गटारीगाथा

सौन्दर्य's picture
सौन्दर्य in कलादालन
22 Jul 2011 - 7:02 pm

गटारीगाथा
तसे आपले खास असे महाराष्ट्रीयन सण पुष्कळ आहेत, पण ज्या सणाची महाराष्ट्रीयन पुरुष आतुरतेने वाट पाहतो तो सण म्हणजे 'गटारी अमावस्या'. ज्या प्रमाणे गणेश चतुर्थी, दिवाळी वगैरे सणांची तयारी काही दिवस अगोदर पासूनच सुरु केली जाते, त्याच प्रमाणे ह्या दिवसाची तयारी देखील पुष्कळ दिवस आधीपासून सुरु होते. आधी पुरुषवर्ग मनातल्या मनात मांडे खाऊ लागतो. गटारी जवळ आल्यावर हळू हळू गटारीचे सुतोवाच बायकोसमोर केले जाते. बायकोने फारशी नाराजी दाखवली नाही कि ह्यांच्या उत्साहाला उधाण येते, आणि मग गटारीच्या दिवशी काय विचारता - आधीच मर्कट, तशात मद्य प्याला --------------------.

पण हे जितके वाटते तितके सोपे नाही हे जाणकार पुरुष मान्य करतील. एकवेळ चक्रव्यूहाचा भेद करता येईल, परंतु गटारी साजरी आणि संपन्न करण्याचा मार्ग अगदी बिकट आहे. गटारी ‘साजरी’ तशी कोणीही करू शकतो, परंतु ती ‘संपन्न’ होईलच असे नाही. ती संपन्न होण्यासाठी गृहलक्ष्मी चे अभय मिळणे फार जरुरी आहे. ‘साजरी करणे’ म्हणजे गुपचूप दोन पेग घशात ढकलणे, वास लपवण्यासाठी गुटखा खाणे आणि चोरा सारखे घरी परतणे. पण त्यात काही मजा नसते, ‘संपन्न’ झाली तरच गटारीची खरी मजा आहे.

सड्या फटिंग पुरुषा पासून संसारी पुरुषापर्यंत, गटारी संपन्न करण्याची ही वाट चढत्या क्रमाने बिकट होत जाते. सड्याला काहीच करायचे नसते, गटारीला सरळ ऐपती प्रमाणे आणि मगदुरा प्रमाणे खंबा घ्यायचा आणि गटारी साजरी करायची. नुकत्याच कमवायला लागलेल्या परंतु लग्न न झालेल्या मुलाला आई-बाबांपासून चोरून गटारी साजरी करावयाला लागते. नवीनच लग्न झालेल्या पुरुषासाठी देखील गटारी फारशी दुर्लभ गोष्ट नाही, मात्र, लग्नाच्या आधीच, होणाऱ्या बायकोजवळ "पितो कधी कधी", एवढा तरी कबुलीजबाब देणे गरजेचे असते. जर हा गौप्यस्फोट गटारीलाच झाला तर तो आयुष्यभर पस्तावतो. मात्र नवीन लग्न झालेल्यांसाठी सर्व काही गुलाबी गुलाबी असते. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर जर लग्न लागले असेल, तर गटारी तशी लगेचच येते. ही पहिलीच गटारी, पहिल्या मंगळागौरी सारखी साजरी करायला हरकत नसते, म्हणजे बायकोची – हरकत नसते, नवऱ्याची तर आजन्म नसते. त्याच्या 'घेण्या'ला तिची चखणे तळून 'देण्या'ची साथ असते. त्यात बायको देखील शौकीन असली मग तर काय विचारता 'सोने पर सुहागा'. थोडक्यात आनंदी आनंद असतो.

परंतु सर्वात कठीण परीक्षा संसारी पुरुषाची, त्यात देखील लग्न होऊन ८-१० वर्षे झालेल्यांची असते. लग्नाची नवलाई संपली असते, एक किंवा दोन मुले असतात. बायको कमावती असते, नवऱ्याच्या खांद्याला खांदा देऊन ती नवऱ्याचा संसार शकट ओढत असते. आत्तापर्यंत तिला नवऱ्याची नस अन् नस ओळखता येत असते, म्हणजे असा तिचा (गैर) समज असतो. ह्या अश्या नवऱ्या मंडळींची दारूविणा फारच कुचंबणा होत असते. दारूचे साधे नाव जरी काढले तरी बायकोचे डोळे पराती एव्हढे मोठे होतात अन् नवऱ्याचा उत्साह कुरुक्षेत्रातल्या अर्जुना सारखा गळून पडतो आणि मग तो अश्या (महा) राष्ट्रीय अन् काही अंशी धार्मिक सणांची फारच आतुरतेने वाट पाहत राहतो. सण जरी राष्ट्रीय, धार्मिक वगैरे असला तरी गटारीचा किल्ला सहजासहजी सर होत नाही. त्यासाठी फार श्रम, त्याग वगैरे करावे लागतात.

आषाढ सुरु होता होताच नवरे मंडळीना गटारीची चाहूल लागते, डोळ्याभोवती बाटल्या फेर धरू लागतात आणि ग्लास किणकीणायला लागतात, आणि मग ह्या वीर पुरुषांची घालमेल सुरु होते. काय करावे, कसे करावे, बायकोला विचारावे की नाही, विचारावे तर कसे विचारावे ह्या विवंचनेत तो बुडून जातो. बायकोला गटारी साजरी करण्याविषयी विचारावे तर होणाऱ्या स्फोटाच्या कल्पनेनेच तो गारठून जातो अन् गटारी तर जवळ येत चालली असते. तर अश्या ह्या कात्रीत सापडलेल्या गरीब बिचाऱ्या आणि सोशिक नवरे मंडळींसाठी, गटारीचा मार्ग सुकर करून देण्यासाठी हा लेखन प्रपंच.

आधी म्हंटल्याप्रमाणे चतुर पुरुषांनी गटारी ची पूर्व तयारी फार आधीपासून करावी, 'पूर्व तयारी' आणि 'फार आधीपासून' ही जरी द्विरोक्ती झाली तरी गटारीचे महत्वच तेव्हढे आहे. आधीपासून म्हणजे कमीत-कमी एक महीना आधीपासून. आषाढ मासारंभेच म्हणू लागायचे, “काय पाउस पडतो आहे नाही ? लोणावळा-खंडाळा म्हणजे अगदी स्वर्ग असेल स्वर्ग.' असे दोन-तीनदा म्हणून झाले की बायको समोर लोणावळा-खंडाळ्याला जाण्याचा बेत ठेवावा. बायको तयार झाली तर आनंद आणि नाही झाली तर अत्यानंद. नाही तरी स्व:ताच्या बायकां-पोरांची वरात घेऊन लोणावळा-खंडाळा म्हणजे ----------------- असो. समजा, बायको तयार झाली आणि गेलात तुम्ही लोणावळा-खंडाळ्याच्या स्वर्गात, तर तेथेच बायकोच्या पूर्व परवानगीने, एखादा पेग मारता-मारता हळूच गटारीचे सुतोवाच करावे. "आता आज नंतर सरळ गटारीलाच 'अधर-चषक योग', ह्या ह्या ह्या ह्या”. हे असे हसणे येथे फार महत्त्वाचे आहे, त्याने दोन गोष्टी साध्य होतात. तुमचे हे वाक्य ऐकल्यावर बायको जर खवळली तर, "अग, मी साधी मस्करी करीत होतो, तू खरे समजलीस की काय ? " असे म्हणून वेळ मारून न्यायची, आणि त्याच बरोबर,' ‘ह्या वर्षी आपल्याला 'गटारी' चे योग नाहीत अशी खुणगाठ मनाशी बांधावी. ही झाली नांदी. मात्र तुमचे हे वाक्य बायकोने जर ऐकल्या न ऐकल्या सारखे केले, तर गटारीच्या गडाची एक पायरी चढलात असे म्हणायला हरकत नाही.

लोणावळा-खंडाळा वगैरे एन्जोय करून झाले, कि लगेच एखाद्या रविवारी पुढचा फासा फेकावा. बायकोजवळ, (तिच्या) आई-वडिलांच्या प्रकृतीची चौकशी करावी, पण जास्त खोलात शिरू नये. जर ते दूर कोकणात वगैरे असतील तर उत्तमच, कारण ते जर जवळपास राहत असतील, तर तुम्ही दाखवलेल्या आस्थेने सुखावून, बायको त्यांना बोलावणे धाडू शकते आणि तसे घडले तर गटारीला ताडी देखील दिसणार नाही हे पक्के समजावे. ह्या चौकशीत मेहुणीचे नाव चुकूनही येत कामा नये, नाहीतर प्रकरण वेगळेच वळण घेण्याचा संभव असतो. आई-वडिलांच्या ह्या तुमच्या चौकशीने, तुम्ही एकदम बायकोच्या आदरस्थानी पोहोचता आणि तिच्या विरोधाचे आणखी एक कवच निखळून पडते. ह्यापुढील पायरी म्हणजे दरवाज्याआड दडलेले 'काल-निर्णय' काढून, बायको समोर त्याची उगाच चाळवा-चाळव करणे. कॅलेंडर च्या मागे असलेले 'खमंग खाद्य पदार्थ' तसेच 'वजन कमी करण्याचे १०१ उपाय' वगैरे तिला वाचून दाखवावेत. हे खटाटोप करत असताना, तिची नजर आपोआपच गटारीवर पडेल असे कॅलेंडर धरावे. तिनेच आपणहून गटारीचा विषय काढला तर तुमचा ही गनिमी कावा सफल झाला असे म्हणावयास हरकत नाही. पण जर तिचे गटारीकडे लक्ष्यच गेले नाही तर, " श्रावण अगदी २५ दिवसावर आला आहे नाही? (खरे म्हणजे गटारी २५ दिवसावर आली आहे असे तुम्हाला म्हणावयाचे आहे) "आपल्या हिंदू धर्मात श्रावणाला फारच महत्त्व असते नाही बुवा ?" असे काहीतरी वायफळ बोलावे. थोडक्यात काय गटारीची आणि बायकोची ‘दृष्ट-भेट’ घालून द्यावी. आता येथून पुढील डावपेच आखताना फार सांभाळावे, कारण गटारी जवळ येत चालली आहे. बायको जर 'त' वरून ताकभात ओळखणारी असेल (बहुतेक बायका तश्या असतातच म्हणा) तर तुमची एक बेसावध, चुकीची चाल तुम्हाला गटारी पासून कोसो दूर घेऊन जाऊ शकते.

आता एक हमखास यश देणारी खेळी तुम्हाला खेळावयाची आहे. बायकोच्या चांगल्या बुकात असणाऱ्या तुमच्या एखाद्या मित्राला, बायको आणि तुम्ही घरी असताना, तुम्हाला फोन करावयाला लावायचा. त्याला आधीच पढवून ठेवल्या प्रमाणे तो तुम्हाला काहीतरी कारण काढून पार्टी साठी निमंत्रण देईल. तुम्ही ते निमंत्रण टाळण्याचा प्रयत्न करायचा. बायकोला ऐकू जाईल अश्या मोठ्या आवाजात, " छे छे, मी नाही येऊ शकत पार्टीला”. “अरे का म्हणून काय विचारतोस ? मुलांची परीक्षा जवळ आली आहे आणि मला त्यांचा अभ्यास घ्यायचा आहे". हल्ली वर्षभर ह्या न त्या परीक्षा चालूच असतात, त्या मुळे तुम्हाला असे ठोकून द्यायला काहीच हरकत नाही. फक्त नक्की तारीख वगैरे बोलू नका नाहीतर तुमचे पितळ उघडे पडेल. तुमच्या अश्या उत्तराने बायको तुमच्याकडे एकतर प्रेमाने तरी पाहील अथवा विचित्र नजरेने. जर तिने विचित्र नजरेने पहिले तर नक्कीच समजा 'दिल्ली अभी बहुत दूर हैं'. मग बायकोचे लक्ष्य असताना, पुढील वाक्ये, जी हमखास पाँइन्ट मिळवून देणारी आहेत, ती बोलावीत. " हे बघ, तुमच्या त्या पार्टीपेक्षा मला घरात इतर महत्त्वाची कामे आहेत, आणि ड्रिंक्स ला तर माझ्या मते अगदी दुय्यम स्थान आहे”. “आता ती गटारी का काय असते ना, त्या शिवाय प्यायची नाही असाच मी निश्चय केला आहे". येथे एका दगडात तुम्ही पक्षांचा थवाच पाडला आहे असे म्हणायला हरकत नाही. तुम्ही चक्क दारूची पार्टी ठोकरलीत म्हणून बायकोला कधी नव्हे तो तुमच्याविषयी आदर वाटू लागतो. आदराचे रुपांतर प्रेमात, प्रेमाचे सहानभूतीत आणि शेवटी दयेत होऊ लागते. आता ह्या दयेचे रुपांतर गटारीत कसे करायचे हे सर्व नवरे जाणतातच, त्यामुळे तो भाग ज्याच्या त्याच्या कर्तबगारी वर अवलंबून आहे. तुम्ही गटारीचा असा प्रत्यक्ष उल्लेख केल्यामुळे गटारीचे येणे देखील बायकोच्या मनावर बिंबते. तुम्ही केलेल्या अनन्यसाधारण त्यागामुळे, तुमची गटारी ची शक्यता खात्रीत बदलते. मात्र येथे एक सावधगिरीची सुचना द्यावीशी वाटते - फोनवर उगाच बेल वाजवून (मोबाईल वर तशी सुविधा असते) मित्राचा फोन आहे व तो पार्टीला बोलावतो आहे असे नाटक करू नका. बायकोला जर संशय आला आणि तिने तुमच्या हातातून फोन ओढला - तर तुम्ही फक्त ह्या वर्षीच नाही तर आजन्म गटारीला मुकलेच म्हणून समजा. म्हणूनच 'जपून टाक पाऊल आज' असा सल्ला येथे द्यावासा वाटतो.

आता येणार येणार म्हणता गटारी जेमतेम एका आठवड्यावर येऊन ठेपली आहे. नवऱ्याच्या पोटात आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या आहेत. लहानपणी शाळेत सहलीला जायचे ठरल्या बरोबर जशी एक वेगळीच हुरहूर दाटायला लागते, तसेच काहीसे गटारी विषयी व्हायला लागते. उगाचच हसावेसे वाटू लागते, गुणगुणावेसे वाटू लागते, मुलांचा गालगुच्चा घ्यावासा वाटतो. कधी नव्हे तो घरी चांगला मुड निर्माण झाला असतो. लोणावळा-खंडाळा, तुम्ही बायको जवळ तिच्या आई-वडिलांविषयी दाखवलेली आस्था, मुलांच्या अभ्यासासाठी मारलेली मित्राच्या पार्टीवरची लाथ ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊ लागला असतो. बायको आता वेगवेगळया बाबतीत तुमचा सल्ला मागू लागली आहे, मुले अंगा-खांद्यावर खेळू लागली आहेत. माहेरी बोलताना तुमच्या स्तुतीची वाक्ये कानी पडू लागली आहेत, आपल्या मैत्रिणी कश्या मूर्ख आहेत, हे ती सांगू लागली आहे. ही सर्व शुभ-चिन्हे समजावीत. परंतु खुंटा अजून हलवून बळकट करायचा आहे. त्यासाठी काय करावे, तर बायकोला घरकामात, तिला संशय न येईल अश्या बेताने मदत करावी. पण चुकूनही घरकामाला येणाऱ्या बाईची कामे करू नयेत, त्यासाठी आधीच त्या बाईची कामे (बाईला नव्हे) पाहून घ्यावीत, म्हणजे नंतर नसता घोळ नको. बायको बरोबर बसून चवीने सिरिअल्स बघण्याचे नाटक करावे, अगदी क्रिकेटची मॅच जरी असली तरी न कुरकुरता सिरिअल लावू द्यावी. हे सर्व करताना मध्ये मध्ये हवामानाचा अंदाज घेत, गटारीचे वारे कोणत्या दिशेला वाहत आहेत ह्याचा कानोसा घ्यावा, सर्व काही ‘आलबेल’ असल्याची खात्री पटताच, सर्व धीर गोळा करून बायकोजवळ गटारीचा विषय काढावा.

तुमच्या एव्हढ्या फिल्डिंग लावल्याने ती सुद्धा आत्तापर्यंत तुम्हाला थोडीफार ‘फॉर’ झालेली असते. सुरुवातीला ती चक्क ‘नाही’ म्हणेल, “आत्ता तर लोणावळ्याला प्यायलात”, वगैरे म्हणेल, पण तुम्ही खिंड लढवीतच राहायचे. गटारीला पिणे कसे धार्मिक आहे ह्यावर बोलावे. जर तुम्ही थोडेफार क्रिएटिव असाल तर एखादी पौराणिक कथा रचून त्यात देव देखील गटारी कसे साजरी करायचे ते बायकोला पटवून द्यायचे. मामला अगदीच हाताबाहेर जात आहे असे वाटल्यास थोडाफार रुद्रावतार धारण करायला हरकत नाही, पण तेव्हढी गरज भासत नाही असे अनुभवाचे बोल आहेत. शेवटी येनकेन प्रकरणे गटारी प्याल्यात पडतेच.

आणि म्हणता म्हणता गटारी तोंडावर येते. मित्रांचे बेत शिजू लागतात, ते आपल्यालाही आपले बेत विचारू लागतात. येथे एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो. गटारी, मित्रांना बोलावून आपल्या घरी साजरी करावी की एखाद्या बार च्या आसऱ्याला जावे. फायदे-तोटे, घरी आणि बारी, दोन्हीकडे आहेतच. बारचे सुपरिणाम बरेच आहेत, वाटेल तेव्हढी पिता येते, वाटेल ते व वाटेल तसे खाता येते. वाटेल तेव्हढे बरळता येते, शिव्यांच्या मधे वाक्य पेरून बोलता येते. बॉस चा त्याच्या सात पिढ्यानसकट उद्धार करता येतो, नुकताच बढती मिळालेला सहकारी कसा नालायक आहे आणि शुद्ध चमचेगिरी करून त्याने प्रमोशन कसे मिळवले हे मित्रांना सांगता येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गटारी साजरी झाल्यावर, केलेला उकिरडा आवरावा लागत नाही. पण ह्या सर्व फायद्यांचा विरुद्ध म्हणजे बार चे बिल. पिऊन पिऊन मिटायला लागलेले डोळे, बिल दिसल्यावर खाडकन उघडतात, आणि मग स्वताच्या आणि मित्रांच्या खिशाची चाचपणी सुरु होते. खिशात क्रेडीट कार्ड्स वगैरे जरी असले आणि त्याने बार चे बिल चुकवले तर गटारीची खरी किंमत बायकोला कळायचा धोका असतो. दुसरे म्हणजे एकदा का क्रेडीट कार्डाने बिल भरले कि मित्रांकडून भरपाई मिळण्याची शक्यता अगदी शून्य असते. गटारी आपल्या घरी साजरी करण्याने खर्च तसा आवाक्यात राहतो, मागच्या वेळेसारखे, मित्रांना, तुम्हाला उचलून घरी आणावे लागत नाही. गटारी घरी साजरा करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे त्यामुळे पुढच्या दोन तीन वर्षांची बेगमी होते. ज्या प्रमाणे काही कुटुंबात फिरता गणपती असतो त्या प्रमाणे मग ही फिरती गटारी होते. जे कोणी मित्र आपल्या घरी आलेले असतात, त्यांच्या घरी अथवा त्यांच्या पैशाने पुढील दोन तीन वर्षे गटारी साजरी करता येते.

आता गृहलक्ष्मीची परवानगी मिळाल्यामुळे एक वेगळाच हुरूप आला असतो. फोनवर एकमेकांचा ब्रांड आणि कोटा ह्यावर बोलणी सुरु होतात. चखन्यात काय , किती आणि कोणी आणायचे हे ठरले जाऊ लागते. पैशांची सढळ हाताने देवाण-घेवाण होऊ लागते. शेवटी गटारीच्या संध्याकाळी, वेळे आधीच मंडळी जमा होतात, वातावरणात उत्साह भरून राहीला असतो, सुज्ञ गृहलक्ष्मी हॉल मध्ये जमिनीवर जुनाट सतरंजी अंथरते, नवऱ्याला तेव्हढाच जुना शर्ट आणि लुंगी घालायला देते, कारण त्या शर्टाचे, लुंगीचे आणि सतरंजीचे भविष्य तिला पूर्वानुभवावरून ठाऊक झालेले असते. मंडळी स्थानापन्न होतात, चषक भरले जातात, चखन्याच्या बश्या मध्ये मांडल्या जातात, म्युझिक सिस्टीम वर गझल लावण्याची फर्माईश सुटते, त्यावरून थोडाफार वादही होतो कारण तेव्हढ्यातच कुणालातरी मराठी नाट्यसंगीत ऐकायचे असते. पण वाद लगेच मिटतो कारण 'अधर- चषक योग' समीप आला असतो, शेवटी 'चिअर्स' चा चित्कार होतो, चषक अधराला भिडतात, 'आनंदाचे डोही आनंद तरंग' अशी अवस्था निर्माण होते, मंडळी तरंगायला लागतात, आणि गटारी नुसतीच साजरीच नव्हे तर संपन्नही होते.

सौंदर्य
जुलै २२, २०११

विनोद

प्रतिक्रिया

शाहिर's picture

23 Jul 2011 - 8:54 am | शाहिर

तात्काळ कार्यवाही केली जाइल !!
(आम्ही आषाढा मधले शेवटचे दोन दिवस माहेरी जायची परंपरा आहे ..असे सांगितले आहे ..)

चिंतामणी's picture

23 Jul 2011 - 9:03 am | चिंतामणी

पण एक गोष्ट कळली नाही. हा लेख "कलादालन" या सदरात का टाकला? मला वाटले सोकाजीरावांनतर आपण सचीत्र वारूणी महीमा टाकला आहे की काय????

पण फसगत झाली.

सोत्रि's picture

26 Jul 2011 - 6:08 pm | सोत्रि

चिंतामणी,
काही हरकत नाही, जे काही किहीले आहे ते एवढे जालीम आहे की कुठेही टाकले असते तरीही तोच खमंगपणा राहिला असता.

सौंदर्य,

मला दिवाळीची खमंग आणि कुर्कुरीत चकली प्राणाहुन प्रिय आहे आणि हा लेख वाचताना आइच्या हातची (अरे हो, बायकोच्याही बरं का, नाही तर बुडालीच गटारी ....;)) ती खमंग आणि कुर्कुरीत चकली खाताना जशी धमाल येते तशीच शेम तो शेम धमाल आली.

गटारी ‘साजरी’ तशी कोणीही करू शकतो, परंतु ती ‘संपन्न’ होईलच असे नाही.

+111

- (रोजच गटारी करणारा) सोकाजी

नावातकायआहे's picture

23 Jul 2011 - 2:31 pm | नावातकायआहे

पु.ले.शु.

पैसा's picture

23 Jul 2011 - 3:38 pm | पैसा

खूप मजेशीर आणि हलकंफुलकं लिखाण! लेख आवडला.

मॅन्ड्रेक's picture

24 Jul 2011 - 1:06 pm | मॅन्ड्रेक

च्या मारि .. तुझे लेखन इथे वाचावयास मिळाले. मस्तच..

अविनाशकुलकर्णी's picture

24 Jul 2011 - 2:10 pm | अविनाशकुलकर्णी

पाषाणभेद's picture

24 Jul 2011 - 2:21 pm | पाषाणभेद

मेहनतीने लिहीलेला लेख! मजा आला.

चित्रगुप्त's picture

24 Jul 2011 - 7:44 pm | चित्रगुप्त

व्व्व्व्व्व्व्व्वा
मस्त...
अहो आम्ही आयुष्यात एकदाही घेतली नसून हा लेख वाचुन अगदी घायाळ झालेलो आहोत ...
असेच लिहीत रहा...

विजुभाऊ's picture

25 Jul 2011 - 12:54 am | विजुभाऊ

हम्म.................. आहाहा काय तो योग..........

एक हलका फुलका विनोदी लेख म्हणुन आवडला.
पण बायको जर का साफ *भोळी-भाबडी असेल तरच वर ज्या क्लुप्त्या सांगितल्या आहेत त्या फळतील असे वाटते.
त्यापेक्षा सरळ एक छानस कॉकटेल बनवुन बायकोला पण आपल्या गोटात आधीपासुनच सामिल करुन घ्यावं. म्हणजे मग तुम्ही विसरलात तरी मग बायकोच स्वतः गटारीची आठवण करुन देईल. ;)
काय म्हणता?

* आजच्या काळात अशी बायको मिळवायची म्हणजे आदल्या सात जन्माची पुण्याई गाठीशी असली पाहिजे.

शाहिर's picture

25 Jul 2011 - 6:17 pm | शाहिर

गनपा भौ ... अशी बायको मिळाली तर नवरा वटसावित्री (की वट सत्यवान ??) भक्तीभावाने करेल

असे काही सत्यवान माझ्या पहाण्यात आहेत. अगदी आपल्या मिपावर पण ;)

सोत्रि's picture

26 Jul 2011 - 6:12 pm | सोत्रि

मी दरवर्षी 'वटसत्यवान' भक्तीभावाने पुजतो :P

- (वटसत्यवान) सोकाजी

इरसाल's picture

27 Jul 2011 - 10:30 am | इरसाल

हे चाल्तय का बघा ?

मॅन्ड्रेक's picture

29 Jul 2011 - 9:01 pm | मॅन्ड्रेक

मस्त..

सौन्दर्य's picture

29 Jul 2011 - 9:22 pm | सौन्दर्य

पु लं च्या नानू सरंजामे सारखे हे माझे पहिले अपत्य. मि पा च्या खवैया आणि पिवैयांनि त्याला उचलून घेतले आहे ते बघुन हुरुप आला. आता जोपर्यंत पाठिवर कौतुकाची थाप बसते आहे, तो पर्यंत आणखी काही अपत्ये सोडीन म्हणतो, आणि पाठीवर बुक्का बसताच उद्योग आवरते घेइन.

चिंतामणीं चा सल्ला लक्शात ठेवून दालन निट निवडायचा प्रयत्न करीन.

शाहीरांचि 'बायकोला माहेरी पाठवायची प्रथा' आवडली.

सोकाजीरावाचि चकलीशी केलेली तुलना वाचून चकली खाण्याची इछा निर्माण झाली.

गणपांनि उल्लेख केलेल्या '*भोळी-भाबडी' बायकोच्या शोधात आहे, सापडल्यावर कळवीन.

ईतर सर्व प्रतिसादांबद्दल आभार.

(सचित्र) प्रतिसादांमूळे भुक चाळवली गेली आहे, त्या मुळे आता आवरते घेतो.

सौन्दर्य

कपिलमुनी's picture

8 Aug 2018 - 1:21 pm | कपिलमुनी

गटारी स्पेशल इनोदी लेखन