बुद्धीबळ खेळणारे यंत्र!

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
12 Jun 2008 - 10:39 am

आपल्या संपूर्ण बुद्धिबळ कारकीर्दीत फक्त ३६ डाव हरलेल्या आणि सातत्याने आठ वर्षे अपराजित राहिलेल्या माणसाला 'बुद्धिबळ खेळणारे यंत्र' असा किताब मिळाला नसता तरच नवल.
बुद्धिबळातला चमत्कार असं ज्याचं वर्णन केलं जातं त्या होजे राऊल कॅपाब्लांका बद्दलच मी बोलतोय. १८८८ मधे दक्षिण अमेरिकेतल्या क्यूबा ह्या देशात जन्मलेल्या होजेचे बुद्धिबळाचे प्राथमिक शिक्षण घरातच वडिलांशी खेळताना झाले. चार वर्षाच्या कापाने वडिलांना घोड्याची एक अयोग्य खेळी करुन त्याला फसवताना पकडले आणि त्यांनी नेमका काय प्रकार केला ते त्यांना नीट समजावून सांगितले! (घोडा अडीच घरे चालविण्या ऐवजी बहुदा साडेतीन घरे चालवण्याचा दीड शहाणे पणा त्यांना भोवला असावा! ;) )
लहानग्या कॅपाची पावलं रिकिबीत दिसली ती अशी!!

वडील त्याला हवानाच्या चेस क्लबमधे खेळायला घेऊन गेले. तिथल्या नामवंत खेळाडूला त्याने क्वीन ऑड्स (म्हणजे त्या खेळाडूकडे वजीर नाही आणि कापाकडे आहे) अशा अवस्थेत जरी हरवले तरिही चार वर्षाच्या कापाचा खेळ त्याच्या वयाच्या मानाने विलक्षण प्रतिभावान होता.
१९०१ मधे वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी कापाने जुआन कॉर्झो ह्या स्पॅनिश्-क्यूबन खेळाडूला हरवून सनसनाटी विजय मिळवला. ह्याच कॉर्झोने पुढे कापाच्या साथीत 'नॅशनल चेस फेडरेशन' स्थापन केले आणि तो कित्येक वर्षे 'कापाब्लांकाज चेस मॅगझीन' चा संपादकही होता.

नंतरच्या काही वर्षात न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातून होजेने रसायन अभियांत्रिकीतली पदवी घेण्याचा प्रयत्न केला पण त्याचे तिथे काही जमले नाही त्याने व्यावसायिक बुद्धिबळ खेळाडूच होणे पसंत केले. (बरे झाले म्हणायचे नाहीतर कदाचित आपण बुद्धिबळातले एक चांगले रसायन गमावले असते! :) )
१९०९ मधे त्याने अमेरिकन चँपियन फ्रँक मार्शलला (+८, -१ = १४) असे हरवले. त्यानंतर लगेचच १९१० मधे तो न्यू यॉर्क राज्याचा विजेता ठरला. पाठोपाठ आलेल्या १९११ च्या दुसर्‍या एका स्पर्धेत तो मार्शलच्या पाठोपाठ दुसरा आला. त्याची खेळातली विलक्षण चमक बघून त्याने सॅन सेबॅस्टियन, स्पेन येथे होणार्‍या जागतिक स्पर्धेत भाग घ्यावा असा आग्रह खुद्द मार्शलने धरला. तत्कालिन जगज्जेता एमॅन्यूएल लास्कर वगळता सर्व अतिरथी-महारथी त्या स्पर्धेला झाडून हजर होते. स्पर्धेच्या सुरुवातीलाच ऑसिप बर्नस्टीन आणि ग्रँडमास्टर ऍरॉन निम्झोविच (तोच तो निम्झो-इंडियन डिफेन्स वाला) ह्या दोन दिग्गजांनी कापाच्या स्पर्धेतील सहभागाला आक्षेप घेतला कारण त्यांच्या मते तो एकही मोठी स्पर्धा जिंकला नव्हता! (मोठ्या स्पर्धेत खेळल्याशिवाय जिंकणार कसा?! प्रस्थापित विरुद्ध नवखे हा वाद तसा सार्वकालिक आणि सर्वक्षेत्रीयच म्हणायला हवा! ;) ) कापाने त्याच्या पहिल्याच डावात बर्नस्टीनला लोळवून आपल्या कृतीनेच ह्याचे उत्तर दिले. त्याच्या ह्या डावाला सामन्यातले सर्वोत्कृष्ट डावाचे बक्षीसही मिळाले. बर्नस्टीन तसा शहाणे बाळ होता -कापाचे श्रेष्ठत्व मान्य करत तो लगेच म्हणाला की "ही स्पर्धा कापाने जिंकली तरी आश्चर्य वाटायला नको!"
आता पाळी निम्झोविचची होती. त्याचा अहं दुखावला! त्यातच निम्झोच्या एका अतिजलद सामन्यात प्रेक्षक असलेला कापा काहीतरी बोलला. "नवख्या खेळाडूंनी अनुभवी लोकांमधे तोंड घालू नये" ही निम्झोची टीका ऐकून घेणार्‍यातला कापा अर्थातच नव्हता. त्याने लगेच निम्झोला जलद स्पर्धेचे आव्हान दिले! ह्या जलद स्पर्धेत त्याने निम्झोला चक्क धुतले!! त्याचा तो पराक्रम पाहून अतिजलद स्पर्धेचा बादशहा असा किताब त्याला बहाल केला गेला तो त्याच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत कायम होता!
त्याच स्पर्धेतल्या नेहेमीच्या डावात काळी मोहोरी घेऊन खेळणार्‍या कापाने निम्झोला हरवले. हा डाव कापाच्या प्रतिभेचे एक उत्तम उदाहरण आहे. प्रतिस्पर्ध्याच्या मोहोर्‍यांना राजापासून वेगळे काढून लांब नेऊन गुंतवून ठेवणे आणि आपल्या इतर मोहर्‍यांनी त्याच्या राजाची कोंडी करणे हे तंत्र ह्यात दिसून येते. किमान ८ ते १० चाली पुढचा पक्का विचार असल्याखेरीज हे शक्य नाही!
सॅन सॅबास्टियनच्या त्या स्पर्धेत कापानं अव्वल क्रमांक पटकावताना अकिबा रुबेनस्टाईन, कार्ल श्लेचर आणि सिगबर्ट ताराश सारख्या भल्याभल्यांना मागे टाकले होते! ह्या स्पर्धेत तो एकमेव डाव हरला तो रुबेनस्टाईन विरुद्धचा. त्या डावात कापाने काही मोठ्या चुका केल्या आणि नंतर त्याचे विश्लेषणही केले!
त्याच वर्षी, १९११ साली, कापाने लास्करला जगज्जेतेपदासाठी आव्हान दिले. लास्करने १७ अटी घालून ते मान्य केले. त्यातल्या काही अटी कापाला मान्य नसल्याने सामना होऊ शकला नाही.
पोटापाण्याचा उद्योग म्हणून कापानं क्यूबाच्या फॉरेन ऑफिसमधे नोकरी पत्करली, ती तशी नाममात्रच होती, कारण त्याचा सगळा वेळ बुद्धीबळ खेळण्यात जाई! किंबहुना तो तसा जावा ह्याचीच काळजी जणू त्याच्या ऑफिसला होती. एक महान खेळाडू आमच्या पदरी आहे ह्याचा त्यांना अभिमान असावा! ;)
ऑक्टोबर १९१३ ते मार्च १९१४ ह्या काळात तो यूरोपात काही प्रदर्शनी सामने खेळला. त्यात प्रथितयश खेळाडूंबरोबर त्याने दैदीप्यमान यश मिळवले (+१९, -१, = ४).
तसाच पुढे रशियात सेंट पीटर्सबर्गला तो अलेखिन आणि इतर दोघांशी खेळला. अलेखिनशी त्याची ही पहिलीच गाठ होती त्याने दोन्ही डावात अलेखिनला पाणी पाजले!
त्यातला हा एक डाव बघण्याजोगा आहे. दोघांकडे समसमान बल असूनही केवळ मोहोर्‍यांमधली सुसूत्रता आणि एकमेकांशी संपर्क करु शकण्याची लवचिकता ह्या दोन्हीतून डाव कसा जिंकता येतो हे थक्क करणारे आहे. अलेखिनच्या डावातले हत्ती, उंट आणि घोडा हे पटावर अशा ठिकाणी अडकून पडले आहेत की ते केवळ चारा खात बसण्यापलीकडे काही करु शकले नाहीत!!
त्यानंतर पुन्हा एकदा त्याची गाठ पडली ती निम्झोविचशी. हा सामना झाला तो 'रिगा' ह्या मिखाइल तालच्या जन्मगावी! ह्याही वेळी त्याने निम्झोला हरवले. ह्या डावाचे वैशिष्ठ्य म्हणजे विरुद्ध रंगाचे उंट राहिलेले असताना हा डाव कापाने जिंकला! असे डाव जिंकणे फार कठिण समजले जाते कारण केवळ प्यादी आणि राजा ह्यांच्या विचारी हालचालींनीच डाव जिंकता येऊ शकतो, ते कापाने करुन दाखवले.

सेंट पीटर्सबर्ग इथल्या १९१४ सालच्या मोठ्या सामन्यात अखेर कापाची गाठ लास्करशी पडली! लास्करने जिंकण्याचा प्रयत्न केला पण कापाने शर्थीची झुंज देऊन बरोबरीत डाव सोडवला! स्पर्धेच्या दुसर्‍या टप्प्यातल्या डावात मात्र लास्करने आपला अनुभव पणाला लावत कापाला निष्प्रभ केले. १३ गुण मिळवून कापा दुसरा आला आणि लास्कर १३.५ गुणांसह पहिला!

पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले आणि आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ थंडावलेच जणू. कापा अमेरिकेत खेळत राहिला पण ते सामने एवढे मोठे नव्हते. ह्यातल्याच एका स्पर्धेदरम्यान फ्रॅंक मार्शलने कापाविरुद्ध डावाच्या ओपनिंग मधल्या 'रॉय लोपेझ' ह्या प्रकारातला 'मार्शल ऍटॅक' (जो त्याने शोधून काढला होता) पहिल्यांदाच खेळला! कापाने तो गँबिट स्वीकारला आणि डाव जिंकला. आज ९० वर्षांनंतरही हे व्हेरिएशन खेळाडूंमधे अतिशय प्रिय आहे.
कापा अधिकाधिक समर्थ होत चाललेला बघून लास्करने १९२० साली स्वतःहून आपले जागतिक अजिंक्यपद त्याला बहाल करण्याची तयारी दर्शविली! तो म्हणाला "तू तुझ्या खेळाच्या कौशल्याने हे जेतेपद खेचून आणले आहेस तुला सामना खेळण्याची गरज नाही!" कापाला मात्र स्पर्धेत खेळून हे जिंकायचे होते. लगेच पुढच्याच वर्षी १९२१ मधे लास्करने त्याला आव्हान दिले आणि कापाने त्याचा +४, -०, =१० असा पराभव केला व जगज्जेतेपद स्वतःकडेच राखले!
जगज्जेतेपदाचा सामना एकही डाव न गमावता जिंकण्याची ही कोणाही खेळाडूची पहिलीच वेळ होती. (हा विक्रम पुढे ८० वर्षे अबाधित होता. शेवटी २००० साली व्लादिमीर क्रामनिकने कास्पारोवला +२, -०, =१३ असे हरवले तेव्हा ह्याची बरोबरी झाली!)

उत्तमोत्तम खेळाडूंच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना बघून १९२२ साली लंडन इथे झालेल्या सामन्यात पुढच्या जागतिक स्पर्धेचे नियम आखले गेले त्यात कापा, अलेखिन, रुबेनस्टिन, रिचर्ड रेटी, सॅविली तार्ताकोर अशा दिग्गजांचा समावेश होता. त्यातली एक अट अशी होती की आव्हानवीराने कमितकमी $१०,००० चा फंड उभा करायला हवा! कापाने घातलेली हीच अट त्याला पुढे जाऊन भोवणार होती हा दैवदुर्विलास!
त्याच सुमारास कापाने एकाच वेळी १०३ खेळाडूंशी खेळण्याचा विक्रम केला. त्यातले १०२ सामने त्याने जिंकले आणि एक बरोबरीत सुटला!!

दरम्यानच्या काळात, १९२१ मधे, कापाने विवाह केला. त्याला एक मुलगा व एक मुलगी झाली पण हा विवाह टिकला नाही, घटस्फोट झाला. त्याच काळात त्याचे आई-वडीलही गेले. हा संपूर्ण कालावधी कापाच्या आयुष्यात तसा वादळीच ठरला. एकाच वेळी खेळाच्या आघाडीवर सर्वोत्तम आणि त्याचवेळी वैयक्तिक आयुष्यात प्रचंड उलथापालथीचा.

१९१६ ते १९२४ पर्यंत सलग आठ वर्षे कापा अपराजित होता! ह्यामधे एकूण ६३ डावांचा समावेश होता ज्यात लंडनची जागतिक स्पर्धा आणी लास्कर विरुद्धचा जगज्जेतेपदाचा सामना अंतर्भूत आहे!
शेवटी १९२७ मधे अलेखिनने त्याला आव्हान दिले. अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनोस आयर्स इथे हा तब्बल ३३ डावांचा मॅरॅथॉन सामना खेळला गेला. ह्या वेळी मात्र अलेखिन पूर्ण तयारीनिशी आलेला होता. कापाने जंग-जंग पछाडले पण शेवटी +६, -३, = २५ अशी हार पत्करली. कापाने प्रतिआव्हान देण्याचा प्रयत्न केला पण ग्रेट डिप्रेशनच्या उंबरठ्यावर असलेल्या आर्थिक वातावरणात त्याला $१०,००० ची रक्कम द्यायला कोणी तयार नव्हते! चडफडत राहण्याशिवाय कापाच्या हातात काही नव्हते.
पुढची आठ वर्षे १९२७ ते १९३५ अलेखिनने कापाला तो खेळत असलेल्या स्पर्धेतून बाजूला ठेवण्याची चलाखी केली आणि कापा जिथे खेळतो आहे तिथे आपण जाणार नाही हाही डाव साधला! (वैयक्तिकदृष्ट्या हा मात्र मला नामर्दानगीचा प्रकार वाटतो! पळपुटेपणा वाटतो. पण असो. असेही असणारच, शेवटी मानवी स्वभावाचे पैलू!)
पण झटपट बुद्धिबळात कापाला स्पर्धक नव्हता. तो प्रतिस्पर्ध्याची अक्षरशः धुलाई करीत असे आणि हा त्याचा दरारा शेवटपर्यंत कायम होता!

१९३६ च्या नॉटिंगहॅम स्पर्धेत त्याची गाठ अलेखिनशी पडली. त्यावेळेपर्यंत दोघांमधे बरीच कटुता आली होती. डावात दोघे काही सेकंदापेक्षा जास्त एकत्र थांबत नसत. एकाने खेळी केली की उठून जाणे आणि दुसर्‍याची खेळी झाली की परत येऊन बसणे असे अखंड सुरु होते. कापा अतिशय वाईट परिस्थितीत डावात अडकला पण त्याने जान पणाला लावून अलेखिनला सापळ्यात पकडले. दोन हत्तींच्या बदल्यात तीन मोहोरी मारुन शेवटी त्याने हा डाव जिंकलाच! डावाच्या शेवटी अलेखिनचे दोन्ही हत्ती पिलखान्यात कसे बंदिस्त आहेत हे बघून आपण थक्क होतो!! :)

१९३८ साली कापाला पहिला हार्टऍटॅक आला. त्याची तब्येत ढासळली असूनही त्याने उत्तम खेळ केला. अलेखिन, पॉल केरेस सारख्या उच्च खेळाडूंच्या स्पर्धेत १९३९ च्या चेस ऑलिंपियाडमधे त्याने क्यूबाला सुवर्णपदक मिळवून दिले!
७ मार्च १९४२ रोजी न्यूयॉर्कच्या मॅनहटन चेस क्लबमधे एका अनौपचारिक डावावर रंजक टिप्पणी करत असतानाच तो कोसळला. माऊंट सिनाई हॉस्पिटलमधे दुसर्‍या दिवशी सकाळी तो मरण पावला. त्याचे वय फक्त ५३ वर्षांचे होते.
त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी अलेखिनने सुद्धा म्हणून ठेवले आहे "कापाच्या अकाली निधनाने एका महान खेळाडूला काळाने आपल्यातून ओढून नेले आहे. त्याच्यासारखा दिग्गज पुन्हा होईल असे वाटत नाही!"

कापाच्या खेळाविषयी -
असामान्य प्रतिभवान असलेल्या ह्या खेळाडूला बुद्धिबळ पंडितांनी 'चेसचा मोझार्ट' अशी पदवी आदराने दिली होती. प्रसिद्ध खेळाडू रीचर्ड रेटी तर म्हणाला होता की "बुद्धीबळ ही कापाची मातृभाषा आहे!"
समकालीन खेळाडू मार्शल, लास्कर, अलेखिन आणि रुडॉल्फ स्पिलमन हेच काय ते त्याला कधीतरी हरवू शकले होते आणि ह्या सर्वांविरुद्ध त्याची एकूण कारकीर्द ही त्यांच्यापेक्षा सरसच आहे. आणखी एक अपवाद म्हणजे सुलतान खान, ह्याने कापाला हरवण्याचा भीमपराक्रम केला होता.
फक्त एकटा पॉल केरेसच त्याच्याकडून हरला नव्हता पण तेव्हा कापाचं वय होतं ५० आणि केरेस होता २२ वर्षांचा!
१९१९ ते १९२१ अशा तीन वर्षातल्या त्याच्या डावांची इलो रेटिंग सरासरी २८५७ अशी अफाट आहे (त्याच्यापुढे फक्त दोघेच राहतात एक गॅरी कास्पारोव आणि दुसरा बॉबी फिशर!)
पटावरच्या स्थितीची त्याची समज एवढी उच्च दर्जाची होती की त्याच्या विरुद्ध केलेले बहुतेक हल्ले हे त्याने फारसा प्रतिकार न करताच मोडून पडत!
तो टॅक्टिकल खेळ करण्यातही अतिशय कुशल होता. अत्यंत सूक्ष्म अशा पोझिशनल ऍडव्हांटेजचा लाभ जास्त मोहोरी जिंकण्याकडे कसा नेता येईल ह्याबद्दलचे त्याचे आडाखे पहाण्याजोगे असत.
त्याने चेस स्कूल किंवा 'बुद्धीबळ घराणे' सुरु केले नसले तरी त्याच्या खेळाचा विलक्षण प्रभाव पुढच्या दोन जगज्जेत्यांवर दिसून येतो - बॉबी फिशर आणि अनातोली कारपॉव. इतकेच नव्हे तर त्याच्याकडून अनेक गोष्टी शिकणार्‍या मिखाइल बॉट्विनिकने लिहून ठेवले आहे की अलेखिनने त्याच्या सुरुवातीच्या काळात कापाकडून बर्‍याच गोष्टी घेतल्या. निदान त्यांच्यात कडवटपणा येईपर्यंत.
२००६ मधे आइसलँडिक रेडिओवरच्या मुलाखतीत बॉबी फिशर म्हणतो, "मॉर्फी आणि कापा हे असामान्य होते. अलेखिनसुद्धा महान होता पण कापाकडे एकप्रकारची तरलता होती. त्याच्या खेळात एक लालित्य होते पांडित्याचा बोजडपणा नव्हता. त्याला कोणतीही स्थिती दाखवा तो नंतरची खेळी अचूक सांगे! मी जेव्हा जेव्हा मॅनहटन चेस क्लबला भेट दिली तेव्हा कापाबद्दल लोक आदराने बोललेलेच बघितले आहेत. त्यावेळी कापाला जाऊन १० वर्षे होऊन गेली होती. एवढा मान कोणत्याही खेळाडूला त्याच्या हयातीतदेखील मिळणे अवघड आहे. पश्चात मिळणे तर दूरचीच गोष्ट"

कॅपाब्लांकाला अशी भीती वाटत असे की मोठेमोठे खेळाडू जर सतत बरोबरी करण्याच्या मागे लागले तर आक्रमक आणि नैसर्गिक खेळाचे नुकसान होईल. तसे होऊ नये म्हणून त्याने १०*८ च्या पटावर खेळता येईल असा कॅपाब्लँका चेस असा चेसचा एक आगळाच प्रकार शोधून काढला होता! :) आणि हा त्याने जगज्जेता असतानाच लावलेला शोध होता, त्याचा जगज्जेतेपदाचा मुकुट हरल्यावर लावलेला नव्हे! ;) लास्करबरोबर तो ह्या नवीन पटाचे काही डाव खेळला होता आणि सहाजिकच त्यात जिंकलाही होता!

चतुरंग

क्रीडाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

ध्रुव's picture

12 Jun 2008 - 1:06 pm | ध्रुव

अत्यंत सुरेख लेख झाला आहे.
लेखनशैलीमुळे लेख अजून वाचनीय झाला.
--
ध्रुव

आनंदयात्री's picture

12 Jun 2008 - 2:06 pm | आनंदयात्री

छान लेख चतुरंग. बुद्धीबळातले फारसे न कळुनही तुझे लेख नेहमी वाचतो कारण खुप रंजक गोष्टी समजतात अन तुझ्या लेखनाला उत्तम ललित लेखनाच टच असतो उदा. लहानग्या कॅपाची पावलं रिकिबीत दिसली ती अशी!!

मस्त लिहतोस. मी काय म्हणतो घोडा अडिच घर चालतो, हत्ती सरळ, ऊंट तिरका, प्यादे १ घर अन हे सोडुन वेगळे काय करता येते ते कॅसलिन एवढीच माहिती असणारे अन त्या जोरावर लुटुपूटु खेळणारे माझ्यासारखे बरेच जण आहेत, आम्हाला जरा भारी चेस शिकव ना राव ! मस्त पैकी एखादी बेसिक चाल समजाउन सांगतांना तु भारी लिहशील !
काय म्हणतोस ? कधी टाकतोस चाल नंबर १ ?

लिखाळ's picture

12 Jun 2008 - 2:50 pm | लिखाळ

अजून एक उत्तम लेख.
अतिशय सुंदर भाषा आणि अभ्यासपूर्ण. आपले बुद्धीबळाविषयीचे लेख वाचायला खरेच आवडत आहे.

प्रदर्शनीय सामने म्हणजे काय असते?..

वरील प्रतिसादात आनंदयात्री सुचवतात तसेच मलाही वाटते आहे. निरनिराळे बचाव, पवित्रे यांबद्दल आपण लिहिलेत तर नक्कीच वाचायला आवडेल.
-- लिखाळ.

चतुरंग's picture

12 Jun 2008 - 11:42 pm | चतुरंग

म्हणजे प्रतिथयश खेळाडूंशी उदयोन्मुख खेळाडूंचे अनौपचारिक सामने. एकाच वेळा अनेकजणांशी खेळले जातात. ह्यात दोन गोष्टी साध्य होतात एक म्हणजे यशस्वी खेळाडू कसा खेळतो ते प्रत्यक्ष बघायला आणि/किंवा खेळायला मिळते. शिवाय यशस्वी खेळाडूसाठी सुद्धा हा एक सरावच असतो. नवनवीन खेळाडूंपैकी कोण चमकदार असू शकतील ते खेळाडू हेरता येतात. ह्यात चेस क्लॉकचा वापर होत नाही.

दुसरा प्रकार म्हणजे दोन तुल्यबळ खेळाडूतली लढत किंवा लढती. हे डाव व्यावसायिक पद्धतीने चेस क्लॉक घेऊन वेळेच्या नियमात खेळले जातात. आणि ह्यात प्रेक्षकांना, नवीन खेळाडूंना भरपूर शिकायला मिळते.

चतुरंग

लिखाळ's picture

14 Jun 2008 - 3:40 am | लिखाळ

शंकासमाधानाबद्दल आभार :)
-- लिखाळ.

तात्या विंचू's picture

12 Jun 2008 - 2:53 pm | तात्या विंचू

आनंदयात्रींशी सहमत....

चतुरंग यांना एक नम्र विनंती.......
आपण मिपा वर बुद्धीबळ शिकवायची लेखमाला सुरु करा ना.....
थोड्याफार बेसिक माहिती पासुन सुरुवात करुन डीपमध्ये जायला काहीच हरकत नाही.......

स्वाती दिनेश's picture

12 Jun 2008 - 9:22 pm | स्वाती दिनेश

बुध्दीबळाच्या खेळातल्या हिर्‍यांची ओळख फार छान करून देत आहात तुम्ही,
हा लेखही आवडलाच,
स्वाती

पिवळा डांबिस's picture

12 Jun 2008 - 9:37 pm | पिवळा डांबिस

शतरंजजी (सॉरी, चतुरंगजी),
सुरस, मनोरंजक आणि अभ्यासपूर्ण लेख!
उरलेली प्रतिक्रिया आता तुम्ही दिलेलं डावांचं होमवर्क केल्यानंतर...
आयुष्यात दिलेले होमवर्क आवडीने करण्याचा हा दुर्मिळ प्रसंग!!:)
-डांबिसकाका

धनंजय's picture

16 Jun 2008 - 1:33 am | धनंजय

गृहपाठ म्हणजे मजाच मजा.

स्वाती राजेश's picture

13 Jun 2008 - 12:37 am | स्वाती राजेश

मस्त माहिती आहे...
माझ्या मुलाने सुद्धा वाचली.तो शाळेत बुद्धीबळ स्पर्धेत भाग घेतो....त्याला थोडीफार माहिती आहे.
पण आपण दिलेली माहिती खरेच छान,उपयोगी आहे. त्यामुळे ज्ञानात भर पडली....
असेच काही चाली किंवा काही घटना येऊ देत....:)

विसोबा खेचर's picture

13 Jun 2008 - 8:18 am | विसोबा खेचर

नेहमीप्रमाणेच सुरेख लेख रे रंगा!

यात्री आणि पणशीकरांशी सहमत. सोप्या पद्धतीने तुझ्या शब्दात बुद्धिबळ शिकवणारी मालिका तू घेच लिहायला! मजा येईल!

लेका, तुलाच एकदा हारवायची इच्छा आहे! :)

आपला,
(तिरका) तात्या.

यशोधरा's picture

13 Jun 2008 - 8:30 am | यशोधरा

जमलाय लेख अगदी!

लेखनाला उत्तम ललित लेखनाचा टच असतो

अनुमोदन!

भडकमकर मास्तर's picture

13 Jun 2008 - 9:38 am | भडकमकर मास्तर

एकदम झकास लेख....
.... थोर खेळाडूंची ओळख करून देताना जालावरचे विविध डाव लिन्क म्हणून आपण देता, ते फार आवडते... त्यासाठी भरपूर मेहनत घेऊन आपण हा लेख तयार करता हे जाणवते..त्याबद्दल आभार....
....सोप्या शब्दांत काही चालींचे , ओपनिंग्जचे वर्णन येउदेत...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आपल्यापैकी बर्‍याचजणांचा आग्रह दिसतो आहे की मी ओपनिंग्ज बद्दल लिहावे.
खेळाचा पूर्वी जोरात असलेला संपर्क सुटून बरीच वर्षे झाली आहेत पण मी प्रयत्न करुन पाहीन, आवडले तर पुढे चालवूयात नाहीतर जय गंगे!
प्रोत्साहनाबद्दल पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद!

चतुरंग