भिकारी

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
29 Mar 2010 - 10:32 pm

सकाळी सकाळी फेरफटका मारताना गल्लीतील भुभ्यांबरोबर थोडस खेळल्यावर पुढे गेलो. भुभ्यांच्या गार गार नाकाचा सुखद स्पर्श मनात रेंगाळत होता. चालता चालता कोपर्‍यावर एक भिकारीसदृष माणुस स्वत:शीच बोलत होता. "हरामखोर साले ....... " अज्ञात व्यक्ति वा समुहाबद्दल मनात विखार होता. भाषा हिंदी वाटत होती. नजर शुन्यात होती. दाढी वाढलेली. अगदी ग्रीक तत्ववेत्यांसारखी. पॆंट शर्ट मेणचट्ट.मध्यम बांधा, उंची अंदाजे पावणे सहा फुट. तिरिमिरीत चालत होता. माझे लक्ष त्याच्याकडेच होते.लोक त्याला टाळत होते. पण त्याला कशाचीच फिकीर नव्हती. त्याला न्हाउमाखु घातले असते व चांगले कपडे घातले असते तर रुबाबदार दिसला असता. मनात विचार चालु होता. किती असतील असे लोक पुण्यात,भारतात. त्याच्या जागी स्वत:ला कल्पुन पाहिले. शी! काय हे विचार! मनातुन झटकुन टाकत पुढे गेलो.

कॊन्क्रीटच्या गल्ल्या होत्या. रस्त्यावर मधेच एक म्हातारा भिकारी बसला होता. थोडा खुरडत सरकत होता. मला त्याच्याकडे पहायची हिंम्मत होत नव्हती. रस्ता बदलताही येत नव्हता. अजिबात पहायच नाही व झटकन पुढे सरकून
जायच असा विचार मनात आला. त्याप्रमाणे कार्यवाही करायची म्हणुन वेग वाढवला. मन अस्वस्थ होत. शेवटी एक कटाक्ष त्याच्याकडे गेलाच. तत्क्षणी त्याने हात पसरले चेहर्‍यावर करुण भाव. मी नजर वळवली व निर्लज्जासारखा पुढे चाललो. खिसा चाचपला. सहसा खिशात पैसे नसतात सकाळी सकाळी. थबकलो. खिशात दहा रुपये होते. काय कराव विचार करत
होतो. एक मन सांगत होत कि द्यायला पाहिजेत. कुणा कुणाला देणार? असे किती तरी भिकारी असतात. दुसर मन सांगत होत. मन असंवेदनशील बनत चालल होत. बघु भिकार्‍याने मागे वळुन पाहिले तर द्यायचे नाहितर नाही असा विचार केला. त्याला मागे वळून पहाण्याची संधी ५ सेकंदाची दिली होती. .शासनाने अशा लोकांना दयामरण द्यायला हवं असा विचार मनात रेंगाळत होता.सगळ काही मीच ठरवत होतो. त्याला विचारले असते कि बाबा तुला जगायचय कि सुखाने मरायचय? काय उत्तर त्याने दिल असत? विचार भिरभिरत होते. मृत्यु कोणाला चुकलाय? विज्ञानात उद्या अमर होण्याचा शोध लागेल ही कदाचित. त्याने काय फरक पडेल हे आज सांगता येत नाही.
डिमेन्शियाग्रस्त आईनी एकदा विचारल होत. झाल आता माझ सगळं.काही इच्छा नाही. डॊक्टरांकडे अशी सुविधा नाही का? बास झाल जगणं!
माझ्याजवळ उत्तर नाही. भय इथले संपत नाही.मग तुझी आठवण येते. परमेश्वरा तुच आहेस रे बाबा! पण तुझ्या जागी! माझे काय? पुन्हा प्रश्न आहेच.

समाजविचारअनुभव

प्रतिक्रिया

शुचि's picture

29 Mar 2010 - 10:41 pm | शुचि

छान आहे लेख. अगदी माझा अनुभव. संवेदनशील माणसांना हा त्रास होतोच होतो.

मी पोळी भाजी प्लास्टीकच्या थैलीत घेऊन निघायचे भारतात असताना. रोज जो पहीला भिकारी दिसेल त्याला द्यायचे. काही मुलं (भिकारी) सांगायची "अन्न नको पैसे द्या". पण मी पैसे देणं टाळायचे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे

पाषाणभेद's picture

29 Mar 2010 - 10:42 pm | पाषाणभेद

एकदम छान मुक्तक काका. कधीना कधी प्रत्येकाच्या मनात येणारे विचार मांडलेत तुम्ही.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

मी-सौरभ's picture

30 Mar 2010 - 12:06 am | मी-सौरभ

काही चित्रपट पाहून त्यांच्याकडे बघण्याचा द्रुष्टीकोन बदललाय माझा :(

-----
सौरभ

राजेश घासकडवी's picture

30 Mar 2010 - 3:49 am | राजेश घासकडवी

तुम्ही भिकारी व इच्छामरणाचे भिकारी यांची दोन परिच्छेदात अनपेक्षित सांगड घातली आहे.

मर्ढेकरांप्रमाणे 'मानव्य मिलिंदा' ला पैसा देऊन

होऊनिया नंगे | पोटा घास घ्यावा
आम्हीही तो द्यावा | हलाखी ही

हे म्हणणं काय, किंवा तितक्याच मानव्याची भीक मारणाऱ्या इच्छामरणाची भूक न भागवता त्याला तडफडत जिवंत ठेवणं यातली हलाखी...

या एकाच नाण्याच्या दोन बाजू चटकन छाप-काटा करून दाखवल्याबद्दल धन्यवाद.

राजेश

अरुंधती's picture

30 Mar 2010 - 2:24 pm | अरुंधती

तुम्ही जे विचार सांगितलेत ना, तेच कधी ना कधी माझ्या मनात तरळून गेलेत.

आता विषयांतर :
भिकार्‍यांमध्ये अनेकजण अगतिक, अपंग, असहाय असतात हे मान्य. पण ह्यांच्यातही काही मुरलेले व्यावसायिक असतात. अशा भिकार्‍यांविषयी विस्ताराने लिहिनच. पण मुद्दा हा की दुसर्‍याच्या मनात कणव, सहानुभूती निर्माण करून त्याचा बाजार मांडणारे कमी नसतात. मग तेव्हा खरी द्विधा अवस्था होते.... हा भिकारी खराखुरा कशावरून? फसवत नसेल कशावरून? ह्याला मदत करावी की नाही? ते पैसे तो दारू/ जुगारात उडवणार नाही कशावरून? एक आणि असे असंख्य प्रश्न....

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

प्रकाश घाटपांडे's picture

30 Mar 2010 - 3:54 pm | प्रकाश घाटपांडे

तो भिकारी खुप म्हातारा होता. अशाच अवस्थेत तो अनेक वेळा दिसला आहे. सिग्नलला मुलांना भिक मागायला लावुन पालक बिड्या फुकत दारु पित मला दिसले आहेत. पोरांना खायला चहा बिस्किट देतो असे म्हटल्यावर पैसे दे म्हणतात.
कचरा कुंडीत एकाच अन्नासाठी कुत्रा व भिकारी एकमेकावर गुरगुरताना मी पाहिले होते. तेव्हा माझ्याकडे कॅमेरा नव्हता. अन्यथा टिपता आले असते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

वाहीदा's picture

30 Mar 2010 - 5:02 pm | वाहीदा

कचरा कुंडीत एकाच अन्नासाठी कुत्रा व भिकारी एकमेकावर गुरगुरताना मी पाहिले होते.

असे नेहमीच घडते ... पण आता जरी संवेदनक्षमता थोडी थोडी बोथट होत चालली असली तरीही कोणी कित्ती ही वेड्यात काढू देत, मी मात्र त्यांना मदत करते .. वेळ असेल तरच - पैसे देत नाही पण वडापाव मात्र खरेदी करून देते

Yes But the accepted fact is - we have become too immune , too insensitive to these issues ...
~ वाहीदा

बद्दु's picture

30 Mar 2010 - 3:56 pm | बद्दु

बघा विचार करा...
१. खरे तर भिकार्‍यांना भिक मागण्याची सवय आपणच लावत असतो. काय होईल समजा भिक नाही दिली तर ?

२. साधुसन्तानी सुध्धा हेच म्हटले आहे की " जे का रन्जले गान्जले , त्यासी म्हणे जो आपुले...." आता रन्जले गान्जलेल्यानी भिकच मगितली पाहिजे असे कुठ लिहीले आहे?

३. दान सत्पात्री लागले पाहीजे असे आपले पूर्वज नेहेमी सान्गत आले आहेत, कदचित त्यान्च्या बोलण्यात तथ्य असावे..........

भीक मागण्याची प्रव्रुत्ती (व्यापक अर्थाने) जोपर्य्नत आपल्या समाजातुन जात नाही तोपर्यन्त उन्नती साधणे अवघड आहे.............

बद्दु

प्रियाली's picture

30 Mar 2010 - 5:07 pm | प्रियाली

दयामरणाचा अज्येंडा सोडून बाकी चिंतन ठीक वाटले. :)