अबोला

मराठे's picture
मराठे in जनातलं, मनातलं
11 Mar 2011 - 11:26 pm

मिटींग संपता संपत नव्हती. ऑफिसमधून घरी पोहोचायला सुधाला कमीत कमी एक तास उशीर होणार होता. जास्त उशीर झाला तर सुहास पुन्हा अबोला धरणार. सुधाने पुन्हा एकदा हातातल्या घडाळ्यावर नजर टाकली. "ह्या मिटींग्ज वेळेत घ्यायला काय होतं ह्या अय्यरला ! ऑफिस सुटायच्या वेळेला बरोब्बर मिटींग घ्यायला सुचतं याला. शिवाय मिटींगचा उपयोग काही नाही."

"सुधा, सुधा! "

सुधाने चमकून अय्यरकडे पाहिलं.

"मी तुम्हाला डिस्टर्ब नाहि ना केलं?" अय्यर तिच्याकडे पाहून कुत्सितपणे हसून म्हणाला.

"अं! नाही सर. माझं लक्ष आहे सर." सुधा मनातला सगळा राग चेहर्‍यावर दिसू न देता चेहर्‍यावर खोटं स्मित आणून म्हणाली.

अय्यरने घसा खाकरून त्याचं बोरिंग भाषण पुढे चालू ठेवलं. सध्याची इकॉनॉमी, कंपनीचा सेल्स चार्ट, नविन क्षेत्रात घुसण्यासाठी कंपनी कसे प्रयत्न करत आहे वगैरे वगैरे.

सुधा पुन्हा सुहासचा विचार करू लागली. लग्नाला दोन अडिच वर्ष होत आली होती त्यांच्या. वरवर पाहता सगळं सुरळीतच होतं. पण गेले सहा सात महीने सुधाच्या नोकरीमधल्या जबाबदार्‍या खूप वाढल्या होत्या. अर्थात सुधाला प्रमोशन मिळवण्यासाठी जास्त काम करणं आवश्यकच होतं. मात्र सुधाला घरी यायला उशीर झाला की सुहास तिच्यावर रागवायचा. राग व्यक्त करायची त्याची नेहमीची पद्धत म्हणजे तिच्याशी अबोला धरणं. पण सुधाला त्याचा राग घालवायची ट्रिक आत्तापर्यंत माहीत झालेली होती. त्यामुळे त्याचा राग फारसा टिकत नसे. त्याच्या त्या खोट्या खोट्या रागाची आठवण झाली अन सुधाच्या चेहर्‍यावर नकळतच स्मिताची रेषा उमटली.

खुर्च्या सरकल्याचा आवाज आला आणि मिटींग संपल्याचं सुधाच्या लक्षात आलं. पटकन उठून ती तिच्या केबिन मधे आली. पर्स खांद्याला लावली. तिच्या इतर सहकार्‍यांना "बाय" वगैरे म्हणण्याच्या मनस्थितीत आज ती नव्हतीच. आधीच अय्यरने डोकं खाल्लेलं होतं त्यात आणखीन कोणी थांबवू नये म्हणून कोणाशीही न बोलता तिने लिफ्ट्च्या दिशेने चटचट पावलं उचलायला सुरूवात केली. उतावीळपणे लिफ्टचं बटण दोन दोन वेळा दाबलं पण लिफ्ट काही येत नव्हती. लिफ्ट अजून आठव्या मजल्यावरच होती. त्रासून तिनं जिन्यांकडे जाणारा दरवाजा उघडला. ऑफिस तिसर्‍या मजल्यावरच होतं त्यामुळे लिफ्ट पोहोचायच्या आगोदरच आपण खाली पोहोचू असा तिचा अंदाज होता. जणू प्रत्येक सेकंद वाचवून तीचा गेलेला वेळ भरून येणार होता. जिन्यात अर्थात कोणी नव्हतं. सुधा भराभर जिने उतरायला लागली. तिने घडाळ्याकडे पटकन नजर टाकली तर घडाळ्यात आठ वाजत आले होते."म्हणजे आज दोन तास उशीर होणार आपल्याला पोहोचायला". तिच्या मनात विचार आला. तोच पट्कन पायरी निसटून तिचा तोल गेला. नशिबाने तिने कठडा धरला आणि पडता पडता वाचली. "हील गेली वाटतं" तिनं पायातल्या सँडलकडे बघितलं. हील अजूनही शाबूत होती.

मग न थांबता ती बिल्डिंगच्या बाहेर आली. रस्त्यावर सगळीकडे माणसंच माणसं. एकमेकांकडे बघूनही न बघितल्यासारखं करणारी... गर्दीतही एकटी राहणारी माणसं. त्या गर्दीत मिसळून जाउन तिनं स्टेशन गाठलं. गाडीमधली गर्दी, भांडणांचे आवाज, विचित्र वास सगळ्याची सवय झाल्यामुळे त्याही परिस्थितीत गाडी तरी वेळेवर मिळाली याचंच तिला थोडं बरं वाटत होतं. एका हाताने वरची कडी पकडून तिनं थोडावेळ डोळे मिटले. पुन्हा सुहासच्या विचारांत मन गुंतलं. "सुहाससारखा समजूतदार नवरा मिळणं हे माझं भाग्यच आहे खरं तर. एकदा माझं प्रमोशन पक्क झालं की कुठेतरी मस्त फिरायला जायला पाहिजे आठवडाभर."

स्टेशन आलं तसं पुरात लोटून दिल्यासारखं तिनं स्वत:ला गर्दीत लोटून दिलं आणि प्लॅटफोर्मवर आली. भरभर जिने चढून स्टेशनच्या बाहेर पडली. आज एकही रिक्षावाला तिच्या हाकेला थांबत नव्हता. "माज आलाय सगळ्यांना" तिनं नेहमीचं वाक्य उच्चारलं आणि झरझर पावलं टाकत घर गाठलं.

रस्त्यातून नेहमी प्रमाणे घराच्या खिडकीकडे लक्ष गेलं. लाईट लागलेला होता. सुहास वाट पाहात असेल. तिनं दरवाजा हळूच उघडला. "सुहास! " तिनं हाक मारली. अर्थात सुहास तिला ओ देईल असं तिला वाटत नव्हतंच.. त्याचं काहीच प्रत्युत्तर आलं नाहीच. स्वैपाकघरात ओट्यावर गार गार झालेला चहा तिला दिसला. सुहासने आज हॉटेलमधून खास तिच्या आवडीचं जेवण पण आणलं होतं. आता एका अपराधीपणाची भावना तिच्या मनात निर्माण झाली होती. सुहास टिव्ही लाउन सोफ्यावर बसला होता.

सुधा त्याच्या शेजारी जाउन बसली. "सुहास ! सॉरी रे, आज त्या अय्यरने शेवटच्या क्षणी मिटींगमध्ये बोलाऊन घेतलं... मी आज वेळेवरच येणार होते." पण सुहासचा मूड आज खरोखरच वाईट असावा. त्याने तिच्याकडे अजिबात बघितलं नाही. उगाच घडाळ्याकडे एक कटाक्ष टाकून तो उगाच रिमोट ची बटणं दाबत राहिला. "अरे असं काय करतोस. मला प्रमोशन मिळालं ना की आपल्या संसारालाच त्याचा उपयोग होणार आहे ना रे." तिच्या डोळ्यात चटकन पाणी उभं राहीलं. पण सुहासचं टी-व्हीवरचं लक्ष काही कमी झालं नाही.

इतक्यात फोन वाजला. सुहासने पटकन उठून फोन उचलला.

"नाही" सुहास कोणालातरी सांगत होता. "आजही उशीर ... हं.... आजकाल रोजचंच व्हायला लागलं आहे तिचं."

सुहास सुधाच्या देखत कोणा तिसर्‍याकडे तिची तक्रार करत होता... सुधाला विश्वासच वाटत नव्हता. सुहास असं करणार्‍यातला नाही. उलट दुसर्‍यांपुढे तोच आपल्याला किती सांभाळून घेतो. क्षणात त्याच्याशी बोलण्याची तिची ईच्छाच गेली. "मी थोडावेळ ग्यालरीत बसतेय" असं म्हणून ती ग्यालरीतल्या टांगलेल्या झोपाळ्यावर जाऊन बसली.

सुहास अजूनही फोनवरच बोलत होता. सुधाचं घरातलं अस्तित्वच त्याने वजा करून टाकलं होतं. थोडावेळ ग्यालरीत बसल्यानंतर मोकळ्या हवेत सुधाला थोडं बरं वाटलं. थंड हवेत किंचीत काळ तिचा डोळा लागला. जाग आली तेव्हा रात्रीचे अकरा वाजले होते. बाहेर आता थोडी थंडी पडायला लागली होती. सुधा पुन्हा घरात आली. सुहासने ओट्यावरचं सगळं साफ करून ठेवलं होतं. टिव्ही पण बंद होता. 'बहुतेक झोपायला गेला असेल' असा विचार करून सुधा बेडरूम मधे आली. सुहास बेडवर पडला होता. पण कुठलसं पुस्तक वाचत होता. सुधा हळूच त्याच्या बाजूला येउन बसली. "सुहास, असं रे काय करतोस. बोल ना माझ्याशी" पण सुहास अजूनही अबोला धरून होता. आता मात्र सुधाला त्याचा राग येऊ लागला होता. "आज असं काय विशेष आहे ? तुझा प्रॉब्लेम तरी काय आहे ? जरा उशीर झाला म्हणून इतकं रागवायचं ? मी काही स्वतः मजा करण्यासाठी बाहेर गेले नव्हते ना ! आणि शिवाय मी माफीपण मागितली तुझी.. यु आर टेकिंग इट टू फार" सटसट गोळ्यांसारखी तिची वाक्य निघून गेली. पण सुहासवर त्याचा काडीचाही परिणाम झाला नाही. पुन्हा एकदा घडाळ्यावर नजर टाकून त्याने दिवा मालवला आणि कूस बदलून घेतली. सुधा बेडच्या एका टोकाला डोळ्यांवर हात टाकून पडून राहीली.

रात्री कधीतरी बेलच्या आवाजाने दोघांनाही जाग आली. "मी उठते" असं सुधा म्हणेपर्यंत सुहास उठलासुद्धा होता. सुधा बाहेर आली तेव्हा सुहास दार उघडत होता.

"मी इन्स्पेटर साळवी, आपण मि. साठे का?" सुहास आणि सुधा दोघही गोंधळून गेले होते. सुहासने मान डोलावली.

"मी दोन मिनीटं आत येऊ का?" साळवी म्हणाले. सुहासने मागं होऊन दार उघडलं. सुधा जरा बावरूनच गेली होती. सुहासच्या बाजूला उभी राहून ती साळवींना म्हणाली "काय झालं इन्स्पेक्टर साहेब?"

"सौ. सुधा साठे तुमच्या पत्नी का?" साळवींनी विचारलं तसं सुधा तडक म्हणाली "अर्थात. दिसत नाही का तुम्हाला?" सुहासने होकारार्थी मान हलवली.

साळवींनी सुहासच्या खांद्यावर थोपटत म्हटलं "आज संध्याकाळी त्यांच्या ऑफिसच्या इमारतीच्या जिन्यातून पाय निसटून त्या पडल्या, डोक्याला जबरद्स्त मार बसला आणि जागच्या जागीच त्यांचा मृत्यु झाला. त्याच्या ऑफिसमधून तुमचा पत्ता मिळाला. बॉडीची ओळख पटवायला तुम्हाला यावं लागेल."

"अहो काय वाट्टेल ते काय बोलताय तुम्ही!.. अरे सुहास मी इथेच आहे रे.. ती कोणीतरी दुसरीच बाई असणार.." सुधा ओरडत होती... आणि सुहासच्या तोंडून अजूनही शब्द फुटत नव्हता.

कथाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

५० फक्त's picture

11 Mar 2011 - 11:57 pm | ५० फक्त

जबरदस्त कथा झालीय, मजा आली वाचुन. छान वाटलं.

हीच स्टोरी लाईन पुढं ओढता आली तर बघा. मस्त मोठी कथा होउन जाईल.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Mar 2011 - 11:59 pm | निनाद मुक्काम प...

लेखनशैली आवडली
चित्र चांगले उभे केले .
अश्या प्रकारच्या शेवट असलेल्या कथा वाचल्या आहेत .
पण ह्या कथेचा शेवट असा होईन हे वाचकांना जाणू न देणे हेच तुमच्या लिखाणाचे यश

पु ले शु

यशोधरा's picture

12 Mar 2011 - 9:47 am | यशोधरा

असेच म्हणते.

लवंगी's picture

12 Mar 2011 - 11:17 am | लवंगी

असत म्हणते.. मस्त कथा

वपाडाव's picture

14 Mar 2011 - 3:52 pm | वपाडाव

एग्झॅक्टली हेच म्हंतो...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Mar 2011 - 8:47 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त.

प्रचेतस's picture

12 Mar 2011 - 8:56 am | प्रचेतस

कथा एकदम छान फुलवली आहे. बिकाशेठची 'भेट' आठवली.

श्री गावसेना प्रमुख's picture

12 Mar 2011 - 8:59 am | श्री गावसेना प्रमुख

गावाकड्च बी लीवत जा(बाकी छान)

गोगोल's picture

12 Mar 2011 - 9:03 am | गोगोल

पण अशा २-३ स्टोरीज आहट मधे बघितल्याच आठ्वतय. अर्थात तुम्हाला ती स्वतंत्र्यरित्या सुचली यात काही वाद नाही.

पिवळा डांबिस's picture

12 Mar 2011 - 9:18 am | पिवळा डांबिस

कथेची मांडणी चागली मांडली आहे...
पण मूळ संकल्पना जुनी आहे....
त्यामूळे साजशृंगार दिसला पण प्रतिभा दिसली नाही असे खेदाने नमूद करावेसे वाटते....
स्पष्टोक्तीबद्दल क्षमस्व!!!
पुलेशु

sneharani's picture

12 Mar 2011 - 9:41 am | sneharani

मस्त कथा!

पिंगू's picture

12 Mar 2011 - 9:59 am | पिंगू

कथा चांगली वाटली. पिडांकाकांशी सहमत.

- पिंगू

शिल्पा ब's picture

12 Mar 2011 - 10:39 am | शिल्पा ब

कथा आवडली.

मुलूखावेगळी's picture

12 Mar 2011 - 10:49 am | मुलूखावेगळी

आवडली.
मस्त

विनायक बेलापुरे's picture

12 Mar 2011 - 11:31 am | विनायक बेलापुरे

उत्तरार्धात चांगला नारायण धारप जागवा.

प्रतिक्रीयांबद्धल सर्वांचे धन्यवाद.

स्पंदना's picture

14 Mar 2011 - 8:26 am | स्पंदना

झटक्यात फिरवली आहे कथा.

मला तर आवडली.

टारझन's picture

14 Mar 2011 - 4:23 pm | टारझन

हा हा हा :) च्यायला गुगलीच पडली की :)
आपल्या बायकोशी अबोला धरणार्‍यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी कथा :)

प्राजु's picture

14 Mar 2011 - 8:55 pm | प्राजु

कथा आवडली..!