द लास्ट अ‍ॅक्ट

निखिल देशपांडे's picture
निखिल देशपांडे in जनातलं, मनातलं
17 Dec 2012 - 12:57 am

१२.१२.१२. ला साहेबांच्या वाढदिवसाच्या जाहिरातींनी पेपरची पाने भरलेलली होती त्या टाळुन पुढे जात असताना एका चित्रपटाच्या जाहीरातीने नजर खेचुन घेतली होती. चित्रपटाचे नाव होते "The Last Act". चित्रपटाच्या प्रिमियर साठी निवडलेला दिवस होता १२.१२.१२ त्याचे कारण म्हणजे चित्रपटाच्या डायरेक्टर्स ची संख्या आहे १२ आणि चित्रपटाचे कथानक घडतेही १२ शहरात. द लास्ट अ‍ॅक्ट ही भारतातली पहिली कॉलॅबरेटीव्ह फिचर फिल्म आहे.

"द लास्ट अ‍ॅक्ट" मागची कल्पना अगदी साधासोपी आहे. अनुराग कश्यप, सुधीर मिश्रा आणि चक्री टोलेटी यांनी भारताच्या वेगवेगळ्या शहरांतून बारा दिग्दर्शक निवडले आणि त्यांच्याकडून दहा-दहा मिनिटांचे लघुपट बनवून घेतले. इथं वेगळेपण हे की, हे लघुपट स्वतंत्र नसून एकाच मुख्य कथानकाचे उपभाग होते.

मूळ कथानक अर्थातच थोडं गुंतागुंतीचं आहे. चित्रपटाची सुरूवात होते मुंबईत. एक छिन्नविछिन्न झालेलं बेवारस प्रेत पोलिसांना मिळतं. तपासाच्या दरम्यान त्या प्रेतावर पोलिसांना बारा वस्तू मिळतात. बारकाईनं पाहता, त्या वस्तू बारा वेगवेगळ्या शहरांकडे पॉईंट करतात. बारा ठिकाणी समांतररित्या चालणारी या गुन्ह्याची उकल हा चित्रपटाचा गाभा आहे.

मुंबई, पुणे, लखनौ, ग्वालियर, गाझियाबाद, चंदीगड, चेन्नई, बंगळुरू, हिसार, कोलकाता,कल्याण, दिल्ली या सगळ्या शहरांत चित्रपटाची कथा घडते. इथं प्रत्येक शहराला जोडणारा 'दुवा'(पुरावा) हा मुख्य असून त्यासाठी बारा वेगवेगळ्या स्क्रिप्ट्स लिहिल्या गेल्या आहेत. म्हणजे खर्‍या अर्थानं ती उपकथानकं आहेत असंही म्हणता येणार नाही. कारण प्रत्येक कथेचं वेगळं स्थान आहे, अस्तित्व आहे. हे सगळं एकत्र सांधणं ही एक अवघड कसरत आहे आणि ती अस्मित पाठारे या प्रोजेक्ट डिरेक्टरने चांगली सांभाळली आहे.
कोलकाता, कल्याण व चेन्नईतल्या कथा बर्‍याचशा प्रादेशिक भाषेत घडतात. इतर भाषांचं माहित नाही, मात्र हिंदी चित्रपटातलं मराठी अगदी खटकण्यासारखं असतं. या सिनेमाचा अनुभव इथं वेगळा आला. तेजस जोशीने दिग्दर्शित केलेल्या कल्याणच्या लघुपटातली पात्रं आयुष्यभर मराठी बोलत असल्यासारखी खूप छान आणि नैसर्गिकरित्या मराठी बोलतात. कल्याण हे खरंखुरं कल्याण वाटतं. इतकंच काय, एका मराठी इन्स्पेक्टरच्या मोबाईलची रिंगटोन "माझं कुंकू...." ही आणि तीही अगदी खूप हळू आवाजात आणि बॅकग्राऊंडला अशी वाजते, की ज्यांनी ती कधी ऐकली असेल त्यांनाच कळावी आणि ओळखू यावी. पुण्यातली कथा मात्र हिंदी-इंग्रजीत घडते.

सिनेमात एक सौरभ शुक्ला सोडला तर ज्याचं/जिचं नांव माहित असावं असं कुणीच नाही. सिनेमाची कथा आणि प्रत्येक डायरेक्टरची वेगळी मांडणी हेच चित्रपटाचं बलस्थान आहे. अर्थातच, काही लघुकथा अतार्किक वाटतात आणि विनाकारण गोंधळात टाकतात. काही प्रश्न शेवटपर्यंत अनुत्तरीत राहतात. तरीही, एक वेगळा प्रयोग म्हणून हा चित्रपट नक्कीच छान आहे.

चित्रपटप्रतिक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

तोंड ओळख पहाता बघावासा वाटतोय.

जाता जाता : गेल्यावेळी मिपावर मिळालेल्या 'गेट वेल सून' ह्या शुभेच्छांनी अनुरागला आराम पडला की काय? ;)

अगदी वेगळा प्रयोग दिसतोय. खून, मारामारी असल्याने अर्थातच पाहणार नाही पण वेगळ्या रितीने तयार केलाय सिनेमा.

किसन शिंदे's picture

17 Dec 2012 - 7:19 am | किसन शिंदे

नक्की पाहणार. अर्थात थेटरात राहिला तर

स्पा's picture

17 Dec 2012 - 8:20 am | स्पा

पा हण ा र.

अरे वा काहीतरी भन्नाट बघायला मिळणार .........

परिक्षणावरुन बघणेबल वाटतोय. आता इकडे हा कुठे लागलाय ते बघणे आले.

छोटा डॉन's picture

17 Dec 2012 - 2:21 pm | छोटा डॉन

हेच म्हणतो.

- छोटा डॉन

पैसा's picture

17 Dec 2012 - 6:21 pm | पैसा

परीक्षण वाचून बघायची उत्सुकता तयार झाली आहे.