मरणघाई (लोकल गोष्टी)

स्वाती फडणीस's picture
स्वाती फडणीस in जनातलं, मनातलं
30 Jul 2010 - 10:22 am

मरणघाई
=============================================

मी राजसला शाळेत सोडून पार्ला स्टेशनवर ट्रेनमध्ये चढायचे तेव्हाची गोष्ट आहे. स्टेशनवर एक जिंगल सतत वाजत असायची.. आणि शेवटच्या एका ओळी व्यतिरिक्त काहीच मला समजायचं नाही. बरं तिच्याकडे दुर्लक्ष करावं.. तर ती इतक्यांदा वाजत राहायची की एखादा तरी शब्द डोक्यात घुसायचाच. मी पाच ते दहा मिनिटं तरी स्टेशन वर असायचे त्या तेवढ्या वेळेत किमान सात-आठ वेळा तरी ती जिंगल मला ऐकावी लागायची.

मग एकदा कधीतरी मी ती जिंगल नीट लक्ष देऊन ऐकायचं ठरवलं. आणि ट्रेन येत असल्याच्या, विलंब होत असल्याच्या, स्वच्छतेच्या.. सूचना तसेच स्पीकरचा चिरणारा आवाज, मध्येच धडधड करत जाणारी लोकल, अर्धवट बंद करण्यात आलेली जिंगल या सगळ्यामधून एक एक शब्द लक्षात ठेवत ती जिंगल पूर्णपणे समजून घेतली.. त्याला तसा आता बराच काळ लोटला तरी त्या जिंगलचा बराचसा भाग अजून आठवतो.. पहिली लाइन नक्की काय होती ते आता तितकंसं आठवत नाहीये..

"रोज शाम को करता है जो घरपर कोई इतजार
रेल की पटरी क्रॉस ना करे पुलो का करे इस्तमाल
आप रहेंगे सदा सुरक्षित ओर हमेशा ही खुशहाल..."
यातलं "आप रहेंगे सदा सुरक्षित ओर हमेशा ही खुशहाल.." हे मला नेहमी ऐकू यायच बाकी जिंगल म्युझिक आणि तिच्या चाली मुळे बाकीच्या कोलाहलात ती जिंगल कुठच्या कुठे विखरून जायची.

खरं तर केवढी महत्त्वाची सूचना.. पण ती ही अशी विरून जाते. बरं रेल्वे रूळ क्रॉस करताना काय होऊ शकतं हे माहीतच नसलेली एकही व्यक्ती नसावी. (रस्ता क्रॉस करताना ही आपल्याला खबरदारी घ्यावीच लागते की..) रेल्वेंनी तर त्या साठी पुलांची सोय ही करून ठेवली आहे.. तरी लोक ट्रॅक का ओलांडतात..? बरं.. ओलांडतात तर ओलांडतात, ट्रेन इतक्याजवळ येईपर्यंत तिथे का रेंगाळतात..? किंवा ट्रेन इतक्या जवळ असताना असे धाडस कसे करतात..? ट्रॅक क्रॉस करून वाचणारी एक-दोन मिनिटं जिवा पेक्षा का महत्त्वाची असतात..? हे सगळं माहीत असताना रेल्वे ट्रॅकवर ज्या दुर्घटना होतात.. त्या नक्की दुर्घटना असतात की आत्महत्या..?

त्या दिवशी हे प्रश्न पुन्हा एकदा उफाळून आले..
मी ज्या लोकलने प्रवास करत होते ती लोकल दादर स्टेशनमध्ये अर्धीमुर्धी शिरून बराच वेळ थांबून राहिली.. आमचा डबा बरोबर जिथं पासून प्लॅटफॉर्म सुरू होतो त्या ठिकाणी येऊन थांबला गेला.. ज्यांना दादर स्टेशनवरच उतरायचं होतं त्या काही जणी खोळंबल्या गेल्या.. वेळ जाऊ लागला तशा वैतागल्या.. एक दोघींनी मागून चालत येणाऱ्या प्रवाशांना बघून ढांग टाकून प्लॅटफॉर्मवर उतरण्याचा पराक्रम ही केला.

जसं जसा वेळ सरू लागला तशी आमच्या डब्याभोवती लोकांची गर्दी वाढत गेली..
दिखता है..?
गया ना..?
स्स्स..!!!
हरे रामा..!!
असे चित्रविचित्र उदगार कानावर येत होते.
काय झालं आहे ते कोणी न सांगताच समोरच्या चेहऱ्यांवर स्पष्ट दिसत होतं.

कोणीतरी आमच्या ट्रेन खाली..
बरोब्बर आमच्या डब्याखाली...
शरीराचे तुकडे तुकडे सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेल होता.

काही जण क्षणभर थांबत होती.. काही नव्हती..
कोणी कुठून कुठून येऊन वाकून वाकून बघत होती.. तर कोणी चुकूनही काही दिसू नये म्हणून खबरदारी घेत सटकत होती..

गाडी दहा-पंधरा मिनिटं तिथेच थांबून राहिली..
आणि पुन्हा तिच्या मार्गावर धावू लागली.

मी नेहमी प्रमाणेच दाराजवळ उभी होते.

ते चेहरे..
ते चित्कार..!
मनावर ओरखडे उमटवत होते..
बरोब्बर आम्ही उभ्या होतो तिथे खाली..
एक माणूस तुकडे तुकडे होऊन पडला होता.

अन्त्य्यात्रा समोरून जाताना पाय कसे आखडले जातात,
तसंच काहीस तेव्हाही झालं.
एका पावलाच अंतर..
पण ते तेवढं चालणं, आम्हा कोणालाच नाही जमलं.
ट्रेन सुरू होईपर्यंत आम्ही जागच्या जागी खिळून उभ्या राहिलो गेलो.

त्या दिवशी डब्यात असलेल्या प्रत्येकीने मरणघाई कशास म्हणतात ते अनुभवलं असावं.

(आपल्या सुरक्षेसाठी सगळ्यात आधी आपणच जवाबदार असतो नं..!)

=============================================
स्वाती फडणीस ......................... १२-०९-२००९

प्रवासजीवनमानलेखअनुभव

प्रतिक्रिया

मी ऋचा's picture

30 Jul 2010 - 12:12 pm | मी ऋचा

भयानक...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jul 2010 - 12:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

भीषण ...

कोणीतरी आपलं आयुष्य एकदा लोकलखाली संपवलं आणि हे असं दृष्य एकदा चुकूनच खर्डी-आसनगावच्या मधे कुठेतरी दिसलं होतं. दोन दिवस जेवण घशाखाली उतरलं नव्हतं!

नगरीनिरंजन's picture

30 Jul 2010 - 1:08 pm | नगरीनिरंजन

सगळेच आत्महत्या नसतील करत. ट्रॅक ओलांडताना गाडीखाली येणारेही काही महाभाग असतीलच. अशा लोकांच्या निर्बुद्धपणाचं मला फार आश्चर्य वाटतं. नियम न पाळण्याचा कोडगेपणा 'मला काही होणार नाही' या समजुतीतून येतो की काय होऊ शकतं याची कल्पना करण्याएवढी कल्पनाशक्तीच नसते कोण जाणे.
मुंबईत रोज सरासरी दोन मृत्यु होतात म्हणे ट्रेनखाली.

संतोषएकांडे's picture

30 Jul 2010 - 1:11 pm | संतोषएकांडे

याला 'यमगंड' ऐसे नाव
रेल्वेलाईनीवर आणी तिच्या अलीपलीकडे नेहमीच यमदूतांच वास्तव्य असतं. असल्या धांदरटांनां उचलून नेण्या साठी.
हे लक्षांत घेवूनच रेल्वे-ट्रॅक क्रॉस करावा.

चिरोटा's picture

30 Jul 2010 - 2:04 pm | चिरोटा

रेल्वे अपघात एवढे भीषण असतात की ते ऐकूनच अंगावर काटा येतो.मरणयातना परवडल्या म्हणायला लावणारी लोकलमधील गर्दी,बेफिकीरीत लटकणारे /रूळ ओलांडणारे प्रवासी... दररोज मुंबईत ५/६ मृत्यु असे होतात असे वाचले होते.पूर्वी एकदा वांद्रे स्टेशनवर एक तरुण फलाटावर उभा होता.गाडी येताक्षणीच ह्याला समोरच्या फलाटावर जायची हुक्की आली.त्याने उडी मारायचा अवकाश आणि गाडी आलीच.सर्वच लोकांनी डोळे मिटून घेतले.नशीब बलवत्तर म्हणून वाचला.मोटरमनने अगदी करकचून ब्रेक मारुन गाडी थांबवली होती.
------