बाजी लढताना एक घाव त्यांच्या पाठून त्यांच्या फिरंग समशेरधारी उजव्या हातावर झाला.वेदनेने कळवळलेले बाजी त्या भ्याडाचा प्रतिकार करण्यासाठी त्याही परिश्तितीत वळले आणि तोच क्षण साधत गनिमाची तलवार त्यांच्या छातीवर उतरली.पासष्ठ वर्षांचा तरणाबांड योध्दा-बाजी पडले !
आपल्या मागे वळण्याची इतिकर्तव्यता झाली हे लक्षात येताच फत्तेखान आपल्या सैन्यासह परत वळून पळून गेला.कावजी मल्हारला हे समजताच तो तीरासारखा सासवडला धावला.आपल्या धन्याचं जखमी शरीर पाठीवर लादून वाहून नेणारी बाजींची यशवंती घोडी आणि कावजी मल्हार यांच्या दु:खाची जात एकच होती ! पुरंदर येईतो बाजींनी शरीरातली धुगधुगी फक्त आपल्या विजयी राजाला - शिवरायांना पहाण्यासाठी व दोन अखेरचे शब्द बोलण्यासाठी शिल्लक ठेवली होती.गडाच्या पायथ्यापासून बाजींची पालखी वर आली आणि वाट चुकलेलं कोकरू आपल्या आईला-गोमातेला बघताच धावत सुटतं तसे राजे पालखीकडे धावले ! पालखी उतरून त्यांनी बाजींचं जखमांनी छिन्नविच्छिन्न झालेलं शरीर तोललं आणि त्यांची मान आपल्या मांडीवर घेत टाहो फोडला,"बाजी,आम्हाला असं पोरकं करुन कुठे चाललात?"
राजांचे अश्रू बाजींच्या जखमांवर पडले.खारट पाण्याने जखमा चुरचुरल्या पण आपलं बलिदान जणू राजाने अभिषेकाने पावन केलं या जाणिवेनं मरणाच्या दारात असलेल्या बाजींच्या गलमिश्या थरथरल्या! क्षीण पण करारी आवाजात ते बोलले,"आरं मांज्या राजा,तुला भेटलो,औक्षाचं सोनं जालं रं मांज्या ल्येकरा ! मला ल्योक न्हाई पर मरताना तुंजी मांडी गावली.त्या फत्याचं मुंडकं आननार व्हतो रं , पर डांव चुकला आन् त्यो पळाला.थोरल्या रांजास्नी पकडून नेणार्या त्या नामर्द बाजी घोरपड्याला नागवनार व्हतो पर त्ये बी र्हाईलं ! पर तू नगं चिंता करू!, ह्यो मांजा नातू सर्जेराव बाजी जेधे आन् त्येचा बा कान्होजी जेधे हाईती तुंज्या सांगाती.येक डाव माफी कर राजा, म्होरला जलम घिऊन यी न पुन्यांदा सवराज्यासाटी लडाया!तुज्यासाटी द्याया येकलाच जीव गावला ह्ये वंगाळ बंग ! म्या चाललू रांजा, आपलं सवताचं सवराज्य व्हनार, जय काळकाई !....."
राजांच्या मांडीवर प्राण सोडलेल्या बाजींचे डोळे उघडेच होते, ते शिवबांनी मिटले आणि दाबून ठेवलेल्या हुंदक्यांना वाट करून दिली.....
---------------------------------------------------------------------------------
उदय गंगाधर सप्रे लिखित "रत्नपारखी शिवराय : भाग एक - बाजी पासलकर" या आगामी पुस्तकातून सप्रेम
प्रतिक्रिया
27 Jun 2008 - 8:04 pm | प्रगती
डोळ्यासमोर बाजी पासलकर आणि महाराज उभे राहीले. तुमचं पुस्तक आमच्या लायब्ररीत ठेवायला आवडेल.
27 Jun 2008 - 8:24 pm | उदय सप्रे
प्रगती ताई,
या पुस्तकाविषयीचं माझं मिपा वरच एक निवेदन आपण वाचलंत का?नसेल तर माझी अशी विनंती आहे की ते वाचा आणि मला सांगा की तुम्ही किती प्रती घेऊ शकाल्?(तुमच्यासारख्याच सुजाण वाचकांना देण्यासाठी.)
आपण माझ्या केलेल्या कौतुका बध्दल पुन्हा एकदा आभार !
उअद्य सप्रेम
28 Jun 2008 - 12:15 am | स्वप्निल..
तुमचे पुस्तक लवकर वाचायला आवडेल...
स्वप्निल..
28 Jun 2008 - 4:20 am | बेसनलाडू
मात्र कोकराची माता गोमाता कशी हे बाकी उलगडले नाही (आणि वाट चुकलेलं कोकरू आपल्या आईला-गोमातेला बघताच धावत सुटतं तसे राजे पालखीकडे धावले ). वासरू म्हणायचे असावे,असे वाटते.
(धनगर)बेसनलाडू
28 Jun 2008 - 11:43 am | उदय सप्रे
तुमचे म्हणणे १०१ % खरे आणि रास्त आहे ! मला वासरूच म्हणायचे होते आणि मूळ पुस्तकात पण वासरूच आहे.पण काल हे लिहिताना मात्र ही चूक हातून झाली आहे.इतक्या तांत्रिक चुका लक्षात आणून देणारे तुमचासारखे सुजाण वाचक मला दिल्याबध्दल मिपा चे शतशः आभार ! आणि तुमचे पण , खरेच ही फार मोठी चूक आहे, यावरून लक्षात येते की तुम्ही सारेच किती चोखंदळ वाचक आहात.
आपला अतिशय ऋणी आहे.
बाकी झलक कशी वाटली?
उदय सप्रेम
28 Jun 2008 - 10:16 am | Rupesh
खुप छान लिहिले आहे.
ह्रुदयाला भिड्ते.
28 Jun 2008 - 4:40 pm | विसोबा खेचर
उदयराव,
पुस्तक लिहिताना संदर्भ म्हणून कोणकोणते ग्रंथ वापरले आहेत हे कळेल का?
28 Jun 2008 - 6:13 pm | उदय सप्रे
तात्या,
इतिहासातील इतकी पुस्तके वाचून झाली आहेत की त्यातील प्रत्येक पुस्तकातून काही ना काही मागोवा मिळत गेला.पण जी काही ठळक स्वरुपात संदर्भ ग्रंथ म्हाणून वापरली ती पुस्तके अशी (जी यादी पुस्तकात पण दिलेली असेल):
१. राजा शिवछत्रपती-बाबासाहेब पुरंदरे
२. सभासद बखर - संपादक भीमराव कुलकर्णी
३.बाजी पासलकर - कृष्णकांत नाईक
४. छत्रपती शिवाजी महाराज - कृष्णराव अर्जुन केळुस्कर
मूळ इतिहासाला धक्का न लावता एक लेखक म्हणून वातावरण निर्मिती म्हणून बाजींचा शेवट लांबवला आहे - ते सासवडलाच गेले होते , पण पुस्तकाचा प्रवाह नांदता रहाण्यासाठी अशी कल्पनाशक्ती वापरावी लागतेच लेखकाला!
उदय सप्रेम
28 Jun 2008 - 6:20 pm | विसोबा खेचर
सप्रेसाहेब,
खुलाश्याबद्दल धन्यवाद.
छान लिहिले आहे...
तात्या.
28 Jun 2008 - 4:48 pm | झकासराव
झलक छानच वाटली आहे.
मी ५ पुस्तकं घेवु शकेन.
त्यासाठी कुठे संपर्क करु???
खरतर इच्छा अजुन खुप जास्त आहे पण सध्या ते शक्य नाही होणार.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
28 Jun 2008 - 6:16 pm | उदय सप्रे
झकासराव,
आपल्या अभिप्रायाबध्दल आभारी आहे.
पुस्तकांसाठी अर्थातच माझ्याशी संपर्क करावा लागेल - माझा भ्रमणध्वनी मी खाली दिलेला आहेच , मी ठाणे येथे रहातो - आपण कुठे रहाता?
पुस्तक छापून यायला अजून २ महिने तरी जातील पण तत्पूर्वी आपला गृहपाठ पूर्ण असावा म्हणून ही खटपट.....
कळावे,
उदय सप्रेम
भ्रमणध्वनी : ०९९६७५ ४२७०३
ठाणे
28 Jun 2008 - 6:32 pm | चतुरंग
चित्रदर्शी वर्णन असल्याने भाग वाचनीय झालाय. एक साहित्यिक कृती म्हणून आवडली आणि लोकांनाही आवडेल अशी खात्री वाटते.
आपला इतिहासाचा अभ्यास दांडगा आहे असे दिसते. त्याबाबत काही भाष्य करावे असा माझा अभ्यास नाही. त्यामुळे ऐतिहासिक संदर्भांची अचूकता ह्याबद्दल मी काहीच बोलू शकणार नाही.
व्यक्तिशः मी किती पुस्तके घेऊ शकेन ह्याबद्दल आत्ता काहीच सांगू शकत नाही पण भारतात आलो की मी आपल्याला संपर्क करेन.
चतुरंग
28 Jun 2008 - 6:35 pm | उदय सप्रे
चतुरंग साहेब,
महाराष्ट्र मंडळ-न्यूयॉर्क यांच्याशी संपर्क केला आहे , काही कळाले आणि त्यांना पण पुस्तके हवी असल्यास आप्ल्याला कळवीनच.
उदय सप्रेम
28 Jun 2008 - 11:47 pm | शितल
अ॑गावर शहारा आणणारा प्रस्॑ग, आणि डोळे ही पाणावणारा. खुप छान शब्दात मा॑डला आहे.
बाजी पासलकर ह्या॑च्या स्वराज्याच्या बलिदाना , मानाचा मुजरा.
29 Jun 2008 - 12:17 am | उदय सप्रे
आभार !
पुस्तक वाचयला आणि मझ्यसाठी त्याचा प्रसार करयला आवडेल आणि जमेल का?