पत्र
प्रिय अबक,
तुला नवल वाटेल मी तुला अचानक हे पत्र लिहीत आहे म्हणून परंतु मला माझ्या भावना कागदावर उतरवणं आवश्यक बाब वाटली. कोणतही नातं हे तुमच्या जीवनात विशिष्ट हेतू, ध्येय घेऊन येतं आणि तो हेतू साध्य झाल्यावरच ते अनंतात विलीन होतं यावर माझा विश्वास आहे. तुझं नेहेमीचं मिष्कील हसू हसलास ना? नाही रे हे घोकंपट्टी केलेलं पुस्तकी वाक्य नाही. हा तर माझा स्वानुभव आहे. मला जाणवलेलं सत्य आहे हे.
आपलं नातं या सत्याला अपवाद कसं असेल? आपल्यामधे तुला परस्यू मी केलं. मी तुला भेटत राहीले वारंवार, इमेल पाठवल्या, या निमित्ताने तर कधी त्या निमित्ताने मैत्री वाढविण्याचा प्रयत्न केला. तुझ्या व्यक्तीमत्वाची, तुझ्यातील कलाकाराची मला अतोनात भुरळ पडली होती, आहे. कोणी विचारलं असतं तर मला नक्की सांगता आलं नसतं पण मी ठाम होते, आहे. तू तर जात्याचा सौजन्यशील. मोठ्या मनानी तूदेखील माझी मैत्री स्वीकारलीस, दोस्तीचा हात पुढे केलास. इथवर सगळं गाडं सुरळीत होतं.
खरी परीक्षा नंतर सुरू झाली. मैत्री की आकर्षण या नाजूक , निर्णयक्षम, दोलायमान स्थितीत आपण काही काळ घालवला.त्या काळात कस लागला तो माझ्या आत्मविश्वासाचा, संवादकौशल्याचा.
मी आतापर्यंत जरूर वाचलेलं होतं की जोवर तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही तोवर तुम्ही दुसर्यावर प्रेम करू शकत नाही. पण मला याची प्रचीती येईल असं कधीच वाटलं नव्हतं कारण इतक्या धबडग्यात स्वतःवरचं प्रेम तपासून पहाण्याची संधी मी कधी घेतलीच नव्हती.
आपल्या "कोर्टशिप्"च्या काळात मी वारंवार ठेचकाळले. मला या सत्याला सामोरं जावं लागलं की मला मी कुठेतरी कमी वाटते, मी स्वतःवर टीकेचा आसूड ओढते, मला माझ्यात न्यूनच न्यून दिसतं, मी स्वतःला कुणासाठीच "गुड इनफ" समजत नाही. आणि हे असं स्वतःला मनाच्या आरशात सामोरं जाणं खूप क्लेशदायक होतं.
तू जेव्हा भरभरून बोलत असायचास तेव्हा मी गप्प रहायचे न जाणो काहीतरी चूकीचं बोलून बसेन, न जाणो तुला माझे विचार अतिशय कमी बौद्धीक पातळीवरचे वाटतील. आपल्यातील अखंड सुसंवादाचा प्रवाह आपल्या बाजूनी खंडीत झालेला असायचा. तुलाही हे चूकीचं वाटायचं पण नक्की काय ते कळायचं नाही कारण तू देखील अननुभवीच तर होतास माझ्यासारखाच. आपल्या प्रत्येक भेटीनंतर माझं मन चुकचुकत रहायचं - मी हे बोलू शकले असते, मी ते बोलू शकले असते. मनाची अशा चुकचुकण्यानी फक्त अधिक शकले व्हायची. तू येण्याआधी मी एकटी होते पण आता माझ्यातल्या कमतरतांमुळे दुकटी असूनही एकाकी झाले होते.
लॅकलस्टर अशी मी किती काळ तुला बांधू शकणार होते? शेवटी रेंगाळत रेंगाळत का होईना आपण या निर्णयाप्रत आलो की आपली फक्त निखळ मैत्री राहू शकते, फक्त मैत्री.. त्या निर्णयाचा अर्थ मला नीट माहीत होता.मला तुझी मैत्री नको होती कारण ते म्हणजे ओढून ताणून नातं फरफटवणं झालं असतं. म्हणून मग मी ही हळूहळू दूर गेले. आजचं हे पत्रं तुला माझी भूमिका सांगण्यासाठी. माझ्या मनात कसलाही कडूपणा नाही. आय होप यु अंडरस्टँड!
~ शुचि
प्रतिक्रिया
क्या बात है! अप्रतिम आणि
बीजगणित
कोर्टशिपवरुन म्हणत आहात का?
सॉरी
हा हा हा बरं आहे आमचं गणित
मुलांनो सोडवा. तर अबक =
छान पत्र आहे.
हे असं छान, नेमक्या शब्दात
असंच काहीस..
सर्वांना खरोखर मनापासून