मळ्यातील दर्शन

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
14 Mar 2011 - 6:46 pm

..............................
आज खूप महिन्यांनंतर माझी पाऊले आमच्या वाडीतल्या भैरोबाच्या विहीरीकडे वळली. पण मळ्यातील पाऊलवाटेवरून चालतांना मात्र मागे फ़िरून धूम ठोकाविशी वाटली. तरीही कुठल्याशा विचित्र ओढीने पाऊले मंत्रमुग्ध झाल्यासारखी विहीरीच्या दिशेने चालतच राहिली. हिला भैरोबाची विहीर नाव का पडले कोणास ठावूक. दाट झाडीमधे लपलेली आणि आजकाल वापरात नसलेली विहीर. आमच्या मळ्यात सगळीकडे कालव्याचे पाणी खेळवले होते. पुर्वी कालवा नव्हता तेव्हा पाण्यासाठीच बांधली असणार. कालवा आल्यानंतर देखील विहीरीच्या आजुबाजुच्या भाज्यांसाठी रहाटाने पाणी काढून देण्यासाठी विहीर पण वापरली जायची. आबांचा तो छंदच होता. आबा मळ्यात दोन चार मजूर घेऊन कामाला जुंपले असायचे. आम्हा पोरांची दांडगाई चालू असायची. माझा मळा, म्हणून मी सगळ्यांचा म्होरक्या! बाकी एकजात सगळी मस्तवाल पोरे. शिंप्याचा भिवा, पाटलाचा बबन, खालच्या आळीतल्या दगडू पैलवानाचा भिम्या! शाळेतल्या पाट्या पुस्तके घरात फ़ेकून आमची सगळी गॅंग मळ्यात घुसायची. विहीरीच्या आजुबाजुच्या रानात लपाछपी, चिंचेच्या झाडावर चढून खाली उड्या मारण्याच्या पैजा! भैरोबाची विहीर म्हणजे तर आमच्या धांगडधिंग्याचा सेंटर पॉईंट!

एकाकी पडलेल्या विहीरीच्या काठावरून मी आत डोकावून पाहीले. रहाटाचा दोर गुंडाळी करून वर लटकत होता. त्याला लटकणारी बादली केविलवाणी दिसत होती. तिच्यात कोळ्याने जाळी बनविली होती. विहीरीचा तळ वरून दिसतच नव्हता. शांत, पण फ़सवे पाणी, डूख धरून बसल्यासारखे वाटत होते. अंगावर सरसरून शहारा आला. याच पाण्यात आम्ही पोरे पार तळापर्यंत डुबकी मारून यायचो. त्या थंडगार हिरव्या पाण्याचा शेवाळी वास अजूनही नाकात घुटमळल्यागत वाटतो. मागच्या वर्षी ती घटना घडली, त्यानंतर कित्येक महिने आमच्या पैकी कोणीच इथे फ़िरकले नव्हते. त्या घटनेची उदासी मनात अजूनही सावली धरून होती. त्यानंतर एकदोनदा मजुरांना काही काम सांगण्यासाठी आबांनी मला इकडे पाठवले होते. तेव्हा मी भितभितच त्यांच्याबरोबर आलो होतो, आणि त्यांना समजावून सांगीतल्यानंतर लगेच घराकडे धूम ठोकली होती. विहीरीत डोकावून पहाण्याचे मनात देखील आले नव्हते.

आज सकाळपासून का कोण जाणे, कसलीतरी खूप हुरहुर लागली होती. शाळा वगैरे सगळ्या कटकटी सोडून दूर कोठे तरी निघून जावे असे वाटत होते. मी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे, पोट दुखते आहे म्हणून अंथरुणावर पडून रहायलो. पण आबांनी काही चालू दिले नव्हते. शेवटी त्यांच्या कटकटीला कंटाळून शाळेत गेलो. कलासात मास्तर कुठलीशी कविता सांगत होते. नेहमीचीच भंकस. कशातच मन लागेना. भिम्याला म्हटले, चलतो का मळ्यामधे फ़िरू. भिम्याला आश्चर्यच वाटले. दुसऱ्याच क्षणी त्याचा चेहरा भितीने झाकोळून गेला. मग भिती लपवायला त्याने टोलवाटोलवीची उत्तरे दिली. त्याचेही बरोबरच होते म्हणा! त्या दुर्दैवी दिवसापासून आमचे मळ्यात हुंदडणे बंदच झाले होते. पण आबांनी झापल्यानंतर आज माझे डोकेच सटकले होते. डोके सटकले असले की भिती काय चिड काय! क्लासला टांग मारून मी एकटाच तरातरा मळ्याकडे निघालो.

विहीरीच्या आजुबाजुला वडा पिंपळाची झाडे होती. आता झाडांवर कुठल्यातरी रानटी वेली चढल्या होत्या. आजुबाजुला गवत भसाभसा वाढले होते. विहीर चांगली ऐसपैस होती. वडाच्या जाड जाड पारंब्या विहीरीच्या वर लोंबकळत असायच्या. त्या पारंब्यांनीच घात केला होता. मुक्याचे हे असे झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांना सावरायला बराच वेळ लागला. आमची गॅंग मात्र तुटली ती तुटलीच. एक दिवस रागारागाने आबांनी चार मजूर बोलावून विहीरीवर लोंबणाऱ्या सगळ्या पारंब्या छाटून टाकल्या होत्या. त्यातल्याच एका पारंबीवरून त्या दिवशी मुक्या लोंबकळला होता. माझ्यामुळे! जीवनाला धरून ठेवण्याची त्याची शेवटची धडपड मला आजदेखील दिसत होती. आम्हा धटींगण पोरांमधे मुक्या अगदी विसंगत वाटायचा. मळ्यात खूप वर्षे काम करणाऱ्या म्हादू मजुराचा मुलगा होता तो. मळ्यात छोटी मोठी कामे करायचा. एरवी आमच्या मागे मागे फ़िरायचा. त्याचे नाव खरे तर मुकुंदा होते. पण आधीच बुजरा स्वभाव, त्यात आमच्या सारखी हुडदांड मुले. तो बिचारा गप्प गप्पच असायचा. म्हणून त्याचे मुक्या हेच नाव पडले. आमच्या शिवाय त्याला इतर कोणीच मित्र नव्हते. म्हणजे तो आम्हाला मित्र म्हणत असेल. आम्ही मात्र येताजाता टपली मारण्याचे हक्काचे करमणूकीचे साधन म्हणूनच त्याच्याकडे पहात असू. सगळे त्याची चेष्टा करायचे. कधी बबन्या जोराने पळत येऊन पाठीमागून धक्का देईल, कधी भिवा डोक्यात टपली मारेल. मुक्या सगळे मुकाट्याने सहन करायचा. सहन करण्यापलीकडे झाले की त्याच्या आधीच तिरळा असलेला उजवा डोळा एका बाजूने खाली झुकायचा. म्हणजे बाहेरच्या कडेखालची गालावरची कातडी खाली लोंबकळायची. एक बदाम तिरका खोबणीत खोचला आहे असे वाटायचे. अती झाले की मुक्या बोलत नसे, किंवा रडत देखील नसे. त्याच्या तिरक्या डोळ्याखालची सैल कातडी थरथरू लागायची. तेच मुक्याचे मुके अश्रु असावेत. निदान त्यावेळी तरी आम्हा कोणालाच त्याचे हुंदके ऐकायला यायचे नाहीत.

आज इतके दिवसांनी विहीरीच्या काठावर बसलो असतांना खोल पाण्यात मी हे सगळे बघत होतो. खरोखर मला पाण्यात हे दिसत होते, की मनातल्या आठवणीच येवढ्या प्रखर होत्या कोण जाणे. मुक्याचे रक्ताळलेले निष्प्राण शरीर त्याच दिवशी लोकांनी बाहेर काढले होते. ते नंतर धडाधडा पेटलेल्या चितेवर जळून खाक देखील झाले होते. पण खरेच का मुक्याला जाळले होते? बाहेर आणलेला डोके फ़ुटलेला तो देह मुक्याचाच होता का? असे असेल तर त्याच्या उजव्या डोळ्याखालची कातडी सैल का पडली नव्हती? त्याचा सताड उघडा उजवा डोळा खाली झुकलेला का नव्हता? आमच्या कृर खेळामुळे त्याला त्या दिवशी अतोनात यातना झाल्या असतील. मग त्याचे अदृष्य हुंदके त्याच्या चेहऱ्यावर कोरले का गेले नसतील? नाही, तो मुक्या नव्ह्ताच! कदाचित अजूनही तो विहीरीच्या आत खोलवर लपून बसलेला असेल! पुन्हा ह्या मित्रांच्या तावडीत जावे लागू नाही म्हणून, तुटले फ़ुटले शरीर सोडून तो आतच बसला असेल!

माझ्या अंगावर सरसरून काटा आला. विहीर तशीच मुर्दाड गप्प गप्पशी, दबा धरून. तिच्या अंत:करणाचा काहीच ठावठिकाणा लागत नव्हता.

पण जे झाले ते कोणी मुद्दाम मुळीच केले नव्हते. मी सांगीतलेल्या सुचना मुक्याने पाळल्या असत्या तर असे काही झालेही नसते. आम्ही नाही का, शेकडो उड्या मारल्या असतील. केवळ त्याच्या घाबरटपणामुळे तो अपघात झाला. त्याचा घाबरटपणाच त्या घटनेला जबाबदार आहे. माझे मन मला ओरडून सांगत होते. आमचा एक आवडता खेळ होता. विहीरीच्या मध्यावर लटकलेल्या पारंब्यांपैकी एखादी पारंबी धरून सरसर खाली यायचे, आणि हात सोडून सरळ धपकन विहीरीत उडी घ्यायची. वरून पडलेला माणूस सरळ आत तळापर्यंतच जायचा. थंडगार पाणी एकदम ह्रदयाचे ठोके धडाधडा वाढवायचे. श्वास कोंदतो आहे, ह्रदय फ़ुटेल की काय असे वाटायचे. पण क्षणार्धात हात वर करून वर सूर मारला आणि डोके पाण्याबाहेर काढून मस्त खोल ओला श्वास भरभरून घेतला की एकदम नवे जीवन मिळाल्यासारखा उत्साह भरून यायचा. त्या एका नवजीवन नशेसाठी आम्ही सगळे पुन्हापुन्हा उड्या मारीत असू. मुक्या मात्र कधीच ह्या वाटेला गेला नव्हता. तसाही तो अशक्त आणि घाबरटच होता. नाही म्हणायला, आमच्या नादाला लागून तो वडावर चढायला शिकला होता. एखादी जाडजूड फ़ांदी धरून तो तीवर बसून आमची मजा पहात रहायचा.

त्या दिवशी फ़ारच कडक उन्ह पडले होते. बाहेरच्या तळतळीत उष्म्यामधे थंडगार पाण्यात अशी जीवनप्राश डुबकी मारण्याचे सुख अवर्णनीय होते. भिम्या, भिवा, मी, सगळ्यांच्या पाच सहा वेळा उड्या मारून झाल्या. मुक्या केवळ नेहमीच्या फ़ांदीवर बसून ही मौज बघत होता हे मला सहन होईना. काय कठीण आहे त्यात? माझ्याबरोबर त्याला घेऊन उडी मारूया. मला एक कल्पना आली. “मुक्या चल, तुला शिकवतो. अरे काही कठीण नाही. आपण दोघे एकदम उडी मारू.” मी त्याला आग्रह केला. डोळ्यांनीच त्याने “नाही नाही” केले. मग सगळ्यांनाच चेव आला. प्रत्येक जण त्याला ह्या खेळात ओढायला पाहू लागला. “मला पोहता येत नाही.” तो कसेबसे म्हणाला. “पोहायची गरजच नाही. आपण दोघेही उडी घेऊ, मी तुला वर आणतो.” माझे उत्तर तयार होते. “पारंबीवर कसे लटकणार मी?” “काय प्रॉब्लेम नाय.” जगन्याने एक मधली जाड पारंबी झोका देऊन मुक्याजवळ आणली. मी ती हातात धरली. म्हटले- “बघ हिला आपण दोघे लट्कू, आणि पारंबी मध्यावर गेली की आधी मी, मग तू अशा उड्या घेऊ.” मुक्या कसला घाबरलेला होता! ते पाहून सगळ्या पोरांना चेवच आला. त्याची टर उडवू लागले. मुक्याचा उजवा डोळा तिरका झाला. गालावरची कातडी थरथरू लागली. भिम्या ओरडू लागला- “रडूबाई रडूबाई, पाणी पाहून घाबरून जाई.” कोणी त्याला टपल्या मारू लागले. जगन्या म्हणाला- “ते काही नाही. आज जर तू उडी मारली नाहीस, तर उद्यापासून आमच्यात यायचे नाही, कारण आम्ही फ़क्त मुलांनाच गृप मधे घेतो!” “मग खेळत बस वर्गातल्या मुलींमधे काचा-पाणी.” भिम्याने चिडविले. हे ऐकल्यावर मात्र, कधी जास्त न बोलणारा मुक्या एकदम उसळून म्हणाला- “मी मुलगा आहे. तुमच्या सारखी उडीही मारू शकतो.”

आता सगळ्यांनी मुक्याची मोट बांधली. जगन्याने पारंबी धरून ठेवली. भिम्याने मुक्याला उचलले आणि पारंबीला लटकावले. किती हलका होता तो! जिवाच्या आकांताने मुक्याने पारंबीला घट्ट पकडून ठेवले. मी त्याच्या खाली लटकलो.

“हे बघ मुक्या, बिलकूल घाबरू नकोस. मी उडी मारली की थोड्या वेळात तू फ़क्त हात सोडून दे. मी लगेच तुला बाहेर काढीन.” मी त्याला धीर दिला. त्याने फ़क्त अविश्वासाने माझ्याकडे पाहीले. पारंबी जशी मध्यावर स्थीर झाली, तशी मी एकवार मुक्याला पुन्हा सुचना देऊन उडी मारली. आत खोलवर जाऊन लगेच सुळकन पृष्ठभागावर येऊन वर पाहू लागलो. मुक्या पारंबी सोडायलाच तयार नाही. उडी मारायचा त्याचा मुळीच विचार नव्हता. “ए जगन्या मला उतरव. मला नाही उडी मारायची.” तो रडत म्हणाला. पोरे आणखीनच चेकाळली. “मुकी बाई मुकी बाई अशी कशी पोहत नाही.” सगळे ओरडत होते. मुक्याने घट्ट धरलेले हात बहुदा घामाने निसटू लागले असावेत. मला वाटले, बरेय, निदान घसरून पाण्यात पडेल, मग मी त्याला धरेन. पण घाबरलेला मुक्या जोरजोरात त्या पारंबीला झोका देऊन त्याच्या फ़ांदीकडे यायचा प्रयत्न करू लागला. पारंबी हलायला लागलेली पाहून मुले टाळ्या वाजवू लागली. “मुका टारझन, मुका टारझन” त्या गलक्यात पारंबीचा वेग कधी वाढला, कधी मुक्याचे हात निसटले आणि कसा तो आडवा तिडवा विहीरीत पडला, कोणाला काहीच कळले नाही.

उन्हाची तिरीप चुकविण्यासाठी मी क्षणभर खाली मान केली होती. तेवढ्यात वर कठड्यावर ठप्प आवाज झाला. मुक्याचे डोके कठड्यावर आपटले होते. खडबडीत दगडी भितींना वेडेवाकडे घासत, पाण्याच्या लेव्हलवर असलेल्या खडकावर डोके पुन्हा आपटले. पाण्यातून बाहेर आल्यावर बसण्यासाठी आम्ही भिंतीला लागून असलेल्या त्या खडकाचा उपयोग करायचो. पुन्हा तसलाच बदबदीत ठप्प आवाज. ह्या भैरोबाच्या विहीरीत गणपती शिरविल्यानंतर आम्ही वरून बरोबर त्याच खडकावर नारळ फ़ेकायचो. त्याचा असाच ठप्प आवाज यायचा.

मुक्याचे डोके नारळासारखे तिथे आपटले, आणि मग तो पाण्यात घसरला. मी भानावर येऊन त्याला पुन्हा दगडावर खेचले, तेव्हा आजुबाजुचे पाणी, त्याच्या फ़ुटलेल्या डोक्यातून येणाऱ्या धारांमुळे लाल झाले आहे हे माझ्या लक्षात आले. लोक जमून त्याला बाहेर काढेपर्यंत त्याने दम सोडला होता.

ही~ गर्दी जमा झाली होती. कुठुनसा मुक्याचा बाप, म्हादू धावत आला. मुलाच्या निष्प्राण कलेवराला धरून ओक्साबोक्षी रडू लागला. हे कसे झाले हा प्रश्न तर सगळेच गोंगाट करून आम्हाला विचारू लागले. “मला काहीच माहीत नाही, मी विहीरीत होतो, इतक्यात तो वरून खडकावर आपटला.” मी नैसर्गीक बचाव तंत्राने अर्धसत्य सांगीतले. तो धागा धरून इतर मुलांनी लगेच आपापली बाजू सांगीतली. “मुक्याला खूप दिवसांपासून पाण्यात उडी मारायची इच्छा होती. इतके दिवस आम्ही काही ऐकले नाही. शेवटी आज पारंबीवर लटकावून दिले. त्याला सांगीतले होते, पारंबी न हलविता सरळ आत उडी मार. पण त्याने झोका घेतला आणि हात सोडले.” असे काहीसे वेगवेगळ्या शब्दांमधे मुले सांगत होती. एक बरे होते, मी विहीरीत असल्याने मला ह्यातले काही माहित नाही, म्हणून मला जास्त प्रश्नांना सामोरे जावे लागले नव्हते. दु:खाचे पाट ओसरल्यानंतर आबांनी मुक्याच्या बापाला बरीच मदत वगैरे केली होती. आबा मला काही बोलले नव्हते, तरी त्यावेळी त्यांची जळजळीत नजर माझे अंत:करण चिरत गेली होती.......

उन्हाची तिरीप अगदी डोक्याच्या आतपर्यंत चटका लावायला लागली होती. अचानक हा सगळा प्रसंग डोळ्यासमोरून गेल्यामुळे डोळे तळावल्या सारखे खुपू लागले होते. कठड्यावरून दिसणाऱ्या थंडगार हिरव्या पाण्याचा शिपका चेहऱ्यावर मारावा ह्या विचाराने मला एकाएकी झपाटले. घशाला कोरड पडली होती. डोळ्यात अंगार उमळला होता. स्वत: विषयीच्या क्रोधाचीच ती जळजळ होती का? मी आणखी जास्त विचार न करता, रहाटाभोवती गुंडाळलेला दोर उलगडला. धडाधडा बादली आत फ़ेकली. डूब्ब असा आवाज करीत ती बुडली. बादलीतले कोळी बहुदा बुडबुड्यांबरोबर तरंगत असतील! सरसर बादली वर ओढली. दोन्ही ओंजळीभर थंडगार पाणी घेऊन जोरात चेहऱ्यावर शिपकारा मारला. एका क्षणात, आधी जळणारा चेहरा शांत झाला. तळव्यानी चेहऱ्यावरून ठिपकणारे पाणी निथळून काढले. सगळी तगमग शांत झाली होती. घसा कोरडा असला तरी ते पाणी पिण्याची मात्र इच्छा झाली नाही. नुसतीच चूळ भरली आणि एखादी अप्रिय वस्तू दूर फ़ेकावी तशी खळाखळा थुकून टाकली.

एरवी घरी जातांना मी आजुबाजुच्या झाडांवर दगड मारीत जायचो. आज मात्र शांतपणे घर गाठले. वाटेत शाळेतून मधल्या सुट्टीत येत असतांना भिम्या दिसला. “अबे सुभान्या, मास्तर लई खवळलेय तुझ्यावर, कलास सोडून पळून गेल्यासाठी.” मी काहीच बोललो नाही. तेव्हा मला बोलते करायला त्याने माझ्यामागे येऊन कवळा घातला आणि माझी माझी मान वाकवून मला पाडायला पाहू लागला. अशा पेचातून सुटणे ही माझी खासीयत होती. पण आज मात्र चिरकलेल्या आवाजात मी फ़क्त “स्स! मान मोडेल, सोड” येवढेच पुटपुटलो. मघा विहीरीजवळ बसून मुक्याचा प्रसंग पुन्हा अनुभवल्यानंतर मला फ़ालतू भंकस करायचीच नव्हती. घरी आल्यावर धावत धावत टुवाल घेतला आणि आरशासमोर उभे राहून खसाखसा ओले डोके पुसू लागलो. विसकटलेले केस नीट विंचरायला समोर पाहीले.
आरशातून माझ्याकडे बघणारा माझा उजवा डोळा अतिशय तिरकस झाला होता. त्याखालची सुरकुतलेली कातडी थरथर थरथर करीत होती.

मळ्यात जाण्याआधी कलासात मास्तर कुठलीशी कविता सांगत होते. त्यावेळीस ऐकली नव्हती. पण कोठूनसे त्या कवितेचे शब्द माझ्या मनात तरंगत आले-

फ़क्त एकदा असेच व्हावे
सोंग घेतले गळून पडावे
पाप झाकले स्वच्छ बघावे
रूप दर्पणी भिन्न दिसावे
............................

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

पैसा's picture

14 Mar 2011 - 7:55 pm | पैसा

कथा छान जमलीय. शेवटपर्यंत काय होतंय म्हणून कळत नाही...

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Mar 2011 - 8:06 pm | निनाद मुक्काम प...

अप्रतिम कथा
सुरवातीपासून बांधून ठेवले होते .
शेवट अपेक्षित असून देखील उत्सुकता क्षणभर सुद्धा कमी झाली नाही .

कानडाऊ योगेशु's picture

14 Mar 2011 - 8:10 pm | कानडाऊ योगेशु

सहमत.
मुक्याबद्दल फार वाईट वाटले.

आनंदयात्री's picture

14 Mar 2011 - 8:14 pm | आनंदयात्री

जबरदस्त भयकथा. एका दमात वाचली, उत्सुकतेने नजरही हटली नाही.
भयकथेला कारुण्याची किनार, वाह अरुणराव, कथा मस्त जमलीये.

जबरदस्त!!
वर पासून खालपर्यंत एकादमात वाचून काढली..
मस्तच!!! शेवटपर्यंत खिळवून ठेवतेय कथा.

यशोधरा's picture

14 Mar 2011 - 9:32 pm | यशोधरा

जबरदस्त..

नगरीनिरंजन's picture

14 Mar 2011 - 9:40 pm | नगरीनिरंजन

जबराट जमलीये! मस्त ओघवती आणि खिळवून ठेवणारी कथा.

इरसाल's picture

14 Mar 2011 - 9:58 pm | इरसाल

अतिशय छान ! आवडली.....

५० फक्त's picture

15 Mar 2011 - 6:09 pm | ५० फक्त

मस्त झालीय कथा, आवडली. सुरुवातीपासुन एक सुत्र बांधुन ठेवलं आहे अगदि नीट शेवट्पर्यंत.

तुम्ही लिहित रहा, आम्ही वाचत राहु.

कथा वेगगवान आणि खिळवुन ठेवणारी आहे.
आवडली.

आवांतरः हा चमत्कार म्हणावा का भुताटकी.?
काल ही कथा एका टॅब मध्ये उघडुन ठेवली होती. पण काही केल्या वाचायला वेळ मिळाला नाही. आज पण सकाळी तो टॅब पाहिला, पण कथा वाचली नाही. दरम्यान बरेच वेळा मिपा उघडायचा प्रयत्न चालुच होता. पण मिपा बंदच होत. आता वेळ काढुन ती कथा वाचली आणि काय आश्चर्य नवीन लेखन वर क्लिक करताच मिपा पण उघडल.

जातीवंत भटका's picture

15 Mar 2011 - 7:37 pm | जातीवंत भटका

भन्नाट आहे भैरोबाची विहीर .... काटा आला सर्रकन् अंगावर ...

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Mar 2011 - 8:04 pm | बिपिन कार्यकर्ते

कथा आवडली. शेवटाचा अंदाज होता. तरीही खिळवून ठेवणारी कथा.

अवांतर: नेहमी असंच लिहित जा हो!

ईन्टरफेल's picture

23 Mar 2011 - 7:04 pm | ईन्टरफेल

फारच छान मि भय कथा

खुप दिवसा पासुन वाचायचि

होति

आता मिळालि पुढे पन मिळेल !

भुतनाथ/जगताप

पुन्हा एकदा अतिशय सुंदर कथा ...
प्रत्येक शब्द डोळ्यासमोर चित्र उभे करतो आहे.
बारीक बारीक वर्णनांच्या सहाय्याने घडलेल्या घटना आपल्याच समोर घडल्या आहेत की काय असे वाटते ..
भैरोबाची विहीर म्हंटले तरी आपण लहानपणी पाहिलेली असीच विहीर डोळ्यासमोर येते.. असेच खेळणारे आपण डोळ्यासमोर येतो .. आणि मग सुरु होते तुमचे शब्द .. आणि त्याच्यात आमचे मिश्र अनुभव ..

गोगोल's picture

15 Mar 2011 - 10:43 pm | गोगोल

सगळा परिसर डोळ्यासमोर उभा राहतो.

वेगवान अन मस्त भयकथा. शेवटचं कडवं खास आवडलं.

अरुण मनोहर's picture

16 Mar 2011 - 11:05 am | अरुण मनोहर

सर्व प्रतिसाद कर्त्यांचे मनःपुर्वक धन्यवाद.

स्पंदना's picture

16 Mar 2011 - 12:16 pm | स्पंदना

वा! एकदा वाचायला सुरु केल्यावर जणु त्या जगातच जातो आपण. अगदी आजुबाजुची शेत , झाड सार जीवंत होउन आल.

शेवटी मित्रा न अंगाशी मस्ती केल्यावर गप गुमान जाणारा नायक आरश्यात अस काही पाहील अस कल्पील पण नाही मी.

मस्त! जबरदस्त!

sneharani's picture

16 Mar 2011 - 12:31 pm | sneharani

जबरदस्त कथा!

वपाडाव's picture

16 Mar 2011 - 12:38 pm | वपाडाव

सुंदर जमली आहे. एका दमात वाचली.