"तू ललित का लिहीत नाहीस?'
बारावीत आमच्या एका (साहित्यिक) वर्गमित्रानं मला हा प्रश्न केला होता. ललित अशा नावाचा लेखनाचा काही प्रकार असतो, हे तेव्हा मला प्रथम कळलं होतं. तो स्वतः चांगलं ललित लिहितो, असा त्याचा दावा होता. अर्थात, कॉलेजच्या "सहकार' मासिकातही त्याचं लेखन छापून आणेपर्यंत त्याची मजल होती, त्यावरून तो निश्चितच मोठा साहित्यिक असावा.
तर सांगण्याचा उद्देश काय, की लिखाण म्हणजे एकतर कथा, कादंबरी, नाटक किंवा कविता, एवढंच मला माहीत होतं. गेला बाजार प्रवासवर्णन. पण रत्नागिरीहून एकतर पुणे किंवा मुंबई एवढाच प्रवास मला माहीत असल्यामुळे आणि तो प्रवासही बरेचदा रातराणीनं होत असल्यामुळे त्याविषयी लिहिण्यासारखं फार काही नव्हतं. रात्री सात किंवा आठ वाजता बसून पहाटे (जाग आलीच तर) पुणे-मुंबईतला दिव्यांचा झगमगाट पाहत शहरात प्रवेश करायचा, एवढाच काय तो प्रवासातला अनुभव. प्रवासापेक्षाही आकर्षण असायचं ते पुणे, मुंबई बघण्याचं. तेसुद्धा कुणी वडीलधारे किंवा वडीलबंधू फळले तर. नाहीतर आमची मुंबई-पुणे वारी म्हणजे लग्न किंवा मुंजीच्या धबडग्यात वाहून जायची. त्यामुळे या महानगरांतलं राहतं घर ते मंगल कार्यालय यांच्या दरम्यान होईल तेवढंच मुंबई-पुणे दर्शन. बाकी प्रवास केला, तो त्र्यंबकेश्वर, पंचवटी, शेगाव असा धार्मिक स्थळांचा. हा प्रवास दिवसा केला असला, तरी बरेचदा गाडी लागण्याच्या (स्वतःला आणि सहप्रवाशांना असलेल्या) भीतीने त्या प्रवासाविषयीही सुखकर असं काही नाही. त्यातून लाल डब्याचा, सुटीच्या "पीक' सीझनमधला तो प्रवास. बसण्याच्या जागेवरून भांडणं, आखडत्या पायांनी सहन केलेला त्रास आणि कंडक्टरच्या खंडीभर शिव्या, याशिवाय फार काही हृदयाच्या कुपीत जपून ठेवण्यासारख्या आठवणी असण्याचं कारण नाही.
दुसरा दिवसाचा प्रवास असायचा तो शिपोशी या आमच्या आजोळचा. पण तो जेमतेम दीड तासाचा. त्या प्रवासात मी एकटा असेन, तर बहुतेकदा शेजाऱ्याला "वाकडा फणस' आला की सांगा, असा निरोप देऊन ठेवायला लागायचा. कारण त्या दीड तासातही माझी ब्रह्मानंदी टाळी लागलेली असायची.
सांगायचा मुद्दा काय, की प्रवासवर्णनाच्या वाटेला कधी गेलो नाही. "ललित' म्हणून दुसरं काय लिहायचं, असा प्रश्न होताच. आयुष्यात काय, साधी वाटेतही कुणी "ललिता' आडवी आली नाही, त्यामुळे त्या ललिताविषयी लिहिण्याचा प्रश्नही निकालात निघाला. "सहकार'मध्ये लिहिण्याचा पहिला प्रसंग आला, (गुदरला!) तेव्हासुद्धा मी माझ्या अभ्यास शाखेशी निष्ठावंत राहून एक विज्ञानकथा लिहिली होती. नुकत्याच वाचलेल्या "बर्म्युडा ट्रॅंगल'मधल्या एका प्रसंगाशी ती कथा अगदी मिळतीजुळती होती, हा निव्वळ योगायोग!
आता मात्र व्यावसायिक लेखक झाल्यानंतर (म्हणजे लेखन हा व्यवसाय म्हणून स्वीकारल्यानंतर) उगाचच ललित लेखनाचा किडा वळवळायला लागला आहे. साध्याच प्रसंगावर छानसं लिहायला जमलं पाहिजे, असं वाटायला लागलंय. जमेल ना मला?
प्रतिक्रिया
14 Jul 2012 - 7:05 pm | प्रभाकर पेठकर
रत्नागिरीहून एकतर पुणे किंवा मुंबई एवढाच प्रवास मला माहीत नसल्यामुळे.....
'नसल्यामुळे' की 'असल्यामुळे'?
नमन झाले आहे आता मुख्य कार्यक्रम हाती घ्यावा. जमेल असे वाटते आहे.
15 Jul 2012 - 8:19 am | आपला अभिजित
धन्यवाद.
14 Jul 2012 - 7:16 pm | मुक्त विहारि
आणि
अनुभव सांगा
14 Jul 2012 - 9:36 pm | शिल्पा ब
:)
15 Jul 2012 - 12:31 am | अत्रुप्त आत्मा
जितकं सहज,तितकच छान...! :-)
15 Jul 2012 - 11:29 am | पैसा
बुवा, लळित जमेल का म्हणून आता विचारताय का? असो.
15 Jul 2012 - 12:49 pm | मनोज श्रीनिवास जोशी
जमेल की लिहायला.जात्यावर बसले की ओवी सुचते तसे लिहायला लागल्यावर हळू हलो विषय सापडेल , शैली तयार होईल. प्रयत्न करत असावे.
हे प्रयोग मी माझ्यावर ही करतो आहे . आपला सहप्रवासी आहे मी ही !
16 Jul 2012 - 2:19 pm | चैतन्य दीक्षित
लळित हा शब्द वाचून सातार्यातला खिंडीतल्या गणपतीच्या देवळातला माघी उत्सव आठवला.
लळिताबद्दल कुणी जाणकार लिहील काय? म्हणजे, लळित म्हणजे नक्की काय प्रकार असतो? कशा प्रकारे केलं जातं इ?
अजून एक म्हणजे,
लहानपणी मी आणि माझा चुलत भाऊ चेष्टा-मस्करी करीत असलो की क्वचित आई म्हणायची, "बास हा आता, नाही तर लळित होईल." याचा साधारण अर्थ 'चेष्टे-चेष्टेच चाललेल्या गोष्टीचं गंभीर भांडणात रूपांतर होईल' असा जरी असला तरी तिथे 'लळित' हा शब्द का आला असावा?
कुणाला माहिती असल्यास कृपया प्रकाश टाका.
16 Jul 2012 - 7:55 pm | प्रभाकर पेठकर
एक प्राचीन नाट्यप्रकार लळित
लळित हा भारतीय संस्कृतीतील एक प्राचीन नाट्यप्रकार असून महाराष्ट्र शब्द कोशात लळित शब्दाचे खालीलप्रमाणे स्पष्टीकरण केल्याचे आढळते. १) नवरात्रादि उत्सवाच्या शेवटच्या रात्री उत्सवदेवता सिंहासनाधिष्ठित झाले असे समजून वासुदेव, दंडीगण इ. ईेशरभक्तांची सोंगे आणली जातात व तो सोंगे स्वसंप्रदायानुरुप देवतेला प्रसाद मागून मग तो सभासदांना वाटला जातो. २) उत्सव प्रसंगातसोंगे आणून नाटकाच्या प्रवेशाप्रमाणे खेळ केला जातो. डॉ. कुमार स्वामींच्या मतानुसार लळित शब्द हा लीला या शब्दावरुन तयार झाला असावा. ते असे म्हणतात- महाराष्ट्रातील संतांनी कृष्णलीलेचे अभंग गायले आहेत. त्यापूर्वी महानुभाव पंथातील परंपरासुध्दा कृष्ण भक्तीने ओतप्रोत भरली आहे. त्यावरुन उत्सवाच्या प्रसंगी लळित करण्याची प्रथा फार प्राचीन असल्याचे आढळते. महाराष्ट्राच्या शिल्पकलेत कृष्णलीलेच्या दर्शनावरुन कृष्णलीलेची सोंगे केली जात असावी असे वाटते. भारतातील विविध प्रांतातील नाटकांमध्ये खूप साम्य आढळून येते. उदा. मथुरेची ब्रजविहार परंपरा, बंगालची कृष्णलीला नाट्ये, कर्नाटकी भागवत नाटके आणि महाराष्ट्राची लळिते यांमध्ये मोठ्या प्रमाणात साम्य असल्याचे दिसते. प्राचीन काळातील लळिते कशी केली जात याविषयी सांप्रत काहीच माहिती उपलब्ध नाही. परंतु लळिताचा मूळ उद्देश वेदान्तोपदेश हा होता व त्यामध्ये करमणुकीसाठी काही सोंगे आणण्यात येत. धार्मिक उत्सवाच्या शेवटी हौशी मंडळी हा कार्याम करीत असत. त्यामध्ये करमणूक म्हणून छडीदार, भालदार, चोपदार, वासुदेव, दंडीगण, गोंधळी, वाघ्या-मुरळी, बहिरा, मुका, आंधळा इ. पंचवीस-तीस सोंगे आणून खेळ करीत. त्यात दशावतारांची लीलासुध्दा दाखविली जाई. लळिताचा शेवट सामान्यपणे रामाकडून रावणाचा वध करण्यात होई. पात्रांची सजावट अर्थातच ओबडधोबड असे. हिलालामध्ये सरकी घालून किंवा मशाली पेटवून त्याच्या उजेडात हे खेळ होत असत. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला विष्णुदास भावे यांनी सुरु केलेली नाटके ही बरीचशी लळिताशी मिळती जुळती असत. त्यावरुन असा निष्कर्ष काढता येतो की आधुनिक मराठी रंगभूमीचा जन्म हा लळितामधून झाला असावा. लळिताचा रंगमंच साधारणतः एक ते दीड फूट उंचीच्या बाकांवर फळ्या टाकून तयार केला जाई. त्याचा आकार सुमारे १२ बाय १२ फूट असा असून रंगमंचाला पडदा नसे. रंगमंचाच्या एका बाजूला साथवाले बसत. सूर धरणारी मुले मागे बसत. पात्रांची ये-जा दुसर्या बाजूने होत असे. प्रथम मुले धृपद गातात, नंतरसूत्रधार येऊन गणपतीचे स्तवन होते. मध्येच विदूषक येतो सूत्रधाराशी विनोद घडतात. त्यानंतर सूत्रधाराची बायको येते दोघांचे द्वंदगीत होते. नंतर लळितातील मुख्ये पात्रे येतात. हिंदी मिश्रित मराठीतले संवाद घडतात. मध्यरात्री सुरु झालेले लळित पहाट उजाडेपर्यंत रंगते. लळितामध्ये एकनाथांची भारुडे साभिनय म्हणून विनोद निर्माण केला जातो.
आंतरजालावरून साभार.
18 Jul 2012 - 4:31 pm | चैतन्य दीक्षित
पेठकर काका,
तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुमचे आणि आंतरजालाचेही आभार :)
16 Jul 2012 - 2:41 pm | अभिज्ञ
लिहिलेला लेख हाच "ललित" कॅटेगरित बसत असल्याने तुम्ही ललित/लळित उत्तम लिहू शकाल ह्यात काहि वाद नाही. ;)
अभिज्ञ.