माझा 'रेल्वे पोलिस' अनुभव

डोमकावळा's picture
डोमकावळा in जनातलं, मनातलं
18 Jul 2010 - 10:19 am

"सुम्या....चल रे आवर पटकन.... साली ८.३० ची लोकल सुटायची." मी बुटाची लेस बांधत ओरडलो.
एम.एस्सीच्या दुसऱ्या वर्षाला होतो तेव्हाची गोष्ट आहे. एम.एस्सी ची चौथी सेमिस्टर म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग असायाचं. माझ्या सुदैवाने मला एका छोट्या कंपनीत म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग साठी जॉब मिळाला होता. आता सुदैवाने म्हणणं योग्य आहे कारण पहिल्या सेमिस्टर पासून प्लेसमेंट होइपर्यंत एकतर मला कधी फ़र्स्टक्लास वगैरे काही माहितच नव्हता. उलट एटीकेटी, जयकर का काय तो नियम (इतर विषयात पास झाल्यावर एखाद्या विषयात २-४ मार्क वाढवुन पास करतात तो नियम) वगैरे सारख्या सुविधांचा यथेच्छ वापर करीत आपलं शिक्षण चाललं होतं. आणि मास्तरांच्या नजरेत आम्ही कधी भरलोच नाही कारण वर्गात कमी आणि मॉडर्न कॉलेजा समोरच्या पोलिस कट्ट्यावरच आमच वास्तव्य अधिक. एकुणच काय तर शिक्षणाच्या आयचा घो.... अशा परिस्थितीत सुद्धा कंपनीच्या प्रवेश परिक्षेला बसायला मिळणं म्हणजे सुदैवच नाही का. तर अशा सगळ्या प्रकारतून चार माणसांच्या कंपनीत ट्रेनी म्हणून आलेला पाचवा मी. कंपनी नारायण पेठेत आणि मी रहायला पिंपरीत डी. वाय. पाटील कॉलेज परिसरात. म्हणून लोकल प्रवास हा रोजचा झाला होता.

"अरे माझं तर केव्हाच आवरलय. जरा सखी मंद झाल्या तारका ऐकत होतो. चल..." सुम्याला बाबूजींच्या गाण्यांची फार आवड. रोज एकदा तरी हे गाणं ऐकायचा. आम्ही गडबडीने निघालो कासारवाडी स्टेशनकडे.
"जॉन्या असल चौथ्या डब्यात. चल लवकर. पोहोचायला उशीर झाला तर संध्याकाळी परत निघायला अजून उशीर होइल." मी आपला गडबड करत म्हणालो.
"साल्या तुला लवकर आवरायला काय होत रे. बसतो टाइमपास करत सकाळी सकाळी" सुम्या माझ्यावर जरा भडकला.
"आता लवकर चलणारेस का माझी काढत बसणारेस?" मी आपला वैतागत म्हणालो. आम्ही स्टेशन वर पोहोचलो आणि ट्रेन सुद्धा लगेचच आली. जॉन्या नेहेमीप्रमाणे चौथ्या डब्यात नव्हता. तो मागच्या एका डब्याच्या दाराला उभा होता. त्याने मला हाक मारली. मग आम्ही दोघं सुद्धा त्याच मागच्या डब्यात बसलो.
"काय रे आज इकडं मागच्या डब्यात?" सुमीतनी जॉनीला विचारलं.
"अरे यार. कल रात को लेट सोया. इसलिये लेट हो गया. भागते भागते ट्रेन पकडना पडा." इति जॉनी.
"आज तो पक्का लेट होनेवाला है यार" मी जॉन्याला म्हणालो.

इकडच्या तिकडच्या गप्पा मारत आमची ट्रेन शिवाजीनगरला पोहोचली.
"सुम्या, आधीच उशीर झालाय. आता आपण पुल ओलांडून गेलो तर अजून वेळ लागेल. चल रेल्वे लाईन ओलांडून जाऊ" मी सुम्याला म्हणालो. आमचं बोलणं होईपर्यंत जॉन्या खाली उतरून रेल्वे ट्रॅक अर्धा ओलांडून गेला होता. मी सुम्याच्या उत्तराची वाट पहात होतो.
" नको रे पुलावरुनच जाऊ. आता झालाच आहे ना उशीर तर मग अजून ५ मिनीटांनी काय फरक पडणार आहे?" सुम्या घाबरत म्हणाला. "आणि जर कोणी पकडलं तर... असं ट्रॅक ओलांडणं कायद्याने गुन्हा आहे म्हणे."
"लई शहाणा ना तू. फट्टू साला. मी जातो इथूनच तू ये आरामात पूलावरून" मी म्हणालो. तोपर्यंत जॉन्या पलिकडे पोहोचला होता.
तो तिकडून ओरडला "अरे क्या टाइम पास कर रहे हो, चलो जल्दी". आता हूं म्हणत मी फलाटा वरून खाली ट्रॅकवर उडी मारली. माझ्या सारखे आणखी बरेच जण ट्रॅक ओलांडत होते. पलीकडच्या फलाटा पाशी पोहोचल्यावर तिथे एका साधारण मध्यम ३०-३२ वर्षाच्या माणसाने मला हात दिला. मी सुद्धा त्याला ’थॅंक्स’ म्हणत वरती चढलो.

आणि मागे वळून पाहिले. सुमीत जरा गोंधळल्यासारखा तिथच उभा होता.
"अजून किती वेळ उभा रहणार आहेस? ये लवकर" म्हणून मी वळालो आणि स्टेशनच्या बाहेर जायला निघालो तितक्यात कोणीतरी माझी कॉलर पकडल्यासारखं वाटलं. मी मान वळवून बघीतलं तर ज्या माणसाने मला हात दिला होता त्यानेच मला पकडलं होतं. मी काय झालं म्हणून विचारलं तर तो ऒरडला.
"काय रे भडव्या लाज वाटती का रेल्वेलाईनी ओलांडून यायला? तुझ्या सारखे आळशी लोक असले उद्योग करतात. अन्‌ साले मरतात रेल्वे खाली सापडून. मग आम्हाला निस्तारत बसावं लागतं" तो रेल्वे पोलिस आहे हे कळल्यावर जरा मला पण भीती वाटली. खाकी नसल्यामूळे मी त्याला ओळखलं नव्हतं.
मी आपलं "साहेब चुकलं जरा. ऑफिसला जायला उशीर झाला होता. जाउ द्या मला" म्हणत सुटकेचा एक प्रयत्न केला.
"सोडतो की. एकदाची कारवाई संपली की नक्कीच सोडतो" तो म्हणाला. कायदेशीर कारवाई म्हटल्यावर मी आणखीनच घाबरलो. मला उशीर होतो आहे हे पाहून जॉन्या पून्हा ओरडला "चल ना रे..."
"अबे यार मेरको पुलिस ने पकडा है. तू जा आगे. मै आता हूं... बॉस को बोल मेरेको टाईम लगेगा" मी म्हणालो.
कायदेशीर कारवाई? फक्त रेल्वे लाईन ओलांडल्या बद्दल? साला ट्रॅफिकचा सिग्नल तोडला आणि पकडलं तर १००-२०० रुपये दंड घेउन सोडतात हे मला माहिती होतं. म्हणजे तसं अनुभवलं पण होतं. पण कायदेशीर कारवाई ऐकून मला मी काहितरी मोठा गुन्हा केल्यासारखं वाटायला लागलं होतं.
"साहेब, आता ही कायदेशीर कारवाई म्हणजे नक्की काय?" मी त्याला प्रश्न विचारला.
"हम्म्‌ फार काही नसतं. तुम्ही हा गुन्हा केला आहे असं मान्य करायचं. मग तुम्हाला कोर्टात घेउन जातील. तिथं जज्ज काही प्रश्न विचारतील. चुक मान्य करायची जो काही दंड होईल तो भरायचा आणि पुन्हा असं करणार नाही म्हणून एक अ‍ॅफेडेव्हीट करून द्यायच बास इतकंच"
"साहेब पण मग दंड इथच भरला तर नाही का चालणार?" मी अजून एक प्रयत्न करून बघीतला.
"अरे आम्ही कोणाला पकडलं नाही तर आम्ही नक्की काम करतो का असा प्रश्न करतील ना वरचे साहेब." तो.
"बरोबर आहे तुमचं साहेब. पण बघा काहीतरी. उग कोर्ट कचेऱ्यांच्या नादाला कशाला लागायच ना जर इथचं प्रॉब्लेम सुटला तर...." आता मी ठरवलं होतं की प्रयत्न सोडायचे नाहीत. उगाच परत आपल्यालाच नको वाटायला की साधे प्रयत्न सुद्धा नाही केले.
"साहेब तुम्ही मनात आणलं तर कोर्टापर्यंत जायची गरजच नाही. बघा ना काहीतरी."
तो जरा विचार केल्यासारखं करून म्हणाला "बघू काही जमलं तर... पण साहेबांनी तुला पकडलेलं पाहिलं आहे. तर मग तिकडे घेऊन तर जावंच लागणार" तो म्हणाला. मग त्याने मला रेल्वे पोलिस कक्षाच्या बाजूला असलेल्या एका खोलीत नेलं. तिथं माझ्यासारखेच आणखी पंधरा वीस जण आधीच होते. त्यात काही कॉलेजचे मुलं पण होते. साहेब खूर्चीवर बसून सगळ्यांना प्रश्न विचारत होता. मधून मधून एखाद दोन शिव्या पण येत होत्या. एक हवालदार काहीतरी लिहून घेत होता आणि दोन हातात वेताच्या त्या लांबसडक काठ्या घेउन सगळ्यांवर नजर ठेउन होते.

साहेब त्याच्या पोलिसी श्टाइल मध्ये सगळ्यांना दम भरत होता. त्या कॉलेज कुमारांची अवस्था अगदी वाईट होती. माझीही काही फार वेगळी नव्हती. फक्त मी अजून रडायला आलो नव्हतो. "काय रे पोरांनो तुम्ही तर चांगल्या घरचे दिसतात. असच शिकवलं का तुम्हाला?" साहेबाने त्या पोरांना प्रश्न विचारला. आधीच त्या पोरांची अवस्था वाईट त्यातून साहेब दम देतोय पाहिल्यावर ती पोरं रडायलाच लागली .
"साहेब कॉलेजला जायला उशीर होत होता. प्रॅक्टिकल्सला उशीर झाला की लॅबमध्ये घेत नाहीत म्हणून पटकन ट्रॅक ओलांडला. जाऊद्या साहेब पाया पडतो तुमच्या." रडत रडत एक जण म्हणाला.
आणि नेमकी इथं मला काय दुर्बुद्धी झाली आणि त्या मुलाला रडताना पाहून मी मोठ्याने हसलो. म्हणजे मला हसू कंट्रोलच झालं नाही त्यावेळेस. दोन मिनीटं मी विसरलो होतो की साहेबाने जर मला दम दिला तर एखाद वेळेस मी सुद्धा असाच रडेन. माझ्या त्या हसण्याचा एका हवालदाराला काय राग ते त्यालाच ठाऊक.
"काय रे भाड्या, मजा वाटतीये का ... मग हे घे" म्हणत त्याने त्याच्या हातातली वेताची काठी सपकन्‌ माझ्या मांडीवर मारली. दोन क्षण मी जगच विसरलो. तोंडातून आवाज सुद्धा निघाला नाही. अडकून बसल्यासारखा झाला. काय चाललयं ते समजायला दोन पाच मिनीटं लागली. आता या सगळ्या कायदेशीर कारवाईतून आपली सूटका होत नाही अशी खात्री मला पटायला लागली होती. मी आजूबाजूला नजर टाकली मला पकडणारा साहेब कुठं आहे का पहाण्यासाठी. एका कोपऱ्यात तो उभा होता. त्याने माझ्याकडे पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की तो विचारत होता "कुणी सांगीतला होता शहाणपणा करायला?" मी त्याच्या कडे पडलेल्या चेहेऱ्यानी पाहिलं आणि तो माझ्याकडे आला.
माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला "नशीब तुझं साहेबांच्या काठीचा फटका नाही खाल्लास... चड्डीत मुतला असतास भो???" असं बोलून तो हवालदारापाशी गेला आणि त्यांच्यात काहीतरी कुजबूज झाली.

पाच मिनीट मी मांडी चोळता चोळता विचार करत होतो की त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवुन मला शिवी का दिली? नंतर मला जरा लिंक लागली की तो मला लघवीचे कारण सुचवत होता त्या खोलीबाहेर काढण्यासाठी. मी हवालदाराला तसे सांगीतले आणि तो मला बाहेर घेवून आला. आमच्या पाठॊपाठ मला पकडणारा साहेब पण आला.
"साहेब, आता तर फटके पण खाऊन झालेत. आता तरी जाऊ द्या" मी कळवळत म्हणालो.
"ठीक आहे ठीक आहे" असं म्हणत त्याने हवालदाराकडे पाहिले. हवालदार मला घेउन स्टेशनच्या बाहेर आला. मी लगेच खिशातून माझ्याकडे असलेले २५० रुपये काढून हवालदाराला दिले. त्यातले ५० रुपये परत देत तो म्हणाला
"जास्त घेउन आम्हाला काय करायचय... साहेबानी सांगितले तितकेच घ्यायचे. आणि हो पुन्हा असा अडकू नकोस प्रत्येक वेळी साहेब नसतील तुला सोडवायला."
मी त्याला "थॅंक्यू" म्हणालो आणि मांडी चोळत चोळत ऑफिसकडे निघालो.

समाजजीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

सहज's picture

18 Jul 2010 - 10:29 am | सहज

हा हा हा!

असलेले २५० रुपये काढून हवालदाराला दिले. त्यातले ५० रुपये परत देत तो म्हणाला
"जास्त घेउन आम्हाला काय करायचय... साहेबानी सांगितले तितकेच घ्यायचे.

असे इमानदार, उसुल के पक्के हवालदार बोल वाचून डोळे पाणावले! :-)

स्वाती दिनेश's picture

18 Jul 2010 - 10:36 am | स्वाती दिनेश

अनुभव छान लिहिला आहेस,
असे इमानदार, उसुल के पक्के हवालदार बोल वाचून डोळे पाणावले!
अगदी अगदी..
स्वाती

यशोधरा's picture

18 Jul 2010 - 10:44 am | यशोधरा

अनुभव बोलका आहे! लिहिलंय पण मस्तच.

निशिगंध's picture

18 Jul 2010 - 10:49 am | निशिगंध

असाच शेम टु शेम अनुभव मलाहि आलेला आहे.. अन तो पण शिवाजीनगर स्टेशनवरच. त्या दिवशी अख्खी दुनिया लाईन ओलांडत होती पण त्याने सगळे कॉलेजकुमारच पकडले होते..
माझ्याकडे भरपुर वेळ असल्यामुळे व लाच द्यायची नसल्यामुळे मी कोर्टाचे सर्व सोपस्कर पुर्ण केले...
नशिबाने कोर्ट (मॉजिस्टेट) त्या दिवशी स्टेशनवरच होते व एका रुम मध्ये त्यांचे कोर्ट चालु होते..
आम्हा 12 15 जणांना तिथे रांगेत नेले..
त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला "गुन्हा कबुल आहे का?"
सर्वजण चिडीचुप अगदी गंभीर गुन्हा केल्यासारखे सुतकी चेहर्याने उभे होते..
मागुन हवालदारानी डिवचले लवकर बोला अन आम्ही एकसुरात होय बोललो..
अन वैयक्तीक 50 रुपयांच्या दंडावर सुटलो...
समदुखी भेटल्याचा आनंद झाला

____ नि शि गं ध ____

७/८ वर्षांपुर्वी पुरंदर किल्ल्यावर जाण्यास आम्ही दुचाक्यांवर निघालो असता पुणे कँप मध्ये वेस्ट एंड पाशी रस्ता ओलांडत असता सिग्नल बंद झाला. तसेच पुढे येताच एक महिला ट्रॅफीक हवालदार समोर. आम्हास अडवले व साईडला घेतले. अर्थात त्या वेळी आम्ही सगळे कॉलेज विद्यार्थी असल्याने नोकरी करत नव्ह्तो त्यामुळे जास्त पैसे खिशात असल्याचा काही संभवच नव्ह्ता त्यामुळे दंड भरून पावती घेण्याचा कुणी विचारच केला नाही. शेवटी ५० रू. वर तडजोड झाली. आता हे पैसे देण्याची जबाबदारी माझ्यावरच आली.
खिशातनं ५० रू. काढले व महिला हवालदारापाशी गेलो. नोट पुढे केली.
"बावळट....! पैसे असे देतात काय?" ....इती महिला हवालदार...मी गारच.

शेवटी ती म्हणाली असे उघडपणे देउ नयेत. नीट लपवून द्यावेत. लोक बघत असतात.
मग मी नोटेची विडीसारखी बारीक गुंडाळी केली व ती दिल्यानंतरच आमची त्या प्रसंगातून सुटका झाली.

आळश्यांचा राजा's picture

18 Jul 2010 - 11:02 am | आळश्यांचा राजा

असे उघडपणे देउ नयेत. नीट लपवून द्यावेत. लोक बघत असतात.

:))

आळश्यांचा राजा

यशोधरा's picture

18 Jul 2010 - 11:15 am | यशोधरा

नीट लपवून द्यावेत.

:D अगदीच म हा न!

शिल्पा ब's picture

18 Jul 2010 - 9:44 pm | शिल्पा ब

असे उघडपणे देउ नयेत. नीट लपवून द्यावेत. लोक बघत असतात.

तुम्हाला एक फुकटचा दुनियादारीचा धडा मिळाला.. :-)
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

आळश्यांचा राजा's picture

18 Jul 2010 - 10:59 am | आळश्यांचा राजा

मनमोकळेपणे सांगीतलेला अनुभव (विदाउट एनी टिप्पणी ऑन द सिस्टम), तो सांगायची पद्धत आणि लेखनाची शैली - सगळंच आवडलं. छान!

आळश्यांचा राजा

विनायक प्रभू's picture

18 Jul 2010 - 11:12 am | विनायक प्रभू

=))

मस्त कलंदर's picture

18 Jul 2010 - 1:06 pm | मस्त कलंदर

ते कॉलेजमध्ये असतानाची गोष्ट. उशीर झाला म्हणून आणि आणखी कुणीतरी सुचवले म्हणून दोन डब्यांच्या मधल्या जागेतून ते डोंबिवली ते कुर्ला/दादर असा काहीतरी प्रवास करत होते. ट्रेन ठाण्याला पोचतापोचता त्या सगळ्यांना रेल्वे पोलिसांनी पकडले. त्यांना स्टेशनवरच्या एका छोट्या खोलीत नेले आणि सगळ्यांना पुढची 'कायदेशीर कारवाई' काय असेल हे समजावून सांगितले. ते ऐकल्या ऐकल्या माझ्या सहकार्‍याने पहिली गोष्ट केली ती म्हणजे, सरळ बॅगेतला डबा काढून खायला सुरूवात केली. सगळे थक्क होऊन त्यांच्याकडे पाहात राहिले. यांनी आधी सगळा डबा फस्त केला आणि मगच दंड भरण्यासाठी ओळखीचे फोन करायला सुरूवात केली(कॉलेजात असताना इतके पैसे जवळ नसण्याची शक्यता जरा जास्तच ना?)

नंतर त्यांनी जेव्हा हा किस्सा मला सांगितला तेव्हा मी 'महान आहात' असे म्हणून हसायला लागले.. तर यावर त्यांचे उत्तर होते, "मग, दिवसभर पुन्हा वेळेवर जेवायला मिळेलच याची काय खात्री? म्हणून मी खाऊन घेतले" :D

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

निखिल देशपांडे's picture

18 Jul 2010 - 5:09 pm | निखिल देशपांडे

छान अनुभव कथन
आमचा रेल्वे पोलिस अनुभव आम्ही मिसळपाव वर ईथे लिहिला आहे.

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!