दिनांक ११ जुलै २०१०, रविवार.. किती छान सकाळ! आज किती तरी दिवसानी लवकर ऊठुन गच्चीत आलो होतो. पुर्वेला रंगांची उधळण चालली आहे. लाल-पिवळ्या रंगाच्या अनेक छटा डोळे सुखाऊन टाकत आहेत. काळपट पांढर्या तुरळक ढगांना आलेली सोनेरी किनार, किती मनमोहक. गेले दोन वर्षे नचुकता सुर्योदय पहाण्याचे भाग्य मला लाभले होते. बंडगार्डन मधील विशाल वृक्षांवर वस्ती केलेल्या अनेक पक्षांचा किलबिलाट कानभरुन ऐकला आहे. होळकर ब्रीजच्या समोरील टेकडीवरील शंभुमहादेवाला नमस्कार करुनच माझा दिवस सुरु होत असे. संपले सारे, आता तांबड फुटत असताना घरी यायचे आणि सुर्य पार डोक्यावर आला की ऊठायचे. एक निश्वास टाकुन मी हातातल्या भ्रमणध्वनीवरुन मुकेशला फोन केला, "काय रे ऊठलायस का?" "अरे मी तयार झालो, निघतोय", मुकेश. जुजबी बोलुन संभाषण संपवले. थोड्या अवधीत मुकेश आला, चहाची फेरी झाली आणि प्रस्थान केले किल्ले केंजळगडाकडे.
केंजळ्गड
रायरेश्वर
रम्य सकाळ अनुभवत, कात्रजच्या जुन्या घाटातुन निघालो. सातचा सुमार असल्याने ऊजाडले होतेच, कोवळ्या उन्हात चमचम करणारी सृष्टी डोळेभरुन पहात आमचा प्रवास चालु होता. बोगद्यापाशी येताच थांबलो, दुरवर नुकतंच उठणारं, रविवारमुळे जरासं आळसटलेलं पुणं गोजीरवाण वाटत होत.
शिवरायांच्या पुनवडीचा आजचा झालेला विस्तार ही काळाची करामतच म्हणावी लागेल. आमचे आजोळ कोकणातलेच त्यामुळे हा बोगदा आणि हा रस्ता खुपदा पाहिलेला आणि चांगला लक्षात राहिलेला. एका रात्री भर पावसात या बोगद्यातुन चालत जाण्याचा अनुभव गाठीला होताच.
तो आमचा दुसरा ट्रेक, राजगड! सकाळी किल्ला चढताना, आमच्या एका मित्राने विचारलेलं "आपण वर का चाललोय?", अरे सु****च्या बोल ना "आणि अजुन किती जायचय. अरे घराचे ३ मजले चढताना लिफ्ट वापरणारा मी हा ३०० वा मजला चढत असीन" तेव्हा उत्तर काय दिलं आणि दिलं का नाही ते नीटसं आठवत नाही पण हा प्रश्न आणि प्रसंग डोक्यात फिट्ट बसला. त्याला राजगडच्या बसमधुन ऊतरवुन अंधारात ४-५ किमी चालवला होता. तो किस्सा आम्हाला जसाच्या तसा आठवला, नेहमीप्रमाणेच त्यावर मनमुराद हसुन टीका-टिप्पण्णी झाली. थोडेफार फोटोसेशन करुन पुढे सटकलो. बोगदा पार केला आणि आला मोकळा रस्ता, त्यात नविन रेसर बाईक मग वेगाला मनाचे नियंत्रण कशाला? फुल्ल रेज केली आणि अक्षरशः १५ मिनिटात कापुरहोळ गाठलं!! उजवीकडे वळुन भोरकडे निघालो. दादा कोंडके स्टूडियो पार केला की एक अफलातुन सीन दिसतो. मधुन वाहणारी नदी, दोन्ही काठाला पसरेलेली हिरवळ, दुर गेलेली डोंगरारांग, अगदी कुठल्याही सिनेमात शोभुन दिसणारा असा तो देखावा.
हा देखावा मला नेहमीच भुरळ घालत आलेला आहे. आतासुध्दा तो देखावा पाहुन थांबलोच. या भागात पाऊस बर्यापैकी झालेला असल्याने चारी बाजुला छान हिरवळ पसरलेली. ढगाळ वातावरण असले तरी लांबवर दिसणार्या डोंगरावर कोवळे ऊन पडल्याने मनोहारी दृश्य दिसत होते. थोडेफार फोटो काढुन पुढे निघालो. इथेच मी मुकेशला गाडी चालविण्यासाठी विचारले.
हातात कॅमेरा घेऊन मी निवांत झालो. बाईकची एक मजा असते, जो पर्यंत तुम्ही चालवत असता तुम्ही राजे असता पण एकदा का तुम्ही मागे बसलात, की काळीज धकधक करायला लागतं. मला तरी सुरवातीला तसं जाणवत, अगदी २-५ मिनिटे. नंतर मात्र मी निवांतपणे क्लिक करत बसतो.
भाटघर धरणाची भिंत ओलांडली,
पुढे एका वळणावर ट्रक दिसला..मुकेश गाडी व्यवस्थित हाताळतो हे माहित असल्याने मी निर्धास्त होतो. एका फोटोसाठी कॅमेरा सेट करत करत असतानाच, ते झालं.. अगदी अर्ध्या क्षणाचा कालावधी.. अगोदर मागचा ब्रेक दाबल्याची जाणीव, अचानक गाडीचे वळवळणे आणि धाड.... मी मुकेशच्या डोक्यावरुन पलिकडे!! गाडी एका बाजुला ट्र्क समोर आणि मुकेश बाजुला पडलेला!!! काही क्षण डोळ्यापुढे अंधारी आली, पोटावर पडुन थोडा फरफटत गेलो असीन मी, तसाच पडुन होतो. तेवढ्यात बाजुची माणसे धावत आली, एकाने मला बसता केला, डोके प्रचंड ठणकत होते. एकच डोळा नीट उघडत होता. मान वळवुन आजुबाजुचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला, मागच्या बाजुला रस्त्याच्या कडेच्या दगडावर मुकेश बसला होता, डावा पाय पकडुन!! कोणीतरी गाडी बाजुला उभी केली, ट्रकवाला निघुन गेला. मग मी सावकाश उठलो, गाडीपाशी आलो, बाजुच्या मावशी म्हणाल्या, "रगात पुस त्ये बाबा, नशीब्वान हाईस ड्योळा नाय घावला!" मग जाणवलं गालावर काहीतरी उष्ण होत! रुमाल काढुन पटकन डोळ्यावर धरला, गाडीच्या आरशात जमेल तसं बघुन पुसुन काढल. तोपर्यंत मुकेश उठुन आला, तो डाव्या पायाने थोडासा लगंडत होता. बाकी ठीक वाटला. त्याने गाडीची पहाणी केली. मला अजुन काही सुधरत नव्हते. कोणीतरी पाण्याचा तांब्या पुढे केला, तसाच तोंडाला लावला, पाणी पोटात गेल्यावर डोके थोडे ठिकाणावर आले. मग थोडे पाणी तोंडावर मारले, जखम धुवुन काढली. तोपर्यंत मुकेशनी गाडी बघितली होती, पाणी पिऊन तो गाडीपाशीच होता. रुमाल जखमेवर दाबुन धरत त्याची चौकशी केली, त्याचा डावा गुडघा आधीपासुन कमजोर होता, तो डावा पाय धरुन बसल्याचे आठवत होते. त्याला फारसे काही लागले नसल्याचे त्याने सांगितले, पण गुडघा आपटला होता. गाडी बरीचशी सुस्थितीत होती, एका बाजुचे गार्ड वाकले होते, पण बॉडीवर स्क्रॅचही नव्हता. तेवढेच समाधान! पुढे कव्हर तुटले होते, काच आश्चर्यकारकरीत्या वाचली होती. पडताना हातात असुनही, कॅमेरा फक्त घासला गेला होता, सुस्थितीत होता.
गावकरी मंडळींचे आभार मानुन पुढे निघालो, भोर गावात जाण्याआधी एक पुल लागतो. पुलाच्या एका बाजुला हॉस्पीटल होते, तीथे जुजबी ऊपचार करुन घेतले. रक्त बर्यापैकी थांबले असल्याने टाके घालण्याची सुचना धूडकाऊन लावली, बॅडेज बांधुन निघालो. कारण एवढेच, टाके घालण्याआधी जखम झाली असेल त्या भागात इंजेक्शन देऊन तो बधीर करतात, हे अनुभवाने माहीत होतं आणि त्या वेदनांचा अनुभव पुन्हा एकदा घेण्याची ईच्छा नव्हती. बाहेर आलो, येतानाच आधी नाश्ता करायचा मग पुढचा बेत आखायचा हे ठरले. शिवाजी चौकातल्या पुनम भेळ वाल्याकडे गाडी घेतली. बाजुच्याच हाटेलात गरमा गरम झणझणीत मिसळ आणि कांदेभजी हाणली. आता जे व्हायचे ते झाले, आता ज्यासाठी आलो ते करुया असा सुर लागला. पावसाचे लक्षण तर होतेच, माझ्याकडे रेनकोट नसल्याने किमान किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जावे असे ठरले. जखम भिजवणे धोकादायक ठरले असते. शिवाजी चौकातुन महाडच्या दिशेने निघालो. ४-५ किमीवर केंजळगड्-रायरेश्वरला जायला फाटा आहे. तिकडे मोर्चा वळवला आणि काय आश्चर्य रस्ता सुका ठाक, पाऊस पडुन बराच वेळ झाला होता. आंबेघर जवळच एका गावात झुलता पुल आहे, त्याची थोडीशी मजा घेतली.
परत वाटेला लागलो. पायथ्याच्या कोर्ले गावात आलो. आमची एकंदरीत अवस्था पाहाता चालत वर जाणे जरा अवघडच होते, पण गाडी बर्यापैकी वर जाते असे माहीत असल्याने तो विचारही मनाला शिवला नाही. पुढच्या परीक्षांची ती नांदीच नव्हती का?
आजुबाजुला लोभावणारा निसर्ग, कधी धुक्याचा दाट पडदा, कधी हलकी पावसाची सर, कधी स्वच्छ सुर्यप्रकाश!! जणु स्वर्गातुनच वाटचाल होत होती.
रस्ता म्हणजे घाटमार्ग, उकललेली खडी, मध्येच थोडा चिखल, त्यामुळे गाडीला फारसा वेग नव्हताच. हँडेल घट्ट पकडुन सावकाश वळणावळणा मागुन वळणे पार करीत होतो. मजा येत होती. अशातच ते वळण, पुर्ण चिखल, गाडी स्लिप व्हायला लागली, तेव्हा मी उतरलो आणि मुकेश गाडी घेऊन पुढे गेला. एव्हाना गड माथा बर्यापैकी टप्प्यात आल्या सारखा वाटत होता. त्या वळणानंतरही पुढ पर्यंत रस्ता खुपच खराब होता.
वाटेत लागणारी २-३ घरे सोडुन बराच पुढे मुकेश थांबला. तीतुन पुढे अगदी १०च मिनिटात आम्ही केंजळ आणि रायरेश्वराच्या खिंडीत येऊन पोचलो. सभोवातली फक्त आणि फक्त धुकेच. अगदी शेजारी दोन फुटावरचा मुकेश धुरकट दिसावा इतके दाट! तिथे अगोदरच काही दुचाकी होत्या.
त्या नसत्यातर आम्ही कदाचित रस्ता समजुन दरीत सुध्दा पोचलो असतो!!!!! थोडे धुके कमी झाले आणि वाईकडुन आलेला एक मोठा ग्रुप आमच्या समोर रायरेश्वरच्या वाटेला लागलेला दिसला. त्यांच्यासोबत शंकर जंगम म्हणुन रायरेश्वरवस्तीतला, मंदीराचा पुजारी होता. रायरेश्वरजवळच असल्याची माहीती होती, केजंळसाठी चौकशी केली तर, खिंडितुन पाउण-एक तासाची चाल, तिही जंगलातुन आणि नंतर पायर्या अशी माहीती मिळाली. मुकेशचा पाय आता जरा बोलायला लागला असे वाटले कारण तिकडे जाण्यास तो फारसा उत्सुक दिसत नव्हता. त्या वाटेला कोणी सहसा फिरकत नसल्याने, आम्ही जरा विचार करुन रायरेश्वराकडे मोर्चा वळवला. इथे मुकेशचे विशेष कौतुक म्हणजे, पाय जबरदस्त दुखत असुनही पठ्ठ्या एका मागुन एक विनोद करीत होता, नेहमी पुढे असणारा तो थोडा जपुन चालत होता, पण थांबत नव्हता. शिडी पार केल्यावर जरासा विसावा घेऊन आम्ही मंदीरात पोचलो. जखम वगळता मला फार काही लागल्याचे जाणवत नव्हते, डावा गुडघा आणि खांदा किरकोळ कुरकुरत होते, तिकडे दुर्लक्ष करणे सहज शक्य होते.
मंदीरात आलो. ह्याच शंभु महादेवापाशी एक सोळा वर्षाचा कोवळ्या वयातला तरूण, काही जीवलग साथीदारांसोबत आण घेतो ती स्वराज्याची! प्रस्थापित मुजोर पातशाह्यांच्या छाताडावर पाय रोऊन उभे राहण्याची!! काय मातीची असतील ती माणसे, छे ते तर पृथ्वीवर पाठविलेले देवदुत, अन्यायाने गांजलेल्या, दारीद्रयाने नाडलेल्या, जातीभेदानी पोखरलेल्या इथल्या मूढमतींना पिढ्यान पिढ्या जाज्वल्य अस्मितेचा साक्षात्कार घडवुन आणण्यासाठी... राष्ट्राभिमान, पराक्रम, राजकारण, धर्मकारण, नितीमत्ता, स्वामीनिष्ठा यांच्या नविन परिभाषा सोदाहरण स्वतःच्या वागणुकीतुन दाखवुन देण्यासाठी आलेले प्रेषितच जणु.. मंदीरातला आसमंत अजुनही भारला आहे, त्या धीरगंभीर शब्दांनी, तिथल्या मातीला अजुनही गंध आहे त्या उष्ण रक्ताचा.. इथेच आहे मराठी माणसाचा नव्हे सार्या भारतीयांचा काशी-विश्वेश्वर, इथेच चार्-धाम, इथेच मोक्ष आणि इथेच परमेश्वर.. महादेवाच्या पायाशी डोई ठेवताना, या आणि अश्या अनेक भावनांनी मन भरुन आले. नकळत डोळ्यावाटे गालावर ऊतरले..ते क्रुतज्ञतेचे दोन थेंब!! वाटले याच ऊष्णोदकाने अभिषेक घडावा.. किती वेळ झाला, काही कळलेच नाही. आम्ही दोघेही असेच भारलेल्या अवस्थेत कोपर्यात बसुन होतो. खर्या भावनांना वाचेची गरज नसते, त्या तुमच्या अंगाअंगातुन प्रकट होतात. आमच्याही भावना सांसर्गिक असाव्यात. मंदीरात आलेले अजुन तीघे आपोआप गप्प झाले, घाई करणारा पुजारी, मटकन खाली बसला. काही क्षण काळाच्या पलिकडले, मग आम्ही भानावर आलो. इथपर्यंत आल्याचे सार्थक झाले होते. अंगच्या वेदना शमल्या होत्या, एका वेगळ्याच शांतीचा अनुभव घेतला होता.
फोटो काढुन बाहेर आलो, पुजार्याच्या घरुन ताक आले होते, ते पिऊन परतीच्या वाटेला लागलो. आता प्रवास झटझट झाला, बघता बघता आम्ही खिंडीत आलो सुध्दा! वाटेत काही बालचमुंचा ग्रुप भेटला, अगदी ५ वर्षापासुन मुले-मुली वर्षा सहलीला आली होती. वाईच्या कुठल्याश्या मल्लखांब मंडळाचे सदस्य होते ते. क्षणभर वाटले, शहरातल्या संगणकावर खेळ खेळणारी आधुनीक शिक्षण घेणारी मुले सरस मानायची का, ही निसर्गाच्या आधाराने वाढणारी, संस्कृतीचा वारसा कुठेतरी पुढे नेणारी मुले सरस? ठरवले तर या आधुनीक मुलांना धोबीपछाड घालुन कुठल्याकुठे निघुन जातील ही!! खिंडीत येऊन परत केंजळचा विचार झाला, पण तो विचारच राहिला. गाडीला किक मारुन निघालो, काय माहित होते पुढे काय वाढुन ठेवले होते??
वाटेतली छोटी वाडी पारकरुन जरा पुढे नाही आलो तर... सपक..सप्प.. गाडी आडवी! आता ऊजव्या बाजुला. मुकेशने पटकन पाय काढुन घेतले, बाजुला झाला. मी उजवा पाय सोडविण्याच्या नादात गाडी डाव्या हाताने उचलण्याचा प्रयत्न केला नी... कट.. जरासा आवाज, आणि मी गाडी जागेवर सोडली.. बाजुला आलो. डाव्या खांदा किंचीत हलवला तरी मरणप्राय वेदना! पाच एक मिनिटात वेदना आटोक्यात आल्या, फ्रॅक्चर नसल्याची खात्री असल्याने मी खांदा थोडा हलवला, मुकेशच्या मदतीने हात खांद्यातुन उलटा - सुलटा फिरवुन बघितला. वेदना थांबल्या पण खांद्यातुन जोर लावणे अशक्य झाले. कशीबशी गाडी उचलली, पण गाडी पडलीच का? उत्तर समोर होते, पुढच्या चाकाच्या मडगार्ड आणि चाकाच्या मधे चिखल घुसला होता. सकाळच्या अपघातात मडगार्डची जागा बदलली, हलली काही कळायला मार्ग नव्हता, पण पुढचे चाक जाम झाले होते. शेजारच्या झाडाची फांदी तोडुन, तिच्या सहाय्याने चिखल बर्यापैकी मोकळा करुन चाक फिरते केले. मुकेश गाडी घेऊन पूढे निघाला. हे वळण सगळ्यात घाण आणि चिखलात बरबटलेले होते. ऐन वळणावर गा़डीचे पुढचे चाक परत जाम झाले. पण मुकेशने हँडल स्थिर ठेउन हळु हळु गाडी पुढे काढली. इथे चिखल असल्याने गाडी उभी करुन पुढचे चाक वर उचलले जात नव्हते. थोडी सपाट जागा बघुन गाडी उभी केली, मुकेशला मागे बसवुन हाताने चाक फिरवण्याचा खटाटोप केला, पण त्यात यश नाही आले. मग तोच काडया घालण्याचा उद्योग. चाक फिरायला लागले, मग आधी गेलेल्या गाडीमुळे तयार झालेल्या चिंचोळ्या खड्ड्यातुन गाडी चालवण्याचा प्रयत्न केला, थोडा पाऊस झाल्याने तिथे पाणीपण साचले होते, त्यामुळे चाक अजुनच मोकळे झाले.
अचानक दुसरी बाजु किमान सुकी असल्याचे मुकेशच्या लक्षात आले. पण त्यासाठी मधला चिखलाचा पट्टा पार करावा लागणार होता. मुकेश तिकडे शिताफिने निघाला, पण अक्षरशः दोनच मिनिटात चाक बंद पडले, तरी तो प्रयत्न करीत होता. त्याच्या डोक्यावर पलिकडल्या बाजुला जायचे जणु भूतच स्वार झाले होते. चिखलात बरबटलेले हात पानांना पुसत मी काही काळ मागे राहीलो होते, मुकेशकडे फारसे लक्ष नव्हते. अचानक ती गोष्ट माझ्या लक्षात आली आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तसाच धावत पळत मी मुकेशच्या मागे गेलो. माझा आवाज जणु त्याच्या कानांपर्यंत पोहोचतच नव्हता. पलिकडच्या बाजुला जाण्यासाठी त्याने गाडी तिरकी घातली होती. पुढचे चाक जाम झाले तरी हा गाडी मागच्या चाकाच्या सहाय्याने गाडी पलिकडे काढत होता. त्यामुळे गाडी पुढुन स्कीड होत होती. पलिकडची म्हणजे रस्त्याची उजवी बाजु, तिकडे दरी होती. किमान १०० फुट खोल! गाडी स्कीड होत होत दरीच्या तोंडाशी आली. मी मागुन गाडी पकडण्याचा प्रयत्न केला, पण चिखलाने मला ग्रीप नाही मिळाली आणि गाडी पुढे सरकली. मी पुढच्या बाजुला जाऊन गाडी पकडली आणि मुकेशच्या अंगावर अगदी कानठळ्या बसतील ऐवढ्या आवाजात ओरडलो. तसा तो भानावर आला, त्याला समोर दरी दाखवताच, त्याचाही आवाज बंद झाला!! क्षणात दोघेही सुन्न झालो, गाडी साईड स्टँडला लाउन पाच मिनिटे शांत बसलो. पाणी प्यायलो. आता हँड्ल दुसर्या बाजुला वळवुन गाडी दरीपासुन बाजुला आणली. परत काठीच्या सहाय्याने चिखल काढला. गाडी ढकलतच पूढे नेली. काही वेळातच चिखलाच रस्ता संपला. आता मी गाडी घेतली, थोडी चालवताच, चिखल चाकाच्या बाजुने बाहेर येऊ लागला. रस्ता चांगला असल्याने एक सलग वेग ठेऊन, अगदी पहिल्या गिअरवर दोघे जाऊ लागलो.
दोन्-तीन्-चार काही वळणे नीट गेली. परत चिखलाचा पॅच आला, यावेळी गाडी मी बाहेर काढली. हा पॅच छोटा होता, थोडे पुढे जाऊन परत दोघे सावकाश जाऊ लागलो. एकदम गाडी स्लिप होता होता दोनदा कंट्रोल केली आणि तिसर्यांदा स्लिप होताच बाजुला उभी केली. परत चक्का जाम!! काडी घालण्याचा कार्यक्रम यथासांग पार पडला. थोडे पूढे परत चिखल होताच, तेव्हा मुकेशनी गाडी घेतली आणि तो चिखल क्रॉस करुन पूढे जाऊन थांबला. एवढ्या वेळात आमच्या एक लक्षात आले होते, एक अर्धवट तारेत असलेला माणुस सोडला तर बाकी कुणीही या बाजुने खाली आले नव्हते का वर गेले नव्हते. सगळ्या गाड्या दुसर्या मार्गाने आल्या असव्यात, आम्ही फक्त तर्कच करु शकत होतो. जवळपास दोन तास होऊन गेले होते, आम्ही अर्धा रस्ताच जेमेतेम पार केला होता. पोटात कावळे, सोबतीला लागलेला मार बेजार करायला लागला. तरी आमच्या चेहर्यावरील हास्य लोपले नव्हते. त्याही परिस्थितीत विनोद करीतच आम्ही पुढे चाललो होतो. पुढचा रस्ता बरा आहे याचा अंदाज येताच, मुकेशने अधिकारवाणीने गाडी घेतली. बघता बघता वळणा मागुन वळणे पार करीत आम्ही बर्यापैकी रस्ता पार केला. एवढा वेळ असलेले धुक्याचे कोंदट वातवरण दुर होऊन सुर्यदर्शनही झाले. उत्साह वाढला तसा, सेकंड गिअर टाकला आणी थोडा वेग घेतला.. बारकी बारकी वाटणारी घरे जरा ऐसपैस दिसत होती, डावीकडे वळण घेतले आणी.... धाड... सकाळाची पुनरावृत्ती!! फक्त वेग कमी असल्याने मी मुकेशच्या डोक्यावरुन फेकला नाही गेलो. पण मुकेशचा उजवा पाय गाडीखाली अडकला, तो कसाबसा सोडवुन दिला आणि मी बाजुला झालो. मुकेश पलिकडल्या दगडावर बसला होता. मी गाडीपाशी खांदा धरुन उभा होता आणि माझी नवी गाडी, समोर आडवी पडली होती. ती उचलायची ताकद माझ्यात असेलही कदाचित पण विश्वास उरला नव्हता!!
मुकेशच्या मागच्या झाडीतुन घंटेचा किनकिनाट ऐकला आणि पाठोपाठ मुंडासे दिसले. ताबडतोब मदतीसाठी आवाज दिला, तसे भाऊ धाऊन आले. त्यांनी गाडी उचलायला मदत केली. गाडी बाजुला घेऊन बघितले, तर पुढचे चाक जाम! त्यामुळेच गाडी अचानक थांबुन पडली होती. परत काडी, मधुनच भाउंचा कोयता काही ना काही घेऊन चिखल काढला. तेवढ्यात ३ वीर गावाकडुन सुसाट वेगात आले, एकाच दुचाकीवर. आमची अवस्था बघुन थांबले, त्यांना पुढच्या रस्त्याची आगाऊ कल्पना देण्याची काळजी आम्ही घेतली, त्याही पोरांनी थांबुन चाक मोकळे करुन दिले. परत मुकेश गाडीवर बसला, पण ऐटीत म्हणतो कसा, "आता ऊजवा पाय दुखावला गेला, पण त्यामुळे आपल्याला डावा पाय आहे आणि तो बर्यापैकी काम देऊ शकतो याची मेंदुला जाणीव झाली" गाव अगदी दहा मिनिटावर आले होते, पण परिक्षा संपली नव्हती. पहिल्या पासुन 'ड' गटाचे प्रश्न सोडविण्यात तरबेज असणार्या आमच्या पूढे बरोबर पेपर संपताना 'ड' गटाचे गणित नियतीने ठेवले होते. अगदी पाच मिनीटे झाली नसतील, गाडी परत पडता पडता वाचली. आता पुढचे चाक असे काही घट्ट बसले होते, की ज्याचे नाव ते! काड्या, बोट सगळ घालुन बर्यापैकी चिखल काढला, पण चाक ढिम्म!! आम्ही दोघेही पार हताश झालो. दिवसात पहिल्यांदा, कुठल्या मुहुर्तावर बाहेर पडलो, अशी वैतागाची वाक्ये बाहेर पडु लागली. लाथा मारुन चिखल पाडण्याचा प्रयोग पण झाला, पण परिणाम शुन्य.
थोड्या वेळानंतर मगाशी वर गेलेली ३ मुले परत आली. चिखल आणी पाऊसाची लक्षणे यामुळे ती परत फिरली. त्यांनी आम्हाला पाहिले,गाडी थांबविली आणि आम्हाला हातभार लाऊ लागली. तेवढ्यात पावसाने काही काळ प्रताप दाखवुन भंडावुन सोडलं. पाऊस थांबताच त्या दोघा-तीघांच्या मदतीने चाक पहिल्यांदा उलटे, मग सुलटे फिरवुन चिखल बाहेर काढला. परत काठ्या घालुन बर्यापैकी चाल मोकळे केले. या मुलांच्या डोक्यात चाक काढुन चिखल साफ करण्याचा विचार डोकावला होता, पण मला डिस्क्-ब्रेक असेंब्ली आणि चाक बाहेर काढल्यावर तेवढ्याच व्यवस्थित लावले जाण्याची खात्री नव्हती. म्हणुन त्या विचारावर साधे भाष्य करण्याचे पण टाळले. शेवटी पुण्यापर्यंत ७०-८० किमीचा प्रवास होता. त्यांनी चाक बर्यापैकी मोकळे केले आणि गाडी ओढ्यावर आणायला सांगुन पोरं निघुन गेली. तिथुन ओढ्यापर्यंतचा अगदी पाच एक मिनिटाचा प्रवास कसाबसा पार करत, आम्ही ओढ्यापाशी आलो. मग अजयने गाडी घेतली, सरळ ओढ्यात घुसवली. पाणी जास्त नव्हतेच, अगदी जेमतेम नडगीचे हाड बुडेल ऐवढे पाणी. बघता बघता चाके मोकळी झाली. पोरांनी अगदी आटापिटा करुन फिरवुन फिरवुन चिखल बाहेर काढला. आम्ही पण स्वतःला बर्यापैकी धुवुन घेतले. पँट, प्लोटर्स जणु चिखलाच्याच बनल्या होत्या, त्यांना मुळरुपात आणले. तोपर्यंत अजयने गाडी पुलावर नेऊन लावली होती. त्यांचे परत परत आभार मानत, आम्ही त्यांना कोर्ले गावामध्ये थांबायला सांगितले.
आता रस्ता चांगला होता, चिखल कुठेही नसेल असा अंदाज होता. सुर्य पश्चिमेकडे झुकलेला पाहिला, सहज घड्याळाकडे नजर टाकली तर पावणे-सहा??? तब्बल पावणे-चार तास आम्ही ते अंतर करायला लावले होते. पण यातुन किती गोष्टी चांगल्या घडल्या होत्या? एक अविस्मिरणीय अनुभव गाठीशी आला होता. कधीही न विसरला जाणारा ट्रेक पार पडला होता. आमची अतुट मैत्री अजुनच अभेद्य झाली होती. आता गाडीचे सुकाणु पुर्ण विश्वासाने मी पकडले, आणि स्टार्टर दाबला. वाटेत त्या मुलांना भेटलो. त्यांनी कुठल्याही प्रकारची भेट स्वीकारण्यास नकार दिला. पैसे देणे म्हणजे त्यांच्या माणुसकीचा, मदतीचा एक प्रकारे अपमान करण्यासारखेच झाले असते, म्हणुन तो विषयही न काढता, पुढच्या वेळी त्यांच्या उपकाराची परतफेड नाही पण कृतज्ञता म्हणुन काहीतरी भेटवस्तु देण्याचा विचार मनात पक्का केला. भोर गावात येताच एकमेकांच्या घरी सुखरुप असल्याची बातमी दिली. मग जय-भवानीला गरमा-गरम चिकन रस्सा आणि भाकर झोडुन नवाच्या सुमाराला घरला परत आलो. एक अविस्मरणीय दिवस संपला. आता भले त्यावर कोट्या करु, विनोद करु, पण हे काही क्षण स्मृतीपटलावर नेहमीच ताजे राहतील.
प्रतिक्रिया
19 Jul 2010 - 5:59 am | नंदन
डेंजर! थरारक झालेला दिसतोय ट्रेक. काळजी घ्या भौ.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
24 Jul 2010 - 8:34 am | यशोधरा
असेच म्हणते.
19 Jul 2010 - 7:36 am | मुकेश
मस्त फोटू लवकर टाका !!!
लेख वाचल्यावर पाय परत दुखायला लागला :''(
20 Jul 2010 - 4:30 am | मीनल
धुक्याचे फोटो आवडले.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
20 Jul 2010 - 1:47 pm | farnaz naikwadi
:H मस्त ल॑खन व फाटाओ
20 Jul 2010 - 2:01 pm | सहज
काळजी घ्या!
पावसाळ्यातल्या ट्रेक करता नवी मड बाईक घ्या
20 Jul 2010 - 3:13 pm | गणपा
लेको खरच थरारक झालाय तुमचा ट्रेक.
सर्व दुचाकी स्वारांनो हेल्मेट वापरा रे.
20 Jul 2010 - 4:54 pm | रंगोजी
लिखाण छान आणि अनुभव तर भन्नाट!!
-रंगोजी
20 Jul 2010 - 6:39 pm | प्रभो
थरारक....
20 Jul 2010 - 7:07 pm | धमाल मुलगा
भावा,
काय ट्रेक म्हणायचा काय चेष्टा? इतका त्रास झाला? बाब्बोय!
च्यायला, आतातर जास्तच रुखरुख लागुन राहिलीये तुझा मेसेज सोमवारी पाहिल्याची! मीही अनुभवला असता हा थरार.
बेश्ट...पण पुढच्या वेळपासुन जरा काळजी घ्या रे बाबांनो.
20 Jul 2010 - 9:17 pm | ज्ञानेश...
सुरूवातीस वाईट वाटले, पण नंतर हसू येत होते लेख वाचतांना... किती पडता लेको..? =)) ती नवी नवरी अपाचे शिव्या घालत असणार तुम्हाला मनोमन ! X(
असो.
डिस्क पॅड्समधे चिखल असावा बहुधा.
एवढी हालत खराब होऊनही ट्रेक पूर्ण केलात, याचे कौतुक वाटले. एक लक्षात राहणारा अनुभव मिळाला, हेही नसे थोडके.
यापुढे स्वतःची आणि बाईकची काळजी घ्या, आणि पूर्ण तयारीनिशी निघा असा मित्रत्वाचा सल्ला देतो.
ऑल द बेस्ट !
20 Jul 2010 - 9:38 pm | धमाल मुलगा
>>किती पडता लेको..? Rolling On The Floor ती नवी नवरी अपाचे शिव्या घालत असणार तुम्हाला मनोमन !
=)) =)) =))
धन्य आहात!
20 Jul 2010 - 9:57 pm | हर्षद आनंदी
आम्हाला पण हसुच येत होते... काही कळत नव्हते, पण धडपड चालुच होती!!
ह्म्म.. तिच्याच शिव्या असतील, डिस्क ब्रेकचा चुकीचा वापर हे मुळ कारण होते, ट्रक हातभर लांब होता, स्पीड ५०-६० चा असेल, मग कंट्रोल करणे अवघड नव्हते म्हणुन ती भडकली असावी, तोंड फुटले बिचारीचे!
शेवटी पडलो तेव्हा, ह्सतच राहीलो.. पडण्याचे काहीच नाही वाटले. चिखल मडगार्ड आणि चाकच्या मधे, साठला होता, तो काही केल्या निघत नव्हता. हँडल वळवले की चाक लॉक होत होते.
डिस्कपॅड ओके होती, नाहीतर हायवेवर कुठेतरी पडुन, डायरेक्ट फोटोत घुसलो असतो :)
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
21 Jul 2010 - 6:10 pm | मी ऋचा
#:S
मी तर वाचुनच थकले!!
मी ॠचा
र॑गुनी र॑गात सार्या र॑ग माझा वेगळा !!
23 Jul 2010 - 10:36 pm | मॅन्ड्रेक
@)
at and post : Xanadu.
24 Jul 2010 - 1:01 am | चित्रा
फोटो आणि भ्रमंती छान, पण जरा काळजी घ्या असे सुचवावेसे वाटते.
2 Aug 2010 - 3:59 pm | राहुल.गीत
अशीच छान छान भटकन्त्ती करा, परन्तु साम्भाळून !
2 Aug 2010 - 3:59 pm | राहुल.गीत
अशीच छान छान भटकन्त्ती करा, परन्तु साम्भाळून !