मोरपिसे....

भानस's picture
भानस in जनातलं, मनातलं
8 Dec 2010 - 8:28 pm

सुवासिक फुलांच वेड अगदी लहानपणापासूनच असलं तरीही मी फारच क्वचित कधी गजरा माळला असेल. कधीमधी सोनचाफा किंवा सोनटक्का मात्र घालतसे. बहुतांशी सगळीच सुवासिक फुले पांढर्‍या रंगाशी जवळीक साधून अन स्पर्शातील किंचितश्या तापानेही कोमेजायला लागतील अशीच. ती त्यांच्या आईच्या अंगाखांद्यावरच सुंदर दिसतात. देवाला वाहण्यासाठीही ती मला तोडवत नसत. मायदेशात त्यातूनही मुंबईत या सगळ्या सुवासांना सदैव बहरायला मिळेल असेच तापमान असल्याने माझ्या घराच्या छोट्याश्या बाल्कनीत ही सगळी आनंदाने नांदत, बहरत, सुवास उधळत होती. इथे यायला निघालो तेव्हां माझा सगळा जीव या झाडांमध्ये अडकलेला. एक वर्षभर मी इतक्या हजारो मैलांवरूनही त्यांना जपले. रोजच्या रोज त्यांची निगराणी, पाणी, खते घालणे यासाठी मोलकरीणही ठेवली. वर्षभराने सुट्टीसाठी गेलो तर काय चारी हातांनी सारी सुगंध उधळत होती. पारिजातक केवढा तरी मोठ्ठा झालेला. फुलांचा आकारही किंचित वाढल्यासारखा. रातराणीने तर घरात शिरल्या शिरल्या तिच्या अस्तित्वाची जाणीव दिलेली. जाई-जुई-सायली-मोगरा, अबोली, गुलबक्षी सारी सारी भरभरून फुललेली. आईला एक कडकडून मिठी मारून मी स्वत:ला या सगळ्यांमध्ये झोकून दिले. किती तरी वेळ माझ्या झाडांना गोंजारून, त्यांच्याशी बोलून, गाल घासून ख्याली खुशाली दिली घेतली तेव्हां कुठे जरा मन निवले. घरातले सगळे मला चिडवत, हसत होते खरे पण मनातून त्यांनाही या माझ्या वेडाची, प्रेमाची कदर होती. माझी समाधी कोणीही मोडली नाही.

इथे परत यायला निघताना मात्र मी स्वत:च्या हातांनी सगळ्यांची पाठवणी केली. मी निघाल्यानंतर, माझ्या अपरोक्ष त्यांची निरवानिरव करणे सहज शक्य असूनही मी ते टाळले. वाटले, माझ्या लेकरांशी ती दगाबाजी होईल. त्यापेक्षा एकेकाला मीच घेऊन जावे, त्यांच्या नवीन माणसांची ओळख करून द्यावी. माझ्या लेकराला नीट जपा म्हणून विनंती करावी. अचानक खुडून टाकल्यासारखे- बेवारस - अनाथ भाव त्यांच्या मनात नकोत रुजायला. सगळी झाडे माझ्या मैत्रिणींनाच दिलेली त्यामुळे आता ती माझ्याकडे नाहीत हे दु:ख वगळता सारी सुस्थळीच पडली. पुन्हा तीन वर्षांनी मायदेशी गेले तेव्हां ती दिल्याघरी आनंदाने सळसळताना पाहून जीव शांत झाला. त्यांच्या बंधनातून मी नाही तरी माझ्यातून ती नक्कीच मुक्त झाली. बरं झालं. कुढली असती तर अनर्थ झाला असता.

जे झाडांनाही कळलं ते मला मात्र कधी उमजलं नाही, आजही उमगत नाहीये. असं कसं होईल? का कळतं पण मला कळवून घ्यायचंच नाहीये. नात्यांमध्ये गुंतवलेला जीव असा सहजी काढून घेता येऊ शकतो? जर उत्तर ’ नाही ’ असे असेल तर मग ते सगेसोयरे, केवळ रोजचा संपर्क-भेट नाही म्हणून दुरावलेत.....? मग माझी त्या मैत्रीतली - नात्यातली ओढ आजही तितकीच का असावी? दुराव्याने मी का कुढावं - तळमळावं? का जीवनप्रवासात एका थांब्यापासून दुसर्‍या थांब्यापर्यंतच, त्या त्या वेळेपुरतीच फक्त ती माणसे माझी - माझ्यापाशी होती? मी तर सगळ्यांना, तितकाच भरभरून जीव लावला. ’ स्व ’ला संपूर्णपणे त्यागून, मैत्रीशी प्रामाणिक राहून. मग काहींतला प्राण, जिव्हाळा हरवून कसा गेला...... का प्रत्येक नात्यातून ही अपेक्षा करणेच मुळी चुकीचे आहे. मुळात आजही तितक्याच ओढीने टिकून असलेल्या मैत्रीच्या आनंदापुढे ही खंत कशाला? हे पटलं तरीही मन दुखतं हे सत्य नाकारता येत नाही.

कदाचित, काही नात्यांत सान्निध्याची - प्रत्यक्ष बरोबर असण्याची गरज असते. तसं झालं नाही तर ती हळूहळू क्षीण होत होत विझून जातात. " कशी आहेस? काय नवीन विशेष? " "अगं, मी ठीक आहे. तूच सांग. " शरिरी दुरावण्याचा पहिला भर ओसरला की या चार दोन शब्दांच्या वाक्यांपुढे गाडी सरकतच नाही. सरकलीच तरी लगेचच ’ बाकी ’ अजून काय म्हणतायं? वर अटकते. अजूनही दोन्ही मने सीमारेषेवर घुटमळत असतात. मग क्वचित कधी दोन्ही बाजूंनी पूल सांधण्याचा प्रयत्नही होतो. पण सामायिक विषयांच्या अभावी व समोरासमोर नसण्यामुळे काहीतरी अडखळत राहते - अपुरे वाटते. रोजच्या जीवनातील समान विषय - मग त्या अडचणी असोत, की राजकारण/समाजकारण/मोलकरीण - का लोकल-बस संप/ निवडणुका/ क्रिकेट/ नवीन साड्या-कपडे/ चकाट्या-भंकस, अगदी गेला बाजार डाळी-भाज्यांचे भाव असोत....... संपल्यामुळे त्यातली तक्रार - बोच -धग- असंतोष, असहायता, गंमत, आधाराची गरज - सांत्वन, यातले कुठलेच भाव समर्थपणे पोहोचत नाहीत - भिडत नाहीत. दोष कोणाचाच नसतो पण असे घडते खरे. मित्रमैत्रिणीतच नाही अगदी घरच्यांबरोबरही. अडचणी दोन्हीं बाजूंनी असतात पण तुला काय कळणार किती त्रास होतोय ते किंवा तुझं आपलं बरय गं..... अशासारखे बोल पटकन बोलले जातात. " The grass is always greener on the other side " असेच भासत राहते.

गेलेल्या काळाचा, अंतरामुळे आलेल्या दूरीचा जबर परिणाम असतो मनावर. जालावर असलेल्या सगळ्या जोडणार्‍या साईट्समुळे एकमेकांची खबर मिळत राहते. विरोपातून, फोनवर,वरचेवर बोलणे झाले तरी शेवटी माणूस समोर असणं, त्याचे अस्तित्व जाणवणं, त्याला स्पर्श करता येणं, अत्यंत क्षुल्लक गोष्टही तातडीने व उत्साहाने ऐकवता येणं व त्याने ती मन लावून ऐकणं..... हे फार फार गरजेच आहे अस सारखं वाटत राहतं.

मोरपिसे वेबकॅममुळे एकमेकाला दिसलो तरी त्या चेहर्‍यात मी पूर्वीचेच भाव, त्या जुन्या ओळखीच्या खाणाखुणा शोधत राहते अन तो चेहरा मात्र काहीसा हरवलेला..... अनोळखी, कोरडा भासत राहतो. ( कदाचित त्यालाही मी तशीच भासत असेन........ दुर्दैव ) जुने जुने विषय काढून मी नात्याला पुन्हा पुन्हा जिवंत करत राहते..... पण खरं पाहता ते बंध कधीचेच सुटलेत. नवीन नात्यात गुंतलेत आणि असं गुंतणं चुकीचं नाहीच मुळी. माझ्यावर त्यांचा जीव आहेच फक्त आता तो पुस्तकात जपून ठेवलेल्या मोरपिसासारखा. वर्षा-दोन वर्षातून कधीतरी त्या मोरपिसावरून प्रेमाने त्यांचा हात फिरतो. दोन घटका मन आठवणींमध्ये रमते - चेहर्‍यावर आनंद-हसू उमट्ते, की पुस्तक मिटून पुन्हा ड्रॉवरच्या खणात सारले जाते. यातच सारे भरून पावले असे म्हणत मी स्वत:ला मुक्त करायला हवे. वरवर हे व्यावहारिक वाटेलही परंतु कुढत-तळमळत राहण्यापेक्षा बरं.

आठवणींच्या माळेत नवीन मण्यांची भर पडेनाशी झाली की ओवलेले मणी, इतकेच का म्हणत खंतावण्यापेक्षा त्यांचं मोरपीसच करावं. मग कधीतरी कातरवेळी ते अचानक समोर येईल तेव्हां त्या सुंदर क्षणांचा पुन: प्रत्यय तितक्याच आवेगाने घेता येईल. मन सुगंधीत-पुलकित होऊन जाईल. की हलकेच फोन उचलावा अन नंबर फिरवावा....... पुढचा अर्धा तास फक्त त्या मोरपिसांचा......

गुंतवणूकमुक्तकजीवनमानविचारअनुभव

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

8 Dec 2010 - 8:44 pm | स्पंदना

खुप दिवसांनी भानस अगदी भान हरपावे अस काही वाचल!

धन्यवाद! __/\__

विंजिनेर's picture

8 Dec 2010 - 8:49 pm | विंजिनेर

वा! सुंदर! नेहेमीप्रमाणेच...

बाकी, जर अंतर वाढल्याने बोलायचे विषय संपत असतील, "मग, अजून काय विषेश?" वर गाडी अडकत असेल तर एकमेकात (मैलांचे)अंतर नसतानाच नात्याचा पीळ घट्ट पडला(की घातला?) की मग किती दुरून, कितीही काळानंतर एकमेकांशी बोलताना मधलं अंतर चटकन पुसून जावं.
तसं नसेल तर नातं औपचारिकतेपुढे कसं जाणार? आणि नातं विरलं तर मग त्याला वाढलेल्या अंतराची लंगडी सबब कशाला द्यावी?

भानस's picture

10 Dec 2010 - 8:19 pm | भानस

बाजूने व्हायला हवं ना... काही काही नाती मुळातच कारणाने जवळ आलेली असतात. त्यामुळे ती कारणं पुरी झाली की धुसर होऊ लागतात. हे समजून स्वतःला त्यातून मोकळं कराव लागतच, इच्छा असो वा नसो. :( अंतर कदचित अजून भर घालत असेल... असो.

विजिनेर, अनेक धन्यवाद.

प्राजु's picture

8 Dec 2010 - 8:51 pm | प्राजु

अतिशय सुरेख!! अगदी माझ्या मनातलेच विचार आहे असं वाटलं वाचताना.
फार सुंदर रितिने मांड्ले आहेस सगळे विचार.

भानस's picture

10 Dec 2010 - 8:20 pm | भानस

अपर्णा, प्राजू तुम्हाला विचार भावले हे वाचून खूप आनंद झाला. :)

स्वाती दिनेश's picture

8 Dec 2010 - 8:59 pm | स्वाती दिनेश

मोरपिसं फिरल्यासारखा तरल लेख, खूप आवडला.
स्वाती

माजगावकर's picture

8 Dec 2010 - 9:04 pm | माजगावकर

अप्रतिम लेख!!

कदाचित, काही नात्यांत सान्निध्याची - प्रत्यक्ष बरोबर असण्याची गरज असते. तसं झालं नाही तर ती हळूहळू क्षीण होत होत विझून जातात. " कशी आहेस? काय नवीन विशेष? " "अगं, मी ठीक आहे. तूच सांग. " शरिरी दुरावण्याचा पहिला भर ओसरला की या चार दोन शब्दांच्या वाक्यांपुढे गाडी सरकतच नाही. सरकलीच तरी लगेचच ’ बाकी ’ अजून काय म्हणतायं? वर अटकते. अजूनही दोन्ही मने सीमारेषेवर घुटमळत असतात. मग क्वचित कधी दोन्ही बाजूंनी पूल सांधण्याचा प्रयत्नही होतो. पण सामायिक विषयांच्या अभावी व समोरासमोर नसण्यामुळे काहीतरी अडखळत राहते - अपुरे वाटते. रोजच्या जीवनातील समान विषय - मग त्या अडचणी असोत, की राजकारण/समाजकारण/मोलकरीण - का लोकल-बस संप/ निवडणुका/ क्रिकेट/ नवीन साड्या-कपडे/ चकाट्या-भंकस, अगदी गेला बाजार डाळी-भाज्यांचे भाव असोत....... संपल्यामुळे त्यातली तक्रार - बोच -धग- असंतोष, असहायता, गंमत, आधाराची गरज - सांत्वन, यातले कुठलेच भाव समर्थपणे पोहोचत नाहीत - भिडत नाहीत. दोष कोणाचाच नसतो पण असे घडते खरे. मित्रमैत्रिणीतच नाही अगदी घरच्यांबरोबरही. अडचणी दोन्हीं बाजूंनी असतात पण तुला काय कळणार किती त्रास होतोय ते किंवा तुझं आपलं बरय गं..... अशासारखे बोल पटकन बोलले जातात. " The grass is always greener on the other side " असेच भासत राहते.

अगदी हेच अनुभवतोय गेले कित्येक दिवस.. वाचुन असं वाटलं आपल्याच भावनांना शब्दांची वाट सापडली..

अप्रतिम लेख..
एकदम मनाला लागुन गेला.

--टुकुल

मस्त लेखन!
कितीतरीवेळा "क्या बात है!"

फार सुंदर. हृदयस्पर्शी झालंय लिखाण! तरल भावना उत्कटपणे व्यक्त करणं फारच थोड्यांना जमतं! मस्तच झालाय लेख!

स्वाती, माजगावकर, टुकुल, मेघवेडा व रेवती, सगळ्यांचे खूप आभार. आवर्जून प्रतिक्रिया दिलीत खूप आनंद झाला.

स्मिता.'s picture

9 Dec 2010 - 11:53 am | स्मिता.

भानसताई,
मनातले विचार खूपच सुरेख रीतीने उतरले आहेत. मनापासून आवडला...
तिसऱ्या परिच्छेदापासूनचं पुढचं सगळं काही अगदी माझं मन वाचून लिहिल्यासारखं आहे. याच, अश्याच भावना-विचार मनात चालू असतात. पण त्यांना एवढ्या सुयोग्य शब्दात लिहिणं आपल्यासारख्या काहींनाच जमतं.

कदाचित, काही नात्यांत सान्निध्याची - प्रत्यक्ष बरोबर असण्याची गरज असते. तसं झालं नाही तर ती हळूहळू क्षीण होत होत विझून जातात. " कशी आहेस? काय नवीन विशेष? " "अगं, मी ठीक आहे. तूच सांग. " शरिरी दुरावण्याचा पहिला भर ओसरला की या चार दोन शब्दांच्या वाक्यांपुढे गाडी सरकतच नाही. सरकलीच तरी लगेचच ’ बाकी ’ अजून काय म्हणताय? वर अटकते.

हे असंच्या असं संभाषण बऱ्याचवेळा अनुभवलंय. त्यावेळीच ही जाणीव होत असते की समोरची व्यक्ती आपल्याला (आणि कदाचित तिच्याकरता मीसुद्धा) दुरावलीये.
आयुष्यात असे कितीतरी लोक येतात... काही-काही तर एवढे जवळ येतात की आपण मनात निश्चिंत असतो की आपण कायम असेच सोबत/जवळ असणार... आणि अचानक केवळ अश्या आठवणी आपल्याजवळ ठेवून ते केव्हा दुरावतात तेही कळत नाही.

थोडंसं अवांतर : यावरून 'मनातल्या मनात' हा गिरीश ओक यांचा चित्रपट आठवला. चित्रपट ठीकठाकच होता आणि त्यातले कथासूत्र जरा वेगळे असले तरी या लेखाशी थोडं साम्य असल्यासारखे वाटले.

भानस's picture

10 Dec 2010 - 8:26 pm | भानस

अग्ं, ही दुरावण्याची कारणेही कधीच कळत नाहीत. इतकी जवळची अगदी घरातलीच झालेली ( आपली... ??? ) माणसे तटकन तुकडा तोडून निघून जातात. :(

आता मला उत्सुकता लागली, हा सिनेमा पाहण्याची. पाहते जालावर मिळाला तर...

sneharani's picture

9 Dec 2010 - 11:58 am | sneharani

सुंदर लेख! मस्त लिहलयं!!

मितान's picture

9 Dec 2010 - 1:06 pm | मितान

सुंदर ! खूप छान ! :)

मदनबाण's picture

9 Dec 2010 - 2:02 pm | मदनबाण

सुंदर... :)

भानस's picture

10 Dec 2010 - 8:28 pm | भानस

स्नेहराणी, मितान व मदनबाण लेख आवडल्याचे वाचून छान वाटले. :)