माझे साक्षात्कारी बद्धकोष्ठ

मूकवाचक's picture
मूकवाचक in जनातलं, मनातलं
4 Nov 2010 - 4:06 am

तसा मी लहानपणापासूनच वेगळा. ज्ञानमार्गी! तर्कसम्राट, पुरोगामी आणि बुद्धीनिष्ठ. खा खा खाणे आणि बसून राहणे या माझ्या सहज प्रेरणा. धोंडो म्हणतात "सहज प्रेरणांचे दमन विकृतीचे एकमेव कारण आहे". मी कधीच तसले दमन केले नाही. आमचे तात्या "हलका, सुपाच्य आहार घे. नियमित व्यायाम कर. " असे जुनाट रूढीवादी सल्ले देत. मी त्यांच्याकडे कधीच लक्ष दिले नाही. अपचनाच्या एका विलक्षण गर्तेत सापडलो. पोट सतत जड, मन सतत अस्वस्थ. आत्महत्येकडे प्रवृत्त! धोंडो म्हणतात "अनारोग्य महत्वाकांक्षेचे सुप्त कारण आहे. ते टाळण्यासाठी माणूस मोठमोठे झमेले उभे करतो, किंवा आत्मघात करतो ". मी जिवंत राहिलो. चिकाटीने अभ्यास करून अभियंता झालो. स्वामी अद्भूतानंदना गजकर्ण होते आणि सारखा कंड सुटत असे म्हणून त्यांनी वेदांत प्रसाराला वाहून घेतले होते अशी माझी धारणा आहे. असो.

अशा विलक्षण गर्तेत सापडलेला माणूसच 'मोकळे' होण्याचा मार्ग तीव्रतेने शोधतो. यालाच अध्यात्मात मुमुक्षा वगैरे म्हणतात. मुत्तुस्वामी म्हणतात "तुम्ही आणि निरामय जीवन यामध्ये बद्धकोष्ठ हा एकमेव अडथळा आहे. " धोंडो त्यापुढे जाऊन म्हणतात "मला बद्धकोष्ठ आहे, मी बद्धकोष्ठ नाही ही जाणीव होणेच ज्ञात आणि अज्ञात रोगांपासून मुक्ती आहे. मी असे सांगतो तेव्हा मी मोकळाच असतो, आणि तुम्ही मोकळेच आहात याची मला जाणीव असते. त्यामुळे इथे कुणी गुरु नाही आणि कुणी शिष्य नाही. फक्त तुमच्यातल्या मला माझ्यातल्या तुमच्याकडून कायम चूर्ण घेण्याची प्रेरणा मिळते (आणि माझ्याकडे पाचशे रुपयाला चूर्णाची बाटली मिळते) इतकेच! " मंदफार्त तर चक्क म्हणतो "तुम्ही मोकळेच जन्माला येत, उगाच खा खा केल्याने जड वाटते. त्यामुळे कुठलेच ध्येय नाही, दिशा नाही, फक्त एक विलक्षण आवेग असे साधण्याचा प्रयत्न केलात तर त्या क्षणी मोकळे व्हाल. मग उरेल ती फक्त एक दिशाहीन, अथांग शांतता."

झाले! मला मार्ग सापडला. रात्री चांगले दोन डाव भरून कायम चूर्ण घेऊन झोपी गेलो. आणि सकाळी 'घटना' घडली. बुद्धाला पद्मासनात, महावीराला गोदुहा आसनात ज्ञान मिळाले असे म्हणतात. घटना कुठेही कशीही घडू शकते. सकाळी जागच आली ती पोटात विलक्षण कळ येऊन. मी धावतच कमोडपाशी गेलो. मी गेलो असे म्हणण्यापेक्षा कळच मला तिथे घेऊन गेली. बसलो. काही मिनिटात 'प्रक्रिया' पूर्ण झाली. तो क्षण शब्दात पकडणे अवघड आहे. तिथे मी नव्हतो, कमोड नव्हता, आणि आता तर कळ पण नव्हती. मुत्तुस्वामी नव्हते, धोंडो ही नव्हते. एक विलक्षण असा गंध सर्वत्र दरवळत होता. विश्वाच्या निरामयतेला मी स्पर्श केला होता. धन्वंतरीचा आशीर्वाद मला मिळाला होता. सारे ओझे नाहीसे झाले होते. एक विलक्षण रिक्तता अवकाश व्यापून उरली होती. तिचे सघन, चैतन्यमय अस्तित्व प्रकर्षाने जाणवत होते. आरोग्य आणि निरामय जीवन मला कायम चूर्ण मार्गाने प्राप्त झाले होते. प्राप्त झाले होते म्हणण्यापेक्षा जे मुळातच होते त्याची जाणीव मला कायम चुर्णाने करून दिली होती.

आता मी निरामय जीवन जगतो. चित्त अस्वस्थ नसल्याने कमीतकमी, सहज जमेल तितके काम करतो. एरवी सहज प्रेरणेनुसार बसून राहतो. कधी पत्ते खेळतो, बायकोबरोबर भाजी आणायला जातो, कधी सगळ्या व्याधी पासून मुक्ती मिळवण्याच्या कायम चूर्ण मार्गाबद्दल जबरदस्त अधिकारवाणीने लिहितो. प्रवचने देतो.

हा लेख वाचण्यापूर्वी:

१. मी हे लिहित असताना इथे फक्त मी, माझे निरामय अस्तित्व, माझा कीबोर्ड आणि कायम चूर्णाची बाटली आहे. निरामय जीवनासाठी इतरांना उपयोग व्हावा इतक्याच हेतूने मी लिहितो आहे. कुणी आजारी पडावे, किंवा बरे होऊ नये असा माझा हेतू कसा असेल? माझ्या बायकोलाही हे फारसे उमजत नाही. आता बोला! ती चक्क म्हणते, तुमचे फक्त पोट साफ होते. तुम्हाला आरोग्य या विषयात फार ज्ञान नाही. माझ्या सांधेदुखीवर कायम चूर्णाचा काही उपयोग झाला नाही. तात्यानी दिलेल्या नारायण तेल आणि योगराज गुग्गुळाचा मात्र हळूहळू गुण आला. माझ्या निरामय अस्तित्वात मी इतका प्रसन्न आहे, कि मी त्रागा करत नाही.
२. एखादा येईल, हिम्मत करून दोन डाव कायम चूर्ण घेईल. तो हि मोकळा होईल. निरामय जीवन यात्रेत सामील होईल.
३. एखादा निष्णात, नाडीपरीक्षा जाणणाऱ्या वैद्याकडे जाणारा रुग्ण येईल. तो पुरता मोकळा नसेल. कायम चूर्णाची महती वाचून थोडा गोंधळून जाईल. पुन्हा वैद्याकडे जाईल.
४. दोन चमचे कायम चूर्ण घेऊन रक्त ओकावे लागले तर काय, अशी भीती धरणारा एखादा अल्सर रुग्ण येईल. तो रोज एक चमचा सत इसबगोल घेतो, हळूहळू मोकळा होऊ शकेल अशी माझ्या ज्ञानात भर पडेल.
५. एखादा साक्षेपाने अभ्यास केलेला येईल. तो उगाच आधुनिक वैद्यकशास्त्र, आयुर्वेद, युनानी सगळेच उपयुक्त आहेत अशी बडबड करेल. दमेकरी, मधुमेही यांनी काय करायचे असे काल्पनिक प्रश्न विचारेल. याची मुळातच समजून घेण्याची वृत्ती नाही. याला आहे ती सगळी शुष्क माहिती आहे. मला माहितीमध्ये स्वारस्य नाही.

तात्पर्य: कुठलाही वैद्य/ हकीम/ उजव्या डोळ्याचे तज्ञ/ डाव्या कानाचे तज्ञ अथवा आधुनिक वैद्यकशास्त्र/ आयुर्वेद/ युनानी/ योगाभ्यास यांना मी पाठिंबा देऊ शकत नाही. अशा लोकांनी स्वतंत्र लेख लिहून आपली बाजू मांडावी. माझी त्याला ना नाही. पण माझ्या लेखावर प्रतिक्रिया देऊ नये इतकीच नम्र विनंती.

टीप: लेखात आरोग्य या जागी अध्यात्म आणि निरामय च्या ऐवजी निराकार असे वाचायला लेखकाची ना नाही. उलट तसे केल्याने धोंडो, मुत्तुस्वामी आणि मंदफार्त या तीन आधुनिक ज्ञानमार्गी संतांचे दर्शन स्पष्ट होण्यास मदतच होईल. असल्या ज्ञानमार्गाने बसल्या जागी, उभ्याउभ्याच 'मोकळे' झालेल्या सगळ्या महायोग्याना (कि महाभागांना) साष्टांग दंडवत घालून हा लेख त्यांच्या चरणी समर्पित करतो.

- मूकवाचक

धर्मप्रकटन

प्रतिक्रिया

राजेश घासकडवी's picture

4 Nov 2010 - 4:46 am | राजेश घासकडवी

___/\___

कुठचं वाक्य उद्धृत करू असा प्रश्न पडला आहे, कारण अंतरीच्या मुक्तीबद्दलची एकामागोमाग एक वरचढ सुभाषितं आहेत. एकंदरीत ही मुक्ती साध्य झाली नाही तर अनेक फेरे पडतात आणि इतक्या फेऱ्या करूनही आत्मा कोरडाच राहातो, असं कुठेसं वाचलं होतं ते आठवलं.

मंदफार्त... अग्ग्गाग्ग्गाग्ग्गाग्ग्गा....

शुचि's picture

4 Nov 2010 - 5:23 am | शुचि

लेख खूप आवडला याचं कारण हे की एक चांगला लेखक इतक्या "ग्रोस" प्रक्रियेला साहित्यिक मजेशीर "स्पिन" देऊ शकतो हे मी फक्त दुसर्‍यांदा पहाते आहे . पहील्यांदा - http://www.misalpav.com/node/11989 येथे हे पाहीलं होतं.
कौतुकास्पद आहे. बहोत खूब!!!!!!!

सुक्या's picture

4 Nov 2010 - 5:05 am | सुक्या

धन्य आहात !!

बाकी ते 'लेख वाचण्यापूर्वी 'नंतर का टाकले असेल बरे?

सन्जोप राव's picture

4 Nov 2010 - 5:46 am | सन्जोप राव

'ती' जीवघेणी कळ येऊन 'नावरे आवरिता' अशी अवस्था व्हावी तसे या वाचकाचे झाले आहे. प्रतिसाद देऊन 'मोकळे' होण्याला आता पर्याय नाही.
'जीवन नावाच्या जनावराचा वास असलेला' लेख. अस्सल, जातिवंत प्रतिभा विषयांच्या चौकटींमध्ये बद्ध होऊ शकत नाही आणि संधी मिळताच अशी कोंडी फोडून बाहेर पडते. आयुष्याला खरखरीत, जाड स्पर्श करणार्‍या अशा जाणिवांमधूनच लेखक आणि वाचक या दोघांनाही मुक्तीचा नवश्वास मिळतो. रोजच्या मळकट, चेंबटलेल्या अनुभवाला कल्पनेची जोड मिळाली की डालड्याच्या डब्याचे टमरेल करावे तसा नवनवोन्मेषी कल्पक आविष्कार साकार होतो हे अधोरेखित करणारा लेख.

ज्ञानेश...'s picture

4 Nov 2010 - 9:10 am | ज्ञानेश...

लेख आणि प्रतिसादही नंबर एक.
ह ह पु वा.

शुचि's picture

4 Nov 2010 - 11:07 am | शुचि

सन्जोपरावांचे प्रतिसाद उंबराचं फूल असतात पण अतिशय वाचनीय असतात.

पुष्करिणी's picture

4 Nov 2010 - 11:57 pm | पुष्करिणी

+ १

लेखन आणि प्रतिसाद दोन्ही महान

सूड's picture

4 Nov 2010 - 2:55 pm | सूड

+१

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Nov 2010 - 9:59 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आमच्या ब्रिटिश दादूसची सुखाची व्याख्या आठवली.

मंदफार्त... अगायायाया ...

पिवळा डांबिस's picture

4 Nov 2010 - 10:40 am | पिवळा डांबिस

या विषयावरचा बिरटिश दादुसचा लेख सगळ्यात बेष्ट!!!
बाकी सगळे आपले यथातथा!!
"ठीक आहेत" इतकंच!!

विजुभाऊ's picture

4 Nov 2010 - 3:10 pm | विजुभाऊ

पिडांकाकाशी सहमत
बाकी हा लेख अत्यावश्यक आहे हे वाचून बरे वाटले

मृत्युन्जय's picture

4 Nov 2010 - 11:20 am | मृत्युन्जय

आयला धन्या आहात तुम्ही. मी वेडा झालोय इकडे हसुन हसुन.

कच्चा पापड पक्का पापड's picture

4 Nov 2010 - 4:40 pm | कच्चा पापड पक्क...

बद्धकोष्ठ वर गाण

जुदा होके भी तु मुझमे कही बाकी हे.

प्रभाकर पेठकर's picture

14 Aug 2013 - 2:19 pm | प्रभाकर पेठकर

बद्धकोष्ठ वर गाण

त्या 'ण' वर अनुस्वार किंवा एक मात्रा द्या राव! उच्चार जरा अवघड होतो आहे.

तिमा's picture

4 Nov 2010 - 7:06 pm | तिमा

हा लेख जाणीवेच्या पातळीवर न वाचता नेणीवेच्या पातळीवर सूक्ष्मात जाऊन वाचावा.

त्यानंतर 'ज्याला मोड आलेला असतो त्यालाच कमोड लागतो' सारखे रायडर्स सोडवावे.

प्राजु's picture

4 Nov 2010 - 10:51 pm | प्राजु

अशक्य आहात! :)

मिसळभोक्ता's picture

5 Nov 2010 - 3:52 am | मिसळभोक्ता

स्वामी अद्भूतानंदना गजकर्ण होते आणि सारखा कंड सुटत असे म्हणून त्यांनी वेदांत प्रसाराला वाहून घेतले होते अशी माझी धारणा आहे.

आईशप्पत !

मस्त रे !!!!!

शहराजाद's picture

5 Nov 2010 - 8:54 am | शहराजाद

धन्य आहात. ह ह पो दु.

Dhananjay Borgaonkar's picture

20 Jul 2012 - 2:07 pm | Dhananjay Borgaonkar

=)) =)) =))

मितभाषी's picture

20 Jul 2012 - 2:43 pm | मितभाषी

बोरगावकर काहून येवळे हासून रायले ब्वॉ...मले तं काही समजून नाय रायलं ब्वॉ.. :D :D :D

चित्रगुप्त's picture

20 Jul 2012 - 11:25 pm | चित्रगुप्त

समर्थांनी सांगितलेल्या 'बद्ध-मुमुक्षु-साधक-सिद्ध' चा नवीन आणि खराखुरा अर्थ आज उलगडला.
लगे रहो कायम भाई.

अक्षया's picture

24 Jul 2012 - 3:29 pm | अक्षया

मस्त लिहिले आहे..:)
लिखाण आव़डले..

सार्थबोध's picture

14 Aug 2013 - 10:32 am | सार्थबोध

कायम लक्षात राहील अशी शैली

पैसा's picture

14 Aug 2013 - 1:26 pm | पैसा

निराकार अध्यात्म!!

lol

प्रभाकर पेठकर's picture

14 Aug 2013 - 2:22 pm | प्रभाकर पेठकर

मूकवाचकांचे 'अमूक' एका विषयावरील अत्यंत वाचनिय विचार. मजा आली वाचताना.

होकाका's picture

10 Sep 2014 - 12:53 am | होकाका

हे अचानक मिळालं वाचायला. एका सदस्यानं दुवा पाठवला. सुरवातीला नीटसं कळलं नाही पण वाचत गेलो. आणि मग एकेक गोष्ट समजायला लागली. भन्नाट ... च्या मारी फटाक्!

होकाका's picture

10 Sep 2014 - 1:03 am | होकाका

पुन्हा एकदा वाचतोय .. बरेच संदर्भ नव्याने लागतायत. असेच आणखी काही "खास" लेख असल्यास कुणी लिंका टाकेल का? अगोदरच आभार... जबराट...!

वैभव जाधव's picture

29 Apr 2016 - 11:30 am | वैभव जाधव

हा लेख आजही तितकाच 'उपयुक्त' ठरतो आहे. त्यामुळे वर काढतोय.
- सं'पूsssर'ण शांतता!

तर्राट जोकर's picture

29 Apr 2016 - 11:54 am | तर्राट जोकर

काही 'स्वं'दर्भ कळले, बाकी हे धोंडो, मुत्तु, मंदफर्त कोण?