आयज जागतिक मराठी दिन

पैसा's picture
पैसा in विशेष
27 Feb 2011 - 11:29 am
मराठी दिन

आयज जागतिक मराठी दिन. या दिनाच्या निमित्तान मराठीची एक धाकटी भैण कोकणी भाषेबद्दल किदें तरी बरोयात अशे हांवे चितलें. म्हणून हो लेख. कोकणी म्हणजे गोंयाची भास असो एक समज आसा, पुण ते सामकें खरे न्हय. कोकणी गोयांन उलैतात, महाराष्ट्रान उलैतात, कर्नाटकान उलैतात, तशी केरळातय उलैतात.

काय मंडळी, काही कळलं का? बरं आता मराठीत लिहिते.

आज जागतिक मराठी दिन. या दिनाच्या निमित्ताने मराठीची एक धाकटी बहीण कोकणी भाषेबद्दल काहीतरी लिहूया असा मी विचार केला. म्हणून हा लेख. कोकणी म्हणजे गोव्याची भाषा असा एक समज आहे, पण तो पूर्ण खरा नाही. कोकणी गोव्यात बोलतात, महाराष्ट्रात बोलतात, कर्नाटकात बोलतात, तशीच केरळमधेही बोलतात.

सोपंय ना? भले कोकणी घटनेच्या ८ व्या परिशिष्टात भाषा म्हणून समाविष्ट झाली आहे, पण ती मराठीला इतकी जवळची आहे, की ती स्वतंत्र भाषा आहे की मराठीची बोलीभाषा याबद्दल लोक वर्षानुवर्षे वाद घालत आले आहेत आणि यापुढेही घालत रहातील. मालवणी या दोघींच्या कुठेतरी अधेमधे.

अगदी साध्या गोष्टी बघितल्या तर, मराठीतला 'मला' हा शब्द घ्या. तो मालवणीत 'माका' असा येतो, तर कोकणीत 'म्हाकां'. मराठीत 'इकडे, इथे' तर मालवणीत 'अडे, हंयसर' कोकणीत होतो 'हांगा'. माझं मालवणीचं ज्ञान जवळपास संपलंच इथे! कारण म्हणजे मी रत्नागिरीतून एकदम गोव्यात आले. मधला मालवणचा श्टॉप आम्हाला लागलाच नाही! मालवणी म्हणजे फक्त 'वस्त्रहरण' बघितलेलं. पण रत्नागिरीजवळच्या गावात कुणबी, भंडारी, मुस्लिम, खारवी वगैरे लोकांच्या वेगवेगळ्या बोली ऐकून मालवणीचा थोडाफार गंध आला होताच.

तरी मजा सांगायची म्हणजे, गोव्यात पाय ठेवल्यापासून कधी एक दिवस सुद्धा माझं भाषेमुळे अडलं नाही. कोकणी थोडी सावकाश बोलली तर मराठी माणसाला तिचा अर्थ कळतो नक्की! त्यातून मी सुरुवातीला म्हापसा इथे रहात होते. ते सावंतवाडीपासून जेमेतेम ५० किमी. त्यामुळे तिथे मराठीचा प्रभाव आहेच. पेडणे भागात तर लोकांची मातृभाषा मराठी म्हणूनच ते सांगतात. डिचोली भागातही मराठीचा खूप प्रभाव आहे. साधारण कोकणीत पाण्याला 'उदक' म्हणतात, पण डिचोलीचे लोक चक्क 'पाणी' असंच म्हणतात. ख्रिश्चन लोकांचे उच्चार काहीसे वेगळे असतात, त्यामुळे एखाद्या ख्रिश्चन माणसाने बोललेली कोकणी कानाला आणखीच वेगळी लागते. गोव्यातल्या कोकणीत असे कितीतरी पोर्तुगीज शब्द घुसले आहेत. जसे 'जनेल' म्हणजे 'खिडकी'. 'वाज' म्हणजे 'कंटाळा'. मडगाव साष्टी भागात आणखीच वेगळी कोकणी. मडगावच्या पुढे कारवारला पोचलात की परत मराठी मिश्रित कोकणी सुरू होते. म्हणजे गोव्यातला माणूस कोकणीत म्हणेल 'मातशे' तर कारवारी माणूस म्हणेल 'जरा.' कारवारीत बसमधून 'उतरतां' तर गोव्यातल्या कोकणीत 'देवतां.'

कारवार सोडून आणखी दक्षिणेला गेलं की उत्तर कन्नडा आणि दक्षिण कन्नडा जिल्ह्यांमधे आणि पुढे थेट केरळपर्यंत जिथे गौड सारस्वत ब्राह्मणांची वस्ती आहे, तिथे तिथे कोकणी आहेच! पण उच्चार मात्र अगदी वेगळे. त्या भागात तिची लिपी मात्र कानडी असते. किंवा केरळमधे तर मल्याळम. मजा म्हणजे कर्नाटकातले इतर लोक या गौड सारस्वत ब्राह्मणाना चक्क 'कोकणी लोक' असं म्हणतात. या गौड सारस्वतांची वस्ती बंगालमधे कधीच्या काळी म्हणजे गोव्यात येण्यापूर्वी होती असं म्हणतात. म्हणूनच त्यांच्या नावात 'गौड' शब्द आला. हे गौडबंगाल काय आहे मला माहिती नाही! पण कदाचित त्यामुळेच असावं, कोकणीत बर्‍याच शब्दांचे उच्चार बंगालीसारखे 'ओ' कारान्त होतात. अगदी नावाची रुपे सुद्धा 'धेंपे' चं 'धेंपो'. मराठीतला 'बोका' कोकणीत 'बोकलो'. मराठीतला 'दादला' कोकणीत 'दादलो' होतो. अशी खूप उदाहरणं आहेत. लिहायला बसले तर संपता संपणार नाहीत!

मंगलोरी कोकणी लोक “गेलो” चा अर्थ “मेला” असा घेतील. तर गोव्याच्या कोकणीत “बाहेर पडलो” म्हणजे मराठीत “मेला!” एकदा एका मंगलोरी ऑफिसरने शिपायाला सांगितलं, “लेटर पेटय.” (पत्र पाठव.) शिपाई बिचारा गोव्यातला. तो काड्यापेटी घेऊन आला! कशाला? म्हटलं तर “पेटवायला.” त्यांची दोघांची जुंपली, ते बघून आम्हाला मात्र जाम मजा आली!

कोकणी भाषा बोलताना जास्त अलंकारिकतेच्या फंदात पडत नाही. 'पार्श्वभागा'ला सरळ 'भोंक' म्हणतात. माझ्या एका मैत्रिणीला दुसर्‍या एका कलिगचा छोटा मुलगा खूप आवडला, तिने त्याला सांगितलं "हो चलो माका दी, हांव ताका सांभाळतां, पुण भोंक धुवुपाचे ना!" (हा मुलगा मला दे, मी त्याला सांभाळते, पण त्याचे कुल्ले धुणार नाही.) तेव्हा आम्ही हसून लोळलो होतो! तर बॅकेत माझ्याशेजारी बसणार्‍याने पहिल्यांदा जेव्हा 'म्हाका मुतपाक टाईम ना' (मला 'एकी' ला वेळ नाही) म्हटलं तेव्हा मी बेशुद्ध पडायचीच राहिले होते! टेलिफोन बंद पडल्याची तक्रार करायला गेले तेव्हा तिथल्या माणसाने सांगितलं, " भुरगी करून घातल्यात, आता पोसपाक जाय ना!" (पोरं जन्माला घातलीयत, आता त्याना पोसायला जमत नाही.) तोपर्यंत मी गोव्यात रुळले होते, त्यामुळे आश्चर्य वगैरे वाटलं नाही!

गोव्यातल्या लोकांच्या बोलण्यात त्यांची आपुलकी दिसते. बोली भाषेत 'तुम्ही' हा शब्द वापरायची पद्धत जवळपास नाहीच. नवरा असो, की सासरा, 'तू'च! वरिष्ठाला पण 'तू'च म्हणतात. त्यामुळे आमचे एक 'साहेब' बेळगावहून बदलून आयुष्यात पहिल्यांदा गोव्यात आले, तेव्हा शिपायाने 'अरे पात्रांव' म्हणताच त्यांचा चेहरा फोटो काढण्यालायक झाला होता!

मराठी संस्कृत आणि मग प्राकृत पासून तयार झाली. इथेच कुठेतरी कोकणी, मालवणी, वर्‍हाडी, बाणकोटी अशा उपशाखा फुटल्या असतील! म्हणूनच तर बरेचसे शब्द आणि त्यांचं व्याकरण मराठी आणि कोकणीत सारखं आहे. काही शब्द मात्र संस्कृतमधून थेट कोकणीत आलेले दिसतात. जसे की 'हांव' हा संस्कृत 'अहम' पासून आलेला दिसतो, तो मराठीत मात्र 'मी' असाच येतो. तसाच 'उदक' थेट संस्कृतमधून कोकणीत! पण मराठीत मात्र 'पाणी'.

खरं सांगायचं तर कोकणीला आपली अशी एक ठराविक लिपी नाही. मराठी जशी फक्त देवनागरीत लिहिली जाते. तसं कोकणीचं नाही. कोकणी बोली देवनागरी, रोमन, कानडी आणि मल्याळम लिपी वापरून लिहिली जाते. म्हणजेच, त्या त्या ठिकाणी दुसरी जी प्रमुख भाषा बोलली जाते, तिची लिपी कोकणी साठीही वापरली जाते. रोमन कोकणी लिहिणार्‍यांचं आणि देवनागरी कोकणी वाल्यांचं तर मराठी-कोकणी वादापेक्षाही भयंकर भांडण आहे!

पोर्तुगीज येण्यापूर्वी गोव्यात कोकणी लिखित स्वरूपात जवळ जवळ नव्हतीच. मराठी हीच गोव्याची सरकारी, धार्मिक, सांस्कृतिक भाषा होती. जुने शिलालेख मराठी किंवा प्राकृत भाषेत आहेत. तर मराठी संतकवींच वाङमय गोव्यात घरोघरी वाचलं जात होतंच. विठोबा हीच गोव्यातल्या लोकांची माऊली होती, आहे, आणि आजही कित्येक लोक पंढरीची वारी चुकवीत नाहीत. पेडण्याच्या सोहिरोबा अंबियेनी त्यांचं संतकवींच्या परंपरेतलं काव्य लिहिलं ते मराठीतच. आणि गोव्यातल्या जुन्या कवींच्या ज्या काही रचना पोर्तुगीजांच्या तडाख्यातून वाचल्या त्याही मराठीतच आहेत. एवढंच काय सक्तीची धर्मांतरं झाली त्या १६ व्या १७ व्या शतकात नव ख्रिश्चनांना समजावं म्हणून फादर स्टीव्हन्सनं ख्रिस्तपुराण लिहिलं तेही मराठीतच.

पण मराठी भाषा गोव्यातल्या लोकाना हिंदू धर्माशी आणि इतर दैवतांशी बांधून ठेवते आहे हे लक्षात येताच पोर्तुगीजांनी मराठी भाषेच्या वापरावर बंदी घातली. तरीही लोकानी चोरून मारून धार्मिक ग्रंथ आणून, लिहून काढून मराठी जिवंत ठेवलीच. या काळात कोकणी ही फक्त गोव्यातली बोलीभाषाच होती. जेव्हा पोर्तुगीज निर्बंध सैल झाले, तेव्हा म्हणजे २० व्या शतकाच्या सुरुवातीला गोव्यातल्या लोकानी मराठी शाळा सुरू केल्या. आजही गोव्यात सरकारी मान्यताप्राप्त आणि अनुदान मिळणार्‍या शाळा या मराठी माध्यमाच्या आहेत. कोकणीच्या बाबतीत काहीशी गोंधळाची परिस्थिती आहे, ती प्रमाणित व्याकरणाच्या बाबतीत, आणि लिपीच्या बाबतीत. त्यामुळे कोकणी माध्यामाच्या शाळा या विना अनुदानित, किंवा खाजगी या स्वरुपाच्या आहेत.

गोव्यात आल्यानंतर मला जेव्हा ही माहिती कळली तेव्हा आश्चर्याचा छोटासा धक्का बसला. पण मुलं मराठी माध्यमात शिकतात आणि घराबाहेर अर्धं मराठी आणि अर्धं कोकणी बोलावं लागतं ही परिस्थिती आमच्या एकूण पथ्थ्यावरच पडली! मराठी माध्यम असल्यामुळे मुलाना शाळेत काहीच त्रास झाला नाही. तर कोकणीची अनेक रुपे असल्यामुळे मोडकं तोडकं कोकणी बोललं तरी कोणी हसत नाही हा पण एक मोठाच फायदा! आम्ही मराठी बोलतो म्हणून कोणी आम्हाला गोव्यात कधीच परकं समजलं नाही. कानडी लोकांसाठी खास राखीव असलेलं 'घाटी' हे संबोधन आमच्या वाट्याला कधीच आलं नाही, किँबहुना ते मराठी लोकांसाठी नाहीच! ऑफिसातसुद्धा अगदी पूर्वीपासून खूप गोंयकार लोक आपणहून मराठीच बोलायला येतात. गोव्यातल्या बर्‍याच जणांचे नातेवाईक मुंबईला असतातच. शिवाय गावातल्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकल्यामुळे बहुसंख्य गोंयकाराना चांगलं मराठी येतं. आमच्या बॆंकेतल्या ख्रिश्चन शिपायाने मला एकदा “पंढरीनाथा झडकरी आता...” हे गाणं म्हणून दाखवून झीट आणली होती!

गोव्यात आल्यावर सुरुवातीला कोकणी पेपर सुनापरांत’ वाचताना मजा वाटायची. हळूहळू सगळ्या प्रकारच्या कोकणी बोलींची सवय होत गेली. मग हळूहळू समजत गेलं, कोकणीत पण बाकीबाब बोरकरांसारख्या प्रतिभावंताने काही लिहिलंय. त्यांच्या कोकणी कविताही मराठी कवितांइतक्याच गोड आहेत. पण बहुतेक कोकणी मराठीच्या वादात दोन्ही बाजू समजल्या की हा कवी दुसर्‍या पक्षाचा आहे! त्यामुळे या थोर कवीला ज्ञानपीठ हा सहित्यातला सर्वोच्च पुरस्कार मिळाला नाही. हल्लीच एकजण मला सांगत होता, की “बाकीबाब आमच्या पिढीला थोर कवी म्हणून माहिती आहेत, पण आताची पिढी त्याना ओळखत नाही!” दुर्दैव आमचं! आणखी काय म्हणू?

कोकणीबद्दल लिहायचं म्हटलं तर काय लिहू आणि काय नको, अशी माझी अवस्था झालीय. पण जास्त लिहिलं तर “तुमका “वाज” येतलो, म्हणून आता हांगाच र्‍हावतां. देव बरें करूं!”
(तुम्हाला कंटाळा येईल, म्हणून इथेच थांबते. देव चांगलं करील!”)

प्रतिक्रिया

इन्द्र्राज पवार's picture

27 Feb 2011 - 11:49 am | इन्द्र्राज पवार

मस्त धन्यवादागलू, पैसा....चंडी धागा.....माक्का म्हापुसा गोतासा...

तुम्ही म्हणता तसे गोव्यात (पणजी आणि म्हापुश्यातच नव्हे तर अगदी मडगाव ते कारवारपर्यंत) मराठीतून संभाषण केले तर स्थानिक लोक मराठीत उत्तर देतात. हुबळी-धारवाडमध्ये तर दुकानदाराबरोबर तुम्ही मराठातून भाव विचारले तर तो अडत नाही, उलट शुद्ध मराठीतून तोही संवाद साधतोच. आपलेच "टूरिस्ट" म्हणून जाणारे बांधव गोव्यात हकनाक हिंदीचा मुडदा पाडत तिथे आपल्या भाषेला दुय्यम गणतात. असो, तो विषय वेगळा आहे.

लेख "चंडी" झाला आहे हे सांगणे न लगे. मराठी माध्यमाच्या शाळांना सरकारी अनुदान मिळते हे वाचून आनंद झाला. तुम्ही बॅन्केत नोकरी करता आणि तेथेही "मराठी" व्यवहारात कशी राहिल हे तुम्ही जाणीवपूर्वक पाहता हे पूर्वीही एकदा इथेच वेगळ्या धाग्यावर समजले होतेच. तुम्ही वर म्हटल्याप्रमाणे "आम्ही मराठी बोलतो म्हणून कोणी आम्हाला गोव्यात कधीच परकं समजलं नाही...." ही वस्तुस्थिती गोव्याला कोणत्याही निमित्ताने जावू इच्छिणार्‍यांनी ध्यानात ठेवणे आणि तिथे सातत्याने मराठीचा वापर करणे गरजेचे आहे. तिथे अगदी नाईलाजास्तवच इंग्लिश तसेच हिंदीचा वापर करावा लागतो हे मी स्वतः कित्येकदा अनुभवले आहे.

आज 'मराठी दिना'निमित्त इंग्रजाळलेल्या गोव्याच्या ठिकाणी तुमच्यासारखे लोक मराठीचा मान उंचावत आहात ही आनंदाची बाब आहे.

इन्द्रा

नगरीनिरंजन's picture

27 Feb 2011 - 11:52 am | नगरीनिरंजन

मस्त लेख! कोकणी-मराठी वादाबद्दल ऐकून झालेले गैरसमज या लेखामुळे निघून गेले!

प्रास's picture

27 Feb 2011 - 11:54 am | प्रास

ज्योतीजी,

फारच छान लेख जमलाय. वाचताना तुमचं मराठी आणि कोंकणीवरचं भाषाप्रेम अगदी काळजात भिडत होतं म्हणा ना.... भाषिक विनोदही छान प्रकट केलेत....

मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!

राजेश घासकडवी's picture

27 Feb 2011 - 12:21 pm | राजेश घासकडवी

मस्त. चुरचुरीत शैली. अस्सल, जिवंत उदाहरणं. भाषेबद्दल लिहिताना इतिहास, भूगोल, मनुष्यस्वभाव, संस्कृती या सर्वांना भाषेप्रमाणे स्पर्श झाला आहे. कोकणीवरचं जिवापाड प्रेम वाक्यावाक्यातून जाणवतं. बावनकशी लिखाण. वा.

प्रदीप's picture

27 Feb 2011 - 4:59 pm | प्रदीप

म्हणतो. चुरचुरीत, माहितीपूर्ण लेख आवडला.

पंगा's picture

28 Feb 2011 - 9:45 am | पंगा

मस्त. चुरचुरीत शैली. अस्सल, जिवंत उदाहरणं. भाषेबद्दल लिहिताना इतिहास, भूगोल, मनुष्यस्वभाव, संस्कृती या सर्वांना भाषेप्रमाणे स्पर्श झाला आहे. कोकणीवरचं जिवापाड प्रेम वाक्यावाक्यातून जाणवतं.

नेमके.

बाकी,

कोकणी थोडी सावकाश बोलली तर मराठी माणसाला तिचा अर्थ कळतो नक्की!

रोचक निरीक्षण.

लहानपणी अनेकदा ऐकलेल्या मुंबई 'ब' वरच्या कोंकणी कार्यावळीतले बहुतेक बोललेले कोंकणी (अगदी जी. एल. गोम्साने दिलेल्या 'खबरों'सकट) अंदाजाने का होईना, पण सहजपणे आणि बर्‍यापैकी समजत असे, मात्र एकदा का ती मंडळी गाऊ लागली, की डोक्याच्या वरून सहा फूट जात असे, असे आठवते.

गोव्यातल्या कोकणीत असे कितीतरी पोर्तुगीज शब्द घुसले आहेत. जसे 'जनेल' म्हणजे 'खिडकी'.

हम्म्म्म्... (थोडे अवांतर आहे, क्षमा करा, पण) कोंकणीत 'जनेल' म्हणजे खिडकी, बंगालीत 'जानाला' म्हणजे खिडकी... हेही गौडबंगाल काही कळत नाही. कोंकणीतली 'जनेल' पोर्तुगीजातली म्हटले आहे, ते योग्य असावे. (गूगल-ट्रान्स्लेटवर खिडकीसाठी पोर्तुगीजात 'जनेला' असा शब्द सापडतो.) बंगालातल्या 'जानाला'चा संबंध गौडांशी खासा नसावा, आणि पोर्तुगीजांशी म्हणावा, तर कधी आणि कितीश्या प्रमाणात आला असावा, ते कळत नाही.

दुसरीकडे कुठे हा दुवा देउ हे कळत नसल्याने तूर्तास इथेच देतो.

तंजावूर मराठी असा एक ब्लॉग श्री. आनंद राव वशिष्ठ यांनी काढला आहे. त्यांच्याकडे बोलल्या जाणार्‍या मराठीची माहीती त्या ब्लॉगबर आहे. अभ्यासुंनी त्याची जरुर नोंद घ्यावी. व जागतीक मराठीच्या निमित्ताने परराज्यात स्थलांतरीत झालेल्या हा मराठी लोकांची व त्यांच्या सद्य मराठीच्या स्वरुपाची ओळख आपल्याला व्हावी म्हणुन हा दुवा इथे.

काही उदाहरणे

अक्रम adv unlawful(act). नियमाच॑ विरुद्ध कराच काम uis चोर्टेलोके अक्रमकार्य काहीं करनास्क॑ असाला अम्च॑ गांवाच॑ पोलीस उदंड॑ पाहींगतात
अग्गि pron everything. all. अग्गीन. अस्कि. अस्कीन. सग्ळ॑. सग्ळीन uis हे खोली अत्ताच॑ खालीकरून देम॑. आंत असाच॑ सामान अग्गीन काढून बाहर ठिवा
श्रीमती pref a form of salutation for women. बायकेंच॑ नावाच॑ पुढे लिवाच॑ एक बहुमान॑ गोष्ट॑
श्रीमान adj a term of respectful salutation for men. दादिगेंच॑ नावाच॑ पुढे लिवाच॑ एक बहुमान॑ गोष्ट॑

तंजावूर मराठी ब्लॉग दुवा

कोणाला अशी वेगळ्या प्रांतात बोलली जाणारी मराठी बोली माहीत असेल तर इथे प्रतिसाद द्या व नंतर संपादकांनी याचा एक स्वतंत्र धागा करावा.

धमाल मुलगा's picture

1 Mar 2011 - 7:36 pm | धमाल मुलगा

उत्तम दुवा आहे.
मी 'तंजावूरची मराठी' ह्यावर लिहिण्याच्या बेतात होतो, पण तुम्ही दिलेल्या ह्या दुव्यावर त्या मुलुखातल्याच व्यक्तीनं भाष्य केलेली माहिती हजर आहे. त्यामुळे त्याला माझं विटकं ठिगळ लावण्याचा बेत रद्द. :)

बेसनलाडू's picture

1 Mar 2011 - 12:37 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

प्रीत-मोहर's picture

27 Feb 2011 - 1:09 pm | प्रीत-मोहर

ब्येश्ट गो ताई ......
तुजो दोनुय भांशांर आशिल्लो मोग काळजान पावलो ....
अशेंच बरय .

मजा आयली वाचुन :)

सहज's picture

27 Feb 2011 - 1:46 pm | सहज

मजेदार व माहीतीप्रद सुंदर लेख!

अवलिया's picture

27 Feb 2011 - 2:11 pm | अवलिया

छान लेखन ! :)

स्पंदना's picture

27 Feb 2011 - 2:47 pm | स्पंदना

देव बरे करु गो बाय !
सांगण कस मधागत वाटल. न्हाय तर मनात कोंकणी म्हंटल्यावर काय तरी येग़ळच वाटायच बाय.
तु सार उस्तरुन सांगीतल्यान कस झ्याक वाटल पैसाताय!

भयंकर सुंदर करुन बरयलां गो तुवें. वाचच्याकय भारी बरें दिसले पळय.

>>आम्ही मराठी बोलतो म्हणून कोणी आम्हाला गोव्यात कधीच परकं समजलं नाही. >> गोयंकार सामके सगळ्यांयंका बरे करुनच वागयतात गों, मनशाच गरीब आणि मनमिळाऊ. मोगाची मनशा, म्हण कोकणी ना आयल्यारही जाता, आणि संवादाची अडचण जायना. पुणि गोयां गेल्यार थोडी कोकणी शिकल्यारही जाता, हय की नी? :) साभार हांव मराठीच नाजाल्यार बिगर कोकणीच उलयतलो म्हळ्यार कशे खय ते? अशे चलीना! सातत्यान कोकणीचो वापर केल्यार, प्रयत्न केल्यार कोकणी येवच्याक कठीण नी! कितली गोड गो आमगेली कोकणी! :)

प्रीत-मोहर's picture

27 Feb 2011 - 3:12 pm | प्रीत-मोहर

म्हज्या मनातलें शब्द गे यशो मावशी !!!

स्वाती२'s picture

27 Feb 2011 - 4:44 pm | स्वाती२

सुरेख लेख!

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Feb 2011 - 9:27 pm | बिपिन कार्यकर्ते

अतिशय सुंदर लेख. शैली सुंदरच. मजा आली आणि अजून असेच वाचायला मिळावे.

५० फक्त's picture

28 Feb 2011 - 8:41 am | ५० फक्त

" भुरगी करून घातल्यात, आता पोसपाक जाय ना!" हे उत्तम, आता माझ्या बोलीभाषेत याचा सढ़ळ हाताने वापर करेन, पुर्वी ' मी ज्याचे घरी नाही आड, त्याने फुलझाड लावु नये ' हे वापरायचो, एक पर्याय दिल्याबद्दल अतिशय धन्यवाद.

बाकी लेख लई भारी झालाय, मजा आली हे सगळं वाचायला. कोकणि म्हणली की माझी उडी - माजा लवतोय डावा डोळा ' आणि ' तुज्या नावाक जोडता नाव' इथंपर्यंतच होती.

स्पा's picture

28 Feb 2011 - 10:00 am | स्पा

पैसा तै बर्याच महिन्यांनी, एकदम झकास लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद
मराठी दिनाच्या अनुषंगाने एकदम फक्कड जमलाय
बरीच नवीन माहिती मिळाली.
आता आम्हाला तुमच्या कडून कोकणी भाषेचे ट्रेनिंग घ्यायला हरकत नाही ;)

-- (अभ्यासू) स्पा

sneharani's picture

28 Feb 2011 - 10:21 am | sneharani

मस्त लेख! मजा आली!
:)

मुलूखावेगळी's picture

28 Feb 2011 - 10:52 am | मुलूखावेगळी

चांगलो लेख.
माका १दा पन “वाज” येतलो ना.

वाचले मस्त लिहिलेस.

माका लेख मस्त वाटलो असा....(मला लेख आवडला)

प्राजक्ता पवार's picture

28 Feb 2011 - 1:09 pm | प्राजक्ता पवार

मस्तं . माहितीपूर्ण लेख आवडला.

लेख चांगला आहे, प्रचंड आवडला !

धनंजय's picture

28 Feb 2011 - 10:39 pm | धनंजय

सोबीत बरयले तुएं, बाय.

गोंयची कोंकणी उतरां वाचून हांव धादोस जालो.

(मराठी "माहाराष्ट्री प्राकृता"सुन आयली, आणिक कोंकणी "शौरसेनी प्राकृता"लागी आसा, अशे हावें आयकिल्ले. पुणून बंगालानसुन आयिल्ल्या गौड सारस्वतांची भास "मागधी प्राकृता"च्या लागी वता...)

चिंतामणी's picture

28 Feb 2011 - 11:27 pm | चिंतामणी

पण आम्हाला कंटाळा नाही आला.

देव चांगलं करील!”

इंटरनेटस्नेही's picture

1 Mar 2011 - 12:03 am | इंटरनेटस्नेही

चांगला लेख पैसा मॅडम.. आमचा शिष्य म्हणुन स्वीकार व्हावा!
-
(अर्धमुर्ध कोंकणी उलेयणारा!) इंट्या गोयंकर!

पुष्करिणी's picture

1 Mar 2011 - 12:34 am | पुष्करिणी

खमंग लेख, मजा आली वाचताना

मेघवेडा's picture

1 Mar 2011 - 3:08 am | मेघवेडा

झकास हां.. वाचून खूप बरें दिसलें. :)

चित्रा's picture

1 Mar 2011 - 6:10 am | चित्रा

खूपच आवडला लेख. कंटाळा नाही आला. अजून येऊ दे.

धमाल मुलगा's picture

1 Mar 2011 - 7:33 pm | धमाल मुलगा

निवांत वाचण्यासाठी म्हणून मुद्दामच बाजुला ठेवला होता लेख..सार्थक झालं बुवा. :)

पैसाताईच्या लेखनशैलीबद्दल म्या पामरानं काय बोलावं?

मला कोकणी ऐकायला फार आवडते. असं वाटतं, की काही काळ तरी गोव्यात किंवा त्याच्याजवळपास रहायला मिळायला हवं होतं. कोकणी अशी नुसती छापलेली वाचण्यात मजा नाही..तीचा जो अस्सल हेल आहे, त्यात खरा गोडवा! आपल्याला कितीही प्रयत्न केला तरी बापजन्मात कधी तो हेल जमलाच नाही. :)

सखी's picture

1 Mar 2011 - 8:32 pm | सखी

पैसाताई लेख खूप आवडला. तसेच वर इन्द्रा यांनी लिहल्याप्रमाणे 'मराठी माध्यमाच्या शाळांना सरकारी अनुदान मिळते हे वाचून आनंद झाला. तुम्ही बॅन्केत नोकरी करता आणि तेथेही "मराठी" व्यवहारात कशी राहिल हे तुम्ही जाणीवपूर्वक पाहता हे पूर्वीही एकदा इथेच वेगळ्या धाग्यावर समजले होतेच. ' हे वाचुनही छान वाटले.

उपेन्द्र's picture

3 Mar 2011 - 10:59 pm | उपेन्द्र

लई भारी...
लगे रहो...

प्रकाश घाटपांडे's picture

4 Mar 2011 - 12:05 pm | प्रकाश घाटपांडे

ही कोकनी लई औघाड हाये ब्वॉ! एकदा गोव्यात गेलो होतो तिथे काही तरी एस्टी स्टँडवर पाट्या होत्या. काय लक्षात नाही पण त्याचा अर्थ हागा पण थुंकु नका असा काहीसा मी काढला होता.

अमित देवधर's picture

4 Mar 2011 - 12:58 pm | अमित देवधर

लेख सुंदर आहे फारच आणि समर्पकही. कोकणी भाषेचं स्वरूप, मूळ, व्याप्ती सगळं ओघवतेपणे आलं आहे यात.
कोकणी आणि मराठीमध्ये वाद घालणं अर्थहीन आहे. दोन्ही आपापल्या जागी आहेत, शिवाय दोघांची संस्कृतीही एकच आहे. कोकणात लोक(तळकोकणात तरी) हा मराठीभाषिक, कोकणीभाषिक, मालवणीभाषिक म्हणून दुसर्‍याकडे भेदभावाच्या नजरेने बघत नाहीत. गोव्यातही नसावेत.

मी ही बोरकरांच्या फारशा कविता वाचल्या नाहीयेत, वाचायच्या आहेत. त्यांची 'जीवन त्यांना कळले हो..' विशेष आहे. त्यांच्या कविता कुठे जालावर मिळू शकतील काय? बा. भ. बोरकरांना ते कोकणी आहेत, म्हणून ज्ञानपीठ मिळाला नाही हा फालतूपणा आहे फारच.

"गल्यान साकली सोन्याची" इतकं कोकणी समजणारा/जाणणारा. बाकी ह्या संदर्भात आम्ही नागवे.
खुप खुप धन्स.

अतिशय छान लेख.
माझे मराठी दिन यामधील बरेच लेख वाचायचे कसे राहिले आहेत तेच कळेना
.
सहज वर आला हा धागा म्हणुन मिळाला.
छान वआटले वाचुन.

संधर्भ माहिती खुपच छान आहे.. मस्त वाटले

अवांतर : कोकणी - मराठी वाद चालु आहे हे मला या लेखातुनच कळाले .. माहित नव्हते ...

कोकणी - मराठी वाद चालु आहे हे मला या लेखातुनच कळाले .. माहित नव्हते
चला बर्याच जणांच्या न्यानात भर पडुन र्हायली तर....

प्रीत-मोहर's picture

5 Mar 2011 - 10:17 am | प्रीत-मोहर

चला बर्‍याच लोकाचे गिन्यान वाडलें म्हणपाचें ... हे योग्य होइल नै का ग पैसा तै?

मन१'s picture

26 Aug 2012 - 12:13 am | मन१

नेमके लिखाण आवडले. इन्द्रा, सहज , धनंजय ह्यांचे प्रतिसादही मस्तच. सहजरावांनी दुवा दिलेला ब्लॉग उघडत नाहीये.