सारे तुझ्यात आहे.....(६)

जयवी's picture
जयवी in जनातलं, मनातलं
20 Apr 2008 - 2:07 pm

कांतिभाईंनी अल्बमचं नाव काय ठेवायचं असं विचारलं……. तेव्हा श्यामलीने (कामिनी केंभावी) सुचवलेलं नाव ओठावर आलं…”सारे तुझ्यात आहे” ब-याच जणांना छळलं होतं मी यासाठी. पण जेव्हा श्यामलीने सुचवलं……तेव्हा मनापासून आवडलं

कांतिभाईंशी भेट झाल्यानंतर दुस-या दिवशी पुण्यात “शाकाहारी रविवार” ह्या मायबोलीच्या गेट टू गेदर ला “वैशाली” मधे ब-याच मायबोलीकरांशी भेट झाली. मी पहिल्यांदाच सगळ्यांना भेटत होते. इतक्या दिवसांच्या रुजलेल्या नात्याचं असं मूर्त स्वरुप…… खूप खूप आनंद झाला.

पुणं सोडून मुंबईला जाणा-या बसमधे मनात गोड आठवणी जागवत मी प्रवास करत होते. देवाने तुला जे काय हवं ते मिळो असं जणू काही वरदानच दिलं होतं मला ! जे जे मी इच्छित होते त्या सगळ्या मागण्या देव पुरवत होता. आजचा दिवस अगदी परिपूर्ण वाटत होता. अवीची खूपच आठवण येत होती. आज त्यांच्या भरवशावरच मी इतकं सगळं करु शकले होते. इतका चांगला नवरा दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा देवाचे आभार मानले

मुंबईत पोचले. आता माझ्याकडे पुढच्या हालचाली करायला फ़क्त २ दिवस होते. कांतिभाई एका महिन्यात सीडी काढणार होते. म्हणजे साधारण १० मार्च पर्यंत सीडी हातात येणार होती. मी २ दिवसांनी म्हणजे १५ फ़ेब्रुवारीला कुवेतला परत जाणार होते. त्या दिवसातच हॉल वगैरे बघून सीडी प्रकाशनासाठी नक्की करावा लागणार होता. तिकडे माझ्या अद्वैतची वार्षिक परिक्षा १६ मार्चला संपणार होती म्हणजे प्रकाशनाची तारीख त्यानंतरच ठरवावी लागणार होती. माझे सगळे नातेवाईक मुंबईला कार्यक्रमाला येणार म्हणजे त्यांच्या सोयीनेच तारीख ठरवावी लागणार होती.

अभिजीत होताच सोबत. ह्या अभिजीतची पण कमालच म्हणायला हवी. हा मुलगा……इतका मोठा संगीतकार…… माझ्या प्रत्येक कठीण वेळेला माझ्या सोबत होता. प्रत्येक ठिकाणी अगदी जातीने बरोबर होता. आतापर्यंत त्याला कुठल्याही गीतकाराने किंवा निर्मात्याने इतका त्रास दिला नसेल इतकं छळलं मी त्याला. तोसुद्धा अगदी तेवढ्याच आपुलकीने माझी सोबत करत होता…. अगदी प्रत्येक ठिकाणी…..प्रत्येक कामात. आम्ही ठरवलं की उद्या आपण सगळे हॉल बघायला जायचं. पण कसचं काय…. राज ठाकरेंच्या अटक प्रकरणामुळे मुंबईत इकडे तिकडे प्रवास करणं धोक्याचं होतं. तो दिवस घरीच नुस्ता चुळबुळत काढला. दुस-या दिवशी मात्र अगदी अट्टाहासाने बाहेर पडलो. ४-५ हॉल बघितले….. पण तारखांचा भरपूर घोळ होता. त्यामुळे दादर-माटुंगा कल्चरल सेंटर निश्चित केला. मी त्याच रात्री कुवेतला वापस आले. जातांना कांतिभाईंना पुन्हा एकदा फ़ोन केला. त्यांनी निश्चिंत रहायला सांगितले. त्यामुळे जरा शांत मनाने कुवेतला परतले.

कुवेतला सुद्धा नुस्तं बसून रहायचं नव्हतं तर प्रकाशनाची सगळी तयारी करायची होती. इकडे अद्वैतची वार्षिक परिक्षा पण सुरु होणार होती. पाहुण्यांची यादी, हॉलवर न्यायच्या सामानाची यादी, निवेदक हेमंत बर्वे शी बोलणं, कार्यक्रमाची क्रमवार आखणी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गायकांशी बोलून तारीख पक्की करणे. ते सगळं अभिजीतनेच केलं. एकदा गायकांच्या तारखा मिळाल्यावर प्रमुख पाहुणे अशोक पत्की ह्यांची तारीख ही पक्की केली. सगळ्यांच्या मते २० मार्च ही तारीख ठरली. नंतरचे दोन दिवसही सुट्ट्या असल्यामुळे हाच दिवस निश्चित केला. तसा प्रकाश ने हॉलही बुक केला. एक मोठ्ठं काम झालं होतं.

मी तिकडे रेकॉर्डिंगला काढलेले फ़ोटो अभिजीत धर्माधिकारी (माझा अजून एक ऑर्कुटवरचा मित्र) ला पाठवले आणि त्याने ते चांगले सुधारुन परत पाठवले. त्यांचे प्रिंट घेतले. ते सगळे फ़ोटो मला प्रकाशनाच्या वेळी छानपैकी क्रमवार चार्ट पेपरवर लावायचे होते. शिवाय माझ्या कविता सुद्धा. त्याचे सगळे प्रिंट आऊट्स, अल्बमचं राईट-अप, टिव्ही चॅनेल्स ना पत्रं….अशी बरीच कामं होती. माझ्या ऑर्कुटवरच्या ब-याच मित्र मैत्रिणींची फ़ार मदत झाली. तुषार शेटे हा झी २४ तास मधला रिपोर्टर. त्याने त्याच्या चॅनेल शी बोलून ठेवलं होतं. कधीही न भेटलेले हे मित्र अतिशय आपुलकीने आपल्या परीने जी मदत होईल ती करत होते.

एका आठवड्‍यात कांतिभाईंची कव्हर डिझाईनची मेल आली. त्यात काही करेक्शन्स करुन कव्हर डिझाईन फ़ायनल केलं. अगदी मनासारखं, फ़्रेश डिझाईन झालं होतं. आता आमंत्रण ! छानसा मजकूर तयार केला आमंत्रणाचा आणि कांतिभाईच्या आर्टीस्ट ने आमंत्रण पत्रिका ही अगदी छान बनवली. सगळ्यांना आमंत्रणं पाठवली. सगळ्यांच्या भरभरुन शुभेच्छा आल्या. माझी इकडे स्वत:ची तयारीही सुरु होती. कुठली साडी, कुठली ज्वेलरी……. :) बॅगा आठवडा आधीच भरुन ठेवल्या होत्या. मी १० मार्चला जाणार होते आणि अवी आणि अद्वैत त्याची परिक्षा संपल्यावर १८ ला सकाळी पोचणार होते. मी तिकडे बाकीची सगळी तयारी करुन ठेवणार होते. अगदी आठवणीने सगळं सामान, सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन मी मुंबईत पोचले.

प्रकाश आणि अर्चना आले होते विमानतळावर घ्यायला. ह्या दोघांमुळेच मी इतका मोठा उपद्व्याप करु शकले. त्यांच्या मदतीबद्दल जितकं लिहावं तितकं कमी आहे. पोचल्यावर थोडा आराम झाल्यावर डोळ्यासमोर सगळी कामं दिसायला लागलीत. अभिजीत शी बोलून कशी सुरवात करायची ते ठरवलं. देवकी ताई, स्वप्निल आणि अशोक पत्कींना घरी जाऊन आमंत्रण द्यायचं होतं. २-३ दिवसात कांतिभाई त्यांच्या मुंबईच्या ऑफ़िसमधे सीडीज, पोस्टर्स आणि आमंत्रण पत्रिका पाठवणार होते. त्या मिळाल्याशिवाय गायक मंडळींकडे जाता येणार नव्हते. तोपर्यंत बाकीची तयारी सुरु होती. सगळ्या गायक, तंत्रज्ञ आणि मदतनीसांचा सत्कार करणार होतो त्यामुळे त्याची तयारी. भरपूर याद्या तयार होत होत्या ….सामान आणलं जात होतं. पिशव्यांवर नावं घालून तयार पिशव्या घरात एका कोप-यात साठत होत्या.

कांतिभाईंनी कबूल केल्याप्रमाणे सगळं सामान पाठवलं. मी आणि अभिजीत सगळं सामान तिकडे जाऊन घेऊन आलो. आमच्या इतक्या दिवसांच्या धावपळीचं सार्थक झालं होतं. अतिशय सुरेख पॅकिंग मधे आमचं स्वप्नं समोर दिसत होतं. आम्ही दोघांनीही देवाचे आभार मानले. ज्यांची ज्यांची मदत झाली त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद दिले मनात. ते गोड ओझं घरी घेऊन आलो. आज खूप थकलो होतो तरी थकवा अजिबात जाणवत नव्हता.

दुस-या दिवशी सकाळीच आम्ही निघालो. सगळ्यात पहिले स्वप्निल बांदोडकरांकडे. त्यांना आमंत्रण पत्रिका आणि ट्रॅक्स असलेली त्यांची गाणी त्यांना देऊन मग आलो अशोक पत्कींकडे. अशोकजींनी फ़ारच छान केलं स्वागत. आम्ही त्यांनाही आमंत्रण पत्रिका आणि सीडी देऊन आलो देवकी ताईंकडे. आतापर्यंत आम्ही खूप मोकळे झालो होतो त्यांच्याशी. दोनदा घरीही जाऊन आलो होतो. खूपच छान बोलतात त्या. त्यांचं बोलणं अगदी ऐकत रहावसं वाटतं. प्रत्येक वेळी त्यांना भेटून काहीतरी अजून करायला हवं अशी भावना तीव्रतेने जाणवली. खूप कळकळीने बोलतात त्या संगीताविषयी. त्यांच्याकडून आम्हाला खूपच उत्तेजन मिळालं.

वैशाली मात्र मुंबईत नव्हती. तिची भेट थेट १७ लाच होणार होती. आमची बाकीची तयारी सुरुच होती. आमचं बॅनर बनवलं अभिजीतच्याच अजून एका टॅलेन्टेड मित्रानं. प्रणव धारगळकर नं. आतापर्यंत अभिजीतने ज्या ज्या कुणाला मला भेटवलं तो तो प्रत्येक मित्र जबरदस्त कलाकार होता आणि तरीही अतिशय साधा. काय लाघवी गोतावळा होता अभिजीतचा. मला पण त्यांनी त्यांच्यात लगेच सामावून घेतलं. तर हा प्रणव सुद्धा एक उच्च कलाकार. त्यानेसुद्धा अगदी धडपड करुन आम्हाला सुरेख, स्टेजला भारदस्तपणा आणणारं, अगदी आमच्या मनासारखं बॅनर बनवून दिलं. ऑफ़िसमधून आल्या आल्या चक्क रात्री साडे-नऊ पर्यंत तो आमचं काम करत होता.

जीवाला जीव देणारी माणसं जोडली आहेत ह्या अभिजीतनं. ह्याला कारण त्याचे संस्कार. त्याचे आई-बाबा सुद्धा इतके प्रेमळ आहेत ना…. मला तर त्यांनी अगदी स्वत:च्या मुलीसारखं प्रेम दिलं आणि मी ही मस्तपैकी हक्काने सगळे लाड करवून घेतले. चिकन काय, फ़िश फ़्राय काय….. काकूंनी अतिशय प्रेमाने खाऊ घातलं. काकांबद्दल काय बोलावं. प्रचंड वाचन आहे त्यांचं. शब्दप्रभू आहेत ते. कायम त्यांचं काहीतरी लिखाण सुरु असतं. अगदी मनापासून कौतुक करणारे, खूप खूप हळवे. प्रत्येक आनंदाच्या क्षणी, टेन्शन्च्या वेळी काकू-काकूंचा आम्हाला खूपच आधार होता. मी, अभिजीत, प्रकाश अर्चना, काका, काकू…… आम्ही सगळेच ह्या प्रोजेक्ट मधे आकंठ बुडालो होतो.

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

अभिज्ञ's picture

20 Apr 2008 - 2:29 pm | अभिज्ञ

आपले लिहिलेले सर्वच भाग वाचले.
सर्वच भाग आवडले.
खुपच ओघवत्या शैलीत लिहिले आहेत.!!!

आपल्या ह्या संगीत वाटचालिला आमच्याहि शुभेच्छा.

अबब.

चित्रा's picture

20 Apr 2008 - 9:06 pm | चित्रा

प्रथमतः अभिनंदन! ही गाणी नक्कीच ऐकीन. आणि तुमच्या या लेखनातून एखादे
गीत तयार होण्याच्या मागच्या प्रक्रिया समजतायत. छान!

जयवी's picture

21 Apr 2008 - 11:35 am | जयवी

अबब, अहो..... ह्या प्रवासाचे प्रत्येक टप्पे इतके मनापासून जगले आहेत ना....... त्यामुळे अजूनही मी त्याच जगात वावरतेय असं वाटतंय :)
तुमच्या शुभेच्छांबद्दल खूप खूप आभार !!

चित्रा, धन्यवाद गं....!! गाणी ऐकल्यावर नक्की कळव आवडली की नाही ते :)