'असल उत्तर'! भाग-३
आधीच्या भागात म्हटल्याप्रमाणे, पाकिस्तानी सैन्याने (११ वी डिव्हिजन) खेमकरण जवळचा काही भाग ताब्यात घेउन भारतीय भूभागात प्रवेश केला होता (अशाप्रकारे ताब्यात घेतलेल्या भागाला बहुतेकदा 'ब्रिजहेड' असा शब्द वापरतात, जिथे सैन्याची जमवाजमव करून पुढे हल्ला केला जातो). पाकिस्तानच्या ताब्यात साधारणतः ३०-४० चौ. कि. मी. एव्हढा भाग आला होता. पण यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा भूभाग बरेच कालवे, नद्या आणि ओढे ह्यांनी बर्यापैकी वेढलेला होता. ह्या भौगोलिक परिस्थितीचा भारतीय सैन्याने अतिशय योग्य असा वापर 'असल उत्तर' च्या लढाईत करून घेतला. भारतीय सैन्याने ठिकठिकाणी कालवे फोडून आसपासच्या भागात पाणी सोडून दिलं, ज्यामुळे पाकिस्तानी सैन्याला हालचाल करणं कठीण होउन बसावं. ('बहुगुणीं'नी मागच्या भागाला लिहिलेल्या प्रतिसादात ह्या संदर्भातल्या विडिओची लिंक दिलेली असल्याने पुन्हा इथे देत नाही).
पाकिस्तानी चिलखती दलाच्या १ल्या डिव्हिजनच्या ५ ब्रिगेडनी केलेल्या हल्ल्याने 'असल उत्तर' च्या लढाईला सुरूवात झाली. भारताच्या ४थ्या माउंटन डिव्हिजनच्या मदतीला आता २ र्या चिलखती ब्रिगेडच्या २ रेजिमेंट (१ AMX-13 आणि १ 'सेंचुरियन' रणगाडा रेजिमेंट) आल्या होत्या. तर पाकिस्तानच्या १ ल्या चिलखती डिव्हिजनबरोबरच ११ वी इन्फ्रन्ट्री डिव्हिजनही ह्याच भागात होती.
भौगोलिक परिस्थीती जरी बरिचशी भारतीय सैन्याला अनुकूल असली, तरी भारतीय सैन्याची युद्धसामग्री पाकिस्तानचा पराभव करण्याएव्हढी नक्कीच सक्षम नव्हती. शेरमन रणगाड्यानी लांबून डागलेले तोफगोळे 'पॅटन' रणगाड्यांच चिलखती संरक्षक कवच भेदण्यास असमर्थ होते (बहुतेकदा ते चिलखती कवचाला आपटून खाली पडत. त्याच इंग्रजीत केलेलं वर्णन म्हणजे "At longer ranges Indian shot simply bounced off the Pattons" ). भारतीय सैन्याकडे असलेले AMX-13 हे रणगाडेही फार फार तर टेहळणी करण्याकरता वापरता येण्यासारखे होते. चिलखती कवच असलेली एक गाडी यापेक्षा जास्त त्यांचा उपयोग (एकूण परिस्थिती संदर्भात) नव्हता, असे ह्या लढाईचे अभ्यासक मानतात. भारताकडे असलेल्या 'सेंचुरियन' रणगाड्यांची अवस्थाही 'शेरमन' पेक्षा फार वेगळी नव्हती. आधीच्या भागात म्हटल्याप्रमाणे भारतीय सैन्याकडे असलेल्या तोफांची संख्या आणि क्षमता फारच मर्यादित होती. एकूण पाहता ह्या लढाईत पाकिस्तानकडे असलेल्या रणगाड्यांच संख्याबळ हे ३:१ अस होत. दोन्ही बाजूंकडे असलेलं एकूण मनुष्यबळातही (संख्याबळाच्या दृष्टीने) फार फरक नव्हता. 'पॅटन' रणगाडे भेदण्यासाठी त्यांच्यावर फार जवळून मारा करणं हा एकच मार्ग होता. अशा परिस्थितीत पाकिस्तानी रणगाड्याना रोखणं जवळपास अशक्य होतं.
त्यातच पाकिस्तानच्या सैनिकी दलाचे प्रमुख (चीफ ऑफ जनरल स्टाफ) स्वतः युद्धभूमीवर येवून त्यांच्या सैन्याला आदेश देत होते (काही अभ्यासकांच्या मते ही कृती पाकिस्तानसाठी घातक ठरली, पण त्यातून पाकिस्तानने 'असल उत्तर' जिंकण्यासाठी किती जोर लावला होता, हेही दिसून येतं).
इथे भारतीय सैन्याच्या धाडसाच आणि व्युव्हरचनेच कौतुक करावं तेव्हढ थोडं आहे. नुकत्याच तयार झालेल्या ऊसाच्या शेतात भारतीय सैन्याने आपले रणगाडे लपवून ठेवले आणि आपली जागा शत्रू सैन्याला कळू नये म्हणून पाकिस्तानी सैन्य ५००-८०० मी. पर्यंत जवळ आल्यावर प्रतिहल्ल्याला सुरूवात केली. घोड्याच्या नालेच्या आकारात केलेल्या संरक्षक रचनेमुळे पाकिस्तानच्या रणगाडे चांगलेच सापळ्यात अडकले. आणि त्याच्यांवर ३ बाजूंनी हल्ला झाला.
ह्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे आणि नक्की कोणत्या बाजूने हल्ला होतोय? हेच न कळल्यामुळे पाकिस्तानचं आघाडीवरच सैन्य पूर्णपणे गोंधळून गेलं. त्यातच भारतीय सैन्याने कालवे फोडून पाणी सोडून दिलं असल्याने जमीनही फार भूसभूशीत झाली होती, त्यामुळे पाकिस्तानी सैन्य रणगाडे आणि इतर सामग्रीही नीट हाताळू शकतं नव्हतं. पाकिस्तानी सैन्याची पुरती दाणादाण उडाली.
लढायचं सोडून बरेचसं पाकिस्तानी सैन्य अक्षरशः पळत सुटलं ते थेट सीमेपलिकडे पाकिस्तानी भूभागात पोहोचेपर्यंत थांबलच नाही. त्यातच काही पाकिस्तानी अधिकार्यांनी त्यांचे वरिष्ठ अधिकारी मारले गेल्यावर पुढील जबाबदारी स्विकारायलाच नकार दिला. ह्यातून ह्या पराभवामुळे हल्ला करणार्या पाकिस्तानी सैन्याच मनोबल किती खलावलं होतं, हे दिसून येत. एकूण ९७ 'पॅटन' रणगाडे ह्या एकाच लढाईत पाकिस्तानने गमावले (भारताने फक्त ८ रणगाडे गमावले होते). युद्धानंतर ह्या भागाला 'पॅटन नगर', 'पॅटन रणगाड्यांच कब्रस्तान' अशी बरीच नावं दिली गेली.
भारतीय सैन्याच्या दृष्टीने हा एक मोठा विजय होता कारण पाकिस्तानी सैन्याचा अभिमान असलेली त्यांची १ ली चिलखती डिव्हिजन ७ ते १० सप्टेंबर दरम्यान अक्षरश: निकालात निघाली. १० सप्टेंबर १९६५, म्हणजे आजच्याच दिवशी, 'असल उत्तर' ची लढाई आपल्या सैन्याने जिंकली.
अवांतरः हे तीनही लेख मी जालावर उपलब्ध असलेल्या लेखांच्या आणि पुस्तकांच्या काही भागातून मिळालेल्या माहितीच्या आधारे लिहीले आहेत. त्यात अजूनही काही रंजक माहिती हाती लागली आहे, ती सगळीच इथे देता येणं शक्य नाही. पण पुढे कधीतरी शक्य झाल्यास त्याबद्दलही लिहावं, असा विचार आहे. नाहीतर, ही लेखमाला इथेच समाप्त.
अतिअवांतरः 'असल उत्तर' विषयी वाचतानाच अचानकपणे १९६२ च्या भारत-चीन युद्धाविषयीही थोडी फार माहीती हाती आली. त्यातल्या 'रेझांग ला' विषयी पुन्हा कधीतरी.
Book traversal links for 'असल उत्तर'! भाग-३
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जबरदस्त..
मस्त झाली लेखमाला. चिनी
मस्त झाली लेखमाला. चिनी
छान आहे.तुम्हाला सापडलेले
ही घ्या अजून काही माहीती.
जबरदस्त! मस्तच झाली लेखमाला.
+१
+२
येस्स! जरुर लिहा. काही ठराविक
छान
मस्त जमलं असल उत्तर !!
एका हुषार व्यूह-रचनेची चांगली उजळणी
बरोबर! भारतीय सैन्याचे एकूण ३२ रणगाडे निकामी झाले....
छान
मस्त!!
लेखमाला आवडली...पुढील
मस्त!!
तिनही भाग आवडले.
लेखमाला आवडली.
सायबा, मस्त लिहिलंय. आवडलं.
घाई झाली हे नक्कीच.....
हरकत नाही देवा, त्यात काय
आम्हाला मेजवानी मिळतेय ना? नो
घाश्या मेल्या, गप की..का माझा