ईमानदारीच्या आईचा घो?

मराठमोळा's picture
मराठमोळा in काथ्याकूट
2 Mar 2012 - 7:09 am
गाभा: 

नमस्कार मंडळी,

हा लेख लिहायचे प्रयोजन म्हणजे नेहमी येणारे आणि मला नुकतेच जरा जास्तच आलेले अनुभव.
भ्रष्टाचार, सरकारी नोकरांची मनमानी, राजकारणी नेत्यांची लाज वाटायला लावणारी कृत्ये हे सर्व तर आहेच पण आपण स्वतः देखील कितपत ईमानदारीने वागतो याचा एक आढावा म्हणा हवं तर.

एकच प्रकरण - मला घर विकत घ्यायचं होतं. शोधाशोध सुरु झाली.. सर्वात पहिले मनात आलं ते म्हणजे घरांच्या वाढलेल्या किमती, खरं कारण नुसतच डिमांड सप्लाय गणित आहे का? माझ्या मते नाही.. वाढलेल्या किमतींमागे बिल्डर, त्यांना सपोर्ट देणारे नेते, तथाकथित गुंतवणूक्दार वर्ग आणि घरांची खरेदी विक्री करून देणारे एजंट हे देखील तितकेच जबाबदार आहेत.

आजकाल Resale घर घेणे म्हणजे एजंट शिवाय सोपं नाही. मुंबईत नविन घरं परवडत नव्हती, त्यात एखादं घ्यायचं ठरवलच तर बिल्डर २० टक्के काळा पैसा मागत होते, अधिक पार्कींगचा पैसा देखील काळाच द्या आणि फ्लोर राईज चा पैसा देखील काळा देत असाल तर घर मिळेल असं समोरासमोर बिल्डर च्या ऑफिसमधे गेल्यावर मला सांगण्यात आलं. मुंबईत नविन घर घेण्याचा विचार पुन्हा मनाला शिवला नाही.
कारण मला काळा पैसा देऊन घर घ्यायच नव्हतं.
यातून खालील काही गोष्टींची शक्यता वाटली.
१. बिल्डर काळा पैसा घेऊन टॅक्स चोरी करतात आणि राजकारणी लोकांना यातूनच काळाबाजारी करता येते.
२. ईन्वेस्टर लोकं बिल्डरला दर सहा महिन्याला किंमती वाढवण्यासाठी दबाव आणतात आणि किमती अव्वा च्या सव्वा वाढत जातात.
३. यातुन काळा पैसा मिळवणे आणि काळ्याचा पांढरा करणे सोपे जाते.

पुण्यात रिसेल घर शोधण्यासाठी एजंट लोकांना भेटणं सुरु केलं. यातले बरेच लोकं देखील चोर निघाले. घराच्या मालकाला हव्या असलेल्या किमतीपेक्षा जास्त मिळवून देतो असं हे घरमालकाला सांगतात आणि कमिशन तसेच २-४ लाख रुपये सहज घशात घालतात.
समजा एखादा फ्लॅट तुम्हाला आवडलाच तर किंमत वगैरे ठरते, तोपर्यंत घरमालक कोण हेही माहित नसतं. आणि बर्‍याचदा शेवटच्या क्षणाला घरमालक अमूक अमाउंट ब्लॅक मधे मागतो आहे असे सांगितले जाते.
"आजकाल ब्लॅक शिवाय कुठेच घर मिळत नाही" असे ज्ञानही आपल्याला दिले जाते.

घरमालक म्हणजे आपल्यासारखीच सामान्य माणसं. १५-२० लाख रुपये उदाहरण घेऊ. ईतका काळा पैसा सामान्य माणूस काय करणार बरं? फक्त टॅक्स वाचवण्यासाठी सामान्य माणून स्वतःच काळाबाजारी करतो. एवढंच काय जिथे वैयक्तीक फायदा दिसतो तिथे सामान्य माणून भ्रष्टाचार करतो आणि करणार्‍याचे समर्थनही करतो. मला एक पुर्ण पैसे व्हाईट मधे घेऊन घर देणारा व्यक्ती भेटला आणि मी घर घेतलही. पण काही सरकारी कामासाठी मी स्वतः नाकारले तरी वकीलाने स्वतःच्या फी मधून ते लाच दिलेले पैसे वसूल केले. मी त्याचा अप्रत्यक्ष रित्या भागीदार झालोच.

हे सगळं इथेच थांबत नाही. आजकाल अतिशय क्लिष्ट आणि संताप आणणार्‍या बँकेच्या गृहकर्ज प्रक्रियेतून जात असताना. घराचं वॅल्युएशन वाढवणे, कर्ज लवकर मंजूर करणे यासाठी देखील माझ्याकडे पैशाची मागणी करण्यात आली. हे सर्व करून देणारे एजंटही आहेत म्हणे.

कॉर्पोरेशन/ईलेक्ट्रिसिटी डीपार्टमेंट मधे घर नावावर करणे यातही हे सर्व येणारच आहे आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या मी याचा भागीदार होणारच आहे. स्वतः ईमानदार राहण्याचा कितपत प्रयत्न करायचा. प्रत्येक ठिकाणी फाईट करण्यासाठी वेळही हवाच.

हे सगळ फक्त एका अनुभवावरून..
मी एकदा वाहतुकीचा नियम पाळला, (दिवसा, ट्रॅफिक असताना, लाल दिवा असताना थांबून राहिलो) तर एका रिक्क्षावाल्याबरोबर मारामारीपर्यंत वेळ गेली होती. मागून हॉर्न वाजवणारे, शिव्या देणारे सामान्य लोकंच होते.
रेशन कार्ड, कॉलेज/शाळा अ‍ॅड्मिशन, सरकारी/खाजगी नोकर्‍या, जात पडताळणी, अनधिकृत बांधकाम, टॅक्सचोरी आणि अशाच असंख्य प्रकारात पदोपदी भ्रष्टाचार करणारे आपणच आहोत तर मग चांगलं सरकार आणि नेते मिळावेत ही अपेक्षा आपण कोणत्या आधारावर करतो देव जाणे.

धन्यवाद.

आपला,
मराठमोळा.

प्रतिक्रिया

श्री गावसेना प्रमुख's picture

2 Mar 2012 - 8:57 am | श्री गावसेना प्रमुख

यस................

धन्या's picture

2 Mar 2012 - 9:08 am | धन्या

सुंदर लेख.

भ्रष्टाचार, काळाबाजार या गोष्टी आपण आंदोलनं करुन आणि मेणबत्त्या पेटवून संपणार नाहीत. त्यासाठी आपण प्रत्येकाने सारासार विचारबुद्धीने वागणे आवश्यक आहे.

अर्थात हे होणार कसं हा ही प्रश्नच आहे. कारण हल्ली कुठलंच काम पैसे चारल्याशिवाय होत नाही. पण आपापल्या परीने प्रयत्न नक्की करता येतील, आणि त्याने फरकही नक्की पडेल.

मी एकदा वाहतुकीचा नियम पाळला, (दिवसा, ट्रॅफिक असताना, लाल दिवा असताना थांबून राहिलो) तर एका रिक्क्षावाल्याबरोबर मारामारीपर्यंत वेळ गेली होती. मागून हॉर्न वाजवणारे, शिव्या देणारे सामान्य लोकंच होते.

हे पुण्यात हल्ली सर्रास होते. एक तुम्ही लाल दिवा असताना निघून जायचे किंवा रहदारीचे नियम पाळायची खुपच खाज असेल तर पुढच्या प्रसंगांना तोंड दयायला सज्ज व्हायचे.

चौकात पोलिस नसेल तर लाल सिग्नलला थांबणे हे पुणेकरांना कमीपणाचे वाटते.

ममो, दुर्दैवाने मलापण घर खरेदी करताना हाच अनुभव आला. बिल्डरने सरळ सांगितले की तो फ्लॅटची पूर्ण किंमत कायदेशीररित्या घेईल, पण वीजजोडणीसाठी मात्र काळा पैसाच लागेल. कारण काय तर वीजमंडळाची अधिकारी लाच घेतल्याशिवाय अधिकृत वीजजोडणी देणार नाहीत. त्यामुळे इच्छा नसताना इथे मी पण लाच देण्यात अप्रत्यक्ष भागीदार झालो. :(

- पिंगू

प्रकाश घाटपांडे's picture

2 Mar 2012 - 10:02 am | प्रकाश घाटपांडे

लाच या शब्दाची लाज वाटली कि त्याला स्पीड मनी असे म्हणतात. सरळमार्गी काम करायचे म्हणल्यावर त्यात इतके तांत्रिक अडथळे आणतात व हेलपाटे मारायला लावतात की मनुष्य हताश होउन लाच द्यायला तयार होतो. सर्विस प्रोव्हायडर ला दिलेल्या सर्विस चार्ज मधुन अशा भ्रष्टाचाराच्या साखळीत आपणही अप्रत्यक्ष भागीदार बनतच असतो.
हल्ली पैसे घेतो पण काम करतो तो प्रामाणिक. शेकड्यात पैसे खाणारा हजारात खाणार्‍या कडे बोट दाखवतो. हजारात खाणारा लाखात खाणार्‍याकडे ......... मालिका पुढे चालू.

चिगो's picture

2 Mar 2012 - 3:31 pm | चिगो

>>हल्ली पैसे घेतो पण काम करतो तो प्रामाणिक.

ह्यावरुन कधीतरी वाचलेल्या ह्या ओळी आठवल्या..

"आधी पैसे न खाता काम करायचा, तो प्रामाणिक.. आणि काम करायला पैसे खायचा तो भ्रष्टाचारी.
आता पैसे खाऊन काम करतो त्याला प्रामाणिक म्हणतात, आणि पैसे खाऊनही काम न करणारा भ्रष्टाचारी.."

उदय के'सागर's picture

2 Mar 2012 - 10:08 am | उदय के'सागर

खरंच.... हि सत्यं परिस्थीती आहे... सामान्य माणुसंच कारणिभुत आहे ह्या भ्रष्टाचाराच्या वाढिला...

आमच्या कंपनीतले (so called IT-ians) बरेच लोक पुण्यातल्या आण्णा हजारेंच्या रॅलीला मेणबत्त्या घेउन, गांधी-टोप्या घालुन, घोषणा देत पायपीट करत होते... आणि... परवाच...
'मेडिकल रिईंबर्समेंट/अलाउंस' साठी ह्यातल्याच ८०% लोकांनि खोटी बिलं (प्रत्येकि १५,०००/-) सबमीट केलि... माझ्या तर १२ जणांच्या टिम मधुन १० जणांनी फेक-बिलं सबमीट केलि... :( ... कंपनिच्या फायनांस डिपार्ट्मेंटला हि हे महित असतं... पण ते काहि कारवाई करत नाहित... कारण ते हि हेच करत असावेत....

डिमांड-सप्लाय चं समिकरण इथेहि लागु पडतं :) .... भ्रष्टाचाराची डिमांड केलि जाते आणि त्याला भरघोस सप्लाय मिळतो... आणि हे चक्र (मग अजुनच वेगात) चालुच राहतं...

हुंडा सारखि गोष्टं जशि चुकिचं असुनहि चालुच राहिलि आणि नतंर तर काय सगळेच करतात म्हणुन प्रथा/ संस्कृती च्या नवानेच पुढे आली.. तसंच भ्रष्टाचार हि एक संस्कृती म्हणुन पुढे येउ नये म्हणजे मिळवलं...

सुमीत's picture

2 Mar 2012 - 10:10 am | सुमीत

ईपीएफ मध्ये लोन साठी अर्ज केला, ठाण्यात घर घेतले त्यासाठी.
मा़झ्या कडे माझेच पैसे परत देण्या साठी ३००० ची लाच मागितली जी मला देवीच लागणार, नाहीतर हक्काचे पैसे गरज आहे तेव्हा मिळणार नाहीच वर परत मनःस्ताप.
नोकरी बदलली तर ईपीएफ हस्तांतर मध्ये पण त्रास देणार.

बाकी हा देश खरे तर ऐजंट लोकच चालवतात. शेती माला पासून, कर्ज, घर खरेदी ते अगदी स्मशान भूमी पर्यंत.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Mar 2012 - 10:26 am | अत्रुप्त आत्मा

मलाही वर्षभरापूर्वी फ्लॅट खरेदी करतांना, जवळ जवळ ३लाख काळे द्यावे लागले...फक्त बँक अडचणी म्हणाव्या तश्या आल्या नाहित... (एक जवळचे यजमान/कस्टमरच बँक म्यानेजर निघाले ;-) )

सामान्य माणसाला सगळेच झोडपतात. सॉफ्ट टार्गेट म्हणून..

मग ती करवसुलीची वेळ असो किंवा भ्रष्टाचाराला कोण जबाबदार हे ठरवण्याची..

वाईट गोष्ट अशी की सामान्य माणूस अन्य कोणाला झोडपण्याची ताकद नसल्याने स्वतःच स्वतःला झोडपून घेताना दिसतो.

"अडवणूक" हे बलस्थान ज्यांच्याकडे आहे अशा सरकारी / सामाजिक सिस्टीमशी दोन हात करताना जे करावं लागतं त्याचा सामान्य माणसाला त्रासच होतो. रोजच्या जगण्याच्या रगाड्यात भ्रष्टाचाराविरुद्ध लढा उभारणं बहुतेकांना अशक्य आहे. हात दगडाखाली अडकलेले असतात. दगड हलवता येत नाही म्हणून हातालाच जबाबदार धरायचं हे नामंजूर.

सत्तारुपी ताकदीच्या दृष्टीने दुर्बळ घटकांची अशी मानसिकता आपोआप तयार होते की आपणच सर्वाला मुळात जबाबदार आहोत असं म्हणून स्वत:वरच ठपका ठेवून घ्यायचा.

आपणच भ्रष्टाचाराला जबाबदार आहोत या विधानाला माझा विरोध आहे आणि राहील. निव्वळ अनुभवांमधून.

बाळ सप्रे's picture

2 Mar 2012 - 12:24 pm | बाळ सप्रे

कुठलाही बदल घडवणं कठीण असतं..
भ्रष्टाचार थांबवणं असो की सुरू करणं असो.. मग ते पैसे देण असो की घेण..
एखाद्या नवीन सरकारी कारकूनाला देखिल गृहीत धरलं जातं कि हा पैसे घेणारच.. मग तो प्रामाणिक असला तरी त्याला ते घ्यावेच लागतात..
खंबीरपणे उभं राहून बदल घडवण्यासाठी , इतरांना बदलण्यासाठी नेतृत्वगुण लागतात..
सामान्य माणूस आहे ते चालू ठेवू शकतो.. म्हणूनच तो सामान्य असतो..
दुर्दैवाने आपल्याकडे वाईट बदल घडवणारी माणसं खूप आहेत.. म्हणूनच भ्रष्टाचाराची क्षेत्रे विस्तारीत आहेत..
नेते खूप आहेत.. पण दूरदृष्टी नसल्याने.. चांगले बदल फारसे घडत नाहीत..

चिगो's picture

2 Mar 2012 - 3:40 pm | चिगो

>>एखाद्या नवीन सरकारी कारकूनाला देखिल गृहीत धरलं जातं कि हा पैसे घेणारच.. मग तो प्रामाणिक असला तरी त्याला ते घ्यावेच लागतात..

हे मी अमान्य करतो.. हां, आता नाईलाज झालाय असं दाखवत जर तो पैसे घेत असेल तर तो एक चांगला "बहाणा" आहे, "कारण" नाही..

मन१'s picture

2 Mar 2012 - 8:36 pm | मन१

प्रचंड सहमत.
लेखातील भावनांशी तर सहम्त आहेच, पण स्वतःलाच सातत्याने का थोबाडित मारुन घ्यावी? तेही काहीही चुकीचे करायचा उद्देश नसताना?
बाकी, सिग्नलवर थांबल्याबद्दल इथे पुण्यात बहुतांश सर्वच वाहने भयभयंकर शिक्षा करतात. अक्षरशः ते तुमच्या बाइकला घेउन ढकलत पुढे जातील आणि वर नावाचा उद्धार ठरलेलाच.

गवि, सहमत.
मी भ्रष्टाचारी नाही पण अडवणूकच करायला लागलात तर काय करणार?
नाईलाजानं केलेली कृती हा भ्रष्टाचार नव्हे.
कोणी शस्त्राच्या बळावर किंवा सत्तेच्या बळावर घेरले तर आपण काय करणार? जीव तर वाचवायला हवा ना!
नुकतेच एकजण आनंदानं सांगत होते की त्यांनी सध्याच्या राहत्याघराव्यतिरिक्त तिसरा फ्लॅट बुक केलाय.
अगदी चांगल्या दराने मिळाला कारण बिल्डर हा त्यांचा क्लायंट आहे. फक्त साडेचार हजार रू. स्क्वे फूट आहे. आम्हालाही पुण्यापासून जरा (म्हणजे किती ती विचारू नका) लांब असलेल्या ठिकाणी फ्लॅट घ्या म्हणून मागे लागले होते.
अर्थातच आमचा तसा प्ल्यान नसल्याने हो म्हटले नाही. नंतर विचार केला की गुंतवणूक वगैरे बाजूला ठेवू. त्या पन्नाशीतल्या जोडप्याला मूलबाळ नाही. आईवडील, सासूसासरे वारलेत. जवळचे म्हणावेत असे दोन चारच नातेवाईक. ह्यांना इतके जमवून काय करायचे आहे. वेळ जात नसेल तर समाजासाठी काहीतरी करावे (आपल्या आवडी नुसार) कुणा गरीब मुलाचे शिक्षण करावे, आयुष्य मार्गी लावावे हे विचार नसून फक्त जमवाजमव हा विचारही भ्रष्टच आहे. यात कोणीही फाटक्या अवस्थेत रहावे असे नाही पण आपल्यापुरते पुरेसे झाल्यावर तरी दुसर्‍याचा विचार मनात येतोय का?

मराठमोळा's picture

3 Mar 2012 - 9:05 pm | मराठमोळा

>>आपणच भ्रष्टाचाराला जबाबदार आहोत या विधानाला माझा विरोध आहे आणि राहील. निव्वळ अनुभवांमधून
तुमच्या प्रतिसादाच्या उपप्रतिसादांची वाट पहात होतो.. :)
हे अनुभव सांगितलेत तर बरे होईल..
कारण हा अनुभव सर्वांना उपयोगी येईल. मी स्वःतः फायद्यात ठरणारे "डील" केवळ ब्लॅक मनी न देण्यापायी मोडीत काढले,(शिव्या खाल्या/मानसिक मनस्ताप झाला हे सर्व वगळे) वरील सर्व प्रतिसाद पहाता मी ते करायला नको होते असे मनोमन वाटायला लागले आहे.

बाकी >>आपणच भ्रष्टाचाराला जबाबदार आहोत>> याचे कारण म्हणजे मेणबत्त्या घेऊन फिरणारे, गळा काढणारे आपल्यापैकीच आहेत म्हणून हा प्रपंच..

हे अनुभव सांगितलेत तर बरे होईल..
कारण हा अनुभव सर्वांना उपयोगी येईल.

हे अनुभव मी यापूर्वी इथे खूपशा भ्रष्टाचारविषयक चर्चांमधे दिले आहेत. पुन्हा टंकत नाही.. ज्यांनी पूर्वी हे गुर्‍हाळ वाचलं नसेल त्यांना शोधावं लागू नये म्हणून अंशतः चोप्य पस्ते करतोयः

तीस वर्षांपूर्वी माझ्या आजोबांच्या शेतीच्या सातबार्‍यावर पीकपाणी लावायला तलाठ्यानं पैसे मागिंतले. ताठ मानेच्या आजोबांनी ते नाकारलं. अरे बाबा, माझ्या जमिनीवर असलेल्या पिकाची कायदेशीर नोंद करण्याचे कसले पैसे ? त्यांनी जणू याविरुध्द झगडा करायचं ठरवलं. सनदशीर मार्गानं.

तीस वर्षं झाली. जमीन पडित दाखवली गेल्यानं जप्त झाली. आजोबांची कोर्ट केस खालपासून वरपर्यंत कोर्टांमधून तारखा घेत राहिली. आजोबा मयत. त्यांचे दोन्ही पुत्र मयत. तलाठी मयत. मग मयताच्या मयत मुलाचा मुलगा असा मी त्या अर्जावर अवतरेपर्यंत ही विटंबना चालूच राहिली. जमिनीवर अतिक्रमणं झाली.

आता मी "मयत" व्हायच्या आधी आजोबांच्या त्या "संघर्षाचं" फळ मला मिळालं. जमीन परत मिळाल्याचा हायकोर्टाचा हुकूम घेऊन मी जमीन ताब्यात घ्यायला गेलो. या अगदी कायदेशीर आणि तीस वर्षांच्या सचोटीने मिळालेल्या "न्याय्"युक्त हुकूमाच्या नुसत्या अंमलबजावणीसाठी खालपासून वरपर्यंत सगळे पैसा मागायला लागले.

आता? मी पुन्हा ताठ मानेने लाच देणे नाकारु शकतो..

पण तसं केल्यास (लाच न दिल्यास) मला अजून खूप वर्षं अडकवण्यात येईल. किंवा पुन्हा आदर्शवादानं मी "कोर्टाच्या हुकूमाच्या अवमानाची" केस संबंधित अधिकार्‍यांवर दाखल करून मी स्वतः मयत होइपर्यंत वाट बघू शकतो.

मग माझा मुलगा खेटे घालेल. मग नवा तलाठी माझ्या मुलाकडे पीकपाणी लावण्याचे पैसे मागेल.

माझा मुलगा कदाचित ते देईल आणि जमीन मिळवेल.

पण मग त्यानंतर मधल्या "कायदेशीर" कालापव्ययाने झालेली अतिक्रमणं (जी जमीन सरकारजमा असल्याने मी थांबवू शकत नव्हतो) आणि स्थानिकांनी जमिनीचे तोडलेले लचके ही अन्य (मूळ लाच न देण्याने उद्भवलेली) डॅमेजेस त्याची वाट अडवून उभी राहतील. बेकायदेशीररित्या जमिनीत घुसलेले लोक ते "सोडायला" (म्हणजे पुन्हा फक्त उपद्रवमूल्याची किंमत म्हणून) लाखो रुपये मागतील.. मग माझा मुलगा त्या जमिनीचा नाद सोडूनच देईल.

लाच देणार्‍यालाही फट्टकन "बरोबरीचा दोषी" ठरवण्यापूर्वी "लाच घेणार्‍याची" न्यूसन्स व्हॅल्यू, उपद्रव मूल्य बघायला नको ?

प्रमोशनसाठी बॉसबरोबर शय्यासोबत करायला तयार असलेली बाई अनैतिक. दोषी..

आणि एकटेपणाचा, अंधाराचा फायदा घेऊन अडवणार्‍या गुंडाकडून जीव वाचवण्यासाठी आणि इलाजच नाही म्हणून बलात्कार करून घेणारी बाईही बलात्कार करणार्‍याइतकीच दोषी?

असो..

मराठमोळा's picture

5 Mar 2012 - 11:24 am | मराठमोळा

>>आणि एकटेपणाचा, अंधाराचा फायदा घेऊन अडवणार्‍या गुंडाकडून जीव वाचवण्यासाठी आणि इलाजच नाही म्हणून बलात्कार करून घेणारी बाईही बलात्कार करणार्‍याइतकीच दोषी?

नाही इथे ही बाई बलात्कार करवून घेत नाहीये. तर केला जातोय, इथे तिच्याकडे ईतर चॉईस नाहीये.
चॉईस असताना देखील (कित्येकवेळा स्वार्थाला नाईलाजाचं स्वरूप देऊन) स्वार्थापायी केलेला भ्रष्टाचार किंवा त्याचे समर्थन योग्य आहे का? नाईलाज म्हणून लाच देणे काय किंवा एखादा खून करुन पैसे देऊन/ लाच खाऊ घालून मोकाट फिरणे दोन्ही एकच आहे.

लाच देऊन कामे करुन घेणे जर योग्य असेल (मग ते साधं काम का असेना) किंवा स्वार्थ साधला जात असेल तर आपले राजकारणी काय वेगळं करत आहेत? त्यांना वाईट का म्हणावं? किंवा गुन्हे करून केवळ पैशाच्या जोरावर निर्दोष सुटणे पण योग्यच आहे.
रस्त्यात/रेल्वेत पोलिसाने पकडल्यावर दंडाची रक्कम न भरता ५-५० रुपयात सुटणे सुद्धा योग्यच. बांग्लादेशींनी पैसे देऊन रेशन कार्ड मिळवणे सुद्धा योग्यच. लाच घेणे योग्य, देणे योग्यच.

माझ्या एका मित्राने त्याच्या वडीलांने ३ लाखाला विकत घेतलेला फ्लॅट २० लाखाला विकला. त्यातले १० लाख ब्लॅकमधे घेतले नाईलाज म्हणून.. (किती टॅक्स भरावा लागला असता, त्यामुळे नाईलाजाने ब्लॅकमधे पैसे घेतले.)

दुसर्‍या एका प्रकरणात एका व्यक्तीने पुण्यातली १ एकर जमीन विकून खुनाच्या खटल्यातून सुटका करून घेतली.

हे सर्व योग्य म्हणावे का? म्हणजेच ज्याच्याकडे पैसा आहे त्याने बिनदिक्कत काहीही कसेही वागाबे, प्रसंगी नाईलाज म्हणून कोणत्याही भयंकर गुन्ह्यातून सुटका करुन घ्यावी असे आहे का?

चिरोटा's picture

2 Mar 2012 - 12:23 pm | चिरोटा

आपण दक्षिण आशियायी लोक आपल्या रक्तात लबाडीचा/धूर्तपणाचा अंश इतरांच्या मानाने जास्त आहे हे अमान्य का करतो? कायदे ढीग कराल पण आडातच नसेल तर पोहर्‍यात कुठून येणार?

मुंबईत नविन घर घेण्याचा विचार पुन्हा मनाला शिवला नाही.

ही नाटके बिल्डर लोक पुण्या-मुंबईला जास्त करतात. बेंगळूरमध्ये अनेक बिल्डर 'सर्व पैसे फक्त चेकनेच घेणार." सांगणारे बघितले आहेत. अर्थात ते वेगळ्या पद्धतीने लबाडी करत असतील पण निदान ग्राहकाकडून पैसे चेकनेच घेतात.

मराठमोळा's picture

6 Mar 2012 - 6:49 am | मराठमोळा

>>कायदे ढीग कराल पण आडातच नसेल तर पोहर्‍यात कुठून येणार?

करेक्ट.. नुसते कडक कायदे करून फायदा नाहीच.. वृत्ती फारच महत्वाची आहे.
लाच देऊन, पैसे खाउ घालून हवे ते साध्य करता येते हे एकदा कळाले बास.. आणि लाच घेणार्‍यालाही एकदा ही चटक लागली की मग हे व्यसन सुटणे जवळजवळ अशक्यच. त्यात आपण जर लाच खाण्यार्‍याचे समर्थन करायला लागलो तर मग आनंदी आनंदच.

भ्रष्टाचाराचे समर्थन करणार्‍यांना माझे प्रश्नः
१. तुमच्या घरातील एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला आणि करणारी व्यक्ती पैसे खाऊ घालून निर्दोष सुटली तर काय कराल?
२. भ्रष्टाचारामुळे सुरक्षेत त्रुटी राहिल्याने मुंबईत/तुम्ही राह्ता तिथे पुन्हा बाँबस्फोट झाले तर समर्थन कराल का? त्यात तुमच्या आप्ताचा जीव गेला तर काय?
३. लाच खाल्याने कमकुवत पूल बांधला गेला आणि त्यामुळे झालेल्या अ‍पघातात तुमच्या शरीराचा एखादा अवयव गमावला तर काय?
४. ५-५० रुपयात सुटतो म्हणून हिम्मत बळावल्याने कुणी सिग्नल मोडला, आणि तुमच्या मुलाचा त्यात म्रूत्यु झाला तर काय?
५. तुम्हाला स्वतःला लाच देताना/काळाबाजारी करताना पकडले आणि पेपरात तुमचे फोटो प्रसिद्ध झाले तर काय?

कुणी "लाच खाऊ घालणे योग्य" याचे समर्थ कसे करु शकते हा भला मोठा प्रश्न मला पडला आहे.
कसली समांतर व्यवस्था आणि कसला नाईलाज? कमीत कमी समर्थन तरी करु नका.

५० फक्त,
>>उगाचच आपण सामान्य माणसं भ्रष्टाचाराच्या या क्रुर चक्राखाली भरडले जात आहोत ही भावना कमी होउन तुमच्या मनातला ती जागा इतर ब-याच छोट्या छोट्या आनंदानी भरुन टाका

दु:ख मला "भ्रष्टाचाराच्या या क्रुर चक्राखाली भरडले जात आहोत" यापेक्षा जास्त तुम्ही भ्रष्टाचाराचे समर्थन केल्याचे झाले. वरील प्रश्नांची तुम्ही काय उत्तरे देऊ शकता? असो, आनंदाने जगायला मी एखाद्या दुसर्‍या लोकांप्रमाणे ईतर देशात स्थायीक होऊ शकतो, सर्वात सोपा उपाय म्हणून, सगळे नाही पण बरेच प्रश्न मिटतील. (या वाक्यावर भला मोठा वाद होऊ शकतो पण तो तुर्तास कुणी करु नये, करायचा असल्यास व्यनी किंवा खरड करावी ही विनंती)

५० फक्त's picture

6 Mar 2012 - 8:12 am | ५० फक्त

१. तुमच्या घरातील एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला आणि करणारी व्यक्ती पैसे खाऊ घालून निर्दोष सुटली तर काय कराल? -
२. भ्रष्टाचारामुळे सुरक्षेत त्रुटी राहिल्याने मुंबईत/तुम्ही राह्ता तिथे पुन्हा बाँबस्फोट झाले तर समर्थन कराल का? त्यात तुमच्या आप्ताचा जीव गेला तर काय?
३. लाच खाल्याने कमकुवत पूल बांधला गेला आणि त्यामुळे झालेल्या अ‍पघातात तुमच्या शरीराचा एखादा अवयव गमावला तर काय?
४. ५-५० रुपयात सुटतो म्हणून हिम्मत बळावल्याने कुणी सिग्नल मोडला, आणि तुमच्या मुलाचा त्यात म्रूत्यु झाला तर काय?
तुम्ही फारच वैयक्तिक उदाहरणं देत आहात, तरीसुद्धा सांगतो, मला तथाकथित कायदा माझ्या हातात घेउन सदर गुन्हे करुन मला त्रास देणा-याना संपवावे लागेल. दुसरा उपाय नाही. अर्थात हा उपाय पहिल्या व चवथ्या केसमध्ये सहज शक्य आहे, दुस-या व तिस-या केसमध्ये थोड़ं अवघड आहे, पण तरीसुद्धा प्रयत्न करेन.

५. तुम्हाला स्वतःला लाच देताना/काळाबाजारी करताना पकडले आणि पेपरात तुमचे फोटो प्रसिद्ध झाले तर काय? - छे, असं होण्याची शक्यता नाही. कारण जर मी लाच देत असेन तर ती देताना पकडले जाउ नये याची दक्षता नक्की घेइनच. आणि जरी झालं तरी कोण्त्याही पेपरमध्ये प्रसिद्ध झालेले फोटो जास्तीत जास्त ४८-९६ तास लक्षात ठेवले जातात, प्रश्न उरला माझ्या कुटुबियांचा किंवा जवळच्या लोकांचा, तर त्यांना माझ्या लाच देण्यानं किंवा काळाबाजारी केल्यान फायदा झालेलाच आहे किंवा होत आहे किंवा होणार आहे, त्यामुळं त्यांच्या या व्यवहारांना असणारा तकलादु विरोध लक्षात घ्यावा असं मला वाटत नाही.

तुमच्या वरील चार प्रश्नांना उपप्रशन -( हाच प्रसंग तुमच्यावर आला, व तुम्हाला पैसे खालु घालुन त्या बलात्कारी व्यक्तीला / संरक्षण व्यवस्थेत त्रुटि ठेवणा-या व्यक्तीला / पुल कमकुवत बांधणा-या व्यक्तीला / सिगन्ल मोडणा-या व्यक्तीला फाशीची शिक्षा देववणं शक्य होत असेल तर ते कराल का ?)

आता,' यापेक्षा जास्त तुम्ही भ्रष्टाचाराचे समर्थन केल्याचे झाले. '' याबद्दल, मी ज्याचं समर्थन केलं ती एक दुसरी बाजु आहे, त्याला भ्रष्टाचार ठरवलं गेलं कारण काही प्रक्रिया, कृत्ये, काम करण्याच्या पद्धतीना शिष्टाचार ठरवलं गेलं म्हणुन. आपण जर काय चांगलं काय वाईट याची वर्गवारी करायला बसलो तर, काही गोष्टी चांगल्या अन काही वाईट अशी यादी करावीच लागेल, पण मुळात चांगलं वाईट ह्याच गोष्टी सापेक्ष आहेत. त्यामुळं काही गोष्टी कायद्यात आहेत म्हणुन त्या शिष्टाचार अन ज्या कायद्यात नाहीत त्या भ्रष्टाचार ह्याला माझा विरोध आहे, कायदेशीर अन बेकायदेशीर हे वेगळं पण प्रत्येक बेकायदेशीर गोष्ट म्हणजे भ्रष्टाचार असेल पण याचा अर्थ प्रत्येक कायदेशीर गोष्ट शिष्टाचार आहे असं होत नाही.
'आनंदाने जगायला मी एखाद्या दुसर्‍या लोकांप्रमाणे ईतर देशात स्थायीक होऊ शकतो, ' - ब-याच अशक्य गोष्टींपैकी एक, असो. आनंद आणि सुख यांच्या व्याख्या सुद्धा सापेक्ष आहेत.

स्वातीविशु's picture

2 Mar 2012 - 1:04 pm | स्वातीविशु

मी मुंबईमध्ये घर घेण्यासाठी खुप वणवण फिरले, पण सगळीकडे अमुक अमुक रक्कम ब्लॅकने द्यावी लागेल असे सांगण्यात आले. हे पहिल्यांदा एकल्यावर आम्हाला धक्काच बसला. सुरुवातीला आम्हीसुद्धा काळा पैसा देणार नाही अशा भुमिकेत होतो. पण शेवटी बजेट कमी तसेच इतर अड्चणींमुळे एका सुरु असलेल्या बांधकामात फ्लॅट बुक केला(चेक देऊन). नंतर बिल्डरने काही लाख रुपये ट्प्प्या ट्प्प्याने कॅश (ब्लॅक मनी) द्यावे लागतील आणि बँक लोनसुद्धा अमुक रकमेच्या वर करु नका असे सांगीतले . नाईलाजाने आम्ही ते भरले :(.

सामान्य नागरिकांच्या मुलभूत गरजांमध्येच (अन्न, वस्त्र, निवारा) हे लोक काळा पैसा समाविष्ट करतात, आणि नागरीक नाइलाजाने भ्रष्टाचारात ओढ्ला जातो.
खरेच इमानदारीच्या आईचा घो......

परिकथेतील राजकुमार's picture

2 Mar 2012 - 1:43 pm | परिकथेतील राजकुमार

इकडे देखील मला असे एक दोन अनुभव आले आहेत. अर्थात भारताच्या तुलनेत इकडे भ्रष्टाचार कमी आहे आणि इथले कायदे देखील कडक आहेत.

मी-सौरभ's picture

2 Mar 2012 - 2:42 pm | मी-सौरभ

तुमच्या USSP (युनायटेड स्टेटस ऑफ सदाशिव पेठ) मधे कायदे आणि नियम फार कडक आहेत असा आणुभव अस्मादिकांनीही घेतला आहे.

शैलेन्द्र's picture

2 Mar 2012 - 5:24 pm | शैलेन्द्र

_/\_

कुंदन's picture

2 Mar 2012 - 5:16 pm | कुंदन

शेवटी "ओन साईट" पोहोचलात वाटते.

होय तर! तुला भारी अनुभव.....

राजेश घासकडवी's picture

2 Mar 2012 - 11:14 pm | राजेश घासकडवी

लेख चांगला आहे. पण या लेखात व चर्चेमध्ये स्वतःला लोकांनी सामान्य माणसांत गणलं आहे हे पाहून अंमळ गंमत वाटली. पंधरावीस लाख रुपये काळ्या पैशाने, चाळीस पन्नास लाखाचे फ्लॅट्स अशा गोष्टी भारतातले सामान्य लोक करत नाहीत. पुण्या-मुंबईतले, उच्च शिक्षित, चांगली नोकरी असलेले, कॉंप्युटर लिटरेट, इंटरनेट सॅव्ही लोक करतात. आपल्या वर्तुळात हेच लोक दिसतात त्यामुळे सामान्यपणाची आपली व्याख्या बदलते कदाचित.

सामान्य माणसं (भारतातले सुमारे ७५% लोक) दररोज दरडोई १०० रुपयांपेक्षा कमी खर्च करतात. चौघांचं कुटुंब महिना १२००० पेक्षा कमीत चालवतात.

तेव्हा ही चर्चा करायला काहीच हरकत नाही, मुद्दे महत्त्वाचे आहेतच. पण लक्षात ठेवा इथे लेखन करणारा जवळपास प्रत्येक जण सर्वात वरच्या २०% मध्ये आहे. बहुतांश लोक वरच्या १०% मध्येही असतील. तेव्हा सामान्य हा शब्द जरा जपून वापरावा, इतकंच म्हणेन.

मराठमोळा's picture

3 Mar 2012 - 3:24 am | मराठमोळा

गुर्जी,

कंटेक्स्ट सुद्धा महत्वाचा आहे ना.
इथे सामान्य माणसाची व्याख्या अशी आहे की "ज्याच्या हातात कोणतीही सत्ता अथवा अधिकार नाही किंवा जो सगळ्या बाजूने बांधला गेला आहे, ज्याला कायदे पालन करणे आणि कुणी अडवणून केल्यास कायदे मोडणे भाग आहे ." या अर्थाने सर्वांनी स्वतःला सामान्य म्हंटले आहे.
:)

राजेश घासकडवी's picture

3 Mar 2012 - 4:31 am | राजेश घासकडवी

की सामान्य माणूस हा शब्द काळजीपूर्वक वापरा. पण तुमची व्याख्यादेखील थोडी प्रॉब्लेमॅटिकच आहे बरं का. ज्यांच्या हाती निर्णय घेण्याची क्षमता आहे अशांचा निर्णय आपल्याजोगा होण्यासाठी लाच देण्याच्या बाबतीत ज्यांचा नाईलाज होतो त्यांना सामान्य म्हटलं तर बोफोर्सच्या तोफा विकल्या जाव्यात म्हणून किकबॅक्स देणारे अधिकारीही सामान्यच म्हटले पाहिजेत.

नाहीतर मग एक श्रीमंत माणूस दुसऱ्या थोड्या कमी श्रीमंताची धंद्याच्या व्यवहारात अडवणूक करतो आणि आपल्याला हव्या त्या टर्म्स मंजूर करून घेतो - यापेक्षा दुसरं काय वेगळं आहे घर खरेदीच्या बाबतीत?

माझी सूचना अशी आहे की सामान्य माणूस या शब्दांतून जी नाडलेपणाची कणव निर्माण होते, ती खरोखरीच्या पन्नासाव्या पर्सेंटाइल माणसासाठी व त्याच्या प्रश्नांसाठी राखून ठेवावी. त्या बिचाऱ्याला मिळणाऱ्या सहानुभूतीत का हक्क सांगावा?

मराठमोळा's picture

3 Mar 2012 - 7:56 am | मराठमोळा

बर्र...,
ठिक आहे ..

मी वर लिहिले होतेच.. की मी काळा पैसा/लाच देऊन व्यवहार करायला तयार नव्हतो आणि कधीही असणार नाही तरी आता मात्र मी सामान्य नाही.. श्रीमंत आहे असे आता मला कळाले आहे :O त्यामुळे ईथून पुढे भ्रष्टाचाराचे समर्थन करेन. सामान्य माणसाची पिळवणूक करण्यासाठी जास्तीत जास्त सहाय्य करणारास करेन. काळ्या पैशाचे व्यवहार बिनदिक्कत करेन, पैसा आहे म्हणून वाहतुकीचे नियम मोडेन, गुन्हे करेन, लाच खाऊ घालून स्वतःची कामे/गुन्ह्यातून सुटका आरामशीर रित्या करून घेईन आणि आनंदाने जगेन. कशाला त्रास करून घ्यायचा स्वतःला इतका? ईमानदारीच्या आईचा घो.. ;)
काय म्हणता? :P

राजेश घासकडवी's picture

3 Mar 2012 - 11:07 am | राजेश घासकडवी

सामान्य आणि प्रामाणिक यात गल्लत करू नका मालक. प्रत्येक सामान्य माणूस सच्छील नसतो, आणि प्रत्येक श्रीमंत माणूस हरामखोर नसतो. सामान्य नसलेला प्रत्येक माणूस टाटा, बिर्ला, अंबानी नसतो. तसंच बहुतांशांना हेवा वाटण्यासारखी परिस्थिती असण्यासाठी तुमच्याकडे मर्सिडीज असण्याची गरज नसते. हे काळंपांढरं नाही.

भारतात दरवर्षी सात लाख रुपये+ हाउसहोल्ड उत्पन्न असलेले हे सर्वात वरच्या पाच टक्क्यांत येतात. तुम्हीच ठरवा तुम्ही सामान्य समजले जाल का.

तुम्ही श्रीमंत आहात की नाही यावरून तुमचे मुद्दे बरोबर की चूक हे ठरत नाही. आक्षेप फक्त 'आपण सामान्य लोक' या शब्दप्रयोगाला होता. आपण सगळेच किमान वरच्या १०-१५ टक्क्यांत आहोत हे लक्षात ठेवू, इतकंच.

परिकथेतील राजकुमार's picture

3 Mar 2012 - 11:24 am | परिकथेतील राजकुमार

श्री. घासुगुर्जी ह्यांच्याशी सहमत आहे. (काळ मोठा वाईट आला आहे.
)
फक्त घासुगुर्जींना एक विनंती आहे, की त्यांनी प्रतिक्रिया थोड्या जपून द्याव्यात. त्यांच्या सडेतोड प्रतिक्रियांमुळे आजकाल लेखच उडतात म्हणे.

मराठमोळा's picture

3 Mar 2012 - 1:32 pm | मराठमोळा

हेच, सामान्य माणूस कोण हा मुद्दा इथे महत्वाचा नसून.. बहुतांश लोक, मग त्यात सामान्य पण आले, वैयक्तीक फायद्यासाठी भ्रष्टाचार करायला तयार/अप्रत्यक्षरित्या सामील होतात तर मग चांगलं सरकार, सुबत्ता यावी अशी अपेक्षा का केली जाते हा आहे.

मी किंवा लेखात प्रतिक्रिया देणारे लोक सामान्य आहेत की नाहीत याने लेखातील मुळ मुद्द्याला काही फरक पडत नाही..
असो, "सामान्य" शब्दावरून भरपूर अवांतर झालं. "सामान्य" विषयक मुद्दा इथेच थांबवुया.

राजेश घासकडवी's picture

5 Mar 2012 - 2:00 am | राजेश घासकडवी

बहुतांश लोक, मग त्यात सामान्य पण आले, वैयक्तीक फायद्यासाठी भ्रष्टाचार करायला तयार/अप्रत्यक्षरित्या सामील होतात तर मग चांगलं सरकार, सुबत्ता यावी अशी अपेक्षा का केली जाते हा आहे.

पटलं. हेच विनोदी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. ह. घे. ही विनंती. :)

हुप्प्या's picture

5 Mar 2012 - 3:12 am | हुप्प्या

किती पैशाचा व्यवार होतो आहे त्यावर सहानुभूती अवलंबून असणे मूर्खपणाचे वाटते. गरिबीच्या आलेखात अमुक इतके खाली असाल तरच आपल्या दुर्दैवावर रडा नाहीतर नाही असे उफराटे तर्कट साफ चुकीचे आहे. सगळेच गरीब काही हतबल , परिस्थितीपुढे लाचार नसतात, त्यातले अनेक ऐतखाऊ, व्यसनी, नालायक मूर्ख असेही असतात.
काळ्या पैशाची समान अर्थव्यवस्था निर्माण करणारे हे ह्या प्रकाराला जबाबदार आहेत. ह्यात मंत्री, सचीव, कायदा बनवणारे आमदार, खासदार, कोर्टे, पोलिस वगैरे येतात. सामान्य माणूस जरी आर्थिक दृष्ट्या सबल असला तरी त्याला ती यंत्रणा त्या वेळी बदलायची शक्ती
नसते. वेळ नसतो. प्रत्येक माणूस हा तत्त्वासाठी शेवटपर्यंत लढेल अशी अपेक्षा ठेवणेही हास्यास्पद आहे. स्वतःच्या मूलभूत गरजेकरता बाजारात अनेक उफराटे प्रकार करायला भाग पाडले जाते त्यात हा ब्लॅक मनीचा प्रकार आहे.
परदेशातही सामान्य लोक असतात. ते काही आकाशातून पडलेले नसतात. त्यांच्यातही मध्यमवर्गीय, आर्थिक दृष्टा सबळ लोक असतात. त्यांना रस्त्यात पोलिसाने पकडले, नवे घर घेतले म्हणून पैसे चारावे लागत नाहीत. नियमाप्रमाणे जे काही दंड, आकार होतात ते भरून ते मोकळे होतात. भारतातील यंत्रणा अशी असती तर मला खात्री आहे की अगदी ४० ५० लाख मिळवणारा उच्च मध्यमवर्गीय मुद्दाम काळे पैसे चारायच्या भानगडीत पडणार नाही. काळ्या पैशाचा वाटा थेट वरपर्यांत सगळ्यांना पोचतो त्यामुळे ही समांतर अर्थव्यवस्था बंद करण्यात सत्ताधारी लोकांना स्वारस्य नाही. शिवाय कोर्टात पकडून निकाल लागून शिक्षा मिळण्याची शक्यताही नामशेष.

राजेश घासकडवी's picture

5 Mar 2012 - 5:57 am | राजेश घासकडवी

किती पैशाचा व्यवार होतो आहे त्यावर सहानुभूती अवलंबून असणे मूर्खपणाचे वाटते.

वा वा. म्हणजे तुमच्या मते बोफोर्सच्या अधिकाऱ्यांनाही अशीच सहानुभूती मिळाली पाहिजे. बिचारे भ्रष्ट व्यवस्थेमुळे गांजलेले होते. नाहीतर त्यांना काय हौस होती तथाकथित भ्रष्टाचार करून तथाकथित किकबॅक्स देण्याची?

अगदी ४० ५० लाख मिळवणारा उच्च मध्यमवर्गीय

भाऊ, तुमची वर्गवारी गंडलेली आहे. वर्षाला ४० ५० लाख मिळवणारा उच्च मध्यमवर्गीय नव्हे तर अतिश्रीमंत समजला जायला पाहिजे. भारतात किती जणांना इतके मिळतात माहीत आहे का? एक टक्क्यापेक्षा कमी असावेत. अहो भारताचं जाऊद्यात सरळ डॉलरमध्ये कन्व्हर्ट केलं तरी १००,००० डॉलर मिळवणारं हाउसहोल्ड (माणूस नाही!) वरच्या वीस टक्क्यांत येतं. परचेसिंग पॉवर पॅरिटीचा हिशोब केला तर वरच्या पाच टक्क्यांत सहज पोचायला होतं.

बाकीच्या मुद्द्यांविषयी माझी चर्चा नव्हतीच. एक साधी, छोटीशी तपशीलातली चूक दाखवली तर त्याबद्दल धन्यवाद देण्याऐवजी लोक चवताळतात का ते कळत नाही.

दादा कोंडके's picture

5 Mar 2012 - 4:15 pm | दादा कोंडके

एक साधी, छोटीशी तपशीलातली चूक दाखवली तर त्याबद्दल धन्यवाद देण्याऐवजी लोक चवताळतात का ते कळत नाही.

सहमत.

परवाच एका मित्रानं बंगळुर मध्ये मंत्री चंडकमधलं ७८ लाखाचं घर बुक केलं. किंमत ऐकून कार्टून मध्ये दाखवतात त्यासारखं माझा जबडाच खाली पडला होता. वर तो म्हणत होता, आपल्यारख्यांना कुठं रे पन्नास-साठ लाखांचं कर्ज मिळतय? म्हणून फक्त पस्तीस लाखाचं कर्ज काढलं आनि बाकीचे पैसे भरले. :)

हुप्प्या's picture

6 Mar 2012 - 3:19 am | हुप्प्या

बोफोर्सचे अधिकारी घर घ्यायला रक्कम उभी करण्याकरता लाच देत होते का? त्यांची कुठली मूलभूत गरज भागवत होते? जरा तपशीलात सांगता की बोफोर्सच्या अधिकार्‍यांचे ह्या चर्चेत उल्लेख करायचे काय प्रयोजन आहे?

मी हेच सांगायचा प्रयत्न करतो आहे की तमाम भारतातील आर्थिक परिस्थितीचा आलेख काढून तुमचे स्थान त्यात किती वरचे वा खालचे आहे ह्याला काहीही महत्त्व नाही.
वर्षाला १० लाख रुपये मिळवत असाल एखाद्या खेड्यात वा आदिवासी भागात अगदी आरामात राहता येईल. पण तुमचे काम जर फिल्म इंडस्ट्रीत वा कंप्युटर व्यवसायात असेल तर तुम्हाला तो पर्याय उपलब्ध नाही. तुम्हाला मुंबईत वा कुठल्याशा महानगरातच कुठेतरी जागा शोधायला लागेल. आणि असे उत्पन्न मिळवणारे तुम्ही मध्यम वा निम्न मध्यमवर्गीयच समजले पाहिजेत. स्थानमहात्म्याकडे दुर्लक्ष का करायचे?
अशा माणसाला मुंबईत वा बंगलोरमधे घर/फ्लॅट घ्यायचे झाले तर कुठल्याशा खेड्यात रहाणार्‍या माणसाला अगडबंब वाटणारे आकडेच दिसतील. १-२ लाखात मुंबईत कुठे फ्लॅट मिळतो का?
अमेरिकेतही ही विषमता आहेच आहे. मोंटाना वा नेब्रास्कासारख्या आडनिड्या राज्यात ३ लाख डॉलरमधे राजवाड्यासारखे घर येते पण त्याच किंमतीत कॅलिफोर्निया वा न्यू यॉर्कमधे एखादे खुराडेही येत नाही. पण म्हणून न्यू यॉर्क मधे रहाणार्‍या, ३ लाख डॉलरची ऐपत असणार्‍या माणसाला दु:ख/खंत वाटू नये का की आपल्याला आपले घर घेता येत नाही म्हणून? व्यक्ती जिथे रहाते तिथे त्याची मूलभूत गरज भागताना काय कसरती कराव्या लागतात हाच मुद्दा आहे. रहाण्याकरता घर घेणे हे काही व्हेकेशन हाऊस, फार्म हाऊस, खाजगी विमान वा बोट घेण्यासारखे निव्वळ चैनीचे नाही. ती एक मूलभूत गरज आहे.

राजेश घासकडवी's picture

6 Mar 2012 - 9:26 am | राजेश घासकडवी

त्यांची कुठली मूलभूत गरज भागवत होते?

हा हा हा. मूलभूत गरज म्हणजे काय यावर चर्चा आली तर. ही संपूर्णपणे अवांतर आहे, तेव्हा फार लांबवू नये ही विनंती.

५०-७५ लाखांचं घर ही मूलभूत गरज? मूलभूत गरजांची व्याख्या जरा नीट तपासून बघा. म्हणजे ७५ टक्के भारतीयांसाठी खायला २००० कॅलरी, रहायला चार भिंती, लज्जारक्षणापुरते कपडे, आजारी पडलं तर डॉक्टरची फी आणि औषधं परवडणं, आणि सरकारी शाळेत शिक्षण. मुंबईत नोकरी करणारे लाखो लोक चाळींमध्ये, भाड्याच्या खोल्यांमध्ये रहातात. ज्यांना तिघांसाठी मुंबईत स्वतःचा फ्लॅट 'आवश्यक' आणि 'मूलभूत गरजेचा' वाटायला लागतो ते श्रीमंतांमध्ये पोचलेला असता. मग त्या बिचाऱ्या बोफोर्सच्या अधिकाऱ्यांच्याही असतील असल्याच महागड्या मूलभूत गरजा.

त्याच किंमतीत कॅलिफोर्निया वा न्यू यॉर्कमधे एखादे खुराडेही येत नाही. पण म्हणून न्यू यॉर्क मधे रहाणार्‍या, ३ लाख डॉलरची ऐपत असणार्‍या माणसाला दु:ख/खंत वाटू नये का की आपल्याला आपले घर घेता येत नाही म्हणून?

भाऊ, थोडी माहिती मिळवा. कॅलिफोर्नियाची मीडियन हाउस प्राइस अडीच लाख डॉलर्स आहे. मी स्वतः न्यूयॉर्क राज्यात रहातो, आणि इथे अडीच लाखात दृष्ट लागण्यासारखी घरं मिळतात.

५० फक्त's picture

3 Mar 2012 - 8:15 am | ५० फक्त

+१०० टु राजेश,

आता किमान आर्थिक बाबतीत तरी सामान्य म्हणजे नक्की कोण याची व्याख्या करुन मग भ्रष्टाचाराबद्दल बोललेलं बरं, ३०-४० लाखाची घर, कर्ज घेउन घेणारी व्यक्ती सामान्य असु शकत नाही, भले ती असामान्य नसेल पण सामान्य नक्कीच नाही.

आणि भ्रष्टाचाराबद्दल तर माझी वैयक्तिक मतं याआधी देखिल मांडलेली आहेत, ही भ्रष्टाचाराची व्यवस्था म्हणुन आपण जी बोंब मारतो, याकडं देखील थोडं पॉझिव्हिवली पहा, ही एक समांतर अर्थ व्यवस्था आहे, जी ज्या त्या देशाच्या / राज्याचा / समाजाच्या अधिकारीक ( ऑफिशियल / एक नंबरच्या ) अर्थ व्यवस्थेला अप्रत्यक्षरीत्या आधार देते आणि जगवते. आजपर्यंतच्या मानवी इतिहासात अशी एकही राज्यव्यवस्था नाही की जिच्यामध्ये एकाही लेव्हलला भ्रष्टाचार किंवा बेकायदेशीर कामं होत नव्हती.

कारण ही समांतर व्यवस्था पहिल्या व्यवस्थेपेक्षा प्रचंड जास्त शक्तिशाली आहे, कारण तिला जगायला मानवनिर्मित कागदी व्यवहार अन कायदे लागत नाहीत, ती दोनच नैसर्गिक नियमांवर चालते, १. व्यवहार करणा-यांमधला एकमेकांच्या प्रति असलेला विश्वास २. जो शक्तिवान त्याचं राज्य.

सध्याच्या काळात संपुर्ण बांधकाम क्षेत्र हे तथाकथित देशात अन परदेशात अडकुन पडलेला या २ नंबरच्या अर्थव्यवस्थेतला पैसा १ नंबरच्या अर्थव्यवस्थेत आणण्याचा हमरस्ता आहे. जवळपास १० % माहिती आंणि तंत्रज्ञान कंपन्या सुद्धा हाच धंदा करतात.

एखादी बी जमिनीत लावली की त्याची वाढ दोन्ही बाजुला होते, खाली मुळं जातात वर खोड फांद्या, कधी आपल्याला वरच्या पसा-याचा फायदा होतो कधी खालचे कंद हवे असतात, मग आपण त्या परिस्थितीनुसार आपली भुमिका बदलतो. वर दिलेलं एक वैद्यकीय खर्च परत मिळ्ण्यासाठी केलेल्या खोट्या बिलांबद्दल आपण काही बोलत नाही, का ? १५०००/- चे ३०% वाचवण्यासाठीच ना ? मग त्यापेक्षा भरा की सगळा टॅक्स नियमानुसार, असं सलग ३० वर्षे करा अन मग बोला प्रामाणिकतेबद्दल अन इमानदारीबद्दल.

आपल्यासारख्यांनी अशी बोंब मारणं म्हणजे, सुर्यमालिकेतल्या सुर्यापासुन ५-१० लाख वर्षे लांब असलेल्या एखाद्या उल्का पाषाणानं चुकुन सुर्याच्या जवळ आल्यावर, ' अरे अरे हा सुर्य फार गरम आहे, ताबडतोब यावर पाणी टाकुन याला गार करा, नाहीतर आपण सगळे जळुन जातोय, अशी बोंब मारणं आहे.

आज आपल्याला झळ लागते म्हणुन त्रागा होतो, सो कॉल्ड नियमांचा आधार घेउन मागच्या काही वर्षात डायरेक्ट टॅक्स भरण्यापासुन वाचवलेले पैसे उचलुन खर्च करावे लागले की असा राग राग होतो, बाकी काही नाही. यात अजुन भर पड्ते ती थोडा अभ्यास केला की लक्षात येतं की घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर मिळणारी करातुन सुट आहे ती सुद्धा तकलादु आणि फसवी आहे हे समजल्यावर.

आज घरं घेणा-यानी जरी त्यांचे घर घेण्याचे सगळे व्यवहार चेकने केले काय किंवा डीडिने केले काय, काही फरक नाही पडत, तुमच्या ४/८/१२/३४/६० व्या मजल्यापर्यंत जे घराचे कॉलम आले आहेत ना त्यांच्या पायाशी असलेल्या जमिनींचे व्यवहार हे ९८% वेळा या समांतर अर्थ व्यवस्थेच्या मार्गानेच झालेले आहेत, शक्य असेल तुम्ही घरं घेताना जो सर्च रिपोर्ट घेताना त्यातल्या प्रत्येक प्रॉपर्टी हस्तांतरणाच्या वेळी व्यवहार कसे झाले होते याची माहिती घेण्याचा प्रयत्न करा ,

उगाचच आपण सामान्य माणसं भ्रष्टाचाराच्या या क्रुर चक्राखाली भरडले जात आहोत ही भावना कमी होउन तुमच्या मनातला ती जागा इतर ब-याच छोट्या छोट्या आनंदानी भरुन टाका.

अन्या दातार's picture

5 Mar 2012 - 8:42 am | अन्या दातार

सो कॉल्ड सामान्य माणूस करत असलेल्या भ्रष्ट कामांची यादी:

आयटीवाले: प्रोजेक्टवर नसतानाही प्रोजेक्टचे काम करणे
मेकॅनिकल (कोअर) वाले: रिजेक्शन रिपोर्ट चुकीचे देणे, आयएसओ-टीएस ऑडीटच्या मेजर एनसी मायनर 'करुन घेणे'
डॉक्टरः कट प्रॅक्टीस
कारकूनः फक्त बॉसने सांगितले म्हणून चुकीच्या एंट्र्या मारणे
सीए/सीडब्ल्युए: इन्कम टॅक्स अधिकार्‍याला 'मॅनेज' करणे, त्रुटी असुनही ते झाकणे (याच कामासाठी त्यांना पैसे मिळतात)
वकील(नोटरी) : अ‍ॅफिडेविट न बघता शिक्के मारणे, सरकारी वकील असेल तर हरण्यासाठी पैसे घेणे, ऐनवेळेस अशिलाला टांग मारुन कोर्टात हजर न राहणे

कवितानागेश's picture

3 Mar 2012 - 12:12 am | कवितानागेश

आपण ठरवले तर काळ्या पैशाच्या व्यवहारांपसून नक्कीच लांब राहू शकतो.
आमचे घराचे २ व्यवहार शुभ्र पांढरे झालेत!
आम्ही बर्‍याच एजंट्स्ना आणि बिल्डर्स्ना भेट्लो आहोत.
त्यांना सुरुवातीलाच ठणकावून ;) सांगितले की ब्लॅकवाल्या पार्ट्या नकोत, फक्त व्हाईट्वाल्या समोर आणा, की ते ऐकतात.
यातली मेख अशी आहे, की आपण गरजवंतांसारखे त्यांच्यासमोर जायचे नाही, नाहीतर ते त्यांच्या अटींप्रमाणे आपल्याला वळवायला बघतात.
पण शक्य असेल तिथे, सगळ्या आर्थिक थरांमधले लोक सगळे व्यवहार काळ्यातच करायला बघतात, हेदेखिल तितकेच खरे आहे.

नेत्रेश's picture

3 Mar 2012 - 2:47 am | नेत्रेश

काळ्या पैशातील व्यवहार म्हणजे केवळ कॅश देणे नव्हे. बरेच बिल्डर ४ ते ८ चेक्स वेगवेगळ्या फर्मसच्या नावाने घेतात. ग्राहक संपुर्ण पेमेंट चेकनेच करतो. पण त्यातील फक्त १ किंवा २ चेक्स बिल्डरच्या नावाने असतात, आणी त्यातील रक्कम घराची किंमत म्हणुन खरेदीखतावर दाखवलेली असते. असा व्यवहार ग्राहकांनाही फायदेशीर पडतात. घराची किंमत कागदावर कमी दाखवली की स्टँप ड्युटी कमी भरावी लागते. तेव्हा बरेच ग्राहक स्वतःच काळ्या पैशातील व्यवहार करायचा आग्रह ही करतात.

बर्‍याच लोकांना सरकारी कचेर्‍यांत खेपा घालायला वेळ नसतो, ते एजंटकडे जातात. ए़़जंट काम लवकर होण्यासाठी सरकारी कर्मचार्‍यांना पैसे देतो. असे पैसे घेतले की त्यांचे काम लवकर करण्यासाठी बाकी लोकांची कामे बाजुला ठेवली जातात. तेव्हा एजंट कडे न जाता स्वतः काम करणार्‍या लोकांना जास्त वेळ लागतो, व ते पुढच्यावेळी एजंटकडे जातात.
सरकारी कर्मचारीसुद्धा स्वतःचे काम करण्यासाठी मिळणार्‍या अतीरीक्त पैशांसाठी लोकांचे काम लांबवणे / न-करणे / लाच मागणे करु लागतात.

यावर उपाय म्हणुन प्रत्येक अर्जाला क्रमांक देउन सध्या कुठल्या क्रमांकाच्या अर्जावर काम चालु आहे हे (ईंटनेटवर / फळयावर) जाहीर करणे. तसेच अर्जदाराला त्याचा अर्ज केव्हा निपटवला जाईल याची अंदाजे कल्पना देणे.
अशी पारदर्शकता आणल्यावर स्वतः काम करणार्‍या लोकांना कमी त्रास होईल.

मराठमोळा's picture

3 Mar 2012 - 9:09 pm | मराठमोळा

धन्यवद नेत्रेश,
>>बिल्डर ४ ते ८ चेक्स वेगवेगळ्या फर्मसच्या नावाने घेतात. ग्राहक संपुर्ण पेमेंट चेकनेच करतो. पण त्यातील फक्त १ किंवा २ चेक्स बिल्डरच्या नावाने असतात

ही माहिती नविन आहे..
हे मलाही माहित नव्हते..
एकुणातच काळाबाजार आपल्यापासूनच सुरु होतो आणि मेणबत्त्यांपर्यंत पोहोचतो.. :)

जर सरकार लोकांवर जरुरि प्रमाणे कर न लावता जास्त कर लावणार असतिल तर हे असच होत राहणार.

सागांयच होतस येव्हढेच म्हणतो !

खालील कॉमेंटवरुन सुरु झालेली या विषयाची चर्चा बरेच मुद्दे कव्हर करणारी आहे आणि अनेकांनी चांगली मतं तिथे मांडली आहेत.

http://www.misalpav.com/node/17574#comment-304998