आपलाआपला इतिहास...

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
1 May 2010 - 10:36 pm

महाराष्ट्राचा मंगल कलश आला, त्याला आज ५० वर्षे झाली. महाराष्ट्र ५० वर्षांचा झाला... व्यक्तीच्या आयुष्यात, ५० वर्षांचा काळ लोटला, की त्याच्या कर्तृत्वाचा लेखाजोखा घ्यायची योग्य वेळ आली, असे समजतात. पन्नाशी उलटली, की आपण कुठे होतो, कुठे आलो, आणि कुठे पोहोचायचे याचे चिंतन आपोआपच सुरू होते. मागे वळून पाहिले जाते, आणि आपण स्वत:सोबत जोडल्या गेलेल्या भूतकाळाचे पदर उलगडू लागतो... ह्या आठवणीची साठवण, हा आपला `इतिहास' असतो...
... प्रत्येकाच्याच वाटणीला त्याचात्याचा इतिहास आलेला असतो... एखाद्याच्या इतिहासाची पाने `सुवर्णाक्षरां'नी लिहिलेली असतात, तर काहीच्या पानांवर नुसतेच, `पांढर्‍यार काळे' झालेले असते... ती पाने उलगडताना कुणाला समाधान, आनंद मिळतो, तर कुणी खंतावून जातो... पण आपण कुठे होतो आणि कुठे आहोत, याचे भान मात्र हीच पाने देत असतात...
... महाराष्ट्र आज ५० वर्षांचा झाला... काही दशकांपूर्वी राजा बढे यांनी लिहिलेल्या `महाराष्ट्र गीता'चे सूर आज राज्याच्या प्रत्येक कोपर्‍यात घुमताहेत...
`गर्जा महाराष्ट्र माझा...' अनेक वृत्तपत्रांचे मथळेही याच शब्दांनी सजले...
हुतात्मा चौकात, स्वातंत्र्यसैनिकांनी `मातीच्या घागरी'तून राज्यभरातील नद्यांचे `एकपणाचे पाणी' आणून ते हुतात्म्यांच्या स्मृतीचरणी वाहिले...
राज्याच्या प्रगतीचे पोवाडे गाणा-या सरकारी जाहिरातींनी प्रसारमाध्यमांचा `सुवर्णदिन' साजरा झाला... कधीकाळी गिरण्यांच्या भोंग्यांनी जागा होणारा गिरणी कामगार, सवयीप्रमाणे सकाळी उठला, आणि घरासाठी, वारसांच्या नोक-य़ाच्या लढ्यासाठी बाहेर पडण्याऐवजी, `कामगार दिन' साजरा करण्यासाठी घराबाहेर पडला...
स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन असला, की `तिरंगे' विकून चार पैशांची कमाई होते... आज `महाराष्ट्र दिनी' झेंडे विकून पैसे मिळतील की नाही हे माहित नसल्याने, रस्त्यावरच्या पोरांनी सिग्नलवर नुसतीच भीक मागायला सुरुवात केली... पण, सुट्टी असल्यामुळे, बरेचसे सिग्नलही नुसतेच लुकलुकत होते... `रोजच्यासारखी' कमाई झालीच नाही. फूटपाथवरच कुठेकुठे महाराष्ट्र दिनानिमित्त `सत्यनारायणाच्या महापूजा' साजर्‍या झाल्या...
मराठी माणसानं आपापल्या घरातल्या `म्युझिक सिस्टीम'वर महाराष्ट्राचे पोवाडे वाजवले, आणि `सुवर्ण-महाराष्ट्रा'चा `लेझर-शो' पाहाण्यासाठी उतावीळ होऊन संध्याकाळ्ची वाट पाहात घरी थांबला...
दुपारी घराघरातल्या टीव्हीवर, मराठी चित्रपटांचा आनंद अनेकांनी लुटला, तर काहींनी मराठी वर्तमानपत्रांच्या `महाराष्ट्रदिन विशेष' पुरवण्या वाचून काढल्या... काहीनी, आवडलेल्या मजकूराची कात्रणे काढून, वहीत नीट चिकटवून ठेवली...
पुढेमागे, आपापल्या मुलांना, नातवंडांना महराष्ट्राचा इतिहास सांगताना, `रेफरन्स' म्हणून उपयोगी पडतील, ह्या `दूरदृष्टी'ने !
... आज महाराष्ट्र ५० वर्षांचा झाला. राज्याच्या इतिहासाची ५० पाने आज सगळीकडे वाचली गेली...
ही पाने `सोनेरी' आहेत, असं म्हणतात. १९६० पासून आजपर्यंत, महाराष्ट्रानं फक्त `सुवर्णकाळ'च पाहिला, असं आजच्या `सेलिब्रेशन' वरून वाटतंय...
खरं म्हणजे, राज्याचा आयुष्यात ५० वर्षांचा काळ म्हणजे काही, `इतिहास' ठरावा इतका जुना काळ नाही...गेल्या ५० वर्षांत महाराष्ट्रानं, अनेक चढ-उतारही पाहिलेत... असंख्य संकटे झेललीत... असंख्य डोळ्यांचे अश्रू अजूनही खळलेले नाहीत... काही संकटे निसर्गाने लादली, तर काहीना आपणच निमंत्रण दिले...
महाराष्ट्रावर बॊम्बस्फोटाच्या जखमा आहेत, गिरणी संपात उध्वस्त झालेल्या लालबाग-परळच्या कुटुंबाच्या वाताहातीच्या कहाण्या आहेत, मराठी-अमराठी वादातून भडकलेल्या हिंसाचाराच्या खुणा आहेत, दलित-सवर्ण संघर्षातून उमटलेल्या वेदना आहेत...
आणि कर्जबाजारीपणामुळे आत्मह्त्या करणा-या शेतकर्‍यांच्या घरातले अश्रू आहेत...
भूकंपानं झालेली हानी अजूनही भरून न निघाल्यानं बेघर जिणं जगणा-या कुटुंबाचे भेदक वास्तव आहे, तर जातीय दंगलीत होरपळलेल्यांचं भेदरलेलं अस्तित्व आहे... नोकर्‍यांच्या कॉलकडे वर्षानुवर्षे लागून राहिलेले लाखो डोळेदेखील महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचं कौतुक न्याहाळतायत...
चहूबाजूनी घुमणार्‍या पोवाडे-तुतार्‍यांच्या निनादात, आणि सुवर्ण-सोहळ्याच्या धामधुमीत, ह्या वेदना-व्यथांची अक्षरे अदृश्य झाली आहेत.
विजेअभावी ग्रामीण महाराष्ट्रात अंधार दाटून राहिला आहे, आणि शेताला पाणी नसल्याने पिके कोरडी पडली आहेत...
शिवाजी महाराज, द्न्यानेश्वर-तुकाराम, शाहू-फुले-आंबेडकरांनी महाराष्ट्रात जन्म घेतला, म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासाची पाने सोनेरी झाली आहेत... त्या चमकदार इतिहासामुळे, गेल्या ५० वर्षाच्या वाटचालीचे- `पांढर्‍यावरचे काळे' झाकोळले, हे महाराष्ट्राचे सुदैव आहे...
... तरीही, ह्या संकटांच्या सावटातही, आपणच देशात सर्व आघाड्यांवर आघाडीवर आहोत...
कारण, बाकी सगळीकडे ह्यापेक्षाही मोठा `आनंदीआनंद' भरून व्यापला आहे.
म्हणून महाराष्ट्राचं कौतुक केलंच पाहिजे.
महाराष्ट्राच्या मातीत दम आहे म्हणतात, ते उगीच नाही!!

http://zulelal.blogspot.com

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

1 May 2010 - 11:53 pm | यशोधरा

मस्त!

शुचि's picture

2 May 2010 - 5:17 am | शुचि

सुंदर लेख
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

तिमा's picture

2 May 2010 - 7:49 am | तिमा

महाराष्ट्राच्या मातीने अनेक सुपुत्र जन्माला घातले. अनेक क्षेत्रात अजुनही कर्तृत्ववान माणसे येताना दिसतात पण राजकारणात एकही चांगला नेता का येऊ नये ? तसे सध्याचे अनेक स्वयंघोषित किंवा घराणेशाहीमुळे संधी मिळालेले नेते आहेत. पण खर्‍या अर्थाने ज्याला लोकनेता म्हणता येईल असा एकही दिसत नाही. योग्य नेतृत्व लाभले तर अजुनही महाराष्ट्र पुढे जाण्याची क्षमता बाळगून आहे.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

दिनेशजी, लेख फारच धावता आढावा घेतल्यासारखा वाटला.

Pain's picture

2 May 2010 - 1:34 pm | Pain

तरीही, ह्या संकटांच्या सावटातही, आपणच देशात सर्व आघाड्यांवर आघाडीवर आहोत...

खरच ?

गुन्हेगारिचे प्रमाण इतर राज्यान्पेक्षा कमी आहे, पण
शाळेत पाहिलेल्या अट्लास प्रमाणे केरळ्मधे सर्वात जास्त साक्षरता आहे.
आपल्या राज्यावर सर्वात मोठे कर्ज आहे. २ वर्षान्पुर्वी ते २ लाख कोटीच्या आसपास होते आणि ते वाढतच गेले आहे.
इथल्या लालफीतीमुळे होणारे नविन कारखाने गुजरातमधे गेले.

अरुंधती's picture

2 May 2010 - 3:09 pm | अरुंधती

आहे हे असंच आहे.... प्रत्यक्ष कामापेक्षा उठावदार सांस्कृतिक कार्यक्रम करून ठिगळे लावण्याचा कार्यक्रम जोरात चालू आहे. पण पर्वा आहे कोणाला?

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

2 May 2010 - 3:32 pm | बिपिन कार्यकर्ते

अजून विस्तारित लिहा. शेवटच्या वाक्याशी सहमत आहे पण आपण केवळ तुलनात्मकरित्याच चांगले आहोत... खरोखरीचे नव्हे, हे भान ठेवलेच पाहिजे.

बिपिन कार्यकर्ते

भोचक's picture

3 May 2010 - 2:57 pm | भोचक

खरंय. वास्तवापासून दुर्लक्ष व्हावे यासाठी उत्सवी नशा दिलीय फक्त. बाकी काही नाही.

(भोचक)
महाराष्ट्राचा सुवर्ण (?)महोत्सव

मन१'s picture

11 Jul 2012 - 2:08 pm | मन१

विचार करायला लावला लेखानं