गाभा:
"सत्यमेव जयते" या आमीर खानच्या मालीकेवरून टिका करणार्यांचा एक मुद्दा हा त्या मालीकेतून होणार्या उत्पन्नाविषयी आहे. अंदाजे तीन कोटींची मालीका तयार करून आमीर केवळ पैसे मिळवतोय आणि दुसरीकडे जनजागृती/लोकशिक्षण/सामाजीक प्रश्नांस वाचा फोडणे, जे काही असेल त्याचा नुसता देखावा करत आहे... मला तसे वाटत नाही हे त्या चर्चांमधून सांगून झाले आहेच तसेच इतरांचे पण या मालीकेसंदर्भात आणि आमीरसंदर्भात समान अथवा विरोधी विचार समजले आहेत. त्यामुळे ह्या चर्चेचा विषय कृपया आमीर कस्सा चांगला आहे अथवा किती चालू आहे या विषयी नसावा. त्याच्याशी आपले कुठल्याच अर्थाने देणेघेणे नाही... त्यावर चर्चा नको. पण खालील प्रश्नांच्या संदर्भात चर्चा व्हावी असे वाटते:
- समाजसेवा म्हणजे नक्की काय? कशाला म्हणावे?
- केवळ स्वतःला समाजसेवक म्हणून जाहीर केलेल्यांनी आणि तशा सेवाभावी संस्थांनी केलेली सेवा म्हणजेच समाजसेवा का? (ह्यात समाजसेवक/सोशल वर्क ही पदवी घेऊन काम करणारे हा चर्चेचा मूळ विषय नाही. तरी त्यावर चर्चासंदर्भ असलेली मते मांडली तरी उत्तमच).
- नित्य व्यवहाराने जगणार्या प्रोफेशनल/व्यावसायीक माणसाला समाजसेवा करायची संधी कशी मिळेल? - फक्त देणग्या देऊन का बाह्या सावरत हाताने नेहमी नाही पण शक्य होईल तेंव्हा शक्य तितके काम करायची संधी शोधून आणि वापरून?
- जे दिवसरात्र समाजसेवेचे काम करतात त्यांनी पैशाची आणि व्यक्तीगत सुखाची अपेक्षा ठेवणे, मुलाबाळांचे-संसाराची योग्य व्यवस्था लावणे योग्य आहे का? असल्यास त्यांनी जर कुठलेही ढोंग न बाळगता अशा समाजकार्यातून पैसे कमावले तर ते योग्य आहे का? - या संदर्भात नावे न घेता उदाहरण देतो - जर एखाद्या संस्थेस (सरकारी/बिनसरकारी/खाजगीकुठलेही) अनुदान मिळत असेल आणि त्यात त्यांच्या वेळेचे-श्रमाचे गणित साधून त्यांना योग्य पगार मिळत असेल तर त्यात काही गैर वाटते का? (परत हे मी प्रोफेशनल सोशलवर्कर्स बद्दल म्हणलेले नाही).
- कुठल्याही क्षेत्रात नावाजलेल्या व्यक्तींनी समाजसेवा कशी करावी ही अपेक्षा आहे? ती करताना त्यांनी स्वतःच्या खिशाला भुर्दंड पाडूनच ते काम केले पाहीजे असे वाटते का?
- जेंव्हा टाटा बिर्ला सारखे उद्योजक आणि इतर अनेक ट्र्स्ट काढून सेवाभावी संस्थांना पैसे देतात तेंव्हा ती समाजसेवा असते, का केवळ सध्याच्या भाषेत कॉर्पोरेट सोशल रीस्पॉन्सिबिलीटी (सीएसआर) इतकेच असते?
अजून काही या संदर्भात मुद्दे असले, काही उदाहरणे असली तर अवश्य सांगावीत ही विनंती.
प्रतिक्रिया
22 May 2012 - 1:09 am | अर्धवटराव
समाजसेवेसाठी सर्वात महत्वाची, इनफॅक्ट वन अॅण्ड ओन्ली रिक्वायरमेंट म्हणजे "समाज" नावाचे काहितरी अस्तित्वात आहे हे मनापासुन स्विकारणे. समाज आणि समुदायात फरक करता येणे हि त्याची वैचारीक बाजु. एकदा हे समाजाचे अस्तित्व मनापासुन स्विकारले कि मग कुठलिही सेवा हि समाजसेवाच होउन जाते... त्याकरता वेगळं काहि करायची आवश्यकता उरत नाहि. मुंगीला आणि हत्तीला जंगलाची जाणिव असावी. मग मुंगीचं वारुळ बनवणं आणि हत्तीचं आपल्या धडकेने वृक्ष तोडणं हि समाजसेवाच.
अवांतर - फुकटचे दुर्बोध लिखाण करायची हि नवीन खोड कुठुन लागली देव (किंवा यकु) जाणे...
अर्धवटराव
22 May 2012 - 10:23 am | ऋषिकेश
अरेच्या! पुन्हा त्याच पठडीतला काथ्याकुट!
असो. टंकाळा आल्याने पास! :)
22 May 2012 - 11:04 am | नगरीनिरंजन
समाजसेवा हे डिसफंक्शनल समाजाचे एक लक्षण आहे.
समाजसेवेसाठी आवश्यक असलेली एक प्रमुख गोष्ट म्हणजे एक डिसफंक्शनल समाज. ज्यात विकासाची बेटे असतील आणि बाकी वंचित लोकांचा महापूर. समाज डिसफंक्शनल नसेल तर समाजसेवेची गरजच काय? अशा समाजात काही लोक कणव आणि स्वानंद म्हणून तर काही लोक करिअर म्हणून या वंचित लोकांना थोडं-फार काहीतरी मिळवून द्यायचा प्रयत्न करतात. ती समाजसेवा. आजकाल हे थोडं-फार काहीतरी म्हणजे दोन घटकेची प्रसिद्धीही असू शकते.
अजिबात नाही. पण पूर्णवेळ समाजसेवा सुरू केली की समाजसेवक ही उपाधी चिकटतेच कधी ना कधी.
अन्यथा नाही.
संधीच संधी असतात. दोन्हीप्रकारच्या. उदाहरणार्थ मी समाजसेवा म्हणून आपल्या भागातल्या नगरसेवकाला किती निधी मिळाला आणि त्याने किती खर्च केला याचे आकडे मिळवून पाठपुरावा करू शकतो किंवा मग घरी ते क्रायवाले वगैरे आले की म्हणतील तेवढे पैसे द्यायचे. कोणत्या लेव्हलपर्यंत जायची हौस आहे त्यावर अवलंबून आहे.
पास. व्यक्तिगत निवड.
नावाजलेल्या व्यक्तींनी जिथे जिथे वंचना आहे तिथे तिथे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी घेऊन जावे म्हणजे लोकांना कळेल की 'अरे इथे वंचना आहे'. मग पुढचं सोपं आहे. या कामासाठी नावाजलेल्या व्यक्तींनी मोबदला घ्यायचा की नाही ही त्यांची निवड आहे.
22 May 2012 - 1:51 pm | नाना चेंगट
जाऊ द्या हो विकासराव ! कशाला येवढं मनावर घेता ?
समाज समाज म्हणून ज्याची सेवा केली जाते तो पायी पण चालू देत नाही गाढवावर पण बसू देत नाही.
22 May 2012 - 3:54 pm | कुंदन
असु दे रे नान्या, चल आपण पण समाज सेवा करु.
22 May 2012 - 2:22 pm | योगप्रभू
वैयक्तिकरीत्या मदत केली तरी तिचा आवाका मर्यादित राहतो. त्याऐवजी समाजसेवेसाठी इच्छुक असे समविचारी गट स्थापावेत. समजा २५ जणांचा एक गट झाला आणि दरवर्षी त्यांनी १००० रुपये काढले तर त्यातून २५००० रुपये निधी जमा होतो. त्यात तुम्ही काही भरीव काम करु शकता. अत्यंत गरीब विद्यार्थांना शैक्षणिक सामग्री, वृद्धांसाठी आरोग्यशिबिरे भरवण्यातील काही संयोजनखर्च उचलणे, मोफत औषधवाटप किंवा तीव्र पाणीटंचाई असलेल्या जागी काही शाश्वत जलपुरवठा सोय, अशी कामे त्यातून होतात. समाजात असे हजारो गट कार्यरत असतील तर सगळ्यांचे जीवन किमान सुसह्य होऊ शकते. काही समाजसेवा खूप कमी खर्चात पण करता येतात. उदाहरणार्थ - रद्दीच्या दुकानातून स्वस्त किंमतीत मुलांची पुस्तके खरेदी करुन त्याचे एखाद्या सार्वजनिक ठिकाणी (मंदिरे, समाजमंदिरे, खेड्यापाड्यांतील शाळा) वाचनालय सुरु करता येते. बल्क खरेदीद्वारे स्वस्त किंमतीत रोपे मिळवून, वृक्षारोपण व निसर्गसंवर्धन करुन वैराण परिसर हिरवाईने फुलवता येतो. 'केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे,' यावर विश्वास ठेवावा.
22 May 2012 - 5:55 pm | राही
अवकाशात आपण एकटेच नाही आहोत, इतरही अनेक माणसे,जीव,वस्तू त्यात आहेत आणि त्यांना त्या त्या जागी असण्याचा हक्क आहे; एव्ह्ढेच नव्हे तर ह्या सर्वांचा एकमेकांशी संबंध आहे,एक मधुर नाते आहे याचे सतत स्मरण ठेवून त्यानुसार तारतम्याने व्यवहार राखल्यास आपल्या हातून घडणारे प्रत्येक कृत्य ही समाजसेवाच असेल. आपले मर्यादित आणि विस्तारित कुटुंब,मित्रमैत्रिणी,शेजारी,गल्लीतले लोक,गाववाले,प्राणी, वनस्पती,जमीन,डोंगर.ओढे,नद्या अशा तर्हेने हे व्यवहाराचे वर्तुळ विस्तारत जाते. या प्रत्येकाशी घर्षण होऊ न देता सुसंवाद आणि समतोल राखता येऊ शकणे ही खूप मोठी अचीव्मेंट होऊ शकते. तारतम्य आणि सदसद्विवेकबुद्धी हे दोन कळीचे शब्द लक्षात ठेवले की सगळी दारे उघडतात. मग वेगळ्या अशा समाजसेवेचे प्रयोजनच उरत नाही. अपेक्षा,निरपेक्षा,ढोंग,भंपकपणा,प्रसिद्धीपरायणता,आविर्भाव,अभिनिवेश हे सर्व प्रकार आपोआपच विलय पावतात. मुद्दाम असे काही करायची गरजच उरत नाही. सारे सहज होऊन जाते.
या प्रकारच्या व्यवहारात कोणकोणती कृत्ये बसू शकतात? तर अक्षरशः अगणित. किंबहुना सर्वच.
उदाहरणार्थ, घरामधे सर्वांशी प्रेमाने वागणे,त्याचबरोबर स्वतःचा वापर न होऊ देणे, समाधानाने, काटकसरीने राहाणे (तेन त्यक्तेन भुञ्जीथः) परिसर आणि पर्यायाने पर्यावरण शुद्ध राखणे,ऑफिस मधे किंवा इतरत्रही कामात कुचराई किंवा हलगर्जीपणा न करणे,आपल्यापेक्षा परिस्थितीने कमी असतील त्यांच्याशी सहानुभूतीने वागणे(उपकारकर्त्याच्या भावनेतून नव्हे) जमेल तशी/तेव्हा त्यांना (ओशाळे न करता) मदत करणे,कोणी रुग्णालयात दाखल असेल तर त्याची घरची कामे करणे, सेवेसाठी एखादी पाळी स्वतःसाठी मागून घेणे,आनंदवन,हेमलकसा,हिवरे बाजार अशासारख्या ठिकाणी भेटी देऊन चार शब्द कौतुकाचे बोलणे आणि त्यांची मौखिक प्रसिद्धी करणे, (आपण सहलींना जातच असतो.एखादी सहल इथेही काढावी,) आपली वैयक्तिक मते फार न ताणणे पण त्याच वेळी आपल्या अनुभवसिद्ध आणि अभ्याससिद्ध मतांशी ठाम राहाणे, आपले भले करताना इतरांचेही भले होत असेल तर अशी गोष्ट प्राधान्याने करणे (जे आमीर खान करतो आहे) इत्यादि इत्यादि.