मराठी शिकलेला नवरा नको गं बाई....

कलंत्री's picture
कलंत्री in काथ्याकूट
8 May 2008 - 4:46 pm
गाभा: 

(या मेच्या सुट्टीमध्ये गावाकडे गेलो असताना हा किस्सा घडला. )

आमच्या गावाकडे असणाऱ्या एका मित्राच्या बायकोने तिच्या उपवर आणि सुशिक्षित मुलीसाठी काही मुले पाहण्यासाठी मला सांगितले, त्याप्रमाणे मी तिला तसे आश्वासन दिले आणि ही गोष्ट अश्याच गप्पागोष्टीत माझ्या एका मित्राला सांगितली. माझ्या त्या मित्राने मला विचारले की तुला त्या मुलीबद्दल काय माहीत आहे, यावर मी नकारार्थी उत्तर दिले. त्याने दुसरा प्रश्न विचारला की आपल्या गावामध्ये अश्या कामासाठी मदत करणारे असतील का नसतील. मी त्यावर उत्तर दिले की अर्थातच आपले गाव छोटे आहे आणि त्यामुळे कोणी मदत करणार नाही असा विचारही माझ्या मनात येत नाही.

मग त्याने एक उसासा घेतला आणि सांगितले," अरे, ती मुलगी फारच अगोचर आहे. तिला आम्ही काही स्थळे दाखविली, परंतु तिने काही चांगल्या स्थळांना तिने सरळ सरळ नकार दिला, कारण माहीत आहे, की मुलगा मराठी माध्यमात शिकलेला आहे. आता मला सांग तिच्या साठी आम्ही काय इंग्लंडहून नवरा शोधायचा का?, मराठी माध्यमाच्या मुलांना काय धाड भरली आहे? दुर्दैवाने तिची आई पण तिला भरीस टाकत असते." मी जास्त न बोलता अल्पोपहार आणि चहा घेऊन गाशा गुंडाळला.

घरी आलो आणि खरेच मी विचारमग्न झालो. लग्नाच्या मुली शक्यतो खेडे टाळतात हे आपणा सर्वांना माहीत असेलच, पण आता मराठी शिकलेला नवरा नको असे म्हणणे म्हणजे फारच झाले, बरे इंग्रजीमध्ये शिकलेला नवरा काय आणि मराठीमध्ये शिकलेला नवरा काय? शेवटी संसार करताना तडजोडीची भाषाच शिकावे लागते.

कदाचित त्या मुलीला आणि त्याही पलिकडे तिच्या आईला आयुष्याच्या शाळेत बरेच शिकायचे आहे हेच खरे.

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

8 May 2008 - 4:52 pm | प्रभाकर पेठकर

दुर्दैव अशा विचारांच्या आईचं आणि मुलीचं. दुसर काय म्हणणार?

स्वाती दिनेश's picture

8 May 2008 - 4:54 pm | स्वाती दिनेश

दुर्दैव अशा विचारांच्या आईचं आणि मुलीचं. दुसर काय म्हणणार?

हेच मनात आले..
स्वाती

मनस्वी's picture

8 May 2008 - 5:07 pm | मनस्वी

नकार द्यायला खरेच हेच कारण आहे, का नकार देण्यासाठी हे कारण पुढे केले जात आहे - हे ताडून घ्यायला हवे.

कलंत्री's picture

8 May 2008 - 5:20 pm | कलंत्री

खेड्यातील लोकांचे एक मानसशास्त्र असते. तेथे आहे तसेच सांगितले जाते. या गोष्टीची मी माझ्या आईकडूनही खात्री करून घेतली आहे.

वरील गोष्टीच्या गावाची संख्या अंदाजे २५००० असावी आणि ही संख्या अनेक जातीजमातीत विखुरलेली असते. असो.

पण ही वार्ता खरी असेल तर मराठी माध्यमात शिकलेला आहे म्हणून नवरा नाकारणे योग्य आहे काय?

अवांतर : हा मुलगा संगणक अभियंता म्हणून पुण्यात नौकरीला असतो असेही मी ऐकले आहे, पण इंग्रजी मुलांसारखी सफाई मराठी मुलांमध्ये नसते अशी पुस्ती ऐकल्याचे आठवते. त्यामुळे कॉन्वेंट मध्ये शिकलेला आणि उच्चविद्याविभुषित मुलाची अपेक्षा आहे असे मी ऐकल्याचे आठवते.

प्रभाकर पेठकर's picture

8 May 2008 - 5:25 pm | प्रभाकर पेठकर

हा मुलगा संगणक अभियंता म्हणून पुण्यात नौकरीला असतो असेही मी ऐकले आहे, पण इंग्रजी मुलांसारखी सफाई मराठी मुलांमध्ये नसते अशी पुस्ती ऐकल्याचे आठवते. त्यामुळे कॉन्वेंट मध्ये शिकलेला आणि उच्चविद्याविभुषित मुलाची अपेक्षा आहे असे मी ऐकल्याचे आठवते.

द्वारकानाथजी,

आपण कोणासाठी कोण शोधताय? मूळ लेखात मुलीसाठी मुलगा शोधत आहात असे जाणवले. आता मुलासाठी मुलगा?

कलंत्री's picture

8 May 2008 - 5:42 pm | कलंत्री

प्रभाकरपंत,

मी त्या नकार दिल्या गेलेल्या मुलाबद्दलची माहिती लिहिली आहे. ( अभियंता इत्यादी). त्या मुलीला कॉन्वेंट च्याच मुलाची अपेक्षा आहे असे मी ऐकले आहे.

द्वारकानाथ

या निमित्त्याने एका सामाजीक समस्येचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे. सर्वसाधारण पणे लग्न ही आर्थिक पायावर जमतात. आता भाषा हाही निकष आला तर काय होईल असा विचार मनात येत आहे. इतर प्रतिसादात मुलेही इंग्रजी येत नाही म्हणून मुली नाकारतात असे वाचल्यावर समस्या बरीच खोल आहे असे वाटते.

प्रभाकर पेठकर's picture

8 May 2008 - 5:45 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद... शंका निरसन झाले आहे. दोन ष्टोर्‍या एकमेकात मिसळल्यामुळे माझा गोंधळ झाला. क्षमस्व.

मनस्वी's picture

8 May 2008 - 5:31 pm | मनस्वी

पण ही वार्ता खरी असेल तर मराठी माध्यमात शिकलेला आहे म्हणून नवरा नाकारणे योग्य आहे काय?

नाही. जर मुलगा खरोखरीच चांगला असेल तर या कारणावरून नाकारणे हा खरोखरीच वेडेपणा आहे.

त्यामुळे कॉन्वेंट मध्ये शिकलेला आणि उच्चविद्याविभुषित मुलाची अपेक्षा आहे असे मी ऐकल्याचे आठवते.

मग असा मुलगा खेड्यातील मुलीला पसंत करेल काय? (१-२% अपवाद वगळता)

सही मनस्वी.. ह्यवर कलंत्री काकांचा प्रतिसाद अपेक्षीत आहे

कलंत्री's picture

9 May 2008 - 11:08 am | कलंत्री

लग्न कसे घडतात या प्रक्रियेचा अभ्यास केला तर हे शक्य आहे. ठरवुन केलेल्या लग्नासाठी आर्थिक निकष, नातेवाईक-मित्रमंडळाची शिफारस, मुलाच्या मोठ्या भावाची निवड, खेड्यातील असली तरी मुलीमध्ये आगळे वेगळे असलेले चैतन्य ( स्पार्क) आणि आपल्याला नेमके काय हवे आहे हे जर उपवराला ठाऊक असेल तर हे निश्चितच शक्य आहे.

वडाची साल वांग्याला -> सयाजीराव गायकवाड यांची दत्तक निवड सुद्धा अश्याच दुरदुरच्या खेड्यातून झाली होती याचे स्मरण होत आहे.

प्रियाली's picture

8 May 2008 - 5:15 pm | प्रियाली

आणि हे केवळ मुलींच्याच बाबतीत नाही तर मुलगेही असेच असतात म्हणजे आपली बायकोशी आपण इंग्रजीत संभाषण करतो हे दाखवण्यासाठी त्यांनाही इंग्रजी बोलणार्‍या बायका हव्या असतात आजकाल. हा बहुधा मराठी शिक्षणाला कमी गणले गेल्याने आलेला गंड असावा.

मराठी भाषेचा न्यूनगंड बाळगण्यासारखं काय आहे तेच कळत नाही.

स्वाती दिनेश's picture

8 May 2008 - 5:34 pm | स्वाती दिनेश

मराठी भाषेचा न्यूनगंड बाळगण्यासारखं काय आहे तेच कळत नाही.

अगदी खरे,
इतर भारतीय भाषक मात्र एकत्र आले की आपल्या मातृभाषेतच संवाद करतात.एवढेच नव्हे तर जर्मनी,इटाली, जपान, स्पेन इ.सारख्या बिगर इंग्रजी भाषक देशात त्यांचे इंग्रजीवाचून काही विशेष अडत नाही आणि आपण कोणाला काही विचारलेच,अर्थातच इंग्रजीमधून तर "आय नो नो इंग्लिश.." असं साधं उत्तरही बरेचदा ऐकायला मिळते.
स्वाती

दोघी खेड्यात रहात असल्यामुळे फक्त इंग्रजी भाषा येत असावी.त्यामुळे हा प्रश्न उधभवला असावा.सदर मुलीला जर ब्रिटन ला पाठवले तर तिचा प्रश्न सुटु शकेल.तसेच अस्स्लिखित इंग्रजी बोलणारे कान्हेन्ट मुले १२ झाली की पुढे शिक्षण घेण्यापेक्षा कालसेंटर मध्ये काम करण्यात धन्यता मानतात व त्याना खेड्यातली मुलगी पसंद पडेल का? शंका वाटते.

(फिरंगी) वेताळ

मुक्तसुनीत's picture

8 May 2008 - 6:26 pm | मुक्तसुनीत

मराठी भाषेबद्दलचा न्यूनगंड हा विषय आपल्या सगळ्याना चिरपरिचित आणि म्हणूनच जिव्हाळ्याचा आहे. या न्यूनगंडाचे सर्वात स्पष्ट प्रतिबिंब वयात येणार्‍या पिढीमधे पडलेले दिसते. इलेक्ट्रॉनिक मिडीआ , सिनेमा , जाहिरातींची दुनिया या सगळ्या लोकप्रिय गोष्टी या गंडाला पोषक ठरतील अशीच मूल्ये युवाविढीसमोर ठेवताना दिसतात. ब्रँडनेम्स ची उत्पादने वापरणे , अत्याधुनिक फॅशनची वस्त्रेप्रावरणे यांचा अंगिकार करणे, व्यवसायात आणि उद्यमशीलता या सगळ्यातील यशाचा संबंध इंग्रजी भाषेशी - आणि मुख्य म्हणजे "स्लँग"शी आहे असे मनीमानसी ठसविले जाते.

या सर्व गोष्टींचा पगडा सहजासहजी न झुगारता येण्याजोगा आहे यात शंका नाही. शेवटी सामाजिक मान्यता , आर्थिक संपन्नतेची स्वप्ने , आर्थिक बंधनातून , सामाजिक बंधनातून "मुक्त" अशी जीवनशैली या सार्‍याचे आकर्षण कुणाला वाटणार नाही ? किंबहुना , वर निर्देशित केलेल्या गोष्टीच , आत्मोन्नतीच्या दृष्टीने प्रवास करायला तरुण व्यक्तीला उत्साहित करतात.

आणि या सार्‍याची नाळ शेवटी बांधली जाते इंग्रजीशी , पर्यायाने , मातृभाषेशी नाते तोडण्याशी.

या सर्व परिस्थितीचा उलगडा तुम्हाआम्हा व्यक्तिना होतो तेव्हा पौगंडावस्था उलटलेली असते. अर्थात आपल्यापैकी बर्‍याच जणांना हा सर्व भुलभुलैय्या आहे याची जाणीव "न कळत्या" वयातही होत असतेच. पण ज्याना ती होत नाही त्यांच्याकरताच तर हे जाळे असते.

कलंत्रीनी वर्णिलेल्या प्रसंगातली तरुणी या जाळ्यात अडकलेली आहे. या सर्वावरचा उपाय काय ? तर प्रबोधन. (शेवटी कुठल्याही सामाजिक समस्येचा अक्सीर इलाज हाच असतो म्हणा !) मराठी भाषेत शिकलेल्या जितक्या जास्त जास्त व्यक्ती लोकंसमोर येतील तितके कमी लोक उपरनिर्देशित जाळ्यात अडकतील. किंबहुना यश म्हणजे काय , आयुष्यातील श्रेयस म्हणजे काय याच्या व्याख्या जसजशा जास्त जास्त लोकांना कळू लागतील तितके असे प्रसंग घडण्याची शक्यता कमी कमी होईल.

नीलकांत's picture

9 May 2008 - 10:43 pm | नीलकांत

मराठी भाषेत शिकलेल्या जितक्या जास्त जास्त व्यक्ती लोकंसमोर येतील तितके कमी लोक उपरनिर्देशित जाळ्यात अडकतील. किंबहुना यश म्हणजे काय , आयुष्यातील श्रेयस म्हणजे काय याच्या व्याख्या जसजशा जास्त जास्त लोकांना कळू लागतील तितके असे प्रसंग घडण्याची शक्यता कमी कमी होईल.

मुक्तसुनीत साहेब अगदी मनातलं बोललात.

नीलकांत

भाग्यश्री's picture

8 May 2008 - 10:19 pm | भाग्यश्री

अशी उदाहरणं दुर्दैवाने आहेत आजूबाजूला.. माझ्या वहीनीच्या बहीणीने असंच एक चांगलं स्थळ नाकारलं होतं.. का तर तो मुलगा भेटायला आला तेव्हा मराठीतून बोलत होता, इंग्लिश नाही.. !! आता दोघांची मातृभाषा मराठी असताना , शिवाय लग्नासारख्या गोष्टी होताना कोण इंग्लिश मधे बोलायला जाईल!! काहीही.. मुर्ख असतात अशी लोकं! निव्वळ वेडेपणा!

प्रभाकर पेठकर's picture

8 May 2008 - 10:20 pm | प्रभाकर पेठकर

बहुतेक अशा मुलींचे अतिंम ध्येय नवरदेवाची शीडी वापरून परदेशात (युरोप-अमेरिकेत) 'सेट्ल' होण्याचे असते.
कॉन्व्हेंट किंवा इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांना अशा संधी जास्त येतात असा एक गैरसमज त्या मागे असू शकतो. तसेच, कॉन्व्हेंट किंवा इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांमध्ये इंग्रजी भाषेचा भयगंड नसल्यामुळे मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलांपेक्षा जगातील कुठल्याही देशात राहण्या-फिरण्याचा, नोकरीचा आत्मविश्वास जास्त असतो (गैरसमज क्र.२). मराठी माध्यमातून शिकलेली मुले 'मराठी मध्यमवर्गीय विचारसरणीची' असतात त्यामुळे आपल्या विवाहोत्तर स्वातंत्र्यावर गदा येऊन धुणी-भांडी, उष्टी-खरकटी काढण्यात उर्वरीत आयुष्य कंठावे लागेल असाही गैरसमज असू शकतो.

अशा अनेक गैरसमजांवर उभारलेली गोजीरवाणी स्वप्ने जेंव्हा वास्तवाच्या ठोकरीत चक्काचूर होतात तेंव्हाच ह्यांचे डोळे (कदाचित) उघडतात. पण तेंव्हा खूप उशीर झालेला असतो.

ह्यांचा आयुष्याकडे, भौतिक सुखांकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. 'लग्न' ह्या विषयाकडे आपले आर्थिक, सामाजिक स्तर उंचावण्याची एकमेव संधी अशा दृष्टीने पाहण्याकडे कल दिसतो.

अशा मुली 'भावी पिढी' काय आणि कशी घडविणार हा अत्यंत भितीदायक प्रश्न आहे.

रविराज's picture

9 May 2008 - 6:51 am | रविराज

गैरसमज क्र.२ हा पुर्णपणे गैरसमज नाहीये. मी मराठी माध्यमातून शिकलो आहे. इंग्रजी बोलताना थोडासा(स्वगतः थोडासा की भरपूर?) न्यूनगंड हा जाणवतोच. त्यामुळे मग वाटत की इंग्रजी माध्यमातून शिकलो असतो तर बर झाल असतं!

(पुन्हा स्वगत : पण जर मी इंग्रजी माध्यमातून शिकलो असतो तर मि.पा. चा खरा आनंद मला लुटता आला असता का? )

रवी

मन's picture

9 May 2008 - 3:30 pm | मन

मी ही मराठी.
मराठी माध्यमात शिकलेला.

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

स्वयंभू's picture

9 May 2008 - 10:02 pm | स्वयंभू (not verified)

माफ करा, मी आपल्याल ओळखत नाही पण तरी बोलल्या शिवाय रहावत नाही कारण हा विषय माझ्याही जिव्हाळ्याचा आहे.
मला असं वाटतं इथे चुकताय आपण. सुरुवातीला त्रास होणे समजु शकतो. पण त्यावर मात करणंही आपल्याच हातात आहे. मराठीतून शिक्षण घेतलं म्हणून इंग्रजीचा भयगंड असेल तर तो एक वैयक्तीक पराभव आहे असं मी मानतो.

मी मराठी माध्यमातून शिकलो. कॉलेज मधेही मराठी मित्रांचाच कंपू होता.

आणि आज मी जगातल्या नं १ च्या ऍड एजन्सी मधे इंग्रजी जाहीरात लेखक (Copywriter) म्हणून कामाला आहे. आणि मि. पा. चा आनंदही व्यवस्थीत लुटतो आहे. मला कुठलाही न्युनगंड जाणवत नाही. सुरुवातीला जम बसवताना त्रास झाला. मराठी माध्यमाचा म्हणून बर्याच मरठी लोकांनीही जॉब नाकारला. पण स्वतः मधे सुधारणा करणं आपल्याच हातात आहे.

ह्या खरडी मागचा अर्थ स्वत:ची लाल करणे नसून ' केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे' ह्या उक्ती वर विश्वास ठेवा हे सांगणे हा आहे.

आपला,

ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

मन's picture

9 May 2008 - 10:24 pm | मन

...पण स्वतः मधे सुधारणा करणं आपल्याच हातात आहे.
बिल्कुल कबुल.
प्रयत्न करतो आहे.

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

llपुण्याचे पेशवेll's picture

10 May 2008 - 2:59 am | llपुण्याचे पेशवेll

माझेही काहीसे ऍडी जोशी सारखे आहे. त्यात मराठी माध्यमातूम शिक्षणाच्या जोडीला त्याच्या जाज्वल्य अभिमानाची पण जोड होतीच. पूर्वी मी माझ्या कॉलेजकंपू मधे इंग्रजी बोलता येत नाही म्हणून हिंदी बोलणारे अनेक जण पाहीले त्यांचा मनोमन फार राग यायचा पण काय करणार मलाही धड इंग्रजी बोलता येत नव्हते.
तेव्हा माझ्या क्लासच्या सरांनी सांगितले की "इंग्लिश बोलता येत नाही म्हणून हिंदी बोलणे या गोष्टीने ज्या मराठी भाषेवर प्रेम करतोस तिचे नुकसान आणि अपमान करत आहेस. जर इंग्रजी बोलता येत नसेल तर प्रयत्नपूर्वक ते शिक. रोज इंग्रजी वृत्तपत्र मोठ्याने वाचत जा. एकदा जीभ वळायला लागली की नक्की जमेल. आणि एखादे वाक्य नाही जमले इंग्रजी मधे बोलायला तर बेलाशक ते मराठी मधे बोलून टाक. आपल्या मातृभाषेची लाज वाटणे हा नुसता करंटेपणाच नाही तर षंढपणाही आहे. चुकलं तर चुकूदे पण प्रयत्नपूर्वक सुधारणा कर."
माझे इंग्रजी बोलणे त्यामुळे सुधारले आणि IT हमाल म्हणून का होईना पण अमेरीकेत येण्यापर्यंत प्रगती झाली.

'केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे' हेच खरे.

पुण्याचे पेशवे

तुमच्या मी.
आंग्ल भाषेत वाचण्याचा ,बोलण्याचा सरावा तर सदोदित सुरु असतो.
नाही जमलं तर इथं साहेबाच्या देशातही मराठीच बोलतो(सहकर्‍यांमध्ये).
प्रयत्न करुन जेवढं इंग्रजी जमलं, त्या जोरावर थेट इथे इंग्लंडात आलो.
समज्तं,बोलताही येतं.पण....
"thinking in English"म्हणतात ते जमत नाहिये.(परिणामी वादावादीचा प्रसंग आला आणि संभाषण इंग्लिश मध्ये असेल तर आमची
स्पीड आणी त्यामुळे वाद घालायचा जोर आपोआप कमी होतो.)

पण , प्रयत्न चालु आहेत, नेटाचे.

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

रविराज's picture

10 May 2008 - 5:18 am | रविराज

स्वयंभू आणि पेशवे साहेब,

प्रोत्साहना बद्घल धन्यवाद. तुमच्या प्रतिसादांमुळे हुरुप आला! >:D<
प्रयत्न मी नक्कीच करेल. पण हे वाघीणीचे दुध मला पचते की नाही या बाबत शंकाच आहे. =))

समज कॉटेंक्स्ट स्पेसिफीक तोडकमोड्क इंग्रजी बोलताही आलं मला, पण अनौपचारीक संभाषण सुधारण्या साठी पेपर वाचणे सोडून दुसरा काही रामबाण उपाय आहे का हो?

अवांतर : आमच्या ऑफीस बाहेर कॉल सेंटर ची मुले मुली सिगरेटी फुकत इंग्रजी मधून बोलत असतात, त्यांच बोलण चोरुन ऐकण्याने फार फायदा होतो असा माझा अनुभव आहे. ;)

त्या भाषेतील चित्रपट पाहणे ह्याने बोलीभाषा चटकन सुधारते. काही स्लँग वर्डस असतात पण ते थोड्या प्रयत्नाने आपण टाळू शकतो.
हमखास लागू पडणारा आणखी एक उपाय म्हणजे भाषांतर करणे.
छोटा ५-१० ओळींपर्यंतचा एखादा इंग्रजी वर्तमानपत्रातील/पुस्तकातील परिच्छेद घेऊन तो भाषांतरित करण्याचा प्रयत्न केलात तरी तुम्हाला किती पायर्‍यांमधून जावे लागेल पहा -
आधी वाचन --> अर्थ समजावून घेणे - त्यासाठी शब्दकोश धुंडाळणे --> मराठीतील प्रतिशब्द शोधणे --> वाक्यरचना समजावून घेणे --> मग भाषांतर पूर्ण करणे.
ह्याने विचार करण्याच्या पद्धतीमधे बदल होत जातो. करुन पहा.

चतुरंग

रविराज's picture

13 May 2008 - 4:29 am | रविराज

चतुरंग धन्यवाद!

चित्रपट पाहणे ह्या उपायाचा नक्कीच प्रयत्न करुन पाहीन.

प्रभाकर पेठकर's picture

10 May 2008 - 8:06 am | प्रभाकर पेठकर

सुरुवातीला त्रास होणे समजु शकतो. पण त्यावर मात करणंही आपल्याच हातात आहे. मराठीतून शिक्षण घेतलं म्हणून इंग्रजीचा भयगंड असेल तर तो एक वैयक्तीक पराभव आहे असं मी मानतो.

श्री. स्वयंभू ह्यांच्या वरील मताशी १०० % सहमत आहे. कुठे-कुठे आपल्यातली कमतरता जाणवली तरी ती प्रयत्नपूर्वक दूर करणे शक्य असते. इंग्रजी कादंबर्‍या वाचल्यानेही (त्यातील स्लँग भाषा वगळून) बराच फायदा होतो. इंग्रजी पेपर्स वाचताना, नुसते शब्द-वाक्ये न वाचता, लेखनशैली समजावून घेण्याचा, आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे ज्ञान मिळविले आहे, जे शब्दभांडार वाढवीले आहे त्याचा तात्काळ आणि सातत्याने वापर करणे गरजेचे असते. इंग्रजी भाषेतील सौंदर्यस्थळे शोधून, समजावून घेऊन त्यांचा अंतर्भाव आपल्या संभाषणात करणे आदी गोष्टींनी हळू हळू भाषेची भीती दूर होऊन आत्मविश्वास वाढतो.
मीही मराठी माध्यमातून शिकलो आहे. नोकरी निमित्ताने गोर्‍यांशी संबंध आले पण त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत वाद घालताना संकोच बाळगला नाही. तसेच, मराठी माध्यमातून शिकल्यामुळे माझे कुठे नुकसानही झाले नाही.
काही इंग्रजी माध्यमातून शिकलेली मुले आपल्या पुढे जाताना दिसतात पण अशा वेळी 'कोल्ह्याला द्राक्षे आंबट' वृत्तीने ,' तो इंग्रजी माध्यमातून शिकला आहे, फाड्फाड इंग्रजी बोलतो म्हणून पुढे गेला' असा विचार न करता तो आपल्या पेक्षा 'हुशार'ही आहे हे वास्तव मनाशी स्विकारावे. आपल्या हुशारीतही 'वाढ' करण्याचा प्रयत्न करावा. तुरळक घटनांमध्ये इंग्रजी भाषेच्या प्रभुत्त्वामुळे कोणी पुढे जातोही पण त्याचा प्रवास फार लांबचा ठरत नाही. नुसते भाषेवरील प्रभुत्त्व आहे आणि हुशारी शून्य असेल तर लवकरच पितळ उघडे पडते.
संकोच बाळगून मागे राहू नये. सतत चौकस राहून आत्मोन्नती घडवून आणावी.

इंग्रजीबद्दलच्या अवास्तव कल्पना, आजूबाजूला दिसणारे तद्दन ढोंगी वातावरण, ह्या बरोबरच मराठी बोलण्याचा न्यूनगंड घरातूनच जोपासला जातो हे त्याचे मूळ कारण आहे.

माझ्या अगदी परिचयातले नेहेमी येणारे अनुभव म्हणून सांगतो - इथे अमेरिकेतही किराणा मालाच्या दुकानात किंवा इतरत्रही मला नवरा-बायको मराठीत कुजबुजत असलेले दिसले आणि माझ्या बायकोशी किंवा मुलाशी मी मराठीत बोललेला त्यांना दिसलो की ते आमच्याकडे एक ओशाळता, चोरटा कटाक्ष टाकून आपापसात लगेच इंग्रजीत बोलायला सुरुवात करतात! (तुमच्या पैकी परदेशात असलेल्या अनेकांना असे अनुभव आले असतील/येत असतील.)
त्याच जागी तमिळ, तेलुगु, हिंदी, गुजराती, पंजाबी असे इतर भाषिक दणादण त्यांच्या भाषेत संवाद साधतात. किंबहुना त्यांना समभाषिक भेटल्याचा जेवढा आनंद होतो (किंवा किमान तसा ते दाखवतात) तेवढा आपल्या मराठी लोकांना होत नाही!
हे का व्हावे?
मध्यमवर्गीय मूल्ये अजिबात चुकीची किंवा वाईट नाहीत. त्या मूल्यांमधे कालानुरुप योग्य ते बदल केले आणि त्यांचा डोळस स्वीकार केला तर आपलं भलंच होणार असतं.
खर्‍या आयुष्याशी यशस्वी मैत्री करायला हीच मूल्ये उपयोगी पडत आलेली मी आजपर्यंत पहात आलेलो आहे.
तेव्हा काहीजण इतरांच्या अनुभवातून शिकतात आणि काही स्वतः खड्ड्यात पडून, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. (प्रबोधनाने खड्ड्यात उडी मारणार्‍यांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.)

चतुरंग

यशोधरा's picture

8 May 2008 - 11:01 pm | यशोधरा

>>> तुमच्या पैकी परदेशात असलेल्या अनेकांना असे अनुभव आले असतील/येत असतील

परदेशातच कशाला, इथे, भारतातही असे अनुभव येतात. माझा एक सहकारी मराठीच आहे, आणि कधीही त्या माणसाच्या तोंडून मी मराठी ऐकलेले नाही!! म्हणजे त्याने विंग्रजी झाडायचे अन मी मात्र मराठीतूनच त्याच्याशी बोलायचे हा प्रकार सतत सुरुच असे!! शेवटी एकदा त्याला विचारले, की, मराठी बोलायला काही त्रास होतो का? जीभ वळत नाही की काय??? .....

संताप होतो असे लोक पाहिले की!!

प्रियाली's picture

8 May 2008 - 11:53 pm | प्रियाली

वरील कथा पहिल्यांदा ऐकली तेव्हा मराठीचा न्यूनगंड का वाटावा असे वाटून इतरांप्रमाणेच पहिला प्रतिसाद दिला. या गोष्टीवर अधिक विचार करता हे जाणवले की त्या मुलीचे सर्वच चुकीचे नाही. तिच्या बाजूने विचार करता कदाचित तिलाही बाजू असू शकेल.

(क्षणभर, येथे मराठी बोलणारा मुलगा म्हणजे इंग्रजी न येणारा मुलगा असा गैरसमज नाही हे धरून चालू)

ही गोष्ट लग्नाची आहे आणि लग्न हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे सदर मुलीने लग्नासाठी कोणत्या अटी घालाव्यात हा तिचा प्रश्न कारण परिणामही तिलाच भोगायचे आहेत. इतरत्र आपल्याच जातीतील मुले हवीत (का तर रहाणी, वागणूक समान मिळते), गोरी मुलगी हवी (का तर शोभून दिसेल..याहीपुढे जाऊन आमच्या घरात एकही सावळा रंग असणारा माणूस नाही), उच्चशिक्षित मुलगा हवा (का तर सुखात ठेवेल), एकुलता/ती एक मुलगा/गी नको (का तर सासूसासर्‍यांच लोढणं गळ्यात पडेल), भरल्या घरातले भरपूर भाऊ-बहिणी असलेला मुलगा नको (का तर आपल्या मुलीला सर्वांची उस्तवार करावी लागेल) जर असे सर्व प्रकार, अटी इ. चालतात तर या पोरीने इंग्रजी बोलणारा मुलगा हवा सांगून काय घोडं मारलं आहे?

मराठी भाषा ही भरपूर पैसा मिळवून देवू शकत नाही ही आजकाल सर्वच समाजाची धारणा आहे म्हणूनच मुलं इंग्रजी शाळांत जातात आणि मराठी शाळा बंद पडतात ना. मग तोच विचार जाहिर या मुलीने मांडला (भले तो चुकीचा असेल पण मग इतर तरी कुठे बरोबर आहेत) तर काय मोठं झालं?

अधिक विचार करता मला असं वाटतं की आपला जोडीदार कसा हवा हे ठरवण्याचा पूर्ण हक्क त्या मुलीला आहे. त्यातून चुकली तर निस्तरेलही तिच.

भडकमकर मास्तर's picture

9 May 2008 - 12:01 am | भडकमकर मास्तर

अधिक विचार करता मला असं वाटतं की आपला जोडीदार कसा हवा हे ठरवण्याचा पूर्ण हक्क त्या मुलीला आहे. त्यातून चुकली तर निस्तरेलही तिच.
याच विचाराचं एक्स्टेन्शन म्हणून मला असं वाटतं की असल्या विचाराच्या मुलीने नकार देण्यातच त्या मुलग्याचं भलं आहे...वाचला बिचारा...

प्रियाली's picture

9 May 2008 - 3:46 am | प्रियाली

याच विचाराचं एक्स्टेन्शन म्हणून मला असं वाटतं की असल्या विचाराच्या मुलीने नकार देण्यातच त्या मुलग्याचं भलं आहे...वाचला बिचारा...

यात मुलाचं भलं ते काय? त्या मुलीने काही त्याची फसवणूक केलेली नाही किंवा आधी हो म्हणून नंतर लग्न मोडलेलं नाही. किंवा कोणाचे तोंडावर अपमान केले असेही वर सांगितलेले नाही. तेव्हा त्या मुलीने नकार देण्यात त्या मुलाचे भले आहे पर्यंत गाडीच पोहोचलेली नाही. ती जर तिच्या मतावर ठाम असेल (चूक की बरोबर ते नंतर बघू) तर इथली ४ डोकी कोण तिला नावं ठेवणार?

किंवा जे नावं ठेवायला जातात ते लग्नाच्या बाजारात उभे होते तेव्हा कोणकोणत्या अटी घेऊन उभे होते ते पाहावे. तिची काही (चुकीची किंवा बरोबर) स्वप्न असतील त्याचा पाठपुरावा करण्याचा पूर्ण हक्क तिला आहे कारण लग्न ही तिची वैयक्तिक बाब आहे.

राजे's picture

9 May 2008 - 4:10 pm | राजे (not verified)

पुर्णतः सहमत.

तिची काही (चुकीची किंवा बरोबर) स्वप्न असतील त्याचा पाठपुरावा करण्याचा पूर्ण हक्क तिला आहे

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

भडकमकर मास्तर's picture

9 May 2008 - 5:39 pm | भडकमकर मास्तर

कारण लग्न ही तिची वैयक्तिक बाब आहे.

अगदी खरंय...
मान्य...
पण आम्ही तिला अजिबात नावे ठेवली नाहीत... तिचे आणि त्याचे दोघांचे भले झाले.... ( इथे सगळ्यांना वाटतंय की त्याच्यावर अन्याय झालाय, पण आम्हाला वाटतंय की छान झाले)
आम्हाला फक्त इतकेच म्हणायचे होते की लग्नानन्तर त्रागा, भांडणे करण्यापेक्षा आधीच नकार देणारी ही मुलगी महान आहे.... आणि तिने नकार दिलेला मुलगा भाग्यवान आहे, कारण लग्न झाले असते तर तिच्या दु:खाचा सारा भार जन्मभर तो नवरा वाहत राहिला असता.....म्हणून वाचला बिचारा...
...
तिला जपानी, जर्मन, इंग्रजी,ताहितिअन, सोमाली, यिडिश, अझरबैजानी, तुर्क, मेक्सिकन, स्पॅनिश ज्या कोणत्या माध्यमात शिकलेला नवरा हवा आहे, तो नवरा मिळवायचा तिला हक्क आहे आणि त्यासाठी तिच्या मनात येइल त्या माणसाला नकार द्यायचा तिला हक्क आहे, यासाठी तिला जो झगडा समाजाशी, कुटुम्बाशी आणि या विश्वातल्या प्रत्येक घटकाशी जरी करायचा असेल तरी माझा तिला तन, मन आणि धनाने पाठिंबा आहे ... ..

( स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता ) ( आणि जन्मभर बायकोच्या दु:खाचे पहाड वाहणारे नवरे पाहणारा) भडकमकर

माझा नवरा आणि त्याचे कितीतरी मित्र मराठी माध्यमात शिकलेले आहेत (१ ते १० वी). तरी ते सफाईदार ईन्ग्लिश बोलतात आणि परदेशी उच्च पदाच्या नोकर् या करीत आहेत. मला नाही वाटत मराठी माध्यम ईन्ग्लिश बोलण्यात अडसर ठरू शकते.
करिअर च्या द्रुष्टीने काही प्रकारच्या नोकर्यान्मधे सध्या असलेले ईन्ग्लिश चे महत्व नाकारता येणार नाही. त्या मुलीने सरळ नकार देण्याऐवजी मुलगा जरी मराठी माध्यमात शिकलेला असला तरी त्याला सफाईदार पणे ईन्ग्लिश बोलता येते कि नाही हे पडताळून पहायला काही हरकत नाही. एकदम टोकाचा विचार करू नये असे मला वाटते.

ईश्वरी

मन's picture

9 May 2008 - 3:10 am | मन

त्या कार्टीला कन्नड माध्यमात शिकलेला मुलगा चालेल का?
कारण तिनं "मराठी" नको असं सांगितलेलं दिसतय.

"इंग्लिश" हवयं असं कुठं म्हटलय?
हे तर उगिच सगळे गृहितक (ऍझम्पशन)धरुन चालले आहे...

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

वेलदोडा's picture

9 May 2008 - 4:21 am | वेलदोडा

त्या कार्टीला कन्नड माध्यमात शिकलेला मुलगा चालेल का?
कारण तिनं "मराठी" नको असं सांगितलेलं दिसतय.
"इंग्लिश" हवयं असं कुठं म्हटलय?
हे तर उगिच सगळे गृहितक (ऍझम्पशन)धरुन चालले आहे...


--- पण मराठी माध्यम नको म्हणजे कोन्व्हेंट मध्ये शिकलेला मुलगा हवाय असं सरळ आहे. (मुलगी मराठी भाषिक आहे हे ऍझम्पशन आहे..कल्नत्री यान्नी ते स्पष्ट केल्यास बरे होईल )
-- वेलदोडा

धमाल मुलगा's picture

9 May 2008 - 11:38 am | धमाल मुलगा

प्रियालीताईच्या मुद्द्याशी सहमत.

ही बाब त्या मुलीची वैयक्तिक आहे. तीने योग्य गुण पारखून घ्यायचे की आभासामागे धावायचं हा प्रश्न तीचाच.!

तरीही, एक मनोवृत्ती म्हणून विचार केला तर हे वागणं नक्कीच खटकण्याजोगं.

हल्ली शहरांत तर सर्रास मराठी मुलं ही इंग्रजी माध्यमाच्याच शाळेत जातात..(ह्याचा अर्थ मराठी शाळा ओस पडताहेत असा कोणी काढू नये!)..तालुक्याच्या ठिकाणीही तुम्ही पाहिलंत तर 'आमचा मुलगा / मुलगी कॉन्व्हेंट मध्ये जाते' हे सांगताना आईबापाच्या नजरेत अभिमान तरळताना दिसतो.
मुळात 'कॉन्व्हेंट' चा अर्थ किती जणांना ठाऊक असतो? :)

बरं, ही मुलं फाडफाड इंग्रजी बोलत असतात (कधी व्याकरण तपासा त्यांच्या संवादातलं...तर्खडकर झीट येऊन पडतील!) त्याचा प्रभाव पडतोच. कारण शतकानुशतकं साहेबाचं लांगुलचालन करण्याची, त्यांचं तेच सर्वोत्तम हे मानण्याची भारतीय मनोवृत्ती आणि इंग्रजीत बोलण्याचा सराव नसल्याकारणाने त त प प...किमानपक्षी थोडंसं अडखळत बोलणारी मराठी माध्यमाची मुलं ह्यात इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी जास्त सरस वाटतात.

इंग्रजी माध्यमात शिकल्यानंतर, काही प्रमाणात का होइना 'पर्सनॅलिटी ग्रुमिंग' नावाचा प्रकार आपोआप घडत जातो जितका मराठी माध्यमाच्या शाळांत नाही होत, त्यामुळे पॉलिश्ड वागणं-बोलणं ह्याचा प्रभाव पडतोच....हे झालं दिखाऊपणाबद्दल...म्हणजे दृश्य स्वरुपासंदर्भात.

वर चर्चिलेले गैरसमज (काही प्रमाणात...मराठीच्या विद्यार्थ्यांना न्युनगंड खचितच वाटतो. निदान सुरुवातीला तरी) समाजात फार मोठ्या प्रमाणात आहेत...काही प्रमाणात त्यात तथ्यही आहेच..पण काही प्रमाणातच.

त्याचाच हा परिणाम वाटतो.
मनस्वीने म्हणल्याप्रमाणे असा एखादा मुलगा, खेड्यातली मुलगी पसंत करेल काय? त्यालाही इंग्रजी माध्यमातच शिकलेली मुलगी हवी असणार..त्याच्यासारखीच पॉलिश्ड! नाही का?

चालायचंच, आपण कोणाकोणाला शिकवायला जाणार?
ज्यानं त्यानं सुरुवात आपल्या घरापासून करावी हेच खरं!!!!!

मुक्तसुनितराव,

यश म्हणजे काय , आयुष्यातील श्रेयस म्हणजे काय याच्या व्याख्या जसजशा जास्त जास्त लोकांना कळू लागतील तितके असे प्रसंग घडण्याची शक्यता कमी कमी होईल.

अगदी टाळीचं वाक्य! लाखमोलाचं बोललात :)

अभिता's picture

10 May 2008 - 1:15 am | अभिता

ह्याचा अर्थ मराठी शाळा ओस पडताहेत असा कोणी काढू नये!)..
असहमत
पुण्यातील मराठी शाळेतील शिक्षक जुन महिन्यात पटसंख्या पुर्ण होण्यासाठी फिरतात्.वर्गातील मुलाची संख्या कमी झाली आहे.म्हणून काहि वर्ग बंद केले जात आहेत्.आणि त्याच वेळेला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गर्दी वाढत आहे.

नेत्रेश's picture

10 May 2008 - 4:25 am | नेत्रेश

आमच्या नात्यातील एक डॉक्टर मुलगी खुप चांगली, शीकलेली मुले नाकारुन बसली होती.
तीची आई एकादा माझ्या मामाच्या दुकानात आली आणी मुलीची तक्रार सांगु लागली.
मामा म्हणाला उद्या तीला दुकानात पाठव, एक चांगला मुलगा आहे. मी बघतो काही जमते का.
पण मुलगा फक्त १२वी पास आहे हे समजल्यावर त्यांचा उत्साह मावळला कारण मुलगी हा मुलगाही नाकारणार याची त्यांना खात्री होती.

तरीही दुसर्या दिवशी ती मुलगी दुकानात आली. तो मुलगाही आला. एक शीक्षण सोडले तर दोघे एकमेकांना अनुरूप होते. मुलीने त्याचे शीक्षण समजल्यावर तीथेच नकार दिला. हे अपेक्षीतच होते. पण मामाने तीला समजावले, मुलगा हुशार आहे. उद्योग धंदा करत आहे. थोड्यादीवसात त्याचा चांगला जम बसेल. तीने इंग्रजी चा वीषय काढला. मामाने त्याच्या दुकानात असलेले २ गोदरेज च्या एजन्सी चे इंग्रजीत असलेले अप्लीकेशन फॉर्म्स काढले आणी त्या दोघांना ते पुर्ण भरायला सांगितले.

त्या मुलाने तो फॉर्म २० मिनीटात पुर्ण भरला, आणी त्या डॉक्टर मुलीला १ तास झाला तरी अर्धा फॉर्म भरता आला नाही. मामाने मुलीला समजावले जे व्यवहारात उपयोगी नाही असे इंग्रजी काय कामाचे. एक शीक्षण सोडले तर मुलगा तुझ्या पेक्षा सरस आहे. आणी कमाई तो २ वर्षांनी तुझ्या दुप्पट करेल.

आणी नवल म्हणजे मामाचे सांगणे तीला पटले. त्यांचे लग्न झाले. मामाचा विश्वास सार्थ होता. आज तो मुलगा त्याच्या डॉक्टर बायकोच्या कीतीतारी पट जास्त कमावतो. आणी अर्थातच इंग्रजीचा कधीही प्रोब्लेम आल नाही.

भडकमकर मास्तर's picture

13 May 2008 - 10:01 am | भडकमकर मास्तर

छान गोष्ट नेत्रेश....
धन्यवाद सांगितल्याबद्दल...
अवांतर ...त्या डॉक्टर मुलीला १ तास झाला तरी अर्धा फॉर्म भरता आला नाही
अजिबात आश्चर्य वाटले नाही... :)) :))

असाच किस्सा माझ्या बहिणीबाबत घडला होता. माझे भाउजी माझ्या बहिणी पेक्षा कमी शिकलेले आहेत. पण त्याच्या धंध्यामध्ये ते खुप्च यशस्वी झाले आहेत. आयटी वाला पण त्याच्या इतके कमवत नसेल.खर तर शिक्षण चांगले संस्कार माणसावर घडवते. काही लोक त्याचा गर्व करतात.त्याचा त्याना कधीतरी पश्चाताप होणार हे नक्की. राजा परुळेकराचे हे वाक्य त्या मुलीला ऐकवा.
तुम्ही कोणत्या भाषेत बोलता यापेक्षा काय बोलता याचं महत्व अधिक आहे. असं नसतं तर बहिणाबाई चौधरी महान कवयित्री आणि लक्ष्मीबाई टिळक श्रेष्ठ लेखिका ठरल्या नसत्या आणि वॉटर प्युरीफायर विकायला टाय लावुन येणारा सेल्समन फाड्फाड इंग्रजी बोलतो म्हणुन तत्वज्ञ थरला असता.
तिने लग्न कोणाशी करावे हा तिचा वैयक्तिक प्रश्न नक्कीच आहे. परंतु तिला तिचा मुर्खपणा दाखवुन देणे आपले काम आहे.

वेताळ