नेट वर कलावंतिण गडाचे फोटो पाहिल्यापासुन एकदातरी हा ट्रेक करायचाच ही खूणगाठ मनाशी बांधली होती. जानेवारी मधे माधव भट याचा मेल येता क्षणीच ही संधी नक्की गाठायचे ठरविले.
मेल मधे मिळालेले फोटो (या मोहिमेचे प्रेरणास्थान):


दिवसभराचे काम आटोपून शुक्रवारी संध्याकाळी नाशिकहुन आम्ही चौघे (मी - ह्र्षिकेश, माधव,अनिरुध्द आणि शुभा) निघालो. नाशिक - मुम्ब्रा - शिळफाटा - कळंबोली मार्गे पुण्याकडे जाणारा एक्स्प्रेस वे गाठला. शेडुंग फाटा मार्गे खोपोली रस्त्यावर लागल्या लागल्या लगेच एक रस्ता डावीकडे - ठाकुरवाडी येथे जातो - हेच आहे आपल्या आजच्या मुक्कामाचे ठिकाण.
गावात पोहोचल्यावर तिथल्या श्वानांनी आमचे जोरदार स्वागत केले. काळ्याकुट्ट अंधारात गावातील सगळे रस्ते पालथे घालुन अखेर आम्ही हनुमान मंदिरात पोहोचलो.
क्षितिज व्यापुन लांबवर पसरलेला "प्रबळगड" आपल्या नावाचे बिरुद सार्थ करीत होता. पुर्वी प्रबळ कोकण किनारे आणि नजीकच्या वाटेवर आपला धाक जमवून असावा.
पुण्यातून निघालेले राहुल आणि चंद्रभूषण आल्यावर आम्ही प्रबळ माचीची वाट धरली. माची वर बर्यापैकी वस्ती असल्याने वाट छानच होती. लाकूडफाटा / मोळ्या / भाजीपाला घेऊन जाणारे गावकरी वाटेवर सोबत करीत होते.
डोंगर धारेच्या डावीकडून माचीकडे जाणारी वाटः
थोडेसे वर गेल्यावर आसपासची डोंगर रांग लक्ष वेधून घेत होती. एका मोठ्या शिळेवर आरुढ होण्याचा मोह माधवला झाला. त्याची पोझ मी पटकन कॅमेर्यात पकडली.
तासा - दीड तासात प्रबळ माची वर येऊन पोहोचलो. तिथे श्री निलेश भुतांब्रा यांच्या घरी स्वादिष्ट चहा पोहे यांची पोटात भर टाकली. येथेच राहण्याची व जेवणाची सोय होऊ शकते. (मोबाईल ९९२०५१८०८६)
नुकत्याच सारवलेल्या जमिनीवर थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही पुढील वाटेला लागलो. सारवलेल्या जमिनीचा मंद सुवास आणि थंडावा मनात दरवळत होता.
माची वरुन आता कलावंतिण गड अधिक सुस्पष्ट दिसत होता.
गडाला कलावंतिण असे नाव का बरे पडले असावे?
तर एका राजाकडे एक कलावंतिण होती म्हणे. ति या गडावर राहायची. राजा तिकडून गेल्यावर देखील ति तिथेच राहिलि म्हणुन गडाला असे नाव प्राप्त झाले अशी कथा गावकर्यांकडुन ऐकायला मिळते. परंतु आजुबाजूच्या परिसरावर टेहळणी करण्याकरीताच या गडाची निर्मिती झाली असणार.
साधारण अर्ध्या तासाच्या खड्या चढाई नंतर प्रबळगड आणि कलावंतिण यांच्या खिंडीत आलो. गावातुन येणारी ही वाट मात्र घरंगळलेले दगडगोटे आणि मुरुम यामुळे दमछाक करणारी होती. उन्हामुळे आमची सगळी दोस्त मंडळी आता विसावा शोधत होती.
खिंडीतुन गडावरील सुरुवातीच्या पायर्या खुणावत होत्या.
लवकरच मी ऊंचावर आलो आणि मगाची खिंड आता मागे पडली होती.
या चित्रातील पायर्या तर साक्षात आकाशाला गवसणी घालत होत्या.
शेवटी १५ ते २० फुटांचे सोपे प्रस्तरारोहण करुन गडाचा माथा गाठता येतो. साधारण४०-५० माणसे एका वेळी मावतील एवढाच माथ्याचा विस्तार आहे.
वरुन माथेरान बरेच जवळ दिसत होते:
विस्तारलेले प्रबळगड - माची पठार वस्ती साठी अनेक पिढ्यांचे स्थान बनले असावे.
ऊतरतांना पायर्या अधिकच आक्रमक वाटत होत्या.
आता पायर्यांची वाट प्रबळ माची आणि कलावंतिण यांच्या खिंडीकडे वेगाने झेपावत होती.
परतीच्या वाटेवर निलेशच्या घरी गरमा गरम तांदळाची भाकरी, ऊसळ, झणझणीत ठेचा व आमटी भात असा फक्कड बेत रिचवून तृप्तीची ढेकर दिली.
कारल्याच्या वेलात गुरफटलेले घर
एक वेगळा गड पाहिल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहर्यावर होते. पाऊले झपझप वाट उतरत होती.
आता कलावंतिण गडाचे हिरवाईत न्हालेले रुप बघण्यासाठी पावसाळ्यात नक्की परतायचे असा निश्चय करून आम्ही परतीच्या वाटेला लागलो.
- ह्र्षिकेश
(टिपः
मिपा वर आणि तेही मराठी मधुन लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तरी चूकभुल द्यावी घ्यावी.
मिपावर बरेच पुणेकर आहेत म्हणे.... )
प्रतिक्रिया
23 Feb 2012 - 9:19 pm | अन्या दातार
उत्तम वृत्तांत. पहिलाच प्रयत्न छान जमलाय.
23 Feb 2012 - 9:34 pm | पैसा
म्हणजे वाचायला आणि फोटो बघायला! त्या काय पायर्या आहेत की चेष्टा?
तुम्ही पहिला लेख नीट आणि व्यवस्थित लिहिला आहे. मिपावर स्वागत! पण जाता जाता पुणेकरांना टप्पल मारलीय त्यावरून तुम्ही अगदीच 'कच्चा पेरू' वाटत नाही! ;)
24 Feb 2012 - 4:36 pm | मी-सौरभ
टू पैसा ताई
23 Feb 2012 - 11:04 pm | प्रचेतस
मस्त रे.
च्यायला तुझी कलावंतीणीची ऑफर नाकारून मी मुरुडला जाऊन बसलो आणि एका भन्नाट अनुभवाला मुकलो.
हरिहरच्या वृत्तांताची आता वाट पाहतोय.
24 Feb 2012 - 1:29 am | मोदक
वल्ली व बाकी मिपाकर मंडळी,
मी चाललो आहे मार्च च्या एखाद्या रविवारी... येणार असल्यास जरूर कळवा..
24 Feb 2012 - 12:22 pm | sagarpdy
आम्हाला मुहूर्त कळवा
25 Feb 2012 - 10:56 pm | चंबा मुतनाळ
मोदक साहेब, जाणार असलात तर जरूर कळवा. येण्याचा प्रयत्न केला जाईल. बरेच दिवस घोळते आहे जायचे कलावंतिणीवर.
चंबा
23 Feb 2012 - 11:38 pm | प्राजु
मस्त फोटो.
पायर्या भितीदायक आहेत हे नक्की.
23 Feb 2012 - 11:52 pm | मराठे
पायर्या खरोखरच भन्नाट आहेत. उतरताना एखाद्या दगडावरून पाय घरसला तर डायरेक स्वर्गाच्या पायर्या चढायची वेळ यायची!
25 Feb 2012 - 2:26 am | पिवळा डांबिस
उतरताना एखाद्या दगडावरून पाय घसरला तर डायरेक स्वर्गाच्या पायर्या चढायची वेळ यायची!
खरं आहे. पण त्याचबरोबर कलावंतिणीच्या गडावर पाय घसरून स्वर्गाला जायची कल्पना किती रोमॅन्टिक आहे!!!! आपण तर ब्वॉ कुठल्यातरी लिंगाण्यावर किंवा डोणागिरीवर पाय घसरून घेण्यापेक्षा इथेच पाय घसरून घेणं पसंत करू!!!
;)
23 Feb 2012 - 11:56 pm | जाई.
फोटो आणि वृतांत आवडला
24 Feb 2012 - 12:34 am | अत्रुप्त आत्मा
चला आज अजुन एक गड सर झाला... :-)
24 Feb 2012 - 1:24 am | मोदक
कलावंतीण हा एक "अनुभव" आहे.
आम्ही नोव्हेंबर २०११ ला गेलो होतो, सकाळी निघायला उशीर झाला आणि भर दुपारी १ की २ वाजता कलावंतीण सुळका चढावा लागला. खालून (म्हणजे बुटाच्या आतून) तापलेल्या कातळाचा चटका + वरून उन्हाचा तडाखा... :-(
वरून प्रबळगडाचे विस्तीर्ण पठार दिसते.. त्याची तुलना बहुदा लोहगडावरून दिसणारे विसापूर आणि तैलबैलावरून दिसणारे पठार (नाव आठवत नाहिये.. कॉलिंग वल्ली..!) याच्याशीच होवू शकेल.
>>>कलावंतिण गडाचे हिरवाईत न्हालेले रुप बघण्यासाठी पावसाळ्यात नक्की परतायचे
पावसाळ्यात थोडे सांभाळून, प्रचंड पावसामुळे सगळ्या पायर्या शेवाळलेल्या असतात... घसरण झाली तर Point of No Return.
24 Feb 2012 - 10:13 am | Hrushikesh
कलावंतीण ला जाण्याआधी मलाही पावसाळ्यात जाणे धोक्याचे आहे असे वाटत होते. गावकर्यांना विचारले असता, पावसाळ्यात ट्रेकर्स सगळ्यात जास्ती येतात असे कळले. ट्रेकर्सच्या या राबत्यामुळेच पायर्यांवर शेवाळे साचत नाही.
तसेच पायर्या पण मोठ्या आहेत त्यामुळे अडचण नसावी. दगडी पायर्यांमुळे व मुरुम - कच्च्या वाटेवर एक्स्पोजर नसल्यामुळे पावसाळ्यात रिस्क असेल असे वाटत नाही.
बघुयात मित्र मंडळींचे टोळके जमल्यास पावसाळ्यात जाता येईल. या वेळी प्रबळगड करायचे राहुन गेले आहे, तेथेही जाता येईल.
24 Feb 2012 - 12:14 pm | मोदक
>>>>पावसाळ्यात रिस्क असेल असे वाटत नाही.
तरीही सांभाळून. :-)
पावसाळ्यात जाणार असल्यास हाक मारणे. मी चिंचवडात असतो, सांगाल तिथे जॉईन होवू शकेन.
पावसाळ्यातला महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे धुके - गडावरून बाकी काहीही दिसत नाही.. पण भरपावसात मजा येतेच.
24 Feb 2012 - 3:01 pm | Hrushikesh
तुम्हाला सांगेनच परत जायचे ठरल्यास. चिंचवड येथून वल्ली पण कदाचित येऊ शकेल.
(तसे आताशा वल्ली वयोमानाप्रमाणे ट्रेक ला न जाता समुद्र सपाटीच्या जागा शोधतो म्हणा)
24 Feb 2012 - 4:24 pm | प्रचेतस
़ही खी खी
समुद्र ही पण आमच्या आवडीची जागा आहे.
हरीहर ला जाउयातच आता
24 Feb 2012 - 4:50 pm | वपाडाव
आम्हाला कळाले आहे की वल्ली आज-काल समुद्रसपाटीच्या अन डोंगरदर्यांच्या सानिध्यात राहणंच जास्त पसंत करतो...
24 Feb 2012 - 4:58 pm | मोदक
काय पर्भणीकर.. इतक्या दुरूनही तुमचे नेटवर्क भारी चालले आहे..?
आपकी तंदुरूस्तीका राज..? ;-)
25 Feb 2012 - 9:03 pm | धन्या
ते पर्भणीला राहतात. महानगरात नाही. गावाकडे हवा चांगली असते. ;)
24 Feb 2012 - 2:23 am | अन्नू
आंम्हाला सुद्धा अशा उंचच्या उंच डोंगरकड्यावर जायची भारी हौस आहे. पण काय करणार आंम्हाला उंच ठिकाणी खूप विचित्र भिती वाटते.
असल्या कुठल्याही उंच ठिकाणावर गेल्यावर का कोण जाणे पण, वरुन पाण्यात खोच मारावी अशी
तिथून सरळ खाली उडी मारावीशी वाटते
24 Feb 2012 - 8:07 am | अत्रुप्त आत्मा
@तिथून सरळ खाली उडी मारावीशी वाटते>>> मारा की मग :-p
24 Feb 2012 - 4:38 pm | मृत्युन्जय
@तिथून सरळ खाली उडी मारावीशी वाटते>>> मारा की मग
येत रहा....
ते शेवटचे येत रहा अगदी अत्रुप्त आत्म्याने म्हटल्यासारखे वाटते आहे. वरुन उडी मारल्यावर ते अत्रुप्त आत्म्याकडेच जाणार की हो.
24 Feb 2012 - 9:58 am | मोदक
अरविंद बर्वे नावाची एक व्यक्ती हरिश्चंद्रगड कोकणकड्याच्या प्रेमात पडली होती.. तो दिवस दिवस तिथेच बसून असायचा.. एका वेड्याक्षणी त्याने तिथून उडी मारली :-(
कोकणकडा: -
24 Feb 2012 - 7:42 am | ५० फक्त
जबराट ट्रेक आहे, मला वाटतं अशा पाय-या अन चढण्या उतरण्याच्या पाय-या बहुतेक सगळ्या किल्यांवर होत्या पण श्री. वल्लींनी दिलेल्या माहितीनुसार इंग्रजांनी त्या फोडुन टाकल्या, पुन्हा या गड किल्यांचा उपयोग होउ नये म्हणुन.
24 Feb 2012 - 9:03 am | नरेंद्र गोळे
पायर्या खरोखरच भन्नाट आहेत.>>> +१
जाणीवपूर्वक काढलेले सुरेख फोटो. आवडले.
24 Feb 2012 - 9:11 am | चौकटराजा
आता या वयात या पायर्या गुगल अर्थ वापरून चढू म्ह्नणतो.
24 Feb 2012 - 1:58 pm | गणेशा
एकदम छान दोस्ता.
असेच फिरत रहा ...
24 Feb 2012 - 2:39 pm | मेघवेडा
क्लास! फोटोज आणि वर्णन दोन्ही आवडले! शेवटच्या वाक्यातले शाजो भारीच!
24 Feb 2012 - 6:12 pm | डिजेबॉय
छायचित्रे अतिशय सुरेख आहेत.
पायर्या तर धमाल भयानक..!!
24 Feb 2012 - 4:49 pm | रघुपती.राज
फोटो आवडले.
आणखी येउ द्या.
25 Feb 2012 - 6:01 am | अभिजीत राजवाडे
सर्व छायाचित्रे अप्रतिम आली आहेत, विशेषतः पहिले चित्र मला फार आवडले. हा ट्रेक माझा करायचा राहिला आहे. लवकरच योग अशी आशा वाटते आहे.
आणखी गड येऊ द्यात.
पुन्हा एकदा अभिनंदन.
25 Feb 2012 - 3:13 pm | चौकटराजा
मिपा वरील समस्त म्हातार्यानो ,
वयाने नव्हे मधुमेह बीपी , रक्त पातळ करणारी गोळी घेणारे, यानी या कलावंतिणीचा नाद करायचा नाय....
निस्त ग्य्लेल्येल्यांच कवतिक करायचं !