निःशब्द तळ्याच्या काठी, रात्रीचे चांदणे झुलते
नि:संग फकिरी अवघी, मग कवितेसाठी झुरते... १
नादास मोह शब्दांचे, शब्दास शाप अर्थांचे
मौनाच्या देहावरती, गाण्याचे गोंदण होते.... २
रात्रीस वेध दिवसांचे, दिवसास कूस रात्रीची
सजणीचा उसवता श्वास, दिवसाचे सार्थक होते... ३
श्वासास तडे मृत्यूचे, मृत्यूत नभाशी संग
मिसळता मीच माझ्यात, श्वासात कस्तुरी भिनते... ४
उःशाप विषादावरचा आकाश सांगूनी गेले
भेदून व्यूह मन सगळे कृष्णा सामोरे जाते....५
तुज उशीर झाला सजणे, शब्दांच्या तुटल्या तारा
देहात भिनूनी आता, निर्वाण प्रतीक्षा करते.... ६
प्रतिक्रिया
19 May 2012 - 11:31 pm | प्रचेतस
छान झालीय कविता.
20 May 2012 - 12:09 am | किसन शिंदे
सुदंर आहे..
20 May 2012 - 3:17 am | जेनी...
रात्रीस वेध दिवसांचे, दिवसास कूस रात्रीची
सजणीचा उसवता श्वास, दिवसाचे सार्थक होते... ३
ह्या ओळी खुप आवडल्या :)
20 May 2012 - 9:35 pm | निरन्जन वहालेकर
" नादास मोह शब्दांचे, शब्दास शाप अर्थांचे
मौनाच्या देहावरती, गाण्याचे गोंदण होते ".... २
वा ! खुप छान ओळी !
21 May 2012 - 6:02 am | स्पंदना
सुन्दर !
21 May 2012 - 6:35 am | यशोधरा
सुरेख.
21 May 2012 - 7:13 am | स्पंदना
हा माझा शब्द आहे. म्हण्जे मी वापरते बहुतेकदा.
21 May 2012 - 9:36 am | यशोधरा
यापुढेही वापरत जा. माझी काही हरकत नाहीये. :P
21 May 2012 - 9:01 am | संजय क्षीरसागर
>शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते ।
ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते ॥
=शब्द कुणाचा नसतो, अर्थ आपला असतो,
अर्थांचे जुळणे आपुल्या, स्नेहाचा धागा असतो
सर्वांना धन्यवाद!
21 May 2012 - 11:08 am | जेनी...
शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते ।
ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते ॥
=शब्द कुणाचा नसतो, अर्थ आपला असतो,
अर्थांचे जुळणे आपुल्या, स्नेहाचा धागा असतो
=शब्दांची माया सगळी , अर्थास जन्म तो देतो |
अर्थास उलगडन्या शब्द , शब्दाच्या मदतीस येतो ||
21 May 2012 - 11:54 am | संजय क्षीरसागर
शब्दांची माया सगळी , अर्थास जन्म तो देतो
नजरेस जराशी नजर तुझी, अर्थाला आशय येतो
21 May 2012 - 12:43 pm | नाना चेंगट
माफ करा पण कविता आवडली नाही.
शब्दापुढे शब्द मांडले आहेत. लय आहे. पण कुठेतरी काहीतरी कमी पडत आहे.
प्रवीण दवणे वगैरे पाट्यापाडू कवींसारखे कविता लेखन झाले आहे.
तीच तीच प्रतिके आणि तेच तेच खोटे खोटे उसासे यावर किती काळ कविता पाडल्या जाणार आहेत कळत नाही.
असो. तुमच्यात थोडी फार क्षमता आहे (असे वाटते) म्हणून लेखन प्रपंच अन्यथा दुर्लक्षून मारले असते.
21 May 2012 - 2:02 pm | संजय क्षीरसागर
म्हणजे `कविता मी लिहीली, अर्थ वाचकांनी काढावा' असा माझा अप्रोच नाही. माझ्या लेखनाची संपूर्ण जवाबदारी माझी आहे आणि ते प्रत्येक प्रामाणिक वाचकापर्यंत पोहोचावं अशी इच्छा आहे त्यामुळे `शब्दापुढे शब्द, तीच तीच प्रतिके आणि तेच तेच खोटे खोटे उसासे' असा माझा `प्रतिसाद' देखील असणं शक्य नाही, लेखनाची तर बातच सोडा. तुमचा प्रतिसाद प्रामाणिक आहे म्हणून हे उत्तरः
निःशब्द तळ्याच्या काठी, रात्रीचे चांदणे झुलते
नि:संग फकिरी अवघी, मग कवितेसाठी झुरते... १
पहिली ओळ हा प्रसंगाचा चित्रदर्शी माहौल आहे, तो दुसर्या ओळीची पूर्वभूमिका मांडतो.
अशा नि:शब्द तळ्याच्या काठी जेव्हा रात्रीचं चांदणं झुलतं तेंव्हा `विरक्त फकिरी मानसिकता' (जिला कशाचा स्पर्श होऊ शकत नाही) ती सुद्धा अभिव्यक्तीला उत्सुक होते म्हणून : नि:संग फकिरी अवघी, मग कवितेसाठी झुरते
नादास मोह शब्दांचे, शब्दास शाप अर्थांचे
मौनाच्या देहावरती, गाण्याचे गोंदण होते.... २
शब्दांना अर्थ नाही (पण त्यांना प्रत्येकानं आपले अर्थ दिल्यानं हरेक शब्द `अर्थाचा शाप' घेऊन येतो). अर्थात प्रत्येक शब्द मुळात फक्त `स्वर' आहे पण स्वराला अभिव्यक्त व्ह्यायला शब्द लागतो, म्हणून
नादास मोह शब्दांचे, शब्दास शाप अर्थांचे
पण इतक्या शांततेत, शब्द काय कामाचे? ज्या मौनातून ते उमटतायत त्याला सजवायला गाणंच हवं! म्हणून
मौनाच्या देहावरती, गाण्याचे गोंदण होते....
असे एकसोएक अर्थ आहेत, पुढच्या अर्थाची फरमाईश झाली तर पुन्हा लिहीन.