"आई माझा वाढदिवस कधी येणार गं ?"
"अजुन दोन महिने आहेत रे" ते "आता उद्याच आहे ना" असा उत्तराचा प्रवास पुर्ण करत वाढदिवस एकदाचा येतो. अवचित एखाद्या वर्षी शाळेला दांडी मारायची पण मुभा असायची, दांडी मारायची नसेल तर आख्ख्या वर्गभर चॉकलेटे वाटायची गंमत मिळणार असायची. आधीपासुनच बाबांच्या मागे लागायचे "बाबा यावेळेस गोळ्या नाही हं वाटायच्या, आपण चॉकलेट आणुयात ना वाटायला !". गोळ्या म्हणजे साध्या आणी चॉकलेट म्हणजे भारी ही समजुत अगदीच पक्की. वर्गात चॉकलेट वाटुन संपल्यावर लक्षात यायचे की आपल्यासाठी चॉकलेट काही उरलेच नाहीये, रडवेला चेहरा पाहुन बाईंच्या ते लक्षात यायचेच, मग बाईंच्या वाट्याला आलेले चॉकलेट त्या लगोलग देउन टाकायच्या, नमस्कार केल्यावर पाठीवर हात फिरवायच्या. शाळा कधी परकी वाटलीच नाही.
परगावी कॉलेजात शिकणार्या ताईला स्वतःच्या हाताने लिहुन पत्र टाकलेले, पत्रोत्तर येणार की ताई येणार याचा विचार डोक्यात चालुच. शाळेतनं मधल्या सुट्टीतच घरी जाण्याची परवानगी मिळाल्याने आनंदाने घरी यायला निघायचे. वाढदिवसाच्या दिवशी अर्ध्या शाळेतनं घरी जायला मिळणे म्हणजे आनंदाची परमावधी. घरी पोचताच गेट धाडकन्न उघडुन घरात शिरतांना ताई घरात असल्याच्या पाउलखुणा जाणवायच्या, त्याचबरोबर यायचा तो घरी बनवलेल्या गोडसर खरपुस केकचा सुगंध. "तु पत्राला उत्तर का नाही पाठवले ?", "तु इतक्या उशिरा का आलीस ?" वैगेरे प्रश्न कुठल्या कुठे गायबलेले, स्वयंपाकघरात शिरल्यावर ताई पट्ट्कन कडेवर उचलुन घेते. मोठ्या तरसाळ्यात आधी तयार करुन ठेवलेले दोन केक ती दाखवते, तिसरा गॅसवर असतोच. "बाप्परे तीन तीन केक !!" म्हणुन माझा चेहरा फुललेला. स्वयंपाकघरात गॅसवर तवा, तव्यावर वाळु अन त्यावर ते अल्युमिनिअमचे केकचे भांडे. ताई इकडे दुधाच्या पिशवीचा कोन करुन त्यात तुपसाखर भरण्यात गर्क. आता ती केकवर त्याने लिहणार "भय्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा", छान वेलबुट्टीची नक्षी पण काढणार. मला स्वर्ग दोन बोटे उरलेला. "माय मरो मावशी उरो" म्हणतात, ताईसाठी अशी म्हण तयार नसली झालेली तरी "ताई" आणी "आई" या शब्दातच फारसा फरक नाहीच, यातच सगळे आले. तीची माया मायेसारखीच, तिला उपमाच नाही.
एव्हाना संध्याकाळ झालेली काका, मावश्या, चुलत-मामे-मावस भावंड यायली सुरुवात झालेली, त्यांच्याबरोबर घरात रंगेबिरंगी चमकीच्या कागदात गुंडाळली पुडकी पण शिरलेली. माझा आनंद आणी उत्साह शिगेला पोचलेला. मीही ठेवणीतला ड्रेस घालुन छान तयार झालेलो. शेवटचा हात ताई फिरवणारच्,थोडा तेलाचा हात डोक्यावर फिरतो, ती चापुनचोपुन माझा भांग पाडते, मी नको नको म्हणुन झटापट करत असतांनाही ती हलकासा पावडरचा पफ फिरवतेच. मी तयार. आता गल्लीतली तसेच शाळेतलीही काही मित्रमंडळीह आलेली. वाढदिवसाचा स्टँडर्ड टाईम "७ वाजता" जवळ आलेला, मी केक कापण्यासाठी उतावीळ. बाबा काका लोकांचे नावडते काम फुगे फुगवणे संपत आलेले, ताई दादातली घराची सजावट रंगेबिरंगी पट्ट्या वैगेरे पुर्ण झालेली. बच्चेकंपनीचा फुल्ल धिंगाणा चालु असतो, क्वचित एखाद्या दोघांची जुंपलेली पण असते. आता केक कापण्याचा प्रोग्राम सुरु व्हायला हवा याचा अंदाज आता मोठ्यांना पण येतो.
घरात मध्यभागी एक टेबल ठेवले जाते, त्यावर एक टेबलक्लॉथ, त्यावर छान सजवलेला केक मध्यभागी ठेवला जातो. मेणबत्ती मध्यभागी लावली जाते, "फुंकायची नाही हं" वर असेही सांगितले जाते. हॅपी बड्डे टु यु च्या मराठी गजरात केक कापला जातो, मलाही भरवला जातो. ताई लगोलग केकचे तुकडे करायला घेते. आता एकेकजण येउन "हॅपी बड्डे" म्हणुन काही ना काही गिफ्ट देउन जात असतो. लगेच उघडुन पहाणे काही शक्य नाही हे माहित असते. एक लहानगा जवळचा मित्र, राजु शेख, हातात जमा केलेली चिल्लर ठेवतो, आठवतेय तशी आजवर मिळालेली आयुष्यातली सर्वोत्तम गिफ्ट असावी ती.
बच्चेकंपनी आणी मोठेलोक पण चिवडा-लाडू-केक खाउन, फुगे घेउन घरी जातात. आता घरात सगळे जवळचे नातेवाईक. ताई दादा आणि मी आलेल्या गिफ्ट उघडुन पहाण्यात मग्न. नुसता आनंद. रात्रीची जेवणं गच्चीवर करायची ठरतात. गच्चीवर लाईट लावला जातो, ताई गच्ची झाडुन काढते, पाणी शिंपडते. गच्चीवर जेवणं पार पडतात.
एव्हाना मी झोपायळलेला असतो. काकवा-मावश्यांन्या त्यांच्या आपापल्या घरी जायचे असते, भावंड पण झोपायला आलेली असतात. देवघरासमोर रांगोळी काढुन पाट ठेवला जातो, डोक्यावर टोपी ठेवुन सगळ्याजणी मला औक्षण करतात. उदंड आयुष्याची शाश्वती तिथेच झालेली असती.
आठवणींच्या या रमलखुणा मला आजही मोहवतात, आजचाही आनंद उद्या मोहावेल, आठवणींच्या रुपाने तो शाश्वत राहील.
धन्यवाद !
प्रतिक्रिया
2 Apr 2010 - 7:55 pm | अरुंधती
छान लिहिलाय हा आठवणींचा प्रवास! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
2 Apr 2010 - 8:00 pm | चेतन
तुम्हाला वढदिवसाच्या शुभेच्छा
मस्त लिहलय :-)
चेतन
2 Apr 2010 - 8:14 pm | किट्टु
छान लिहीलस रे आंद्या....
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!! <:P
2 Apr 2010 - 11:43 pm | शुचि
वाङ्मय (लेख) आवडलं.
>>नमस्कार केल्यावर पाठीवर हात फिरवायच्या. शाळा कधी परकी वाटलीच नाही.>> : ) मस्त!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I fly when you persue me, But when you shy I woo thee
Explain it to me , can't you,Why I must ever want to want you.
3 Apr 2010 - 1:48 am | बिपिन कार्यकर्ते
आंद्या तुझे हे असले लेखन मी नेहमी बेसावध क्षणी वाचतो रे... कितीही नाही म्हणलं तरी खपली निघतेच... आणि मग परत खपली धरायला थोडा वेळ लागतो.
:(
बिपिन कार्यकर्ते
3 Apr 2010 - 2:17 am | बहुगुणी
सदाबहार विषय...... आणि प्रत्येकाच्याच आयुष्यात निदान काही वर्षे तरी येणारी सुखद घटना. 'ताई'चं वर्णन आवडलं! हार्दिक शुभेच्छा!
3 Apr 2010 - 4:18 am | बेसनलाडू
(शुभेच्छुक)बेसनलाडू
7 Apr 2010 - 6:02 am | चित्रा
'ताई'चं वर्णन आवडलं!
लेख उत्तमच.
3 Apr 2010 - 11:29 am | परिकथेतील राजकुमार
आंदोबा छान लिहिले आहेस रे :)
तुझी एक मस्त वेगळीच स्टाईल आहे बघ.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
3 Apr 2010 - 1:36 pm | गोगोल
असे कितीतरी साजरे न झालेले वाढदिवस डोळ्यापुढे तरळून गेले....वर्णन इतक छान जमलय कि क्षणभर मीच उत्सव मूर्ती असल्यासारख वाटल...
>आठवणींच्या या रमलखुणा मला आजही मोहवतात, आजचाही आनंद उद्या मोहावेल, आठवणींच्या रुपाने तो शाश्वत राहील.
नक्की..नक्की
3 Apr 2010 - 2:47 pm | दिपक
हा आनंदयात्री म्हणजे वेगळं रसायन आहे. काय लिहितो. लेख म्हणजे भूतकाळात नेणारे बटण.
अप्रतिम.!
3 Apr 2010 - 3:04 pm | घाशीराम कोतवाल १.२
आनंदयात्री उर्फ आमच्या आंद्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
हॅप्पी बर्थ डे <:P <:P
**************************************************************
3 Apr 2010 - 5:07 pm | डावखुरा
ह्रुदयस्पर्शी........
"राजे!"
6 Apr 2010 - 3:10 pm | इरसाल
एक लहानगा जवळचा मित्र, राजु शेख, हातात जमा केलेली चिल्लर ठेवतो, आठवतेय तशी आजवर मिळालेली आयुष्यातली सर्वोत्तम गिफ्ट असावी
6 Apr 2010 - 3:19 pm | प्रमोद्_पुणे
छान लिहिले आहे..मस्तच..
6 Apr 2010 - 9:56 pm | प्राजु
सु-रे-ख!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
7 Apr 2010 - 2:05 am | संदीप चित्रे
म्ह-ण-तो !
6 Apr 2010 - 10:16 pm | रेवती
छान लिहिलाय वाढदिवस!
एका दिवशी भरपूर लाड होतात ते आठवले.
रेवती
7 Apr 2010 - 3:46 am | सुचेल तसं
क्लासिक!!!
7 Apr 2010 - 7:19 am | चतुरंग
शाळेत चॉकलेटे वाटायला मिळायची ती मज्जाच! :)
भेटवस्तूचे अप्रूप का कोण जाणे इतके नसायचे तेव्हा. सगळ्याच बाबी साध्या होत्या.
(लाल पेपरात गुंडाळलेला किस प्रेमी)चतुरंग
7 Apr 2010 - 9:52 am | चित्रगुप्त
पूर्वीच्या पिढीत शाळकरी मुला-मुलींचा वाढदिवस साजरा करण्याची प्रथा नव्हती.... केक वगैरे पदार्थ तर माहीतच नव्हते.....
मात्र उदाहरणार्थ इंदूर मध्ये आम्हाला यशवंतराव होळकर महाराज, अहिल्याबाई, वगैरेंच्या वाढदिवसानिमित्य सुट्टी, आणि शाळेत मिठाई वाटायचे....रस्त्यावरून मिरवणूक निघयची....
पुढे गांधींच्या, नेहरूंच्या वादिवसाचे स्तोम सुरु झाल्यावर मात्र ते बंद पडले......
7 Apr 2010 - 10:10 am | निखिलचं शाईपेन
गणपा आरे असा केक कसा करायचा ते लिहि रे एकदा .. (बिन अंड्याचा)
बाकी आनंदयात्री ... वा हा शु...
-निखिल
7 Apr 2010 - 10:42 am | अमोल केळकर
सुंदर लिखाण
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
7 Apr 2010 - 11:43 am | फ्रॅक्चर बंड्या
फारच छान लिहले आहे ...
मस्तच
binarybandya™
7 Apr 2010 - 1:31 pm | समीरसूर
खूपच सुंदर वर्णन!!! अगदी डोळ्यासमोर आई, ताई, बाबा असे सगळे उत्साहात 'हॅपी बर्थडे टू यू' म्हणत आहेत असे वाटले.
माझ्या लहानपणी (त्याला आता खूप वर्षे झालीत) वाढदिवस असा साजरा होत नसे. लहान गावातल्या संस्कृतीमुळे म्हणा किंवा ८० च्या दशकातल्या चालीरीती म्हणा किंवा आर्थिक परिस्थितीचे प्रतिबिंब म्हणा, असा वाढदिवस आमच्या नशिबी नव्हता. मला आठवते, माझा एक श्रीमंत मित्र होता; त्याचा वाढदिवस असा धुमधडाक्यात होत असे. त्याच्या अवाढव्य बंगल्यात सकाळपासूनच नोकरा-चाकरांची लगबग सुरु होत असे. त्याच्या खोलीला (प्रत्येकाला स्वतंत्र खोली असते किंबहुना असू शकते हा विचारही कधी मनाला शिवला नव्हता तेव्हा) खूप आकर्षक पद्धतीने सजविले जाई. तो आम्हा सगळ्या मित्रांना संध्याकाळी बोलावत असे. आम्ही त्याच्या वाढदिवसाच्या २-३ दिवस आधीपासूनच त्याने बोलावण्याची वाट बघत असू कारण इतकी खेळणी, असा तर्हे-तर्हेचा कधीही न पाहिलेला खाऊ, तिथलं ते श्रीमंती वातावरण, चमक, अगदी महागड्या कपड्यांमध्ये फुलपाखरासारख्या बागडणार्या त्याच्या बहिणी आणि त्याचे आई-बाबा, अदबीने आणि आदराने मान तुकवून चालणारे तिथले नोकर, आपल्या मालकांचे पाहुणे म्हणून काही काळापुरता का असेना आम्हाला मिळणारा मान या सगळ्या गोष्टी आम्हाला नेहमीच भुरळ पाडत. मग आम्हाला नेहमीच पडणारा प्रश्न म्हणजे त्याच्यासाठी गिफ्ट काय घ्यावे. सगळे मित्र आपापले गिफ्ट आणत असत. मग कधी पारले-जी चा बिस्कीट पुडा, कधी रेनॉल्ड्सच्या पेनचा एखादा २ पेन बसतील असा घरीच बनवलेला बॉक्स तर कधी कुठल्यातरी दुसर्या बिस्कीटांचा पुडा असे गिफ्ट आम्ही घेऊन जात असू. यापैकी तो कुठलीच गोष्ट कधी वापरेल की नाही हा विचार आमच्या मनाला शिवायचा नाही. अगदी सहज चारपाचशे रुपये एखाद्या खेळण्यासाठी खर्च करणारा आमचा मित्र मग आमचे दोन रुपयाचे गिफ्ट आनंदाने स्वीकारायचा. त्याची आई आमचे खूप लाड करायची. विविध प्रकारचे खाऊ खाल्ल्यानंतर मग केक कापण्याचा समारंभ व्हायचा. त्याच्या मावश्या किंवा अजून कुणी नातेवाईक त्याला अत्यंत महागडी गिफ्ट्स देत असत आणि आम्ही आमचे गिफ्ट देत असू. काही लोकं नाके मुरडत असत पण आम्ही दुर्लक्ष करत असू. मग जेवणाचा बेत होत असे. तिथे डाईनिंग टेबलवर बसून जेवायला मजा येत असे. त्याची आई आम्हाला अगदी प्रेमाने खाऊ घालत असे. खूप नवनवीन चविष्ट पदार्थ खाऊन आम्ही मित्रासोबत त्याच्या खोलीत जात असू. तिथे टीव्ही किंवा व्हीसीआरवर एखादा सिनेमा बघत असू. काही वेळाने आम्ही घरी परतत असू, अगदी भारावलेल्या अवस्थेत.
माझा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा होत असे. शाळेतून घरी आल्यावर औक्षण होत असे. वाढदिवस म्हणून शाळा बुडविणे म्हणजे धर्म बुडविण्याइतके महान पातक समजले जाई. मग आई काहीतरी गोड (शिरा किंवा तत्सम सोपे) करून आम्ही जेवण करत असू. बाबा आईजवळ १०-२० रुपये देत असत आणि आई ते मला देत असे आणि मी पुन्हा ते बाबांना देत असे. खल्लास! यापेक्षा जास्त काही सेलिब्रेशन होत नसे. मित्राच्या वाढदिवसाचा थाट बघून मला कधीच त्याचा हेवा किंवा असूया वाटत नसे. माझा वाढदिवस इतका कोरड्या पद्धतीने का साजरा होतो हा देखील प्रश्न मला पडत नसे. आता मला आश्चर्य वाटते पण मला अजूनही आईने केलेल्या औक्षणाच्या दिव्याची उब जाणवते.
--समीर
9 Apr 2010 - 11:14 am | आनंदयात्री
तुझ्या आठवणी वाचायला आवडल्या.
10 Apr 2010 - 4:19 am | सुचेल तसं
छान आठवणी सांगितल्या तुम्ही....
9 Apr 2010 - 1:11 pm | मदनबाण
आंद्या मस्त लिवल हायेस रे !!! :)
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
10 Apr 2010 - 6:52 am | नीधप
छान लेख.
औक्षण करायला कुणी नाही याची कमी आज जास्त जाणवते. :(
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
16 Jul 2012 - 9:27 pm | मन१
सुरेख...
17 Jul 2012 - 1:28 pm | विकाल
....शाळा कधी परकी वाटलीच नाही.!
ईथंच जिंकलास मित्रा...!!!
27 Mar 2013 - 8:30 pm | बंडा मामा
हे वाचले आणि आज माझच वाढदिवस आहे असे मला वाटले. मजा आली. सुंदर लेखन.
27 Mar 2013 - 9:24 pm | प्यारे१
खूप निरागस नि स्वच्छ मनाचा ठाव घेतला गेलाय!
वयानं मोठं होताना हा निरागसपणा कुठं जातो कुणास ठाऊक?