एका तैल-चित्राची जन्मकथा (सचित्र- भाग १)

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in कलादालन
9 Jun 2012 - 8:40 pm

या लेखात माझ्या एका चित्राच्या संपूर्ण निर्माणप्रक्रियेची सचित्र नोंद करण्याचा प्रयत्न करत आहे.

१. उपोद्घात:
पॅरीस मध्ये चित्रे रंगवावीत, ही माझी फारफार वर्षांपासून ची इच्छा. Monet, Renoir, Pissaro इत्यादी प्रमाणे तिथल्या रस्त्यांवर, उद्यानात, नदीकिनारी बसून चित्रे काढावीत, असे तेंव्हा वाटायचे...

पुढे प्रत्यक्षात अशी संधी जेंव्हा मिळाली, तोवर माझी प्रत्यक्ष जागेवर बसून चित्रे काढण्यातली गोडी ओसरलेली होती. तीन तीन महिन्याचे तीन मुक्काम होऊनही सर्व काळ भटकण्यात, संगीताचे कार्यक्रम आणि लूव्र वगैरे संग्रहालये बघण्यात व्यतीत झाला... अर्थात, हे सर्व खूपच आनंददायक होते, पण यावेळी मात्र काहीतरी चित्रकर्म करायचेच, असा निश्चय झाला.

२. पूर्व तयारी:
रंग-ब्रशादि सामान घरून आणलेले होते, पण कॅन्व्हास इथूनच घ्यायचा होता. यासाठी 'मारा' (Marin) हे स्थान सर्वोत्तम, तिथे अगदी लहान, ६ बाय ६ इंच पासून दहा-पंधरा फुटा पर्यंतचे कॅन्व्हासच्या थप्प्या च्या थप्प्या लावलेल्या बघून डोळ्यांचे पारणे फिटले. त्यातून खिश्याला परवडेल, बस मधून नेता येईल, आणि घरात करायला,लावायला सोयीस्कर असे 73x92 सेमी. आकाराचे दोन कॅन्व्हास खरेदी केले. घरी पोचताच आहानने त्यांचे परिक्षण करून, थापट्या मारून, आनंदाने चीत्कारून पसंतीची पावती दिली. मग आम्ही दोघांनी याच्यावर आज चित्र करायचे ठरवले.


जमिनीवर कॅन्व्हास आडवा ठेऊन, रंग- ब्रशादि सामानाची जुळवाजुळव करून सर्व ठीक-ठाक आहे ना, हे आहान ला बघायला सांगितले:

त्याने लगेच उत्साहाने सर्व सामानाचे त्याच्या पद्धतीने परिक्षण केले.

कॅन्व्हास तैल रंगाच्या दृष्टीने थोडा कोरडा वाटला, म्हणून त्यावर लिन्सिड तेलाचा अगदी हलका थर चढवला:

३. प्रारंभ:
चित्राला सुरुवात करण्यापूर्वी मनात (निदान जाणीवेच्या पातळीवर तरी) कोणतीही आकृती, कल्पना, विचार वगैरे काहीही नसते. फक्त आपण आता चित्रकर्म करणार आहोत, एवढाच विचार असतो... कोर्‍या कॅन्व्हासकडे काही वेळ नुसते बघायचे....
सहजपणे सुचतील, ते रंग ट्यूब मधून कॅन्व्हासवर पिळायचे... मग त्यावर रोलर फिरवून रंग पसरायचे...


मधले लाल, पिवळे रंग हे काही इमारती सारखे दिसू लागले... आता एका बाजूला हिरवा रंग पसरवला.... हे 'पाणी' आहे, असे वाटू लागले.... आता 'खाली' पाणी, 'मध्ये' इमारती, तर 'वरती' आकाश करावे, असे वाटून वर निळा, पांढरा रंग पसरवला....

आता हे चित्र असे दिसू लागले:

आता पूर्ण कॅन्व्हास रंगीत झाला. हे तैल रंग असल्याने आता चित्र चार-पाच दिवस वाळायला ठेवायचे, त्या दरम्यान जाता-येता बघत रहायचे, यातून चित्रात अनेक आकार दिसत, सुचत जातात, आणि हळूहळू चित्र मनात साकार होत जाते. पूर्ण वाळल्यावर पुढले काम सुरु करायचे...
आता मला चार-पाच दिवस थांबायचे आहे, तेंव्हा वाचकांना पण थोडी प्रतिक्षा करावी लागणार...
पुढे हे चित्र कसे, कोणते रूप घेणार, याची उत्सुकता आहे, कदाचित हे बिघडेल, किंवा बर्‍यापैकीही होईल, कुणी सांगावे?
......क्रमशः ....

संस्कृतीकलातंत्र

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

9 Jun 2012 - 10:34 pm | प्रचेतस

मस्त.
चित्र कसे पूर्ण होतोय याची जाम उत्सुकता आहे.

बाकी तुमचा नातू एकदम गोड आहे.

अमृत's picture

9 Jun 2012 - 10:46 pm | अमृत

चित्र कसे पूर्ण होतोय याची जाम उत्सुकता आहे. - हेच म्हणतो. एका कलाकृत्तीचा जन्म बघायला मिळणार म्हणून आनंदीत झालो आहे.

अमृत

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Jun 2012 - 10:58 pm | बिपिन कार्यकर्ते

पुढचे वाचायला / बघायला जाम उत्सुक आहे!

बॅटमॅन's picture

10 Jun 2012 - 12:42 am | बॅटमॅन

जाम उत्सुक आहे बघा चित्र खंप्लीट कसे होते ते बघायला :)

संजय क्षीरसागर's picture

10 Jun 2012 - 12:56 am | संजय क्षीरसागर

मस्त चित्र काढा आणि इथे टाका, फार आनंद देऊन गेली ही प्रक्रिया.

भरत कुलकर्णी's picture

10 Jun 2012 - 1:03 am | भरत कुलकर्णी

मुलगा जाम गोड आहे.
एक छान निसर्गचित्र तयार व्हावे असे वाटते.

मुक्त विहारि's picture

10 Jun 2012 - 1:06 am | मुक्त विहारि

थोडे ज्ञान दिलेत तर बरे होईल.

१. कॅन्व्हास कसा निवडायचा?
२. त्याला तेल का लावयचे?

शिल्पा ब's picture

10 Jun 2012 - 1:24 am | शिल्पा ब

भारी! मला चित्रकलेतलं चित्र आवडलं - नाही आवडलं याशिवाय काही कळत नाही.

पुढील भागाची उत्सुकता आहेच. अजुन एक म्हणजे रोलरने का चित्र काढायचं? मग ते ब्रश वगैरे कशासाठी? का ब्रशने नंतर बॉर्डर काढायच्या?

असो. पिल्लु अगदी गोड आहे. आहान चा अर्थ काय?

चित्रगुप्त's picture

10 Jun 2012 - 2:03 am | चित्रगुप्त

१. कॅन्व्हास कसा निवडायचा?
मी हे कॅन्व्हास जिथून घेतले, ते पॅरिस मधील अतिशय प्रसिद्ध, उत्कृष्ट कलासाहित्य मिळण्याचे ठिकाण असल्याने लेखात म्हटल्याप्रमाणे... "खिश्याला परवडेल, बस मधून नेता येईल, आणि घरात करायला,लावायला सोयीस्कर "... असे निकष लावून ते घेतले.
मात्र आपल्याइकडे नाना कंपन्यांचे, बरे-वाईट कॅन्व्हास मिळतात, त्यातून निवडणे खरोखर कठीण असते. अनुभवी लोकांची सुद्धा फसगत होते. कॅमल सारख्या मोठ्या कंपन्या देखिल स्पर्धेमुळे स्वस्त माल बनवतात, त्यातून दर्जा खालावतो. कापडाच्या जाडीप्रमाणे जाड, मध्यम व तलम असे प्रकार असतात. दाट, जाड्या रंगांचे थर लावून चित्र करण्यासाठी 'कोर्स', तर गुळगुळीत, घोटीव कामासाठी 'फाईन' ग्रेन, व सर्वसाधारण कामासाठी 'मिडियम' ग्रेन कॅन्व्हास घ्यावा.

खरेतर तैल-रंग व अ‍ॅक्रेलिक रंगासाठी निरनिराळे कोटिंग केलेले कॅन्व्हास असतात, परंतु बरेचदा ही दोन्ही मध्यमे एकाच चित्रात वापरली जातात (अ‍ॅक्रेलिक रंग लगेच वाळतात, तर तैल-रंग चार-पाच दिवसात वाळतात) त्यामुळे हल्ली अ‍ॅक्रेलिक कोटिंग चे कॅन्व्हास बनवले जातात (हे कोटिंग पण लगेच वाळत असल्याने कॅन्व्हास बनवणार्‍यांना फारच सोयीचे ठरते). मात्र हे कोटिंग तैल-रंगासाठी कोरडे वाटते. म्हणून जरा ओलसर करण्यासाठी लिन्सिड आणि टर्पेंटाइन चे मिश्रण अगदी हलके लावावे.
२. रोलरने का चित्र काढायचं? मग ते ब्रश वगैरे कशासाठी?
रोलर मुळे मला हवा असलेला एक प्रकारचा पोत निर्माण होतो, शिवाय अल्पावधीत मोठा अवकाश रंगाने भरला जातो.
या चित्रात पुढचे काम ब्रशने केले जाणार आहे.
३. 'आहान' हा शब्द ऋग्वेदात 'पहाट' या अर्थाने आलेला आहे. 'प्रारंभ', 'एक नवीन सुरुवात' असाही अर्थ आहे म्हणे.

आहान फारच गोड आहे. लेख फार आवडला. आहानमुळे चार चांद लागले.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Jun 2012 - 3:40 am | निनाद मुक्काम प...

झकास मस्तच

मस्त मस्त मस्त, आता उत्सुकता आहे चित्र कसं पुर्ण होतं आहे याची.

एक सहज गंमत म्हणुन विचारतो, आता आहे त्या स्थितीत हे चित्र सॉफ्ट कॉपी करुन इथं डकवु शकाल का, म्हणजे इथले हौशी चित्रकार संगणकावर त्यावर प्रयोग करतील, आणि शेवट तुम्ही कसा करताय किंवा बाकी कसे करताय हे पाहायला मजा येईल.

छानच
उत्सुकता वाढीस लागलीय

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jun 2012 - 1:21 pm | बिपिन कार्यकर्ते

बादवे, चित्रगुप्तकाका रामदासकाकांचे भाऊ वाटत आहेत! ;)

चित्रगुप्त's picture

10 Jun 2012 - 1:32 pm | चित्रगुप्त

पॅरिसला येण्यापूर्वी डोईवरील केस भादरून आलो, कारण भारतात जे नापितकर्म तीस रुपयात झाले, त्यासाठी इथे दीड - दोन हजार लागले असते.... तेवढ्यात ही दोन कॅन्व्हासं घेता आली.

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jun 2012 - 1:44 pm | बिपिन कार्यकर्ते

बघा! अशी डिव्होशन पाहिजे कलेप्रती! ;)

चौकटराजा's picture

14 Jun 2012 - 2:39 pm | चौकटराजा

पॅरिसला दुधाचा भाव काय आहे हो ?
( पुण्यात सध्या मटाराचा भाव काय असा प्रश्न लहानग्या पुलं नी न चिं केळकराना केला होता म्हणे )

पिवळा डांबिस's picture

13 Jun 2012 - 11:21 pm | पिवळा डांबिस

चित्रगुप्तकाका रामदासकाकांचे भाऊ वाटत आहेत!
काकापणाचं ते व्यवच्छेदक लक्षण दिसतंय!!
म्हणुन सांगतो असतो की लेको मला काका म्हणू नकात!!
:)
आणि चित्रगुप्तकाका, ती काळी पॅन्ट, ती सुद्धा भारतातून नेलीत की पॅरिसमध्ये घेतलीत?
एकदम ढींच्याक आहे!!
:)
बाकी आम्हाला चित्रकला अजिबात येत नाही...
:(
चित्र बघायला आवडतात. चित्र तयार होतांना बघायला आवडतात...
तुमचं चित्रकलाविषयक लिखाण आवडतं...
बॉब रॉसचे टीव्ही शोज तर भारावून जाऊन बघतो...
पण आम्ही स्वतः काही काढायचं म्हंटलं ना, की राडा झालाच!!
खूप प्रयत्न केला पण मनासारखं जमतच नाही...
आजवर अनेक कागद आणि रंग नासले आहेत...
पुलंच्या शब्दात सांगायचं झालं तर, 'चित्रकलेचा दोर मी कापून टाकला आहे!!'
:(

पियुशा's picture

10 Jun 2012 - 3:21 pm | पियुशा

वॉव यातुन काहीतरी सुरेख निर्मिती होणार हे नक्की :)

खेडूत's picture

10 Jun 2012 - 5:28 pm | खेडूत

छान! आता वाट पहातोय..लवकर येऊ द्या!

चौकटराजा's picture

10 Jun 2012 - 7:38 pm | चौकटराजा

सुमारे ४२ वर्षा पूर्वीची गोष्ट . मी आत्याकडे मुंबईस एप्रिल महिन्यात गेलो होतो. रंगसम्राट रघुवीर मुळगांवकार व दीनानाथ दलाल ही दोन नांवे चित्रकलेच्या विशेषत: मुखपृष्ठे व दिनदर्शिका व दिवाळी अंक या क्षेत्रात फार आदराने व लाडाने घेतली जात. मुळगांवकरांची व दलालांची शैली भिन्न. त्यावेळी मुळगावकरांचा स्टुडिओ मुंबईत गिरगावात बॉम्बे बुक डेपो या दुकानावरच्या वरील मजल्यावर होता एवढे मला माहीत झाले होते. मी नववीत वगैरे असेन. फिरत फिरत गेलो. खाली बुक डेपोच्या शोकेस मधे मुळगावकरांचेच मूळ आकाराचे व मूळ चित्र लावलेले होते. धाडस करून आपण मुळगावकरांना भेटावे असे मनात आले व सरळ त्यांच्या स्टुडिओची बेल दाबली. दरवाजा उघडला गेला. दारात एक बारीक बांध्याचे, गोरेटेले, नाजुक प्रकृती असलेले ,अंगात पांढरा सदरा काळे जाकिट च पांढरे शुभ्र तलम धोतर अशा पहनाव्यात असलेले हे मुळगावकरच असावेत अशी माझी खात्री पटली. कोठेतरी त्यांचा फोटो पूर्वी पाहिला होता. मी सर जरा आत येउ का असा भीतभीतच प्रश्न केला. त्यानी मानेनेच होकार दिल्यावर पाया पडून त्यानी सांगितलेल्या जागी बसलो. मी चाहता आहे पुण्याच्या बाजूने भेटावयास आलो वगैरे सांगितल्यावर मला आपल्याला चित्र काढताना पहावयाचे आहे अशी मनिषा व्यक्त केली. तेंव्हा मी उद्या लंडनला सहा महिन्यासाठी चाललो आहे.मला इकडचा उन्हाळा जाचतो त्यामुळे सहा महिने तिकडे सहा महिने इकडे असे करतो असे त्यानी सांगितले. व त्यांचा आणखी एक स्टुडिओ एलफिनस्टन कॉलेजजवळ आहे. तिथे पुढच्या वेळी तुम्ही या. तुमची इच्छा पुरी होईल . असे त्यानी आशवासन दिले. मी मूळचा गोव्याचा असून कोणत्याही कला महाविद्यालयात गेलो नाही असेही त्यानी सांगितले. त्यानी बोलावल्याप्रमाणे " त्या " दुसर्‍या स्टुडिओत जाउन त्यांचे कुंचलाकाम पहाता आले नाही. त्यानंतर त्यांच्या दु: खद निधनाचीच बातमी कानावर आली. एखादा कसबी चित्रकार कोर्‍या निर्विकार कॅनव्हास वर रस , अर्थ , पोत, वेग, रंग यांचे विश्व कसे निर्माण करतो हे पहायला कधी जमलेच नाही. तो योग मिपा च्या माध्यमातून आज आला. म्हणून सर्वांसाठी खास करून चित्रगुप्त काकांसाठी ही आठवण !
@ चित्रगुप्त जी, अजब धागा पाहून कृतज्ञता हा एकच शब्द समोर येतो.

चित्रगुप्त's picture

11 Jun 2012 - 7:29 pm | चित्रगुप्त

आता चित्र वाळत आलेले आहे, लवकरच कामाला सुरुवात करतो...

खुपच सुंदर
चित्र बघायचच आहे ....

प्रास's picture

11 Jun 2012 - 9:06 pm | प्रास

मिपावर काय काय बघायला मिळेल सांगता येत नाही. आज हे चित्रगुप्तकाकांचं एका चित्राचं डॉक्युमेंटेशन बघायला मिळणं म्हणजे एक पर्वणीच आहे.
काका, चित्र छान बनतंय असं वाटतंय.
पुढल्या प्रक्रिया समजून घेण्यास इच्छुक आहे.
वाट बघतोय.....
आहान पण मस्त आहे. :-)

स्मिता.'s picture

11 Jun 2012 - 9:16 pm | स्मिता.

आहानचे फोटो तर मस्त आले आहेत. आजोबांकडून चित्रकलेचं बाळकडू मिळतंय त्याला.
संपूर्ण झालेलं चित्र बघायची उत्सुकता आहे. ते पूर्ण करण्यात आहानचा सहभाग असणार का? (सहभागी झाल्याशिवाय तो कसला सोडतोय :D )

स्मिता.'s picture

11 Jun 2012 - 9:21 pm | स्मिता.

प्रकाटाआ

गणपा's picture

11 Jun 2012 - 9:48 pm | गणपा

मस्त ! मस्त !! मस्त !!!

अथ पासुन इती पर्यंत एका चित्राचा प्रवास पहायला मिळणार. क्या बात है.

आवांतर : दुधावरची साय फारच गोड आहे. :)

स्पंदना's picture

12 Jun 2012 - 9:32 am | स्पंदना

फारच कल्पक धागा. उत्सुकता चाळवली.

नातवावर फार जीव दिसतोय, अगदी बाळकडु मिळत आहे त्याला चित्रकलेच.

सहज's picture

12 Jun 2012 - 9:57 am | सहज

लेखमाला बघत /वाचत आहे.

(स्वगतः - मुळ लेखात कुठेच आजोबा-नातू हे शब्द आले नसतानाही, प्रतिसादात मात्र तसेच स्टिरीओटाइप चित्र का बरे रंगवले जात असावे? )

ऋषिकेश's picture

12 Jun 2012 - 10:16 am | ऋषिकेश

अत्यंत रोचक.. असे काम लाईव्ह बघायला मिळणे म्हणजे कमालच!
अनेक आभार!

जे.पी.मॉर्गन's picture

12 Jun 2012 - 10:44 am | जे.पी.मॉर्गन

निदान आता चित्रकलेतलं काही कळेल ह्या एकमेव आशेवर ह्या धाग्यावर डोळा ठेऊन आहे. तुम्ही हा धागा काढेपर्यंत चित्रकला हा विषय ह्या जन्मासाठी ऑप्शनला टाकला होता.

बादवे - मी इ. ८ वीत काढलेली "दहिहंडी" आणि "विहीरीवर कपडे धुणार्‍या बायका" ही दोन चित्रे तुमच्या पॅरीसच्याच लूव्र का कुठल्याश्या म्यूझियम मध्ये "मोनालिसा" आणि "मॅडोना ऑफ द रॉक्स" (हे नावही मॅडोनामुळे लक्षात राहिलंय) बरोबर त्याच दालनात लावली जावीत अशी इच्छा आमच्या ड्राँईंग टीचरनी व्यक्त केली होती.

(तरीही) धागा वाचतो आहे.

जे पी

जागु's picture

12 Jun 2012 - 11:51 am | जागु

छान.

खेडूत's picture

13 Jun 2012 - 10:16 pm | खेडूत

वाळलं काहो? आम्ही वाट बघत बसलोत!
सध्या एक जुना राजवाडा किंवा संकल्पचित्र दिसून रहायलय ! घड्याळाच्या काट्याच्या दिशेने उभे केल्यास एक गूढ चेहरां पण दिसतोय!

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jun 2012 - 10:45 pm | अत्रुप्त आत्मा

वाळलं का...?

अन्या दातार's picture

14 Jun 2012 - 12:18 am | अन्या दातार

पहिल्यांदाच असा प्रकार बघायला मिळतोय. छान व रोचक धागा :)

चित्रगुप्त's picture

27 Oct 2013 - 8:48 pm | चित्रगुप्त

नवीन मिपाकरांसाठी पुन्हा एकदा.

गजानन५९'s picture

28 Oct 2013 - 12:18 pm | गजानन५९

अप्रतिम इतकेच बोलू शकतो.

खरे तर कुठलीही कला ( साला आमच्याकडे असले काही कलागुण असते तर ) हि देवाची देणगी वगेरे असतेच पण स्वतः तो कलाकार त्यावर किती मेहनत घेतो त्यावर त्या कलेची योग्यता ठरते, अर्थात हे माझे वयक्तिक मत आहे.
श्री चित्रगुप्त आम्ही खूप नशीबवान आहोत कि आम्हाला एखादी कलाकृती घडताना बघायला मिळत आहे ते.
खूप धन्यवाद.

चित्रगुप्त's picture

25 Jan 2018 - 5:10 pm | चित्रगुप्त

नवीन मिपाकरांसाठी पुन्हा एकदा.