नगरी मोरूचा जामदि

नगरीनिरंजन's picture
नगरीनिरंजन in विशेष
28 Feb 2011 - 9:53 pm
मराठी दिन

कडक थंडीचे दिवस संपून वसंताच्या आगमनापूर्वीच्या उरल्यासुरल्या गुलाबी थंडीच्या गुदगुल्या सहन करीत कोवळ्या उन्हाची चादर घेऊन मोरू माळवदावर तोंड उघडे टाकून साखर झोपेत उताणा पडला होता. छाया टॉकीजला पाहिलेला रात्री अकराचा आंजेलिना जोलीचा पिक्चर, फेसबुकावरची मैत्रिणींशी केलेली गुटरर्रगू आणि कालेजच्या पोरांबरोबर कँटीनला बसून केलेल्या टवाळक्या यांचा त्याच्या डोक्यात छान गुलकंद तयार होत असताना त्यात माशी पडावी तसा त्याच्या बापाचा आवाज त्याच्या कानावर पडला,
"मोरुऽऽ, अऽऽय मोर्‍या, अय ऊठेऽऽ"
त्या आवाजाच्या कात्रीने टराटरा फाटणारी झोपेची चादर बळंबळं धरून ठेवायचा प्रयत्न करत मोरू चुळबुळला आणि उताण्याचा पालथा होऊन वर वर चाललेल्या सूर्यनारायणाकडे टिर्‍या करून उशीखाली डोकं घालून पडला.
"तुझ्यायला", बापानं आपला हट्ट सोडला नाही, "चहा टाकायला सांगून आलोय मी. ऊठ लवकर."
मोरू ढिम्म.
"अय ऊठे भोऽऽ," बाप काकुळतीला आला,"आज जाग्तिक मराठी दिने अन तू काय असा झोपून र्‍हायलाय? कसं नामी ऊठावं, गाडी धुवावी, हार घालावा, पुस्तकांची पुजा करावी."
"ओऽऽ पप्पा," मोरू तडकला,"तो काय दसराय काय गाडी धुवायलान हार घालायला? काय तरी तुम्चं आप्लं. अन हे काय नवीन खूळ काढ्लंय जाग्तिक मराठी दिनाचं? इथं नकाका काळं कुत्रंपण मराठी बोलंना तरी म्हणे जाग्तिक मराठी दिन. जाग्तिक मराठी दिन नाय जाग्तिक मराठी दीन म्हणा"
मोरू चांगलाच हुशारला. सकाळी उठल्या उठल्या अशी कोटी सुचली म्हणजे आज नक्कीच कायतरी विशेष आहे असे त्याला वाटून गेले. बापाने मात्र त्याच्या कुजकट कोटीकडे साफ दुर्लक्ष केले.
"काळं कुत्रं कशाला? मस धा-बारा कोटीच्या वर माणसं बोलतात ना मराठी. अन मला सांग तू काय आत्ता हिब्रू बोलून र्‍हायला काय रे?"
"घरात बोल्तो होऽऽ, पण बाहेर? बाहेर जाऊन बघा. कोणी मराठी बोलत नाय. सगळे इंग्लिशच्या मागं. पुण्या-मुंबईच्या कॉलेजात तर मराठी बोल्लं तर पोरं हस्तात."
"हा. काय तुम्चं ते इंग्लिश रे? भ*व्यांना एक वाक्य पूर्ण बोल्ता येत नाय. आं ऊं करत नाय तर आय मिन यू नो च्या फुगड्या खेळत जमंल तसं बोल्तात. मधीच आठवलं नाय की हिंदीचे पाय धरायचे अन ते पण नाय जमलं की मग मायच्या भाषेच्या तोंडाकडं बघायचं. हड तिच्यायला. आता परवाची गोष्ट. मुंबयला जायला म्हणून पुणेस्टेशनवर शिवनेरीच्या रांगेत उभा होतो. तिथं एक बया आपल्या पोट्ट्याला म्हन्ती 'यू वेट, आयल जस्ट लगावफाय अ चक्कर'. च्यायला अशा लोकान्ला चक्कर येईस्तवर लगावफाय केलं पाह्यजे मंग कळंल कसं बोलायचं ते."
"मंग? बरोबरे. इंग्लिश नव्या जगाची भाषाए. लोकान्ला येत नसली तरी पण बोलायला बघतात. इंग्लिशमधीच ज्ञान आहे. इंग्लिश नसंल येत तर नोकरीपण मिळत नाय आणि बिझ्नेसपण चालत नाय."
"जिथं आप्ला फायदाए तिथं बोलाना. कोण नको म्हण्तो? पण इतर ठिकाणी कशाला? आता परवाची गोष्ट. आमी सिंगापूरला गेल्तो ना तिथं त्या सेंटोसाला गेल्तो. तिथं तुझ्यायला लागली भूक म्हणून गेलो तिथल्या दुकानात तर इंडियन बर्गर म्हणून चक्क वडापाव विकत होते बोल. बघ म्हण्जे आपल्याकडून पैशे काढायला वडापाव विकायला तयार आहेत ते लोकं. मंग मी पण दिलं ठणकावून मराठीत. म्हण्लं की भो हे इंडियन बर्गर नाय, वडापाव म्हण्तात याला. दे म्हण्लं दोन वडापाव. आता प्रत्येक जण जाऊन त्याला वडापाव म्हणून मागायला लागला तर तो पण त्याला झकत वडापाव म्हणल का नाय? तसंच सगळीकडं आपण मराठी बोल्लो तर ज्यान्ला गरज आहे ते लोकंतरी झकत मराठी बोलणार का नाय?"
मोरूने दोन मिनिटं विचार करून पटल्यासारखी मान हलवली.
"तुम्ही म्हण्ता ते बरोबरे पप्पा. पण आता मराठी पण किती प्रकारची आहे. कोणी नगरी बोल्तो, कोणी आगरी बोल्तो. कोणी वर्‍हाडी बोल्तो तं कोणी अहिराणी बोल्तो. कोणी कोल्हापूरी बोल्तो तं कोणी नागपुरी बोल्तो. कोण्ती भाषा शुद्ध ते कसं कळ्णार?"
"मोर्‍या, नुस्त्या उच्चारांनी भाषा अशुद्ध होत नस्ते भोऽऽ. च्यायला त्या इंग्रजीच्या अ‍ॅक्सेंटांचं लई कौतुकं कर्तात लोकं. सदर्न काय अन पॉश काय अन कॉकनीज का फॉकनीज काय. मंग मराठी भाषेच्या अँक्सेंटांचा काय त्रास आहे रे? आता परवाचीच गोष्ट. बेबीमावशीच्या पुष्पीच्या लग्नाला गेल्तो पाथर्डीला. तिथं पाव्हणे सगळे खेड्यापाड्याचे. तुझा नानामामा पण आल्ता पुण्यावरून. पाव्हण्यातला एक जण बोल्ता बोल्ता म्हण्ला की कायतरी लई वंगाळ आहे. तुझा नानामामा लगी शिकवतो त्याला. 'अहो, वंगाळ नाही ओंगळ म्हणावे'. पाव्हणा म्हण्ला बरं. नंतर जेवायला बसल्यावर पाव्हण्याला पाह्यजे होतं वरण तर नानामामाला विचारतो कसा? 'अहो, ओरण नाही आले अजून?'. आता मला सांग त्याचं काय चुकलं? हे शुद्ध भाषेचं ताबूत नाचवणार्‍यांना नाचू द्यायचं तिकडं परिसंवादात नाय तर संमेलनात आणि कोण जाणे आणखी कुठं. आपण आप्लं रोजच्यासारखं बोलायचं."
"बरं पप्पा. बोल्तो.", मोरू खोडकरपणे म्हणाला, " पण मला कधीकधी प्रश्न पडतो की कशाला यवढं भाषेचं महत्त्व? काय फरक पडतो भाषा कोण्ती बोल्तो त्यानी? कशाला मराठीच बोलायच?"
"फरक पडतो रे बाळा, फरक पडतो," बाप म्हणाला, "सैंपाकाला बाई असली तरी तुझ्यायच्या हातच्या पोळ्या खाताना बरं वाटतं का नाय? कितीही भारी मिठाई खाल्ली तरी आज्जीच्या हातानी खडीसाखर खाल्ल्यावर भरतो तसा गळा भरतो का? भले डिस्कोत जाऊन नाचत असशील पण ढोलाचा दणदणाट ऐकल्यावर चढती तशी झिंग चढती का? आरे, आयच्या दुधातून पिलेली भाषा आहे ही. ही बोल्ला नाही तर मनचं बोल्ता तरी यील का तुला?"
मग मोरू आणि त्याचा बाप दोन मिनिटं शांत बसून राहिले. तेवढ्यात मोरूच्या आईची चहा तयार असल्याची ललकारी खालून ऐकू आली.
"चल भो. नायतर मायच्या भाषेचा पट्टा सुरु झाला ना मंग दिवसभर कडकलक्ष्मीसारखं नाचावं लागंल आप्ल्याला.", बाप हसून म्हणाला आणि मोरू मग झटकन उठलाच.

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

28 Feb 2011 - 10:25 pm | ब्रिटिश टिंग्या

लै भारी! मजा आली वाचुन! :)

टारझन's picture

1 Mar 2011 - 1:29 pm | टारझन

मस्त आहे :)

पैसा's picture

28 Feb 2011 - 10:29 pm | पैसा

तुमचा नगरी मोरू आणि मोरूचे पप्पा आपल्याला खूप खूप आव्डले! सगळे किस्से वाचून हसून हसून पुरेवाट झाली.
(घरात फक्त माय बोलती, म्हणून तिच्या भाषेला मायभाषा म्हणत्यात नव्हं का?)

पुष्करिणी's picture

1 Mar 2011 - 1:09 am | पुष्करिणी

असंच म्हणते, मस्त लेख..मजा आली

प्रीत-मोहर's picture

1 Mar 2011 - 9:02 am | प्रीत-मोहर

हेच बोल्ते

सोनल कर्णिक वायकुळ's picture

28 Feb 2011 - 10:29 pm | सोनल कर्णिक वायकुळ

झणझणीत...

५० फक्त's picture

28 Feb 2011 - 11:28 pm | ५० फक्त

लई भारी, अजुनही मोरुचा बाप त्याला उठवतो आणि तो उठतो यावरुन या सुखि कुटुंबाची कल्पना आली.

अरुण मनोहर's picture

1 Mar 2011 - 3:03 am | अरुण मनोहर

लय भारी!

>>आरे, आयच्या दुधातून पिलेली भाषा आहे ही. ही बोल्ला नाही तर मनचं बोल्ता तरी यील का तुला?"
<<

मेघवेडा's picture

1 Mar 2011 - 3:14 am | मेघवेडा

लै भारी रे! मजा आली! :)

अय भो, आमच्या नगरी लोकान्ला इंग्लिशचे धडे शिकवायचं काम नाही सांगुन ठेवतो. साला नगरमध्ये बापजन्मात इंग्लिश कळली नाही आपल्याला. (अन मग नगर सुटलं)

बाकी ते नगरमध्ये लोक फेसबुक वगैरे वापरत असतील असा विश्वासच नाही आपला. चुन्याची पुडी नायतर कोंबडा बिडी घेउन बसले असतील कुठशीक कोपर्‍यावर चकाट्या पिटत.

नगरीनिरंजन's picture

9 Mar 2011 - 9:09 pm | नगरीनिरंजन

>>बाकी ते नगरमध्ये लोक फेसबुक वगैरे वापरत असतील असा विश्वासच नाही
अय भो, हैस कुठं? नगरातली अवली पोरं पण फेसबुकावर आहेत अन "भाडखाव" वगैरेच्या ऐवजी एफवर्ड वगैरे लिवतात. ;-)

बेसनलाडू's picture

1 Mar 2011 - 4:50 am | बेसनलाडू

अप्रतिम लेखन. फार आवडले. विशेषतः
"फरक पडतो रे बाळा, फरक पडतो," बाप म्हणाला, "सैंपाकाला बाई असली तरी तुझ्यायच्या हातच्या पोळ्या खाताना बरं वाटतं का नाय? कितीही भारी मिठाई खाल्ली तरी आज्जीच्या हातानी खडीसाखर खाल्ल्यावर भरतो तसा गळा भरतो का? भले डिस्कोत जाऊन नाचत असशील पण ढोलाचा दणदणाट ऐकल्यावर चढती तशी झिंग चढती का? आरे, आयच्या दुधातून पिलेली भाषा आहे ही. ही बोल्ला नाही तर मनचं बोल्ता तरी यील का तुला?"
(मराठी)बेसनलाडू

मुलूखावेगळी's picture

1 Mar 2011 - 1:36 pm | मुलूखावेगळी

+१

वपाडाव's picture

8 Mar 2011 - 6:44 pm | वपाडाव

हेच नकलुन घेत्लो होतो पन छापाया जागाच भेटाय नाय....

खुसखुशीत, हलकेच चिमटे घेणारा बाप लेकाचा संवाद आवडला. :)

सहज's picture

1 Mar 2011 - 5:26 am | सहज

मोरुचा जामदि मजेशीर!

अवलिया's picture

1 Mar 2011 - 8:21 am | अवलिया

मस्त !!

स्पंदना's picture

1 Mar 2011 - 8:25 am | स्पंदना

हंगशी! असा ठोकायचा बघ धरुन उभा आडवा! अन त्ये कोल्हापुरी सोलापौरी तर लय झ्याक उलगडलस भाउ.
काय दुसर सुचत न्हाय पण सक्काळी सक्कआळी सुर्याला घालायचा त्यो नमस्कार तुला घालीन म्हणते.

शिल्पा ब's picture

1 Mar 2011 - 8:55 am | शिल्पा ब

मपल्याला लय आवाल्डं गड्या!!

लय लय भारी! मज्जा आली वाचताना :)

sneharani's picture

1 Mar 2011 - 10:45 am | sneharani

मस्त मजा आली वाचायला!!
:)

मैत्र's picture

1 Mar 2011 - 1:09 pm | मैत्र

काय भो एकदम फार्मात...
झक्कास नगरी !

धमाल मुलगा's picture

1 Mar 2011 - 7:58 pm | धमाल मुलगा

निर्‍या,
लै भारी रे! :)
आमच्या नगरच्या/राशीनच्या मित्रांची आठवण आली. येकदम झकास.. वाचताना सगळं अगदी तालात म्हणून पाहलं! :D

"फरक पडतो रे बाळा, फरक पडतो," बाप म्हणाला, "सैंपाकाला बाई असली तरी तुझ्यायच्या हातच्या पोळ्या खाताना बरं वाटतं का नाय? कितीही भारी मिठाई खाल्ली तरी आज्जीच्या हातानी खडीसाखर खाल्ल्यावर भरतो तसा गळा भरतो का? भले डिस्कोत जाऊन नाचत असशील पण ढोलाचा दणदणाट ऐकल्यावर चढती तशी झिंग चढती का? आरे, आयच्या दुधातून पिलेली भाषा आहे ही. ही बोल्ला नाही तर मनचं बोल्ता तरी यील का तुला?"

साला, शेवट मात्र कच्चकन डोळ्यातून पाणी काढणारा लिहिलास बे.

नगरीनिरंजन's picture

1 Mar 2011 - 8:33 pm | नगरीनिरंजन

सगळ्या प्रतिसादकर्त्यांचे आणि वाचनमात्रांचे आभार! धम्याचे एकूणच उपक्रमाबद्दल विशष आभार!

गणेशा's picture

1 Mar 2011 - 9:17 pm | गणेशा

लेख आवडला .. आशय भावला ...

बर्‍याच दिवसानी नगरची आठवण आली भाऊ भाषा वाचुन .. मस्त वाटले.

जय महाराष्ट्र

-

प्रास's picture

8 Mar 2011 - 4:39 pm | प्रास

अगदी हेच म्हणतो मी......

मुक्त's picture

9 Mar 2011 - 12:29 pm | मुक्त

हा हा हा झक्कास फटका.
:)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

10 Mar 2011 - 2:55 pm | विश्वनाथ मेहेंदळे

लय भारी. मस्त लिहिले आहे भौ.

राजेश घासकडवी's picture

11 Mar 2011 - 5:17 am | राजेश घासकडवी

छाया टॉकीजला पाहिलेला रात्री अकराचा आंजेलिना जोलीचा पिक्चर, फेसबुकावरची मैत्रिणींशी केलेली गुटरर्रगू आणि कालेजच्या पोरांबरोबर कँटीनला बसून केलेल्या टवाळक्या यांचा त्याच्या डोक्यात छान गुलकंद तयार होत असताना त्यात माशी पडावी तसा त्याच्या बापाचा आवाज त्याच्या कानावर पडला

सुरूवातच भन्नाट आहे. गुलकंद, माशी पडणे, आवाज पडणे हे छान साधलेलं आहे.

गंभीर चर्चेची कडू गोळी विनोदी प्रसंग, मांडणीच्या साखरकोटिंगने गिळायला सोपी जाते (चर्चेतले सगळेच विचार पटले नाही तरी). पुलंनी अनेक लेख अशा स्वरूपात लिहिलेले होते (एकअक्षरकळलतरशपथ...)

सुरूवातीला जी मिष्किल, तऱ्हेवाईक वर्णनशैली ठेवली होती ती शेवटी थोडीशी गळाली असं मात्र वाटलं.