शब्द

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
14 Aug 2010 - 6:06 am

मी सिगारेट का सोडली. श्री सुधीर काळे ह्यांचा लेख वाचून पुर्वी लिहून ठेवलेली ही स्वानुभवाची कथा आठवली. .......
'
शब्द.

फ़ोनची घंटी वाजताच स्वातीने धावत जाऊन फ़ोन उचलला.
मी अगदी मजेत आहे आई. तू काळजी करू नको.

काळजी वाटणारच गं! लग्नानंतर इतक्या लांब गेलीस. तिथे तुम्ही दोघेच. सगळं घर लावायचं. कोणी मदतीला नाही..... विकास काय म्हणतात?

त्याचं काम छान सुरू आहे. संध्याकाळी तसा लवकरच घरी येतो. दिवसभर मी एकटीच घरी.
तू काळजी घे बाई.

आई तू आली असतीस आमच्याबरोबर तर किती छान झाले असते! पण तुझी शाळा. ते काही नाही, आता पुन्हा प्रयत्न कर आणि लवकर ईकडे ये...
स्वातीचा आवाज कातर झाला.

अग आता रडू बिडू नकोस हं... येईन मी. फ़ोन करत जा. चल ठेवते आता.
बरं, मी वाट बघते तुझ्या येण्याची. चल बाय..
*****************************
विकासने स्कूटर घरच्या अंगणात स्टॅन्डवर ठेवली. कंपनीतून येतांना वाटेत जैननी पकडल्यामुळे थोडा उशीरच झाला. स्वाती अंगणातच वाट पहात उभी.
काय गं, फ़िरायला जायच? चल चहा घेऊन निघू.

आज उशीर झाला?

अगं, जैन बरोबर जरा कोपऱ्यावर गप्पा मारत उभा होतो.

गप्पा म्हणजे पानाच्या ठेल्यावर सिगरेट फ़ुंकत होतास ना?

छे गं! बरं, कुणाचा फ़ोन वगैरे?

अरे, आईचा आला होता. मी म्हटलं तिला, लवकर इकडे ये. मला एकटीला कंटाळा आला.

मग आई येणार म्हणली कां?

काय माहीत तिचे केव्हा जमते ते! मला खरच खूप कंटाळा आलाय. ह्या छोट्याशा गावात माझ्याजोगी धड नोकरी पण नाही.

हो नं! आणि आमच्या कंपनीत देखील सद्ध्या काही चान्स नाही. बघुया. कदाचित पुढे मिळेल. बर चलणार ना बाहेर फ़िरायला?

हो तू शर्ट तर बदल. आणि काय रे, सिगरेट पीत नव्हता म्हणालास, मग येवढा वास कसा येतो आहे शर्टला?

ते अगं, जैन पीत होता ना जवळ उभा राहून म्हणून असेल.

खोटं नको बोलू. खर सांग दिवसात आज कीती?

अगदी खरं फ़क्त दोन, तुला प्रॉमीस दिल्याप्रमाणेच. हे पाकीट बघ दोनच संपल्या आहेत.... (आता हिला हे काय कळणार, की दोन सिगरेट तर नवीन पाकीटातल्या संपल्या. त्याआधी एक रिकामे झालेले पाकीट ऑफ़ीसमधेच फ़ेकले!)

अरे पाकीट दाखवायची काही गरज नाही. माझा विश्वास आहे तुझ्यावर.
*****************************
आज घरी यायला नेहमीपेक्षा बराच जास्त उशीर झाला. राणेनी नेमकी ऑफ़ीस सुटायच्या वेळीच अर्जंट मीटींग बोलावली. प्रॉडक्शनच्या समस्यांविषयी काथ्याकूट. तीन तास आणि सिगरेटची दोन पाकीटे धुरात नाहीसे झाली. तिकडे स्वाती जाम भडकली असेल. लॅच कीने दार उघडून विकास घरी आला. घरात अंधार. स्वाती बेडरूम मधे किंवा कुठेच दिसेना. आता ह्या वेळेस तर ही कुठे बाहेर जाणे शक्यच नाही. विकास किचनकडे पाणी घ्यायला वळला. बेडरूमच्या खिडकीचा पडदा हलल्यासारखा वाटला. खिडकी उघडी टाकली आहे वाटते? विकासने पडदा बाजूला सारून पाहीले. पडद्यामागे खिडकीच्या ऐसपैस वरवंडीवर, स्वाती गुमसूम बसलेली.

अग हे काय, तू इथे का बसलीस अशी?

......

काय झालय काय तुला? अग अचानक मिटींग निघाली, ती संपल्याशिवाय कसे येणार?

.....

आणि तू काय रडत होती कां? काही झालं का? तब्येत ठीक आहे नं?

तू आधी शर्ट बदल. केवढी सिगरेट पिऊन आलास? कमी केली म्हणाला होतास ना?

अग मिटींगमधे खूप वैताग होता. म्हणून नेहमीपेक्षा एखादी जास्त. विकास संपवलेली दोन पाकीटे नजरेआड करीत म्हणाला.. पण तू का अशी बसलीस लपून?

काही नाही. एकटी असतांना अशीच आईची आठवण येत होती.

अग मग अस पडद्याआड गुरफ़टून बसण्यापेक्षा, जरा शेजारी गेली असतीस. बर ते जाऊदे. मला वाटते, तू एखाद महीन्यासाठी आईकडे जाऊनच ये.

खरच? आणि तू इकडे एकटा...

मला काय प्रॉब्लेम? लग्नाआधी एकटाच तर होतो!

काही नको. म्हणजे मी गेल्यावर तुझी सिगरेट पुन्हा बेबंद सुरू होणार. मोठ्या मुष्कीलीने रोज दोन तीन वर प्रमाण आणले आहे. एकटा असला की ऑफ़ीसमधे, घरी सगळ्या चांडाळ चौकडी बरोबर नुसते धुरांडे सुरू होईल.

लग्नानंतरचे सहा महीने विकासच्या डोळ्यासमोरून गेले. रोज दोन तीन पेक्षा जास्त सिगरेट पिणार नाही असे वचन स्वातीला दिले. पण प्रमाण काही कमी होईना. हे सुरवातीला जेव्हा तिच्या लक्षात आले, तेव्हा तिने खूपच गोंधळ घातला होता. नवीन घरात तिचा एकटेपणा पाहून त्यालाही तिची दया आली, आणि त्याने रोज फ़क्त दोनच हे बंधन घालून घेतले. ती कशीबशी तयार झाली. पण पट्टीचा स्मोकर, पिणे कधी कमी करू शकतो का? कीतीही प्रयत्न करून ते शक्य झाले नाही, तेव्हा रोज दोन पाकीटे संपवून तो आपण फ़क्त दोनच सिगरेट प्यायल्या असे सांगून वेळ मारून नेऊ लागला.

अग तू बिनधास्त जा. आता मला सवय झाली आहे ना कमी पिण्याची. तू नसतांना मी उगाच वाढवीन कशाला?

तसा माझा तुझ्यावर विश्वास आहे रे. पण तुझी ती चांडाळ चौकडी.. तो जैन, मेह्ता, पाटील सगळी जन्मजात धुरांडी मेली.

काहीतरीच काय. म्हणजे मलाही तू चांडाळ म्हणालीस की. आणि ते काय जन्माला येता फ़ुंकतच आले काय़? म्हणे जन्मजात धुरांडी. ते जाऊ दे. तू ख्ररच माझी काळजी न करता आईकडे जा. मी एकदा शब्द दिला म्हणजे दिला.
*********************************
स्वाती माहेरी जाऊन महीना झाला. ती येण्याची वेळ झाली होती. ती येण्याआधी विकासने घरात शेवटची बीयर पार्टी दिली.

हे बघा, स्वाती आल्यावर तिला पताही लागला नाही पाहीजे आपल्या मस्तीचा. आणि मेहता, ही जमलेली रिकामी पाकीटे आधी फ़ेक सगळी.

अरे हो हो. आम्हाला तुझी लीमीट माहीत आहे. रोज फ़क्त दोन. मेहता डोळे मिचकावित म्हणाला.

आणि महीन्यात कीती पाकीटे संपली ते गुपीत ठेवण्यासाठी तू एक पार्टी नंतर देण्याचे कबूल केले आहेस, तेव्हा आम्ही बिलकूल विघ्नसंतोषीपणा करणार नाही. पाटीलने आश्वासन दिले.

स्वाती आल्यावर दिवस पुन्हा नेहमी सारखे भराभरा जाऊ लागले.
**********************************
चांडाळ चौकडी मधे जैन आणि मेहता बॅचलरच होते. ते दोघे बॅचलर आणि विकास स्वाती, शिवाय चौकडीतला पाटील व त्याची बायको राणी मिळून सहा जणांची मस्त दिवसभराची धमाल पिकनिक गावाबाहेर दहा मैलावर गराडी महादेव ह्या नदीच्या खोल घळीत असलेल्या स्पॉटवर झाली. शोले मधल्या अरे ओ सांबा प्रसंगाला अनुरूप दगडांच्या राशी. त्यावर एकेक बॅचलर सांबा बसलेला. खाली दगडांच्या चुली मांडून त्यावर राखेत बाटी शेकत पडल्या आहे. हातात कोण जाणे कितवी बीयर घेऊन पाटील आणि विकास आपण दाल बाटी बनवीत आहे हे जगाला दाखवत आहेत. स्वाती आणि राणी मधून मधून आज जेवायला खरच मिळणार की नाही हे विचारत आहेत. अशा थाटात ही पिकनीक साजरी झाली. पिकनीकच्या निमीत्याने विकासने विनालगाम सिगरेट पिण्याचे स्वातंत्र्य भोगून घेतले. एक दिवस तर पितोय मित्रांबरोबर मजा करतांना. म्हणून स्वाती जास्त कटकट करणार नाही, हे तो जाणून होताच. झालेही तसेच. पण रात्री घरी आल्यावर दिवसा थांबवलेला हल्लाबोल होईल असो त्याला वाटले नव्हते.

मी पहात होते. आज तू पुरा उंडारला होता. मी बोलत नाही असे पाहून, सरळ माझ्यासमोरच तीन पाकीटे संपवली तू.

छे ग. तीन पाकीटे कुठे? अग, पाटीलला देत होतो काढून. हा, आता माझ्या बहुदा नेहमी पेक्षा पाच सहा जास्त झाल्या असतील. पण रोज रोज थोडेच होते असे?

माहीते तुझे रोजचे लॉजीक. ते काही नाही. आता तू सिगरेट एकदम पूर्ण पणे सोडली पाहीजे. दोन नाही न चार नाही. बंद म्हणजे बंद.

अग असं एकाएकी काय झाल?

मी पहाते आहे ना तुझ रोजचं. शिवाय मला तिकडे बाबांनी सांगीतल. सिगरेट अशी थोडी थोडी करून कधीच सुटू शकत नाही. तू आता मला पूर्णपणे सोडायचे प्रॉमीस दे.

त्यानंतर स्वातीने विकासच्या मागे सतत एकच रट लावली. सिगरेट सोड. बायकांकडे आसू हे फ़ार मोठे शस्त्र असते नां! शेवटी त्याला हो म्हणण्याखेरीज काहीच पर्याय उरला नाही. ऑपरेशन क्वीट स्मोकींग सुरू झाले.

स्वातीचा रडकुंडीला आलेला चेहरा आठवून आठवून पहीले दोन दिवस तर एकदम धूर विरहीत गेले. स्वाती अगदी खुशीत होती.

"हे असं निदान चार महीने सुरू राहीलं, तर नक्की सुटली असे समज." तिने आशा दाखवली.

चार महीने ऐकताच विकासच्या पोटात गोळा आला. दोन दिवस कसे काढले होते ते त्याला माहीत.

"बघु या. सुरवात तर झाली आहे. मला वाटते मी सुपारीच्या पुड्या बरोबर ठेवत जाईन. म्हणजे तलफ़ आली की टाकली तोंडात."

हो अरे. खरच घेऊन जात जा. आणि मी संतोषी मातेचे सोळा सोमवारांच व्रत पण करणार आहे तुझी सिगरेट सुटावी म्हणून.

विकासला काही खात्री नव्हती हे जास्त दिवस सुरू राहील. पण आठवडाभर त्याने खरच मनापासून प्रयत्न केला. आणि खरच, एक पूर्ण आठवडा कोरा गेला. त्याने मोठ्या आनंदाने ही बातमी स्वातीला सांगीतली. तिनेही लगेच "संतोषी माते तू पावणार ग मला" म्हणत देवापाशी जाऊन हात जोडले. मात्र असे व्हायचे नव्ह्ते. एक दिवस बॉस मोठ्या खडूस मूड मधे होता. विकासच्या एका छोट्याशा चुकीचे त्याने अवडंबर माजवले. विकासला इतरांसमोर लेफ़्ट राईट फ़ायरींग मिळाली. सुन्न मनस्थीतीत बारा दिवसांच्या विरहानंतर त्याने शुभ्र परीचा झुरका घेतला. आणि त्यावेळेस त्याला एकदम कीकच आली. नशा केल्या सारखे वाट्ले. ह्या आधी रोज सिगरेट पितांना अशी जबरदस्त कीक कधीच आली नव्हती. मधे काही दिवस ऍबस्टेन राहीले की पहील्या सिगरेटची मस्त नशा येते ही नवीन जादूच कळली. त्या नशेत पूर्ण पाकीट कसे संपले हे पण कळले नाही. अर्थात त्याने रात्री घरी जाण्या आधी मसाला पान खाण्याची काळजी घेतली. स्वातीला ’सिगरेट पासून दूर रहाण्याची नवीन युक्त” अशी मसाला पानाची आयडीया म्हणून सांगीतले.

नंतर हा एक खेळच झाला. पाच सहा दिवस सिगरेट बंद ठेवून नंतर मस्त नशा अनुभवायचा. पुढे पुढे हा नशा लवकर यावा म्हणून फ़क्त दोन दिवस बंद, व तिसऱ्या दिवशी यज्ञकुंड, असे वेळापत्रकच सुरू झाले. त्यानंतर, दोन दिवस बंदच्या वेळात फ़क्त एकच घेतली, तरी तिसऱ्या दिवशी तीच जादूची नशा होते हा शोध लागला. मग काय! रोज मसाला पान जिंदाबाद. ऑफ़ीसमधल्या मित्रांच्या न कळत पिण्याची खबरदारी त्याने आवर्जून घेतली.

विकास, अरे माझे बारा सोमवार झालेत. आत्तापर्यंत तू एकपण प्यायला नाहीस ना? अगदी खऱ्र सांग.

छे गं! एकपण नाही. आता सुटली असे वाटते.

तू किती चांगला आहेस विकास. मला केवढी मोठी गीफ़्ट दिलीस!

अग माझ काय प्रिन्सीपल आहे, एकदा शब्द दिला म्हणजे दिला.

थॅन्क्यू विकास! तुला काय पाहीजे ते मला सांग.

ते रात्री. की आत्ताच सांगू?

चल. जास्त लाडात येऊ नकोस.

का कोणास ठाऊक, पण ह्या नंतरच्या तिसऱ्या दिवशीच्या नशेच्या खेळात कीक आलीच नाही. सिगरेट पितांना स्वातीचा भोळा विश्वासू चेहरा डोळ्यासमोर आला. किती चटकन तीने आपल्यावर विश्वास टाकला! तोच मोठा प्रॉब्लेम झाला. ह्यापेक्षा मी नाही प्यायली असे म्हटल्यावर तिने उलटतपासणी घ्यायला हवी होती. शर्टचा वास घेऊन पहायला हवे होते. तिने काही जरी प्रश्न केले असते तर आता वाटत असलेली अपराधी भावना आली नसती. मग चोर शिपाई खेळात तिला कसे बनवले म्हणून पितांना सिगरेटची खुमारी वाढली असती. पण स्वाती अशी बावळट! नवऱ्यावर इतका आंधळा विश्वास तिने का टाकावा? त्याने अस्वथपणे दोन झुरके घेतले खरे, पण लगेच सिगरेट चुरगाळून टाकून दिली.

सोळा सोमवार पूर्ण झाले. उद्यापन करण्याच्या आधी स्वातीने पुन्हा विकासला विचारले. मी मागे तुला विचारले होते, त्यानंतर तू खरच एक पण प्यायला नाही नां?

"अगं खरच नाही." दोन झुरक्यानंतर फ़ेकलेली सिगरेट "एक" म्हणून मोजायची काहीच गरज नसल्याने विकास ठासून उत्तरला.

त्याचा चेहरा आत्मविश्वासाने झळाळून उठला होता. स्वातीचा निरागस, नवऱ्यावर अंधविश्वास टाकणारा चेहरा त्याने प्रेमाने निरखला. यापुढे ह्या निरागस चेहऱ्याचा विश्वासघात करण्याचे हीन कृत्य तो कधीच करणार नव्ह्ता......

कथाअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

मस्त कलंदर's picture

14 Aug 2010 - 11:54 am | मस्त कलंदर

निदान हा मनुष्य सिगरेट सोडेन असे तरी बायकोला आश्वासन देत होता.. याबाबतीत आमचा एक स्नेही याहीपेक्षा वरचढ. बायको म्हणाली, "मी तुला शेवटचे विचारतेय, तू सिगरेट कधी सोडणार आहेस?"
यावर याचे बेरकी उत्तर," पुढच्या जन्मी. आणि तू आत्ताच म्हणाली आहेस शेवटचं विचारतेय म्हणून. आता परत विचारायचे नाही!!!"
या संवादानंतर पुढे काय झाले ते मी अजून विचारले नाहीय!!! :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Aug 2010 - 3:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमच्या स्नेह्याने सिगरेट सोडण्यासाठी त्याला शुभेच्छा आणि त्याच्या बायकोला त्याहूनही जास्त!!

विसुनाना's picture

14 Aug 2010 - 1:22 pm | विसुनाना

इतरांनी टाकलेल्या भरवशाची टोचणी सर्वात परिणामकारक असते - मनाची लाज असेल तर.

स्पंदना's picture

14 Aug 2010 - 7:22 pm | स्पंदना

उत्तम कथा !
जनापेक्षा मनाची ..म्हणतात ते यालाच बहुतेक.

मदनबाण's picture

14 Aug 2010 - 7:41 pm | मदनबाण

हेच म्हणतो...

इंटरनेटस्नेही's picture

15 Aug 2010 - 5:51 am | इंटरनेटस्नेही

कथा आवडली. :)

नगरीनिरंजन's picture

16 Aug 2010 - 9:08 am | नगरीनिरंजन

कथा आवडली. माणसांच्या सर्वसाधारण आयुष्यातल्या घटनांवर तुम्ही छान लिहीता.
खूप नाट्यमय नसले तरी शोकांतिका आणि सुखांतिकेमधल्या बारीक रेषेवर हिंदकळणारे चित्रण आवडले. अगदी नेहमी दिसणार्‍या बाबींमागचे भाव छान टिपले आहेत. अजून येऊ द्या.