्य आवारात आलो. फार काही फरक नव्हता पडला. आर्टस् नी सायन्सच्या दोन बाजूस दोन बिल्डिंगज्, मधली बाग, उजवीकडे लायब्ररी, पलीकडे व्होकेशनल सेंटर, डावीकडे दूर जिमखाना, हॉस्टेलची रांग...त्यापुढचं विस्तीर्ण मैदान......ह्या विश्वात मी पाच वर्ष संपूर्णतया सामावलो होतो. सुट्टित सुध्दा अधनं मधनं चक्कर टाकल्याखेरीज चैन पडत नसे. अकरावी ते बी.एस्सी. पर्यंतच्या प्रवासात मित्र बदलले, वेगवेगळे शिक्षक भेटले, पण 'कॉलेज्ला चाल्लोय' या डोक्यातल्या व्याख्येत काही फरक पडला नाहि.

शनिवार असल्यामुळे फारशी टाळकी नव्हती आवारात. अधीरपणे आधी केमिस्ट्री डिपार्टमेंटला गेलो. केम लॅब मधला वास जशाचा तसाच होता. निरनिराळ्या सॉल्व्हंटस् चा, चित्रविचित्र कंपाउंडस् च्या मिश्रणातून तयार झालेला तो विशिष्ट वास - अजूनही तेच रटाळ शिकवतात वाटतं! आणि हा माणूस ओळखीचा...अरे हे तर 'भांबरे गुरुजी' !! कॉलेजच्या शासकीय भाषेत सांगायचं तर केवळ लॅब-बॉय. पण हा लॅब-बॉय नुसत्या मुठिच्या अंदाजाने सोल्यूशनस् अशी बरोब्बर करायचा की त्याला भांबरे गुरुजी हे 'ऑनररी' उपादान मिळालं होतं! पन्नाशीला आलेले भांबरे गुरूजी अजूनही पेशाने लॅब-बॉयच आहेतसे वाटले. डीपार्टमेंट मधे आत्ताच फार वेळ न घालवता म्हंटलं आधी चहा टाकावा म्हणून कँटिनकडे वळलो. कँटिन अगदी झकपक झालं होतं. 'चहा टाकायला' जावं अशा त्या जागेची आठवण माझ्या डोक्यात होती. खरं सांगायचं झालं तर इतकं स्वच्छ, इतकं नीटनेटकं कँटिन मला माझ्या कॉलेजमधे जरा विसंगतच वाटलं. च्यामारी, 'माझं कॉलेज'? पंधरा वर्षानी येउन पंधरा मिनीटं नाही झाली तर मी परत 'माझ्या कॉलेजचा' उल्लेख करायला लागलोय.

पुढच्या तास-दिड तासात कॉलेजभर भटकलो. माझी लॅब, मेन लेक्चर हॉलस् , ऑफिस, लायब्ररी (इथे आता संगणक होते, पूर्वी कार्ड कॅटलॉग धुंडाळायला लागायचा), लेडीज रूम बाहेरचा खास कट्टा, जिमखाना...माझे ठराविक नोटिसबोर्डसुध्दा वाचून काढले. सध्याच्या परीभाषेचा अंदाज यायला जरा वेळ लागला मात्र. थोडेफार बदल सगळीकडेच होते. चेहेरे तर सगळेच नवीन होते. एक भांबरे गुरुजी आणि लायब्ररीत दिसलेले, ऍनालिटिकल केमिस्ट्रीत डोकं खाणारे भावे सर सोडले तर बाकी कोणी मला ओळखणे शक्यच नव्हतं. सगळिकडे थोडा थोडा वेळ घालवेस्तो दुपार टळंत आली. परत एकदा कँटिन मधे चहा प्यायला नी परत फिरलो. पण परत जाताना काहीतरी चुकल्यासारखे वाटत होतं. मगाशी जरी 'माझं कॉलेज' म्हणालो होतो तरी आता तेव्हढी ओढ वाटत नव्हती. कदाचित पुढची भेट कीती वर्षानी होईल या विचाराने? त्यामुळे मी एव्हढा अस्वस्थ झालो होतो? माझं मलाच नक्की कळेना.

दुसरया दिवशी पुण्याला एका लग्नकार्याच्या निमित्ताने जायचं होतं. त्यामुळे घरी आल्यावर कॉलेजभेटिबद्दल जुजबी बोलणं झालं आणि पुण्याच्या तयारीला लागलो. परत आल्यावर खरेदीचं सत्र सुरू झालं. सुमाला फ्रेमस् हव्या होत्या म्हणून त्या खरेदीसाठि गेलो. वाटेत सुमाने विषय काढला - "काय रे, एव्हढ्या उत्साहाने गेलास 'पंधरा वर्षानी भेट देतोय' म्हणत पण कॉलेजबद्दल बोलला नाहिस ते फारसं?". तिला मी थोडंफार सांगितलं, पण नक्की काय खुपत होतं ते मला तरी कुठं कळत होतं? दुकानात सुमा फ्रेमस् बघत होती नी मी आपला कॉलेजच्या भेटिचा चित्रपट परत उलगडून बघत होतो. काय उणं पडलं होतं? मी एव्हढा आसुसून गेलो होतो कॉलेजला, पण पुनःप्रत्ययाचा आनंद मिळण्याऐवजी ही भेट रूखरूख लावून का गेली? काहीतरी मागे राहीलं होतं. मला काही सुचेना. "ए अवि, ते झरयाचं पेंटिंग पडलंय बघ इतके दिवस आपल्याकडे, त्याला हि फ्रेम मस्तच दिसेल नाहि?" सुमा म्हणाली. माझं लक्षच नव्हतं, मी आपल्याच बेचैनीत गुरफटलो होतो. "अवि, जरा बघ तरी रे इकडे, खरंच किती छान फ्रेमस् आहेत बघ, आपल्या पेंटिंगज् ना अगदि शोभुन दिसतील, नाहि?"
अं? फ्रेमस्...पेंटिंगज् ... मस्त दिसतील....कुठेतरी एक्दम क्लिक झालं आणि भराभर धुकं वितळावं तसा मला उलगडा झाला. मी पंधरा वर्षानी कॉलेजला जाउन आलो होतो. थोडाफार बदल अपेक्षितच होता त्या पेंटिंगमधे. पण माझी चौकट हरवली होती. बरोबरीच्या मित्रांची, ऑफिसमधल्या शिपायांची, लॅबमधल्या मदतनीसांची, क्लासरूममधल्या प्रोफेसरांची, कँटिनमधल्या पोरयांची, जिमखान्यावरच्या गर्दिची, गंभीर प्रिन्सिपॉलची चौकट.... बंक मारलेल्या लेक्चर् सची, कॉपी केलेल्या जर्नल्स् ची चौकट... टेबलटेनिसवरून झालेली भांडणं, फनफेअरमधली निखळ धमाल, वर्गात मागच्या बाकावर बसून केलेल्या टिवल्या-बावल्या, क्षणभराच्या डोळेभेटिने वाटलेली हुरहुर, परीक्षेची अनामिक धास्ती, स्टडि टूरच्या नावाखाली भर पावसात खंडाळ्याला केलेली ट्रीप, या सारया सारयानी नटलेली चौकट, ती मात्र पंधरा वर्ष मागेच राहीलि होती. मी नुसताच चित्रातून फिरून आलो होतो नी मला सगळे रंगच फिके वाटले होते. ते खुपत होतं मला!

माझी बेचैनी एकदम गेली. मी लक्ष देउन सुमाबरोबर फ्रेमस् बघायला लागलो. तासभर घालवून चार पाच फ्रेमस् आणल्या. महिन्याभरात परत आल्यावर लगेच पेंटिग्ज् लागली देखील.

पुढच्या वीकएंडला सकाळी चहा घेता घेता पेंटिग्ज् कडे समाधानाने बघत सुमा म्हणाली, "बघ, तासभर मोडला खरा फ्रेमस् च्या निवडीत, पण कशी मस्त दिसताहेत चित्रं नाहि? फ्रेम्सनी कसा उठाव दिलाय ना चित्राना?" मी मनापासून होकार दिला. खरंच, चित्र काय किंवा आयुष्य काय, छानशी चौकट असल्याखेरीज सजत नाही. जीवनाला उठाव देणारी.....चौकट....

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

झकासराव's picture

11 Jul 2008 - 11:23 am | झकासराव

छान लिहिलय. :)
आपल्या मनात ती चौकट वेगळी आणि फ्रेम वेगळी अस होउन जात.
काहि वेळा तर आपल्या मनात फ्रीज झालेली फ्रेम आणि आताची फ्रेम ह्यात तर खुपच फरक झालेला असत.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao