लागा चुनरीमे दाग..

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
29 Mar 2010 - 6:48 pm

बॉलिवूडी सिनेमे पाहण्याचं फ्याड आता इथे चांगलंच रुजलं आहे. हिंदी शिनूमांच्या जर्मन डब्ड डीव्हीडी.. नव्हे डेफाउडे, हो जर्मन मध्ये डेफाउडेच! तर ह्या तबकड्या आता दुकानादुकानांतून दिसायला लागूनही जुन्या झाल्या. पण ह्यातलीच एखादी बया आपल्या घरात भेट द्यायला येईल असं मात्र कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं पण.. आमच्या एका फिरंगी मित्राला आणि त्याच्या कुटुंबाला( बायको आणि दोन मुले वयं अनुक्रमे १४ आणि १८) राणीबाई फारच आवडायला लागल्या आणि 'लागा चुनरीमे दाग' नावाच्या सिनेमाची तबकडी आम्हाला चक्क भेट म्हणून दिली की त्यांनी.. आतापर्यंत लागा चुनरीमे दाग.. हे मन्नादांचं एक सुमधुर सेमीक्लासिकल अनेक अर्थछटा असलेलं एव्हरग्रीन गाणं आहे एवढंच माहित होते. आता या गाण्यातले शब्द सिनेटायटल मध्ये जाऊन बसलेत हेच मुदलात माहित नव्हतं आणि हे घोर अज्ञान आमच्या मित्राच्या फ्यामिलीसमोर दाखवणे हा शुद्ध मूर्खपणा झाला असता त्यामुळे, कित्ती कित्ती दिवस मी ही तबकडी मिळण्याची वाट पाहते आहे आणि नेमकी तीच तुम्ही आणून आम्हाला उपकृत केले आहेत असे भाव चेहर्‍यावर आणण्याचा प्रयत्न करून चेहर्‍यावर हसू कमावले.

येथल्या पद्धती प्रमाणे लगेच्च वरचे कव्हर त्यांच्यासमोर उघडले. (हो, येथे तुम्हाला दिलेली भेटवस्तू देणार्‍याच्या समोर लगेच्च उघडून वा, वा.. किती छान! मला हे हवेच होते, खूप आवडले.. इ. इ. म्हणण्याचा प्र-घात आहे)तर कव्हर उघडल्यावर राणीबाईंचे घडी केलेले दोन पोस्टर फोटो आणि एक चक्क पिक्चर पोस्टकार्ड टप्पकन खाली पडले. कित्ती क्यूट आहे ना र्रानी.. ज्यू आणि सि सुपुत्र चित्कारले. खोलीच्या भिंती फोटूंनी सजवण्याच्या वयात देखील मी कधी हे उद्योग केले नव्हते ते आता राणीबाईंना भिंतीवर टांगून काय उजेड पडणार होता? जर्मन कॉंप्लिमेंटला कॉप्लिमेंट म्हणून ज्युनियर आणि सिनियरला ते फोटो मी रिटर्न गिफ्ट म्हणून देऊन टाकले तेव्हाचे त्या दोघांचे प्रफुल्लित, उल्हसित वगैरे चेहर्‍यांचेच फोटो काढायला हवे होते असे राहून राहून वाटत होते.

आम्ही सिनेमा पाहण्यापेक्षा त्यांचं समरसून सिनेमा बघणंच जास्त पाहतो (आणि हसत बसतो! ) ह्या आजवरच्या अनुभवाने तुमचा सिनेमा पाहून झाला की आम्हाला बघायला दे अशी आज्ञावजा विनंती आली. कव्हरवरच्या कलाकारांची जंत्री पाहून कचकडी, चकचकीत सिनेमात आणि एक भर हा अंदाज येऊन मी म्हटलं, "अरे, तुम्ही ही तबकडी घरी घेऊन जा, हवे तितके वेळा पाहा आणि सवडीने परत द्या. (नाही दिली तरी चालेल असं त्यांच्या प्रेमाच्या भेटीला म्हणता येत नव्हतं, सिनेमा टुकार असला तरी ' भावना महत्त्वाची'! ) पण त्यांनी आणलेली भेट असल्यामुळे त्यांनीच कसा आमच्याआधी पहायचा सिनेमा? असा कूटप्रश्न त्यांना पडला. दोन्ही मुलांचे (आणि त्यांचा बापही!)उत्सुक चेहरे वाचत सध्या निवांत वेळ नाही, आधी तुम्ही पाहा रे असं प्रकट आणि दुसरं करण्यासारखं काही नसेल तेव्हा पाहीन मी.. असं स्वगत म्हणून पाहिलं पण त्यांचं जेव्हा'पहले आप, पहले आप' सुरू झाले तेव्हा ज्युनियरच्या हातात तबकडी आणि मित्राच्या हातात पेला चक्क कोंबला आणि विषय संपवला. तीन चारच दिवस मध्ये गेले असतील, नसतील.. ज्यू आणि सि दोघेही एक दिवस भारावून तबकडी घेऊन आले आणि भाराभर धन्यवादवून लवकर पाहा ग सिनेमा असा सल्ला देऊन गेले. तोंडदेखलं हो,हो म्हणत फोन जागेवर आणि तबकडी आपली स्ट्यांडावर विराजमान!

मध्ये बरेच दिवस गेले पण मी काही अजून चित्रपट पाहिला नव्हता, ज्यु आणि सि दोघांनी वेगवेगळ्या वेळी फोन करून सिनेमा कसा वाटला अशी विचारणा केली. काहीतरी कारणं सांगून वेळ मारून नेली आणि पुन्हा त्या मंडळींचा फोन यायच्या आत लाजेकाजेस्तव तरी सिनेमा बघावा म्हणून शेवटी एके दिवशी मुहूर्त काढला सिनेमा पहायला.. बाहेर हिमनृत्य चालू झालं होतं. दार उघडण्यासारखी सुद्धा हवा नव्हती त्यामुळे ह्या तबकडीला गोषाबाहेर काढली. जर्मन, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांतून उपरोक्त सिनेमा असून भाषा निवडण्याचे स्वातंत्र्यही असलेले पाहून क्षणभर अवाकच झाले. सिनेमा सुरू केला. हिंदीचा कंटाळा आला की जर्मन, जर्मनमध्ये बोअर व्हायला लागलं की विंग्लिश असा त्रैभाषिक सिनेमा बघणारी मीच असेन या भूतलावर बहुदा.. तर ते असो. पण खरी गोष्ट अशी की असे करत पाहिला म्हणून सिनेमाच्या शेवटापर्यंत जाऊ शकले, :)

आता चित्रपटाविषयी एवढे गुर्‍हाळ ऐकल्यावरही जर "ष्टूरी" ऐकायची असेल तर पुढच्या भागात..

चित्रपटलेख

प्रतिक्रिया

अरुंधती's picture

29 Mar 2010 - 7:24 pm | अरुंधती

त्रैभाषिक सिनेमा म्हन्जे एकदम कै च्या कैच! जय बॉलिवुड मय्या! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

रेवती's picture

29 Mar 2010 - 7:28 pm | रेवती

तुम्हाला दिलेली भेटवस्तू देणार्‍याच्या समोर लगेच्च उघडून वा, वा.. किती छान!
हो अगदी!
मुलांच्या वाढदिवसांना हे असे प्रकार चालतात.
कधीकधी पुन्हा त्याच भेटवस्तू आल्यास (गिफ्ट रिसिट असूनही) चेहेर्‍यावरचे ओशाळलेले भाव लपवत अनेक पालक तिथून निघायची वाट पहात असतात. लहान मुले कधेतरी पटकन् 'मला हा गेम आवडत नाही' असं बोलून जातात.;)
बाकी शिनुमा पाहून जरा 'हेच' वाटलं होतं.;)
रेवती

श्रावण मोडक's picture

29 Mar 2010 - 11:24 pm | श्रावण मोडक

वा. पाकृ ते चिकृ... छान प्रवास सुरू आहे. लेखन सहज-सोपे आवडले. हा चित्रपट मी तर ऐकलाही नव्हता. काय प्रकार होता?

मनिष's picture

29 Mar 2010 - 11:27 pm | मनिष

त्यापेक्षा ओरीजिनल सुमित्रा भावेंचा "दोघी" बघा, तो बराच चांगला आहे!
बाकी परीक्षण लिहाच - भन्नाट मजा येईल! :-)

प्रमोद्_पुणे's picture

30 Mar 2010 - 11:21 am | प्रमोद्_पुणे

दोघी फारच छान आहे.. आणि त्यातले मा. माधुरींचे "फाल्गुन मास येता" गाणे केवळ केवळ अप्रतिम..

शुचि's picture

29 Mar 2010 - 11:32 pm | शुचि

लेख आवडला
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे