कचोरी आणि चिंचेची चटणी

स्मिता.'s picture
स्मिता. in पाककृती
11 Apr 2011 - 3:16 pm

कचोरी म्हणताच माझ्या तोंडाला पाणी सुटतं. (खरं तर मी इतकी खादाड आहे की अनेक पदार्थांच्या नावाने माझ्या तोंडाला पाणी सुटतं) लहानपणी मी आणि माझा भाऊ तर कचोरी आणून खायचं कारणच शोधत असू. २-३ दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रीणीने कचोरीची आठवण करून दिली. मग काय डोक्यात कचोरीच घोळ घालत होती. इकडे पॅरीसमध्ये आयती विकत आणायचीही सोय नाही. म्ह्णून काल रविवारी कचोरी बनवली होती. त्याचंच वर्णन खाली देतेय...

साहित्यः

१. कचोरी
आवरणासाठी:
२ वाट्या मैदा
३ चमचे तेल/तूप
मीठ
थंडगार पाणी

सारणासाठी:
१ वाटी साल काढलेली मूग डाळ
१ टीस्पून जिरं
१ टीस्पून शोप
१/४ टीस्पून हिंग
१ १/२ टीस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-अधिक)
१ टीस्पून मिरची आणि आल्याचा ठेचा
१/२ टीस्पून गरम मसाला
२ टीस्पून आमचूर (नसल्यास चिंचेचा कोळ)
३ टेबल स्पून तेल
मीठ

तळणासाठी तेल

२. चिंचेची चटणी
१/४ वाटी चिचेचा कोळ
१/२ वाटी गूळ
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून जिरं
१ टीस्पून धणे
१ टीस्पून शोप (ऑप्शनल)
१ १/२ वाटी पाणी
मीठ

कृती:

१. कचोरी
मूगाची डाळ २ तास भिजत घालून जाडसर वाटून घ्या.
आवरणासाठी मैद्यात चवीप्रमाणे मीठ घाला. त्यात तेल/तूप घालून पहिले ते कोरडे मिश्रण व्यवस्थित मळून एकजीव करा. हा मैदा आता थंडागार पाण्याने घट्ट गोळा होईपर्यंत भिजवा आणि ओल्या कापडाने झाकून ठेवा.

सारण बनवण्यासाठी एका पसरट भांड्यात तेल गरम करून त्यात जिरं, शोप आणि हिंग घाला. गॅस मंद आचेवर ठेवा. त्यात मूगाच्या डाळीचं वाटण घालून तेलात एकजीव करून घ्या. आता त्यात वरून मिरची आणि आल्याचा ठेचा, लाल तिखट, गरम मसाला, आमचूर/चिंचेचा कोळ आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करून थोडं शिजू द्या. सारण भांड्याला खालून चिटकू नये म्हणून अधून-मधून चमच्याने परता. ५-७ मिनीटं शिजल्यावर गॅस बंद करून सारण थंड होवू द्या.

भिजवलेल्या मैद्याचे टेबलटेनिसच्या बॉलएवढे गोळे करून त्याची पारी बनवा. त्यात सारण भरून सर्व बाजूंनी पारीची टोके एकत्र आणून (पुरणपोळीप्रमाणे) ती दाबून बंद करा. सारण भरलेला गोळा थोडा लाटून पूरीएवढा बनवा. अश्या सर्व कचोर्‍या भरून घ्या.

एका कढईत तेल गरम करून घ्या. तेख खूप जास्त गरम नको. या तेलात कचोर्‍या तांबूस-सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. गरमागरम कचोरी तय्यार!!

२. चिंचेची चटणी
चिंचेच्या कोळात पाणी घालून ते मिश्रण गरम करायला ठेवा. ते उकळायला लागले की त्यात जिरं, धणे, शोप, लाल तिखट, गूळ आणि चवीप्रमाणे मीठ घाला. हे मिश्रण आपल्याला हवे तसे घट्ट होईपर्यंत उकळून घ्या.

चटणी थंड झाली की तीला कचोरीत घालून, वरून कांदा, बारीक शेव आणि कोथिंबीर टाकून फडशा पाडा :)

(आम्हाला चटणी झाल्यावर कांदा-शेव करता धीर नसल्याने फोटो न काढताच ताव मारला.)

प्रतिक्रिया

पक्का इडियट's picture

11 Apr 2011 - 3:22 pm | पक्का इडियट

जबरा !!

टारझन's picture

13 Apr 2011 - 1:00 pm | टारझन

एक नंबर .. ह्याला म्हणतात कचोरी ...

मी एकदा कचोरी ट्राय केली तर सुदर्शन चक्र तयार झाले होते .. ते मी असं फेकुन मारलं .. तर खाली गाय उभी होती ... तिच्या बरगड्यांवर लागलं ... नंतरचे तिन दिवस तिच्या तोंडातुन फेस येत होता आणि रात्री अपरात्री ती कॉलनीतुन विव्हळत फिरत असे. तेंव्हा पासुन मी कचोरी ला क्रॉस केलं होतं ..

पण ही पाकृ पाहुन पुन्हा कचोरी कराविशी वाटत्ये . बोला कोण कोण येणार ? :)

- टिचला कचोरी आयना

यशोधरा's picture

11 Apr 2011 - 3:23 pm | यशोधरा

मस्त!!

मराठमोळा's picture

11 Apr 2011 - 3:24 pm | मराठमोळा

खतरनाक... मिपाचे सर्वात समृद्ध दालन पाककृती आहे हे नक्की.. :)

sneharani's picture

11 Apr 2011 - 3:25 pm | sneharani

मस्तच!!

सहज's picture

11 Apr 2011 - 3:27 pm | सहज

छान!!!

धन्यु!

डावखुरा's picture

11 Apr 2011 - 3:50 pm | डावखुरा

खुपच छान....

कचोर्‍या सुंदर साधल्या तर तुम्हाला.
आता वेळ घालवू नका. आयफेल टॉवरजवळ दुकान उघडा. धो धो चालेल. :)

इथे पुण्यात आम्ही लहर आली की डेक्कन बसस्टॉपजवळून 'शेगावची सुप्रसिद्ध कचोरी' आणून खातो.
चिंचेची गोडसर चटणी मात्र राजस्थानी मिठाईवाल्यांकडची छान लागते.

परिकथेतील राजकुमार's picture

11 Apr 2011 - 4:07 pm | परिकथेतील राजकुमार

इथे पुण्यात आम्ही लहर आली की डेक्कन बसस्टॉपजवळून 'शेगावची सुप्रसिद्ध कचोरी' आणून खातो.

अज्जीबात आवडलेली नाही तिची चव मला. (इथे 'गाढवाला गुळाची चव काय' असा विचार वाचणार्‍याच्या मनात आल्यास त्यानी स्वत:च स्वतःला शिक्षा करुन घ्यावी)

बाकी फटू आणि पाकृ एकदम खत्तर्नाक !

असुर's picture

11 Apr 2011 - 6:40 pm | असुर

स्वत:च स्वत:ला शिक्षा करुन घेतली आहे. =)) =)) =)) =))

(परंतु, इतक्या सौम्य भाषेतला प्रतिसाद वाचून पराचा आयडी हॅकल्याची शंका आलेली आहे)

कचोर्‍या मस्तच!!! पार्सल पाठवत असाल तर पत्ता व्यनि करतो. प्यारिसहून लंटन कै लाम्ब नैये!! मागे एकदा आम्हाला बेल्जमवरुन लाडू आणि मेतकुट आल्याची आठवण होऊन डॉळे पाणावले, जीभेवर त्सुनामी उठली!!!

--असुर

स्मिता.'s picture

11 Apr 2011 - 7:04 pm | स्मिता.

प्यारिसहून लंटन कै लाम्ब नैये!!

मग मी पार्सल पाठवण्यापेक्षा तुम्हीच या की कचोरी खायला. यशोधराताई आणि तुमच्यासहीत सर्वांनाच आमंत्रण आहे.

मस्त. आत्ता जाउन हाणुन येतो. :)

फारफार पाणी सुटले तोंडाला. आधीच आज जेवण झालेलं नाही त्यात हे.

धुळ्यात सकाळी सकाळी कढईतून काढलेल्या गरम कचोर्‍या आणि तीच ती चिंचेची चटणी आठवली.

खलास कॉम्बिनेशन... आवडली तुमची पाकृ खूप..

नि३सोलपुरकर's picture

11 Apr 2011 - 5:43 pm | नि३सोलपुरकर

खुपच छान...

५० फक्त's picture

11 Apr 2011 - 5:44 pm | ५० फक्त

स्मिता,

जबरा फोटो आणि पाक्रु, चव पण तशीच जबरा असणार हे नक्कीच.

आता घरी जाउन पालकाची भाजी अन भात खाणं अतिशय जिवावर आलंय माझ्या, असो.

@ परा, + १०० @ डेक्कन जवळची सो कॉल्ड शेगाव कचोरी.

मराठे's picture

11 Apr 2011 - 5:47 pm | मराठे

फस्कास दिस्तेय कचोरी...

शेगावच्या कचोरीवरून आठवलं... १९८४/८५ मधे कधीतरी शेगावला गेलो होतो तेव्हा बाबांबरोबर कचोरी खाल्ली होती. तिची चव अजूनही विसरू शकलेलो नाही.

मुलूखावेगळी's picture

11 Apr 2011 - 5:51 pm | मुलूखावेगळी

मस्त आहे कचोरी
बाकि शेगाव पेक्षा उन्द्री (गाव आहे शेगाव ला जाताना लागते) ची कचोरी जास्त छान असते.

फोटू आणि पाकृ छानच!
मी एकदा या कचोर्‍या करायला घेतल्या आणि सारण काही जमले नाही.
बरेच तेल घातले तरी कढईला चिकटून त्याचे काहीतरी वेगळेच झाले.
मुगाची डाळ इतकी व्यवथित भरड कशी वाटलीत तुम्ही?
मिक्सरमध्ये थोड्या डाळीची तरी पेस्ट होतेच.
सारण बिनसले म्हणून कचोर्‍या केल्याच नाहीत आणि उत्साह संपला.
बाहेर मिळणार्‍या शेगाव कचोर्‍यांची चव मूळ चवीसारखी राखलेली नसावी असा दाट संशय आहे.
बाकी तुम्ही कचोर्‍या घरी करता म्हणून कौतुक वाटले.

चित्रा's picture

11 Apr 2011 - 6:06 pm | चित्रा

छान.

आमच्या एका आजीचे अमरावतीला सासर होते, तिने घरच्यांना ही कचोरी शिकवली होती.
आता आमच्याकडे घरी साधारण अशीच कचोरी करतात. पण त्यात बडीशेपही सारणातच अधिक असते. आले-मिरची बहुदा आई घालत नाही असे वाटते. खूप भारी लागते. मुगाची डाळ कोरडी होईस्तोवर परतले गेले पाहिजे असे वाटते. सारणही आमच्याकडे अधिक कोरडे करतात. अर्थात हे बदल असू शकतील. मूळ पाककृती कदाचित वरीलप्रमाणेच असेल.

स्मिता.'s picture

11 Apr 2011 - 6:31 pm | स्मिता.

काही ठिकाणी सारण बनवताना त्यात थोडे बेसन घालतात. त्यामुळे त्याला कोरडेपणा येत असावा. आधीच मैदा, मूगाची डाळ असल्याने कचोर्‍या जास्त वातूळ होवू नये म्हणून मी बेसन टाळले.

स्मिता.'s picture

11 Apr 2011 - 6:25 pm | स्मिता.

कौतुकाबद्दल धन्यवाद! भारतात असते तर मीसुद्धा कचोर्‍या घरी केल्या नसत्या. पण इकडे काहिही खायची इच्छा झाल्यावर घरी करण्यावाचून पर्याय नाही.

सारणबद्दल... माझ्याकडे ब्लेंडर टाईपचं मिक्सर आहे. त्यात काहीच अगदी बारीक वाटलं जात नाही. त्यामुळे अशी डाळ वाटायची असली की माझ्या पथ्यावर पडतं ;)
अशीही मूगाची वाटलेली डाळ कढईला चिकटतेच. म्हणून तेल जरा जास्त घालावे लागते. तुम्ही तेल जास्त घातलं होतं म्हणताय म्हणजे वाटण घालताना कढई जास्त तापलेली असेल. वाटण घालताना तेल थोडं थंड होऊ द्या आणि नंतरही मंद आचेवरच शिजवा. तेव्हा सारण बिघडल्यामुळे उत्साह गेला तर जाऊ देत. पुन्हा एकदा करून बघा :)

चिंतामणी's picture

12 Apr 2011 - 9:20 am | चिंतामणी

त्याहून भन्नाट आहे तुझा कबुली जबाब.

भारतात असते तर मीसुद्धा कचोर्‍या घरी केल्या नसत्या.

भन्नाट पाकृ, फटु बद्दल धन्स.

स्मिता.'s picture

11 Apr 2011 - 6:35 pm | स्मिता.

माझ्याप्रमाणेच बर्‍याच मिपाकरांना कचोरी आवडते वाटतं. सर्वांच्या उत्साहवर्धक प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!

यशोधरा's picture

11 Apr 2011 - 6:40 pm | यशोधरा

माझ्याप्रमाणेच बर्‍याच मिपाकरांना कचोरी आवडते वाटतं.

हे वाक्य वाचताना मनातल्या मनात अशी कल्पना केली होती की पुढच्या वाक्यात कचोरी करुन घालते, या, असे आमंत्रण असेल! पण नुसतेच धन्यवाद वाचले आणि अंमळ खट्टू व्हायला झाले! ;)

स्मिता.'s picture

11 Apr 2011 - 7:01 pm | स्मिता.

आमंत्रणाची गरज काय? तुम्ही म्हणायला पाहिजे की आम्ही येतो कचोरी खायला :)

यशोधरा's picture

11 Apr 2011 - 7:10 pm | यशोधरा

आलेच :)

प्रचेतस's picture

11 Apr 2011 - 6:38 pm | प्रचेतस

कचोरी तर माझा खास आवडीचा पदार्थ आहे. आता कुठल्याश्या स्वीट मार्ट मधे जाउन खाउनच येतो. नाहीतरी छान पावसाळी वातावरण आहे इथे.
अवांतर-पुण्यातल्या अप्पा बळवंत चौकात रतन मिठाईवाल्याची कचोरी अगदी झक्कास मिळायची. या एक दोन वर्षातच ते दुकान बंद होउन तिथे पुस्तकांचे दुकान सुरु झालेय.

रेवती's picture

11 Apr 2011 - 6:48 pm | रेवती

ते दुकान बंद होउन तिथे पुस्तकांचे दुकान सुरु झालेय.
हा हा हा

निवेदिता-ताई's picture

11 Apr 2011 - 6:51 pm | निवेदिता-ताई

कचोरी...माझा सगळ्यात आवडता पदार्थ.....

आमच्या इथे पण एकजण करतो..अश्शी भन्नाट करतो की बास...
त्या सोबत चिंचेचे गोडपाणी व पांढर्या वाटाण्याची उसळ असे घालून देतो......अहाहा ,,अहाहा...

प्रभो's picture

11 Apr 2011 - 7:12 pm | प्रभो

मस्तच!!

वेरी टेस्टी

फोटू पण झकास

ए स्मिता, हीच ती खस्ता कचोरी का? म्हणजे कचोरी चाट याचाच करतात का?
की खस्ता कचोरीसाठी काही वेगळ्या खस्ता काढाव्या लागतात?? ;)

ही कचोरी तुफान आहे. मी एकदा प्रयत्न केला, सारण जमले पण आवरण जमले नाही. एकही कचोरी टम्म फुगली नाही. सगळ्या चपट्याच झाल्या. पुन्हा एकदा करून बघेन आता.

स्मिता.'s picture

11 Apr 2011 - 7:32 pm | स्मिता.

हॅ हॅ हॅ... खस्ता काढाव्या लागतात म्हणून याला खस्ता कचोरी म्हणत असतील तर ठिकच आहे. मला नव्हतं माहिती की असंही काही असतं. मला आपली फक्त कचोरी माहिती होती.
सगळ्या कचोर्‍या फुगायला नशीब किंवा सुगरणिचा हात लागतो. माझ्याही २-३ च फुगल्या, बाकी चपट्याच राहिल्या.

प्रास's picture

11 Apr 2011 - 7:46 pm | प्रास

आयशप्पत तोंडाचा गणितातला गळका हौद झालाय..... :-P

घरी कुणी कचोरी बनवून खात असेल असं वाटलंच नव्हतं पण घरापासून दूर जिभेचे चोचले पुरवण्यासाठी याशिवाय पर्याय नाही हे पटलं.

मिपाचा पाकृसेक्शन मी आता अथ पासून इति पर्यंत वाचणार आहे आणि लौकरच बल्लवगिरीला सुरुवात करेन म्हणतो.

कधी मधी 'प्यारीसा'त गेलो तर स्मिताबाईंकडे भोजनाचा बेत पक्का..... ;-)

(आपली आवड आधीच सांगून ठेवतो) :-)

वैष्णवनिरामिषभोजनाभिलाषि -

सानिकास्वप्निल's picture

11 Apr 2011 - 8:38 pm | सानिकास्वप्निल

मी पण कचोरी बनवते,अगदी खरं आहे परदेशी असल्यामुळे कित्येक पाकृ घरी बनवण्याशिवाय पर्याय नाही.
मस्तच कचोरी दिसत आहेत :)

मी त्यात थोडे दही, पुदीना चटणी आणी चिंचेची चटणी घालते. :)

हा मी केलेल्या कचोरींचा फोटो

.

प्राजु's picture

11 Apr 2011 - 9:17 pm | प्राजु

ए, तुझ्या कचोर्‍या इतक्या टम्म फुगल्या कशा?

निवेदिता-ताई's picture

11 Apr 2011 - 9:48 pm | निवेदिता-ताई

मी ही हेच म्हणते......तुझ्या कचोर्‍या इतक्या टम्म फुगल्या कशा?

सांग ना...

सानिकास्वप्निल's picture

11 Apr 2011 - 10:02 pm | सानिकास्वप्निल

;)

काही नाही मी कचोर्‍या लाटण्याऐवजी तळहातावर दाबून चपट्या करते व मंद गॅसवर तळते.
पारीच्या कणकेत थोडा बारीक रवा घातला तर खुसखुशीत होतात कचोर्‍या :)

रेवती's picture

12 Apr 2011 - 12:39 am | रेवती

ओ तै, तुम्ही दरवेळी फोटू देवून आमचे डाएट कोलमडवले पाहिजेच का?;)

स्मिता.'s picture

12 Apr 2011 - 12:57 am | स्मिता.

वॉव! काय मस्त फुगल्या आहेत तुमच्या कचोर्‍या!
फोटु एकदम जबराट... दुकानातल्या चाट सारखाच.

सानिकास्वप्निल's picture

12 Apr 2011 - 3:21 am | सानिकास्वप्निल

:)

विशाखा राऊत's picture

12 Apr 2011 - 2:09 pm | विशाखा राऊत

शिक्षा वाटते आहे बघुन... :(
इथे नाहि मिळत अशा कचोरी..
अत्ता एकतर करुन बघावे लागेल नाहितर भारतात कधी येणार तेव्हाच

सखी's picture

12 Apr 2011 - 12:53 am | सखी

मस्त फोटु व कृती.
प्राजु म्हणते तश्या मागे मी केलेल्या कचो-याही फुगल्या नाहीत व जास्त खुसखुशितही नाही झाल्यात. कचो-या जाम आवडतात, त्यामुळे त्या एकदा फसल्याने परत करायचे धाडस होत नाही.
सनिकास्वप्निल - तुमचे पा़कृंचे फोटो छान असतात, पण इथे बसुन नुसते फोटो बघितल्याने खरोखर त्रास होतो हो :(

अरे काय चाल्लंय, तो गणपा जरा शांत आहे सध्या म्हणून बरं वाटत होतं तोवर स्मिताताई कचोर्‍या घेऊन आल्या की!
बरं हा पदार्थ टाळण्याजोगाही नाही हो! खलास फोटू आलाय हो! चाल्लो मी लाळेरं आणायला!

-रंगॉ

स्मिता.'s picture

12 Apr 2011 - 2:49 am | स्मिता.

चालतं हो रंगाभाऊ कधी-कधी कॅलरीजचं गणित बोंबललेलं!
एवढ्या निग्रहाने डाएट पाळणारे तुमच्यासारखे लोक जर माझी पाकृ टाळू शकले नाही तर मी त्यात माझे यश मानेल (जास्त हवेत उडतेय का मी?)

शिल्पा ब's picture

12 Apr 2011 - 6:48 am | शिल्पा ब

इतका वेळ मनाचा निग्रह करून धागा उघडला नव्हता तेच बरं होतं म्हणायचं.
कचोऱ्या मस्तच झाल्या दिसताहेत...घरी कचोऱ्या बनवणाऱ्या तुम्ही पहिल्याच पहिल्यात मी.

बाकी तुम्ही प्यारीसात असता म्हणे ;)

स्मिता.'s picture

12 Apr 2011 - 1:15 pm | स्मिता.

थँक्स शिल्पा! तुम्हीच पहिल्या आहात ज्यांना या धाग्याचा मूळ उद्देश समजला ;)

ajay wankhede's picture

12 Apr 2011 - 7:31 am | ajay wankhede

व्वा सकाळि सकाळि तोन्डाला पाणि सुट्लय . आम्हि नक्किच करुन बघणार.

पप्पुपेजर's picture

12 Apr 2011 - 8:59 am | पप्पुपेजर

सकाळी सकाळी धागा उघडला आणि स्वताच्या पायावर कुर्हाड मारून घेतली :)

आमच्या कडे म्हणजे विधार्भात कचोरी चे खास ठेले असतात ...अमरावती आणि शेगाव एकदम फेमस आहेत ....

सविता००१'s picture

13 Apr 2011 - 11:55 am | सविता००१

मस्त कचोर्या.

मी तेल खूप तापवून त्याची वाफ गेली की मग मन्द आचेवर सावकाश तळ्ते. एक्दम ट्म्म फुगतात आणि खुसखुशीत पण.

प्राजक्ता पवार's picture

14 Apr 2011 - 3:56 pm | प्राजक्ता पवार

कचोरी खुप आवडते .
पाकृ व फोटो पर्फेक्ट :)

मितान's picture

11 Dec 2015 - 12:32 pm | मितान

सापडली बै कचोरी !!! कित्ती दिवस वाचलेलं आठवत होतं पण स्मिताताईंचं आठवत नव्हतं आज लै अभ्यास करून शोधली रेस्पि !

त्रिवेणी's picture

11 Dec 2015 - 12:51 pm | त्रिवेणी

का ग असे रिकामे उद्योग केलेस.आता काय जावून घेवून येवू का कचोरी.
आज एवढा जंगी मेनू होता माझ्याकड़े.

त्रिवेणी's picture

11 Dec 2015 - 12:52 pm | त्रिवेणी

का ग असे रिकामे उद्योग केलेस.आता काय जावून घेवून येवू का कचोरी.
आज एवढा जंगी मेनू होता माझ्याकड़े.

पिलीयन रायडर's picture

11 Dec 2015 - 1:39 pm | पिलीयन रायडर

लाज वाटली लाज.. लोक प्यारिसात कचोर्‍या करताएत आणि इथे रोजच्या स्वयंपाकाचा कंटाळा येतोय...

काय ते फोटो..!!!! __/\__

स्नेहल महेश's picture

11 Dec 2015 - 3:45 pm | स्नेहल महेश

असच म्हणते बाकी कचोरी एकदम जबराट...

रेवती's picture

12 Dec 2015 - 8:00 am | रेवती

हम्म्म........अजूनही करून पाहिल्या नाहीत. कश्याला ती आठवण म्हणते मी!