प्रेम - एक अनुभव

स्मृती's picture
स्मृती in जनातलं, मनातलं
2 May 2010 - 8:59 am

फार जुनी गोष्ट नाही ही, गेल्या १०-१५ वर्षांतलीच आहे. एक छोटंसं, टुमदार नगर होतं. तिथले लोक खाऊन पिऊन सुखी, आनंदी, उत्सवप्रिय होते. हेवेदावे, मतभेद नव्हतेच असं नाही; पण अगदी चवीपुरते होते आणि तेवढेच चघळले जायचे. मुळात सगळे कुठल्या ना कुठल्या सोहळ्यात इतके गुंतलेले असायचे की आपोआपच या नकारात्मक गोष्टी मागे पडायच्या.

जगदीश पांचाळ, लता राऊत आणि सुषमा कुलकर्णी हे तिघे त्या नगरातल्या तरूणाईचे प्रतिनिधी. लताच्या घरचं वातावरण कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि तसं पारंपारिक. सहा भावंडांत लताचा दुसरा नंबर. बी.ए.च्या शेवटच्या वर्षाला. काळी-सावळी पण रेखीव. सदैव हसरा तरतरीत चेहरा. सगळ्या गोष्टींत भाग घ्यायचा प्रचंड उत्साह आणि उत्साहाला साजेशी टॅलेंटची जोड. सुषमाचं घर त्यातल्या त्यात पुढारलेलं. दोनच भावंडं, दुहेरी मिळकतीमुळे थोडीफार सुबत्ता. चारचौघात वावरल्याने येणारा समजुतदारपणा घरात. सुषमा सोशल वर्कच्या पद्व्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला.

झालं काय की, राज्य नाट्य स्पर्धेसाठी नाटक बसवणं सुरू होतं. नाटक, बांधकाम मजूरांच्या आयुष्यावर असल्याने सडसडीत, सावळ्या लताच्या वाट्याला प्रमुख भुमिका आली आणि तीही त्यात जीव ओतून काम करत होती. पंधरा दिवसांवर नाटक आलं आणि नाटकातल्या दुसऱ्या एका मुलीने काम करायला नकार दिला. झालं मुलीचा शोध युद्धपातळीवर सुरू!! कोणीतरी सुषमाचं नाव सुचवलं. अरे पण तिचं मराठी?! काही वाईट नाही, आणि आता शेवटच्या क्षणी फारसा चॉईसही नव्हता. उपलब्ध पर्यायांमध्ये सुषमाच सगळ्यात योग्य होती कारण तिने आधी नाटकांत कामं केली होती आणि नशीबाने आढेवेढे न घेता ती कबुलही झाली. परत नव्या जोमाने तालमी सुरू झाल्या आणि लता सुषमाची मैत्रीही.

दोघी तशा ओळखत होत्या एकमेकींना पण प्रत्यक्ष संबंध आला नव्हता. आता तालमींना येता जाता एकमेकींसाठी थांबणं, कॉलेजच्या गंमती - नोकरीचे प्लॅन्स शेअर करणं सुरू झालं. सुषमाला लताचं खुप कौतुक वाटलं, सगळ्या लहान भावंडांचं किती प्रेमाने करते ही! घरात सतत एवढी वर्दळ आणि इतकी कामं असूनही कसा काय अभ्यास करते?! आणि किती चव आहे हिच्या स्वैपाकालापण! ऑल राउंडर आहे बाबा!

लताला तर सुषमामुळे एका नवीन जगात प्रवेश मिळाला. किती छान आहे हिचं घर, स्वत:ची छोटीशी खोली म्हणजे चंगळच! किती बडबडी आहे ही, मनातलं सगळं आरपार बोलून टाकते, तेही आई बाबांसमोर. हिचे बाबा कसे मस्त गप्पा मारतात, आई पण वाचत असते!!

नकळत दोघींनी एकमेकींच्या भावविश्वात शिरकाव केलाच. नाटक पार पडलं, ग्रुप पांगला पण ही नवीन जोडी वरचेवर भेटतच राहि्ली. कधी अभ्यासाच्या निमित्ताने सुषमाच्या घरी, कधी लताच्या कॉलेज कँटीनमध्ये, कधी कुठे कधी कुठे...

अशाच एका संध्याकाळी दोघी अभ्यास संपवून बाहेर पडल्या. लताला सोडायला सुषमा बस स्टॉपपर्यंत गेली, दोघी बसची वाट बघत होत्या. गप्पा चालू होत्याच, तेवढ्यात, " हाय सुषमा!" मागून आवाज आला. वळून बघतात तर जगदीश. "अरे हाय! कसा आहेस? आणि इतके दिवस होतास कुठे, दिसला नाहीस अजिबात. इन फॅक्ट मी तुला विसरलेच होते!" सुषमा म्हणाली. "अगं मी थळला होतो जवळ जवळ वर्षभर, जॉबवर पाठवलं होतं बॉसने", जगदीश हसत हसत म्हणाला. "ही माझी नवीन मैत्रीण लता, हल्लीच परवाच्या नाटकात ओळख झाली आमची" सुषमा म्हणाली. दोघांनी एकमेकांना ’हाय’ केलं, पाचेक मिनिटं गप्पा झाल्यानंतर जगदीश गेला.

सुषमा म्हणाली "एकदम छान, साधा मुलगा आहे हा जगदीश. त्याच्या मोठ्या भावाचं माझ्या आईच्या ऑफीसमध्ये काहीतरी काम होतं तेव्हा घरी आला होता एक-दोनदा. वायरमनचा का काहीतरी कोर्स केलाय आणि आर.सी.एफ. मध्ये कामाला आहे". तेवढ्यात लताची बस आली आणि बोलणं तिथेच थांबलं.

काही दिवसांत लताला छोटीशी नोकरी मिळाली. सकाळच्या कॉलेजनंतर ती सरळ ऑफीसला जायची आणि संध्याकाळीच घरी पोचायची. तिच्या वडलांनी बहुतेक तिच्यासाठी स्थळं शोधणं सुरू केलं होतं आणि तिची त्याबद्दल काही तक्रारही नव्हती. नाहीतरी ग्रॅज्युएट झाल्यावर लग्न होतातच मुलींची.

याच दिवसांत एक-दोनदा तिला जगदीश दिसला होता. एकदा तिची बस सिग्नलला थांबलेली असताना बाजुलाच तो बाईकवर आला. नंतर एकदा संध्याकाळी घरी जाताना चहाच्या टपरीवर मित्राबरोबर. मित्रासारखी याच्या हातात मात्र सिगरेट नव्हती याची तिने नोंद का घेतली याचा ती बराच वेळ विचार करत राहिली होती नंतर. दोन्ही वेळा दोघांनी हसून हात हलवला होता. सुषमाला तिने सहज म्हणून सांगितलंही. सुषमा म्हणाली "अरे वा!" बस एवढंच.

दिवस भराभर जात होते. लताचा पहिला ’दाखवण्याचा’ कार्यक्रम होता संध्याकाळी. ती साडी नेसून तयार होत होती; पण का कोणास ठाऊक तिचं मनच नव्हतं कशात. खरं तर लग्नाची पहिली पायरी असलेल्या या कार्यक्रमाची तिने मनात कित्येकदा कल्पनाही केली होती. मग काय बरं बिनसलं होतं?! काही का असेना, झटपट तयार झाली ती. पाहुणे आले, प्रश्नोत्तरं झाली, चहा-सुपारी झाली आणि मंडळी गेली. दोन दिवसांनी ’नोकरीवाली मुलगी नको’ असं उत्तर आलं. घरच्यांच्या कोणत्याही प्रतिक्रियांच्या आधीच तिच्या नजरेसमोर झपकन जगदीश आला. ती एकाच वेळी पुर्णपणे गोंधळून गेली आणि निश्चिंतही झाली. तिचे आप्पा मात्र नोकरीबद्दल आग्रही होते हे तिला खुपच सुखावून गेलं. "तू नको मनाला लावून घेऊ. याच्यापेक्षा तालेवार स्थळ शोधतो बघ. नोकरी करायचीच पण. संसाराचा गाडा दोघांनी मिळून चालवावा, बरं असतंय." आप्पांचा अभिमान वाटला तिला.

पुढच्याच आठवड्यात पुन्हा एकदा जगदीश दिसला. यावेळी तो फक्त हसून न थांबता जवळ येऊन म्हणाला, "सोडू का? बाईक आहे". त्याचं हास्य आणि नजर इतकी निर्मळ होती की नाही म्हणायचा विचारही आला नाही तिच्या मनात. "घरी येणार का चहा घ्यायला" तिने विचारलं, तो म्हणाला, "पुढच्या वेळी नक्की येईन, आज भाबीबरोबर जरा डॉक्टरकडे जायचंय. भाई टूरवर आहे." "अच्छा! थॅंक्स!!" दोघंही वळले.

जगदीश घरी आला तर भाबी तयारच होती. नेहमीसारखीच टवटवीत, प्रसन्न. जगदीशच्या मनात आलं, बाच्या पश्चात किती सहजपणे आपलं घर सावरलं हिने. सगळं सणवार, चालीरिती... माणसं धरून आहे. आपणही आता भाई भाबीचं ऐकलं पाहिजे. २७ चे झालो, लग्न करायला हरकत नाही. याच क्षणी का कोण जाणे सावळी मोहक लता आली त्याच्या डोळ्यांसमोर आणि पाठोपाठ ओठांवर हसू.

छोट्या नवीनला तयार करत असताना, आज जगदीशभाईचा मूड काही वेगळा आहे, हे नीताने ताडलंच. यावेळी अगदी लावून धरलंच पाहिजे नवीनचे पप्पा आल्यावर. सगळं व्यवस्थित असताना कशाला उगाच उशीर करा? जगदीशभाईसारख्या सरळ मुलाला नक्षत्रासारखी मुलगी शोधू आपण!

दोन आठवडे झाले, कोणीच दिसत नव्हतं, नेहमीचीच वेळ, तोच बस स्टॉप, तेच सिग्नल; पण सगळं कसं ओकंबोकं वाटत होतं. आणि कोणी म्हणजे काय, फक्त जगदीश! लता जाता येता वाट बघून दमली. घरी पोचल्यावर कामाच्या गोंधळातही त्याचाच विचार येत राहिला मनात. मोजून आठ-दहा वाक्यं बोललो असू आपण. त्यातून एखाद्याची इतकी ओळख पटते? त्याच्यासाठीच बनलो असल्याची भावना कशी निर्माण होते? त्याचा हसरा चेहरा नजरेसमोर आला की टचकन डोळ्यांत पाणी का येतं? या अनाकलनीय प्रश्नांच्या गुंत्यात लता सापडली होती आणि तरीही कमालीची शांत होती.

जगदीशही दोन आठवडे थळला अगदी वेडापिसा झाला. का माझं चित्त थाऱ्यावर नाही? थळचा हा आवडता समुद्रकिनारा अचानक जीवघेणा का वाटायला लागलाय? सुषमाच्या घरी फोन करून लताला काही निरोप द्यावा का? छे, भलतंच! असे मुर्खासारखे विचार कसे येतायत मनात?!

सोमवारच्या भल्या सकाळीच तो वाट पहात थांबला होता तिच्या कॉलेजजवळ. ती आली, त्याला पाहिलं आणि कसं कोण जाणे, डोळ्यांतून घळघळ पाणीच वहायला लागलं तिच्या! कुठेतरी पळून जावंसं वाटलं त्या क्षणी शरमेने! काय चाललंय काय हे, लता आश्चर्यचकीत झाली होती. तेवढ्यात जगदीश पुढे होऊन म्हणाला, "सॉरी, अचानक जावं लागलं थळला. काही सांगायला वेळच नाही मिळाला..... आणि... सांगणार तरी काय, कशाला?!"

काही न बोलता दोघं कॅंटीनच्या दिशेने वळले. बोलायची गरज उरलीच नव्हती! मनाची खूण मनाला पटली होती. भान हरपल्यासारखे दोघे बराच वेळ कॅंटीनमध्ये बसले होते. बऱ्याच वेळाने जगदीश म्हणाला, "लता, हे नक्की कधी झालं कळलं नाही; पण तू खूप जवळची वाटतेस, तुझ्याबरोबर आयुष्य खूप छान जाईल असं वाटतं. लग्न करशील माझ्याशी? तुझ्याएवढा शिकलेला नाही मी; पण नोकरी चांगली आहे आणि माझ्या कामाला मरण नाही, तुला आयुष्यभर सुखात ठेवेन याची खात्री आहे."

लता हरखून गेली. किती हा साधा मुलगा! अगदी जसा असेल अशी कल्पना केली होती, तस्साच! तिने त्याच्याकडे पाहिलं, टिपीकल गुजराती तरतरीत फिचर्स आणि कमालीचे बोलके डोळे! त्या डोळ्यांत ती हरवून गेली आणि होकाराचं लाजवट हसू चेहऱ्यावर कधी उमललं कळलंच नाही. "चला मॅडम, पळा आता वर्गात. मलापण कामावर जायचंय म्हटलं"

त्यादिवशीची संध्याकाळ कधी होते असं झालं होतं लताला. सुषमाला कधी एकदा सगळं सांगते असं होऊन गेलं होतं. विशेष ओळख नाही, उण्यापुऱ्या २-३ महिन्यांतल्या या येता-जातानाच्या भेटी. पण तरीही कोणाबद्दलही न वाटलेलं काहीतरी खूप छान, नाजुक, आश्वासक असं फक्त याच्याबद्दलच वाटलं. ते समजून घेणारंही सुषमाशिवाय कोणी नव्हतं तिच्या जगात.

सुषमा तर उडालीच आनंदाने आणि आश्चर्याने! "काय गं, छुपे रुस्तम निघालात दोघेही! जगदीश तर खरंच ग्रेट बाबा.. इतक्या पटकन मनातलं बोलूनही गेला!... पण गोड मुलगा आहे गं लता, तुला खरंच छान ठेवेल! आणि काळजी नको, आपल्याला माझ्या आईतर्फे चौकशी करता येईल त्या सगळ्यांची." सुषमा तिच्या मुळच्या बोलघेवड्या स्वभावाला एक्साईटमेंटची जोड मिळाल्याने बोलतच राहिली... लता मात्र घरच्यांच्या प्रतिक्रीयांच्या विचाराने थोडीशी धास्तावली होती.

नंतरचे दोन महिने परीक्षेच्या धामधुमीत गेले. मध्येच कधीतरी जगदीश यायचा कॉलेजवर; पण तेवढंच. यादरम्यान काहीच बोलायला नको असं लताने सुचवलं. जगदीश म्हणाला, "तू सांगशील तेव्हा, तुला कम्फर्टेबल वाटेल तेव्हा आपण सांगू घरी. आधी भाबीची भेट घालून देतो तुझी, माझं घर बघ, मग भाई भाबी येतील तुझ्या घरी." एकदाची परीक्षा झाली. घरी कोणी नाहीसं पाहून लताने हळूच आईला जगदीशबद्दल सांगितलं. म्हणजे, अमुक अमुक एक मुलगा आहे, चांगला आहे, त्याने मला लग्नाचं विचारलं आहे, त्याची अमुक अमुक नोकरी आहे, घरी भाऊ, वहिनी, भाचा आहे वगैरे वगैरे. आईने काहीही प्रतिक्रिया व्यक्त न करता आपलं तांदुळ निवडण्याचं काम चालू ठेवलं. लताला आईकडून अपेक्षाही नव्हती प्रतिक्रियेची. खरं तर तिला कळायला लागल्यापासून आई सदैव बाळंतपणांत आणि घरचं करण्यात इतकी गुंतलेली असायची की तिच्या वाट्याला कधी आलीच नव्हती; त्यामुळे सहाजिकच दोघींमध्ये मायेचा ओलावा वगैरे काही नव्हता. जे काही प्रेम मिळालं ते शेवटच्या गणेशलाच. आधीच्या पाच जणी जणू काही आईचा सुडच घ्यायला आल्या होत्या.

दुसऱ्या दिवशीची सकाळ. आप्पा कामावर निघाले होते, आणि ऑफिसच्या गडबडीत असणाऱ्या लताला त्यांनी अचानक विचारलं, "कोण पोरगा आहे? काय आडनाव? आर.सी.एफ. मध्ये नोकरी कधीपासून आहे?" लताने शांतपणे सगळी उत्तरं दिली. म्हणाली, "त्यांच्या भाऊ-वहिनीला यायचंय आपल्या घरी". "कशाला?!" चमकून आप्पा म्हणाले! "पांचाळ म्हणजे मराठा सोड मराठीपण नाही". लता गांगरून गेली तरीपण उसनं अवसान आणून म्हणाली, " पण आप्पा, चांगली माणसं आहेत हो. दोघंच भाऊ. आई वडील १० वर्षांपुर्वी २ महिन्यांच्या अंतराने गेले. मोठा भाऊ मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह आहे. भाबी घरीच असते. छोटा भाचा आहे. दोघं भाऊ दोस्तांसारखे रहातात. एकदा भेटा तर खरं".

पाचही पोरींमधली सगळ्यात सोशिक, शांत पोरगी एकदम चुरूचुरू बोलायला लागलेली बघून आप्पांना धक्काच बसला. या पोराने एवढी काय जादू केली म्हणायची! आणि ती हल्ली नवीन मत्रीण येते, कोण, हां सुषमा! तिची फूस दिसते या सगळ्याला. एवढी हौस आहे तर स्वत: कर जा म्हणा त्या गुजरगांड्याशी लग्न! एक ना दोन, नको नको त्या विचारांनी आप्पांचं डोकं पार विस्कटून गेलं. दिवसभर कामात लक्ष लागेना. लताच्या पाठीवर तीन पोरी उजवायच्या आहेत, हिचं करून दिलं तर गावाकडे तोंड दाखवायला नको! मग तिघींसाठी कोण आणेल स्थळं? कसं व्ह्यायचं, काय करायचं?

लताने ऑफिसला पोचल्या पोचल्या जगदीशच्या कामावर फोन केला. तो म्हणाला, "काळजी करू नकोस. मी ऑफिसवर येतो, त्याआधी भाबीला कल्पना देतो, संध्याकाळी माझ्या घरी जाऊ, आणि सगळे मिळून ठरवू पुढचं." तिला खूप आश्वस्त वाटलं. संध्याकाळी भेटल्यावर डोळे सारखे भरून यायला लागले. काय होणार, काय करायचं, तिला काहीच सुचेना.

जगदीशने ओळख करून दिल्यावर लता पटकन पाया पडायला वाकली. नीताने अर्ध्यातच तिला हाताला धरून उभी केली, नीट पाहिलं तिच्याकडे आणि खात्री पटल्यासारखी हसली. बाईच्या पसंतीची पावती बाईला लगेच मिळाली. नीता आणि लता, अरे वा! नावातच नाद आहे.. छान जमणार आपलं, लताला वाटून गेलं. भाबी म्हणाली, "केटली रूपाळी छे!" आणि लगेच मराठीत म्हणाली, "गोड आहेस हं!"

"भाई कधी येणार आहे?" जगदीशने विचारलं. "त्यांना उशीर होणार आहे; पण मी त्यांना सगळी कल्पना दिली आहे. आपण म्हणजे आम्ही दोघं येत्या शुक्रवारी संध्याकाळी तुझ्या घरी आलो तर चालेल का? तू तुझ्या वडिलांना विचारून सांग". भाबी एका दमात बोलून गेली आणि लताला खूप निवांत वाटलं. किती समजूतदार आहेत ही माणसं! जगदीशने काही सांगायची सुचवायची वेळ न आणता माझ्या घरी येणार, मला रीतसर मागणी घालायला!! आणि बोलण्यातही भाबी किती प्रेमळ आहे. आपले आप्पा जरा नाराज होतील खरे आपल्यावर, पण इतकी चांगली माणसं पाहून देतील आशीर्वाद. लता विचारांत गुंगून गेली. "अगं, भाबी काय म्हणतेय ऐकलंस का?" जगदीशच्या बोलण्याने भानावर येऊन तिने मान हलवली.

"आप्पांना विचारून लगेच सांगते मी. निघायचं का आपण? उगाच आप्पांना 'उशीर का झाला?' असा विषय नको!" भाबीने केलेला खास गुजराती 'मसाला चहा' घाईघाईत संपवून ती लगेच निघाली. निघताना मात्र भाबीला न जुमानता नीट वाकून पाया पडलीच.

रात्रीची जेवणं झाल्यावर आप्पांना सुपारी कातरून देण्याचं आईचं काम. याच वेळी दोघं जरा दिवसभराचं बोलतात. आज जरा स्वैपाकघर आवरण्यातून अंग काढून याच वेळी दोघांच्या कानावर घालूया असं लताने ठरवलं.

"काय म्हनली? भेटायला येनार? शुक्रवारला अजून वेळ आहे! त्याच्या आधी तू जरा दोन दिवस आपले काटकर मामा आहेत ना, पालघरला, तिकडे जाऊन ये. मामींनी सांगावा धाडलाय.. जीवाला बरं नाही म्हनतात, तुला पहावं वाटतंय त्यांना. गुरुवारी ये परत. सकाळी प्रकाश गाडी घेऊन न्यायला येईल.

लता पुरती गोंधळून गेली. अचानक काय झालं असेल मामींना? परत स्टोनचा त्रास सुरू झाला की काय? आणि उद्याच जायचं? जगदीशला कधी कळवू? अर्थात मामींच्या घरीच आहे म्हणा फोन.. हे काटकर नवरा-बायको म्हणजे लताच्या वडिलांच्या गावचे.. नातं असं काही नव्हतं; पण प्रेमळ होते दोघंही आणि वर श्रीमंत. राउत कुटुंबावर बरेच छोटे मोठे उपकार होते त्यांचे. मुलबाळ नव्हतं म्हणून त्यांना ह्यांचं गोकुळ खूप आवडायचं. लतावर विशेष जीव होता त्यांचा. लताला बरंच वाटलं, मामींनाही सांगावं. नाहीतरी आप्पा सांगणारच शुक्रवारनंतर. मामी खुश होतील. लता निश्चिंत मनाने झोपली. सगळं नीट मार्गी लागेल अशी तिला खात्री वाटत होती आता.

सकाळीच प्रकाशबरोबर निघाली, आप्पा आधीच कामावर निघून गेले होते. निघताना आईने नेहमीच्याच तटस्थपणे; पण "जप जीवाला" असं म्हटलं तेव्हा तिला जाणवलं की आईला, मी आता लवकरच माझ्या घरी जाणार असं काहीसं फिलिंग वगैरे आलेलं दिसतंय! आत कुठेतरी तुटल्यासारखं झालं तिला.

गेल्या गेल्या मामींच्या गळ्यातच पडली ती. नेहमीसारख्या छान स्वच्छ हसल्या नाहीत त्या. पण बोलल्या. तब्येतीची चौकशी केली तर म्हणाल्या, "तशी ठीकच म्हणायची, सुख दुखतंय दुसरं काय!" लताला काहीच कळलं नाही, पण मामी अस्वस्थ आहेत एवढं मात्र लक्षात आलं.

नंतरच्या काही तासांत हेही लक्षात आलं की त्या तिच्यावर घारीसारखी नजर ठेऊन होत्या. तिला नेहमीप्रमाणे वावरू देत नव्हत्या. काही बोलतही नव्हत्या आणि तुटकपणे वागत होत्या. शेवटी रात्री जेवताना न राहवून तिने विचारलंच, " मामी काही चुकतंय का माझं? काय झालंय? मला तुमच्याशी किती बोलायचंय, तुम्हाला सांगायचंय". यावर फक्त कसनुशा हसल्या.

नंतर दोघी एक चक्कर मारायला बाहेर पडल्या, लता परत विषय काढणार तेवढ्यात त्या म्हणाल्या, "सगळं माहीत आहे पोरी मला. आप्पांनी सगळं सांगितलंय ह्यांना. म्हणून तुला इथं आणलंय. उद्या सकाळच तू अन मी प्रकाशबरोबर निघायचंय गावी जायला". लताचं डोकं बधीर झालं! एवढा मोठा कट केला! आपल्या आप्पांनी? आणि आपण किती साधी-भोळी, गोड स्वप्नं बघत होतो!

काही वेळ काहीच सुचेना! डोकं अजिबात चालेना.. परत परत आप्पा डोळ्यांसमोर येत राहिले. तेच हे आप्पा का, ज्यांनी स्थळाकडून नकार आल्यावर 'नोकरी केलीच पाहिजे.. तालेवार स्थळ शोधतो' म्हणून दिलासा दिला होता. तेच हे आप्पा का ज्यांना तिच्याच हातची भाकरी लागायची. तेच हे आप्पा का जे तिच्यापाठच्या तिघींना कायम 'लतीसारखं सगळं शिकून घ्या पोरींनो' असं सांगायचे!

असं सिनेमातल्यासारखं खऱ्या आयुष्यात घडतं? कोणाला काही पत्ता न लागू देता, मुलांचा काहीही विचार न करता आई-वडील असे परस्पर निर्णय घेऊन मोकळे होतात? इतर कोणाकडून कळण्याआधी आपण सगळं घरी सांगितलं हे चुकलं का आपलं? जगदीशबद्दल चौकशी तरी केली का आप्पांनी? का त्याचीही गरज नाही वाटली त्यांना?

जे घडत होतं त्यावर तिचा विश्वास बसेना. "मामी, फक्त एक करा, मला तेवढा फोन करूद्या जगदीशला!" "नको पोरी, तुझे मामा या वयात घराबाहेर काढतील मला.. भलतं सलतं मागू नको, माझ्या हातात नाही गं काही." लता वेडीपिशी झाली. काय करावं? फोन असलेल्या खोलीतून मामी हलेनात आणि येणाऱ्या फोनवर बोलणं होताना तिला तिथे थांबूही देईनात. रात्र गेली, रात्र कसली, काळरात्रच! डोळ्याला डोळा नव्हता, तिच्या आणि मामींच्याही. पहाटेच हाक मारली त्यांनी. तयारी केली आणि उजाडता निघाली गाडी गावी. गावी म्हणजे आपल्या गावी सातारला की आणखी कुठे जातोय, किती दिवस तिथे असणार... काही म्हणजे काही पत्ता लागू देत नव्हत्या मामी.

रस्त्यातही कुठे चहाला, जेवायला थांबले तरी प्रकाश आणि मामी सावलीसारखे मागे मागे होते. लताचे डोळे राहून राहून भरून येत होते. मनात विचार सुरू होते. एक फोन करायला मिळाला तरी खूप होईल. काय होईल ते होवो, तिने ठरवलं, जगदीशला अंतर द्यायचं नाही. सगळं होईल नंतर व्यवस्थित. सगळ्यांची नजर चुकवून पळायला मिळालं तरी पळू; पण देवा, एक संधी दे!

गाडी सातारच्या दिशेने भरधाव जात होती. संध्याकाळी मामींच्या माहेरी म्हणजे सातारच्या पुढे एका छोट्या गावी ते पोचले. मामींनी बहुतेक आधीच कल्पना देऊन ठेवली असावी कारण सगळे चिडीचूप होते. निमुटपणे कामं सुरू होती. तिची आणि मामींची व्यवस्था त्या मोठ्या घरातल्या वरच्या मजल्यावरच्या एका आडबाजूच्या खोलीत केली होती. गडीमाणसांनी भरलेलं घर होतं ते. शहरात वाढलेली लता त्या जुन्या, कर्मठ वातावरणात आणखी बुजून गेली. तिचं मन आप्पांच्या आणि जगदीशच्या नावाने आक्रोश करत होतं; पण ती प्रत्यक्षात मात्र बर्फासारखी थिजून गेली होती. दोन दिवस गेले. शुक्रवार आला... आज भाई भाबी घरी येणार होते... आले असतील का? तिला अशा लागून राहिली.. दुसऱ्या दिवशी ती 'काही वेगळं घडतंय का' याची वाट पहात राहिली; पण नाही.. तिचं नशीब एवढं चांगलं नव्हतं!...

तिच्याशी कोणी कामाव्यतिरिक्त काहीच बोलत नव्हतं. ती मामींना विचारत होती अध्येमध्ये, पण तिने कुठल्याही उत्तराची अपेक्षा सोडली होती. लवकरच आपल्याला इथून बाहेर पडायला मिळेल आणि जगदीशला एक फोन करता येईल याच आशेवर ती तग धरून राहिली होती.

आणखी दोन दिवसांनी 'तिचं लग्न १२ तारखेला आहे' असं तिला सांगण्यात आलं! कुलदीप इंगळे नावाच्या मुलाशी. त्याची म्हणे शेतीही होती आणि तो सातारला कुठल्यातरी कंपनीत नोकरीही करत होता. घर असंच जवळच्या गावात. घरी आई वडील आणि धाकटा भाऊ. एवढी माहिती तिला दिली गेली. याच्या पलीकडे, काही सांगायची कोणाला गरज वाटली नाही. आणि विचारायचं तिच्या मनातही आलं नाही. मामींना तिने 'आप्पांशी तरी बोलुदे' असं वारंवार सांगूनही, 'ते आता तुला भेटतीलच १० तारखेला, तेव्हा बोल.. सध्या ते गडबडीत आहेत' यापलीकडे तिच्या हाती काही लागलं नाही.

आठ तारीख होती. म्हणजे चार दिवस हातात होते. काय करावं? फोन करायचा कुठून? जगदीशच्या घरी फोन नाही. ऑफिसमध्ये भेटेल ना फोनवर? बरेचदा प्लांटमध्ये असतो तो. अशा अनेक प्रश्नांनी ती हैराण झाली होती.

नऊ तारखेच्या रात्री लताचे आई आप्पा, भावंडं, तिची ताई - भाउजी आणि मुलं, सगळे गाडी करून आले. वातावरण आणखीनच तंग झालं. सगळी मंडळी घाई करायला लागली. कामं, खरेदी, आमंत्रणं.. सगळंच दोन दिवसांत करायचं होतं. सगळी गडबड लताच्या लग्नाची होती; पण ती मात्र हरवल्यासारखी, जे घडतंय ते अजूनही अविश्वसनीय वाटत असल्यासारखी, बधिरपणे सगळं बघत होती.

तिची ही विस्कटलेली अवस्था आप्पांच्या नजरेतून सुटली नाही. जेवणानंतर वरच्या खोलीत लता मुलांची झोपायची तयारी करत असताना आप्पा आले. तिला म्हणाले, "हे बघ पोरी, हे प्रेम बीम काय आपल्यासारख्या लोकांचं काम नव्हे. माझी सगळ्यात समजदार लेक तू. तुझ्या पाठीवर आणखी तिघीजणी आहेत, त्यांचा विचार कर. तुझं त्या जगदीश का कोणाशी करून दिलं असतं तर या तिघींना कोणी करून घेईल का आपल्यात?

मला माहीत आहे, त्या सुषमाने फूस लावलीय तुला. आली होती दोनदा घरी तुला विचारत. तिला सांगितलं मी, गावाला धाडलंय तुला, पुढच्या महिन्यात येईल परत. त्या जगदीशचा भाऊ का कोण घरी येऊन गेला...मी 'जमायचं नाही' सांगितलंय. उद्या तुझी हळद.. मागचं सगळं विसर आणि देवाचं हे दान निमूट पदरात घे." काही बोलली नाही ती; आणि बोलण्यासारखं काही नव्हतंच उरलं. १२ तारीख आली. लग्न झालं.

इकडे जगदीशने फक्त पोलीस कम्प्लेंट करायची बाकी ठेवली होती... सातारपर्यंत पोचला तो.. पण तिथेही काही माग काढू शकला नाही.. निराश मनाने परत मुंबईला आला... सुषमाही भयंकर गोंधळल्यासारखी झाली होती. अशा प्रसंगाची तिने कधी कल्पनाही केली नव्हती.. आई बाबांनाही सांगितलं तिने; पण कोणालाच काही सुचेना. १८-१९ तारखेच्या दरम्यान रात्री लताचा फोन आला त्यावेळी तिने लग्न झाल्याचं सांगितलं फक्त आणि 'भेटल्यावर बोलू' म्हणत पटकन ठेवला. सुषमा ताबडतोब जगदीशच्या घरी पोचली. नशीबाने तो घरी नव्हता, त्याला ही बातमी सांगणं म्हणजे एक दिव्यच झालं असतं सुषमासाठी.

भाबीला सांगितलं आणि लगेच बाहेर पडली ती. त्याक्षणी कोणाशीही काहीही बोलायची तिची इच्छा नव्हती. फसवणूक झाल्याचं हे फिलिंग तिच्यासाठी पूर्णपणे नवीन होतं. असेही असतात आई-बाबा? मलाच असं वाटतंय तर लताचं काय झालं असेल? काय भयानक परिस्थितीतून गेलीये ती. कसा असेल तिचा नवरा? कुठचा असेल? किती शिकलेला असेल?.. रात्र सगळी याच विचारांत गेली. लताच काय; पण या अनुभवाने सुषमाही एकदम प्रौढ होऊन गेली.

लता सुषमाची भेट झाली ती तब्बल चार महिन्यांनी, लता माहेरी आल्यावर. दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून मनसोक्त रडल्या. बोलण्यासारखं काहीच उरलं नव्हतं आणि त्या विषयावर बोलून फक्त त्रासच झाला असता. सुषमाने विचारलं, "कसा आहे ग कुलदीप?" लता उत्तरली, "वाईट नाही; पण शहरात आणि गावात वाढल्याची तफावत पावलोपावली जाणवते गं." "तो कसा आहे?" तिचा हळवा प्रश्न. "ठीक!". सुषमाला "जिवंत आहे" असं म्हणायचं होतं खरं तर.

आणि खरंच जगदीश फक्त जिवंत होता. म्हणजे रूढार्थाने त्याचं रुटीन सुरू होतं; पण हरवल्यासारखा, मिटून गेल्यासारखा झाला होता. सुषमा भेटली त्याला तेव्हा हसला, बोलला; पण सुषमाला तो चक्क कोमातून नुकत्याच बाहेर पडलेल्या पेशंटसारखा वाटला होता. निर्जीव, विझलेला.

...
आणि आज, पंधरा वर्षांनंतर... लताला दोन मुलं आहेत.. तिथेच गावी.. नवऱ्याने नोकरी सोडली आणि शेती करतो, लता कसलीतरी छोटीमोठी नोकरी करते साताऱ्याला. नोकरी, संसार आणि सासरच्या त्रासाने थोडीफार बेजार, पण आदर्श भारतीय नारीच्या परंपरेनुसार सोशिक. तिच्या पाठच्या तिघींचीही 'love marriages'. यात बळी गेली फक्त लता.

जगदीश, तसाच.. कोमातून बाहेर आल्यासारखा.. विमनस्क.. नोकरी आहे, "लग्न कर..लग्न कर' सांगून
भाई भाबी दमले.. स्थळंही येत नाहीत आताशा.. आणि हा लग्न करणार नाही हे त्यांना कळून चुकलंय...

या सगळ्याची मूक साक्षीदार सुषमा.. तिच्या संसारात रमलीय; पण या दोघांचा विचार तिची पाठ सोडत नाही....
कुठे ते लताचे जातीचा टेंभा मिरवणारे आप्पा... कुठे त्या दोघांची संसाराची गोड स्वप्नं आणि कुठे ती गावात खितपत पडलेली लता, आयुष्यातून उठलेला जगदीश!

प्रेमाचा अनुभव कोणासाठी उन्मादक असेल तर कोणासाठी हळूवार... कडाक्याच्या थंडीत चुलीजवळ बसून शेक घेतल्यासारखा उबदार; पण हा प्रेमाचा अनुभव मात्र सगळ्यांसाठीच विदारक होता हेच खरं!!

- स्मृती चित्रे

कथाअनुभव

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

2 May 2010 - 9:09 am | यशोधरा

आई गं... ! :( ही सत्यकथा आहे? असली तर किती दु:खदायक आहे..

मस्त कलंदर's picture

2 May 2010 - 10:21 am | मस्त कलंदर

खरंच!!! :(

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

सुबक ठेंगणी's picture

3 May 2010 - 8:06 am | सुबक ठेंगणी

:(

वेताळ's picture

2 May 2010 - 4:54 pm | वेताळ

मनाला चटका लावुन जाते

वेताळ

मेघवेडा's picture

2 May 2010 - 5:51 pm | मेघवेडा

असंच म्हणतो.. मनास चटका लावून जाणारी आहे..

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

झकासराव's picture

2 May 2010 - 11:31 am | झकासराव

:(

इंटरनेटस्नेही's picture

2 May 2010 - 1:33 pm | इंटरनेटस्नेही

अरेरे...! कथा वाचुन हळहळलो.
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

टारझन's picture

2 May 2010 - 1:46 pm | टारझन

डोळे पाणावले !!!

बिपिन कार्यकर्ते's picture

2 May 2010 - 4:24 pm | बिपिन कार्यकर्ते

चटका लावणारी घटना...

अगदी अश्शीच पण सुदैवाने सुखांत असलेली घटना माझ्या मित्राची. शेवट सोडता बाकी सगळं सेम टू सेम. आम्ही काही मित्रांनी त्याला भरीला पाडलं, तो पण हुशार आहेच... सरळ गावी जिथे ती मुलगी होती तिथे जाऊन धडकला. मुलीने आधीच फोन करून ठेवला होता. मित्र तिथे जायच्या आधी स्थानिक पोलिस स्टेशनमधे तिथल्या इन्स्पेक्टरना भेटला आणि सेटिंग करून ठेवली... पोलिस कंप्लेंट झाली तर आधीच खबरदारी... :)

बिपिन कार्यकर्ते

sur_nair's picture

2 May 2010 - 8:10 pm | sur_nair

खूप छान लिहिलं आहे. या अशा कथा रोजच कुठेतरी घडत असतात. आणि त्या सर्वतः आपापल्या परीने individual असतात. पण एक सांगावेसे वाटते. जे मिळालं नाही त्याचं आपल्याला जास्त दुख, ओढ, खंत वाटते. घरच्यांविरुद्ध हट्टाने प्रेमविवाह करणारे आणि पुढे जमत नाही म्हणून संसार विस्कळीत झालेले सुद्धा खूप आढळतात. याउलट जमवून आणलेले सुखी संसार सुद्धा अनेक आहेत. लग्नाआधी फक्त प्रेम असतं आणि लग्नानंतर प्रामुख्याने तडजोड, एकमेकांना सांभाळून, विश्वासाने जमवून घेणं असतं. एक गोड आठवण म्हणून कधी कधी त्याचं रवंथ करणे वेगळे आणि आयुष्यभर त्यासाठी खुडत काढणे वेगळे. कदाचित रुक्ष असतील हे विचार पण I am just trying to put the practical reality of life.

टुकुल's picture

3 May 2010 - 2:27 pm | टुकुल

सहमत !!
कथा (?) चटका लावुन गेली.

--टुकुल

स्मृती's picture

4 May 2010 - 7:57 pm | स्मृती

खरं आहे तुमचं म्हणणं... या कथेतील 'जगदीश' हे वाचेल तर फार बरं होईल...

दुसरं म्हणजे, कधी कधी असं होतं की ज्यांच्या आयुष्यात असा प्रसंग घडतो त्यांच्यापेक्षाही त्या प्रसंगाच्या साक्षीदारांच्या मनावर त्याचा जास्त खोल ठसा उमटतो... असंच काहीसं इथे झालंय..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 May 2010 - 9:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे खरंच घडलेलं आहे? :-(
अर्थात अविश्वास ठेवण्यासारखं काहीच नाही ... माझ्या एका वर्गमैत्रिणीला पळून जावं लागलं, पण थोडक्यात त्यांच्या कहाणीला अप्रिय ट्विस्ट नाही मिळाला.

अदिती

नंदू's picture

3 May 2010 - 7:34 am | नंदू

पुलेशु.

प्रभो's picture

3 May 2010 - 8:09 am | प्रभो

चटका लावणारी घटना/कथा...

मी अर्धवट लिहिलेल्या एका लग्नाच्या गोष्टीची आठवण झाली.

मन१'s picture

11 Jul 2012 - 2:22 pm | मन१

अवघड आहे...

बॅटमॅन's picture

11 Jul 2012 - 4:09 pm | बॅटमॅन

लै अवघड :(

प्यारे१'s picture

11 Jul 2012 - 4:28 pm | प्यारे१

काय शॉट्ट आहे राव....!