"ग्रेट सोल..." आणि "दि बुक ऑफ मॉर्मन"

विकास's picture
विकास in काथ्याकूट
30 Mar 2011 - 8:29 am
गाभा: 

आज अनेक वृत्तपत्रांमध्ये आलेली "Great Soul: Mahatma Gandhi And His Struggle With India" या पुलीट्झर पुरस्कार विजेत्या लेखकाच्या पुस्तकाबद्दल बातमी वाचली आणि त्याच वेळेस गेल्या आठवड्यात वाचलेले ब्रॉडवे थिएटर मधील "दि बुक ऑफ मॉर्मन" या ख्रिश्चनांमधील मॉर्मन नामक पंथाच्या पुस्तकाबद्दलचे विडंबन आठवले. न पटणार्‍या आणि कधी कधी त्यात हिणकस देखील असू /वाटू शकणार्‍या विचारांना विरोध कसा करावा याचे या संदर्भात दोन धृव दिसले...

वॉलस्ट्रीट जर्नल मध्ये आलेल्या पुस्तकपरीचयाप्रमाणे, प्रस्तुत पुस्तकाचा लेखक जोसेफ लेलीवेल्ड हा काही काळ न्यूयॉर्क टाईम्सचा संपादक होता आणि इथे अतिशय सन्माननीय असलेला पुलीट्झर पुरस्कार देखील त्याला आधी मिळून गेला आहे. थोडक्यात लेखक म्हणून अमेरिकन चष्म्यातून त्याची योग्यता ही नक्कीच वरच्या दर्जाची वाटते. या पुस्तकासंदर्भात देखील वॉलस्ट्रीटने "वेल रीसर्च्ड" असेच म्हणलेले आहे. पण जर आपण वाचू लागलो तर एकीकडे संतमहात्मा म्हणत असताना, प्रत्येक गोष्टच खटकणारी वाटते. येथे काही त्यांचा संदर्भ देतो, पण ज्यांना वाचायचे असेल त्यांनी वॉलस्ट्रीटच्या पानावर जाऊन सविस्तर वाचावे (अथवा पुस्तक वाचावेत):

हिटलर विरोधात एक जरी ज्यू हा खंबीरपणे उभा राहीला तर हिटलरचे हृदयपरीवर्तन होऊ शकेल.
त्याच हिटलरला पत्र लिहीत असताना त्याला "माझ्या मित्रा" असे संबोधत "अहिंसेच्या पुजार्‍याचे ऐक" अशा अर्थाचे लिहीले.
दक्षिण अफ्रिकेत असताना कृष्णवर्णीयांना त्यांनी कमी लेखले होते....

वगैरे वगैरे म्हणत नंतर लेखक हा त्यांच्या व्यक्तीगत चारीत्र्यावर घसरतो आणि तारेवरची कसरत करत बरेच काही लिहून जातो, ज्यावरून आता भारतात आरडाओरड चालू झाली आहे. देशात, कधीकाळी विचारांना विचाराने उत्तर देणारा महाराष्ट्र, पुस्तकावर बंदी घालणारे पहीले राज्य ठरणार आहे.

मला हे पुस्तक खचीतच पटले नाही. किंबहूना पुस्तक परीचय वाचताना अस्वस्थता आली. त्याहूनही न्यूयॉर्क टाईम्सचे पुस्तक परीचय देतानाचे, "Appreciating Gandhi Through His Human Side" शिर्षक अधिकच कुजकटपणाचे वाटले. पण त्याच बरोबर हे देखील लक्षात आले, की असे गांधीजी काही पहीले नेते नाहीत ज्यांचे स्वत:च्या पाश्चिमात्य चष्म्यातून विश्लेषण केले जात आहे...सावरकरांवर तर अनेकांनी अगदी भारतीयांनी देखील वाटले ते विश्लेषण केले आहे. तेच रामकृष्ण परमहंस, विवेकानंदांच्या संदर्भात आणि हिंदू देवतांच्या संदर्भात झालेले आहे. बर्‍याचदा असे लिहीणार्‍यांना स्कॉलर म्हणत ते बरोबरच असणार असे म्हणले गेले. आत्ता देखील गांधीजींच्या संदर्भात तेच होऊ शकेल असे वाटते.

पण म्हणून अशा पुस्तकांवर बंदी घालावी हा उपाय आहे का? मला नाही वाटत. कुठल्याही पुस्तक, विचार, कला कशावरही बंदी घालू नये असेच मला वाटते. तोडफोड करण्यास त्याहूनही विरोध आहे. गांधीजींच्या संदर्भात तर अशी तोडफोड म्हणजे गांधीवादाला अजून एकदा तिलांजलीच ठरेल... पण अशा विचारांच्या विरोधात त्यांचा अभ्यास करून ते कसे चुकीचे आहेत हे सिद्ध करणे महत्वाचे आहे असे वाटते. आणि मग त्या लेखकास नंतरच्या आवृत्तीत तसे चुकीचे ठरलेले विचार मागे घेण्यास भाग पाडायला लावणे हे श्रेयस्कर आहे असे मला वाटते...

आता याच संदर्भात सुरवातीस म्हणलेला दुसरा पूर्ण अमेरिकेतील प्रसंग. त्यासाठी अगदी थोडक्यातः "मॉर्मन हा एक ख्रिस्तीपंथ आहे. त्यामधील ख्रिश्चन धर्मीय हे खूपच धार्मिक असतात. त्यांचे संघटनात्मक कौशल्य देखील खूप चांगले असते. 'The Church of Jesus Christ of Latter-day Saints' नामक त्यांचे चर्च सर्वत्र असते. त्यांच्या धर्मग्रंथाला 'बुक ऑफ मॉर्मन' असे म्हणले जाते. धर्मांतराला ते उद्युक्त करतात ह्यात नवल नाहीच... "

तर या 'बुक ऑफ मॉर्मन' वरून न्यूयॉर्कच्या सुप्रसिद्ध ब्रॉडवे थिएटरमध्ये "दि बुक ऑफ मॉर्मन" म्हणून एक संगितीका आत्ताच चालू झाली आहे. त्यात मॉर्मन मिशनरी, त्यांच्या श्रद्धा यांची कुठल्याही नॉर्मल भारतीय मनाला विकृत वाटेल अशा पद्धतीने थट्टा केली आहे. ती केली ते केली त्या शिवाय अमेरिकेतील क्रूर/विकृत गुन्हेगारांची नावे त्यात आणली आहे, रोगांची नावे आणली आहेत आणि घृणास्पद गुन्ह्यांची नावेपण थट्टा करत आणली आहेत. हे जर भारतात झाले असते तर आत्ता पर्यंत काय काय झाले असते याचा विचार करावा लागत आहे. मात्र मॉर्मन्सच्या The Church of Jesus Christ of Latter-day Saints संस्थेने काय करावे? "The production may attempt to entertain audiences for an evening, "but the Book of Mormon as a volume of scripture will change people's lives forever by bringing them closer to Christ." असे म्हणत त्या शो मधील हवा देखील काढून टाकली आणि हकनाक मिळू शकणारी त्या नाटकाची प्रसिद्धीपण अधिक न बोलता, बंद करून टाकली!

आता प्रश्न पडतो यातील कुठली प्रतिक्रीया योग्य आहे? स्वातंत्र्यावर बंदी आणणारी का समोरच्याच्या स्वातंत्र्याचा आदर राखत, त्यातल्या हिणकसपणामधील हवा काढून टाकणारी?

प्रतिक्रिया

माझीही शॅम्पेन's picture

30 Mar 2011 - 8:38 am | माझीही शॅम्पेन

माझ्या मते पुस्तकावर बंदी घालू नये ,
बंदी घातली तर फुकट प्रसिध्धी मिळते ,
काळाच्या ओघात न टिकणारे विचार आपोआप पडतात.

अशी शेकाड्यने पुस्तक येतात आणि जातात.
बाकी ज्याना भरपूर वेळ आहे त्यानी यावर आदोलने करावीत , लेख पाडावेत (किंवा कौल पाडावेत) आमच काही म्हणन नाही !

नितिन थत्ते's picture

30 Mar 2011 - 10:13 am | नितिन थत्ते

पुस्तक अर्थातच वाचलेले नाही.

जे काही वर्तमानपत्रांतून छापून आलेले आहे (कॅलनबाख यांच्याशी असलेले संबंध वगळता) त्यापैकी बहुतेक गोष्टी (इंद्रियांवर संयम न राहणे वगैरे) गांधींनी स्वतःच सांगितलेल्या आहेत. त्यात वेल रिसर्च्ड काय आहे हे माहिती नाही.

तसेही बहुधा पुस्तकात यावर ४-५ पानांहून जास्त खर्ची पडली नसावीत. त्या ४-५ पानांमुळे सगळे पुस्तक टाकाऊ किंवा बंदीयोग्य ठरू नये.

काल वर्तमानपत्रात वाचलेल्या बातमीनुसार पुस्तकात बायसेक्शुअल हा शब्द एकदाही आलेला नाही. आणि रेसिस्ट हा शब्द एकदाच आहे असे लेखकाचे म्हणणे दिसते.

पुस्तकावर बंदी घालूच नये.

(गांधींच्या स्वातंत्र्यलढ्याबाबत किंवा अहिंसेबाबत बोलताना त्यांचे सेक्शुअल ओरिएण्टेशन मध्ये आणले तर आम्ही प्रतिवाद करूच).

रणजित चितळे's picture

30 Mar 2011 - 11:56 am | रणजित चितळे

आपल्या कडे एखादे पुस्तक खपवायचे असेल तर असे काही तरी वर्तमान पत्रात छापून आणावे म्हणजे पुस्तक खपते (कसेही असले तरी). माय नेम इज खान जेव्हा प्रदर्शित होणार होता तेव्हा शहारुख ने अमेरीकेला गेला असताना एअरपोर्टवर त्याची तपासणी केली गेली हे छापून आणले होते (का छापले गेले होते नेमके त्याच वेळेला) .......... पिक्चर चालायला मदत झाली थोडीशी.
महात्मा महात्मा होते व त्यांचे महात्म्य असल्या विदेशी लेखकांच्या चाळ्यांमुळे कमी होणार नाही. भारतीय जनता हुशार आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

1 Apr 2011 - 2:05 pm | परिकथेतील राजकुमार

महात्मा महात्मा होते व त्यांचे महात्म्य असल्या विदेशी लेखकांच्या चाळ्यांमुळे कमी होणार नाही. भारतीय जनता हुशार आहे.

+१ अगदी अगदी सहमत आहे.

अहो वाल्मिकी म्हणजे गतआयुष्यातला वाल्या दरोडेखोर हे कुठे आठवते आता पटकन ?

अशा पुस्तकांवर बंदी घातल्याने त्यांचे महत्व उगाचच वाढते...प्रसिद्धी मिळते त्यामुळे बंदी घालायचे काहीच कारण नाही.
एखादं पुस्तक वाचलं म्हणजे त्यातले विचार पटले असं होत नाही.

रणजित चितळे's picture

30 Mar 2011 - 12:07 pm | रणजित चितळे

हल्ली कोठल्याही प्रकारच्या स्वैराचाराला स्वातंत्र्य किंवा लोकशाही ह्या नावानी विभुषीत केले जाते.

एकदा एक माणूस आपल्या हातातली लाठी फिरवत असताना दुस-याच्या नाकास ती काठी लागते. दुसरा जेव्हा त्याला थप्पड मारतो तेव्हा तो पहीला इसम आश्चर्याने दुस-यास म्हणतो, की मी स्वतंत्र आहे व लोकशाहीत माझे स्वातंत्र्य वापरु शकतो त्या मुळे मी कशीही लाठी फिरवीन. तेव्हा दुसरा त्याला लोकशाहीचा व स्वातंत्र्याचा अर्थ समजावतो - म्हणतो तुला कशीही लाठी फिरवायचे स्वातंत्र्य आहे हे खरे आहे पण ते स्वातंत्र्य जिथे माझे नाक सुरु होते तेथेच संपते. हे लक्षात ठेव व तसे वाग.

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Mar 2011 - 1:27 pm | llपुण्याचे पेशवेll

म्हणतो तुला कशीही लाठी फिरवायचे स्वातंत्र्य आहे हे खरे आहे पण ते स्वातंत्र्य जिथे माझे नाक सुरु होते तेथेच संपते
१०० % सहमत आहे...

राही's picture

31 Mar 2011 - 1:14 pm | राही

पुस्तकावर बंदी घालू नयेच.गांधीजींविषयी अफाट संदर्भसाहित्य उपलब्ध आहे. त्यांचे स्वतःचे स्वतंत्र लेखन,हरिजन,यंग इंडिअमधील लेखन,त्यांच्या समकालीनांनी,नातलगांनी,सुहृदांनी, त्यांच्या सहकार्यकर्त्यांनी,अनुयायांनी केलेले लेखन,असे सर्व मिळून इतके विपुल लेखन झालेले आहे की एका आयुष्यात त्या सर्वांचा परामर्ष घेणे देखील कठिण व्हावे.याशिवाय वेगवेगळ्या सरकारी दफ्तरांतल्या टिप्पण्या अहवाल वगैरे वेगळेच. या संदर्भसागरातून कोणीही उठून आपल्याला हवी तशी चारदोन वाक्ये निवडून संदर्भाविना उद्धृत करू शकतो. या उलट या मुद्द्यांचा प्रतिवाद करता येईल असेही खूपसे साहित्य त्याच वेळी हाताशी असते. गांधीजींच्या आफ्रिकेतील वास्तव्याविषयी सुद्धा अनेक वेळा अनेक ठिकाणी लिहिले गेले आहे. आता त्यात नवीन काही सापडण्याजोगे फारसे नाहीच. आता फक्त लेखकाच्या दृष्टीकोनानुसार गांधीजींचे मनोविश्लेषण करणे आणि त्याला अनुसरून त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करू पाहणे हेच चालू असते आणि त्यात ऐतिहासिक असे काहीही नसते. हेच इतर सर्व नेत्यांनाही लागू होते.वोल्पर्ट्,डालरिंपल इ.च्या लेखनातून हे याआधीच पुरेसे स्पष्ट झालेले आहे.

फक्त या पुस्तकाबद्दलच असे माझे मत देत नाहिये ते वरती आलेले आहेच ..
तरी अश्या क्रुती बद्दल थोडक्यात बोलतो :

खरे तर तुमच्या म्हणण्याने कुठल्याही साहित्यावर्-कलेवर बंदी घालुच नये हे माझे ही म्हणने आहे..
पण जे चुकीचे आहे त्यास त्याच पद्धतीने उत्तरे दिलीच पाहिजेत ..
साहित्यातील विरोध हा.. हाणामारी न करता - त्यातील मुद्द्यांना खोडणारे पुस्तक काढुनच करावे ..

विरोध जर रस्त्यावर दिसला की त्या कलेचा-साहित्याचा उलट खप होतो आणि आपल्या विचारांचा बाजार ..
त्यामुळे व्यव्स्थीत योग्य मार्गाने सडेतोड उत्तरे देणे योग्य.
ज्यांना जे घ्यायचे ते ते घेतील ... कोणास ही आग्रह नक्कीच नहई की हेच वाचा आणि ह्यालाच बरोबर म्हणा ..

--
बाकी वरील माहीती मी आजच पाहिली आहे .. पुस्तक न वाचण्याचा माझा निर्णय आहे.

चिंतातुर जंतू's picture

1 Apr 2011 - 11:00 am | चिंतातुर जंतू

आज 'हिंदू'च्या संपादकीय पानावर हा लेख आहे. त्यातील काही भाग खाली उद्धृत केला आहे:

“I am of the earth, earthy … I am prone to as many weaknesses as you are,” the Mahatma famously declared. He explored a number of these weaknesses with extraordinary honesty in My Experiments with Truth.

हे असे असताना पुस्तकावर बंदी घालणार्‍यांविषयी एवढेच म्हणू शकतो की त्यांना माफ करा, कारण ते काय करत आहेत ते त्यांचे त्यांनाच कळत नाही.

तुषार गांधी यांचा पुस्तकावरील बंदीला विरोध आहे हे सांगणार्‍या लेखाचा दुवा.
अवांतरः या बाबतीतही गुजरात महाराष्ट्राच्या बहुतेक पुढे गेले असावे.

विकास's picture

1 Apr 2011 - 4:44 pm | विकास

आपल्या मुद्द्याशी सहमत आहे. पण ख्रिस्ताप्रमाणे अथवा गांधीजींप्रमाणे केवळ "माफ करा" असे म्हणून उपयोगाचे नाही. अर्थात हा मुद्दा काही रस्त्यावर येण्याचा देखील नाही. हा मुद्दा केवळ गांधीजींवरील पुस्तकाचा नसून वृत्तीचा आहे.

तुषार गांधीं नी केलेला विरोध योग्यच आहे. या पुस्तकातील आक्षेपार्ह भागाशी संबंधीत कागदपत्रे गांधीजींच्या "गांधीसर्व्ह.ऑर्ग" वर उपलब्ध आहेत. आणि असे जर सर्व आदरणीय असलेले आणि आक्षेपार्ह होऊ शकलेले दस्ताऐवज गांधीजींचीच संस्था ठेवू शकते तर सरकारने नाक कशाला खुपसायचे? मात्र त्याच बरोबर, केवळ "तुषार गांधी" म्हणतात म्हणून निर्णय बदलू नये तर बंदी घालणे चूक म्हणून असल्या बंदींवरच बंदी आणावी असे म्हणणे आहे.

कोणे एके काळी नेहरूंच्या डिसकव्हरी ऑफ इंडीया मधे त्यांच्या तत्कालीन मर्यादीत माहीतीवर त्यांनी शिवाजीबद्दल अनुद्गार लिहीले होते. पण नुसतीच जनतेची ओरड नाही तर (मला वाटते) राजवाड्यांनी ते पुराव्यानिशी काय चुकलेत हे दाखवले आणि पुढील आवृत्यांमध्ये बदल केले गेले. पुस्तकावर बंदी घातली गेली नाही तर विद्वत्तेला विद्वत्तेने उत्तर देत प्रश्न, मिटवला म्हणण्यापेक्षा सोडवला.

गुजरात या बाबतीत महाराष्ट्राच्या पुढे जाणार यात आश्चर्य नाही... अमेरिकन काँग्रेसच्या (लोकसभेच्या) एका अध्यक्षाचे, टिप ओ नीलचे वाक्य अशा संदर्भात कायम आठवते: "All politics is local." :-)

प्रदीप's picture

2 Apr 2011 - 5:49 pm | प्रदीप

अमेरिकन काँग्रेसच्या (लोकसभेच्या) एका अध्यक्षाचे, टिप ओ नीलचे वाक्य अशा संदर्भात कायम आठवते: "All politics is local"

मग ह्या टिप ओ'नीलचाच देश जगाच्या सर्व भागात नाकखुपसेगिरी करतो ते काय 'लोकल पॉलिटीक्स' म्हणून का? का सर्व जगावर अमेरीकेची मक्तेदारी आहे, असा (अजून) तेथील राजकारण्यांचा समज अहे?

विकास's picture

2 Apr 2011 - 9:13 pm | विकास

का सर्व जगावर अमेरीकेची मक्तेदारी आहे, असा (अजून) तेथील राजकारण्यांचा समज अहे?

प्रश्न आणि त्यातच लपलेल्या उत्तराशी सहमतच आहे.

मग ह्या टिप ओ'नीलचाच देश जगाच्या सर्व भागात नाकखुपसेगिरी करतो ते काय 'लोकल पॉलिटीक्स' म्हणून का?

याचा संदर्भ हा एखादा काँग्रेसमन/सीनेटर (खासदार या अर्थी) हा जे काही बोलतो, मतदानाच्या वेळेस निर्णय घेतो हा आहे. येथे मते देताना पक्षाची मायक्रो धोरणे आणि पक्षश्रेष्ठींना विचारात घ्यावे लागत नाही. त्यांना जे योग्य वाटते तसे ते मत देतात. कधी कधी ती अगदी पक्षाच्या विरुद्ध देखील असू शकतात.

म्हणूनच, ज्या टिप ओ नीलचे वाक्य मी वर सांगितले त्याच टिप ओ नीलच्या मतदारसंघातील (मॅसॅचुसेट्स डिस्ट्रीक्ट ८) मधून सध्याचा असलेला डेमोक्रॅटीक आणि लिबरल काँग्रेसमन कापुआनोचा लिबियाला जाण्याच्या ओबामाच्या निर्णयाला विरोध आहे. कारण त्याला माहीत आहे की लिबरल बेसला हे पटत नाही जो आमच्याकडे भरपूर आहे!

त्या उलट अ‍ॅरिझोनातील डेमोक्रॅटीक काँग्रेसवुमन जीला बंदुकीने मारण्याचा प्रयत्न केला, अजून सुधारत आहे, ती पक्षाच्या बंदूकबंदीसंदर्भातील मतांच्या विरुद्ध असून बंदुक ठेवण्याच्या बाजूने आहे. कारण ज्या भागातून ती निवडून येते तेथे बंदुका प्राण्यांपासून देखील स्वसंरक्षणासाठी ठेवल्या जातात, तिथले ते स्थानिक कल्चर आहे.

अशा संदर्भांत, all politics is local!