नाटकवाला

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
8 Jan 2011 - 8:41 am

तसं म्हणाल तर बालपणापासूनच नाटक अंगात मुरलेलं. हवी ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी रडण्याचं नाटक करायचं किंवा एखाद्या किर्तनकाराची हुबेहूब नक्कल करीत वाहवा मिळवायची. शालेय जीवनात अनेक सोंगे करुन उपस्थितांना हसवलं. 'चोरीचा मामला' मधील सदाशिवरावांची व्यक्तिरेखा साकारली. 'वेड्यांच्या इस्पितळा'त पोस्टमन म्हणून वावरलो. कॉलेजच्या पहिल्या वर्षी पु.लं. च्या 'सारं कसं शांत शांत' मधील भटजीची भूमिका करून अनेकांची शाबासकी सुद्धा मिळवली. परंतु नाटक म्हणजे काय चीज असते याचा वास्तव अनुभव कॉलेजच्या अंतिम वर्षात घेतला...
ज्यावेळी आम्ही कॉलेजकुमार होतो तेव्हा नाटकाचा (अन् नृत्याचाही) किडा आम्हांबरोबर सर्वांनाच चावायचा. मग कॉलेजच्या स्नेहसंमेलनात ही हौस भागवून घ्यावी लागायची. परंतु आमचं ध्येय मोठ्या प्लैटफॉर्मवर उतरण्याचं असायचं. अशा गैदरिंगच्या ईडलिंबू-टिडलिंबू स्टेजवर आमचं मन जडायचं नाही. हौशी नाटक मंडळीत ऊठबस कराविशी वाटायची. पूर्णतः व्यावसायिक रंगभूमीवर ठसा उमटवण्याची स्वप्ने रंगवायचो आम्ही..
योगायोगाने माझा मित्र ऋषि सुद्धा असाच नाटकवेडा निघाला. त्यातही आनंदाची गोष्ट म्हणजे त्याचा मोठा भाऊ गिरीश हा पुण्यातीलच एका नाट्यसंस्थेत कार्यरत होता. एकंदर काय तर 'नाटकवाला' बनण्याचा राजमार्गच गवसला म्हणा ना.
'काय रे नाटक करणार का?' असं जेव्हा त्यानेच मला विचारलं तेव्हा मला स्वर्ग फक्त दोनच बोटे उरला होता. त्यावर्षी आयोजित केल्या गेलेल्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेकरिता आदरणीय नाट्यअभिनेते श्री. दिलीप प्रभावळकर यांनी विषय सुचवलेला- 'हरवली होती'.
मग काय
आम्ही तिघेही त्या नाटकाच्या स्वप्नात हरवून गेलो. रात्र कमी सोंगे फार अशी आमची अवस्था झाली. जेमतेम महिन्याभरात नाटक उभं करायचं होतं. ऋषि, मी व गिरीश असा अड्डा जमू लागला. नाटकाचा विषय कळला परंतु मांडायचा कसा? यावर खल चाले. मग मीच आख्खी रात्र जागून 'हरवली होती' नावाचे विनोदी नाटक लिहिले! परंतु त्यात स्त्री पात्र असल्याने अन् प्रत्यक्षात त्याचीच वानवा झाल्याने ते नाटक दिग्दर्शक कम निर्माते गिरीश महोदयांनी निकालात काढले..
आम्ही संहितेचा शोध सुरु ठेवला. अखेर त्या बंधूद्वयांनीच नाटक 'रचले', लिहूनही काढले. आठवड्यातच आमच्या तालमी सुरु झाल्या. नाटक तसं सुटसुटीत होतं. गिरीश पडद्यामागचा कलाकार तर आम्ही दोघे स्टेज गाजवायला उत्सुक होतो. दोन तीन दिवसांतच माझे उच्चार 'शुद्ध गावंढळ' असल्याचा साक्षात्कार डायरेक्टरांना झाला. मग दररोज दोन तीन वेळा फोनिक साऊंडस् ची प्रैक्टीस करण्याचे फर्मान निघाले. दंत्य, तालव्य, कंठ्य, अनुनासिक, प्राणोत्पन्न वर्ण कसे उच्चारायचे याचे शास्त्रशुद्ध शिक्षण सुरु झाले. न आणि ण मधला फरक, ब्रह्म म्हणायचं की ब्रम्ह, स्वर आणि व्यंजने कशी बाहेर पडली पाहिजेत इ. इ. सुचनांचे पालन करुन मी जाम वैतागलो. ती शुद्ध बाराखडी उच्चारून उच्चारूनच दमू लागलो. नाटक राहिले बाजूला हे भलतंच काम करण्यात एनर्जी वाया जाऊ लागली. शेवटी तेही जमवलेच. जिद्दच तशी होती ना, मोठं काहीतरी करुन दाखवण्याची!
आमचं द्विपात्री परंतु स्त्री पात्र विरहीत नाटक बऱ्‍यापैकी तयार झालं. अखेर तो स्पर्धेचा दिवस उजाडला...
आम्ही आहे त्या कपड्यांनिशी नाट्यकला अकादमीच्या सभागृहात पोचलो. अन् तेथील इतर स्पर्धकांची जोरदार तयारी पाहून घामच फुटला. त्यांचे ते मोठमोठे सेटस्, भरजरी ड्रेपरी, मेकपमनची नट-नट्यांभोवती चाललेली धावपळ, अनेक पात्रांची रेलचेल असलेली पाच-पंचवीस पानांची नाटके बघून पुरते हबकलो. आमच्याकडे काय होतं? काहीच नाही.. केशभुषा नव्हती, वेशभूषा नव्हती की नेपथ्यही नव्हते!
'इतरांकडे लक्ष देऊ नका, चला.' डायरेक्टरांचा हुकूम मिळाला अन् आम्ही सभागृहाच्या बाहेर पडलो. चौकातील नागपुऱ्‍यांची चविष्ट मिसळ चापीत आलेला ताण घालवू पाहत होतो. परंतु तो जाईल कसा? कारण आम्ही ज्या स्पर्धकांची तयारी पाहिली ते सतीश-सुनिल नावाचे भावी चमकते 'तारे' होते. त्यांच्यापुढे आमच्या अभिनयाची मेणबत्ती लुकलुकणार कशी? इतरांची परिपुर्ण तयारी अनुभवून आमच्याच डोळ्यांपुढे तारे चमकत होते.
'काळजी करु नका, आपली थिमच जबरा आहे.' डायरेक्टर आम्हां दोघांचा होसला वाढवत होते..
आमच्या नावाचा पुकारा झाला. गिरीश महाशय पडद्यामागून प्रेक्षक परिक्षकांपुढे प्रस्तावना करू लागले- 'क्षितिज, पुणे निर्मित द्विपात्री पाच अंकी नाटक- हरवली होती.'
सर्वजण सावरुन बसले. कारण पाच अंक 'सोसायचे' म्हणजे नक्कीच पाच तासांची बैठक मारावी लागणार, असं त्यांना वाटलं असावं.
ऋषि सूत्रधार होता तर मी एक सामान्य नट. कोणती कोणती गोष्ट हरवली होती, ते अभिनयाच्या माध्यमातून दाखवायचं होतं. तो अभिनय माझ्याकडून सूत्रधाराने करवून घ्यायचा, अशी नाटकाची एकंदरीत थिम.
आम्ही मोठ्या जोशात संवाद फेकीला सुरुवात केली. परंतु समोर बसलेल्या तीन परिक्षकांमधील दोघांनी जेव्हा सिगारींची धुम्रवलये आमच्या दिशेने फेकीत तुच्छता दर्शक नापसंतीचा अभिनय केला, तेव्हा आम्ही दोघेही गडबडलो. पुढील संवाद आपोआपच त्यांच्या धुराळ्यामुळे धुरकट झाले. पुढील तीन अंक पंधराच मिनिटांत उरकते घेऊन आम्ही रंगभूमिवरून पायउतार झालो ते कायमचेच!
मोठी स्वप्ने रचित आम्ही नाटकारा रंग द्यायचे ठरवले होते परंतु तशी सकस भूमी लाभली नाही. आम्ही थोडक्यात आवरल्यामुळे आमच्या वाट्यालाही थोडकेच गुण आले. आमच्या चुका आम्हांला कळल्या खऱ्‍या, परंतु पुन्हा नाटकाकडे वळण्याचं धैर्य झालं नाही..
अखेर काय तर हे जीवन, हे आयुष्य म्हणजेच एक फार मोठी रंगभूमी आहे मित्रांनो. घरादाराचं नेपथ्य सांभाळतांना कितीतरी पथ्ये पाळावी लागतात, याचा अनुभव प्रत्येकजण घेतच असतो. घरी किंवा ऑफिसात कितीही चंपी झाली तरी बाहेर इतरांपुढे नथिंग हॅपन्ड चा विग परिधान करावाच लागतो. आतल्याआत काळजात कितीही दुखवटे पाळावे लागत असले तरी इतरांसाठी हसरे मुखवटे धारण करावेच लागतात. बंद दाराआड कितीही शाब्दिक मार झेलावे लागत असले तरी इतरांना सांगतांना आपल्या गळ्यात किती प्रेमळ हार पडतात, याचाही अत्यानंदी अभिनय साकारावाच लागतो. म्हणूनच हे जगणे जगणारा प्रत्येकजण एक नाटकवाला असतो. अन् हे सप्तरंगी आयुष्य म्हणजे हरेकाची कंपनी असते! ती प्रत्येकाने जपली पाहिजे, जोपासली पाहिजे...
( 'चौफेर' मधून...)

नाट्यजीवनमानशिक्षणलेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

रेवती's picture

8 Jan 2011 - 8:45 am | रेवती

लेखन आवडले.

शिल्पा ब's picture

8 Jan 2011 - 9:02 am | शिल्पा ब

छान.

डावखुरा's picture

8 Jan 2011 - 9:30 am | डावखुरा

मस्त विश्लेशण ....

हे आयुष्य म्हणजेच एक फार मोठी रंगभूमी आहे मित्रांनो. घरादाराचं नेपथ्य सांभाळतांना कितीतरी पथ्ये पाळावी लागतात, याचा अनुभव प्रत्येकजण घेतच असतो. घरी किंवा ऑफिसात कितीही चंपी झाली तरी बाहेर इतरांपुढे नथिंग हॅपन्ड चा विग परिधान करावाच लागतो. आतल्याआत काळजात कितीही दुखवटे पाळावे लागत असले तरी इतरांसाठी हसरे मुखवटे धारण करावेच लागतात. बंद दाराआड कितीही शाब्दिक मार झेलावे लागत असले तरी इतरांना सांगतांना आपल्या गळ्यात किती प्रेमळ हार पडतात, याचाही अत्यानंदी अभिनय साकारावाच लागतो. म्हणूनच हे जगणे जगणारा प्रत्येकजण एक नाटकवाला असतो. अन् हे सप्तरंगी आयुष्य म्हणजे हरेकाची कंपनी असते! ती प्रत्येकाने जपली पाहिजे, जोपासली पाहिजे..