इये ईंदुरीचिये बोली कवतुके

भाग्यश्री कुलकर्णी's picture
भाग्यश्री कुलकर्णी in विशेष
28 Feb 2011 - 3:20 pm
मराठी दिन

"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी"
हे कौशल इनामदार चे गाणे ऐकताना अंगावर क़ाटा येतो राव. 80 वर्षांचे विठ्ठ्ल उमप अन ती आठ वर्षाची चिमुरडी मुग्धा दोघांनाही एका व्यासपिठावर आणुन समा बांधणारा, खरच ग्रेटच आहे.आज 28 तरखेला ह्या गीताला वर्ष पुर्ण झाले हा अजुन एक योगायोग

ह्या मराठी चा "अभिमान" काय वर्णावा! ह्या मराठीच्या अंगाखांध्यावर वाढलेले आम्ही एक दिवस अचानक इंदुरनगरीत जातो काय, अन नगरीच्याच नव्हे तर तिच्या भाषेच्याही प्रेमात पडतो काय, सारेच स्वप्नवत वाटते आहे.
इंदोरचे पहिले दर्शन मला भगभगीत वाटले होते. प्रचंड उन्हाळ्यामुळे सुरवातीला सानिध्यात आलेली माणसेही काहीशी रुक्ष जाणवली.पण एक दिवस आमच्या अहोंच्या ऑफिसात गेल्यावर स्मिताताई म्हणाल्या, अहो तुमच्या बायकोला काही'खिलवा पिलवा" अरे वा! मला त्यांच्या बोलण्यातला रिदम भारीच आवडुन गेला. मग मी तिकडच्या लोकांचे बोलणे जास्तच कान देउन ऐकु लागले.

कोपर्‍यावर "मुड्ले"की मग आमचे घर येते हा नवा शोध मला तिथे लागला. माझी मुलगी तर काय "भिया""तिथ्थल्ली"च होउन गेली.मला "गोदी" घे असे ती हात वर करुन म्हणाली की तिला उच्चुन घ्यावे लागे.(उच्चुन ह्या शब्दावर तीचा लहानपणी copyright होता.) तीच्या मैत्रिणीला"डरावनी"स्वप्न पडत असत. तिथल्या लोक़ांच्या रोजच्या बोलण्यावर हिंदीचा प्रभाव असला तरी ती मावशीच्या भाषेला आपलेसे केलेली भाषा कानाला गोड वाटाय़ला लागली.

नाहीतरी साहित्यसंमेलनात आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना कांबळेंनी सांगीतलेला "भिरभिरे" ह्या शब्दाच्या उगमावरुन त्यांनी बाकीच्या बोली भाषांना प्रमाण भाषेत सामावुन घेण्यावरुन आवाहन केले होतेच ना. मग त्याचप्रमाणे महाराष्ट्राबाहेर राहणार्‍या ह्या25 ट्क्के लोकांनी जपलेल्या भाषेला धेडगुजरी म्हणुन हिणवण्यापेक्षा तीला मुख्य प्रवाहात सामिल करुन घेतल्यास आपल्या मराठीला कितीतरी नवीन शाब्दिक अन भाषिक अलंकारही मिळतील.

तिथले लोक निळ्या रंगाला "फिरौजी"रंग म्हणतात ते त्यांच्या तोंडुन ऐकताना इतकं छान वाततं ना.आपण बैगणी रंग म्हणतो ना तसा "गाजरी" रंग तिथल्या मराठीत खुपच प्रचलीत आहे. भगर ह्या शब्दाला "मोरधन" हा किती सुंदर शब्द आहे तिथे.शौच हा शब्द तिथल्या तिशीच्या वयोगटातल्या लोकांच्या तोंडुन ऐकताना सुरवातीला मला कसेसेच व्हायचे.पण आपण ह्या शब्दाला खरेच "हद्दपार" केल्याचे मला तिथे जाणवले."आलुची अशी झन्नाट भाजी फार बढीया लागते" म्हणणारे इंदोरकर नेहमी मस्त नाही तर"बढीया" असतात. तु करतीये का? तु येतिये का? हे त्यांच्या खास ढबीत ऐकताना थोडा नागपुरी भास होतो. करील्ले जाईल्ले अशा नागपुरी वळणाच्या अन अक्षरास जोडाक्षर बनवणार्‍या इथल्ल्या तिथल्ल्या शब्दांनी हळुहळु माझ्याही तोंडात बस्तान बसवायला सुरवात केली होती. ती भाषा कानाला छानच वाटायला लागली होती. मराठी शब्दांवर हिंदीचा प्रभाव असला तरी मराठी घरात मात्र आई आजी आत्या हे शब्द ऐकु येत होते. आताची नवीन पिढी दोन तीन वाक्यानंतर कधी हिंदीची "पटरी' पकडते हे कळत नसले तरी तिथल्या आज्ज्यांची मराठी अन रोज संध्याकाळी रामाच्या देवळात भरणारी संस्कारशाळा आपल्या महाराष्ट्रातही नाही ऐकायला येत.

तुळशीच्या लग्नाची खरी मजा मी इंदोरला अनुभवली. दिड ते दोन फुटी कृष्णाच्या मुर्तीची बग्गीतुन काढ्लेली मिरवणुक, कॉलनीतल्या चौकात मस्त लफ्फेदार शालु नेसुन उभी असलेली तुळशीबाई.आख्खी कॉलनी लग्नाला लोटलेली. लग्नानंतर बुंदी अन चिवडालाडु वाटप.अगदी खर्‍या लग्नासारखा थाटमाठ. गुढी,संक्रांत, त्यातली वाणं,चैत्रातले हळदीकुंकु,मंगळागौर अगदी यथासांग करायच्या तिथल्या बायका.बाळाच्या बोरन्हाण्याला "बोरलुट" असा छान शब्द कळला मला तिथे.
पंढरीच्या वारी सारखीच तिथल्या राजवाड्याहुन पंढरीनाथ मंदिरापर्यंत दरवर्षी निघणारी दिंडी मला महाराष्ट्रातच असल्याचा अनुभव द्यायची.सानंद न्यास,मराठी समाज ह्यासारख्या कितीतरी संस्था महाराष्ट्राच्या बाहेर राहुन मराठी जपण्याचे कार्य करत आहेत ते खरेच वाखाणण्यासारखे आहे.अनंताच्या पुजेला लागणारा दर्भाचा नागही मला इंदोरात मिळाला होता. हे सगळे पोटतिडकीने सांगण्याचे कारण म्हणजे आपण इथे मराठी मृत होते का?ती टिकणार का यावर चर्चा अन वितंड्वाद घालत बसतो त्याऐवजी ह्या इतर प्रांतात बोलल्या जाण्यार्‍या मराठीला "हिंदाळलेली" न समजता आपली म्हट्लीत तर तिथे मराठीचे रोपटे जपणार्‍या आपल्याच बांधवाला मुख्य प्रवाहात सामावता येईल. म्हणुन मराठीतील संतश्रेष्टींची क्षमा मागुन म्हणावेसे वाटते की,
इये ईंदुरीचिये बोली कवतुके.
रसिकांचिये मन जिंके.

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Feb 2011 - 3:24 pm | बिपिन कार्यकर्ते

बढिया! एकदम बढिया... राजबाड्यावर मिळणार्‍या कचौरीसारखा... नाही तर थंडीच्या दिवसात पहाटे रस्त्याच्या बाजूला असलेल्या ढाब्यातल्या गरम पोह्यांसारखा... किंवा उन्हाळ्यात नुक्कड नुक्कड वर लागणार्‍या मधुशालांमधील गन्न्याच्या रसासारखा!

मजा आ गया भिया!

Nile's picture

2 Mar 2011 - 9:29 am | Nile

मजा आ गया भिया!

तुम्ही इंदोरात राहात असाल तर लई मजा आहे तुमची, एकदा इंदोरला फक्त खाण्यासाठी यायचं आहे. दोन - तिन दिवस फक्त खादाडी. जेंव्हा योग जुळेल तेंव्हा तुम्हाला कळवेनच.

बाकी लिहिलंय लई भारी, आता जेवण झालं होतं आणि त्यात पुन्हा इंदोराची आठवण.

पैसा's picture

28 Feb 2011 - 3:34 pm | पैसा

या इंदौरच्या बोलीला पु लं नी अजरामर करून ठेवलीय. मग ते रामुभैय्या दातेंवर लिहिललं असो, नाहीतर काकाजी असो. लेखन आवडले!

भाग्यश्री कुलकर्णी नेहमीच छाण लिहीतात . मराठी दिना निमित्ताने त्यांनी लेखणीवरची श्याई पुसल्याने बरे वाटले .... लेख आवडला हे सांगण्याची औपचारिकता जरुरी नाही.

उत्तम !! इंदौर दर्शनाबद्दल आभार.

-इंदुरीकर

भाग्यश्री, खूप सुरेख लिहिलंस. आवडलं.
उच्चून :)

छोटा डॉन's picture

28 Feb 2011 - 3:55 pm | छोटा डॉन

सुरेख आणि नेमके लेखन ...
खास इंदौरी बाज असलेले हे सर्व वाचायला आवडले.

- छोटा डॉन

बेसनलाडू's picture

1 Mar 2011 - 12:43 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

मुलूखावेगळी's picture

28 Feb 2011 - 4:15 pm | मुलूखावेगळी

बढिया हो ताई. मस्त लिहिलेत
ईन्दोर ला जायची खुप इच्छा आहे

सहज's picture

28 Feb 2011 - 4:55 pm | सहज

लेख आवडला.

> इंदोरला जायची खूप इच्छा आहे.

असेच म्हणतो.

लेख आवडला.
इंदोरला जायची खूप इच्छा आहे.

अगदी असेच म्हणतो.

टारझन's picture

28 Feb 2011 - 6:51 pm | टारझन

का ? यमन शिकायला का ?

नगरीनिरंजन's picture

1 Mar 2011 - 9:36 pm | नगरीनिरंजन

मी पण!

श्रावण मोडक's picture

28 Feb 2011 - 6:58 pm | श्रावण मोडक

छान. पुलेशु.

ramjya's picture

28 Feb 2011 - 7:53 pm | ramjya

ताई, इंदोर दर्शन तसेच मध्य प्रदेश ची आठ्वण झाली....मस्त लिखाण...(बाकी भावी पिढी साठी तिथे मराठी शाळा असतील ना?)...

धमाल मुलगा's picture

1 Mar 2011 - 7:20 pm | धमाल मुलगा

एकदम बढिया! :)
मझा आला भिया तिथल्ली वर्णनं वाचून. :)

(आता हल्ली तात्या काय दिसून नाय र्‍हायले, मंग इंदौराचा उल्लेख आला आणि देवासकरांची सही नाही असं मोठं आक्रित नको व्हायला...मीच हाणतो एक सही. :) )

- धम्याभैय्या देवासकर,
देवासकरांची कोठी, इंदौर.

अवलिया's picture

1 Mar 2011 - 7:28 pm | अवलिया

छान !!

इन्द्र्राज पवार's picture

1 Mar 2011 - 8:00 pm | इन्द्र्राज पवार

"...मुख्य प्रवाहात सामिल करुन घेतल्यास आपल्या मराठीला कितीतरी नवीन शाब्दिक अन भाषिक अलंकारही मिळतील...."

~ हा विचार स्तुत्य आहे. भाषा सुंदर आणि डौलदार बनते अशा विविध मिश्रणांच्या संगतीनेच. कानडी मुलुखातील मराठी माणसे आणि तुमच्या इंदौर (मला वाटते इथे महाराष्ट्रातच 'इंदूर' असे नाव घेतले जाते) आणि ग्वाल्हेरमधील मराठी माणसांनी आपली अशी एक शैली प्रस्थापित केली आहे, ती फार मोहक आहे. तुम्ही दिलेली उदाहरणे "झन्नाट" आणि "बढिया"...एकदम बढिया वाटली.

सागर आणि ग्वाल्हेरमध्ये काही काळ बॅन्केच्या सेवेत असलेले एक गृहस्थ परिचयाचे आहेत. त्यानी असेच तिकडच्या (तुमच्या भाषेत 'तिथलच्या') भाषेच्या लहेज्याविषयी गमती सांगितल्या होत्या. उदा. स्थानिक बॅन्क अधिकारी आपल्या शिपायाला हुकूम देतो "दौडत जाऊन हे काम कर...", "कॅशिअर बीमार आहे, छुट्टी घेतली...". 'आजारी आणि सुट्टी" हे शब्द कुणी तिथे उच्चारतच नाही असे म्हणतात

मझा आला वाचायला !

इन्द्रा

प्राजक्ता पवार's picture

1 Mar 2011 - 8:58 pm | प्राजक्ता पवार

मस्तं लेख.

कानडाऊ योगेशु's picture

1 Mar 2011 - 9:03 pm | कानडाऊ योगेशु

भोचकरावांची आठवण आली.

लेखन आवडलं.
इंदोरातनं फिरून आल्यासारखं वाटलं.
मीही बरच ऐकलय शहराबद्दल.

सन्जोप राव's picture

2 Mar 2011 - 4:23 am | सन्जोप राव

लेख आवडला. भाषेला खळाळत्या पाण्यासारखे मुक्त असू द्यावे हे खरेच, पण तिच्यावर काही बंधने घातलीच पाहिजेत असे वाटते. शुभानन गांगल किंवा सतीश रावले यांनी भलावण केलेली 'नियममुक्त' मराठी मला तरी पचणारी नाही. मराठीत अन्यभाषिक शब्द सहजपणाने मिसळून गेले (उदा. कानडी शब्द) तर ती मराठी कानाला गोड लागते. (उदा. बेळगाव, निपाणी भागातली मराठी) याउलट मराठीत मारुनमुटकून इतरभाषिक शब्द बसवले की ती कानाला खटकते. (धन्स, धन्यु, वीकांत वगैरे). अर्थात हे वैयक्तिक मत झाले.
इंदुरी मराठीवर आणखी लिहावे.

स्पंदना's picture

2 Mar 2011 - 7:57 am | स्पंदना

आवडल!

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Mar 2011 - 10:30 am | llपुण्याचे पेशवेll

लेख आवडला. छान आहे. इंदूरला मी पण खूप वेळा जाऊन तिथल्या लोकांमधे राहून आलो आहे. आश्चर्य म्हणजे पंचपाळ, लुगडं असे शब्द तिकडे अजूनही वापरात दिसतात. छान वाटतं. तिथल्या आधीच्या पिढीनी आपली संस्कॄती तिथे राहूनही चांगली जपली आहे. आणि असे असतानाही तिथले होऊन राहीले तिथला लहेजा उचलला हे छान वाटते.

पण तिथली नवी पिढी (आपल्या इकडच्या नव्या पिढीप्रमाणेच ) अतिगोंजारल्यामुळे होपलेस झाली आहे असे वाटते. मराठी बोलत नाही. आणि ती नवीन पिढी इकडे म्हणजे महाराष्ट्रात आल्यावर जेव्हा मराठी बोलायला नकार देते तेव्हा डोक्यात जाते. मग त्यांच्या "मैने आई को बोला, आजी को बोला" चे कौतुक आम्ही इथे बसून का करावे असा प्रश्न पडतो.
असो सगळ्या गोड गोड प्रतिसादात मिठाचा खडा टाकण्याची इच्छा नव्हती पण तरीही टाकला. असो.

गणेशा's picture

9 Mar 2011 - 3:52 pm | गणेशा

लेख मस्त जमला आहे ..

बाकी उज्जेन्-इंदौर एक दौरा करायचा आहेच त्याची आठवण झाली.. माझी मैत्रीण बरेच दिवस झाले बोलविते आहेच .. बघु.
बाकी वेगवेगळ्या बोली भाषा त्यांच्या ठेक्यामुळे/लयीमुळे खुप छान वाटतात. विशेषकरुन मला कोल्हापुरी जास्त आवदते.
पण हिंदीमिश्रीत मराठी मला नक्कीच आवडत नाही ..

मैत्र's picture

9 Mar 2011 - 5:05 pm | मैत्र

मस्त लेख !
या मिश्र गोड भाषेत खूप सारे जुने मराठी शब्द अजून नेहमी वापरले जातात हे जरा वेगळेपण आहे.

माझ्या एका अतिशय शुद्ध बोलणार्‍या इंदोरी मराठी मित्राची आठवण आली.
तो नेहमी बोलताना - "मी तुला ते धाडून देतो. " मेल वर काही माहिती हवी असेल तर "धाडतोस ना?" असा शब्द प्रयोग करायचा. बरेच परंपरागत शब्द पन्नास साठ वर्षापूर्वी अगदी प्रचलित असलेले आणि आता केवळ जुन्या पुस्तकातून उरलेले तिथे अजून सहज सवयीने वापरले जातात.

खिलवण्या साठी, खाण्यासाठी इंदोरास यायचे आहे जरुर.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Mar 2011 - 5:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लेख आवडला.

तू मिपावर फारशी दिसत नाहीस फारशी याची तक्रार याच निमित्ताने करून घेते.

प्राजु's picture

10 Mar 2011 - 12:45 am | प्राजु

लेख आवडला. नेहमीप्रमाणेच मस्त!!

विनायक बेलापुरे's picture

10 Mar 2011 - 1:05 am | विनायक बेलापुरे

सरवटे पुढची गुलाब पाकळ्या घातलेली लस्सी (नाव आठवत नाही) आणि ५६ दुकानची आठवण करुन दिलीत.
:)