॥ज्ञानेश्वरी ई पारायण अभियान॥

ई साहित्य's picture
ई साहित्य in पुस्तक पान
21 May 2012 - 10:11 pm

ज्ञानेश्वरी ई पारायण
जेथे जेथे मराठी माणूस तेथे तेथे ज्ञानेश्वरी

गेल्या पुस्तक दिनाच्या दिवशी एक सर्वे प्रसिद्ध झाला. त्यात म्हटलंय की मराठीमध्ये सर्वात जास्त खपणारं पुस्तक म्हणजे ज्ञानेश्वरी. जवळजवळ प्रत्येक मराठी घरात ज्ञानेश्वरी असतेच असते. आणि प्रत्येक मराठी मुलगा, मुलगी आयुष्यात एकदातरी ज्ञानेश्वरी उघडतोच किंवा उघडतेच. पण संपूर्ण ज्ञानेश्वरी प्रत्येक मराठी माणूस वाचतोच असे नाही. कारण १२९१ साली प्रचलित असलेल्या प्राकृतबहुल मराठीत लिहीलेली ज्ञानेश्वरी आजच्या तरुणांना समजायला कठीण जाते. अनेकजण प्रयत्न करतात पण नंतर सोडून देतात. कारण प्राकृत भाषा आजच्या तरूणाच्या ओळखीची राहिलेली नाही.

अशा वेळी ई साहित्य प्रतिष्ठान या संस्थेने श्री विजय पांढरे यांनी २१व्या शतकातील सोप्या मराठीत ओवीबद्ध केलेली भावार्थ ज्ञानेश्वरी इंटरनेटवर आणून त्याचे ई पारायण सुरू केले आहे. स्वतःच्या सोयीच्या वेळेनुसार, रोजचा केवळ अर्धा तास, असे फ़क्त एकोणतीस दिवस वाचन करून आपण ज्ञानेश्वरीचे पूर्ण पारायण करू शकता. ही ज्ञानेश्वरी मूळ ज्ञानेश्वरीप्रमाणेच ओवीबद्ध आहे. फ़क्त त्यातल्या जुन्या अवघड शब्दाच्या जागी नवीन प्रचलित भाषेतला शब्द घातला आहे. त्यामुळे ती समजायला खूपच सोपी झाली आहे. मूळ प्राकृत ज्ञानेश्वरीइतकीच रसाळ, सुंदर आणि मोहक. या ज्ञानेश्वरी सोबत मूळ ज्ञानेश्वरीचीही ई प्रत उपलब्ध आहे. श्री विजय पांढरे हे इंजिनियर असून महाराष्ट्रातल्या इंजिनियर्स ना शिकवणार्या इन्स्टिट्युटचे (MERI) प्राचार्य आहेत. त्यामुळे तरुण मंडळींची मनःस्थिती ते जाणतात.
तसंही ज्ञानेश्वरी वाचण्याचं काही वय नसतं. जर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी वयाच्या सोळाव्या वर्षी लिहीली तर आपण तरूण वयात वाचायला काय हरकत आहे? उलट आताच्याच युगातील तरुणांसाठी ज्ञानेश्वरी अत्यंत आवश्यक आहे. सध्याच्या जीवनात स्पर्धा आणि हव्यासापोटी प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या तणावातून हेवेदावे आणि अशांती पसरत आहेत. त्यामुळे सध्याच्या तरुणांचे आयुष्य नैराश्याने वेढले जात आहे. आपल्या जीवनातील चिंता, भय, तणाव, दुःख अदृश्य होऊन जर सुंदर , शांत, निरामय आयुष्य अनुभवायचे असेल तर संतांचा निरोप, संतांचा उपदेश समजावून घ्यावा लागेल. व त्यानुसार सहज निष्काम जीवन आपल्याला स्वतःच्याच अंतरंगांतून शोधावे लागेल. त्याशिवाय मानवी दुःख दूर होऊच शकत नाही. केवळ भौतिक प्रगतीने आणि भौतिक साधनांनी जीवनात सुख व तृप्ती लाभूच शकत नाही. म्हणून भय, चिंता व तणावातून मुक्ती हवी तर माऊलींनी सांगितलेला शांतीचा, समाधानाचा, दुःख मुक्तीचा व मनःसमत्वाचा मार्ग समजून घ्यावा लागेल.
ज्ञानेश्वरीमध्ये परमार्थ तर आहेच. पण परमार्थाची सुरूवात मनुष्य जन्म उत्कृष्टपणे जगण्यातून होते.
त्यामुळे सुखी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणता येईल असा हा सुंदर मराठी ग्रंथ प्रत्येक मराठी माणसाकडे हवाच. ई साहित्य प्रतिष्ठानने यासाठी “जेथे जेथे मराठी माणूस तेथे तेथे ज्ञानेश्वरी” असा संकल्प सोडला असून जगभरातील १००% मराठी माणसांच्या कॉंप्युटरपर्यंत ही ज्ञानेश्वरी पोचत नाही तोवर हे अभियान चालू राहील असे ई साहित्य प्रतिष्ठानच्या लोकांनी ठरवले आहे. श्री विजय पांढरे लिखित २१व्या शतकासाठी ओवीबद्ध केलेली भावार्थ ज्ञानेश्वरीची ई प्रत या निरनिराळ्या मार्गांनी कॉंप्युटर वापरणार्या जगातील प्रत्येक मराठी माणसाला विनामूल्य उपलब्ध करून देण्याची योजनाबद्ध तयारी ई साहित्य प्रतिष्ठान यांनी चालवली आहे. यासाठी त्यांनी सव्वा लाख लोकांना ई मेल द्वारे ज्ञानेश्वरी पाठवायला सुरुवात केली आहे. शिवाय यात मिसळपाव व इतर मराठी मंडळींच्या सहभागाची अपेक्षा आहेच. याच्या प्रचारासाठी इंटरनेटवरील फ़ेसबुक, युट्युब, ट्विटर, ब्लॉग, ई मेल, ऑर्कुट, व मिसळपाव, मायबोलीसारख्या वेबसाईट अशा सर्व साधनांचा वापर केला जाणार आहे. त्याचबरोबर एफ़ एम रेडियो, वेब रेडियो आदी साधनांचाही वापर केला जाईल. ही विनामूल्य प्रत सर्व मराठी वेबसाईट्सना मुक्तपणे वितरणासाठी देण्यात येत आहे. त्याचबरोबर देशोदेशीच्या सर्व बृहन महाराष्ट्र मंडळांना या अभियानात सामिल करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. इंग्लंड आणि अमेरिकाच नव्हे तर उझबेकिस्तान आणि इस्त्रायल, टांझानिया, न्युझीलंडसारख्या प्रत्येक देशात आता मराठी माणूस पोचला आहे. आणि या प्रत्येक मराठी माणसाच्या डेस्कटॉपवर ई ज्ञानेश्वरीची आजच्या भाषेतील प्रत उपलब्ध करून दिली जाणार आहे. या कार्यात शेकडो स्वयंसेवक आपल्या नांवाची नोंदणी करत आहे. आणि जोवर १००% मराठी माणसांपर्यंत ज्ञानेश्वरी पोचत नाही तोवर हे अभियान चालवले जाणार आहे. सुमारे १२ लाखांहून अधिक ई प्रती वितरित होतील अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे या अभियानात सर्वाधिक सहभाग हा चाळीस वर्षांखालील तरुणांचा असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर ३०-४० वर्षांपुर्वी भारत सोडून परदेशात स्थायिक झालेल्या ज्येष्ठांचाही उत्साही पाठिंबा या अभियानाला मिळतो आहे.
आजच्या धकाधकीच्या, स्वकेंद्रित जीवनात ज्ञानेश्वरीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आपण मराठी असण्याचा हा एक फ़ायदाच म्हणा की इतका सुंदर ग्रंथ आपण मूळातून वाचू शकतो. आणि स्वतः एकटेच नव्हे तर आपल्या आजूबाजूच्या लोकांना , आप्तमित्रांनाही हा सुखाचा मार्ग दाखवू शकतो.
या अभियानात प्रत्येक मराठी माणसाने आपल्या हाती जे असेल ते साधन वापरून सहभागी व्हावे आणि हे अभियान संपूर्ण यशस्वी करावे असे आवाहन ई साहित्य प्रतिष्ठानने सर्वांना केले आहे. ई साहित्य प्रतिष्ठान हे गेल्या पाच वर्षांपासून ई पुस्तकांच्या निर्मितीचे व विनामूल्य वितरणाचे काम करत आहेत. आजवर त्यांनी २०० हून अधिक ई पुस्तकांची निर्मिती आणि ई मेल द्वारे वितरण केले आहे. सुमारे सव्वा लाख मराठी वाचकांचा e mail बेस असलेल्या ई साहित्य प्रतिष्ठानचा निदान बारा लाख वाचकांचा बेस तयार करण्याचा संकल्प आहे. त्यांच्या वेबसाईटवर सर्व पुस्तके वाचायला मिळतील. किंवा त्यांना आपला ई मेल कळवल्यास त्यांची ई पुस्तके विनामूल्य मिळतील.
या अभियानात सामिल होण्यासाठी लिहा : esahity@gmail.com
संपूर्ण ज्ञानेश्वरीसाठी व अधिक माहितीसाठी भेट द्या : www.esahity.com
य़ु ट्युब : http://www.youtube.com/watch?v=yCHZ85Xzuxc&feature=share
Facebook वर पहा : http://www.facebook.com/edyaneshwari
ब्लॉगला भेट द्या : http://edyaneshwari.blogspot.in/
या शिवाय या ज्ञानेश्वरीचे तीस तासांचे सांगीतिक पारायण सीडीवर उपलब्ध असून कोणाला FM Radio किंवा तत्सम प्रसार माध्यमासाठी हवे असल्यास संपर्क साधावा. हॆ सांगितिक ई पारायण लवकरच स्वरनेटाक्षरी या ई साहित्य प्रतिष्ठानच्या ऑडिओ वेबसाईटवर उपलब्ध हॊईल.

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

21 May 2012 - 10:20 pm | बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद आणि स्वागत!

पैसा's picture

21 May 2012 - 10:46 pm | पैसा

उत्तम प्रकल्प. सर्वांना वाचण्यासारखं आहे. सर्व लिंक्ससाठीही धन्यवाद!

कवितानागेश's picture

21 May 2012 - 11:41 pm | कवितानागेश

अरे वा. छान. :)

या धाग्यासाठी 'वाचनखूण साठवा' हा पर्याय का येत नाहिये.. :-(

विकास's picture

22 May 2012 - 12:04 am | विकास

खूप छान प्रकल्प आहे! असेच सर्व संतसाहीत्यासहीत मराठीतले इतर अक्षरवाड्मय पण प्रसिद्ध करता येउंदेत अशी मनःपूर्वक शुभेच्छा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 May 2012 - 5:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खूप छान प्रकल्प आहे! असेच सर्व संतसाहीत्यासहीत मराठीतले इतर अक्षरवाड्मय पण प्रसिद्ध करता येउंदेत अशी मनःपूर्वक शुभेच्छा!

असंच बोल्तो.

-दिलीप बिरुटे

नाना चेंगट's picture

22 May 2012 - 4:17 pm | नाना चेंगट

शुभेच्छा !

ई साहित्य's picture

25 May 2012 - 5:01 am | ई साहित्य

सर्वांचे धन्यवाद

भावार्थ ज्ञानेश्वरी व मूळ ज्ञानेश्वरी तसेच त्याचे mp3 निरूपण या ठिकाणी उपलब्ध आहे.

ज्ञानेश्वरीचे सर्व अध्याय :
http://edyaneshwari.blogspot.in/

http://www.esahity.com/p/blog-page_02.html