आवतन! -कोंबडी वडा

स्पंदना's picture
स्पंदना in विशेष
1 Mar 2011 - 10:46 pm
मराठी दिन

पयल्या झुठलाच सांगुन ठिवतु , म्या कोंबडी वडा म्हंटल म्हनुन इथ्थ कोंबडी वडायला नक्का येउ! उगा सांगाया ग्येल म्हुन टांगाया न्हेयाच काम न्हाय! आदीच सांगतो ! ह्यो परदार्थ हाय. आमच्या कोलापुराकडचा.तसा बाकी ठीकानास्नी बी मिळतुया पर हित्त म्या कोलापुराची, म्हुनशान ह्ये जेवान बी कोलापुरीच! काय?
आता इचारा ह्ये आवतन कशासाठन? न्हाय इचारा की. इचारा ! इचारा ! तर सांगतो. अगदी बैजवार सांगतो. टाइम हाय न्हव? मग बसा हिथ जरा. खांड हाय का सुपारी बिप्पारीच? काढा काढा. हांगश्शी!
तर मला सांगा,आता दोन दिस झाल तुम्ही ह्या मराठी दिनात वणवण फिरायला लागलायसा, कुनी तुमच्या पोटा पान्याच काय इचारल? इचारल ? न्हाय सांगाच मला , इऽचाऽरल काऽऽऽ? न्हाय ना? मग? ह्यो इचार कुनी करायचा? न्हाय सांगा मला कुनी करायचा? ऑ ? आपल्या पैकीच कुनी तरी , व्हय न्हव? व्हय का न्हाय? तर म्या त्यो इच्चार केला. म्हनुन त्ये मुटे पंतांच्या ओव्या मध्ये टाळ , चिपळ्या वाजवुन झाल, आन पाषान भेदांच्या पवाड्यावर मान हलवुन झाली, की थेट हित्त युन , हात वल्ल करुन जायाच. अगदी शाकारी लोकांसाठन बी मीन त्योच मसाला वापरुन सोयाबीन्च्या वड्या आन बटाट घालुन्श्यान सांबारऽ बनीवलय. त्येवड खायाच आन मग काय सीमा लढा , त्ये कुठ कोकणी , कुठ कविता, मोडी आस काय बाय करत फिरा वाट्टल त्येव्हढ! काय खर हाय न्हव्ह? न्हाय कुटलबी काम कराया पयला पोटाला आदार पायजे , व्हय कनी? काय खोट बोलतुया काय म्या?
काय? काय म्हनतासा? दळुन कदी आनलस? कसल दळन? वड्याच? न्हाय ओ!
अश्या टाइमाला कुटल मिळायला दळुन आन फिळुन! त्यो गिरनीवाला बी लय बादशा****चा हाय. कदी येळला काय मिळल तर शप्पत्त ! तर माग बी येकदा असच झाल्त, तवापास्न म्या ठरविल, काय न्हाय तर वड्या साटन तरी माझ दळना वाचुन अडु द्याच न्हाय. मग कस करायच? तर काय न्हाय ! मला सांगा घरात पिठ असत्यात का न्हाय? म्हणजे तान्दळाच , गव्हाच आन जुंदळ्याच. ही सगळी पिठ एक एक वाटका घेयाची. आता वाटक्यान घ्या न्हाय तर, आज म्या कस भुगुन्यान घ्येतल तस घ्या, पर एका मापी ही तीन पिठ हायती कनी ती घ्या ! झाल ?आता त्याच वाटक्यान न्हाय तर भुगुन्यान अर्ध माप उडद घ्या. त्या उडद डाळीत वाटकाभर आसल, तर येक डाव भरुन धन, त्येवढाच डाव भरुन जीर आन मग अर्धा डाव भरुन म्येथीच दान घाला, आन काय जात असल तर जात्यावर न्हाय तर मिक्सर असल तर मिक्सरवर चांगल गुऽर गुऽर फिरवुन घ्या. चांगल बारिक करुनश्यान घ्या.आता ह्ये सगळ सामान येकत्र करुन त्यात आपली हाळद आन चवीप्येक्षा जरा कमीच मीठ घाला. चांगल येक जीव करुन घ्या आन पानी घालुन ब्येतशीर मळा. कळ्ळल हितवर? आता खरी गमजा तर पुढच हाय! आता तुमच्या कड चुल बील आसल तर त्यातला येक निक्कारा घ्या. आन नसल तर येक कोळसा ग्यासावर ठिवुन चांगला लालभडक करुन घ्या. तवर हिकड त्ये पिठ मळलय़ त्यात येक खड्डा करुन घ्या. चांगला मुठभर खोलीचा आन लांबी रुंदीचा असुद्या काय?

त्या खड्ड्याला पुर झाकल आस झाकन बी तयार ठिवा. आता त्या खड्ड्यात येक डाव भर त्येल घाला आन त्यो चांगला फुललेला निक्कारा त्या त्येलात घालुन वरन लगोलग झाकनी घाला. लय धुर उटल. पर ह्यो धुरच तर धुरकाट वास देतुया आपल्या वड्यास्नी.
From Drop Box

तर आता ह्ये झाल? आता आपण कोंबडी कड वळु.
आता कुणाला काय म्हंटल्यावर काय आटवल काय सांगता येयाच न्हाय. खर का न्हाय? तर कोंबडी म्हंटल की मला बघा योक परसंग खायम आटवतु. न्हाय त्येच काय झाल म्या आन आमच धनी येकडाव आमच्या तिठ्ठ्याच्या गावात गाडी लावुन कशा साठन तरी हुबा हुताव. तर तिठ्ठ्याच गाव म्हंजे जरा काय बाय शेरी आव आनत्यात ही लोक. तर आता सांगा घरपती कोंबड्याची खुराडी आन म्हशीच गोठ असलेल्या खेडगावातनी कोन कधी " चिक्कन मार्ट" काढल का? काढणारा गाढावच म्हंटला पायजेल का न्हाय? तर आमी अस हुबा होतो तीत्थ समोरच जाळीच्या डालग्यात येकुलती येक कोंबडी घालुन ह्यो भाद्दर हुबा हुता. तवर तीकडन येक असच गिराइक बी आल त्याच्या कड . मग चौकशी बिवकशी हुन ह्यो भाद्दर कोंबडी काढायला म्हुन डालग उघडायला ग्येल्या पेटाला, कोंबडीन मारला सुऽर! आन पडली भायेर, आता गावाकडची कोंबडी ती, ती काय तुमच्या शेरातल्या कोंबडी वानी गप बसणार हाय व्हय वाट बगत? की बाबा अश्यान असा ये आन मला कापुन खा? ती भाद्दरीन बी लागली प- प- पळायला. मग ह्यो दुक्कानदार म्हंत्याला आन त्ये गिराइक म्हंत्याल अशी दोघ बी लागली तीला तनवायला! कोम्बडी गावत्या व्हय? सक्काळधरन ती बी कावली असल गप डालग्यात बसुन बसुन, ती लागली की वो पळायला.
आता मी आसन तवा पोरांच्या वारगीचीच. नुकतच बाशिंग बांधल्याल आमी दोघांनी बी. तर त्या वयात तुमाला आगदी कश्याच्च बी हसु येत का न्हाय? येत किनी? तस मला बी त्ये गिऱ्हाइक आन दुक्कानदार दोघ मिळुन कोंबडी तनवताना बगुन लय हसु याला लागल. म्या हसतोय खुदु खुदु आन मला हसताना बगुन आमच धनी बी हसत्यात. तर त्ये बगुन ह्ये दोनी भाद्दर जरा वरमल, आन मग त्यो दुक्कानदार म्हंत्याला कसा म्हंतो गिराइकाला," आता बगा ती थेट घरला जाइल. तीच्या डालायच्या जागला. मग म्या जातो आन तीला परत घिवुन येतो. तवर तुमी थाम्बा हीतच दुकानावर. कोन आल तर सांगा बापश्या हीतच ग्येलय म्हुन काय?"

आता असला परसंग आटवुन कुनाला बी हसु फुटल का न्हाय सांगा बगु मला?

तर आता कोम्बडी! काय न्हाय . आमच्या कोलापुरात कोंबडी म्हना मटान म्हना ह्यात काय जास्त काय घालत न्हाइती. हा! ज्याचा रस्सा करायचा त्ये मात्र मायंदाळी पायजे. मग बाकिचा मसाला उली उलीसा घातला तरी बी चालतय.
तर कोंबडी घ्या . आता मसाला. हं ! थोड त्ये आपल लवंग घ्या एक आट-धा, दालचीनी अर्ध्या बोटाच्या मापाची, त्ये काळ येलदोडयेक तीन-चार, आन आपल साद जीर. ह्यो सगळा मसाला. आता वाळ्ळ खोबर जरा येक आर्धी वाटी खिसुन घ्या आन भाजुन बी घ्या खरपुस रंगावर, आता ह्यो सगळा मसाला येकत्र करुन चांगला पाटा वरवंटा घिवुन घसा घसा वाटा. काय न्हाय म्हंता? हात्तीच्या मग घाला मिकसरवर, आन घ्या बारिक करुन . आता ह्ये बाजुला ठिवायच आन कोंबडी कड वळायच. तीला तवर तुमच धनी कापुन,धुन, तुकड करुन आनुन द्येतीलच की. तर त्या कोंबडीला वाइच आल लसुन आन कोतींबीर आन बडीशेपु ह्ये सगळ बैजवार वाटुन घाटुन लावुन घेने. जमल तर कच्चा कांदा आन कच्चा टोमेटो बी लावुन टाका हातासरशी. त्यातच हळ्द आन मीट बी घालुन घ्या. आता ह्या सगळ्यात त्ये कोंबडीच तुकड घालुन चुलीवर गरम पातेल्यात गरम त्येलावर फोडनी टाकने. दर पाच मिंटाला हलवुन घ्या . अस येक पाच पंचवीस मिंट झाली की आता त्यो वाटुन ठिवलेला मसाला हाय कीनी? त्यो बी घाला त्या कोम्बडीवर, आन लागल तस हळु हळु गरम पानी वाडवा.
आता म्या तुमाला आमच कोलापुरी जेवान आस फक्कड कस दिसत त्ये सांगत्ये. काय करायच तिखटाची बुक्की असत्या की न्हायी? ती आपल्या आपल्या अंदाजान घ्याची आन दुसऱ्या येका जरा ल्हानश्या भुगुन्यात येक डाव भर त्याल गरम करायच आन त्यात ह्यी तिखटाची बुक्की घालुन भुगुन लगोलग खाली उतरायच. आसा खाट सुटतो म्हंता. तर ह्ये आस त्येलावर परतल्येल तिखाट घातल की आमच्या कोलापुरी रश्श्याला तवंग येतुया बगा. तर ह्ये भाजलेल तिकाट घालुन रश्श्याला आनी येक चांगली उकळी येवु द्या आन सरते शेवटी रस्सा खाली उतरुन त्यात येका नारळाच दाट्शीर दुध घाला.
From Drop Box
बर रस्सा झाला?आता भायेर पालपट्ट्या हातरुन घ्या. काम्दा लिम्बु लावुन घ्या. पान्याच तांब बिंब ठ्येवुन घ्या आन ह्याच येळेला चुलीवर त्येलाची कढई चढवा. त्ये वड्याच पिठ त्यातला कोळसा काढुन्श्यान परत येकदा चांगल मळुन घ्या, आन येका पलॅस्टीकावर जरा जरा पानी लावुन योक योक लिम्बा येव्हढा गोळा घिवुन गोल थापा आन मधी येक छिद्र करा . त्याल गरम झाल आसलच त्यात घाला आन चांगल तळा. झाल.
From Drop Box तर आता ह्ये सगळ जेवान तयार हाय, तुमी नुसत याच, आन पंगतीत बसुन खावुन मग परत कुट काय सुद लेखन बिखन शिकायला जायाच आसल तिकड जायाच.पर याच बर का? तसा आमचा आग्रेवच हाय. न्हाय म्हनायच न्हाय! काय?

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

1 Mar 2011 - 10:57 pm | श्रावण मोडक

अगं ए... आवर.
तुझं नाव पाहून शीर्षक न वाचता धागा उघडला तर बोंब... मला वाटलं, कालच्यावानी काही असेल. तर हितं येगळंच. त्यात ते फटूंची लिंक अख्ख्या मजकुराला.
च्यायला, एक तर कोल्हापुरास्नं लांब आहे. त्यात हे असलं लिही. तू भेटच. नाही पाठीत धपाटे घातले तर पहा. :)

स्पंदना's picture

2 Mar 2011 - 7:22 am | स्पंदना

आर धपाट घाल खर, तुझा हाक्कच हाय त्यो, पर पयला ऐकुन तर घे सळ्ळ!
आर या भागाच सगळच्या सगळ 'न्याट ' गुतपाळलय आस त्यो येजंट सांगत हुता. आर काल पासन किती बी नेट लावला तरी त्या न्याटावर काय चडना बी आन उतरना बी. आता ह्यात्न बी म्या हीत पत्तुर आलो. आलो कीनी? त्ये म्हत्वाच का न्हाय सांग बगु? न्हाय सांगच मला!

श्रावण मोडक's picture

2 Mar 2011 - 2:51 pm | श्रावण मोडक

तुझ्या या भाषासामर्थ्याला दंडवत.
धपाटे घालण्याचा निर्धार मागे. शिकवणी लावायची आहे. जुन्या बेळगावी आणि कोल्लापुरी भाषेच्या आठवणी ताज्या करण्यासाठी. तिच शिक्षा या उत्तम पाकृद्वारे मला चिडवल्याबद्दल. :)

पैसा's picture

1 Mar 2011 - 11:12 pm | पैसा

लोकांना आवतण देताय की भूकबळी करताय? फोटु पन लै झ्याक बगा!

पिवळा डांबिस's picture

1 Mar 2011 - 11:12 pm | पिवळा डांबिस

हाण तिच्या मा**!! ह्येला म्हंतात रेशिपी!!!
शेमलं आभाळात उडीवलंत की वो!!
आंबाबाई भलं करो पघा तुमचं!!!!
:)

आता या रविवारच्याला घरामंदे कोंबडं-वडंच!
आजच कारभारणीला सांगून ठिवतो!!
या जिवायला रविवारच्याला!!!
:)

ऐतवारी? बर . कुट याच? पिवळ्या गल्लीत डांबीसांच्या कड का डांबीस गल्लीत पिवळ्यां कड?

प्राजु's picture

1 Mar 2011 - 11:50 pm | प्राजु

काय गो बाय ह्ये!! रेशिपी का काय म्हनाचं??
लय झक्कास दिसतंय बघ.
:)

सुहास..'s picture

2 Mar 2011 - 1:20 am | सुहास..

आस्सल पुणेरीत वारलो !!

मायंदाळ चवदार असणार !!

मी मनातून मांसाहारी झाले आहे अशी शंका घ्यायला वाव आहे.;)
फोटू मस्त!

टारझन's picture

2 Mar 2011 - 11:50 am | टारझन

प्रत्येक जण मनातुन "णॉणव्हेज" असतो , असा माझा पुर्वीपासुन दावा आहे .. वर वर सगळेच आपण "व्हेज" आहोत असे दाखवतात :)

- (णॉणव्हेज जोक प्रेमी) टारु श्रीवास्तव

स्पंदना's picture

2 Mar 2011 - 7:26 am | स्पंदना

प्राजु, सुहास, रेवती अन 'पैसा' धन्यवाद! आमच्या भागच नेट खरच गंडलय त्यामुळे इव्हन हा प्रतिसाद मी तीन चार दा लिहिला आहे. तसेच वरील ही.

नगरीनिरंजन's picture

2 Mar 2011 - 7:35 am | नगरीनिरंजन

ओ बाई, आवरा सोत्ताला. येकतर सोत्ता करून खाता आन नंतर फटू दाखवू दाखवू जळवता. शोभतं का तुमाला हे? :-)

सहज's picture

2 Mar 2011 - 8:21 am | सहज

.

_/\_

प्रीत-मोहर's picture

2 Mar 2011 - 9:25 am | प्रीत-मोहर

रेवती मावशीशी सहमत ...__/\__

प्यारे१'s picture

2 Mar 2011 - 9:32 am | प्यारे१

अग्गागागागागा....

तायडे, पाक येड पळिवलंस की समद्याचं.

ए दोन शीट कोल्लापुर हाय का कोल्लापुर.

निगाली निगाली ह्ये गाडी.....

जरा घ्या दाबून वाईच.(म्हन्जे सरकून. उगा चुकीचा गैरसमज नको. काय???)

अजून ३ शीटा बस्त्याल पावनं.

च्यामारी धरुन फटाक्क. घ्या वाडून. आलोच. तवर रस्सा द्ये लोकास्नी.

मुलूखावेगळी's picture

2 Mar 2011 - 10:06 am | मुलूखावेगळी

काय लिवलंय काय लिवलंय
अपर्णाबाई महान _ /\ _
१०० नम्बरी आहे रेसिपी
अजुन खाल्ली नाहिये कधी पण आता नक्की करुन बघणार

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Mar 2011 - 10:36 am | llपुण्याचे पेशवेll

छान. :)

इन्द्र्राज पवार's picture

2 Mar 2011 - 11:01 am | इन्द्र्राज पवार

अपर्णे....आगं आपल्या कोल्लापुरात माह्या मायंदाळ झाल्याती....त्याची आवताणं खिशात घालून्श्यान आमी फिरतोय न्हवं आजकाल...परवा तुझ्या गावाजवळच्या हिटणी...गडहिंग्लज तालुक्यातील जाली. लई भारी....तेवढ्यात कागलातून फटफटीवरून तिघं द्वाड आली, त्यातला येक हुता हामीदवाडीचा....त्या लेकालाही म्हाईती न्हाई तिथं समाधी कुनाची हाय ती....पण गडी खारे शेंगदाणे खाऊन टर्र झाल्यानं मी पन त्याला जादा ढुसला नाहीच.

तुझ्या कोंबडीवड्याकडं बघतच हिंडत्योय असं म्हटलंस तरी चाललं ! लई मज्जा आणलीस तू... कोल्हापूरी रस्सा...नाद खुळा !

इन्द्रा

मस्त कलंदर's picture

2 Mar 2011 - 8:17 pm | मस्त कलंदर

आता कोल्लापुरकरास्नी बी कोल्लापुरी यीssना का काय?
आजकाल,तेवढ्यात, कागलातून,त्या लेकालाही ,पण,झाल्यानं असलं कोल्लापुरी भासंत नसल्यालं का म्हून लिवावं वो? तवर/तवरका, कागलातनं, त्येलाबी/ त्या लेकालाबी, पर/पन असलं कैतरी सादं सोपं लिवायचं सोडूsssन उगंs आपलं बुक लिवल्यावाणी सुद लिव्हलंय त्ये.

@अपर्णा: मी शाकाहारी असल्याने पाकृला फक्त चान चान म्हणू शकते. :-) बाकी मराठी दिनाच्या वेळेस असं काहीतरी वेगळं करण्याची आणि लिहिण्याची तुझी कल्पना आवडली गं..

इन्द्र्राज पवार's picture

2 Mar 2011 - 10:20 pm | इन्द्र्राज पवार

आवो गुळमाट (तुमच्या पुण्याच्या-ठाण्याच्या भाषेत ज्याला शाकाहारी म्हणतात...) खाणार्‍या मकीबाई, वाईच माझी गाडी घसरली कोल्हापूरीच्या पट्ट्यावरून....तेवढं मनावर घेऊ नका. माझ्या मनी लई असतं तसलं लिवायचं पण झालंय असं की, माझ्या बोटास्नी सुदलेखनाचं असं काय वंगाळ वळण बसलंय, ते हटाला तय्यारच न्हाय.

ती बावना की भावना तेवढीच घ्या त्या मोडक्यातोडक्या मजकुरातंन ! सुदारतो मी.

इन्द्रा

वपाडाव's picture

3 Mar 2011 - 5:52 pm | वपाडाव

@अपर्णा: मी शाकाहारी असल्याने पाकृला फक्त चान चान म्हणू शकते. बाकी मराठी दिनाच्या वेळेस असं काहीतरी वेगळं करण्याची आणि लिहिण्याची तुझी कल्पना आवडली गं..

+१
पहिला व्हेज प्रतिसाद पाहुन बरं वाटलं.
प्रसन्न यकदम. आमीबी खंप्लिट येजिटेर्यन मानुस.
(कोंबडी पळ्वुन लावणारा)
-वपाडाव

स्पंदना's picture

4 Mar 2011 - 10:05 am | स्पंदना

आर ये वप्पाडाव! आर वरतीच लिव्हलय नव्ह म्या ' शाकारी माणासांसाठन सोयाबीन्च्या वडया आन बट्टाट्यात ह्योच मसाला घालुन सांबाराऽ केलया म्हनुन' वाचल न्हाय का? आँ! हितन कुनी बी उपाशी तापाशी जावु नगासा रं!

पर्नल नेने मराठे's picture

2 Mar 2011 - 1:17 pm | पर्नल नेने मराठे

शिवरात्रीच्या दिवशी सुरेख मेनु ;)

चिंतामणी's picture

2 Mar 2011 - 2:07 pm | चिंतामणी

कुठे फेडणार ही पापे??

बाकी फोटोबघूनच मेलो. ठार मेलो.

कोल्हापुरात येणे होते वरचे वर. पुढच्यावेळी वेळ काढुन येतो आणि आधी संपर्क साधतो.

नगरीनिरंजन's picture

4 Mar 2011 - 10:16 am | नगरीनिरंजन

ओ चिंतामणी भौ, अपर्णातैंकडचे कोंबडीवडे खायाला कोल्हापुरला जायाचं म्हन्ता? कात्रज घाटातून जावं लाग्तं तिकडं जाय्ला हे ध्यानात ठिवा.

चिंतामणी's picture

4 Mar 2011 - 10:46 pm | चिंतामणी

भौ,

तुला बी संग घेउन जाइन. ;;)

(खरे तर सिंहगड रस्त्यावरून नवीन बोगद्यातुन जाणे फारच सोपे आहे. पण तुला नक्की घेउन जाणार. तेवढ्यासाठी वाट वाकडी करीन.) ;)

इंटरनेटस्नेही's picture

2 Mar 2011 - 7:42 pm | इंटरनेटस्नेही

अर्पणा ताई जबरदस्त! आमचा प्रणाम स्वीकारावा!

सखी's picture

2 Mar 2011 - 7:58 pm | सखी

क ड क. तुझ्या भाषासामर्थ्याला दंडवत!!

गणेशा's picture

2 Mar 2011 - 8:09 pm | गणेशा

अप्रतिम

धमाल मुलगा's picture

2 Mar 2011 - 9:00 pm | धमाल मुलगा

झक्क मारलो न धागा वाचायला घ्येटलो! गप शिवाजीपुतळ्याच्या हितं लोणीडोसा खायला ग्येलो अस्तो तर बरं झालं असतं!

फोटु बघून तर डायरेक खटक्यावर बोट..आमचा लाकूडबाबाच झाला न्हवं का.

काय लिव्हलंय, क्काय लिव्हलंय, मायला....

आता ज्येवाय कधी बलावती त्येवडं सांग :)

की थेट हित्त युन , हात वल्ल करुन जायाच. अगदी शाकारी लोकांसाठन बी मीन त्योच मसाला वापरुन सोयाबीन्च्या वड्या आन बटाट घालुन्श्यान सांबारऽ बनीवलय. त्येवड खायाच आन मग काय सीमा लढा , त्ये कुठ कोकणी , कुठ कविता, मोडी आस काय बाय करत फिरा वाट्टल त्येव्हढ! काय खर हाय न्हव्ह? न्हाय कुटलबी काम कराया पयला पोटाला आदार पायजे , व्हय कनी? काय खोट बोलतुया काय म्या?

बास बास बास!! आक्षी कोल्लापूरात पोचलो. हक्काचा आग्रव, आन "बसा ओ...आला पाव्हणा जेवल्याबिगर जातो व्हय? लाज काडाय लागलासा व्हय आमची?" असा पक्का कोल्लापूरी पाहुणचार आठिवला.

आळश्यांचा राजा's picture

2 Mar 2011 - 9:48 pm | आळश्यांचा राजा

मंगळवार पेठेतल्या सणगर आळीत गेल्याचा भास झाला!

ही बोली अमर रहे!

बापरे भन्नाट भाशा आणि तितकिच भन्नाट रेसिपी

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

6 Mar 2011 - 2:27 am | निनाद मुक्काम प...

मुंबईत कोकणी किंवा आगरी भाषा माहित होती .कोल्हापुरी भाषेचे सुंदर दर्शन घडवले .
बाकी आणि काय विशेष लिहू. ही अशी काही पाक कृती पहिली कि वाटते .

''जिंदगीमे कूच पानें के लिये कूच खोना पडता है''( हा शिनेमाचा डायालोग आयुष्याचे ब्रीद वाक्य बनले )
''आता वाटते कितना पाया और कितना खोया ''.
आणि एक गाणे
मुझको दिलसे येही शिकायत हे
जो नही दिलको मिल सकता दिलको उसीकी चाहत हे

आभसी जगतात का होईना आपले जेवण म्हणजे( महाराष्ट्रीयन) पहिले की मन तृप्त होते .

नगरीनिरंजन's picture

6 Mar 2011 - 10:29 am | नगरीनिरंजन

>>''जिंदगीमे कूच पानें के लिये कूच खोना पडता है''
अश्लील भाषा वापरून चुकीच्या माहितीचा प्रसार करणार्‍या या प्रतिसादाचा सौम्य निषेध.

शानबा५१२'s picture

6 Mar 2011 - 1:29 pm | शानबा५१२

खुप दीवसांनी प्रतिक्रीया द्यावशी वाटली तो हा लेख वाचला म्हणुनच.

लेख खुप खुप energetic आहे,full of energy!

नक्कीच वडे वगैरे खाउन नंतर लिहला असेल.
:-)

अरुण मनोहर's picture

12 Mar 2011 - 12:28 pm | अरुण मनोहर

खूप दिवसांनी प्रतिक्रीया दिली, कारण इतके दिवस उपास होता. आता उपास संपल्यावर लेख वाचला आणि हळहळ वाटली. उपासातच वाचला असता तर कोंबडी वाचली नसती.

बाकी अपर्णाची कोल्हापुरी म्हणजे एका झटक्यात माणसाला गार करणारी. स्स! हाय! करता करता बोलती बंद!

sneharani's picture

12 Mar 2011 - 7:41 pm | sneharani

नादखुळा भाषेतलं आवतन आवडलं!

मुक्त विहारि's picture

31 Dec 2013 - 2:11 pm | मुक्त विहारि

झक्कास...

अब आयेगा मजा़ ये थर्टी फर्स्टका....