“अनिता ए अनिता, अग बाल्कनीमध्ये काय करते आहेस एवढा वेळ? चल लवकर.”
“आले, आले”
“चल आता निघू या.तुला डॉक्टरकडे नेवून आणून मला ऑफिसला जायचय.”
“अरे, आपल्या बिल्डिंगच्या मागे जी रिकामी जागा होती ना तिथे बहुधा बांधकाम सुरु होणार आहे असे वाटतंय “
“तरीच मागच्या महिन्यात एकदम तिथे काँग्रेस गवत काढून टाकणे चालू होते. तारेचे कुंपण घालत होते.”
“काय म्हणतील रे डॉक्टर? आपल्याला हवी ती गोड बातमी देतील?”
“देतील का काय? देणारच.”
……
……
……
“हॅलो …. सासूबाई, मी अजय बोलतो आहे. एक चांगली बातमी सांगायची आहे. तुम्ही आजी होणार आहात.”
“अरे वा! आनंदाची बातमी आहे कि ही. कशी आहे अनिता? कितवा महिना आहे? डॉक्टर काय म्हणाले?”
“अनिता इथे माझ्या शेजारीच आहे. तुम्हीच बोला तिच्याशी.”
“अग आई, तिसरा महिना सुरु झालाय.”
“अनिता, मी उद्याच येते तिकडे. वाटल्यास तुझ्या सासूबाईना पण घेवून येते.”
“ये ये आई. सासूबाईना पण घेवून ये.”
“हो, आणि येताना तू माझ्याबरोबर पुण्याला ये. पहिलीच वेळ आहे तुझी.माझ्या नजरेसमोर राहशील. तुझे डोहाळे पुरवता येतील मला. म्हणजे काही काळजी नाही मला.”
“आई, डॉक्टर म्हणाले काळजीचे काहीही कारण नाही. दर महिन्याला एकदा दाखवायला या म्हणाले डॉक्टर आणि पाचव्या महिन्यापासून दर महिन्याला एक सोनोग्राफी करूया असे म्हणाले.”
“तुम्ही तिथे इतक्या लांब बंगलोरला राहायला गेलात, काळजी वाटते मला.”
“त्यात काय एवढे?”
“ते आता तू आई झालीस कि कळेल तुला.”
……
……
……
“अजय, आपल्या बाळाचे नाव आकाश ठेवू या का ?”
“हे नाव कसे काय सुचले तुला ?”
“आज त्या बांधकामाच्या इथे पाटी लागली ना ‘आकाशगंगा अपार्टमेंटस ‘, तेव्हापासून मला आकाश नाव एकदम आवडायला लागले आहे.”
“आणि मुलगी झाली तर?”
“तर मग तू ठरवशील ते नाव.”
“ठरलं तर!”
……
……
……
“काय मग? कुठवर आली तुझी बिल्डिंग?”
“आज सकाळी सकाळी इमारतीकरता मापे घेणे चालू होते. २-३ इंजिनिअर्स आले होते.त्यांनी बिल्डिंग च्या मापानुसार पांढर्या वाळूने जमिनीवर रेघा काढल्या. उद्यापासून बहुधा पाया खोदायला लागतील असे वाटते आहे. आणि ४-५ कामगारांची कुटुंबे पण राहायला आली आहेत बघ. २-३ तास चालू होते काम.”
“बरं”
“दुपारी मी झोपले. मला पोटात खूप जड वाटत होते. वाटतय कि पोटात एक क्रिकेटचा बॉल आहे आणि तो जागचा हलतच नाही आहे.”
“डॉक्टरांना फोन नाही का करायचास ?”
“केला होता. डॉक्टर म्हणाले कि हे नॉर्मल आहे. बाळ एक जागा निश्चित करून आता तिथेच वाढू लागेल.”
……
……
……
“अजय, आज काय झाले सांगू बांधकामावर ?”
“तुला ते बांधकाम पाहत बसायचा नादच लागला आहे कि काय ?”
“हो. अगदी खरे आहे.मला टीव्ही आणि इंटरनेटपेक्षाही नवीन काही तरी मिळाले आहे वेळ घालवायला.”
“सांग तर. रोज त्या बांधकामाचे पुराण ऐकल्याशिवाय माझे जेवण कसे होणार ?”
“आज ना पहिली स्लॅब पडली. मी कधीच पाहिले नव्हते स्लॅब पडणे म्हणजे काय? त्या ज्या लोखंडी सळ्या उभारल्या होत्या ना ते म्हणेजे सांगाडे. त्याच्या आधारे आज अनके लाकडाचे साचे उभारले गेले. एकदा का काम सुरु झाले ना कि किती आरडाओरडा करतात ते मुकादम. कामगार
पटापट कॉंक्रीट आणून टाकत होते. मला पायाला रग लागली तेव्हा समजले कि मी बराच वेळ उभी होते ते.”
“तू अशी इतका वेळ उभी राहत जावू नकोस. त्रास होईल तुला.”
“मी आज एवढा वेळ उभी राहिले कारण आपल्या बाल्कनी मधून ही पहिली स्लॅब बरोबर दिसली. माझ्या नजरेच्या पातळीवरच होती.पण पुढच्या वेळेस दुसरा मजला आपल्या बाल्कनी मधून दिसणार नाही. उंचावर असेल ना
तो.”
“मी असे करतो, उद्या तुझ्याकरता बाल्कनी मध्ये झोपाळा बसवून घेतो.म्हणजे तुला झोपाळ्यात बसून तुझे पुस्तक वाचता येईल,विणकाम करता येईल. तुझे बांधकाम देखील बघता येईल. आणि सगळ्यात महत्वाचे – मस्त झोके घेत बाळाशी गप्पा मारता येतील”
“बाळाची हालचाल कधी सुरु होणार असे वाटते आहे. सध्या तरी मी बाळाचे वाढते वजन फक्त अनुभवते आहे. आणि माझा खादाडपणा.”
……
……
……
“आई, तू आलीस म्हणून मला किती किती बरे वाटतेय ग”
“अग पाचवा महिना लागला ना आता तुला? चोरचोळी नको करायला? शिवाय तुझी पहिली सोनोग्राफी पण आहे ना?”
“आणि काय ग मला अजय सांगत होता की हल्ली तुझा मुक्काम बाल्कनी मध्येच असतो म्हणे.”
“हो ना. अग तिथे काम करणाऱ्या लोकांना पण माहित झाले आहे कि मी इथेच झोपाळ्यात बसून त्यांचे काम तासंतास पाहत असते.तिथे काम करणाऱ्या २-३ बायका आहेत ना, त्या पण मला खुणा करून विचारत असतात बाळ कसे आहे म्हणून? काल मी दिवसभर बाल्कनीमध्ये गेले नाही. दोन नव्या मैत्रिणी आल्या होत्या घरी. तर आज सकाळी त्या बायका विचारत होत्या कि मी ठीक आहे ना?”
” बघू तरी ती बिल्डिंग”
” चल ना. तुला दाखवते.”
“अग हो, हळू चाल. किती वेळा बजावले तुला. पोट बरेच दिसू लागलाय कि.”
“हे बघ आई किती सुरेख बांधकाम आहे. तीन मजली बिल्डिंग आहे. रोज संध्याकाळी सगळ्या बिल्डिंगला पाणी मारतात आणि आजूबाजूला पण. मला तर तो मातीचा वास प्रचंड आवडतो. तो वास सतत घेता यावा म्हणून मी
पण थोड्या कुंड्या आणल्या आहेत. मी पण त्या कुंड्यावर पाणी मारून त्या कुंड्याना नाक लावून तो श्वास खोलवर भरून घेते. संध्याकाळी तर इथे इतके छान दिसते समोर. दमून भागून वाळूच्या ढिगावर पहुडलेले कामगार,
त्यांच्या बायका त्या झोपड्याबाहेरच बसून स्वयंपाक बनवत असतात. त्याचा निळा जांभळा धूर. ती २ छोटी मुले आहेत ना ती त्या बाईची. आणि आई, ह्या बिल्डिंगच्या बरोबर मागे सूर्यास्त होतो ते पण खूप छान दिसते . अजय येईपर्यंत माझा वेळ अगदी मजेत जातो.”
……
……
……
“अजय मला खूप कंटाळा आलाय.”
“का ग? बिल्डींग पाहून मन भरले का?”
“अरे, सामसूम आहे तिथे सगळीकडे. स्लॅबचे काम संपून अडीच महिने झाले. एक माणूस फक्त सकाळ संध्याकाळ पाणी मारून जातो त्या स्लॅबवर.”
“तू अशी कंटाळू नको.असे उदास राहणे बरे नाही. आपलं बाळपण असेच होईल बरं!”
“तिथे उलट आता मला हालचाल जाणवू लागली आहे. कधी कधी तर इतक्या गरकन ते बाळ हलतं ना की मला कशाचातरी आधार घ्यावा लागतो . तेव्हा मी गडबडते. आणि बाळाचे गपकन फिरणे थांबले कि मला खूप हसू येते.”
“डॉक्टर काय म्हणतायेत?”
“त्यांच्या मते बाळाचा आकार आता पूर्ण तयार झालेला असतो. आणि आता स्नायू तयार होत असतात. बाळाचे वजन वाढू लागते आणि मग शेवटी शेवटी केस नखे असे नाजूक अवयव आणि मुख्य म्हणजे मेंदू विकसित होतो. अजय सध्या मला काय वाटते सांगू ?”
“सांग ना “
“माझ्या पोटात एक नव निर्मिती आकार घेत आहे. आणि माझ्या समोर ही एक बिल्डींग आकार घेत आहे. एक देवाने घडवलेली निर्मिती आणि एक मानवाने घडवलेली.”
……
……
……
“मी आज खूप खुश आहे . खूप वर्दळ सुरु झाली आहे बांधकामावर”
“कसली वर्दळ?”
” कामगार जास्त दिसत आहेत, पूर्वीपेक्षा. फारशा येवून पडल्या आहेत. नळ आणि पाईप येवून पडले आहेत. २-३ महिने एकदम शांत होते हे लोक आणि आता एकदम २ महिन्यात सगळे पूर्ण करायला निघाले आहेत.”
“तुला अजून एक खुश खबर! तुझ्या आईने तुझे सातव्या महिन्यातले डोहाळजेवण इथेच करायचे ठरवले आहे. बरेचजण येणार आहेत. २५-३० जण तरी असतील सगळे मिळून. आपल्याला इथे फक्त एक केटरर शोधून ठेवायचा आहे. बाकी सगळी तयारी तुझी आणि माझी आई घेवूनच येणार आहेत.”
“मजा येईल ना”
“अग, पण तू कोठे होतीस ४ वाजता? घरचा फोन कोणी उचलत नाही आहे असे म्हणाली तुझी आई.”
“अरे मी खाली गेले होते. ती बांधकामावरची बाई आहे ना, २ मुले असलेली. काल मी तिच्या मुलांकरता २-३ लाकडाची रंगीत खेळणी आणली होती. ती द्यायला गेली होती. खूप आनंद झाला बघ त्या बाईला. कानडी मधून खूप काही बोलत होती. शेवटी कानावर बोटे मोडून माझी दृष्ट पण काढली तिने.”
……
……
……
“अजय, मला पुण्याला जावेसेच वाटत नाही आहे. माझी खूप द्विधा मनस्थिती झाली आहे. बाळाला पण लवकरात लवकर पाहायचे आहे आणि कधी कधी वाटते कि ही बिल्डिंग पूर्ण झालेली पहावी आणि मगच जावे. आता फाटक लावतील, नाव देतील बिल्डिंग वर …सगळे काही मला पाहायचे आहे.”
“झाली ना पूर्ण बिल्डिंग? तूच तर म्हणत होतीस कि भिंती,प्लास्टरिंग, खिडक्या, फरश्या बसवणे सगळे काही फटाफट झाले मागच्या एक दीड महिन्यात”.
“हो, खूपच काम झाले मागच्या काही दिवसात. पण मुख्य रंग लावणार आहेत ह्या आठवड्यामध्ये. मग फाटक लावतील, नाव देतील बिल्डिंग वर …सगळे काही मला पाहायचे आहे.”
“तुला बेड रेस्ट वगैरे काही नाही म्हणून तुझी आणि माझी आई तुला इथे आठवा महिना पूर्ण होईपर्यंत राहू देत आहे. आणि म्हणून तुला बिल्डिंग इतकी पाहायला मिळाली आहे. आता मला सक्त ताकीद आहे कि तुला नववा महिना लागताच तुझ्या माहेरी पोचवले पाहिजे.”
“आपलं बाळ काय म्हणतं आहे?”
“तिथे पण खूपच प्रगती आहे. अरे, मी त्याच्याशी सारखी बोलत असते. मी पोटावर हात ठेवला कि ते बाळ जागे होते जणू. पाय हलवायला लागतं. माझा आवाज ओळखतं. माझा स्पर्श समजतो त्या बाळाला.हालचाल तर खूपच आहे.”
“बर चल अनिता, तयारीला लाग. उद्या दुपारी ४ चे विमान आहे.”
……
……
……
“अनिता, कसा आहे माझा मुलगा?”
“मस्त गुब्बू गुब्बू आहे. बघ. एकदम सिम्बा. पण बाबांवर रागावला आहे, उशीरा आल्याबद्दल”
“अग, मला काल संध्याकाळी ७ वाजता तुझ्या बहिणीचा फोन आला कि तुम्ही दवाखान्यामध्ये निघताय म्हणून. मी रात्रीच्या १०च्या विमानात जागा मिळतेय का ते पाहिले. पण नाही मिळाली. आत्ता सकाळी ९ च्या फ्लाईटच तिकीट मिळालं.”
“मी आत्ता जेव्हा तासापूर्वी आपल्या बाळाला प्रथम जवळ घेतले, तेव्हा मी तुझ्या नजरेने आपल्या बाळाकडे पाहत होते.”
“आणि काल संध्याकाळी मी काय करत होतो, माहित आहे? संपूर्ण संध्याकाळ मी तुझ्या नजरेने तुझ्या बिल्डींगमधली पहिली वास्तुशांत पाहत होतो.”
_________________________________________________________________________
प्रतिक्रिया
13 Apr 2011 - 9:56 am | शिल्पा ब
वेगळ्याच नजरेने बाळाच्या आगमनाची गोष्ट लिहिली आहे. छान आहे.
13 Apr 2011 - 10:10 am | ५० फक्त
पारुबाई, मस्तच आहे कथा.
याच धंद्यात आहे, बिल्डिंगा बांधायच्या म्हणुन सांगतो, आम्ही पण आमच्या बिल्डीगाकडे एखादया बाळासारखंच पहात असतो, पण फरक काय आहे, पुर्ण झालं की बाळ आपल्याकडं येतं, पण प्रोजेक्ट पुर्ण करुन क्लायंटला देताना टिम पैकी कुणाच्या तरी एकाच्या डोळ्यात पाणि येतंच येतं. दगडामातीची असली तरी जीव लावते हो बिल्डिंग पण.
आणि आधी एक तळटीप दिलेली होतीस आता संपादित केली आहेस बहुधा, त्याबद्दल सांगायचं होतं, की २-३ मजली बिल्डींग जर क्लायंट पैसे देणारा असेल तर होते ९ महिन्यात.
असो, छान लेखन, आवडलं.
13 Apr 2011 - 11:00 am | प्रास
पारूबाई,
खरंच एका वेगळ्या दृष्टीने दोन एरवी एकमेकांशी जराही संबंधीत नसलेल्या गोष्टींची सुरेख सांगड घातली आहे. छान लेखन आहे. हर्षद म्हणतायत त्याप्रमाणे ज्याने बिल्डिंग बांधली त्याच्या भावना नक्कीच त्यात गुंतलेल्या असतात काही काळासाठी तरी आणि मुलाच्या संबंधाने तर काय प्रश्नच नाही.
छान लेखन, आवडले.
पुलेशु
:-)
13 Apr 2011 - 11:38 am | नगरीनिरंजन
बिल्डींगच्या आणि बाळाच्या आकाराला येण्याची सांगड घालण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे पण अजून खुलवता आला असता असे वाटले.
13 Apr 2011 - 6:55 pm | राजेश घासकडवी
नैसर्गिक आणि मानवनिर्मित आकारांची अगदी पायापासून होणारी वाढ समांतरपणे छान मांडलेली आहे. आत जे चाललेलं असतं त्याला बाहेरच्या जगातल्या तशाच घटनांशी साम्य दिसलं की अचानक नातं जोडलं जातं. मास्टरपीस नावाच्या कथेत बाहेरच्या वेलीवर शिल्लक राहिलेल्या, तुटायला आलेल्या एका पानाच्या भवितव्यावर आपला जीव टांगणीला लावून धरणारी मुलगी आठवली.
13 Apr 2011 - 7:02 pm | पुष्करिणी
पारूबाइ, नवनिर्मितीची सांगड छान घातलीय कथेत .
13 Apr 2011 - 10:27 pm | पिवळा डांबिस
दोन परस्परांशी संबंधित नसलेल्या पण समांतरपणे आकारास येणार्या क्रियेटिव्ह गोष्टींमधली नाजूकता छान चितारली आहे....
पण... पोरगं गवंडी होणार बहुतेक!!!!:)
14 Apr 2011 - 12:07 pm | मृत्युन्जय
हाहाहाहा. आयला सिव्हिल इंजिनीयर नाही सुचला तुम्हाला. बिल्डींग कॉण्ट्रॅक्टर नाही सुचला. ;)
14 Apr 2011 - 2:08 am | रेवती
कथा आवडली.
14 Apr 2011 - 2:09 am | प्राजु
कथा आवडली.
छान लिहिली आहे.
14 Apr 2011 - 11:25 am | मराठमोळा
मस्त कथा.. छान कल्पना!!!!
वेगळीच वाचकला बांधून ठेवणारी शैली.. :)
14 Apr 2011 - 7:30 pm | सूड
छान कथा !!
14 Apr 2011 - 7:43 pm | गणेशा
अतिशय छान सांगितले आहे तुम्ही .. आवडले..
बिल्डींग .. मातीचा गंध .. आणि बाळ .. त्याची हालचाल .. ममतेचा गंध मस्तच एकदम
असेच लिहित रहा.. वाचत आहे ...