माझिया मराठीचिया कवतिके

प्रदीप's picture
प्रदीप in विशेष
27 Feb 2011 - 4:44 pm
मराठी दिन

श्री. माधव भावे गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ भारताबाहेर रहात आहेत. त्यांची पत्नी सिंगापूरी चिनी आहे, आणि अनेक वर्षे आन्तरराष्ट्रीय बँकांत उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत राहिल्यावर आता श्री. भावे त्यांच्या क्षेत्रात सल्लागाराचे काम करतात. ह्या सगळ्या जंजाळांत त्यांचे मराठी संस्कृतीचे, मराठी भाषेचे भान सुटलेले तर नाहीच, उलट ते उत्तरोत्तर अधिकाधिक दॄढ होत गेले आहे. सुमारे दीड दशकांपूर्वी ते माझ्या गावात असतांना येथील महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष होते, तेव्हा त्यांच्या समवेत काम करण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी त्यांच्या ह्या मराठी प्रेमाची चुणुक मला दिसली होती. पुढे ते सिंगापूरी गेल्यापासून तेथील महाराष्ट्र मंडळाचे ते एक अध्वर्यू होऊन राहिले आहेत. ह्या जागतिक मराठी दिनानिमित्त मी त्यांची एक अनौपचारिक मुलाखत घेतली, ती इथे प्रस्तुत करत आहे.

मी: येथील महाराष्ट्र मंडळाचे कार्य करीत असतांना मला अगदी प्रकर्षाने जाणवले होते की, मराठी लोकांशी बोलतांना तुम्ही अगदी जाणीपूर्वक मराठीतूनच बोलता. हे मला तेव्हाही विलक्षण वाटले होते, कारण तेव्हाच तुम्ही १५ वर्षांहून अधिक काळ भारताबाहेर राहिला होतात, तुमची पत्नी चिनी, त्यामुळे घरी मराठी बोलण्याची संधी नाही. आणि तरीही मराठीतून बोलतांना तुम्ही अजिबात अडखळत नव्हतात, तुम्हाला शब्द शोधावे लागत नव्हते, आणि अगदी साध्या प्रवाही मराठीतून तुम्ही आमच्याशी बोलत असा. हे तुम्ही कसे साध्य करू शकलात?

श्री. भावे: माझ्या अंतरात या भाषेची पाळंमुळं खोलवर गेलेली आहेत, त्याचं कारण म्हणजे माझी जडणघडण. माझे शिक्षण मराठी माध्यमातून झाल्यामुळे "विचार करणे", "आंकडेमोड करणे", "राग व्यक्त करणे" या गोष्टी मराठीतून करण्याची संवय लागली. लहान गांवात बाळपण गेल्याने पूर्ण वेळ केवळ मराठीच कानावर पडत राहिली. त्यामुळे भाषेचा लवचिकपणा, त्यातील अनेक खाचाखोचा व सौन्दर्यस्थळं ही सहजगत्या जिभेवर राहिली. महाविद्यालयीन शिक्षण मुम्बईत झालं त्यावेळी मुम्बानगरीतही मराठीचं साम्राज्य होतं. बरीचशी मित्रमंडळी महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागांतून आलेली होती. तेव्हां तरुणाईची थट्टामस्करी, धांगडधिंगा, सुखदु:खाच्या गोष्टीदेखील मराठीतूनच चालत. नोकरीसाठी व्यावसायिक क्षेत्रात उतरल्यावरही "विशीतली वर्षे" महाराष्ट्रातच होतो. त्यामुळे कचेरीत इन्ग्रजीचा वापर अपरिहार्य असला तरी दुपारचा चहा घेतांना, सायंकाळी आगगाडीत, आसपास फेरीवाल्यांच्या तोंडी, अशी सारीकडे मराठीच भरून राहिलेली असे.

हे सारं घडत असतांना माझ्या आढळात अधूनमधून असे अनेक तरुण येत की ज्यांना इंग्रजीची पेरणी करीत बोलायची संवय असे. एकाने तर मला चक्क 'गुपित' सांगितल्यासारखं सांगितलं, "तू बघितलंस ना? हे मराठी मीडियममधून आलेले पोट्टे स्मार्ट नसतात आणि किती घटिया इंग्रजी बोलतात !" या वाक्यांतून मला दोन बोध झाले. एक म्हणजे माझं स्वत:चं इन्ग्रजी त्याला चांगलं वाटत होतं आणि दुसरं म्हणजे 'मराठी माध्यमात शिकलेल्या तरुणांना कमी लेखणारा' असा हा एक नवा 'वर्ग' जन्माला येतो आहे. त्या वेळी महाराष्ट्रात अगदी थोड्या शाळात मराठी माध्यम असे. तेव्हां मराठी बांधवांतील हा 'वर्ग' विकसित होण्यासाठी 'इन्ग्रजी माध्यमाचा सुळसुळाट' हे नक्कीच एक कारण आहे.

पुढच्या काळातही 'मराठीतून बोलणं' म्हणजे काहीतरी गांवढळपणा व 'सातत्याने इन्ग्रजीतूनच बोलणे' हे सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे अशी मानसिकता असल्याचं मला अनेक व्यक्तींच्या बाबतीत जाणवलं.

मी: तरीही अगदी नेटाने, मायभूमीपासून इतक्या दूर राहिल्यावरही आता इतक्या वर्षांनीही तुम्ही हे अगदी साध्यासरळ मराठीत कसे बोलू शकता?

श्री. भावे: मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे आपल्या भाषेची पाळेमुळे आपल्यात अगदी खोलवर गेलेली असतात. तेव्हा थोडा प्रयत्न केला तर सहज मराठी शब्द सापडू शकतात. आपण जे काही करतो, ते संपूर्ण मन लावून केले पाहिजे अशी माझी धारणा आहे. भाषेचे असेच आहे. कुठलीही भाषा बोलतांना ती आपणाकडून कामचलावू पद्धतीने बोलली न जावी, असा माझा कटाक्ष असतो. अगदी इंग्लिशमधून बोलतांनाही. उदाहरणार्थ, How was the food? ला nice हे उतर, तसेच how is the weather? ह्यालाही nice हेच उतर हे मला पटत नाही. अन्न कसे होते? तर delicious म्हणा ना! तसेच मराठीतून बोलतांनाही, विशेषणे, क्रियाविशेषणे व क्रियापदे विचारपूर्वक योजता आली पाहिजेत. मुळात आपल्याला अनेक शब्द, त्यांच्या अर्थछटांसकट माहिती असतात, प्रयत्न केला की हळूहळू जमू लागते.

मी: तुमच्या घरी कितपत मराठी बोलली जाते? पत्नीशी, मुलांशी?

श्री. भावे: पत्नीला मराठी येत नाही. दोन्ही मुले मात्र ९ वी पर्यंत हिंदी भाषा शिकली आहेत, त्यामुळे देवनागरीशी ती दोघे परिचीत आहेत. आमच्या घरी सर्व व्यवहार इंग्लिशमधून होतात, परंतु दरवर्षी आम्ही भारतात जातो, तेव्हा तिथे आमच्या अईवडिलांच्या तसेच नातेवाईकांच्या घरी बरेच संवाद मराठीतून होतात, ते ह्या सगळ्यांना बर्‍यापैकी समजतात. आता तेथील नवी पिढी मात्र आमच्या मुलांशी मराठीतून न बोलता, सरळ इंग्लिशमधूनच संवाद साधते!

मी: मराठी चालीरीती, सण इत्यादी तुम्ही सर्व किती साजरे करता?

श्री. भावे: इथे सिंगापूरला मराठी सण घरी साजरे फारसे होत नाहीत, पण माझी पत्नी धार्मिक आहे, पूर्वी आम्ही दर वर्षी भारतात जात असू तेव्हा ती अगदी रीतसर देवळांत जाऊन व्यवस्थित पूजा करीत असे. अजूनही करतेच. तसेच तेथे असतांना सणवार असले तर त्यात आम्ही सर्वच मनापासून सहभागी होत असू, अजूनही होतो. दिवाळीत आम्ही भारतात आईवडिलांकडे असलो, तर पाडव्याची ओवळणी, आमच्या व मुलांच्या भाऊबीजा हे आम्ही अगदी आपल्या पद्धतीनुसार साजरे करतो. दुसरे म्हणजे येथील महाराष्ट्र मंडळात जे सण साजरे होतात, त्यात आमचा सहभाग असतोच असतो.

ह्या संदर्भात श्री. भावेंनी सिंगापूरच्या महाराष्ट्र मंडळाच्या गणेशोत्सवाच्या सुरुवातीविषयी सांगितले. 'मी येथे आलो, तेव्हा मंडळ गणपतीच्या तसबिरीची पूजा करून मोठ्या हॉलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत असे. त्यावेळी मूर्ति आणणे हे जोखमीचे काम कसे करायचे, पाच-दहा दिवसांचा गणेशोत्सव कुठे साजरा करायचा, असे अनेक प्रश्न होते. आम्ही ते नेटाने सोडवण्याच्या मागे लागलो पण योग्य मार्ग सापडत नव्हता. जेव्हा येथे भवन्सची शाळा (आताचे नाव 'ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल') सुरू झाली तेव्हां नवी दिशा मिळाली. या शाळेचे प्रमुख श्री. अतुल टेमुर्णीकर हे मराठी गृहस्थ आहेत. त्यांनी दरवर्षासाठी आपल्या शाळेत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळाला जागा देऊ केली व श्रींची मोठी मूर्तीही आणवून दिली. तसेच पूजा, प्रतिष्ठापना व विसर्जनासाठी शाडूची मूर्ति सिंगापूरीच आता उपलब्ध होत आहे, तेव्हा गेल्या सात वर्षांपासून आम्ही रीतसर कमीत कमी पाच दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या थाटाने व उत्साहाने साजरा करतो'.

आमचे संभाषण पुन्हा एकदा भाषेच्या वापराकडे वळले.

मी: तुम्ही मराठी लोकांशी मराठीतूनच बोलण्याविषयी आग्रही आहात, पण ती भाषा कशी असावी असे तुम्हास वाटते? ह्या संदर्भात मी जालावर मराठी संस्थळांवर वावरत असतांना एका टोकास भाषा अगदी शुद्ध असावी, असे मत ऐकले आहे, तर त्याच्या दुसर्‍या टोकास काही जबाबदार माणसे, ’शुद्धलेखन वगैरे गेले फाट्यावर' असे म्हणतांना ऐकतो.

श्री. भावे: अगदी पिटुकल्या गावात इतस्तत: भटकलेलं चालू शकतं, पण महानगरात रहदारीचे नियम आवश्यक ठरतात. त्याचप्रमाणे, 8 कोटी लोक जी भाषा बोलतात त्या भाषेला काही नियम असल्याशिवाय परस्परांच्या विचारविनिमयातून सामंजस्याऐवजी तेढ वा गैरसमज पसरण्याची शक्यता असते. शेक्सपियरच्या काळापासून आजपर्यंत लाखो नवीन शब्द इंग्रजी भाषेत सामील करण्यात आले आहेत. तरीही, आपण एकमेकांशी बोलताना एका सर्वमान्य धाटणीचा वापर करतोच की. भाषा स्वच्छ असावी, समोरची व्यक्ति मराठी समजू शकत असेल तर तिला त्यातील शब्द समजण्यास फारसे कष्ट पडू नयेत, असे मला वाटते. म्हणजे बोलीभाषेतील शब्द आले तर काही हरकत नाही. 'बांबू' म्हणा अथवा 'मेषा', 'माणा', 'कळक' म्हणा, त्याने काही फरक पडत नाही. पण त्याचबरोबर इतर भाषेंतून मराठीत येऊन रूढ झालेल्या शब्दांसाठी विनाकारण प्रतिशब्द शोधण्याची धडपड मला पटत नाही. टॉवेलला 'पंचा' वा फोनला 'दूरध्वनि' म्हणण्याचा आग्रह नसावा.

श्री. भावे सिंगापूरच्या महाराष्ट्र मंडळाच्या 'ऋतुगंध' ह्या द्वैमासिकाचे संपाद‍न करत आहेत. त्याचे भरगच्च अंक त्यांनी मला ई-मेलीतून पाठवले होते. ह्या संपादनाविषयी मी पृच्छा केली "ह्यात अनेक तरुणांचे/ तरुणींचे लेख दिसत आहेत. भाषेच्या दृष्टीने तुम्हाला किती संपादन करावे लागते?"

"भाषेच्या बाबतीत होतकरू लेखकांना थोडेफार मार्गदर्शन करावे लागते, हे खरे. पण तरीही उत्साहाने लिहितात ही मंडळी" श्री. भावे उत्तरले " पण त्याचबरोबर तुम्ही अनेक लहान मुलामुलींनी लिहीलेले लेखही पाहिले असतील?"

"हो ना, काही काही तर इंग्लिशमधून लिहिलेले आहेत व त्याखाली त्यांचे मराठी भाषांतर केलेले आहे" मी म्हटले.

"बरोबर. आम्ही लहान मुलामुलींसाठी लेख मराठीतूनच लिहीले पाहिजेत ही अट शिथील ठेवली आहे. त्यांचे मूळ लेख, गोष्टी, कविता इन्ग्रजीतून असल्यास शक्यतो आम्ही त्यांच्या पालकांकडूनच त्या लेखाचे भाषांतर करून घेतो, अगदी तसे शक्य नसल्यास आमच्या संपादक मडळापैकी कुणीतरी हे काम करते. तरीही आम्ही पालकांकडून अपेक्षा ठेवतो की ते त्यांनी त्यांच्या मुलांचा मराठीतील भाषांतरीत लेख मुलांना वाचून दाखवावा". तरूणांना तसेच अगदी लहान मुलांनाही प्रोत्साहित करण्याची श्री. भावे ह्यांची ओढ मला सुपरिचित होती.

"आपणच आपली भाषा जोपासली पाहिजे, इतर कोण ते आपल्यासाठी करणार आहे?" श्री. भावे तळमळीने सांगत होते. " आपली मराठी भाषा समृद्ध आहे, तिच्यातून सर्व काही नीट व्यक्त करता येते असा माझा अनुभव आहे. तिला वारंवार परदेशी शब्दांच्या कुबड्या देऊन दुर्बळ करण्याचं काहीएक कारण नाही. आपण फक्त मनावर घेऊन तिचा वापर करत रहाणे जरूरी आहे".

प्रतिक्रिया

स्वाती२'s picture

27 Feb 2011 - 5:14 pm | स्वाती२

छान मुलाखत!

पैसा's picture

27 Feb 2011 - 5:28 pm | पैसा

इथे बाकी सगळे साहित्यप्रकार हाताळले गेलेत. मुलाखत हा मात्र दुर्मिळ प्रकार आहे. आवडली. त्यात प्रकट केलेले विचारही मननीय आहेत.

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Feb 2011 - 9:33 pm | बिपिन कार्यकर्ते

असेच म्हणतो. मराठी दिनानिमित्त एक सुंदरशी मुलाखतही आली... धन्यवाद, प्रदीपदा.

श्री. भाव्यांना काय म्हणायचे आहे ते खूपच छान पोचवले तुम्ही.

स्पंदना's picture

27 Feb 2011 - 5:35 pm | स्पंदना

सर्वात प्रथम प्रदीप तुमचे आभार!

माधव भावे, ज्यांना आम्ही 'भावे काका' म्हणतो हे एक इतक मनस्वी पण अतिशय साध व्यक्तिमत्व आहे. कोणाही नवख्याला झटक्यात आपल कराव तर ते काकांनीच ! ते स्वतः खुप सार्‍या गोष्टी जाणतात, पण त्या सांगताना त्यात कधीही अहंभाव वा प्रौढी तुम्हाला कधीही दिसणार नाही. का ही ही विचारा , कधीही विचारा , निदान आजवर तरी काकांनी थांब अस म्हंटलेल मी ऐकल नाही. त्यांनी सुरु केलेला आणखी एक अतिशय प्रशंसनिय उपक्रम म्हणजे ' शब्दगंध' सार्‍यांच्या कविता अगदी तितक्याच आवडीन ही जेष्ठ मंडळी ऐकताना मी पहाते. त्याच शब्दगंध चे आणखी एक खंदे पाइक आहेत आपले 'अरुण मनोहर' काका. प्रत्येक महिन्याला कुठेतरी भेटुन हे सर्व जण( त्यात मी ही असते अधीमधी कडमडायला) इतका सुंदर कार्यक्रम करतात की बस्स!

आज मराठीदिनाच्या निमित्ताने तुम्ही करुन दिलेली भावे काकांची ओळख ही अगदी 'अं काय म्हणु? ' महत्व्वाची वाटते मला म्हणा हवे तर‍. बघा काका असते तर त्यांना ताबडतोब शब्द सुचला असता.

छोटेखानी मुलाखत आवडली.

>तेव्हां मराठी बांधवांतील हा 'वर्ग' विकसित होण्यासाठी 'इन्ग्रजी माध्यमाचा सुळसुळाट' हे नक्कीच एक कारण आहे.

ज्या भाषीकांच्या हाती सत्ता आहे ते अन्य भाषीकांना कमी लेखण्यात आहे. त्याचे पुढचे स्वरुप सुशिक्षीत लोक अशिक्षीत लोकांना कमी लेखायची. पुर्वीचे कमी शिकलेले पण तल्लख मारवाडी, गुजराथी व्यापारी त्यांच्याकडे कामाला असलेल्या एम बी ए व अन्य शिकलेल्या आले मोठे... समजायाचे तसेच. इतरांना कमी लेखणे हा मनुष्याचा आवडता छंद आहे त्याला एक भाषीक कारण मिळाले इतकेच. ८०-९० च्या दशकात चीन मधे इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्या चीनी माणसाला बघा किती इंग्रजी टिव टिव करतो असे ऐकायला लागायचे जसे जगातील कुठल्याही एखाद्या गावात शहरी माणसाला त्याच्या तथाकथित गुणांमुळे असुयेमुळे टिकेचे धनी व्हावे लागते. अगदी अमेरिकेतही ... पण जसे तंत्रज्ञान उदा मोबाईल, इंटरनेटचा वापर जसा वाढत गेला तसा हे कमी लेखणे कमी होत आहे. किंवा या कमी लेखण्यात इतरांना (पक्षी: बळी पडणार्‍यांना) फार जाचक वाटू नये म्हणून काही नियम यावे उर्फ पॉलीटीकल करेक्टनेस यावा याकरता आजकाल प्रयत्न होताना दिसतात. अगदी जालावर देखील याचे स्वरुप दिसुन येतेच.

असो सांगायचा मुद्दा की इतरांना कमी लेखणारा हा वर्ग कायमच विकसित होत आला आहे. प्रगल्भ व अप्रगल्भ देखील त्याचेच रुप आहे. भारतातील जाती व्यवस्था (कास्ट सिस्टीम) व दीडशे वर्षे राज्यकर्ते इंग्रज यांच्या समाजात असा अनादी अनंत काळापासुन असलेली क्लास सिस्टीम (वर्ग व्यवस्था) यांची भयानक युती झाल्याने भारतातील हे दृश्य भयाण आहेच. इंडीया व भारत हे दोन वेगळे काही आयटी मुळे झाले नाहीत तर ते आधीपासुन होते व ग्लोबलायझेशनच्या प्रकाशात झळाळत आहे इतकेच.

शुचि's picture

27 Feb 2011 - 6:15 pm | शुचि

सुंदर प्रतिसाद!!!

शुचि's picture

27 Feb 2011 - 6:17 pm | शुचि

छानच मुलाखत.

इन्द्र्राज पवार's picture

27 Feb 2011 - 11:33 pm | इन्द्र्राज पवार

जागतिक मराठी दिनानिमित्य स्वतंत्र लेख लिहून भाषेचे महत्व सांगणे आणि ते मुलाखतीच्यामाध्यमाद्वारे वाचकांचा मनावर बिंबवणे यात फरक असा होतो की, मुलाखत घेणार्‍याला आपले स्वतःचे असे मत त्यात मांडता येत नाही शिवाय मुलाखत देणारा जे काही विचार मांडतो ते अचूकपणे नोंदवून घेऊन तीवर संस्कार करून पुढे आणावे लागतात, ते काम अतिशय सुंदररित्या श्री.प्रदीप यानी करून मुलाखतीचा आणि त्याद्वारे श्री.माधव भावे करीत असलेल्या अतुल कामाचा परिचय इथे करून दिला आहे.

"...टॉवेलला 'पंचा' वा फोनला 'दूरध्वनि' म्हणण्याचा आग्रह नसावा. .."
~ हे आवडले. आपलीच काय पण जगभरातील भाषा अशा आदानप्रदानानेच समृद्ध झाल्या आहेत. त्यामुळे इंग्रजीमधील जे शब्द सहज विनासायास मराठी भाषेत रुळले गेले आहे ते मराठीच्या हट्टापायी बाजूला काढून टाकल्यास मराठी तर वाढणार नाहीच, पण तिच्याविषयी अप्रितीच निर्माण होईल. उदा. 'एसटी' हे प्रवासी सेवेचे आंग्ल रूप गावागावात असे काही जनतेच्या तोंडी चपखल बसले आहे की, त्याजागी 'आज परिवहन मंडळाचे वाहन आले नाही...' असे जर एखाद्या बाबुरावाला किंवा सखुबाईला सांगितले तर ते त्याना कळेल असे कुणीही म्हणणार नाही.

"पोस्टमन" ला हिंदीत "डाकिया" म्हणतात पण मराठीत हे हिंदी रुप चंबळेच्या दरोडेखोराला बोलाविल्यासारखे वाटते; म्हणून ते इथे रुजले नाही. तरी पोस्टमनला "टपाल माणूस" असेही म्हणता येणार नाही. पोस्टमन हा मराठीतही पोस्टमनच राहिला आहे...अन् ते कुणाला खटकतही नाही.

मुलाखतरूपी सुंदर लेख !

इन्द्रा

विकास's picture

28 Feb 2011 - 1:56 am | विकास

भाव्यांची मुलखात मिपाकरांबद्दल पोहचवल्याबद्दल धन्यवाद. जागतिक मराठी दिनी जितके वाचतो आहे, तितके जगभर मराठी अगतिक नाही असेच वाटते.

श्री. भाव्यांना देखील मिपावर काही लेखन, विशेष करून अनुभवाधारीत लेखन करण्यास आमंत्रित करावे ही विनंती!

चित्रा's picture

1 Mar 2011 - 8:54 am | चित्रा

कुठलीही भाषा बोलतांना ती आपणाकडून कामचलावू पद्धतीने बोलली न जावी, असा माझा कटाक्ष असतो. अगदी इंग्लिशमधून बोलतांनाही.

जागतिक मराठी दिनानिमित्त हा विचार पुढे आला, ते खूप चांगले झाले. मलाही रोजच्या बोलण्यात हल्ली आपण तेच तेच मराठी/इंग्रजी शब्द बोलतो असे जाणवले, त्यामुळे हा विचार लगेच पटला. शब्दसंपत्ती वाढवत राहावी असे म्हणतात. अलिकडेच कुठेतरी वाचलेले आहे असे वाटते की बाळासाहेब ठाकरे आजही नवीन इंग्रजी शब्द पाठ करतात. अर्थात खास, शेलक्या मराठी शब्दांचाच वापर करतात हे सांगायला नको! पण हे मला कौतुकास्पद वाटते.

श्री. भावे यांची मुलाखत घेतल्याबद्दल प्रदीप यांचे आभार.
मिपावरील जागतिक मराठी दिनानिमित्त आलेले लेख हे विविध विषयांवर आले आहेत, याचा खूप आनंद वाटला.

बेसनलाडू's picture

1 Mar 2011 - 9:36 am | बेसनलाडू

मुलाखत आवडली. भावेंनी मराठीशी त्यांचे नाते अजूनही तितकेच घट्ट आणि अर्थातच अतूट असण्याची सांगितलेली कारणेही अगदी पटण्यासारखी; आणि त्याचबरोबर मराठी भाषेबाबतचे विचारही. विशेषतः

पण त्याचबरोबर इतर भाषेंतून मराठीत येऊन रूढ झालेल्या शब्दांसाठी विनाकारण प्रतिशब्द शोधण्याची धडपड मला पटत नाही. टॉवेलला 'पंचा' वा फोनला 'दूरध्वनि' म्हणण्याचा आग्रह नसावा.

भाषेची लवचिकता आणि सर्वसमावेशकता टिकून राहणे आणि भाषेचा वापर होत राहणे महत्त्वाचे आहे. वाचन, श्रवण, जमल्यास लेखन अशा माध्यमांमधून भाषेशी सतत खेळत राहिले, तर तिच्या संवर्धनाचे प्रयत्न जाणीवपूर्वक करायला लागणार नाहीत नि तिच्या र्‍हासाबद्दल कळाही सोसायला लागणार नाहीत, असे वाटते.

(त्रिभाषक)बेसनलाडू

धमाल मुलगा's picture

1 Mar 2011 - 7:16 pm | धमाल मुलगा

श्री. माधव भावे ह्या नावाची अन माझी ओळख झाली ती दै.सकाळच्या एका लेखामधून. ज्यामध्ये , रहायला कित्येक वर्षे सिंगापूर,चिनी वंशाची पत्नी, महाराष्ट्रमंडळाचा एक भक्कम आधार अशी वैशिष्ट्ये जाणवली.

श्री. प्रदीप ह्यानी घेतलेल्या ह्या मुलाखतीमधून श्री. भावे ह्यांचा मातृभाषेची नाळ जपण्याच्या अथक प्रयत्नांची उत्तम ओळख झाली.
धन्यवाद प्रदीप.

मुलाखतीच्या पहिल्याच प्रश्नाचं उत्तर हे खूप काही सांगून जाणारं आहे. जर एखाद्या भाषेत आपण रुळलो तरच त्या भाषेत बोलण्यातला सहजपणा आपल्यामध्ये उतरेल.
उगाच "अंकलना पोऽम म्हणून दाखव" "ह्या सॅटरडेला आपण मूव्हीला जाऊ हं, आणि संडेला पिकनिक अ‍ॅरेंज करुया" असल्या मराठीत आईबापांनीच बोललं तर लहानग्या पोरांना धड मराठी काय येणार? कप्प्पाळ? हे अगदी सहजासहजी दिसणारे प्रकार आहेत. आणि मी हे 'विद्येचे माहेरघर' म्हणवल्या जाणार्‍या पुण्यात 'जाज्वल्य पुणेकरां'कडे प्रकर्षाने पाहिले आहेत. त्या दृष्टीनं पहायचं तर श्री. भावे ह्यांचं महाराष्ट्रच नव्हे, तर देशाची सीमा ओलांडून स्थाईक झाले असतानाही मराठी भाषेसाठीचे प्रयत्न हे एक खूप मोठं काम आहे असं वाटल्यावाचून रहात नाही.

फारच छान !

प्रदिप यांनी नेहमी लिहीत रहावे असे मी यानिमित्ताने त्यांना सुचवतो.

फारच छान !

प्रदिप यांनी नेहमी लिहीत रहावे असे मी यानिमित्ताने त्यांना सुचवतो.

नगरीनिरंजन's picture

1 Mar 2011 - 10:02 pm | नगरीनिरंजन

भावेकाकांची मुलाखत आवडली. परदेशात राहूनही त्यांचे मराठीवरचे प्रभुत्व खरोखरच दाद देण्यासारखे आहे. ते आणि महाराष्ट्र मंडळातले इतर स्नेही यांच्या सहवासामुळे पुण्यात असताना बोलायचो त्यापेक्षा जास्त मराठी इथे बोलायला मिळतंय!

श्रावण मोडक's picture

1 Mar 2011 - 11:17 pm | श्रावण मोडक

आपणच आपली भाषा जोपासली पाहिजे, इतर कोण ते आपल्यासाठी करणार आहे?

बास्स. सहमत.